Total Pageviews

Friday 15 May 2020

करोनाचा संसर्ग बळावला तर?

  1. करोनाचा संसर्ग बळावला तर? 

 करोना अजून आटोक्यात येण्याची चिन्हं नाहीत, किंबहुना आगामी काळात तो वाढण्याची शक्यताच अनकेजण व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाची सद्यस्थिती आणि करोनाशी लढण्यासाठी काय करायला हवे.......

करोनाच्या रुग्णांसाठी आपण अनेक व्यवस्था करत आहोत हे योग्यच आहे. एखाद्या व्यक्तीचे 'करोना बाधित' असे निदान झाल्यानंतर त्याचे योग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णाच्या लक्षणाप्रमाणे, त्याच्या इतर आजारांप्रमाणे व वयाप्रमाणे त्याचे योग्य त्याठिकाणी विलगीकरण आणि उपचारांची व्यवस्था केली जात आहे.

ठिकठिकाणी ऑक्सिजन केंद्रे तयार केली जात आहेत. राज्यसरकार अत्यंत कसोशीने करत असलेल्या या प्रयत्नांमुळे रुग्णांना नक्कीच फायदा होईल. परंतु आताचे, झपाट्याने पसरणाऱ्या करोनासाथीचे स्वरूप पाहिले, तर आता याहून अधिक व्यापक विचार अधिक जोमाने करण्याची गरज आहे.

त्यासाठी करोनाचे रुग्ण वाढत असले, तरी प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा काटेकोरपणे पाठपुरावा करून त्या सर्व व्यक्तींना घरी किंवा नियुक्त ठिकाणी वेगळे ठेवण्याची व्यवस्था कसोशीने केली पाहिजे. कारण ह्याचमुळे ह्या रोगावर नियंत्रण आणता येईल आणि यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो,
तो प्राथमिक आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा जनसंपर्क व समाजाचा त्यांच्यावर असणारा विश्वास. एखाद्या विभागात करोनाचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर तेथील लोकांनी विश्वासाने आरोग्य सेवकाकडे आले पाहिजे व आपला आजार न लपवता त्यावर तपासणी व उपचार करून घेतले पाहिजेत. 

पण बरेच वेळा लोक घाबरतात, quarantine होण्याच्या भीतीने आजार लपवतात किंवा पॅरासिटामोलची गोळी घेऊन ताप असेल तर तो अंगावर काढतात. एखाद्या व्यक्तीस जास्त लक्षणे नसतील किंवा
कमी लक्षणे असतील, तर ती व्यक्ती काही दिवसांनी उपचारशिवाय बरी होईलही, परंतु त्या काळात इतर अनेकांना ह्या आजाराचा संसर्ग देऊन जाईल.

केरळ राज्यात हेच चित्र वेगळे आहे. तेथे प्राथमिक आरोग्य व्यवस्था सक्षम तर आहेच, परंतु लोकांचा तेथील कर्मचाऱ्यांवर, व्यवस्थेवर, 'आशा'-'उषा' सेविकांवर प्रचंड विश्वास आहे. तेथील नागरिक स्वतःहून ह्या कर्मचाऱ्यांकडे येऊन तपासण्या व उपचार करून घेतात.

प्रत्येक वस्तीमध्ये किंवा वसाहतीत तेथील उपचार व्यवस्था व सुविधांमध्ये तेथील स्थानिक नेत्याचा महत्त्वाचा सहभाग असतो. लोकप्रतिनिधी व स्थानिक नेतृत्वाच्या सहभागाने आपत्तीच्या काळात अशा आरोग्यसुविधांचा योग्य उपयोग करता येतो. लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या सहभागामुळेच केरळमध्ये करोनाच्या साथीवर नियंत्रण आणणे शक्य झाले.

केरळप्रमाणेच मुंबई शहरातही काही प्रमाणात आरोग्य सेविकांचे जाळे आहे. पल्स पोलिओ कार्यक्रमामध्ये त्यांनी चांगले काम करून यश मिळवले आहे. ३ वर्षांपूर्वी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर लेप्टोचा आजार पसरू नये म्हणून याच सेविकांनी मुंबईतील ६५ लाख व्यक्तीपर्यंत पोचून त्यातील लाखो व्यक्तींना प्रतिबंधक औषधे अवघ्या दोन दिवसांत दिली होती.
 त्यामुळे त्यावेळी लेप्टोमुळे अगदी कमी मृत्यू झाले होते. या आरोग्य सेविकांना योग्य त्या सुविधा व मानधन देऊन त्यांच्या लोकसंपर्काचा वापर करूनच करोनासारख्या समुदायात वाढणाऱ्या आजारावर नियंत्रण आणले पाहिजे.

बळाचा किंवा पोलिसांचा वापर करण्यापेक्षा, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेत्यांचा लोकसंपर्क, आरोग्यसेविकांवरील विश्वास व जनतेची साथ ह्या मानवी घटकांमुळेच अशा साथीमध्ये जास्त यश प्राप्त होते. म्हणूनच पुढील काळात आपल्याला आरोग्यसेविका व प्राथमिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर द्यायला हवा.
आरोग्य व्यवस्थेसाठी संक्रमण काळ
आरोग्य व्यवस्थेवर अजून काही काळ हा ताण राहणार आहे. आता पावसाळा सुरू होणार असल्यामुळे पुढील काही महिन्यांत पावसाळी आजारांचा भारही करोनासोबत पेलायचा आहे. त्यासाठी थकलेल्या आरोग्यरक्षकांना चक्रांकित पद्धतीने विश्रांती देऊन त्यांचे मनोबलही वाढवणे आवश्यक आहे. भविष्य काळात आरोग्य क्षेत्रात भरीव गुंतवणूक करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणे अनिवार्य आहे.
करोना विषाणूच्यावर उपयुक्त अशी लस तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही शास्त्रज्ञांना त्यात प्राथमिक यश येते आहे. अर्थात अशी लस तयार करण्यात यश आले, तरी ती लस आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत वर्षअखेर उजाडणार आहे. तेव्हा एकूणच लस किंवा संसर्ग झाल्याने जनसामान्यात रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावरच, ह्या आजाराचा जोर/धोका कमी होणार आहे.

करोना विषाणूची आतापर्यंत जगातील ५० लाख रुग्णांना बाधा झाली असून, ३ लाखाच्यावर मृत्यू झाले आहेत. ज्या वेळी करोनासारख्या नव्यानेच निर्माण झालेल्या संसर्गजन्य आजाराचा वेगाने प्रसार होतो, तेव्हा एकाच वेळी रुग्ण संख्या मोठ्या संख्येने वाढते. अशा काळात आरोग्यसेवा व संस्था, सतत वाढणाऱ्या रुग्णांसाठी तयार नसल्याने आरोग्य व्यवस्थेवर एकदम ताण येतो आणि मृत्यूचे प्रमाण वाढते.
युरोप व अमेरिकेत काही ठिकाणी रुग्ण-संख्या काही लाखात आहे व मृत्यूदर १०-१५ टक्
के एवढा आहे. त्यामुळे अनेक देशात रस्त्यावर रुग्णांच्या खाटा, मृतांची अव्यवस्था... अशी दारुण दृश्ये आपण पाहिली आहेत. त्यासाठीच करोना प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांत लॉकडाउनचाच पर्याय वापरला गेला.
परिणामी ४०-५० दिवसांनंतर काही देशांत (स्पेन, इटली, जर्मनी व स्वित्झर्लंड) रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण आता कमी झाले आहे. तेथे आता लॉकडाउन शिथिल होऊन सर्व लोक सुरक्षितता सांभाळून रोजचे कामकाज करत आहेत. जपान, सिंगापूर, कोरियासारख्या देशांनीही जास्त तपास व विलगीकरण काटेकोरपणे पाळून हा आजार नियंत्रित केला.

भारतासारख्या विकसनशील देशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात लोक लोकलने प्रवास करतात व झोपडीवजा घरात दाटीवाटीने राहतात.
साहजिकच इथे ह्या आजाराचा प्रसार आता आहे त्यापेक्षा अधिक वेगाने होऊ शकला असता, परंतु तो लॉकडाउनमुळेच नियंत्रित आहे. आज महाराष्ट्र व मुंबईत करोनाबाधित रुग्णांमध्ये मृत्यूदर ३.७ टक्क्यापर्यंत नियंत्रित आहे,ते ही लॉकडाउनमुळेच शक्य झाले आहे, लक्षात घ्यायला हवे.

 मात्र आता हा आजार अधिक लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते जूनच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या वाढत राहील.
म्हणजेच पुढील काही महिने थोड्याफार प्रमाणात हा आजार आपल्यासोबत राहणार आहे. परंतु त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. शासनाने वाढलेल्या आरोग्य सुविधांमुळे ह्या आजारास तोंड देण्यासाठी आपण आता अधिक सक्षम आहोत.
लॉकडाउन हा पर्याय योग्यच आहे, परंतु लॉकडाउन तरी किती काळ ठेवणार? म्हणूनच जिथे रुग्ण-संख्या आटोक्यात आहे, तिथे निर्बंधासहित लॉकडाउन शिथिल करून कामकाज पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही सेवा, जेथे घरून काम करणे शक्य नाही, अशा ठिकाणी तरुणांना प्रवास करण्याची व कामावर परत जाण्याची परवानगी देऊन दुकाने, उद्योग व ऑफिसेस पुन्हा कार्यरत केले पाहिजे. कारण भारतासारख्या विकसीनशील देशात आर्थिक व औद्योगिक मंदीमुळे जास्त हानी होण्याची शक्यता आहे.

अर्थात मुंबई, ठाणे व पुणे येथे लॉकडाउन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण लॉकडाउन नंतर लोकांचा प्रवास व संपर्क वाढून ह्या आजाराचे प्रमाण काही अंशी वाढू शकते. म्हणूनच इतरत्र लॉकडाउन उठवला तरी आपण सर्वानी काही काळापर्यंत स्वतःसाठीच नाही, तर इतर सर्वांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
मास्कचा योग्य वापर, अनावश्यक प्रवास टाळणे, फिरताना किंवा प्रवासात विलगीकरण पाळणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर, जोरात न बोलणे... इत्यादी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. एकमेकांशी हस्तांदोलन, मिठ्या मारणे, पार्टी... इत्यादीवरही बंधन राहणारच आहे. घरी येणारे सामान हे काही तास हात न लावता बाजूला ठेवणे, भाज्या व फळे कोमट पाण्याने धुणे, बाहेरचे खाणे टाळणे हे ही अगदी जरुरीचे आहे.
विस्कळीत झालेली आर्थिक आणि औद्योगिक व्यवस्था पूर्ववत येण्यास काही काळ नक्कीच लागणार आहे- तो कदाचित १-२ वर्षांचा असू शकेल. त्यासाठी संयम व कष्ट अपेक्षित आहेतच, पण मानसिक दृष्ट्या आपण सगळ्यांनी सक्षम असणे अधिक आवश्यक आहे. मन खंबीर ठेवूनच अशा ह्या संक्रमण काळात आपण जगायला शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा काळात माणसाने माणुसकीने दुसऱ्याला दिलेला आधार व साहाय्य हेच महत्त्वाचे आहे!
(केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता)
आरोग्य मंत्रालयाच्या विशेष हेल्पलाईन अशा आहेत. +91-11-23978046, ncov2019@gmail.com and ncov2019@gov.in.
 
 
 **************************************************************************************************************

 

2. करोना  या आजाराविषयी आतापर्यंत आपल्याला जेवढी माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे आपण वैयक्तिक पातळीवर करोनाशी लढा देण्यास सक्षम आहोत.
परंतु.. इटलीने काय करायला हवं होतं?, अमेरिकेचं काय चुकलं?,चीनने काय कारस्थान केले? त्याला पुरावा काय? भारताला किती व्हेंटिलेटरची गरज आहे? या वादविवादात अवाजवी रस घेऊन मन:स्वास्थ्य बिघडवून घेऊ  नये ही कळकळीची विनंती.  त्यापेक्षा संचारबंदी आणि जमावबंदी फारशी गांभीर्याने न घेतल्यास काय उत्पात घडू शकतो याचे गणित समजून घ्या आणि ‘आपल्याला काय होतंय’ या बिनबुडाच्या आत्मविश्वासाने  विनाकारण घराबाहेर जाणाऱ्या मित्रांना ते समजावून सांगा.



करोनाशी लढायचं म्हणजे दोनच नियम प्रामाणिकपणे पाळायचे.  
एक म्हणजे, स्वत:ची काळजी घ्यायची आणि
दुसरं म्हणजे, इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यायची.
 या दोन नियमांचे काटेकोर पालन केलं की आपण हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवू शकतो.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी  : 

# हात सतत स्वच्छ ठेवावे, करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी किमान २० सेकंद हात साबणाने धुणे आवश्यक आहे. तेवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं.
# लोकांपासून चार हात दूर राहायचं. कुणी परिचितही भेटला तरी, हात जोडायचे. हस्तांदोलन पूर्णपणे बंद. वाद कितीही चिघळला तरी समोरच्याशी ‘दोन हात’ करणं टाळलेलंच बरं. कारण अशा परिस्थितीत सुरक्षित अंतर राखण्याचा नियम पाळणं कठीण असतं.
# घराबाहेर जाणार असल्यास हातरुमाल नाकतोंड झाकेल असा बांधावा व घरी परतल्यावर स्वत:च्या हाताने साबण लावून धुवावा.
# जिना चढताउतरताना रेलिंगला हात लावू नये व तीच खबरदारी लिफ्टमध्येसुद्धा घ्यावी  (वयोमानपरत्वे रेलिंग गरजेचे असल्यास हँड सॅनिटायझर हाताशी ठेवावे.)
# दाराचे हँडल, लिफ्टची बटणे, सार्वजनिक टेलिफोन, कामाचे टेबल-खुर्ची, दुकानाचे काउंटर या ठिकाणी हात नाइलाजाने वा अनवधानाने लागतोच त्यामुळे  ‘हात लावाल तिथे विषाणू’  असण्याची शक्यता आहे हे पक्के ध्यानात ठेवा म्हणजे झाले. आणि म्हणूनच इथे सर्वाधिक काळजी घ्यायला पाहिजे.
# वाणसामान, कुठलीही वस्तू वा भाजी घेताना विनाकारण हाताळण्याचा मोह टाळावा, खरेदी त्वरित आटोपावी.
# गरज नसतांना मास्क वापरण्याचे धोके:
मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे. जर ते आपण अधिक काळ वापरल्यास....
1. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
2.मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो.
3.तुम्हांला अशक्तपणा जाणवू लागतो.
4.परिणामी मृत्यू ही ओढवण्याची संभावना बळावते.
# उपाय/सल्ला:
अ.)तुम्ही जेव्हा एकटे असाल मास्क तेव्हा विनाकारण मास्क परिधान करू नका.मी बऱ्याचदा असे पाहतो की,बरेचसे लोक वातानुकूलित (A.C.)कारमध्ये सुद्धा मास्क परिधान करतात.याला काय म्हणावे अज्ञान किंवा निरक्षरता?
ब)शक्यतो घरी मास्क  वापरू नये.
क)गर्दीच्या ठिकाणी किंवा जेथे एक किंवा अधिक लोक एकमेकांच्या खूपच जवळ संपर्कात येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी मास्क वापरावे.
ड) जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा मास्कचा उपयोग कमीत कमी करा.
#*सुरक्षित राहा*




**************************************************************************************************************

 

पुलाव:-

        एका रेस्टॉरंटमध्ये एका सुप्रसिद्ध शेफने उच्च प्रतीचा तांदूळ वापरून अतिशय चवदार पुलाव बनवला . पुलाव तयार होताच त्याचा सुगंध आसमंतात पसरला.  प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. 
        सगळ्यांनाच त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली . जवळपास १०० लोकांना रेस्टॉरंटमधील वेटरने पुलाव वाढला .प्रत्येकाने पहिला घास हातात घेतला आणि तोंडात घालणार ........ त्या क्षणी

     शेफने येऊन सांगितले 'यात  गारेचा एक खडा पडलाय' आणि तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कुणाला येईल हे सांगता येणार नाही. 'काळजी घ्या कुणाच्या दाढेखाली आला तर ईजा होऊ शकते म्हणून ' सांगितले. 

      आता पुलावचा स्वाद चांगला आहे ,चव उत्तम आहे,  तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. 

" प्रत्येक घास गणिक चवीकडे लक्ष न जाता घास सावकाश खाल्ला जातोय न जाणो खडा याच घासला आपल्यालाच आला तर काय घ्या".

          आता सगळ्यांच्या जेवणातली मजा गेली. जो तो सावध झाल्याने गप्पा गोष्टी विनोद काहीही झाले नाही. सर्वांनी शेवटपर्यंत जेवण केले अगदी शेवटचा घास देखील सावधपणे घेतला.
 सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुस्कारा सोडला.
    हात धुतले तेव्हा कुणाच्या तरी लक्षात आले अरेच्चा कुणालाच खडा आला नाही.

           शेफला बोलावले त्याला विचारले तू तर म्हणाला होतास की खडा येईल तो म्हणाला मी काढले  'बहुतेक पण एखादा राहिला असेल असे वाटले म्हणून तुम्हाला सावध केलं.'
          सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या पुलावावर चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमलेले होते....

 कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती. 

       जबड्याच्या हालचालीतली सहजता गेली होती म्हणून जेवण जेवणे कष्टदायी झाले होते. 

   तात्पर्य:-
       सध्या कोरोनामुळे आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. 

कुणाला हा खडा येईल हे सांगता  येत नाही. "जगण्यातील सहजता" गेली. 

अगदी मदत करणारा हात देखील कोरोनाचा असेल का, दूधवाला, भाजीवाला, किराणावाला जीवनावश्यक वस्तू देताना वस्तू बरोबर काय देईल याची शंका घेऊन जगतोय आपण. 

      पूर्वी शींक आली की वाटायच कोणीतरी आठवण काढली..
   आता शींक आली की वाटत..
    देवाने आपली फाईल बाहेर काढली की काय...

        माहीत नाही किती दिवस चालेल हे पण  "जगण्यातली सहजता" किती महत्वाची आहे हे आता कळले....

  **************************************************************************************************************

 

 

2. जैसे कर्म तैसे फळ : गीताभ्यास

 

कर्म सिद्धांतावर विज्ञान आणि धर्म यात मतमतांतरे नाहीत.
धर्मानुसार, हे कार्य आणि कारण असते. तर, विज्ञानानुसार, ही क्रिया आणि प्रतिक्रिया असते. न्यूटनने मांडलेल्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे कर्म सिद्धांत आहे.

कर्म सिद्धांताप्रमाणे आपल्या जीवनात आज जे घडत आहे, ती आधी आपण केलेल्या कार्याची प्रतिक्रिया आहे. ही कर्म आपण याच जन्मी केली असतील, असे नाही. कदाचित आधीच्या कालखंडातील ही कर्म असू शकतात, ज्याची आपल्याला आठवण नसते. प्रत्येक कार्यामागे काहीतरी कारण असते, यावर कर्म सिद्धांताचा दृढ विश्वास आहे.

काही कार्याची फळे आपल्याला तात्काळ मिळतात. तर काही कर्माची फळे मिळायला युग लोटू शकते. मात्र, आपल्या कर्माचे फळ मिळते, हे नक्की. यामुळे या जीवनात चांगली कर्मे केली नाहीत, तरी अशा व्यक्तींना दुःख आणि समस्या सतावत नाहीत. मात्र, प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. यामागे कर्म सिद्धांताची तत्त्वे लागू होतात. कर्म तत्त्वज्ञानातील कार्य आणि कारण या दोन घटकांचाकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनहा मुख्य आधारस्तंभ आहे. अनेकदा या सिद्धांतावर टीका झाली, याबद्दल वाद-विवाद झाले. परंतु, सिद्धांताची महती आजही तशीच आहे.

समस्यांमुळे दुःखी होणे, मानवी स्वभाव आहे. मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांनाही कर्म चुकले नाहीत. माणूस जितका परिपक्व होईल, तितका तो भावनिकदृष्ट्या सशक्त होतो, असं पतंजलीच्या योग सूत्रात म्हटलंय.

आपल्या भावना या आपण केलेल्या कर्माचे कारण असतात, ज्या जन्मजन्मांतर आपला पाठलाग करत राहतात. म्हणूनच जगाला भवसागर म्हटले आहे. कारण मानवी आयुष्य हे भाव प्रधान आहे. चांगली कर्मे नेहमी आपल्याबरोबर राहणार असतात. त्याचे फळ आत्ता मिळाले नाही, तरी ते मिळेल हे नक्की. वाईट, चुकीच्या कर्माची फळे तात्काळ प्रभावाने मिळाली नाहीत, तरी ती पुढील जन्मी चुकती करावी, लागू शकतात. गीतेच्या कर्म सूत्राप्रमाणे फळाची अपेक्षा करता कर्म करत राहणे आवश्यक आहे.
‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं, कधी मिळेल यावर तुमचा हक्क नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका, असं म्हणणं जास्त उचित.
आत्म्याची अमरता व स्वधर्मपालन याविषयीचं मार्गदर्शन करून भगवंतांनी अर्जुनाला ‘लढणं’ हेच तुझं कर्तव्य आहे, तोच तुझा धर्म आहे, हे सांगितल्यानंतरही आपल्या हातून आप्त-गुरुजनांचा मृत्यू घडल्यास आपल्याला घोर पाप लागेल, ही अर्जुनाच्या मनाची धारणा त्याला त्रास देत होती. निर्णय घेण्यापासून परावृत्त करत होती.
अर्जुनाची ही मनस्थिती पाहून भगवंतांनी त्याला पुन्हा समजावलं. भगवंत म्हणाले, ‘‘अर्जुना, अरे पाप-पुण्य, जय-पराजय या गोष्टी युद्धाच्या अंती परिणामांच्या रूपाने समोर येतील. युद्ध सुरू होण्याच्या आधीच परिणामांच्या विचाराने तू हताश झालास तर तुझी युद्धकर्तव्यातील एकाग्रता नाहीशी होईल. युद्धाच्या वेळी अशी अस्थिर मनोवृत्ती असणं चांगलं नाही. मनाचा समतोल ठेवून युद्ध कर. तुझ्या  हातून घडणारं युद्धासारखं कर्मसुद्धा ‘कर्तव्य व स्वधर्मपालन’ असल्याने त्याचं तुला पातक लागणार नाही. तू कर्मबंधातून सुटशील.’’
या ठिकाणी भगवंत ‘कर्मबंध’ असा शब्द वापरत आहेत. कर्माचं बंधन म्हणजे कर्मबंध. कर्माचा साधा अर्थ आहे कोणतीही क्रिया! प्रत्येक कर्माचं फळ ठेवलेलंच आहे, असा कर्माचा सिद्धांत आहे. हेच त्याचं बंधन आहे. कर्मावर आधारित एक फार प्रसिद्ध श्लोक गीतेत आहे :

   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥२.४७॥

साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. पण खरं तर या श्लोकात जो ‘अधिकार’ हा शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. गीता सांगते, ‘‘तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे. कोणतं कर्म करायचं? कसं करायचं? हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं व कधी मिळेल यावर तुमचा काहीच हक्क चालत नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका, असे म्हणणे उचित ठरेल.
खरं तर, सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादं कार्य करायचं ठरवतो, तेव्हा त्याला त्यापासून काही ना काही मिळवण्याची अपेक्षा असते. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहाच्या कपापासूनसुद्धा समाधान किंवा तरतरी अपेक्षित असते. इतर सर्व कामंसुद्धा शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा फळांसाठीच केली जातात. काही नको असेल किंवा काही मिळणार नसेल तर माणूस काहीच हालचाल करणार नाही. म्हणजेच फळाची आशा असतेच!
मग हा श्लोक काय सांगतो? फळाची चिंता करता करता काम करायला लागाल तर प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष होईल. तुम्हाला जे फळ अपेक्षित आहे ते तसंच मिळण्यासाठी तुमचं कर्म त्या फळाच्या कसोटीला उतरेल इतकं व्यवस्थित व्हायला हवं. भविष्याच्या काळजीपायी वर्तमानाकडे लक्ष रहाणार नाही. शिवाय जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्यावर विचार करण्यात काय अर्थ आहे? तेव्हा फळाची आसक्ती न धरता, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण करा. जसं कर्म तसं फळ मिळेलच. चांगल्या कर्माचं चांगलं फळ उपभोगायचं तर वाईट कर्माची वाईट फळं भोगायची. या कर्माच्या सिद्धांतापासून सुटका नाही. हे माहीत असल्यामुळेच नरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनाची अशी स्थिती झाली होती.
गीतेला मनुष्यप्राण्याची गमतीशीर मनोवृत्ती चांगलीच माहीत आहे. म्हणून श्लोकाच्या दुसऱ्याच ओळीत भगवंत बजावत आहेत की, फळाकडे ध्यान द्यायचं नसेल तर काही कर्मच करायचं नाही, असंही तू करू नकोस. कारण कोणीही कर्म केल्यावाचून क्षणभर राहू शकत नाही. तेव्हा कर्मच न करणं हा विचार चुकीचाच आहे. अशा परिस्थितीत काही जण म्हणतील की आम्ही कर्म करणार आणि फळं चाखणार. काही म्हणतील की फळ मिळणार नसेल तर कर्मच करणार नाही. गीता सांगते, ‘कर्म तर कराच, पण फळ सोडा. फळाची आसक्ती फळावरचं ध्यान, चिंतन सोडा. कुठल्याही बाजूचं फळ मिळालं तरी मनाचा तोल ढळणार नाही अशी मनाची तयारी करा. जय-पराजय, सुख-दु:ख, लाभ- हानी अशा कुठल्याही परिणामाने विचलित होणार नाही अशी सम-भावना मनात ठरवून घ्या.

अशा प्रकारे गीता, मानवी मनाच्या विकासाची एक पायरी सांगते. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानराचा नर झाला आणि शारीरिक विकास परिपूर्ण झाला. इथून पुढे विकास व्हायला हवा तो मानसिक-तरच नराचा नारायण होईल. गीता आपल्याला या मार्गाची ओळख करून देते. अपेक्षा न ठेवता कर्म करीत रहाणं व फळाची आशा न ठेवणं हा मानसिक विकासाचा टप्पा आहे.
मनात कुठलीही कामना न धरता जेव्हा कार्य केलं जाईल तेव्हा ते निष्काम कर्म होईल. गीता निष्काम कर्माला महत्त्व देते. मनातील कर्तव्याची इच्छा आणि बुद्धीचा त्या दृष्टीने वापर अशी सांगड घालून एकाग्रतेने व कौशल्याने कर्म कराल तर बुद्धी कर्माशी साधली जाईल. योगबुद्धी होईल. कारण ‘योग’ म्हणजे सांधणे-जोडणे. कर्मापेक्षाही कर्म करताना कोणत्या विचाराने किंवा हेतूने कर्म युक्त आहे हे महत्त्वाचे असते.
या ठिकाणी गीता ‘योग’ या शब्दाच्या दोन सुंदर व्याख्याच सांगते. ‘समत्व योग उच्यते’ आणि योग कर्मसु कौशलम्’! समतोल व स्थिर बुद्धी असेल तर कर्म कौशल्यपूर्ण आपसूक होईल. योग साधेल.
माणसाला जीवनात सुख व शांती यांचीच आस असते. सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते. पण मनाची शांती तेव्हाच मिळेल जेव्हा भविष्यकाळाची चिंता नाहीशी होईल. ‘आपण आपलं काम नीट करू , मग काय व्हायचं ते होईल,’ अशी मनाची धारणा एकप्रकारची शांती देईल. आपली इंद्रियं सतत वखवखलेली असतात. त्यावर थोडा काबू ठेवला की आपोआप गरजा, अशांती, चिंता या गोष्टींपासून सुटका होईल. अशा तऱ्हेने मनोवृत्ती विकसित करता येईल व मनाला, बुद्धीला स्थिरता येईल.
भगवंत सांगतात, की ‘अशा समबुद्धीने व स्थिर चित्ताने कर्तव्य करणारे लोकच कर्मबंधातून मुक्त होतात. निष्काम कर्म कर, असे झाल्यास तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. निष्काम कर्म, स्वधर्मपालन, समतोल व संयमी बुद्धी, इंद्रियांवर पूर्ण ताबा, काम-क्रोधावर विजय या सर्व गोष्टींमुळे तू पूर्ण स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ होशील व तुला ‘ब्राह्मी’ स्थिती प्राप्त होईल.
 
कर्मयोग म्हणतो की, ‘निरंतर कर्म करा. परंतु कर्मावरील आसक्तीचा त्याग करा.’ कशाशीच एकजीव होऊन जाऊ नका, कशालाच चिकटून राहू नका. मन स्वाधीन ठेवा. आपल्या आयुष्यातील दुख,  कष्ट या पैकी काहीच चिरस्थायी नाही. दारिद्रय, समृद्धी, सुख इत्यादी सर्वच क्षणिक आहे. त्याचा आपल्या खऱ्या स्वरूपाशी काहीच संबंध नाही. स्वरूपत आपण सुखाच्या आणि दुखाच्या, प्रत्यक्षाच्या किंवा कल्पनेच्या अगदी पलीकडचे आहोत आणि तरीही आपल्याला अखंड कर्म आचरीत गेलेच पाहिजे- नान्य पन्था!’    
-स्वामी विवेकानंद 

No comments:

Post a Comment