Total Pageviews

Friday 27 December 2019

आवडलेले सुंदर लेख

******************************************************************

 

 

 

******************************************************************

******************************************************************

🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀
              🔸देव आणि दैव...!🔸

गवतात हात घालून दुर्वा तोडताना पाहून सुषमा ताई थांबल्या. आजीना म्हणाल्या, "आजी, अहो गवतात हात घालून दुर्वा घेताय, चावेल काही अन् हाताला लागू शकेल, बाहेर १०-२० रुपये देऊन स्वच्छ जुडी मिळते दुर्वांची."

त्यावर आजी बाईंनी मागे वळून सुषमा ताईंकडे पाहिलं आणि किंचित गालात हसून म्हटल्या, "तुम्ही पण या माझ्या सोबत वेचा दुर्वा आणि घरी जाऊन स्वच्छ धुवून २१-२१ बांधा आणि वाहून पाहा गणरायाला खूप आनंद मिळेल. हा आनंद त्या विकतच्या जुडीत नाही हो. परसात आलेली फुलं देवाला वाहाताना जो आनंद आहे तो २०रुपयाचा फुलाचा पूडा आणून वाहाण्यात नाही."

खरं तर सुषमा ताई काळजीपोटी आजीना सूचना देत होत्या, पण आजी त्यावर मनातलं बोलू लागल्या. "कुठे राहाता तुम्ही ?" आजीनी ताईना प्रश्न केला. ताई उत्तरल्या, "बी विंग मधे राहाते. नवीनच आलोय राहायला. मी आणि आहो. मुलगी परदेशात असते लग्न झालंय तिचं. बस फार जबाबदारी नाही. वेळ भरपूर असतो मग एका संस्थेसाठी काम करते. अनाथ आश्रमात."

सुषमा ताईंकडे बघण्याची आजीबाईंची नजर आता बदलली होती...

सुषमा ताई बोलू लागल्या,"आजी या अनाथाश्रमातील मुलांकडे पाहीलं ना की या देवावरचा विश्वासच उडतो हो..." त्यांचे डोळे पाणावले.

आजीबाईंनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून, शेजारीच असलेल्या मंदिराच्या पायरीवर बसा अशी खूण केली. एक मिनीटाच्या शांततेनंतर आता आजी त्यांच्या अनुभवाचे बोल बोलू लागल्या... "पोरी, 'देव'ही फार मोठी संंज्ञा आहे. प्रत्येक जण स्वतःला हवा तसा त्याचा अर्थ लावत असतो. देवाला रजनीकांत सारखा हीरो बनवतात. तर कधी प्रेम चोप्रा, एक व्हिलन. कधी माय माऊली तर कधी दगड. पण खरा देव कोणाला कळालाच नाही. 'देव आणि दैव' यात एकाच मात्रेचा फरक असला, तरी फार भिन्न अर्थ आहे. देव ही पवित्र शक्ती आहे, पण दैव हे भोग आहेत आयुष्याचे. कधी सुखाचे भोग, कधी दुःखाचे."

"पण आजी मी एकेकाळी खूप केलंय हो देवाचं..." सुषमा ताईं मधेच बोलल्या, "पण मला सुद्धा एकटेपणा आहे. माझे अहो आजारी असतात. मुलगा अपघातात गेला. मुलगी परदेशात. मलाच का हे दुःख ?"

आजी जरा गंभीर होऊन बोलू लागल्या,"समाजात चार प्रकारची माणसे असतात. एक जी पिढी, रुढी, परंपरा म्हणून देवाचं करतात, दुसरा स्वतःची संपत्ती उधळायला, बडेजाव मिरवायला दिखावा म्हणून देवाचं करतात, तिसरा भीती पोटी देवाचं करतो. आणि चौथा मनशांतीसाठी करतो, श्रध्देपोटी करतो. या चार प्रकारच्या माणसांत तू कुठे बसतेस ? ते तूच स्वतः शोध तुला सारी उत्तरं मिळतील..."

सुषमा ताई बुचकळ्यात पडल्या. त्यांची संभ्रमावस्था पाहून आजी समजावून सांगू लागल्या, "अगं जे इथे भोग आहेत ते भोगूनच जायचंय. देवाबद्लची अढी पहिली मनातून काढून टाक. लढायची ताकद देणारी शक्ती कधीही आपलं काढून घेत नाही गं. निरपेक्ष पणे देवाचं कर. मनःशांती शोध त्या देवात. दैव आणि देव यांची सांगड नको घालूस. देवाला भ्यायचं नाही, त्यावर श्रद्धा ठेव. तुझ्या डोळ्यात जे अश्रू आले तो देव आहे. त्या अनाथ मुलांना पोसणाऱ्या प्रत्येकात देव आहे... त्या मुलांसाठी जेवण बनवणारा, औषधोपचार करणारा, ज्ञान शिकवणारा, शिस्त लावणारा आणि तुझ्यासरखे समाजाचे देणे देणाऱ्या मधे देव आहे. जे मिळालं ते, आपलं जे सुटून गेलं, ते आपलं नव्हतंच गं. येते मी जप हो" असं म्हणत खूप काही मोलाचे बोल बोलून आजी नी त्यांच्या घराची वाट धरली...

त्या दिसेनाशा होईपर्यंत ताई त्यांच्या कडे पाहात राहील्या. भानावर आल्यावर रूखरूख लागली,
 
त्या माऊलीचे चरण धरायचे राहून गेले...!
🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀

******************************************************************

*********

गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.
वाघ  गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला. 
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
 सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. 
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
       सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄

Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!

*********************************************************

 

चिकित्सक व्हा

एका मठात एक अजब समस्या निर्माण झाली होती.

साधक साधनेला बसले की ठिकठिकाणाहून उंदीर यायचे आणि 
साधनेत व्यत्यय आणायचे. गुरुदेवांनी बरेच उपाय केले. शेवटी 
त्यांनी एक मांजर आणली. साधनेला बसताना ते मांजर शेजारी 
बांधून ठेवू लागले. मांजरीला घाबरून उंदीर यायचे बंद झाले.

गुरू म्हातारे झाले. वारले. 
शिष्य गुरू झाले, तेही म्हातारे झाले, वारले.
मांजर तर त्यांच्या आधीच वारली होती. 
तिच्याजागी दुसरी मांजर आणली गेली.

हळुहळू त्या पंथाचा प्रत्येक गुरू मांजर घेऊन साधनेला बसू लागला.
मांजर ही त्या पंथाची ओळखच बनली. तो पवित्र प्राणी बनला. 
मांजरीचा साधनेशी नेमका काय संबंध आहे, हे कोणालाच माहिती 
नव्हतं. सगळे परंपरेने चालत आलेलं आहे, म्हणून सुलक्षणी मांजरी 
निवडून आणू लागले. साधनेत कोणत्या रंगाची, कोणत्या जातीची, 
कोणत्या रंगाच्या डोळ्यांची, कोणती शुभचिन्हं असलेली मांजर 
सर्वोत्तम, ती कशी निवडावी, याचं ज्ञान देणारेही ग्रंथ निघाले. 
गुरूच्या पुतळ्याबरोबर मांजरीचीही मूर्ती मंदिरांमध्ये विराजमान 
होऊ लागली. ज्यांना ध्यान जमत नाही, साधना जमत नाही, 
त्यांनी गुरूमान्यताप्राप्त मांजर घरात पाळली, तरी पुण्य लागतं, 
अशी समजूत प्रचलित झाली.

आता तर त्या पंथात मांजरीचं साधनेतील आध्यात्मिक महत्त्व 
या एकाच विषयावरचे एक लायब्ररी भरतील, एवढे ग्रंथ आहेत… 
मांजर हा साधनेत व्यत्यय आणणाऱ्या उंदरांवरचा उपाय आहे, 
असं त्यातल्या एकातही लिहिलेलं नाही.

प्रत्येक  धर्मात, पंथात ,जातित अश्याच चालत आलेल्या 'परंपरा' ज्याची चिकित्सा आपण कधी केलीच नाही आणि करूही इच्छित नाही...
 
 

******************************************************************


 

 

********************************************************

चिडचिड होतीय ?

सर्वप्रथम आपण हे पाहूया की आपण ज्या प्रोब्लेमचे सोल्युशन शोधतोय तो खरतर प्रोब्लेमपण आहे कि नाही? राग करणे प्रथमतः चुकीचे नाही. चुकीचे असते ते आपण ज्या पद्धतीने आपला राग बाहेर येऊ देतो तो मार्ग. आपण राग कधी करतो? जेव्हा आपल्या मनासारखे होत नाही आणि आपल्याला प्रकर्षाने वाटते की तसे व्हावे तेव्हा!

आपला टीव्हीवर आवडता कार्यक्रम येतो आणि तेव्हाच लाईट जाते लगेच आपल्याला राग येतो. घरात सगळे टॉवेल ओले असतील तर आपल्याला राग येतो. आपल्याला कोणी काही बोलले तर लगेच आपल्याला राग येतो. कोणाशी मतभेद झाले लगेच राग येतो. कोणी आपले ऐकले नाही आपल्याला लगेच राग येतो.

ह्या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट सामाईक असते ती म्हणजे, "आपल्या मनासारखे होत नाही आणि आपल्याला प्रकर्षाने वाटते की तसे व्हावे तेव्हा!".

मग हा प्रोब्लेम आहे का? → 
मी सांगेल की हा प्रोब्लेम आहे पण मी हे सांगणार नाही की तुम्ही राग नका करू, टेक इट इजी!!, चिल्ल ब्रो!!. खरतर प्रोब्लेम दुसराच आहे!!

आपल्या मेंदूचे प्रत्येक घटनेला प्रतिसाद देण्याचे निश्चित मार्ग ठरलेले असतात. तहान लागली पाउले आपोआपच स्वयंपाकगृहाकडे वळतात. मोबाईलमध्ये आपण सतत एकाच प्रकारचा pattern फोल्लो करत असतो. फोन आला की प्रत्येक वेळेस एकाच स्टाईलमध्ये बोलत असतो.

मेंदूबद्दलचा सुवर्ण नियम (ह्या नियमाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही आधार आहेत) :

जी गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करतात ती आपल्या मेंदूसाठी एक फिक्स्ड गोष्ट बनते ज्याला मेंदूत ती गोष्ट Hardwired झाली असे म्हणतात. जेवढी ती गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करणार आपल्या मेंदूला वाटते ही गोष्ट आपल्यासाठी सगळ्यांत महत्वाची आहे. आणि तो त्याला जास्त महत्व देतो आणि उर्वरित पर्यायी मार्गांचा विचार कमी करतो.

एकदा तुम्ही राग करा. तुम्हाला हलके छान वाटते. आपले काम झाले असे वाटते. आणि अशा वेळेस मेंदूला चुकीचा संदेश पोहोचतो की यार हा मार्ग तर भारी आहे. आणि अशाने आपल्याला नंतर क्षणात राग यायला लागतो. राग येण्याचा जणू सराव आपला होत जातो. आणि आता हाच राग फक्त ठराविक ठिकाणी न येता सगळीकडे यायला लागतो. ज्याला आपण "चिडचिड होणे" म्हणतो.

तर राग येण्यासाठीचा मेन प्रोब्लेम हा आहे!! राग व्यक्त करण्याचे पर्यायी मार्ग असतात — आणि चांगले पर्यायी मार्ग असतात परंतु आपण रागच करतो आणि गोष्टी बिघडतात. कारण मेंदूला तोच एक मार्ग माहित आहे आणि म्हणून मेंदू क्षणाचाही विलंब न करता सरळ तो अप्लाय करतो.

मूळ प्रश्न : लहान सहान गोष्टींवर चिडणे थांबवण्यासाठी अंमलात आणाव्यात, अशा काही प्रत्यक्ष सवयी सांगाल का?

"डोक्यात होणारी बैठक तोडा — ब्रेक द मिटिंग" (माझ्या अनुभवावरून हे नाव मीच दिलय. नक्कीच ह्याला काहीतरी शास्त्रीय नाव आणि आधार असेलच.)

जेव्हा पण आपल्या मनासारखे होत नाही तेव्हा डोक्यात तत्वांची, वाचलेल्या — पाहिलेल्या गोष्टींची, नीतीमूल्यांची एक बैठक सुरु होते. जसे संसदेत सगळे भांडण करतात, एकमेकांना शिवीगाळ करतात, बाकावर ठकठक करतात अगदी असाच गोंधळ डोक्यात त्यावेळेस सुरु होतो. आणि आपल्याला चांगलेच माहिती आहे — जेव्हा जेव्हा डोक्यात गोंधळ होत असेल तेव्हा आपली निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होते आणि हातून चुका होतात.

मी म्हणतो, "ही बैठक तोडा!!". जेव्हा राग आला सरळ ती जागा, ती व्यक्ती, तो वेळ सोडा चप्पल घाला आणि आणि बाहेर फिरून या. ह्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. बाहेर नाही जाऊ शकत तर गच्चीवर येऊन उभे राहा किंवा खिडकीतून बाहेर पहा. डोक्यात जे काही चालू आहे ते शांत होते जर तुम्ही तुमचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी लावले तर!! मग अर्धा-पाऊण तासाने तुम्हाला घडल्लेया घटनेचा सारासार विचार करायला जमेल कारण तेव्हा गोंधळ शांत झालेला असेल. आता तुम्ही जे पण करणार ते बरोबर असण्याची शक्यता आहे.

"बॉक्स ब्रेथिंग" 
(नेवि सिल्सची एक लक्ष टिकवून ठेवण्याची प्रभावी पद्धत)

जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपला मेंदू आपल्या ताब्यात न राहता Automatic Mode मध्ये जायला लागतो. जसे मी वर सांगितले की त्याला पर्यायी मार्ग दिसतच नाहीत ते हेच. अशा वेळेस डोक्यावर ताबा आणण्यासाठी आपले लक्ष श्वासावर आणा.

बॉक्स ब्रेथिंग पद्धत अशी आहे :

डोळे बंद करून ४ सेकंद मोजत मोजत नाकाद्वारे ४ श्वास आत घ्या.
आत घेतला गेलेला श्वास ४ सेकंद पकडून ठेवा.
आणि पुढचे ४ सेकंद श्वास सोडा. पहिल्यापासून रिपीट करा.
असे ३-४ मिनिटे जरी केले तरी लक्ष लगेच "जे आहे त्यावर येते". ही पद्धत नेवी सिल्स असलेले सैनिक आपले लक्ष तात्काळ भानावर येण्यासाठी वापरतात. तुम्ही ह्या पद्धतीने कधीपण, कुठेपण आणि कशासाठी पण वापरू शकतात. जिथे लक्ष लावायचे आहे तिथे बॉक्स ब्रेथिंग करा.

बॉक्स ब्रेथिंग केल्यामुळे तुमचा राग करण्याचा response time कमी होईल आणि राग क्षमेल. नाहीतर असा राग करण्याचा टाईम एकदम लगेचच असतो. फट्टकरून!! बॉक्स ब्रेथिंगबद्दल अधिक येथे वाचा

"उलट मोजणी सुरु करा."

राग आल्यावर १०० किंवा १५० पासून हळूहळू मनातल्या मनात उलट मोजणी म्हणायला सुरु करा. एकशे पन्नास, एकशे एकोणपन्नास, … , एकशे बावीस, एकशे एकवीस!! असं.

उलट मोजणी करतांना गच्चीवर चालले जा किंवा दुसऱ्या रूममध्ये जा. एका ठिकाणी बसून घ्या आणि डोक्यात चाललेल्या क्रमांकांकडे लक्ष द्या. उलटच का म्हणायचे?? त्याचे कारण असे की १ ते १०० किंवा सुलटपद्धतीने सगळे आकडे आपले पाठ असतात. एक, दोन,तीन असे! परंतु जेव्हा आपण उलट पद्धतीने ह्यांना म्हणतो तेव्हा तो विचार करावा लागतो आणि हेच आपल्याला पाहिजे की आपले लक्ष दुसरीकडे लागले पाहिजे.

"लगेच तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची मदत घ्या"

राग आला की सरळ युटूब उघडा आणि "चला हवा येऊ द्या!" चा एक लहान भाग पाहू शकतात. कानात इअरफोन लावून आवडीचे गाणे ऐकू शकतात. तुमच्या आवडीच्या चित्रपटाचा एखादा भारी सीन पाहू शकतात. जिथे पण तुमचे लक्ष लागते ते करा.

फक्त दुसऱ्या व्यक्तीशी लगेच बोलू नका. नाहीतर तिकडून प्रतिसाद चांगला नाही मिळाला की अजून राग वाढेल. म्हणून ज्या लगेच पाहिजे तशा उपलब्ध होतील अशा गोष्टी करा. व्हिडीओ, गाणी, चित्रपट इत्यादी.

जे म्हणतात ना मला राग येत नाही ते खरतरं कमी जास्त प्रमाणात खोट बोलतात असे माझे निरीक्षण आहे. प्रोब्लेम राग करण्यात नाही. प्रोब्लेम आहे राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देणे. जी हमखास चुकते. म्हणून स्वतःच लक्ष थोड्या वेळासाठी दुसऱ्या ठिकाणी लावा. ते शांत झाले की मग नेमकं काय झाल? आता काय केलं पाहिजे? हे केल्याने काय होईल? ते केल्याने काय होईल? असा विचार करा. आणि योग्य तो मार्ग काढावा.

"आपला कल नेहमी 'कोण चुकले' ह्याकडे असतो. स्वतःला 'काय चुकले' आहे ह्याकडे पाहायला शिकवा."

परंतु मला असं वाटत की प्रतिक्रिया करायची पण काही गरज पडत नाही जेव्हा तुमचा राग क्षमतो.🙏🙏🙏🙏


******************************************************************

Dear Love 

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,

वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा

बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती,
वेड्याचे

आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात

उडी टाकली,
ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............

वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,

शेवटी स्वतःची  हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात

जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
बाहेर काढल्या नंतर काठीला

लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,

तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,
पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल

होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ....ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील
म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका..
आणि जोडलंल नात सहज तोडू नका..❣️ 

******************************************************************

आयुष्याचे गणित चुकले 

असे कधीच म्हणू नये . 

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, 

चुकतो तो चिन्हांचा वापर...! 

बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार 

हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि 

उत्तर मनासारखे येते. 

आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, 

कुणाला केंव्हा वजा करायचे ,

कधी कुणाशी गुणाकार करायचा 

आणि भागाकार करताना 

स्वतः व्यतिरिक्त किती 

लोकांना सोबत घ्यायचे हे 

समजले कि उत्तर मना-जोगते येते..! 

आणि मुख्य म्हणजे 

जवळचे नातेवाईक,मित्र 

आप्तेष्ट यांना हातचा समजू नये , 

त्यांना कंसात घ्यावे!

कंस सोडविण्याची हातोटी 

असली कि गणित 

कधीच चुकत नाही ........!! 😊

आपल्याला शाळेत त्रिकोण, 

चौकोन, लघुकोन, 

काटकोन, विशालकोन 

इत्यादी सर्व शिकवतात..

पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो 

तो कधीच शिकवला जात नाही.

तो म्हणजे "दृष्टीकोन"

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा 
एकमेकांशी बोला, 
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील..
आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' accounts कधी जमलेच नाही...
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की 'आठवण' सोडून काहीच balance उरत नाही...
🌹

******************************************************************

🙏🌹🤝🦚🌸😌🌸🦚🤝🌹🙏
----------------------------------------------
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन
मिनिट थांबून शांत विचार करावा.
-----------------------------------------------


प्राचीन लोककथेनुसार,

एका व्यक्तीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते. व्यक्ती खूप कष्टाळू होता परंतु गरिबी त्याची पाठ सोडत नव्हती. गरिबी दूर करण्यासाठी त्याने परदेशात जाऊन पैसे कमावण्याचा विचार केला. 
हा विचार त्याने पत्नी आणि वडिलांना सांगितलं. त्याची पत्नी गरोदर होती यामुळे दोघेही त्याच्या विचाराशी सहमत नव्हते परंतु व्यक्ती हट्टाला पेटला होता. रात्री पत्नी आणि वडील झोपलेले असताना तो घरातून बाहेर पडून परदेशात निघून घेला.

> परदेशात जाऊन त्याने खूप कष्ट केले आणि २० वर्षांमध्ये तो श्रीमंतही झाला. खूप पैसे कमावल्यानंतर त्याने घरी जाण्याचा विचार केला. जहाजात बसून तो आपल्या देशाकडे निघाला. जहाजात त्याला एक व्यक्ती भेटला. तो व्यक्ती ज्ञानाचे सूत्र विकत होता. तो धनी व्यक्तीला म्हणाला मी येथे ज्ञानाचे सूत्र विकण्यासाठी आलो होतो परंतु कोणीही विकत घेतले नाही आणि यामुळे रिकाम्या हाताने घरी जात आहे.

> धनी व्यक्तीने त्याचे एक ज्ञान सूत्र खरेदी करण्याचा विचार केला. ज्ञान सूत्र विकणारा व्यक्ती म्हणाला एक सूत्राची किंमत ५०० सुवर्ण मुद्रा आहे. श्रीमंत व्यक्तीने त्याला ५०० सुवर्ण मुद्रा दिल्या. 
त्या व्यक्तीने एका कागदावर लिहिले- 
कोणतेही काम करण्यापूर्वी दोन मिनिट थांबून विचार करावा.
 श्रीमंत व्यक्तीने तो कागद खिशात ठेवला.

> काही दिवसानंतर श्रीमंत व्यक्ती आपल्या शहरात पोहोचला. पती आणि वडिलांना खुश करण्यासाठी तो गुपचुपत घरामध्ये घुसला. पत्नीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याला पत्नीजवळ एक मुलगा झोपलेला दिसला. ते पाहून त्याला खूप राग आला. त्याने विचार केला की, विदेशात मी हिच्यासाठी पैसे कमवत होतो आणि आपल्या पत्नीने तर दुसरे लग्न केले. रागात त्याने खोलीत ठेवलेला चाकू उचलला आणि पत्नीला मारण्यासाठी पुढे सरकला. तेवढ्यात त्याला ज्ञान सूत्र लक्षात आले की- कोणतेही काम करण्यापूर्वी दोन मिनिट शांत विचार करावा.

> तो थांबून विचार करत होता तेवढ्यात एक भांडे जमिनीवर पडले आणि त्या आवाजामुळे पत्नी झोपेतून जागी झाली. खोलीमध्ये उजेड केल्यानंतर समोर तिला पती दिसला. पतीला पाहताच तिने जवळ झोपलेल्या मुलाला उठवले आणि म्हणाली 'बाळा उठ तुझे वडील आले आहेत.' हे ऐकताच व्यक्तीची मान शरमेने खाली गेली. त्याने विचार केला की, दोन मिनिट थांबलो नसतो तर सर्वकाही उद्धवस्त झाले. ज्ञान सूत्रामुळे अनर्थ टळला.

> मुलगा त्याच्या पाया पडण्यासाठी उठल्यानंतर त्याचे केस मोकळे झाले. पत्नीने पतीला सांगितले की, तुम्ही गेल्यानंतर मी एका मुलीला जन्म दिला. काही दिवसानंतर तुमच्या वडिलांचे निधन झाले. त्यानांतर मुलीला लोकांना वाईट नजरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मी तिला मुलाप्रमाणे वाढवले. त्या व्यक्तीने रडत-रडत पत्नी आणि मुलीला मिठी मारली. त्याला ते ज्ञान सूत्र महाग वाटले होते परंतु या प्रसंगानंतर त्याला ते अनमोल सूत्र असल्याचे लक्षात आहे.

कथेची शिकवण
या कथेची शिकवण हीच आहे की, ज्ञान तर अनमोल आहे. कोणताही काम करण्यापूर्वी दोन मिनिट थांबून शांत विचार करावा. घाईगडबडीत कोणतेही काम करू नये. विशेषतः वैवाहिक जीवनात राग आल्यानंतर पती-पत्नीने हे सूत्र अवश्य लक्षात ठेवावे अन्यथा सर्वकाही नष्ट होऊ शकते.

🙏🌹🤝🦚🌸😌🌸🦚🤝🌹🙏

************************************************************

🌹 मनाची शुद्धता 🌹

दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."

तात्पर्य- मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.

*******************************************************************

कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही?

 (प्रेरणादायी लेख)

नियतीला, ब्रम्हांडाला किंवा हवं तर देवाला म्हणा, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तो काही दूत पाठवतो….

का माहितीये??

तुमचा अपमान करायला, इन्सल्ट करायला….

ऐकायला काहीतरीच वाटतं ना!! तुम्ही म्हणाल काय काहीतरीच बोलता….
 
पण थांबा. हे कसं ते पुढे मी तुम्हाला सांगते. हे नुसतंच मोटिव्हेशन डोस पाजण्यापूरतं नाही.  पण पूर्ण लेख वाचल्यावर तुम्हाला पण माझं म्हणणं नक्कीच पटेल.


यावर उस्फुर्तपणे बरीच वेगवेगळी उत्तरं मिळाली कोणी सांगितले रडतो/रडते, कोणी सांगितले चीड-संताप येतो, कोणी सांगितले दुःख होते, कोणी सांगितले समोरच्याला त्याची जागा दाखवून देतो. कोणी सांगितले “मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला” तर कोणी सांगितले चक्क घोडे लावतो 😄

एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखलं तर तुम्ही काय करता?

राग येतो, चीड येते….. रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सूनावतो. आणि समोरच्या माणसाला त्याची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर ना!!

पण असामान्य उंची गाठणारा माणूस काय करतो हे तर बघू आपण!!

टाटांच्या कम्पनीचं पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजन तोट्यात चाललेलं असताना रतन टाटा एकदा फोर्डचे हेड बिल फोर्ड यांच्याकडे गेले होते. आणि त्यांनी बिल फोर्डला request करून टाटाचं पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजन खरेदी करायची ऑफर दिली.

बिल फोर्ड टाटांच्या पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजनला खरेदी करण्यासाठी तयार तर झाले. पण त्यांनी रतन टाटांचा अपमान पण केला. बिल फोर्ट यांचा रतन टाटांना बोलण्याचा रोख असा होता की, “जर कार विकता येत नाही तर कार बनवता कशाला? जे काम येत नाही ते सुरूच कशाला करायचं” आणि याच बोलण्याने रतन टाटा आतून पेटून उठले. त्या वेळी त्यांनी बिल फोर्ड यांना उत्तर देऊन राग काढला नाही की बचावात्मक पवित्रा सुद्धा घेतला नाही.

भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या इंजिनिअर्स ना बोलवून सांगितलं की टाटा पॅसेंजर्स वर लक्ष द्या आपल्याला एक वल्ड क्लास कम्पनी म्हणून पुढे यायचं आहे. आणि त्यांच्या पूर्ण टीमने हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणलं. आणि टाटा चं पॅसेंजर डिव्हिजन दिवसेंदिवस प्रगती करत गेलं. आणि योगायोग असा की फोर्ड कम्पनी काही कारणांमुळे विक्रीत कमी आल्याने आणि भारतातली टाटा कम्पनीची ताकत ओळखल्यामुळे बिल फोर्ट स्वतः टाटांकडे आले आणि त्यांनी टाटांना ऑफर दिली लँड रोव्हर आणि जॅग्वार खरेदी करण्याची. आणि महत्त्वाचे म्हणजे यावेळी टाटांनी बिल फोर्ड यांचा अपमानही केला नाही.

अपमान झाल्यावर आपल्याला राग येतो, चीड येते. आणि आपण कम्प्लेन्ट करायला किंवा वाद घालायला सुरू करतो. नाहीतर समोरच्याला क्रीटीसाईझ करायला सुरू करतो. प्रत्येक सामान्य माणूस हेच करतो. पण असामान्य यशस्वी माणूस जर कोणी त्याचा अपमान केला तर कम्प्लेन्ट नाही करत, क्रीटीसाईझ नाही करत ते स्वतः मध्ये बदल घडवून आणतात.

अमिताभ बच्चन जेव्हा पहिल्यांदा रेडिओ वर इंटरव्ह्यू द्यायला गेले होते तेव्हा त्यांची ताडा-माडा सारखी उंची आणि जड आवाज यामुळे त्यांना रिजेक्ट केलं गेलं. त्यांच्या आवाजाचे आणि उंचीचे कारण दाखवून त्यांचा अपमान केला गेला. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं पण वाईट वाटलं म्हणून त्यांनी आपल्याला संधी न देणाऱ्यांना क्रिटिसाईझ नाही केलं, पण स्वतःमध्ये बदल केले आणि तीच उंची, तोच आवाज त्यांचा यु.एस.पी. बनला.

जेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा समोरच्या माणसाशी भांडणं, त्याचा अपमान करणं किंवा त्याला घोडे लावणं हि तर खूप कॉमन गोष्ट आहे. पण जेव्हा आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा उद्देश्य बनवू, आपली ताकत बनवू तेव्हा इतिहास घडेल हे लक्षात ठेवा. जर कोणी तुमच्या असफलतेचा अपमान केला, तुमच्या दुःखावर मीठ चोळलं तर सक्सेसफुल होऊन बदल घ्या. म्हणजे अपमान करणाऱ्याला पण एक दिवस तुमच्याकडे मान झुकवून बोलावं लागेल. लक्षात ठेवा ‘Massive success is the biggest revenge ‘ जर सर्वात मोठा बदला काही असेल तर तो यश…..

***********************************************************************

एकदा एका वर्गात एका गणिताच्या शिक्षिकेने सर्व मुलांना स्वतः सोडून बाकीच्या सर्व आपल्या वर्गमित्रांची नावे दोन पेपर वर लिहायला सांगितली व प्रत्येक नावाच्या बाजूला थोडी जागा ठेवायला सांगितले. त्यानंतर आपल्या प्रत्येक वर्गमित्राबद्दलची एक चांगली गोष्ट त्याच्या नावाच्या शेजारी लिहायला सांगितले. वर्गाचा जवळ जवळ पुढचा सर्व वेळ मुलांचा ते लिहिण्यातच गेला.

त्या शनिवारी त्या शिक्षिकेने एका वेगळ्या नव्या पानावर प्रत्येक मुलाचे नाव व त्याच्या शेजारी प्रत्येकाने त्याच्या बद्दल लिहिलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा लिहुन काढल्या.

सोमवारी वर्गात गेल्यावर तिने प्रत्येक मुलाला आपापला कागद दिला. थोडा वेळ होतो न होतो तोच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती व प्रत्येकजण खुप खुश होता. "मला नव्हतं माहिती मी कोणाला इतका आवडू शकतो!" , "मी कोणासाठी तरी इतका महत्त्वाचा असू शकतो!" सर्व कॉमेंट्स ह्या अशाच खूप सकारात्मक व कौतुकास्पद  होत्या.

त्यानंतर ह्या पेपर्सची वर्गामध्ये कधीही चर्चा झाली नाही. शिक्षिकेला माहित देखील नव्हते की मुलांनी आपापसात त्या गोष्टींची चर्चा केली अथवा नाही केली. घरी पालकांना सांगितले की नाही सांगितले. तिला त्या गोष्टीशी काही देणे-घेणे देखील नव्हते. तिचा हेतू  साध्य झाला होता. मुलं एकमेकांवर व स्वतःवर प्रचंड खुश होती. तो वर्ग पुढे सरकला.

अनेक वर्षानंतर तिचा एक विद्यार्थी कारगिलच्या युद्धात शहीद झाला. शिक्षिका ह्या विशेष विद्यार्थ्याच्या अंतिम संस्काराला गेली होती. ह्या आधी त्या कधीही सैनिकाच्या अंतिम संस्काराला गेल्या नव्हत्या. त्याच्या चेहऱ्यावर जणू काही एक विशेष शांति विलासत होती.

जागा गच्च भरली होती. प्रत्येक मित्र व बाकी सगळे त्याला शेवटचा प्रणाम करून बाजूला होत होते. शिक्षिकेने सर्वात शेवटी अंतिम दर्शन घेतले.

तेवढ्यात एक सैनिक तिच्यापाशी येऊन म्हणाला, "तुम्ही संजयच्या गणिताच्या शिक्षिका होता का ?" त्यावर होकार दिल्यावर, तो सैनिक म्हणाला, "संजय तुमच्याबद्दल खूप बोलायचा."

अंतिम संस्कार झाल्यावर संजयचे बरेचसे वर्गमित्र, त्याचे आई-वडील व बरेचजण त्या शिक्षिकेशी  बोलायला उत्सुक होते.

संजय चे वडील म्हणाले, "तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे." असे म्हणून पाकिटातून दोन चिकटवलेले कागद जे  अनेकवेळा उघडून मिटवलेले होते असे चुरगळलेले ते कागद काढून पुन्हा म्हणाले, "आम्हाला वाटलं तुम्ही ओळखाल. आम्हाला हा कागद संजयपाशी मिळाला." तो कागद बघताच तिच्या लक्षात आले की तो कुठला कागद होता ते. अनेक वर्षापूर्वी सहज म्हणून घेतलेल्या ऍक्टिव्हिटीचा कागद होता तो.

संजयची आई म्हणाली, "तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही मुलांकडून ती सकारात्मक ऍक्टिव्हिटी करून घेतली. संजयने तो कागद आयुष्यभर जपून ठेवला होता."

संजयचे  सर्व वर्गमित्र हळूहळू त्या शिक्षिकेभोवती जमा व्हायला लागले. अर्जुन थोडे स्मितहास्य करून म्हणाला, "तो कागद माझ्याकडे अजून आहे. मी तो माझ्या ड्रॉवर वर लावून ठेवलाय."

पृथ्वीराजची बायको म्हणाली, "पृथ्वीराजनी मला त्याचा कागद आमच्या लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये लावायला सांगितला होता."

रश्मी म्हणाली, "माझ्याकडे पण तो कागद अजून आहे. माझ्या डायरी मध्ये आहे."

त्यानंतर दिपाली. तिच्या पाकिटातून तिने तो अर्धवट फाटलेला, चुरगळलेला कागद सर्वांना दाखवला आणि म्हणाली, "मी हा कागद माझ्याजवळ कायम ठेवते. मला वाटते आपण सगळ्यांनीच आपापले कागद खूप जपून ठेवलेत."

हे सर्व बघून, ऐकून शिक्षिकेचे मन भरून आले. स्वतःच्या भावना सावरू न शकल्याने तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते.

आपण एकमेकांचे दोष इतक्या पटकन प्रकर्षाने बघतो व आत्मसात करतो की आपल्या लक्षातच येत नाही की समोरच्या व्यक्तीमध्ये काही चांगले गुण देखील आहेत. आपलं थोडंसं देखील एकमेकांबद्दलचे गुण बघणं, एकमेकांचे कौतुक करणं व समोरच्याला सांगणं की तो-ती आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे व किती आवडता आहे, हे त्या व्यक्तीची आयुष्यभराची  पुंजी होऊ शकते.
 
पेराल ते उगवेल. कायम गुण व प्रत्येकातला चांगलेपणाच फक्त बघावा.

साभार... सुंदर मराठी लेख तुमच्यासाठी.....
🌹🌹


 समस्त शिक्षीकांना समर्पीत

************************************************************************

 एक विचार - तुम्हीच तुमच्या सुंदर जीवनाचे शिल्पकार बना...

तीन रुम किचनचा एखादा फ्लॅट, दोन, चार एकरचे फार्म हाऊस एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, "अमक्या - तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं...!"
म्हणजे होतंय काय..., की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय. पण सुखी काही होताना दिसत नाही, सुखी कधीही झालेला दिसत नाही...!

आपण नेहमीच म्हणतो की...,
आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही...!

मग आता काय नेमकं झालं...?

नक्की, मजा कुठ गेली...?

एकटं एकटं का वाटतंय...?

छातीत धडधड का होतेय...?

कशामुळे / कशामध्ये मन करमत नाही...?

कारण...
आपली विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली आहे का...,
विश्व निर्माण करणं म्हणजेच...
- नाती गोती जपणं...
- आपले छोटे, मोठे छंद जोपासणे / आपल्या चांगल्या इच्छा, आकांशा ना महत्व देणे आणि त्यांचा पुरस्कार करणे,  त्यांना नेहमीच अंमलात आणणे...
- पाहुणे होऊन जाणं, सर्वांशीच मनमोकळेपणाने वागणे...
- पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणं, त्यांना योग्य प्रकारे मानसन्मान देणे...
- आपल्या जवळच्या व्यक्तीशी / मनाला भावलेल्या व्यक्तीशी खूप गप्पा मारणं, मन मोकळे करणे...
-  घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं...,
-  खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं...!
या गोष्टी आपण नैसर्गिक पणे प्राप्त करू शकलो तर आपण ” शून्यातून विश्व निर्माण केलं ” असं म्हणायला काहीच वावगे ठरणार नाही...

आताच तुम्हीच मनमोकळेपणाने सांगा, की...,
आपल्या आयुष्यात काळाप्रमाणे या सर्व नैसर्गिक विषयांमध्ये वाढ झाली की घट झाली...?

तुमचं खर दुःख / सुख, तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता...?
असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक आपण निर्माण करू शकलो...
खूप कमी, किंबहुना नाहीच...,
मग आपण खरंच ” छोटेसे पण सुंदर विश्व निर्माण ” केलं का..., हा प्रश्र्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा...
खरं तर तुम्हाला तुमच्या ह्या गहन प्रश्र्नाचे  उत्तर थोडेसे उशिरा मिळेलही, पण ते बहुतांश वेळा ते " नाहीच " असे असेल...

माझ्या मित्रांनो...,
रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजेच आपले विश्व का...?
भौतिक साधनांची रेलचेल म्हणजेच आपले विश्व का...?
लॉकर मध्ये ठेवलेले हिरे, मोत्यांचे दागिने, रूपये म्हणजेच आपले विश्व का...?
आभासी सुख / विश्व किंवा शाश्र्वत सुख / विश्व, म्हणजे नेमकं काय, हे प्रथम तुम्हाला समजून घ्यावेच लागेल आणि सध्या आपण कुठल्या  विश्वात जगतो आहोत याचा सखोल अभ्यास करावा लागेल...
 
मोठं बनण्याच्या आभासी इच्छेमुळे  आणि मग त्या संदर्भातील कामाच्या व्यापामुळेच आणि त्या संदर्भातील मानसिक, शारीरिक दडपणामुळेच नाती दूर जाणार असतील..., इतरांना तुच्छ, कमी लेखण्यामुळे आणि आपल्या अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील..., दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल...
तर...
आपण शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य...?, याचा विचार प्रत्येकाने सकारात्मकपणे केलाच पाहिजे...

एकदा विचार तर कराच..., अजूनही वेळ गेलेली नाही, आपण आभासी जगात जगतो आहोत का...,
आपल्याला सुंदर आयुष्य जगायचे आहे तर मग आतापासूनच आपल्या आयुष्याला सकारात्मक पणे सुंदर आकार द्या, आपल्या सुंदर आयुष्याकडे सकारात्मक पणे, नैसर्गिकपणे बघा, आपल्या आयुष्याला फक्त सकारात्मक पणे घडवा...
आणि..., आपले " श्री " निमित्त सुंदर जीवन सुंदरपणे, नैसर्गिकपणे शाश्र्वत जगात पूर्णपणे जगा, आणि तुम्ही तुमच्या जिवनाचा पूरेपूर आनंद घ्या तसेच सभोवतालच्या जगामध्ये हा आनंद पसरायला सकारात्मक पणे प्रयत्न करा...

तुम्हीच तुमच्या सुंदर जीवनाचे शिल्पकार बना...

धन्यवाद...

************************************************************************

 

नात्यांची "स्माईलिंग फोडणी" !!🤗🤗


आमटीला फोडणी घातली, चर्र असा आवाज आला आणि घरभर घमघमाट सुटला. तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांनी स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला आणि सगळेच एकाचवेळी ओरडलेत "जेवायला वाढ!!"

हे असं एकत्र आलेलं ओरडणं मला फार आवडतं. माझ्या ओठांवर हलकंच स्मित उमटतं....स्माईल येतं😊😊

पानं वाढता वाढता मनात काहीतरी शिजायला लागलं. ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भुक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते.

नाती पण अशीच हवीत ना!! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी!!

फक्तं "अंदाज" बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणुन ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणचंच नातं खुपत नाही.

हिंग कितीही औषधी असला तरीही जास्तं पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो!!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडुन बोलतो, तीव्र बोलतो आणि मग ते बोलणं कितीही समोरच्याच्या भल्यासाठी असलं तरी, नात्यांमधे वितुष्ट यायला वेळ लागत नाही.

मेथी जरा जरी जास्तं पडली, तर जेवणात कडवटपणाच येतो. आपणही कधी कधी राग आला की अगदी टाकुन बोलतो, टोकाचं बोलतो, इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मग नात्यात अढी निर्माण होतेच ना!! अगदीच कबुल आहे, आपल्या माणसांना हक्कानं बोलावं...पण प्रमाणात. एक वेळ स्वैपाक कडवट झाला तरी चालेल, पण नाती नको!!

कढीपत्ता हा सुगंध येईल इतकाच घालावा, नाहीतर जेवण उग्र होतं. माणुस हा कायमच प्रेमात पडत असतो, कधी व्यक्तिंच्या तर कधी वस्तुंच्या!! एकमेकांवर अतोनात प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात गुदमरायला लावणं वेगळं!! स्वतःला आणि इतरांना झेपेल इतकच प्रेम करावं, नाहीतर नात्यातला सुगंध हरवुन जातो.

हळदीचा रंग मोहक, अगदी प्रमाणात घातली की तिच्या गुणांबरोबर तिचं अस्तित्वं ही प्रेमात पाडतं. गरज असेल तेंव्हा मदत जरुर करावी, पण समोरच्याला "स्पेस" ही द्यावी. आपण आहोत, आपलं अस्तित्त्वं आहे, इतकं जरी समोरच्याला जाणवलं ना, की मग सगळंच सोप्पं होतं.

तेलही आवश्यक इतकच!! भसाभसा ओतुन किंवा अगदी थेंबभर घातलं की फोडणी बिघडलीच म्हणुन समजा!! अहो!! का, काय विचारताय?? जास्तं तेल पडलं तर मुळ पदार्थापेक्षा तेलाचीच चव जिभेवर रेंगाळेल आणि कमी पडलं तर ते इतर घटकांना सामावुन कसं घेणार?? नात्यात ओशटपणा नको. आपल्यात इतरांना सामावुन घेण्याइतका मोठेपणा असावा, पण आपण किती महान आणि किती चांगले हे त्यांना न जाणवता, कसलाच दिखावा न करता!!तरच मनं एकमेकांत सामावली जातील.

आपल्या स्वैपाकात मिरचीचं प्रमाण कसं आणि किती असावं, हे प्रत्येक गृहीणीला चांगलंच ज्ञात असतं. स्वैपाक सपक ही नको आणि जहालही नको!! नात्यांचंही तसंच असतं अहो!! मुळमुळीत नाती नकोशी होतात अन तिखटपणा, जहालपणा नात्याला सुरुंग लावतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्टं म्हणजे आच!! फोडणी फक्कड तेंव्हाच जमते, जेंव्हा भांड्याखालची आच योग्य प्रमाणात असते अन भांडं योग्यं प्रमाणात तापतं तेंव्हा!!

जर आच प्रमाणापेक्षा कमी असेल, तर फोडणी कच्चीच राहील आणि सगळ्या स्वैपाकाची मजाच जाईल.

जर आच प्रमाणापेक्षा जास्तं असेल तर रागाप्रमाणे त्यातला प्रत्येक घटक तडतडुन अंगावर उडेल, इजा होईल, मोहक हळद काळी पडेल आणि फोडणी जळेल.

आपल्या नात्यातही आच योग्यच हवी, नाती कच्चीही रहायला नकोत अन जळायलाही नकोत, तरच नात्यांची फोडणी अचुक जमली, असं म्हणता येईल.

"अगं वाढतेस ना, पोटात कावळे ओरडताहेत, तुला भुक नाही का गं लागत??" ह्या वाक्यानं मी भानावर आले आणि "हो, आलेच" म्हणत आमटीतल्या "स्माईलिंग फोडणी"कडे हसुन बघत डोळे मिचकावले!!

काय मग सख्यांनो!! आवडली का गुजगोष्टं??
मग उद्या फोडणी देताना माझी आठवण येईल ना!!

************************************************************************

संवाद

अनेकदा राग आला की
आपण लगेच अबोला धरतो
पण, त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात
आणि परिस्थिती अधिकच बिघडते
म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका

संवाद!!
मग तो कोणत्याही दोन व्यक्तीमधील असेल
संवादामुळे नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते
कित्येक वर्षांची मनामनातील साचलेली जळमटं साफ होतात . मन मोरपिसासारखं हलकं होऊन तरंगायला लागतं . स्वतःभोवती आनंदाने गिरकी घ्यावीशी वाटते

छानंच आहे की!!!

पण काही वेळा मात्र संवादाचे विसंवादात रूपांतर होते

समोरची व्यक्ती आपल्या शब्दांचे विश्लेषण करून सरळ सरळ नकारात्मक अर्थ काढते आणि ते देखील एकदोनदा नव्हे तर वारंवार .
रेशमाच्या लडींचा गुंता सोडवताना तो अधिकाधिक गुंतत जातो ……... तसेच काहीसे नाते संबंधांचे होते

मन विषण्ण होते . आपल्या शब्दांची, वाक्यांची वारंवार चिरफाड केली जाते हे पाहून……….
शब्दांचीच भीती वाटू लागते मग……….
टाहो फोडून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करतो आपण…… .
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता……….
माझ्या ध्यानीमनीही नव्हते .
हदय पिळवटून निघते
काहीच निष्पन्न होत नाही
आणि मग
शब्दच घेतात गळफास स्वतःचा
संपवून टाकतात स्वतःलाच

( हे टाळण्यासाठी विसंवाद नको संवाद असावा)   
************************************************************************

 ईगो’  (Ego) म्हणजे नक्की काय?
.
एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता.
.
त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत.
.
ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत.
.
त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना.
.
कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता.
.
शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
.
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत.
.
तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
.
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली.
.
मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली....

आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो. या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..!

आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला ईगो कुरवाळत असतात.
मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात,

पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड   तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.


एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवा.. विसरा..सोडून द्या..
बघा काय चमत्कार होतो ते..!
 ************************************************************************
 
 
 अमृतवेल.. वि स खांडेकर
काही छानसं..

     कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने!
     वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
     कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो, कुणी तरी आपला सांभाळ करते. शाळेच्या चिमण्या जगात कुणी तरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखविते. कुणी तरी चिमणदातांनी राय-आवळ्याचे दोन तुकडे करून त्यांतला एक आपल्याला देते. योगायोगाने जवळ आलेल्या कुणाच्या तरी जीवनात यौवन आपले जीवन मिसळून टाकते.
       जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे-
 दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे, 
त्याचे जीवन फुलावे, 
म्हणून त्याच्यासाठी जे-जे करता येईल, ते-ते करणे! 
🙏🙏🙏🙏
 
 
 
 
 ************************************************************************
 
          
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही
एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग  रिकामी झाली. एक दिवस असेच राजा त्याच्या घराजवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."
मित्रांनो, आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे जीवन परत मिळत नसते. मानवी जीवन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगु या।। 
बोध :-
या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह. त्या देहाचा कोळसा करायचा की चंदन हे आपले आपणच ठरवायचे.
 
 ************************************************************************
 
 
कृष्ण हा खरतर प्रत्येक क्षणी प्रत्येका बरोबरच असतो..
कदाचित त्याची रूप वेगळी असतील, पण तो असतो प्रत्येका बरोबर पण प्रत्येकाला त्याला ओळखता हि यायला हवं ... आणि ओळ्खण्या साठी कृष्ण म्हणजे नेमकी काय हे समजायला हि हवंच.
पण ह्या कलीयुगात सर्वच जण "मी " पणाच्या शकुनी मना पुढे इतके वाहून जातात की कृष्ण बाजूला जरी असेल तर कळणार कसा ?
कृष्ण समजायला सुदाम्या सारखी निस्वार्थ मैत्री, अर्जुना सारखं हळवं मन, उद्धवा सारखी आसिमत श्रद्धा,  दारूका सारखा सच्चा सेवा भाव, राधे सारख शुद्ध प्रेम भाव, मीरा सारखा समर्पण भक्ती भाव ... अशा अनेक पैकी एखादा तरी गुण किंवा वृत्ती आपल्या ठायी असली की कृष्ण आपल्याला थोडासा का होईना पण नक्कीच समजेल.
मग तो ओळखायला हि नक्कीच सोप्पा.
कृष्ण म्हणजे सर्व काही असून ही वैराग्य ... 
कृष्ण म्हणजे सामर्थ्य असून ही बाळगलेला संयम ... 
कृष्ण म्हणजे सर्वज्ञ ( ज्ञान ) असून ही ठायी असलेला विनयभाव ...
कृष्ण म्हणजे समस्ये प्रमाणे धारण केलेला आकार ( न्याय ) ...
कृष्ण म्हणजेच अर्थ, कर्म, धर्म व काम यांचा समतोल साधणारा स्थितप्रज्ञ योगी ... 
कृष्ण म्हणजेच साम दाम दंड भेद या नुसार आयुष्यात मार्ग दाखविणारा गुरु ...
चौसष्ट विद्या व सोळा गुणांचा स्वामी म्हणजे कृष्ण ..
.तो जेवढा सहज तेवढाच अवघड ...थोडा "मी" पणा बाजूला ठेवून , निस्वार्थ, निष्काम व आसक्त रहित मनाने त्याला साद द्या ...तो नक्कीच येईल व आपल्या या जीवन रुपी प्रवासात आपल्या रथा चे सारथ्य हि करेल ...फक्त "मी" पणा ची वृत्ती सोडून समर्पित मनाने,  निस्वार्थ वृत्तीने , श्री कृष्णभवनभावीत होऊन पूर्ण श्रद्धेने शरण जाता आलं पाहिजे ...मग जो समजेल, उमजेल , कळेल,  मिळेल तो सर्व एक च म्हणजे कृष्ण.
जय जय राम कृष्ण हरी!!!

🌹🌷🌹 
 
 ************************************************************************
 
सकारात्मक आणि नकारात्मक विचार   यातील फरक

                   आवर्जून वाचावे.
        
एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली.
     
या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढुन टाकलं आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं.
     
याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली. आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली.

याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं !!

याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला. त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे !! जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले.
 
शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजून वेगळेच ..!
               
आणि शेवटी त्यांनी  लिहिले ..…. 
"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले 
हे वर्ष माझ्यासाठी !!!

इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्यांना काहितरी वेगळे असल्याचा अंदाज आला. सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या. 

थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. लेखक महाशयानी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते ..

गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढून टाकले. आता मला कुठलाही त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालोय यामुळे !!

याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली. आणि एक चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो, आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे...!!

याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..!!

याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, जीवघेण्या कारच्या अपघातातून जरी कार पूर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

आभारी आहे या जीवनाचा ...!!
किती सुंदर व चांगले वर्ष दिलेस तू मला !!
      
बघा मित्रांनो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! 

नकारात्मक विचार बाजूला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !! 

आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.

आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो. प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.

आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच….. !!!

त्या घटनेची वाईट बाजू न पहाता चांगली बाजू, 

सकारात्मक बाजू डोळ्यासमोर ठेवायला शिका. जे होते ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपूर्वक विचार करा !! जगणं अजून सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

Every Dark cloud has a silver lining !!

प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!! 

शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे, आपल्या विचारांवरच ठरणार आहे.

आपल्याकडे काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवून नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!

दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!

शेवटी, पाडगावकरांच्या ओळी आठवता !!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत ;
पेला अर्धा भरला आहे,
असं सुद्धा म्हणता येत !!

सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं ???

सांगा कसं जगायचं ???
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत.

तुम्हीच ठरवा.... !!

मित्रांनो, सकारात्मक व्हा, आनंद लुटा !!
 
 ************************************************************************
 
--------------------------------
शब्द शब्द जपून वापरा
---------------------------------


 तुकारामहाराज आपल्या अभंगात म्हणतात-

आम्हां घरी धन शब्दाची रत्ने।
शब्दाची शस्त्रे यत्न करू।।
शब्द चि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्दे वाटू धन जनलोकां।।
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव।
शब्दे चि गौरव पूजा करू।।

संत तुकारामांकडे शब्दांचीच धनदौलत होती. समाजाला देण्यासाठी त्यांच्याकडे शब्दरूपी धन होते. शब्दाला ते देवत्व बहाल करतात. ते शब्दांचीच पूजा बांधतात आणि हयातभर शब्दांचाच गौरव करताना दिसतात. भौतिक संपत्तीपेक्षा त्यांना शब्दसंपत्तीचे मोल अधिक वाटते.
कारण शब्द जसे विधायक असतात तसे ते विघातकही असतात. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा, हा सुविचार आपण अनेक वेळा ऐकलेला असतो. शब्द जसे प्रोत्साहन देणारे असतात. तसे माणसाला खचवणारेही असतात. शब्दांनी जशी माणसे उभी राहतात तशी ती कोलमडूनही पडतात

शब्द फार महत्त्वाचे असतात, असे म्हणतात. त्यामुळेच ते जपुन वापरावे लागतात. पण, असं असुनही काही लोकांच्याच शब्दांना किंमत असते, असही दिसते. त्याच कारण शब्द तेच असले तरी उच्चारणारी व्यक्ती त्या दर्जाची नसेल तर त्याला काहीच अर्थ नसतो. म्हणजेच शब्द उच्चारणारी व्यक्ती जर सभ्य असेल तर सहाजिकच, त्याच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द ऐकण्यासाठी लोक वाट पहातात किंवा त्याने उच्चारलेला शब्द कानावर पडावा म्हणून वाटही पहातात. 

याच्या अगदी उलट अवस्था असभ्य लोकांची किंवा दुर्जनांची असते. ते काहीही बोलले तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांचे शब्द ऐकण्यासाठी इतरही राहत नाही. कारण, ते दुर्जन असल्यामुळे त्यांच्या शब्दात सच्चेपणा नसतो. त्यात कष्ट आणि प्रामाणिकपणा यांचा अभाव असतो. सहाजिकच, त्यांनी कितीही चांगले आणि उत्कट विचार मांडले तरी त्याच्यात सच्चेपणा नसल्यामुळे त्यांचे शब्द हवेत विरुन जातात. 
सज्जनांचे शब्द हे शिलालेखाप्रमाणे असतात. सहजपणे उच्चारले तरीही ते अभंग राहतात. तर दुर्जनांचे शब्द पाण्यावर उमटलेल्या तरंगाप्रमाणे क्षणात विरुनही जातात. ते विनाश असतात. म्हणूनच आपल्या शब्दांला किंमत यावी असे वाटत असेल तर आधी सज्जन व्हायला हवे

 मराठी भाषेमध्ये "शब्द देणे, शब्द पाळणे, शब्दाला जागणे' असे काही वाक्प्रचार आहेत. कोणत्याही भाषेमध्ये शब्दाला फार महत्त्व असते. भाषेमध्येच कशाला तर जीवनामध्येच शब्दाल अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
 शब्द हे जसे खोचक असतात, बोचक असतात, टोकदार असतात, तसे सांभाळून घेणारे, जीव लावणारे, वात्सल्य जपणारेही असतात. 
काही शब्द ऊर्जा वाढवणारे, प्रेरणा देणारे, प्रोत्साहित करणारे असतात. म्हणून जीवनामध्ये शब्दांना फारच महत्त्व असते.
शब्दांना जशी खोली असते तसा अर्थही असतो. शब्दाला व्यक्तिमत्त्व असते. शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या अर्थाचे सहचारी भावनही सोबत येतात. तसेच शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याचे अनुभवजन्य भावही मनात फेर धरतात.
व्यवहारामध्ये जसे पैशाला स्थान असते तसे जीवनामध्ये शब्दाला स्थान असते. 
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात 
"शब्दची आमुच्या, जीवाचे जीवन'
 हे सारं शब्दपुराण सांगायचं कारण म्हणजे या शब्दांनीच काहींची जीवनं वाचतात आणि फुलतात हे होय.

 
 

*************************************

        माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत. आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. (चांगला स्वभाव म्हणजे बुळेपणा नव्हे. स्वतःचा 'होयबा' करणे तर अजिबात नव्हे.) पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.
       तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवतपणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की तो संशयास्पद वाटू लागेल.
     अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो.
          लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळासारखी टोचत राहते, असह्य वेदना देते.
      'भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे. कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे हवेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं, जमल्यास आचरणातही आणावं. पण आंबा आवडला म्हणजे लगेच झाड उपटून घरात आणण्याचा वेडेपणा आपण करू नये. आंबा खाण्याचा आनंद घ्यावा आणि आपलं 'आपलेपण' आपण टिकवून ठेवावं. आपणच आंब्याचं झाड होण्याचा प्रयत्न करू नये.
      काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मनात राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्यासोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती.  मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षाभंग वाट्याला येतो.
      माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपलेपणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी. चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा.
       माणसं जरूर जोडावीत, जपावीत, एकमेकांच्या  सुटून आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं...🙏🙏🙏

*************************************

*************************************

समुद्राच्या. किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली.....

 तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि

"समुद्र चोर आहे".

त्याच समुद्राच्या दुस-या बाजुला मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि

"समुद्र पालनकर्ता आहे".

एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते

"समुद्र खुनी आहे".

एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो

"समुद्र दाता है".

अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते

लोकं काहीही म्हणू द्या...

 परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो... 

आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो

      जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...

भूतकाळातील विचार करत बसू नये. 

यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये.

जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता

जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात..

🙏🏻📿 📿🙏🏻

*************************************


👍👍👍


घरटे उडते वादळात  

बिळा-वारूळात पाणी शिरते 

कोणती मुंगी? कोणतं पाखरू?

म्हणून आत्महत्या करते?

🐜🕊


प्रतिकूल परिस्थितीतही 

वाघ लाचारीने जगत नाही 

शिकार मिळाली नाही म्हणून 

कधीच अनुदान मागत नाही.

🐅


घरकुलासाठी मुंगी

करत नाही अर्ज 

स्वतःच उभारते वारूळ 

कोण देतो गृहकर्ज?

🎭


हात नाहीत सुगरणीला 

फक्त चोच घेऊन जगते 

स्वतःच विणते घरटे छान 

कोणतं पॅकेज मागते?

🕴


कुणीही नाही पाठी 

तरी तक्रार नाही ओठी 

निवेदन घेऊन चिमणी 

फिरते का कोणत्या योजनेसाठी?


घरधन्याच्या संरक्षणाला 

धावून येतो कुत्रा 

लाईफ इन्शुरन्स काढला का? 

असं विचारत नाही मित्रा!

🐕


राब राब राबून बैल 

कमावून धन देतात 

सांगा बरं कुणाकडून 

ते निवृत्तीवेतन घेतात?

🐂


कष्टकऱ्याची जात आपली 

आपणही हे शिकलं पाहिजे 

पिंपळाच्या रोपासारखं 

पाषाणावर टिकलं पाहिजे

🤕


कोण करतो सांगा त्यांना 

पुरस्काराने सन्मानित 

तरीही मोर फुलवतो पिसारा 

अन् कोकिळ गाते मंजुळ गीत

🐧


मधमाशीची दृष्टी ठेव 

फुलांची काही कमी नाही 

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 

कोणतीच रोजगार हमी नाही

🐝


घाबरू नको कर्जाला 

भय, चिंता फासावर टांग 

जीव एवढा स्वस्त नाही 

सावकाराला ठणकावूण सांग

😎


काळ्या आईचा लेक कधी 

संकटापुढे झुकला का? 

कितीही तापला सूर्य तरी 

समुद्र कधी सुकला का?

🌊💦


निर्धाराच्या वाटेवर 

टाक निर्भीडपणे पाय 

तू फक्त विश्वास ठेव 

पुन्हा सुगी देईल धरणी माय

🎑


निर्धाराने जिंकू आपण 

पुन्हा यशाचा गड 

आयुष्याची लढाई 

फक्त हिमतीने लढ...

फक्त हिमतीने लढ...!!

👊

******************************


धावता कृष्ण आणि स्तब्ध बुद्ध !!


भारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या. एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण.

बुद्ध आत्मिक, अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे. बुद्ध एक उदाहरण देत असत. मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो. शांत असतो. तो आपली जागा सोडत नाही. जिथल्या तिथे स्थिर असतो. स्तब्ध असतो. तो आपली जागा सोडून धावू लागला तर रथ निश्चितच कोसळेल. सारा डोलारा खाली येईल. उध्वस्त होईल. म्हणून बाहेर कितीही संघर्ष होत राहिला तरी आत शांतता पाहिजे. मन शांत पाहिजे. ते जितकं शांत राहील तितका रथ नीट धावेल. खाचखळगे पार करेल. बुद्ध आतील शांतता शिकवतो.

बुद्धाचं आणखी एक उदाहरण आहे.

बुद्ध शिष्यांसह दुसऱ्या गावात चालला होता. मधे जंगल आले. सगळे एकामागून एक चालले होते. वाटेत नदी आडवी आली. नदीचं पात्र ओलांडावं लागणार होतं. म्हणून सगळ्यांनी नदीत पाय टाकले. त्यांच्या पावलांमुळे खाली बसलेला गाळ वर आला. पाणी गढूळ झाले. बुद्धांच्यामागे शिष्य नदी ओलांडून पुढे निघाले. पुढे थोडं अंतर पार केल्यावर सगळ्यांना तहान लागली.

बुद्धाने एका शिष्याला सांगितले " परत मागे जा आणि नदीतून प्यायला पाणी घेऊन ये."

शिष्य म्हणाला, " ते पाणी गढूळ झाले आहे. पिण्यासाठी योग्य नाही. "

तरीही बुद्धाने आज्ञा दिली. बुद्ध काहीतरी शिकवू पाहत होते.

शिष्य मागे फिरला. नदीजवळ गेला आणि पाहतो तर काय, पाणी निर्मळ, स्वच्छ झाले होते. इतके स्वच्छ होते की तळ दिसत होता. शिष्याला पटकन कळले. आपण पाण्यात उतरलो की पाणी गढूळ होते. शिष्याला कळून चुकले की आपण मनाने परिस्थितीत उतरलो की सगळे गढूळ होते. मन डोलू लागले की काहीच नीट दिसत नाही. परिस्थिती आणखी बिघडते.

बुद्ध मन शांत ठेवायचा संदेश देतात. जो फारच आवश्यक आहे.

श्रीकृष्ण त्याच्यापलीकडे जातो. तो रथाच्या चाकाचा धावता परीघ बनतो. अनेक खड्डे, धक्के, खाच-खळगे कसे पचवत जायचे, त्यांच्याशी कसा सामना करायचा हे शिकवतो.

कृष्णाचं एक उदाहरणे पहा.

गोकुळावर मुसळधार पाऊस पडला. गोकुळ बुडू लागले. संकट उभे राहिले. कृष्णाने गोकुळवासीयांना उपाय सांगितला की आपण गोवर्धन पर्वत उचलून घेऊ. त्याच्या आश्रयाला जाऊ. हे काम अशक्य होते. पर्वत कसा उचलला जाणार. पण कृष्ण म्हणाला -मी फक्त करंगळी लावतो आणि पर्वत उचलतो. त्याला आधार देण्यासाठी तुम्ही खालून काठ्या लावा. पुढची कथा अशी आहे की गोकुळातील सगळ्या लोकांनी काठीचा टेकू लावून पर्वत उचलला आणि कृष्णाने करंगळी लावली होती. म्हणजे कृष्णाने काहीच केलं नाही. फक्त संकटाला तोंड देण्याचा आत्मविश्वास दिला. सामुदायिक शक्ती उभी केली आणि संकटाला तोंड दिलं.

कृष्णाचं सगळं चरित्र पाहिले तर दिसते की तो बाहेरचा संघर्ष शिकवतो.

कृष्ण आणि बुद्ध यांचे विचार महाभारताच्या अंतिम युद्धात एकवटलेले दिसतात. बुद्ध आतून शांत राहण्याचा सल्ला देतो आणि कृष्णही फक्त साक्ष बनून उरतो. कृष्ण अर्जुनाच्या रथावर चढला तेव्हा त्याने युद्ध करणार नाही अशी शपथ घेतली होती. त्याने हातात शस्त्र घेतले नाही.  तो अर्जुनाचा रथ चालवत राहिला. कृष्ण महान योद्धा होता. युद्धकलेत प्राविण्य होतं. क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या चॅम्पियन खेळाडूला नुसतं उभं राहून खेळ पाहणे किती कठीण होईल. कृष्णाचीही तीच अवस्था झाली होती. तो फक्त साक्षीदार बनला. अर्जुनाचा रथ चौफेर युद्ध करत राहिला आणि कृष्ण आतून शांत होता. फक्त साक्षीदार होता.

जणू बुद्ध आणि कृष्णाचा इथे संगम झाला.

बुद्ध स्तब्ध आहे तो फार आवश्यक आहे, कृष्ण धावता आहे तोही आवश्यक आहे.

बुद्ध आतील शांतता आहे तर कृष्ण बाहेरील संघर्ष आहे!!

दोघे सोबत असतील तर जीवनातील सारा संघर्ष कठीण नाही.

☝🏻👌🏻📝📚



******************************************************

सुंदर कोण ?
-----------------------
एकदा शनिदेव आणि लक्ष्मी देवाधिदेव इंद्राकडे गेले व आमच्यापैकी सुंदर कोण हे सांगा असा त्यांनी आग्रह धरला. लक्ष्मीला सुंदर म्हणावे तर शनिदेव महाराज रागावतील. पण शनिला सुंदर म्हणावे तर लक्ष्मी रागावेल. तेव्हा काय करावे असा प्रश्न पडला म्हणून इंद्रदेव म्हणाले, ”असं करा ब्रह्यदेवाला भेटा. तेच उत्तर देतील” दोघेही ब्रह्यदेवाला भेटतात. ब्रह्यदेव सांगतात  ”दोघेही समोरच्या वडाच्या झाडाला हात लावून परत या, मग मी सांगतो.” दोघेही वडाच्या झाडाला हात लावून परत येतात तेव्हा ब्रह्यदेव सांगतात, ”शनिमहाराज तुम्ही जेव्हा जात होता तेव्हा तुम्ही सुंदर दिसत होता आणि माता लक्ष्मी, तू परत येत होतीस तेव्हा सुंदर दिसत होतीस ?” ब्रह्मदेवांनी दोघांनाही नाराज न करता सत्य सांगितले. राशीतून  जाणारा शनि  चांगला वाटतो आणि  येणारी ‘लक्ष्मी’ केव्हाही सुंदर असते.
तात्पर्य – सत्य सांगतांनाही कोणास  नाराज न करता सांगावे. 

**********************************************************************************
मोक्ष...

देवा उचल रे!!! मला कंटाळा आला या असल्या जगण्याचा म्हातारी आर्ततेने म्हणाली, बिचारी एकटीच रहात होती भल्या मोठ्या बंगल्यात कुणीही नव्हत बरोबर फक्त एक बाई यायची धुण भांडी करायला खर तर धुण भांडी हा बहाणा होता खरतर ही म्हातारी जीवंत आहे का मेली आहे याची तपासणी करायला मुलीन सांगितल होत... ती बाई नुकतीच येऊन गेली ,बोलायला थांब म्हणली म्हातारी पण मला लय काम हायत म्हणुन पळुनच गेली, फार फार पिकवायची ती म्हातारी हातातला वाॅकर टेकत टेकत बाहेर व्हरांड्यात येऊन बसली होती आसपास जवळ घर नव्हत,  लांबवर आताशी बांधकाम चालु होती बाकी शेत होत ... हो या म्हातारीच्या मालकीच ३० एकर शेत होत, तिच्या मालकाने आणि तिने लावलेल्या झाडाकडे एकटक पाहिल आणि आठवणीन डोळ्यात पाणी आलं जवळच इमानदार कुत्र बसल होत शेपटी हालवत......
     इतक्यात भवती भिक्षाम देही हा नाद कानावर आला कुत्र्याने सतर्क तेने झेप घेतली पण फाटकाजवळ जाऊन नुसतच उभारल भुंकल वगैरे काही नाही, वाजवी पेक्षा जास्तच उंच तरणाबांड आणि गौरवर्णीय संन्यासी आत आला आणि म्हणाला माई भिक्षा दे...... म्हातारी बोलली कशी देऊ मला ना उठता येतय ना बसता येतय तु ये आणि हातान घे सामान बिमान चोरायचा विचार सुध्दा मनात आणु नकोस मी जवळ बंदुक बाळगुन आहे समजल का? यावर तो मुलगा जोरदार हसला त्याचे पांढरेशुभ्र दात दिसले तो म्हणाला अग वेडे हे वस्त्र ही मला ओझ वाटत तिथ तुझ जुनाट सामान माझ्या काय कामाच गं........ यावर ती म्हणाली तु मला दिसतोस ये माझ्याशी गप्पा मार नां, तो लगेच तिच्या समोर खुर्चीत जाऊन बसला आता मात्र तु मला निट दिसलास बाबा अगदीच श्रीपाद श्रीवल्लभ सारखा देखणा आहेस नाव काय तुझं बाळा मला लोक स्वामी म्हणतात पण आजी तु रोज मुक्त कर म्हणुन का ओरडतेस ग बाई, अरे बापरे म्हणजे तु रोज जाता येता ऐकतोस तर माझं दुःख तरुण किंचीत हसला आणि म्हणाला होय!! रोजच ऐकतोय मी म्हणुन तर आज आलो तुला भेटायला.....
              काय सांगु पोरा तुला मला दोन पोर आणि एक मुलगी माझे मालक तलाठी होते ते १६ वर्षांखालीच वारले त्यांनीच शेतात हे घर बांधल होत हे सगळं शेत आमचच आता वाट्यान दिलंय, दोन्ही पोर सांभाळत नाहीत ते हजार बहाणे सांगतात इकडं ये म्हणल की यांची पेन्शन आहे ,पण पोरांना आता एटीएम का कसल कार्ड काढलय बॅंकेत ही जायची गरज राहीली नाही, काही पैसे तोंडावर फेकतो बस, एक जेवणाचा डबा येतो बेचव तेच आपल खात असते... मुलीला आहे माया येती भेटती रडती आणि निघुन जाती ,डोळे पुसत फारच माया आहे तिला माझ्या विषयी.......
        स्वामी मंद हसले आणि म्हणाले माया वगैरे झुठ असतं , माई ती शेतावर नजर ठेवुन करत असेल तर, नाही नाही रे पोरा ती तसली अजिबात नाही!! अग फोन करून म्हणुन तर बघ तिला म्हणाव तुझ सगळ चांगल आहे मी जायदाद पोरांच्या नावाने करते.... आणि जोरदार हसु लागले म्हातारी तापट होती पण आज ती शांत बसली होती ....
       मोक्ष पाहिजे तुला ना.... मिळेल जरुर मिळेल अवश्य मिळेल गं.. त्यासाठी तर मला इथे पाठवल आहे भगवंतांनी, म्हातारी म्हणाली देव माझं ऐकतो का? ऐकतो का? कान किटुन गेले परमेश्वराचे स्वामी म्हणाले ... आणि मुक्ती दे मुक्ती दे इतकं सोपं वाटतं का तुला ते मिळवण...... तो तरुण संन्यासी विलक्षण तेजस्वी दिसु लागला अंगाला चंदन कस्तुरीचा सुगंध दरवळत होता गोरापान गळ्यात रुद्राक्ष माला शोभत होती.. तो बोलु लागला ज्ञानाचा अतिप्रचंड झरा मुखातुन वाहणार होता हे पक्कच होत.....

स्वामी म्हणाले अग मुक्ती दे मुक्ती दे असं म्हणुन मुक्ती मिळत नसते ती एक प्रक्रीया आहे.. जस पाऊस ये पाऊस ये असं नुसत्या बोलण्याने तो येत नसतो समुद्राच्या पाण्याची वाफ होते,ढग तयार होणे, वारा आपल कार्य चोखपणे बजावणे, डोंगरानी अडवणे, झाडांनी बाष्पयुक्त वातावरण निर्माण करणे आणि मगच पाऊस पडतो.... तुझ्या नुसत्या पोकळ बडबडीन ती शक्ती फक्त जागी झाली तुझ्या पर्यंत येणार नाही आणि तु भाग्यवान आहेस माई परमात्मन यांनी मला आदेश केला कारण तुझ मागल्या जन्मी पुण्य अफाट होत या जन्मी तुला मिळालेले भोग हे राहिलेल्या पापाच परीमार्जन करण्यासाठी होत...
       म्हातारीचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात अश्रु वाहायला चालु झाले ती म्हणाली कारण काही असो माझी प्रार्थना पोहचली हे महत्त्वाचं आहे.
              माई जगातील प्रत्येकाची हाक परमात्मन यांच्या पर्यंत पोहचतेच पण प्रारब्ध संचित अटळ असल्याने ते हस्तक्षेप टाळतात पण काही खचित प्रसंगी त्यांनाही नियमात बदल करावाच लागतो...
            इतक्यात उघड्या गेट मधुन अतिशय पांढरी शुभ्र गाय प्रवेश करुन आत आली आणि तिथेच उभारली तरुण संन्यासी न प्रसन्न पणे त्या गाईकडे पाहुन स्मित केलं मी कुठे ही असु दे ही मला शोधत येतेच येते...
           मग मला मोक्ष, मुक्ती मिळेल का रे पोरा ?? म्हातारी चा आर्जवी आणि कातर स्वर पाहुन त्या संन्याश्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते म्हणाले माई मुक्ती म्हणजे सगळच सोडुन देणे अगदी सगळंच ना संपत्ती ना आप्तेष्ट ना मुलं ना आपला देह कशाबद्दल ही मोह नसावा माई तु आज या जमिनीच्या तुकड्यावर मोह लावुन बसली आहेस आज तुझ्या जीवनात काही ही राहील नाही याचा तु आनंद मानायला हवास कारण हेच खर जीवन आहे इतके दिवस फक्त नाटीका चालु होती अस समजता कुणाकडुन ही अपेक्षा करु नकोस अगदी स्वताहा कडुन देखील ही तु जर या जीवनात च जीवंत पणी सगळ्या बंधनातुन सुटलीस तर तुला मेल्यावर कोण अडवणार आहे जे पाप झाले त्याची माफी माग आणि मग बघ चमत्कार तु मुक्त झाली म्हणुन समज....
       इतक्यात तो संन्यासी उठला म्हातारीच्या डोक्यावरून ममतेने हात फिरवला  तिचे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते कुत्र ही माग माग उठलं आणि संन्यासी च्या माग चालत आलं गाय तिथेच उभारली होती तिला संन्यासी थापटतच होता.. म्हातारी म्हणाली मी जर इतकी पुण्यवान म्हणतोस तु तर तुझे परमात्मन का आले नाहीत मला सांगायला यांवर संन्यासी ने सुंदर स्मित केले आणि म्हणाला माई ती नजर पाहिजे ते इथेच आहेत यावर म्हातारी स्तब्ध झाली... इतक्यात संन्यासी मोठ्या आवाजात म्हणाले माई इकडे निट बघ जरा.... गाय उभारली होती त्याला टेकुन संन्यासी उभा होता पायाजवळ श्वान होता मोठ्ठा पिवळसर प्रकाश पडला त्यात म्हातारी चे डोळे दिपून गेले काही क्षणातच गळ्यामध्ये हार असलेले त्रिशुळ असलेले तिनमुखी दत्तात्रय तिला दिसु लागले तीन कृतज्ञ भावनेने हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनातुन पक्का विचार केला परमेश्वरा मी सगळ सोडल आहे आणि तुझ्या चरणाशी लीन आहे इतक्यात तिच्या अंगालाही कंप सुटला दोन्ही नाकपुड्या मधुन श्वास समपातळीत वाहु लागला तीन एकदम मोठे श्वास घेतले आणि म्हातारी ने खुर्चीत मान टाकली..........

        आत्मज्योत भगवंताच्या छातीमध्ये विलीन झाली ती मोक्षाला शेवटी गेलीच.......( समाप्त)
**********************************************************************************

मंथन

१.   मानसिक स्वास्थ्याचा जागर 

 

                 मानसशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय. कुठलेही क्षेत्र आज असं नाही, की ज्याचा मानसशास्त्र विषयाशी संबंध नाही. असं असतानाही हा विषय विद्यापीठाच्या व शालेय अभ्यासक्रमामधून दुर्लक्षित का राहतो हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याबाबत इतके जागृत असतो की, लहानशी इजा झाली तरी पटकन डॉक्टरांना भेटतो, औषधे घेतो, विश्रांती घेतो; पण मानसिक स्वास्थ्याबाबत आपण इतके जागृत आहोत काय? 
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, की त्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ होतॆ, मनावर प्रचंड ताण येतो. आयुष्यात महत्वाच्या प्रसंगी नेमका निर्णय घेता येत नाही. कुणाशी तरी बोलावं, मन हलकं करावं असं वाटतं. सतत अपयश येतं. नातेसंबंधांमध्ये तणाव येतात, भविष्यात आपलं कसं होईल याची चिंता वाटते, भूतकाळातील चुकांची खंत वाटते. नैराश्य येतं, आत्महत्या करावीशी वाटते. अचानक एखाद्या क्षणी आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं वाटतं. अशा असंख्य समस्या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतात. अशावेळी त्याला हवा असतो दिलासा, विश्वास, आधार, मदतीचा हात, त्याला समजून घेणारं कोणीतरी.  पण असं त्याच्या आजूबाजूला कोणीच नसतं. तो घरच्यांशी संवाद साधू शकत नाही, मित्रांना सांगू शकत नाही,कुणाला सांगितलं तर त्या व्यक्तीला टाळले जाते, त्याची चेष्टा केली जाते. तू नाटक करतोय असं म्हटलं जातं. मनाला अस्वस्थ करणाऱ्या समस्यांची उत्तरं असतात मानसशास्त्रात. या विषयाचा जाणकार प्रत्येक घराघरांत निर्माण झाला तर त्या घराचं मानसिक स्वास्थ्य निकोप राहायला मदत होईल. मानसशास्त्र फक्त मानसिक समस्या सोडवण्यास मदत करतो,असं मुळीच नाही. आयुष्यात प्रगती करण्याकरिता, व्यक्तिमत्वामधील सामर्थ्य वाढवण्यासाठीही हा विषय मदत करू शकतो.

**********************************************************************************
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. जेव्हा सर्वच शून्य वाटते...!

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येतेच येते ,"जेव्हा सर्वच शून्य वाटते"...जगणे नको,रडणे नको,नको हरणे जिंकणे,नको शोधणे नव्या दिशा नव्या वाटा...

थकलोय आता साराच खेळ खेळून आयुष्यातील सारेच डाव मांडून...बस् आता हवी जीवाला फक्त एकांत, शांतता  आणि एक शून्य ....जो बंद करेन जगण्यासाठी सर्वच वाटा...?

असे मन जेव्हा शून्यात जाते...तेव्हाच खरा नव्याने पुन्हा जन्म होतो ...

त्या एकाकीपणातच तो आत्मा फक्त स्वतःचा विचार करतो फक्त स्वतःचा....!

इष्टआप्तांच्या गोतावळ्यात  शोधतो स्वतःला ...आतापर्यंत जगलेल्या आयुष्यात काय मिळवले ,काय दिले ...!

आता यापुढे काय करावे ,काय मिळवावे...काय सोडावे...या सगळ्याच गोष्टीचा ताळमेळ जुळवले जातात...तो एकाकीपणाच स्वतःची नव्याने ओळख करुन देतो...नवा मार्ग दिसण्याची वाट शोधू लागतो....

अगदी सुखदुःखांचा आठवांचा पूर येतो डोळ्यातून धो धो वाहून जातो..आणि त्या हताश मनाला उर्जाही देतो...

अचानक वैचारीकता जोर धरू लागते...व  एकदम विज चमकावी तशी उत्तरेही मिळू लागतात मनाला...

शांत खूप शांत वाटते .बोलके मन स्वतःच स्वतःची प्रेरणा होते ..!

यातून कोणी सकारात्मक उर्जा भरत उभारी घेतात तर कुणाच्या आयुष्यात नकारात्मक उर्जेमुळे फक्त निराशाच येते...

हा प्रश्न त्या त्या जीवाच्या वैचारीकतेवर अवलंबून असतो...हे मात्र खरय...!

पण जो उभारी घेतो,घेती....ती व्यक्ती समाजाला प्रेरणादायी ,मार्गदर्शक ठरते.कारण अशा व्यक्ती समाजात कष्ट ,मेहनत,चिकाटी,सातत्य,आशा,आत्मविश्वास यांच्या जोरावर खूप नावलौकिक मिळवतात..

आणि जेव्हा सर्वच शून्य वाटलेले असते...त्या शून्यापुर्वी एक आशेचा किरण उगवला जातो...

पुन्हा नव्याने जगायला ...

एक शून्य शून्य होतो....!

शंभर वाटा जन्म घेत धाव घेतात...!

यशस्वी करायला ...!!!

नव्याने जगत ईतरांनाही जगवायला...!
😊😊😊😊😊😊😊
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


4 comments:

  1. nice Update, thanks a lot for sharing, useful msbte update msbte

    ReplyDelete
  2. The MSBTE Question Papers and Model Answers towords diploma exam papers which are been mentioned above are really very helpful thanks for sharing the quality information, through this blog, for more info visit:
    MSBTE

    ReplyDelete