Total Pageviews

Thursday 21 May 2020

ज्ञानेश्वरीमुळे स्फुरलेले विचार

                                  ज्ञानेश्वरी


अध्याय पहिला (५६ ते ६२):
                                                    ज्ञानेश्वरी कशी वाचावी?


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जैसे शारदीचिये चंद्रकळें- । माजि अमृतकण कोवळें ।

ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे ॥ ५६:१ ॥

तियांपरी श्रोतां । अनुभवावी हे कथां ।

अति हळुवारपण चित्ता । आणुनियां ॥ ५७:१ ॥

हे शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।

बोलाआधी झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८:१ ॥

जैसे भ्रमर पराग नेती । परी कमळदळे नेणती ।

तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९:१ ॥

कां आपुला ठाय न सांडिता । आलिंगिजे चंद्र प्रगटता ।

हा अनुराग भोगिता । कुमुदिनी जाणे ॥ ६०:१ ॥

ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंतःकरणे ।

आथिला तोचि जाणे । मानू इये ॥ ६१:१ ॥

अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणिया योग्य होती ।

तिहीं कृपा करुनि संती । अवधान द्यावे ॥ ६२:१ ॥

श्रीज्ञानेश्वरी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्गमयी मूर्ती आहे यात शंका नाही. महाराजांच्या संपूर्ण व्यक्‍तीमत्वाचे सुंदर चित्र या ग्रंथराजामधून साकार होते असे वाटते. माउलींचा आपल्या गुरुंप्रती असलेला अतीव आदर, त्यांची पराकोटीची नम्रता, समाजाकडे प्रेमाने पहायची नजर आणि भोंदूगिरीबद्दलचा तिटकारा इत्यादी सर्व गोष्टींचे स्पष्ट प्रतिबिंब श्रीज्ञानेश्वरीमध्ये पहावयास मिळते. या ग्रंथाद्वारे प्रत्यक्ष श्रीज्ञानेश्वर महाराजच आपणास परमार्थाचे गुह्य उकलून सांगावयास जवळ येत आहेत अशी कित्येक साधकांची अनुभूती आहे. या ग्रंथाचे नित्यपठण जो करील त्याला परमार्थ गवसेल यात अजिबात संदेह नाही. परंतु अशी वस्तुस्थिती असताना देखील आपण दररोजच्या व्यवहारामध्ये असे बघतो की अनेक साधक वर्षोनुवर्षे श्रीज्ञानेश्वरीची पारायणे करुनही कोरडेच राहिले आहेत. चराचरातील सर्व जीवमात्रांबद्दलची सहिष्णुता त्यांच्या अंगात भिनण्याऐवजी स्वतःला एका पंथाचे कट्‍टर अनुयायी बनवून इतरपंथीय लोकांवर टीका करण्यात त्यांना धन्यता वाटत आहे असे दिसून येते. श्रीज्ञानेश्वरीसारखा अमृतमयी ग्रंथ हातात असूनही स्वतःची साधना सहज बनविण्याऐवजी अधिकाधिक रीतीरिवाजांनी बाधण्यात त्यांना धन्यता वाटत आहे असे का आढळते यावर आज विचार करु.

असे बघा, घराबाहेरील गोठ्यात कामधेनूवत दुभती गाय बांधलेली आहे, पोटात भूक प्रज्वलित झालेली आहे आणि दूध पिण्याची अनिवार इच्छा झालेली आहे या अवस्थेतसुध्दा जर दूध काढण्याची हातोटी नसली तर उपाशी रहावे लागते. त्याचप्रमाणे, मनात जिज्ञासा जागृत झालेली आहे, गुरुंनी अनुग्रह देऊन परंपरेमध्ये सामाविष्ट केलेले आहे आणि हातात अमृतमयी श्रीज्ञानेश्वरी आहे अशा शुभ घटनांनतरही श्रीज्ञानेश्वरी कशी वाचावी हे माहिती नसले तर परमार्थ आपल्यापासून दूरच राहतो. श्रीज्ञानेश्वरीचे पठण कसे करावे याबाबत आज निरुपणाला घेतलेल्या ओव्यांमधून माउली आपणास असे सांगत आहे की : ‘ज्याप्रमाणे शरदऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील जीवनोपयोगी अमृत चकोरपक्षी (तन आणि मन पणाला लावून) एकाग्रतेने चाखतो (५६). त्याचप्रमाणे श्रोत्यांनी हा ग्रंथ मनाला तल्लीनत्व आणून अलगद अनुभवावा (म्हणजे निव्वळ शाब्दीक ज्ञान नको) (५७). यातील तत्वे शब्दांमध्ये सापडतील अशी अपेक्षा न करीता (म्हणजे निव्वळ श्रवणेंद्रिये वा नेत्रांद्वारे इकडे बघू नका) उच्चारलेल्या शब्दांमागील अभिप्रेत असलेल्या अर्थाकडे सतत नजर ठेवा (५८). ज्याप्रमाणे भुंगा कमळातील परागकण चोरुन नेतो हे कमळाच्या पाकळ्यांना जाणवित देखील नाही त्याचप्रमाणे या ग्रंथातील अर्थाचे सेवन करता आले पाहीजे (५९). किंवा आपले स्थान न सोडता, फूल चंद्राच्या किरणांचा आस्वाद कसा घ्यायचा हे जाणते (म्हणजे चांदण्यात कळी पूर्ण विकसित होते) (६०). त्याप्रमाणे आपल्या मनाला एकाग्र करुन, ही एकच आपल्या आयुष्याला उज्जीवन करणारी गोष्ट आहे या नजरेने जो पाहील त्यालाच परमार्थ दिसेल (६१). अहो, थोडक्यात सांगायचे झाले तर असे की अर्जुनाने ज्या पातळीवर गीता ऐकली त्याच पातळीवर जाऊन आपण हा ग्रंथ बघितला तरच जीवनाचे सार्थक होईल (६२).’

अतिशय सुंदर शब्दांमध्ये माउलींनी वाचकाच्या मनाची अवस्था कशी असावी याचे वर्णन केलेले आहे. श्रीज्ञानेश्वरांची दृष्टी अत्यंत सकारात्मक आहे म्हणून आपण काय करु नये याचे वर्णन करण्याऐवजी त्यांनी आपण काय करावे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या या सांगण्यामध्येच ‘अशा मनस्थितीशिवाय केलेली सर्व धडपड व्यर्थ आहे’ हा इशारा दडलेला आहे हे आपण विसरता कामा नये. श्रीज्ञानेश्वरी वा एकनाथी भागवत किंवा श्रीसमर्थ रामदासकृत दासबोध अशा ग्रंथाची अनेक पारायणे करुनही आपल्यात काहीच बदल कसा होत नाही अशी पृच्छा ज्या साधकांच्या मनात उद्भवली असेल त्यांनी ‘आपले प्रारब्ध नसेल’ या पळवाटेत उत्तर शोधू नये. कारण या सर्व ग्रंथांमध्ये आपल्या सर्व कर्मांचा विनाश करण्याची शक्‍ती असल्याने पूर्वकर्मांचे फळ म्हणून ग्रंथ कळत नाही असे म्हणणे अनुचित वाटते. या ओव्यांकडे लक्ष देऊन पहावे की आपण यांतील कसोट्यांना उतरतो की नाही.
झटकुनि आशेचा लेप । करुनि व्यक्‍तिमत्वाचा लोप ।

करावे अंतःकरण निर्लेप । घ्याल ज्ञानेश्वरीतून भगवंताकडे झेप ॥
‘आमची श्रीज्ञानेश्वरीवर असीम श्रध्दा आहे. जेव्हा आम्हाला काही प्रश्न भेडसावतात तेव्हा आम्ही तो प्रश्न डोक्यात ठेवून हा ग्रंथ उघडतो आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर सापडते असा आमचा नेहमीचा अनुभव आहे.’ हे शब्द उच्चारणाऱ्या साधकाच्या डोळ्यात माउलींबद्दलचे प्रेम भरुन ओसंडत होते आणि कृतज्ञतेचे हसू मुखावर होते. आयुष्यभर हा ग्रंथ सोडणार नाही अशी मनाची ठेवण या शब्दांवरुन स्पष्ट होत होती.

आपल्यापैकी अनेक साधक आपल्या गुरुंकडे वा दैवयोगाने हाती आलेल्या पारमार्थिक ग्रंथांकडे स्वतःच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यास उपयोगी वस्तू या नजरेने पहात असतात. अध्यात्माच्या मार्गावर येण्याकरीता त्यांचा हेतू ‘आहे त्या जीवनाला अधिक सुंदर बनविणे’ हा असतो. याचा अर्थ असा की त्यांना व्यावहारिक जीवनाचा उद्वेग आलेला नसतो तर संसारातील (स्वतःला जाणविलेल्या) न्यूनतेंना भरुन काढण्याचा प्रयत्‍नांचाच ‘अध्यात्म’ हा एक मार्ग असतो. हा उद्देश्य मनात ठेवून जो श्रीज्ञानेश्वरीकडे बघतो त्याला परमार्थाची गवसणी कशी होणार? माउली म्हणत आहे की अर्जुनाने गीता जशी ऐकली तशी आपण ऐकावी. अर्जुनाची योग्यता अंगी येण्यासाठी प्रथम आपण आपल्या हातातील व्यावहारिक प्रगतीचे गांडीव धनुष्य टाकून दिले पाहिजे आणि मग भगवंतांना सांगायला हवे की मी तुम्ही जसे सांगाल तसे करीन. याउलट आपण हातातील धनुष्याचीच नवी आणि सुधारीत आवृत्ती मिळविण्यासाठी भगवंताकडे जातो!!
माउली म्हणत आहे ‘भ्रमर पराग नेती/ परि कमळदळे नेणती’ स्वतःच्या शरीराचा एक अंशसुध्दा फुलाला न टेकविता अलगदपणे भुंगा परागकण घेऊन जातो त्याचप्रमाणे आपण स्वतःच्या व्यक्‍तीमत्वाचा थोडासासुध्दा अंश मनात न ठेवता श्रीज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणजे काय, तर ‘मी एक अमुक-अमुक व्यक्‍ती आहे, माझ्या फलाण्या इच्छा आहेत, मनात अमुक प्रश्न आहेत’ इत्यादी भावनांचा संपूर्ण त्याग करुन आपण हा ग्रंथ उघडला पाहीजे. मनात प्रश्न ठेवून जे हा ग्रंथ उघडतात त्यांना माउलींना अभिप्रेत असलेला अर्थ कळणार का आपल्याच इच्छांचे प्रतिबिंब दिसणार या प्रश्नाचे उत्तर वेगळे सांगायची गरज नाही. माउलींच्या दुसऱ्या उदाहरणातील कळी स्वतःच्या संकुचित जीवनाला बसल्या ठिकाणी तिलांजली देऊन उगविलेल्या चंद्राच्या प्रकाशात उमलून फूल होते. त्याचप्रमाणे आपण मनात अत्यंत प्रेम ठेवून निव्वळ त्या प्रेमाखातीर श्रीज्ञानेश्वरीचे वाचन केले तर का होणार नाही आपल्या जीवनात आमुलाग्र बदल? एखाद्या मेळ्यामध्ये गेल्यावर आपणास कधी चित्रविचित्र आरसे असणारा तंबू दिसतो. आपल्या शरीराचे वेगवेगळे बेढब रुप त्यामधून दिसते. श्रीज्ञानेश्वरी म्हणजे असा एक निर्मळ, स्फटीक आरसा आहे की आपले खरे रुप त्यामध्ये दिसू शकते. प्रत्येक साधकाला जो अर्थ परमार्थाच्या मार्गावर चालायला उपयुक्‍त असतो तोच श्रीज्ञानेश्वरी त्याला दाखविते. परमार्थाच्या सर्व मार्गांचे सुप्त रुप माउलींच्या ओव्यांत साठलेले आहे. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात की ‘म्हणऊनि महाभारती नाही । ते नोहें लोकीं तिहीं । येणेकारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७:१॥’. परंतु हेच उद्गार श्रीज्ञानेश्वरीलाही परमार्थाबाबत लागू होतात. प्रत्येकाच्या दृष्टीस जे पडेल तेच त्याच्या प्रगतीला सहाय्य करेल. परंतु त्यासाठी स्वतःची दृष्टी स्वच्छ असणे फार महत्वाचे आहे. आपण स्वतःच्या डोळ्यावर काळा चष्मा लावून अंधार झाला आहे अशी तक्रार करणे ज्याप्रमाणे निरर्थक असते त्याचप्रमाणे व्यावहारिक दृष्टीला बाजूला न करीता गुरुंकडे जाणे परमार्थाच्या दृष्टीकोनातून अर्थहीन आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मनातील ‘सर्व’ महत्वाकांक्षांचा लोप केल्याखेरीज आपली नजर साफ होत नाही. इथे आपली इच्छा ‘ज्ञानेश्वरीचा अर्थ जाणून घ्यावा’ अशी पारमार्थिक असली वा ‘कचेरीतील विचित्र स्वभावाच्या सहकाऱ्याकडून सहकार्य कसे मिळवावे’ अशी व्यावहारिक असली तरी त्या दोहींचा परीणाम ज्ञानेश्वरीतील तत्वे न दिसण्यातच होतो हे साधकाने लक्षात ठेवले पाहीजे. सर्व इच्छा चुकीच्या आहेत. पारमार्थिक इच्छा मनात ठेवल्याने व्यावहारिक वासनांचा विनाश करणे हे काट्याने काटा काढण्यासारखे आहे. एकदा रुतलेला काटा निघाला की आपण हातातील काटाही बाजूला ठेवतो त्याचप्रमाणे साधकाला अध्यात्मिक इच्छांनासुध्दा काढावे लागते. मनाला सकृतदर्शनी पारमार्थिक इच्छांमध्ये गुंतविणे हा इच्छांमधून बाहेर पडण्याचा मार्गच होऊ शकत नाही. आणि जो पर्यंत मनात इच्छा जागृत आहेत तो पर्यंत आपले स्वतःचे वजन आपण ग्रंथावर टाकत आहोत, अलगद त्याचा स्वाद घेण्यास अपात्र होत आहोत हे ध्यानात घ्या. अशा निःसंदेह जाणीवेतच सर्व इच्छांचे निरसन करण्याचे सामर्थ्य आहे. ज्याप्रमाणे जगण्याची अनिवार ओढ असल्याने स्वतःला हृदरोगाचा झटका बसला की आपोआप धूम्रपानाचे व्यसन सुटते त्याचप्रमाणे एकदा इच्छा ठेवल्याने भगवंत मिळणे अशक्य आहे हे कळले की आपोआप इच्छा नष्ट होऊन मन निर्लेप बनते. परंतु याआधी चकोराला ज्याप्रमाणे शरदीय पोर्णिमेच्या चंद्रप्रकाशाबद्दल अतीव प्रेम असते त्याचप्रमाणे परमार्थाला गवसणी घालण्याबद्दलचे प्रेम आपल्या मनात असणे जरुरी आहे. आणि एकदा हे प्रेम मनात उद्भवले की श्रीज्ञानेश्वरी स्वतः साधकाचा हात धरुन भगवंताकडे घेऊन जाते यात संदेह नाही. माउलींनी हे वचनच आपणास दिलेले आहे!!
॥ हरि ॐ ॥

**************************************************************************** 


अध्याय दुसरा (७१ आणि ७२):
           ब्रह्मस्थितीची परीपूर्णता 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

विहाय कामान्‌ यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ॥ गीता ७१:२ ॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।

स्थित्वाऽस्यामंतकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ गीता ७२:२ ॥

व्यवहारात निव्वळ भौतिक सुखसोयींमध्ये नव्हे तर अगदी नृत्य, गायन, क्रिडा इत्यादी हिशेबवहीच्या बाहेरील विषयांमध्येसुद्धा निरंतर प्रगतीची अपेक्षा असते. त्यामुळेच यंदाच्या वर्षी अमुक रकमेचा फायदा झाला की लगेच कंपनी पुढील वर्षाचे लक्ष्य त्याहून जास्त ठेवते आणि एखाद्या गायकाने ठराविक रागावर प्रभुत्व मिळविले की दुसरा राग शिकायची धडपड सुरु होते. या जगातील बहुतेक सर्व मंडळी जे सध्या आहे त्यापेक्षा अधिक चांगले कसे मिळेल या विचारत गुंगून गेले आहेत. ‘थांबला तो संपला’ ही म्हण या वस्तुस्थितीचे अगदी समर्पक वर्णन करते. भगवंतप्राप्तीचा आटापिटा आपण या पार्श्वभूमीवर सुरु केला असल्याने साधनेतही आपण एक टप्पा गाठला आहे हे कळले की प्रगतीचा पुढचा टप्पा कधी आवाक्यात येईल इकडे सतत बघत असतो. वारीला जाऊन आले की श्रावण महीन्यातील व्रते आणि मग नवरात्रीची उपासना आणि नंतर मार्गशीर्षातील साधना असा आपला क्रम अव्याहत चालू असतो. आपले हे प्रयत्न निःसंशय जरुरी आहेत. परंतु या सर्व उपायांमध्ये साधनेच्या सुरुवातीलाच ‘ती कधी संपणार’ याची तरतूद आपण केलेली असते ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे! उदाहरणार्थ वारी आषाढी एकादशीला समाप्त होते, श्रावण महीना भाद्रपदात विलीन होतो आणि नवरात्राची सांगता विजयादशमीत होणार असते. अगदी दररोज उठून ध्यान करणे या क्रियेकडे जरी बघितले तरी ध्यान संपले की काय करावे याचा विचार आपण बहुतेक वेळा ध्यान सुरु करण्याच्या आधीच केलेला असतो असे दिसून येते आणि वर्षोनुवर्षे इष्टदेवतेच्या नामजपामध्ये रमणाऱ्यांनासुद्धा जपफलाची म्हणजे साक्षात्काराची ओढ असते. थोडक्यात सांगायचे झाले तर परमार्थातही आपण सतत प्रगतीच्य मागे लागलेलो असतो. आपले ध्येय ‘जे स्वयंभू आहे त्या अवस्थेमध्ये आयुष्यभर रहायचे आहे’ याची जाणीव आपणापैकी अतिशय दुर्मिळ लोकांना असते.
निरंतर प्रगतीचे विचार आपणा सर्वांच्या मनात असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण असे ठीकाण वा मानसिक अवस्था बघितलीच नाही की जी स्वतः निरंतर स्थिर आहे. आज स्वच्छ दिसलेले पाण्याचे तळे उद्या अस्वच्छ डबके होते आणि आज अतिशय आदर्श वाटणारी व्यक्ती सवयीची झाली की सामान्य होते असाच आपला अनुभव आहे. मनात घर करुन बसलेले आदर्श विचारसुद्धा आचरणात आणायला लागले की व्यावहारीक तडजोडींच्या संगतीने बदलायला लागतात. ‘स्थिरता’ आपणास तीच्या प्रादुर्भ्याने न जाणविता अभावानेच जाणविते. परंतु भगवंतांना अभिप्रेत असलेली ब्राह्मीस्थिती या सर्वांपेक्षा मुलभूतपणे वेगळी आहे. एकदा या स्थितीमध्ये साधकाने प्रवेश केला की त्याच्या मनात कुठलाही बदल, कुठलीही प्रगती करण्याची इच्छा उरत नाही. साधकाची ही स्थिती वर्णन करण्यास (वरील श्लोकांमधून) भगवान म्हणत आहेत की ‘ज्या मनुष्याने ममता आणि अहंकार यांचा पूर्ण त्याग केला आहे त्याच्या मनात विषयसुखाच्या इच्छेची प्रबळता नाहीशी होऊन सर्व कामना नाहीशा होतात आणि त्याला परमशांति प्राप्त होते (७१). अर्जुना, या स्थितीलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात आणि ती प्राप्त झाली की (काही वेगळे करण्याचा) मोह कधीही उत्पन्न होत नाही, (आणि त्यामुळे) अगदी स्वतःच्या देहविनाशाची वेळ सामोरी आली तरी तो मनुष्य (तिकडे लक्षसुद्धा न देता) आपल्या ब्राह्मी स्थितीतच रममाण होऊन राहतो (७२). 
’ आयुष्यभर नुसती चंचलता बघत असल्याने ब्राह्मी स्थितीची ही अकल्पनीय स्थिरता कशी असू शकेल यावर आपण विचार करुया.


असे बघा, जरी या जगातील प्रत्येक वस्तू अशाश्वत असली तर काही गोष्टींचा समूह केला तर त्यांच्या एकत्रितपणे तो शाश्वत राहतो. उदाहरणार्थ, समुद्रातील पाणी कमी-जास्त होऊ शकते पण या पृथ्वीवर आणि वातावरणात असलेल्या पाण्याकडे पाहीले तर ते स्थिर आहे असे दिसून येते! समुद्रातील कमी झालेले पाणी बाष्पीभवनाने आकाशात आहे आणि पावसाने जमिनीवर आलेले पाणि निरनिराळ्या नद्यांतून वहात आहे. काही पाण्याचे बर्फ बनत आहे तर कुठेतरी हिमनद्या वितळत आहेत. परंतु या जगातील पाण्याचा साठा आहे तसाच आहे! असेच एक छोट्या प्रमाणातील उदाहरण म्हणजे एखाद्या घरातील वातावरण प्रसन्न आहे असे आपण म्हणतो. परंतु त्या घरातील एखादी व्यक्‍ती बघितली तर ती नेहमी प्रसन्न असतेच असे नाही! कधी सासू नाखूश असेल तर कधी सून रुसलेली असेल तर कधी नातू हट्ट करीत असेल, परंतु तरीसुद्धा त्या घराचे एकंदर वातावरण प्रसन्नच असते आणि तिकडे आपणास नेहमीच जावेसे वाटते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील चंचलतेमध्ये स्थिरता आहे. ज्या साधकाने आपल्या जीवनातील अनंत घटकांपासून दूर राहून त्यांच्यामधील सामंजस्य बघितले असेल तो स्वतःच्या तटस्थपणामध्ये स्थिर असतो. आपण अस्थिर का आहोत तर आपण नेहमी कुणाची तरी बाजू घेऊन जीवनाच्या रणांगणात उतरत आहोत! असे बघा, कुरुक्षेत्रामध्ये इतके घनघोर युद्ध झाले तरी संजय आपल्या जागेपासून चळला नाही, तो आपला लांबूनच धृतराष्ट्राला सर्व वृत्तांत सांगत होता. खरे म्हणजे त्याच्या मनाची ओढ पांडवांच्या जयाकडे होती पण तिकडे त्याने लक्ष दिले नाही! त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातले सर्व चढ-उतार, मनातील भावनांचा सगळा आवेग आत्मरुपी राजाला वर्णन करण्याच्या हेतूने नुसता बघितला तर आपली स्थिती संजयाप्रमाणेच स्थिर होईल. ब्राह्मीस्थितीमध्ये आपल्या देह-मनाच्या कुरुक्षेत्रावरील निरनिराळ्या वासनांच्या कलहांकडे तटस्थपणे पहायची शक्ती आहे. असा स्थितप्रज्ञ दगडाप्रमाणे निर्जीव, निश्चल होत नाही तर पृथ्वीवरील वातावरणासारखा सर्वव्यापी होतो. सर्व बदलांना तो व्यापून असल्याने तो निश्चळ होतो. अरुंद पायवाटेने डोंगरावर चढत असताना आपणास दिसत असलेले दृष्य सतत बदलत असते. परंतु एकदा माथ्यावर पोहोचले की संपूर्ण विहंगम नजारा दिसायला लागतो आणि मग दृष्यात फरक पडत नाही. संतांची स्थिरता अशी व्यापकपणे स्थिर असते. या व्यापकतेमध्ये जी गोडी आहे ती अवीट आहे. अगदी मृत्यू समोर आला तरी आपली ही स्थिती ढळत नाही मग बाकीच्या गोष्टींची बातच करु नका! स्थितप्रज्ञ कसा चालतो, बोलतो, वागतो याचे वर्णन करताना भगवंतांनी काढलेला हा पूर्णोद्गार आपणा सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. संसारातील निरंतर चंचलतेमुळे उद्भवलेल्या बुद्धीच्या अंधःकारात निश्चळ चमकणारा हा तुरीयावस्थेचा प्रकाश आपणा सर्वांना योग्य मार्ग दाखवेल यात शंका नाही. कारण भगवंतांची तशीच योजना आहे.
॥ हरिः ॐ ॥

*******************************************************************

अध्याय तिसरा ( ४२ आणि ४३): 
 मन-बुद्धी पलिकडील अस्तित्व

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ गीता ३:४२ ॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्‌वा संस्तभ्यात्मानमात्मना ।

जहि शत्रुं महाबाहो कामरुपं दुरासदम्‌ ॥ गीता ३:४३ ॥
गेल्या दोन श्लोकांमधून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा सल्ला दिला. ‘या जगातील सर्व गोष्टी नश्वर आहेत, नष्ट पावणार आहेत’ हे ज्ञान अंतरमनात एका क्षणामध्ये खोल बिंबते. अचानक प्राप्त झालेले हे पारमार्थिक धन जर आयुष्यभर जतन करुन ठेवायचे असेल तर मनातील कामनांचा विनाश व्हायला हवा. नाहीतर उधार घेतलेली वस्तू जशी परत मालकाला परत करावी लागते त्याप्रमाणे हे स्वयंभू ज्ञान परत अनंतात विलीन होते आणि साधक परत व्यावहारीक गोष्टींत रस घ्यायला लागतो. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करुनि ठाके उभा । तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ॥ ज्ञा. १६:४४४ ॥ (जो काम, क्रोध आणि लोभ यांचा संपूर्णपणे नाश करुन जीवन जगतो त्यालाच झालेल्या पारमार्थिक लाभावर राज्य करता येते – इतर लोकांकरता ते तात्पुरते असते, उसने असते!) परंतु कामरुपी शत्रू अत्यंत मायावी असल्याने आपण स्वतःच्या प्रयत्नांनी तो काबूत येऊ शकत नाही. आपल्या मनातील इच्छांचे जे रुप आपणास भासते त्या सर्वांवर ताबा मिळविला तरी ‘स्वतःच्या मनाकडे आपण कसे छान दुर्लक्ष करु शकतो’ अशी नवी भावना उत्पन्न होते आणि त्यातून परत नूतन इच्छा निर्माण होतात. खरे म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांची जाणीव होणे हेच कामनाविरहित होण्यास घातक आहे. ज्याप्रमाणे लहानपणातील आपले शरीर स्वतःला जाणीव न होताच यौवनात येताना बदललेले असते त्याप्रमाणे आपल्या मनातील इच्छांचा सहजपणे नायनाट झाला पाहीजे. असे झाले तर मग साधकास कधीतरी अचानक जाणविते की ‘अरे आपल्या इच्छा थोड्याबहुत कमी झालेल्या दिसत आहेत!’ आयुष्यभर ध्येय ठरवून त्याच्या प्राप्तीकरीता प्रयत्न करण्याची आपणास जी सवय लागलेली आहे ती इथे अजिबात उपयोगी येत नाही. सतत स्वतःला ध्येयाच्या आठवणीत ठेवणेच इथे उपयुक्त ठरते. मनातील इच्छांमुळे मी भगवंताच्या सान्निध्यापासून दूर होत आहे याची सतत आठवण ठेवणे पुरेसे आहे. त्यापेक्षा अजून काहीही प्रयत्न केले तर ते आपणास नव्या बंधनांत गुरफटून टाकतात. भगवंताच्या जवळीकीचे स्मरण ठेवणे म्हणजेच अनुसंधान राखणे होय. सतत अशा अनुसंधानात जो राहतो तोच साधक काम आणि त्यातून उत्पन्न होणारा क्रोध यांचा विनाश करु शकतो.
भगवंताचे अनुसंधान राखण्याशिवाय गत्यंतर नाही हे पटले पण ते प्रत्यक्षात आचरणात कसे आणायचे? या प्रश्नाचे उत्तर खरे म्हणजे साधकाने स्वतःच शोधायला हवे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी माणसांच्या स्वभावांवर जी म्हण आहे ती आपल्या साधनेलासुद्धा लागू पडते कारण आपल्या प्रवृत्तींवर साधना अवलंबून असते. परंतु असे असले तरी काही गोष्टी ध्यानात ठेवणे सर्वांनाच हितकारक असते. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंताचे आपल्या जीवनातील खरे महत्व ओळखणे ही होय. एखादी वस्तू वा व्यक्ती वा तत्व आपणास मह्त्वाचे वाटले तर त्याच्या प्राप्तीकरीता जेव्हढा शक्य आहे तेव्हढा त्याग करायला आपली तयारी आपोआप होते. या आपल्या मनाच्या सवयीचा उपयोग करुन घ्यायचा असेल तर भगवंताचे सान्निध्य आपल्या अस्तित्वास किती उपयुक्त आहे हे जाणून घेणे जरुरी आहे. वरील दोन श्लोकांतून भगवान अर्जुनाला हीच गोष्ट समजावून सांगत आहेत असे वाटते. भगवान श्रीकृष्ण तृतीय अध्यायाचा समारोप करताना म्हणत आहे की : इंद्रिये महत्वाची आहेत असे सर्व मानतात (म्हणूनच इन्द्रियसुखांखेरीज जीवनात काही दुसरे महत्वाचे वाटत नाही). परंतु इन्द्रियांपेक्षा मन (ज्यामध्ये इन्द्रियांनी घेतलेल्या विषयभोगाचे प्रतिबिंब उमटते) श्रेष्ठ आहे. मनापेक्षा महत्वाची बुद्धी (जी मनात प्रगट झालेल्या सर्व भावनांमध्ये ‘चांगले-वाईट’ याचा निवाडा करु शकते) आहे. परंतु या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे आपल्यामधील भगवंताचे अस्तित्व आहे (जे आपल्या बुद्धीला मनातील अनंत विचारांमध्ये नक्की काय बघावे हे दाखवित असते!) (४२) (आपल्या जीवनातील) भगवंताच्या सान्निध्याचे हे महत्व आहे हे जाणून घेऊन स्वतःच्या बुद्धीचे मर्यादीत्व साधकाने जाणायला हवे आणि (या ज्ञानाच्या आधार घेऊन) इन्द्रियांवर भगवंताच्या अनुसंधानाने ताबा मिळवायला हवा. या मार्गाने कामरुपी महाघोर शत्रूचा – जो आपले खरे रुप कधीच दाखवित नाही – संपूर्णपणे नायनाट होतो (४३)
लक्षात घ्या की खुद्द भगवंतांनीसुद्धा मनातील इच्छांना ‘दुरासदम्‌’ म्हणजे समजायला, जाणून घ्यायला, त्यांचे रुप कळायला, अत्यंत कठीण असे म्हटले आहे. आपणच आपल्या मनातील सर्व इच्छा ओळखणे स्वतःच्या पाठीवर आपल्याच पायाने चालण्याइतके असंभव आहे! आपण जेव्हा अत्यंत तटस्थ राहून जीवन जगतो तेव्हा आपोआप आतून स्वतःबद्दल खरी माहिती होते. हे ज्ञान आपल्यामधील भगवंतानी पुढे आणलेले असते आणि ते आपल्या त्यावेळच्या मनःस्थितीला पचेल इतकेच असते. जेव्हा अशा स्वयंभू उद्भवलेल्या ज्ञानाला आपण (शक्य तितके!) आचरणात आणतो तेव्हा आपली मनःस्थिती अजून प्रगल्भ होते आणि मग परत तटस्थ राहिल्यावर ज्ञानाचा पुढचा भाग आपणास दिसायला लागतो. आयुष्यभर आपणास स्वतःबद्दलचे ज्ञान असे हप्त्या-हप्त्याने मिळत असते! म्हणून आपले अनुसंधान निरंतर राहणे अत्यावश्यक असते. या सर्व प्रक्रियेमध्ये बुद्धीचा जरासुद्धा वापर करणे झालेल्या ज्ञानाला दूषित करते आणि साधक जर अशा अस्वच्छ ज्ञानावर अवलंबून राहून आचरण करु लागला तर त्याची परत अधोगती व्हायला लागते, जी आधीच्या अधोगतीपेक्षा भिन्न असते. डोंगराच्या एका बाजूने वर चढून दुसऱ्या दरीत कोसळण्यासारखा हा प्रकार होतो. या सर्व प्रकारात आधीची अधोगती टळलेली असल्याने साधकाला स्वतःच्या नवीन पतनाची जाणीवसुद्धा लगेच होत नाही! हे सर्व धोके टाळायचे असतील तर स्वरुपानुसंधानापलिकडे जीवनात काहीही महत्वाचे नाही असे साधकाने कायमचे ठरविले पाहीजे. प्रगती-अधोगती यांच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास हा एकच मार्ग आहे. इति तृतीय अध्याय संपूर्ण.
॥ हरिः ॐ ॥


अध्याय तिसरा (४० आणि ४१): 

 प्राथमिक बोध स्थिर कसा होतो?

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।

एतैर्विमोहयत्येष ज्ञाननावृत्य देहिनम्‌ ॥ गीता ४०:३ ॥

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।

पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ गीता ४१:३ ॥

श्री भगवद्गीतेच्या तृतीय अध्यायात अर्जुनाने अत्यंत समर्पकपणे या वस्तुस्थितीवर आधारीत प्रश्न विचारलेला आहे की ‘ज्ञानी माणसेसुद्धा पापाचरण करण्यास उद्युक्त होतात हे कसे घडते?’ या प्रश्नाचे उत्तर देताना गेल्या दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्णांनी आपणास असे सांगितले की ज्ञानाला वेढून असलेले काम आणि क्रोध साधकाला परत संसारात गुंतवितात. या दोन शत्रूंमधील क्रोध हा कामनांपासूनच निर्माण झालेला असलेल्याने ज्ञानाचा शत्रू आपल्या वासनाच आहेत असे भगवतांचे म्हणणे आहे. इथे ‘या वासनांचे दहन कसे करावे?’ हा प्रश्न साहजिकच उद्भवतो.
श्री रामकृष्ण परमहंस गंमतीत म्हणायचे की ‘गंगास्नानाने सर्व दुष्कृतांचा नाश होतो हे आपल्या पापांनासुद्धा माहित असल्याने आपण गंगेत प्रवेश करण्याआधी ते जवळच्या झाडांवर चढतात आणि स्नान करुन बाहेर आलो की ती सर्व पापे परत आपल्या शरीरात प्रवेश करतात!’ आपणा सर्वांना या संसाराचे मिथ्यत्व अनेकवेळा जाणवलेले असते (म्हणजे गंगास्नान झाले!) परंतु काही काळाने आपण परत आपल्या संकुचित विश्वात गुरफटून जातो आणि साधनेला परत दुय्यम स्थान देतो (पापे परत आपल्यामध्ये घुसली!). मधल्या काळात आपल्यामधील इच्छा-आकांक्षाचा समूह कुठे दडून बसलेला होता? वरील दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण जीवनातील वासना कशाचा आश्रय घेतात हे आपणास सांगून त्यांचे निराकरण कसे करावे याचा उपदेश करीत आहेत. भगवान म्हणत आहेत की (आपल्या कामनांचे) यांचे आश्रयस्थान म्हणजे आपली इन्द्रिये, मन आणि बुद्धि होय. यांचा वापर करुनच आपल्या इच्छा झालेल्या ज्ञानाला झाकून ज्ञानी मानवाला परत संभ्रमात पाडतात (४०). म्हणून हे शक्तिशाली युवराजा, आपल्या इन्द्रियांना संयमित ठेवून मनातील कामनांचा त्याग कर. कारण त्यांच्यामुळेच झालेल्या बोधाचा विनाश होतो आणि जीवनातील सत्य झाकले जाते (४१). याचा अर्थ असा की व्यावहारिक इच्छा व वासना वैराग्यप्राप्तीच्या क्षणी आपल्या इन्द्रियांत आणि मन व बुद्धीने तयार केलेल्या संकुचित व्यक्तिमत्वात दडून बसतात. जेव्हा बोधगंगेतून बाहेर येऊन आपण स्वतःच्या या अस्तित्वाच्या छायेखाली येतो तेव्हा त्या परत आपल्या मानगुटीवर बसतात आणि आपणास नाचवितात. श्री रामकृष्णांच्या गंमतीमध्येसुद्धा खोल अर्थ दडलेला आहे! याशिवाय वरील श्लोकांमध्ये दोन सूक्ष्म तत्वे दडलेली आहेत. त्यांचे ज्ञान झाल्याशिवाय आपल्या साधनेची कर्मठपणापासून सुटका होत नाही म्हणून आपण त्यांच्यावर विचार करु. पहिला मुद्दा असा की व्यावहारिक जीवनाचे फोलपण संपूर्णपणे पटल्यानंतरच इन्द्रियांचे दमन करणे योग्य आहे. आणि दुसरा मुद्दा असा की नुसतेच आपल्या इन्द्रियांना काबूत आणून उपयोग होत नाही, याशिवाय आपल्या मनातील कामनांचा प्रभावदेखील कमी झाला पाहिजे.
स्वतःच्या जीवनाचा फोलपणा जाणविणे हा एक अत्यंत आणीबाणीचा प्रसंग असतो. आपल्या मनात ज्या भावनांची उभारी असते त्या सर्वांचा एका क्षणात नायनाट करण्याची शक्ति या प्रसंगात असते. आणि ज्याप्रमाणे शेतात तणांना जाळल्यानंतर तिथे नवीन पीक उगवते त्याप्रमाणेच आपल्या जीवनाला एक नवीन वळण लावण्याची संधी या विनाशात दडलेली असते. सर्व संतांच्या जीवनाकडे बघितल्यावर त्यांनी अशा क्षणाला अत्यंत सकारात्मक तोंड दिलेले दिसून येते. युवराज सिद्धार्थास रस्त्यात दिसलेल्या घटनांमुळे मनात वैराग्य उत्पन्न होऊन त्याने आपल्या पूर्वजीवनाचा त्याग केला आणि ते भगवान बुद्ध झाले. अचानक झालेल्या मृत्यूच्या दर्शनाने मदुराईतील एका सतरा वर्षाच्या मुलाने आपल्या घरातून पलायन करुन अण्णामलाईत एका गुहेत आश्रय घेतला व ते श्री रमणमहर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. स्वामी स्वरुपानंदांना अचानक अनाकलनीय रोग होऊन देहत्याग होतो की काय अशी परीस्थिती निर्माण झाली आणि त्यांनी गुरुमंत्राचा आधार घेतला. सद्य जीवन बदलण्याची अत्यंत तळमळ निर्माण झाल्याशिवाय इन्द्रियांवर संयम ठेवायचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. लक्षात घ्या की ओल्या मातीचा लेप अंगाला कितीही चेपून लावला तरी कालांतराने तो सुकतो आणि गळून पडतोच. जीवनाकडे बघण्याचा मनातील दृष्टीकोनामध्ये मूलभूत बदल होणे हा कुठल्याही साधनेचा पाया आहे. स्वतःच्या मनात भगवंताशी सान्निध्य साधणे हे एकच ध्येय निर्माण होणे म्हणजे प्राथमिक बोध होणे होय. हा झालेला बोध निरंतर राहण्यासाठी गुरुकृपेचा ओलावा आपल्या बरोबर हवा. गुरुकृपा जन्मजात आपल्या बरोबर असतेच. परंतु इन्द्रियांच्या आकर्षणांच्या दडपणाखाली हा कृपेचा स्त्रोत दडला गेलेला असतो. तो परत दिसण्यासाठी इन्द्रियांपासून अलिप्त होणे जरुरी असते. आपल्या इंद्रियांमध्ये आपले मन आणि बुद्धीसुद्धा अंतर्भूत असल्याने मनातील कामनांकडे दुर्लक्ष करणे हा उपाय भगवान आपणास सांगत आहेत. एकदा मन-बुद्धी-इंद्रिये यांचा आपल्या विचारसरणीवरील ताबा कमी झाला की स्वयंभू स्वरुपाचे ज्ञान स्पष्ट व्हायला लागते. एकदा हृदयात स्वरुपानुसंधान स्थिर झाले की मग साधकाला पदच्युत व्हायचा धोका नसतो. तेव्हा ‘आणिबाणीचा प्रसंग->इंद्रियांवर ताबा->मनाकडे दुर्लक्ष->बुद्धीच्या कुबडीला लाथ->जीवनातील सर्व घटनांची आक्रोशरहित स्वीकृती->अखंडित शांति’ हा प्रवास सर्व साधकांना लागू पडतो असे भगवान सांगत आहेत. बाह्य दृष्टीने साधना भिन्न दिसल्या तरी तात्विकरीत्या त्या सर्व एकच आहेत. जय श्रीराम!
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा(३८ आणि ३९):

 ज्ञान होण्यात साधनेचा अंत नाही!

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

धूमेनाव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च ।

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ गीता ३:३८ ॥

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।

कामरुपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ गीता ३:३९ ॥

अर्जुनाच्या ‘ज्ञानी मनुष्यसुद्धा संसारात कसा परत गुरफटतो?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणून गेल्या श्लोकातून आपण असे बघितले की मानसिक इच्छा आणि (त्यांचेच अंतिम रुप) क्रोध हे दोन शत्रू जेव्हा साधकावर विजय मिळवितात तेव्हाच तो आपल्या योग्य मार्गातून पदच्युत व्हायचा धोका असतो. यातून असे सिद्ध होते की निव्वळ ज्ञान मिळविण्यात साधकाच्या साधनेची फलश्रुती होत नाही. साधकाने असे ज्ञान मिळविले पाहिजे की त्याने काम आणि क्रोध यांचा निःपात सातत्याने (कधी-कधी नव्हे, तर प्रत्येकवेळा!) होऊ शकेल. असे झाले तरच साधकाची साधना ज्ञानातच सफल होईल. ही वस्तुस्थिती वरील श्लोकातून भगवान स्पष्टपणे सांगत आहेत: ज्याप्रमाणे आगीबरोबर धूर असतो, आरश्यावर धूळ असते आणि उदरातला गर्भ गर्भाशयाने आवृत्त असतो त्याचप्रमाणे ज्ञान इच्छेने वेढलेले असते (३८). अरे कुंतीपुत्रा, ज्ञानाबरोबर नेहमीच (जाणण्याची) इच्छा असते जी कधीही समाधान न होणाऱ्या आगीसारखी असते(३९)’.

लक्षात घ्या की श्रीमद्भगवद्गीतेत ज्ञान हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला आहे. उदाहरणार्थ, चतुर्थ अध्यायातील छत्तीस आणि सदतीस श्लोकांतून भगवान अर्जुनाला असे म्हणतात की ‘तू सर्व मानवांमधील सर्वात जास्त पापी असलास तरी ‘ज्ञान’ तुला वाचवेल कारण ज्याप्रमाणे अग्नीत तृण भस्म होतात त्याप्रमाणे ज्ञानाग्नीत सर्व कर्मांचा विनाश होतो.’ याउलट बाराव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात भगवान म्हणतात की ‘प्रयत्नांपेक्षा (त्यांच्यामुळे झालेले) ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा (त्यामुळे लागलेले) ध्यान उत्तम अहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग उच्चतम आहे कारण त्याने कधीही न ढळणारी शांति येते.’ परंतु हे सांगायच्या आधी चवथ्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात की ‘श्रद्धावंत असल्याने ज्याने इंद्रियांवर ताबा मिळविला आहे त्याला ज्ञान प्राप्त होते आणि एकदा ज्ञान मिळाले की विनाविलंब पराकोटीची शांतीचा लाभ होतो.’ या उदाहरणांतून गीतेमधील विसंवाद स्पष्ट होत नाही, तर शब्दांचे तोकडेपण सिद्ध होते. व्यवहारातसुद्धा आपण ‘बरे वाटले’ हे शब्द संदर्भानुसार वेगवेगळ्या अर्थाने वापरतो (भूक लागली असेल तर भोजनाने बरे वाटते, सकाळी निद्रा व्यवस्थित झाल्याने बरे वाटते, आवडत्या संघाचा खेळात विजय झाल्याने बरे वाटते इत्यादी) त्याचप्रमाणे ज्ञान हा शब्द आपण संदर्भानुसार घेतला पाहीजे. इथे संदर्भ कुठला आहे? तर अर्जुनाच्या साधक मार्गातून पदभ्रष्ट का होतो या प्रश्नाचा. याचा अर्थ असा की साधकाला झालेले ज्ञान चतुर्थ अध्यायात वापरेलेल्या ज्ञान या शब्दाप्रमाणे शाश्वत नसून बाराव्या अध्यायातील ज्ञानाप्रमाणे प्राथमिक ज्ञान आहे. साधनेच्या प्रयत्नांमुळे जेव्हा आपण अज्ञानाच्या अंधारातून पहिल्यांदा ज्ञानाच्या उजेडात येतो तेव्हा आपली जी अवस्था असते ती अतिशय नाजूक असते. खूप दिवस आजारी असलेला मनुष्याचा ताप उतरला तर त्याचा आजार गेला असे आपण म्हणतो पण त्यानंतर काही दिवस आपण त्याच्या तब्येतीची अधिक काळजी घेतो (नाहीतर गेलेला आजार दुप्पट परत येतो!) त्याप्रमाणे प्रथम ज्ञानाची अवस्था असते असे इथे भगवान म्हणत आहेत. अजून संसारातील आकर्षणांचा संपूर्ण विनाश झालेला नाही आणि भगवंताच्या सान्निध्याचे ज्ञान झालेले आहे अशा अवस्थेचे हे वर्णन आहे. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक त्यावरील मडके काढल्यावरही काही काळ फिरतच असते त्याप्रमाणे आपल्या मनातील इच्छा आणि आकांक्षा ज्ञान झाल्यावरही काही काळ आपणास वेढून असतात. अशावेळी आपण अत्यंत सावध असायला हवे. ज्याप्रमाणे धूर आग पूर्ण प्रज्वलित होईपर्यंतच असतो, वा आरसा धूळ साफ करेपर्यंतच घाण असतो वा गर्भ जन्म होईपर्यंतच गर्भाशयात असतो त्याचप्रमाणे ज्ञान इच्छा-आकांक्षांच्या लेपामध्ये काही काळच असते. हे लेप अविनाशी नसून प्रयत्‍नांनी निघून जाणारे असतात. म्हणून साधकाने ‘या जगात भगवंत भरलेला आहे याचे ज्ञान मला झाले’ या भावनेत सुखी न राहता सध्या झालेले ज्ञान चिरकाल कसे राहील इकडे लक्ष द्यायला हवे. वरील श्लोकांतून भगवंत आपणा सर्वांना हा सावधानीचा इशारा देत आहेत. नंतरच्या श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानावरील इच्छेचे आवरण कसे काढायचे हे सांगतील. ते आपण पुढच्या वेळी बघू. इति.
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा (३७): 

संकुचित अस्तित्वाचा परिणाम


॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

श्रीभगवानुवाच:

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ गीता ३७:३ ॥

अर्जुनाने गेल्या श्लोकात अत्यंत मार्मिकपणे असे विचारले की पाप आणि पुण्य यांतील फरक पूर्णपणे माहित असूनसुद्धा लोक पापाचरण का करतात? आपणा सर्वांच्या जीवनातसुद्धा जाणीवपूर्वक चुकीच्या रस्त्याने जाण्याची घटना अनेकदा घडून आलेली आहे. वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्णांनी या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण केलेले आहे. जेव्हा मी अनेकवेळा न करण्याचा प्रयत्न करुनही जेव्हा एक चूक (नित्य साधना न करण्याची चूक!) परत-परत करतो तेव्हा त्या वर्तनामागील कारण शोधताना मला असे वाटते की माझा स्वभावच असा विचित्र आहे. आणि एकदा स्वतःच्या (न बदलणाऱ्या) स्वभावावर खापर फोडले की मग दुसरे कारण बघायची जरुरी वाटत नाही. हे कारण बरोबर केव्हा असू शकेल? जर ही चूक फक्त मीच करत असलो तर. परंतु अत्यंत भिन्न स्वभावाच्या माणसांकडून हीच चूक जर पिढ्यानपिढ्या होत असेल तर निश्चितच त्यापैकी कुणा एकाचा स्वभाव त्या आचरणामागे कसा असू शकेल? जेव्हा एकच गोष्ट देश, काल आणि व्यक्ती या तीनपैकी कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसते तेव्हा त्यामागे कुठलेतरी एक शाश्वत तत्व असते हे आपण लक्षात घेतले पाहीजे. म्हणूनच अर्जुनाने जेव्हा साधकांच्या दिशाभुलीचे कारण विचारले तेव्हा भगवंतांनी जे उत्तर दिलेले आहे ते असेच देश,काल आणि व्यक्तीच्या पलिकडील आहे. भगवान म्हणत आहेत: अरे अर्जुना रजोगुणापासून उत्पन्न झालेली अभिलाषा (काम) कालांतराने क्रोधात पदार्पण करते. या अभिलाषेची कधीही तृप्ती होत नाही आणि (या अतृप्तीपोटी) ही पापाचरण करण्यास जगाला उद्युक्त करते. हा कामच सर्व जगाचा वैरी आहे.
ज्याप्रमाणे या सृष्टीतील कुठलाही रंग लाल, हिरवा आणि नीळ्या रंगांच्या मिश्रणातून निर्माण करता येतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील कुठलीही भावना सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन मूळ गुणांच्या मिश्रणानी निर्माण होते. सात्विक गुणात इतरांच्या भल्याचा विचार होतो (मग स्वतःला त्रास झाला तरी चालतो), राजसिक गुणात स्वतःच्या भल्याचा विचार होतो (यात इतरांचे नुकसान झाले तरी पर्वा नसते) आणि तामसिक गुणामध्ये स्वतःसकट सर्वांना अहितकारक विचार होतो. यातीनपैकी रजोगुणाचे प्राधान्य सर्वसामान्यपणे लोकांत आढळून येते. ज्याप्रमाणे नीळ्या रंगाचे फळ निसर्गात आढळत नाही, त्याचप्रमाणे बाकीच्या दोन गुणांपैकी एक प्रामुख्याने दिसणारे मानव विरळाच दिसतात. इथे अर्थात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय जरुरी आहे. ती म्हणजे हे गुण फक्त मानसिक भावनांच्या पातळीवरच बघायला हवेत, दृष्य घटनेत नव्हे. उदाहरणार्थ, एखाद्या कसायाने स्वतः उपाशी राहून स्वतःच्या (मांसाकरीता पाळलेल्या) बकरीला चारा आणला तर ते उदाहरण सात्विक वृत्तीचे नसून राजसिक वृत्तीचे आहे आणि एखाद्या आईने योग्य वळण लावण्यास मुलाला रागाने फटका दिला तर ते सात्विक वृत्ती दर्शविते, तामसिक नव्हे! बाह्य वर्तनातून आतील गुणांचे आकलन होतेच असे मानणे चुकीचे आहे. आपल्या वर्तनामागील हेतूवरुन आपण कुठल्या गुणामध्ये अडकलेलो आहोत हे ठरते. म्हणूनच अध्यात्मिक प्रवचने देण्यामागे (वा लेख लिहीण्यामागे!) स्वतःचा मोठेपणा वाढावा अशी सुप्त इच्छा असेल तर हे वर्तन राजसिकच ठरते. सद्‌गुरुंची आज्ञापालन करणे कर्तव्य आहे या एकाच भावनेतून जर परमार्थ प्रगट झाला तरच ते सात्विक वर्तन होते. असो. आता आपण मूळ मुद्यावर परत येऊया!
भगवान म्हणत आहेत की जेव्हा साधक राजसिक गुणांच्या कचाट्यात सापडतो तेव्हा तो पापकर्म करण्यास प्रवृत्त होतो. (इथे पाप या शब्दाची व्याख्या गीतेतील संदर्भानुसार ‘भगवंतास विसरणे’ अशीच केली पाहिजे. मग बाह्यक्रिया समाजसेवेची का असेना!). अर्जुनाच्या मनात ‘आपण राजसिक गुणात अडकलेलो आहोत हे कसे ओळखायचे?’ हा प्रश्न उद्भवणार हे जाणून भगवान म्हणत आहेत की मनात एखाद्या गोष्टीची अभिलाषा उत्पन्न जाली की समजावे आपण रजोगुणात आलेलो आहोत. आता आयुष्यभर मनाची कुठली ना कुठली इच्छा पूर्ण करण्यात आपण धन्यता मानत असल्याने मनातील इच्छा आपल्या सर्वनाशाला कारणीभूत कशा होतात अशी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः भगवंतांनी इच्छा-इच्छांमध्ये फरक केलेला नाही (म्हणजे इतरांचे भले व्हावे ही इच्छा आणि फक्त माझे भले व्हावे ही इच्छा यात फरक ठेवलेला नाही) असे जेव्हा आपल्या बुद्धीला कळते तेव्हा आपल्या मनातील गोंधळ वाढण्याची शक्यता आहे हे जाणून श्रीकृष्णांनी असे स्पष्ट केले आहे की एखादी इच्छा आपल्या मनात घर करुन राहीली की तीचे रुपांतर क्रोधात होते. क्रोध तामसिक वृत्तीचे द्योतक आहे कारण सारासार विचार करण्याची शक्ती आपण क्रोधात गमावून बसतो. स्वतःच्य वर्तनावरील ताबा सुटून बेबंद वागतो (आणि नंतर पश्चात्ताप करतो!) यात ना आपले भले असते ना इतरांचे. म्हणून क्रोध (संतापाची परीसीमा म्हणजे क्रोध) तामसिक वृत्तीत मोडतो. याशिवय हा क्रोध राजसिक वृत्तीतून निर्माण झालेला असल्याने (म्हणजे क्रोधाचा हेतू सात्विक नसल्याने) त्याच्या प्रभावाखाली आपल्या अहंकाराचेच पोषण होते आणि अहंकारवृद्धी हे सर्वात मोठे पाप या जगात आहे.
तेव्हा मी परमार्थाच्या मार्गातून पदच्युत कसा झालो याचा शोध घ्यायला गेलो की त्याचे मूळ या संसारातील कुठल्यातरी वस्तू वा व्यक्तीबद्दल माझ्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली असे आढळते. जोपर्यंत मी व्यावहारिक घटनांपासून वा मित्र-मंडळींपासून थोडाबहुत अलिप्त होतो तेव्हा माझी साधना व्यवस्थित चालू होती. आणि जेव्हा मी साधना चांगली चालू आहे असे गृहीत धरुन संसाराकडे आसक्तीने बघायला लागलो तेव्हा ना मला संसार मिळाला ना परमार्थ! या गोष्टीमध्ये स्वतःचा स्वभाव कारणीभूत नसून आपण स्वतःच्या मनाला दिलेले स्वातंत्र्य कारणीभूत आहे हे लक्षात येते. मनाचे सर्व चोचले पुरविणे केव्हाही योग्य नाही. आपले ध्यान सतत भगवंताकडे लावून जे कर्तव्य आहे ते अनासक्तीने करत राहणे याचे जोपर्यंत आपणास ओझे वाटते तोपर्यंत पदच्युतीचा धोका आहे. अशा वर्तनातच आपल्या मनाला गोडी वाटायला हवी आणि समाजात निव्वळ कर्तव्य म्हणून वावरायची वृत्ती व्हायला हवी. ही अवस्था म्हणजेच: तुका म्हणे देह भरला विठ्ठले । काम क्रोध केले घर रिते ॥ आणि एकदा काम-क्रोध निघून गेले की पापाचरण होणारच नाही. स्वानुभवाने भगवंताच्या सहवासाची गोडी ज्याने चाखलेली आहे त्यालाच हे शक्य आहे. बौद्धीक कसरती करुन ज्याने स्वतःच्या मनाला समजावले आहे तो अतिशय निसरड्या मार्गावर आहे. ज्यांना अनुभूती नाही ते पापाचरण केव्हा करतील याचा नेम नाही. त्यामुळे आपणा सर्वांचा कटाक्ष बुद्धीने परमार्थ जाणून घेण्यापेक्षा स्वानुभवाने कळून घेण्याकडे हवा. भगवंत हेच आपणास सांगत आहेत असे वाटते.
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा (३६): 

                                अध्यात्मिक मार्ग कसा चुकतो?

 

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥


अर्जुन उवाच:


अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः ।


अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ गीता ३:३६ ॥

गेल्या काही श्लोकांवर विचार करताना आपण असे बघितले की सर्व भूतमात्रांचा मूळ स्वभाव प्रेम करणे हाच आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेमरुपी झरा वहात आहे आणि या झऱ्याचा उगम म्हणजेच स्वरुपी स्थित असलेला भगवंत आहे. अर्थात, प्रत्यक्ष व्यवहारात आपण असे बघतो की सर्व लोकांचे वागणे प्रेमळ असत नाही. म्हणजे प्रेम या कल्पनेची उदात्त, पुस्तकी व्याख्या सोडाच, पण प्रेम म्हणजे काय? या प्रश्नाचे त्या माणसांकडूनच जे उत्तर येईल त्यानुसारदेखील त्यांचे वर्तन होत आहे असे आढळत नाही. आपण कसे वागायला हवे याचे पूर्ण ज्ञान असूनदेखील माणसे त्याप्रमाणे वागतीलच याची खात्री देता येत नाही. जर स्वतःच्या संकुचित व्यक्तिमत्वाच्या भल्यासाठी आपण तत्वांच्या विरुद्ध वागतो असे म्हटले तरी ते बरोबर आहे असे वाटत नाही! कारण कित्येकवेळा अभ्यास करणे जरुरी आहे हे जाणूनसुद्धा मुले टवाळक्या करतात किंवा आता कचेरीत काम करायलाच हवे हे माहित असूनही मी संगणकावर कुठल्यातरी बालीश खेळात रमतो याचे स्पष्टीकरण काय? जर व्यावहारिक गोष्टींत (जिथे लाभ काय होणार आहे हे स्पष्ट दिसत असते) जर आपले वागणे अकलनीय असेल तर पारमार्थिक मार्गावर चालताना (जिथे नक्की लाभ काय होणार आहे हेसुद्धा संपुणपणे माहित नसते, नुसती एक अंधुक अशी श्रद्धापूर्ण जाणीव असते) आपण जाणून-बुजून खाचखळग्यात पडतो यात आश्चर्य काय? अर्जुन अत्यंत चाणाक्ष असल्याने आपल्या या अगम्य वर्तनाची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणून जेव्हा त्याने भगवंतांच्या मुखातून स्वधर्माने वागले तर सर्व फळे (व्यावहारिक आणि पारमार्थिक) काहीही कष्ट न करीता आपोआप हस्तगत होतात असे ऐकले तेव्हा त्याने वरील श्लोकातून एक मार्मिक प्रश्न विचारला. अर्जुन म्हणत आहे की: (पुण्य आणि पाप यातील फरक पूर्ण जाणल्याने) पाप न करण्याची प्रबळ इच्छा असलेला मानवसुद्धा कसा पापे करतो? जणू एखादी शक्ती त्याला जबरदस्ती करुन पापाचरणात ढकलत आहे असे दिसून येते. अशी कुठली शक्ती आहे?
वर सांगितल्याप्रमाणे अर्जुनाचा हा प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनातही लागू पडतो. खरोखर, मुद्दाम चुक करुन काय होते हे पाहू असे पाहण्याची एक खोड आपणांत का आहे? कदाचित मानवाच्या जैविक विकासासाठी (evolutionसाठी) ही कुतुहलशक्ती जरुरी असेल! मानवाच्या सुरुवातीच्या काळात कदाचित असे घडले असेल की त्याकाळच्या सर्वसामान्य समजेच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्यांचा निभाव जास्त घडला असेल आणि त्यामुळे आपल्या जीन्समध्येच निरनिराळे प्रयोग करण्याची वृत्ती गुंफलेली असेल. परंतु सध्याच्या काळात बुद्धीने आपण आपल्यामधील या वृत्तीवर ताबा का मिळवू शकत नाही? शिवाय सकाळी उठल्यावर दात घासणे इत्यादी क्रिया आपण विनातक्रार आयुष्यभर करतोच की. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणायचा आपला प्रयत्न आहे असे आपण म्हणू शकत नाही. याउलट, ज्यांची गुरुंवर पूर्ण श्रद्धा आहे आणि ज्यांची संसारावरील आसक्ती क्षीण झालेली आहे असे साधकसुद्धा गुरुंच्या उपदेशानुसार तंतोतंत वागतीलच असे ठामपणे आपण सांगू शकत नाही. अर्जुनाच्या प्रश्नामध्ये अशा साधकांचाच उल्लेख आहे. ज्यांना परमार्थ माहित नाही वा माहित असूनही ज्यांना त्यामध्ये रस वाटत नाही अशा लोकांनी चुका केल्या तर आपण समजू शकतो. परंतु सदा सावधान राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक साधकांच्या हातूनही जाणतेपणाने चुका का व्हाव्या? आपण सर्वांनी या प्रश्नावर स्वतः विचार करणे जरुरी आहे. भगवान अर्जुनाला काय उत्तर देतील ते आपण पुढच्यावेळी पाहूच!
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा (३):

इंद्रियांच्या आकर्षणातून सुटायचा उपाय


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


श्रेयान्‌ स्वधर्मो विगुणः परधर्मात्‌ स्वनुष्ठितात्‌ ।


स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ गीता ३:३५ ॥

गेल्या श्लोकाचा गूढार्थ उलगडून बघताना आपण बघितले की स्वतःचा मूळ स्वभाव ओळखायचा असेल तर त्यावरील असलेले विषयासक्तीचे टरफल आपण इंद्रियांकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीने फोडायला हवे. परंतु अनेक वर्षांचा सहवास असल्याने आपल्या मनात विषयांबद्दलची ओढ इतकी खोलवर रुजलेली आहे की तीला मूळापासून काढणे कठीण झाले आहे. असे बघा, अत्यंत सुपीक जमिनीकडे फार काळ दुर्लक्ष केल्यावर जी तणांची वाढ होते ती काढणे फार कठीण होते कारण बाहेर दृश्यमान असलेली सर्व तणे जरी काढली तरी त्यांची जमिनीत खोलवर रुजलेल्या बीजांमुळे योग्य काळ आला की परत नवीन तणे येतातच. त्या बीजांप्रमाणेच आपल्या मनातील विषयांचे आकर्षण खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे विषयासक्तीत आपली इतकी शक्ती खर्च होते की आपल्या मनाला शांततेचे पीक संपूर्णरीत्या कधीच मिळत नाही. आणि इंद्रियातीत शांततेचा उपभोग निरंतर (कधीकाळी नव्हे!) घेतल्याशिवाय स्वतःला आपल्या मूळ स्वरुपाची ओळख होणे अशक्य आहे. या वस्तुस्थितीची भगवंतांना जाणीव असल्याने ते अर्जुनाला आता आपल्या मनातील इंद्रियांना सुखप्राप्ती करुन देण्याची जी निरंतर ओढ लागलेली आहे तीचे निवारण करण्याचा उपाय सुचवित आहेत. भगवान म्हणत आहेत की:स्वधर्माने वर्तन करणे, जरी त्यात गुणांचा अभाव वरकरणी दिसला तरी, सर्वश्रेष्ठ आहे. याउलट परधर्म कितीही गुणांनी भरलेला दिसला तरी स्वधर्मापेक्षा कनिष्ठच आहे आणि त्यानुसार वर्तन करणे अत्यंत भयावह आहे (कारण त्यायोगे आपण स्वरुपापासून दूर जातो). स्वधर्माचे पालन करताना देह जाण्याची पाळी आली तरी तो सोडू नये.’ श्रीमद्भगवद्गीतेच्या गेल्या काही श्लोकांतून विचारांची एक अशी शृंखला निर्माण होते: १. स्वधर्माने वर्तन केले की आपोआप इंद्रियांकडे दुर्लक्ष होईल. २. इंद्रियांवरील नजर हटली की त्यांच्या आकर्षणामागे लपलेले स्वरुप स्पष्ट होईल. ३. स्वरुपाचे ज्ञान झाले की मनातील हव्यासाचे निराकरण होईल ज्यायोगे अढळ शांतीचे अस्तित्व आपणास जाणवू शकेल आणि ४. त्यातून भगवंतांची भक्ती आणि सर्व प्राणिमात्रांवरील प्रेम जागृत होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होईल.
भगवंताच्या प्राप्तीचा हा चौरस मार्ग सर्वांसमोर, जात-पात आणि धर्म यांचा विचार न करीता मोकळा ठेवलेला आहे. परंतु आपणच या मार्गावर न जाण्याचा हट्ट धरुन बसलेलो आहोत! इथे आपल्या मनात असा प्रश्न यायची शक्यता आहे की स्वधर्म म्हणजे नक्की काय? आधुनिक काळातील मानवाचा जीवन जगण्याचा उद्देश्य इतका बदललेला आहे की जुन्या रीतींप्रमाने वर्तन करणे आपला स्वधर्म असेल असे आपणास वाटत नाही. म्हणून स्वधर्म म्हणजे काय यावर आपण विचार करणे जरुरी आहे. श्री ज्ञानेश्वर माउलींनी आपणास स्वधर्माची व्याख्या अशी करुन दिली आहे: म्हणोनि जे जे उचित। आणि अवसरेंकरुनी प्राप्त। ते कर्म हेतुरहित । आचरे तू ॥ ३:७८ ॥ देखे अनुक्रमाधारे । स्वधर्म जो आचरे । तो मोक्ष तेणे व्यापारे । निश्चित पावे ॥ ३:८०॥ स्वधर्म जो बापा। तोचि नित्ययज्ञ जाण पां। म्हणोनि वर्तता तेथ पापा संचारु नाही ॥ ३:८१ ॥ स्वधर्माच्या या व्याख्येत हिंदूत्वाचीसुद्धा आवश्यकता नाही, मग ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी जातीनुसार वर्तन करण्याची मागणी असणे दूरच राहीले. माउली म्हणत आहे की आपल्यासमोर जे कर्म सहजरीत्या निर्माण होते ते जर उचित असले तर मनात कुठलाही हेतू न ठेवता पार पाडावे. असे वर्तन करणे यज्ञ करण्यासमान आहे. याचे कारण असे की या वागण्यामध्ये आपण स्वतःच्या इच्छा-आकांक्षांची आहुती क्षणोक्षणी देत आहोत. उदाहरणार्थ, ऑफीसमधून आल्यावर चहा पिऊन झाला की आता स्वस्थपणे बसावे असे आपण ठरवितो आणि त्याचवेळी मुलाने त्याच्याबरोबर वेळ घालविण्याची मागणी केली तर स्वतःच्या देहसुखाच्या इच्छेला तिलांजली देऊन त्याच्याबरोबर खेळणे हा त्यावेळचा स्वधर्म आहे. स्वधर्माची एक ठराविक व्याख्या नसून क्षणोक्षणी अत्यंत लहान-सहान गोष्टींमधून आपला स्वधर्म आपल्यासमोर प्रगट होत असतो हे लक्षात घ्या. इथे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे खरा साधक जरी त्याच्या इच्छेप्रमाणे ऑफीसमधून परत आल्यावर विश्रांती मिळाली तरी त्याबाबत ‘तो विराम माझा हक्क होता’ अशी भावना मनात न आणता, आज भगवंताची इच्छा मला आराम देण्याची होती असा विचार करतो. म्हणजे मनाविरुद्ध वा मनाप्रमाणे घटना घडणे या दोन्हीबाबतीत तो भगवंताचा हात बघतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण महान तपस्या करायला तयार असतो पण दैनंदिन जीवनातील अशा क्षुल्लक घटनांमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष करायला तयार होत नाही हे आपले दुर्दैव आहे. ज्याप्रमाणे समर्थ शत्रू असलेला मनुष्य सतत तलवार परजून तयार असतो त्याचप्रमाणे आपल्या अहंकाराचे निर्दलन करण्यासाठी आपण स्वतःच्या इच्छांकडे निरंतर दुर्लक्ष करुन जे पडेल ते काम करण्यास तयार राहीले पाहीजे. लक्षात घ्या की वरील उदाहरणात पालकाने स्वतःहून मुलाला खेळायला बोलाविले नव्हते. मुलाबरोबर खेळणे हे कर्म सहजपणे त्याच्यासमोर आले आणि अशा कर्मांकडे आपण निर्हेतुकपणे सामोरे गेलो पाहीजे. म्हणजे काय तर वरील उदाहरणात मुलाबरोबर (इच्छा नसताना, निव्वळ त्याच्याकरीता) खेळलो की मी चांगला पालक बनलो ही भावना आपल्या मनात आली नाही पाहीजे. भगवंताने माझा वेळ अशारीतीने व्यतीत करावयाचा ठरविला होता अशी भावना मनात उत्पन्न झाली पाहीजे. निरंतर असे वर्तन जो करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो असे माउली आपणास वरील ओव्यांतून म्हणत आहे.
ज्या मानवाने जीवनात सतत असे वर्तन ठेवले आहे त्याचे जीवन कधीही साचेबद्ध होत नाही तर प्रत्येक क्षणी तो समोर आलेल्या कर्मांना सकारात्मक नजरेने सामोरा जात असतो. मग त्याने रामनवमीचा उत्सव केला नाही वा एकादशीचा उपवास केला नाही तरी काही बिघडत नाही. या कधीकाळी येणाऱ्या घटनांद्वारे भगवंताची प्राप्ती करण्याची आपली इच्छा ढगांच्या सावलीमधून उन्हापासून बचाव होईल अशी कल्पना करुन घर न बांधण्यासारखे हास्यास्पद आहे! भगवंताच्या उत्सवामध्ये सहर्ष सामील होणे हा एक आपल्या मनातील प्रेमाचा एक आपोआप झालेला परीणाम असायला हवा. ते मूळ धरुन त्यायोगे मनात प्रेम उत्पन्न होईल ही अपेक्षा म्हणजे घोड्यापुढे खटारा बांधल्यासारखे विपरीत वर्तन आहे. आपला स्वधर्म काय आहे हे बघण्यास दररोज आपल्या हातून घडणाऱ्या असंख्य गोष्टींमध्ये आपल्या इच्छांचा किती प्रभाव पडलेला आहे हे बघायला हवे. इथे आपणास निरंतर जागृत रहायला हवे आणि हेच अनुसंधान आपणास भगवंताकडे आपोआप घेऊन जाते. मग त्यासाठी वेगळी तपस्या वा साधना करावयाची काहीच गरज उरत नाही. भगवंतांच्या या सहज उपायाला ज्याने महत्व दिले त्याने सर्व साधले!
॥ हरिः ॐ ॥

 

 अध्याय तिसरा (३४):

 सर्वांचा स्वभाव प्रेम करणे आहे!

 

                      ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
 इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ गीता ३४:३ ॥

गेल्या श्लोकामध्ये आपण असे बघितले की भगवंतावर अपार निष्ठा असणाऱ्या साधकांमध्येही श्रद्धावंत आणि मूढ असे जे दोन वर्ग पडतात ते केवळ त्यांच्या स्वभावामुळे. इथे असा एक प्रश्न निर्माण होतो की जर स्वभावानुसार आपली प्रगती किंवा अधोगती ठरत असेल आणि स्वभाव हा जन्मताच आपल्या बरोबर येत असेल तर मग साधनेचे महत्व काय? अध्यात्मिक प्रगती जन्मल्यावरच ठरत असेल तर उगीच साधनेच्या तपश्चर्येच्या कष्टांचे सोस कशाला भोगायचे?! अर्जुनाच्या मनातील हा प्रश्न जाणून भगवान त्याला वरील श्लोकातून उत्तर देत आहेत. भगवान म्हणत आहेत की: मनुष्याची इंद्रिये त्यांच्या अनुभवांचे केंद्र असलेल्या विषयांकडे आकर्षित होतात किंवा तिटकारा करतात. त्यांच्या अशा वागण्याचा मानवाने आपल्या वर्तनावर परीणाम होऊ देऊ नये. इंद्रियांच्या इच्छा परमार्थाच्या मार्गावरील फार मोठे अडथळे आहेत.या शब्दांतून भगवंतांनी वरील प्रश्नाला कसे उत्तर दिले आहे ते आता आपण पाहू.
सर्वात आधी आपण स्वतःचा स्वभाव कसा ठरवितो ते पाहू. जेव्हा आपण ‘माझा स्वभाव अमुक-अमुक आहे’ असे म्हणतो तेव्हा आपण स्वतःला ज्ञात असलेल्या आपल्या सवयींबद्दल बोलत असतो. परंतु या सर्व सवयी आपल्या इंद्रिंयाना जे विषय प्रिय असतात त्यांवर अवलंबून असतात (उदाहरणार्थ, एखाद्याला गोड पदार्थांचे सेवन करणे पसंत असते तर कुणी एक सुगंधाचा वेडा असतो.) अगदी आपल्या मनातील समाजात कसे वागावे याचे जे नियम ठरविलेले असतात ते देखील आपणास कुठली व्यक्ती वा तत्व आवडते, म्हणजे मन या अकराव्या इंद्रियाला जे प्रिय आहे त्यावरच ठरलेले असते (मनाला शरीराचे इंद्रिय मानायला आधार: ‘इन्द्रियाणां मनश्चास्मि … गीता २२/१०). तेव्हा सांगायची गोष्ट म्हणजे इंद्रियांवर अवलंबून नसलेल्या स्वभावाची जाणीवसुद्धा अजून आपणास झालेली नाही. आपण मूळ स्वभावावर इंद्रियांच्या आकर्षण/द्वेषाने निर्माण झालेल्या कवचालाच स्वभाव मानत आहोत. आणि इंद्रियांच्या समाधानापुढे आपणास दुसरे काही दिसतच नसल्याने हे कवच अपारदर्शक बनले आहे! त्यामुळे स्वतःचा खरा स्वभाव काय आहे हे कळण्यास आपणास असे प्रयत्न करायला हवेत की ज्यायोगे स्वभावावरील आसक्तींचे कवच फुटेल. म्हणून भगवान आपणास असा सल्ला देत आहेत की इंद्रियांना त्यांच्या नैसर्गिक वृत्तींवर मोकळे सोडून मानवाने आपले चित्त त्यातून मोकळे केले पाहीजे. ज्याप्रमाणे शेजारील घरात नवीन रहायला आलेल्या माणसांच्या इच्छांबद्दल आपण तटस्थ असतो, त्यांना ना बदलायचा प्रयत्न करतो वा त्यांची पूर्तता करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो, त्याचप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांच्या इच्छा-आकांक्षांबद्दल आपण तटस्थ रहायला शिकले पाहीजे! लक्षात घ्या की आपल्याच देहाच्या इंद्रियांना नवीन शेजाऱ्यासारखे मानण्यास काहीही हरकत नाही. कारण आपला देह हा जणू चिरंतर अस्तित्वात असलेल्या आपल्या आत्म्याजवळ नुकताच आलेला एक शेजारी आहे आणि ही सर्व इंद्रिये देहाशीच निगडीत आहेत!
एकदा आपल्या अंतःकरणाला इन्द्रियांच्या इच्छांकडे दुर्लक्ष करायची सवय लागली की आपल्या डोळ्यांवरील विषयांच्या आसक्तीचे झापड दूर होऊन आपले वर्तन स्वतःच्या मूळ स्वभावानुसार होऊ लागेल आणि आपण आपोआप श्रद्धावंत भक्त बनू. कारण आपणा सर्वांचा जन्मजात स्वभाव प्रेम करण्याचा आहे, भक्ती करण्याचा आहे. अगदी जंगली पशूसुद्धा जन्मल्यावर जी व्यक्ती समोर येईल तीला स्वभावतःच आपले मानायला लागतात याचे दुसरे कुठले कारण असू शकेल? नंतर, आयुष्यात टक्के-टोणपे खाल्यावर आपण काही व्यक्तींचा वा वस्तूंचा द्वेष आणि उरलेल्यांवर (आपोआप) प्रेम करायला लागतो आणि मग आपल्या अशा वागण्याला स्वभाव मानतो! लक्षात घ्या की प्रेम करायला कुणाला शिकवावे लागत नाही. प्रेम व्यक्त होण्यास जे अडथळे असतात त्यांना दूर केले की आपोआप मनातील जिव्हाळा दृष्य व्हायला लागतो. इंद्रियांच्या वर्तनात जे स्वतःला गुंतवितात ते आपल्यामधील जन्मजात प्रेमाला बाहेर येण्यास प्रतिबंध करतात. म्हणून भगवंतांनी आपणा सर्वांना स्वतःच्या इंद्रियांकडे दुर्लक्ष करण्याची साधना सांगितली आहे. अशा नजरेने बघितल्यास भगवंतांच्या वक्तव्यातून सुरुवातीला उद्भवलेल्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर मिळते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे की स्वभावाला औषध नाही हे जरी खरे असले तरी आपला स्वभाव काय आहे हे जर आपण चुकीचे ठरविले असेल तर तो बदलायला मार्ग आहेत! मनाच्या ज्या ओढींमुळे आपण स्वभावाला जाणू शकत नाही ती आकर्षणे काढून टाका. बस, इतकेच पुरेसे आहे. बाकी काही करायची जरुरी नाही. विहीर खणताना आपण पाण्याच्या स्त्रोतावरील जमिनीचे आच्छादन कुदळीच्या प्रहारांनी दूर करतो. दुसरे काही करीत नाही. निर्मळ पाण्याचा झरा मग आपोआप दिसू लागतो. त्याचप्रमाणे आपणा सर्वांच्या हृदयातील प्रेमाचा नैसर्गिक झरा ज्या व्यावहारिक वर्तनांच्या सवयींने झाकला गेला आहे तो बघायचा असल्यास इंद्रियांवरील ममता तटस्थतेच्या कुदळीच्या निश्चययुक्त प्रहारांनी फोडून टाकली पाहीजे. इति.
 ॥ हरिः ॐ ॥
 अध्याय तिसरा (३१ आणि ३२): 
कुठेतरी विश्वास ठेवा!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।

श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ गीता ३: ३१ ॥

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।

सर्वज्ञानविमूढांस्तान्‌ विद्धि नष्टानचेतसः ॥ गीता ३:३२ ॥

गेल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असे सांगितले की मनातून ‘काहीतरी मिळवायचे आहे’ या आशेला पूर्णपणे काढून माझ्या अनुसंधानात निरंतर राहून खुशाल युद्ध कर (म्हणजे तुला वरकरणी अयोग्य वाटणारे वर्तनसुद्धा निर्धास्तपणे कर). मनाची अशी धारणा ठेवलीस तर तुला कुठल्याही गोष्टीचा खेद करायची वेळ येणार नाही. भगवंतांच्या या वक्तव्याने आपल्या मनाला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण आयुष्यभर बाह्यवर्तनाकडे लक्ष ठेवून ते सुनियंत्रित करण्याकडे आपला कटाक्ष असतो. आपल्या आणि भगवंताच्या जवळीकीचा व ‘योग्य-अयोग्य वागणे’ याच्याशी संबंध नसला तर समाज बेबंद वर्तन करण्यास मोकळा राहील या शंकेने आपले मन व्यापले जाण्याची शक्यता आहे. आणि एकदा मनात शंकेचा अतिशय सूक्ष्म किडा जरी घुसला तरी कालांतराने तो व्यापक रुप धारण करतो आणि आपल्या हातून भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे वर्तन होऊ शकत नाही. म्हणून या गोष्टीवर आपण थोडा विचार करणे जरुरी आहे.
भगवंतांच्या सांगण्यामध्ये एक सूक्ष्म गोष्ट दडलेली आहे. ती म्हणजे आपल्या हातून कर्म होत असताना मनात सतत भगवंताचे स्मरण हवे. भगवंताचे (आणि संतांचे) एक खास वैशिष्ट आहे ते म्हणजे ज्याक्षणी आपणास त्यांचे स्मरण होते त्याचक्षणी ते आपणास त्यांच्याएवढे थोर बनवितात. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे: विपाये आठविला चित्ता । दे आपुली योग्यता ॥’. त्यामुळे जर सतत भगवंताच्या अनुसंधानात असणे ही गोष्ट आपणास जमली तर आपल्या हातून कर्मे होत नसून प्रत्यक्ष भगवान ती कर्मे घडवून आणत असतो असे सिद्ध होते. मग इथे बेबंद वागण्याचा संबंधच येऊ शकत नाही! ज्याप्रमाणे एखादी आई मुलाला योग्य वळण लावण्याकरीता कधीकधी उग्र रुप धारण करते त्याचप्रमाणे आपल्या हातून कदाचित वरकरणी अयोग्य वाटणारी कर्मे घडू शकतील. परंतु तशा वागण्यातही स्वतःच्या अहंकाराचा लवलेशही नसल्याने असे कर्मसुद्धा कुठलाही खेद उत्पन्न करु शकत नाही. आपण सर्वसाधारणपणे मनातील घडामोडींकडे दुर्लक्ष करुन बाह्यवर्तनाला कर्म असे नाव देतो. समाजात वावरताना असा संकुचित अर्थ योग्यही आहे कारण इतरांना फक्त आपली बाह्य कर्मे दिसतात. परंतु परमार्थामध्ये कर्म हा शब्द खूप व्यापक आहे. ज्याप्रमाणे फळांना बाहेरुन साल असते त्याचप्रमाणे आपले बाह्यवर्तन हे संपूर्ण कर्माचे निव्वळ कवच आहे असे मानायला हरकत नाही. आणि ज्याप्रमाणे फळाची चव त्याच्या सालीवरुन नाही तर आतील गरावर निश्चित होते त्याचप्रमाणे आपल्या कर्माची खरी अध्यात्मिक योग्यता बाह्य वर्तनावरुन नाही तर आपल्या मनातील भावनांवर ठरत असते. असे जर नसते, तर सर्व खाटकांना पशू संवर्धनाचे पुण्य प्राप्त झाले असते! परंतु त्यांच्या मनातील हेतू ‘पशूचे वर्धन झाल्यावर त्याच्या मांसाला विकावे’ हा असतो. त्यामुळे त्यांच्या पशूला खाद्य पुरविण्याच्या कर्मात सहिष्णुता नसून निव्वळ व्यवहार असतो आणि त्यामुळे पुण्ण्याचा त्या कर्माशी दुरान्वयानेसुद्धा संबंध नसतो. तेव्हा बाह्य वर्तन व्यवस्थित असले पाहीजे यावर आपले जे बारीक लक्ष आहे ते काढून मनातील हेतू ‘भगवंताबद्दलचे प्रेम दाखवायचे आहे’ असा आहे की नाही यावर असली पाहीजे. ज्याकडे ही नजर आहे त्याने सर्व साधले. असे भगवंताचे म्हणणे आहे.
आता काही गोष्टी अशा असतात की त्या करणे योग्य आहे हे आपण करण्यापूर्वीच सिद्ध करु शकतो. (उदाहरणार्थ खूप भूक लागलेली असताना घरी जाऊन भोजन करावे अशी भावना योग्यच आहे!) परंतु भगवंताचे वरील वक्तव्य खरे आहे की नाही हे प्रत्यक्ष वर्तन केल्याशिवाय कळत नाही. कारण ते मानसिक भावना योग्य ठेवली तर पुण्य मिळेल असे अदृश्य गोष्टीबद्दल आहे. इथे भगवंतांच्या बोलण्यावर करण्याआधी विश्वास बसणे जरुरी आहे. स्वतः मेल्याशिवाय़ ज्याप्रमाणे स्वर्ग दिसू शकत नाही त्याचप्रमाणे इथे आधी वर्तन केल्याशिवाय परीणाम दिसत नाही. याठीकाणी श्रद्धेला महत्व प्राप्त होते. नाहीतर बुद्धीचा वापर करुन ‘असे कसे होईल? कर्मांपासून मुक्ति मिळविणे एवढे सोपे असणे कसे शक्य आहे?’ इत्यादी आक्षेप कुणीही घेऊ शकतो. म्हणून भगवान आता आपल्या मनातील विश्वासाला आवाहन करुन जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणत आहेत की: ‘कुठलीही असूयायुक्त शंका मनात न ठेवता जे (भाग्यवान) लोक माझ्या सांगण्याप्रमाणे वर्तन करतील, तेसुद्धा (माझ्याप्रमाणे) सर्व कर्मबंधनांतून मुक्त होतात (३१). (याउलट) जी माणसे माझ्या सांगण्यावर अविश्वास ठेऊन, त्याच्यावर विनाकारण टीका करुन, माझ्या सांगण्यानुसार वर्तन करीत नाहीत, त्यांची बुद्धी विपरीत झालेली असून ती दुःखाच्या खाईत खिचपत पडतात (३२).’
भगवंतांच्या सांगण्यावर मनापासून विश्वास बसणे ही फार मोठी सद्‌गुरु कृपा आहे. किंबहुना याशिवाय दुसरी कुठली कृपा असूच शकत नाही असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. आपल्या (संकुचित) विचारसरणीला जे योग्य वाटते त्यावर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे. परंतु जेव्हा आपणास अयोग्य वाटणारी गोष्ट योग्य आहे असे सांगण्यात येते तेव्हा कितीजणांचा विश्वास बसतो? अर्जुनाने अनेक कारणे देऊन कुरुक्षेत्रावरील युद्ध करणे कसे चुकीचे आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आता भगवान त्याला सांगत आहेत की तू खुशाल युद्ध कर. त्याने कुठलेही पाप उत्पन्न होणार नाही. यावर अर्जुनाचा विश्वास बसतो यातच त्याच्या योग्यतेचे दर्शन होते. अर्जुनासमोर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उभे होते म्हणून तो भाग्यवान ठरत नाही. तर त्याचा भगवंतांच्या उपदेशावर विश्वास बसतो म्हणून तो भाग्यवान आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात भगवान वेगवेगळे रुप धारण करुन योग्य काय आहे याचा सल्ला आपणास देतच असतात. परंतु आपल्या मनाला न पटणाऱ्या किती उपदेशांवर आपला विश्वास बसतो? (मग त्यानुसार वर्तन करणे तर दूरच राहीले!) यातच आपल्या जीवनातील दुःखाचे मूळ दडलेले आहे. जर आपली बुद्धी भ्रष्ट झालेली असेल तर दुःखाशिवाय आपल्या जीवनात काय पुढे येणार? स्वतःच्या मनातील भावनांकडे ज्याला सातत्याने दुर्लक्ष करता येते त्यालाच भगवंताजवळ जाणे शक्य आहे. अशा व्यक्तीलासुद्धा जर भगवान काय म्हणत आहेत याबद्दल आस्था नसेल तर त्याने आपल्याजवळील या दुर्लभ गोष्टीचा दुरुपयोग केला असेच म्हटले पाहीजे. (उदाहरणार्थ: घरातील इतरांचे मन सांभाळण्यासाठी स्वतःचे मन मारणारी गृहीणीला मानसिक शांति मिळतेच असे नाही.) स्वतःजवळ योग्यता असणे जरुरी आहेच, परंतु त्या योग्यतेचा सदुपयोग करण्याची बुद्धी जवळ असणेसुद्धा तितकेच जरुरी आहे. आणि हा सदुपयोग होण्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच स्वतः भगवान श्रीकृष्ण अशा भक्तांना ‘श्रद्धावन्तो, अनसूयन्तो’ या विशेषणांनी संबोधित आहेत. आपल्याबद्दल भगवान असेच उद्‌गार काढतील असे वर्तन आपण का करु नये?
॥ हरिः ॐ ॥


अध्याय तिसरा (३०): 
                                                          कर्मबंधनांतून सुटायचे रहस्य
  
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।

निराशीर्निर्ममो भूत्वा युद्ध्यस्व विगतज्वरः ॥ गीता ३:३० ॥

गेल्या काही श्लोकांमधून ज्ञानी मनुष्याची जीवनाकडे बघायची नजर सर्वसामान्य लोकांपेक्षा किती भिन्न असते हे सांगितल्यावर आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतः कसे वागावे याचे स्पष्ट मार्गदर्शन करीत आहेत. या श्लोकातून जो सल्ला दिला गेला आहे तो केवळ अर्जुनाकरीता नसून आपणा सर्वांकरीता आहे. भगवान म्हणत आहेत की: स्वतःच्या आत्मस्वरुपावर नजर दृढ ठेवून आपली सर्व कर्मे तू मला अर्पण कर आणि (या जगात काही मिळवावे याबद्दलच्या) आशेचा संपूर्ण नायनाट करुन, कुठल्याही व्यक्ति वा वस्तूबद्दलची ममता दूर करुन मनाच्या दुःखरहित अवस्थेत निःशंकपणे लढ (३०).’
सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना असे ज्ञान असते की आपल्या सर्वदुःखांचे मूळ आपल्या कर्मांतच असते. या वस्तुस्थितीला मान्य करुन जीवनात अखंड सुख मिळविण्याचा आपण सर्वजण प्रयत्‍न करीत असतो. आणि आपला असा उद्योग म्हणजे कर्मयोग असे आपण समजतो. त्यामुळे कर्मयोग म्हणजे नक्की काय याबद्दल जेव्हढी मते आहेत तेवढी मते इतर कुठल्या योगाबद्दल असतील असे वाटत नाही. परंतु आपल्यापरीने कर्मयोगाचे पालन करुनही जेव्हा दुःख समोर उभे राहते तेव्हा आपणास धक्का बसतो आणि असे वाटते की आपल्यापरीने दुःख टाळायचे सर्व प्रयत्‍न करुनसुद्धा सुख का निघून जाते? अशावेळी आपली भगवंतावर जितकी श्रद्धा असते त्याप्रमाणे आपण नवीन मार्ग शोधतो. अढळ विश्वास असणारा मनुष्य म्हणतो की जरुर या दुःखातून पुढे सुख निर्माण होणार आहे. ‘जे काही होत असते ते सर्व चांगल्याकरीताच होत असते’ या शब्दांचा आधार घेऊन अशी व्यक्ती आपले प्रयत्न चालू ठेवते. ज्यांची श्रद्धा एवढी दृढ नसते ते म्हणतात की कितीही प्रयत्न केले तरी दुःख टळत नसेल तर मग उगाच कर्मयोगाचा वा भगवंताच्या भक्तिचा सोस का बाळगावा. विषयसुखांत रममाण होऊन शक्य तितकी सुखे आत्ताच उपभोगून घेण्यात काय वावगे आहे? बहुतांशी लोक या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये कुठेतरी अडकून कधी भक्ती तर कधी भुक्ती करत आपले जीवन सुसह्य करायचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्या खटापटीमध्ये आपला जगण्याचा मूळ दृष्टीकोन बदलत नाही. दुःखांना जितके टाळता येईल तितके टाळावे ही आपली मूळ भूमिका जशीच्या तशी राहते. जास्तीत जास्त पुढे सुख मिळविण्याकरीता आज दुःख सहन करायला आपण तयार असतो. पण कुठल्याही प्राप्तीची हमी न देता दुःख उगाचच जवळ येऊ नये असेच आपणा सर्वांना आयुष्यभर वाटते. आणि जीवनाकडे बघायची ही दृष्टी इतकी सर्वमान्य आहे की यात काही चुकीचे असू शकेल असा विचारसुद्धा आपल्या डोक्यात येत नाही. त्यामुळे संतांच्या जीवनाकडे आपण बघितले तरीसुद्धा आपणास असे वाटते की त्यांनी जे साधनेचे कष्ट घेतले होते तेसुद्धा पुढील प्राप्तीकरीता (म्हणजे भगवंताच्या निरंतर सान्निध्याकरीता) घेतले होते. (यापेक्षा अधिक चुकीची गोष्ट असू शकत नाही. भगवंतांच्या इच्छेने संतांना कष्ट सोसावे लागतात. ज्याच्यामुळे त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांचे कष्ट आपोआप कमी होतात. श्री रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना नेहमी म्हणायचे की मी एवढे साधनेचे कष्ट सोसले आहेत कारण की त्यामुळे तुमची प्रगती कमी प्रयत्नांत होईल.)
परंतु आपली जीवनाकडे बघायची अशी दृष्टी असेल तर वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ‘निराशी’ होऊन युद्ध लढ असे सांगत आहेत त्याचे आपण कसे समर्थन करणार? मनातील सर्व आशेचे संपूर्ण निराकरण होणे म्हणजे निराशी होणे. मनातील आशा कधीही पूर्ण होणार नाहीत याची निःसंदेह खात्री झाली की मनाची जी उदास, नकारात्मक अवस्था होते त्याला सर्वसामान्यपणे निराश या शब्दाने सांगायचा प्रयत्‍न करतात. परंतु भगवंतांनी वापरलेला हा शब्द अतिशय सकारात्मक आहे. त्या शब्दांत अर्जुनाकडून सक्रियपणे घनघोर युद्ध यशस्वीपणे लढवून घेण्याची शक्ति आहे हे जाणून घेणे अतिशय जरुरी आहे. असे सकारात्मक निराश होण्याचे कारण म्हणून भगवंतांनी अर्जुनाला वरील श्लोकातून असे सांगितलेले आहे की स्वतःचे आत्मस्वरुप काय आहे याचा कधीही विसर पडू देऊ नकोस. ज्याप्रमाणे हातचलाखी करणारा मनुष्य आपणास बोलण्यात गुंतवून हळूच हातातील पत्ता बदलतो त्याप्रमाणे या संसारातील अनुभव आपल्या चित्ताला स्वरुपाचे विस्मरण पाडून आपली स्वानंद उपभोगायची सहज अवस्था बदलवून सुख किंवा दुःख या द्वंद्वात आपणास ढकलतात. स्वरुपाचे विस्मरण झाल्यावर जी अवस्था होते तीचेच वर्णन वरील श्लोकाच्या दुसऱ्या चरणात केलेले आहे असे वाटते. भगवान म्हणत आहेत की भविष्यात काय होईल याची अपेक्षा (म्हणजे आशा) मनातून काढ, सध्या समोर असलेल्या व्यक्तिंबद्दलच्या ममतेचा विनाश कर आणि आत्तापर्यंत झालेल्या वा पुढे होणाऱ्या मनाविरुद्ध घटनांबद्दलचा खेद (म्हणजे शोक) मनातून काढून टाक. या सर्व गोष्टी आपल्या देहावर आणि मानसिक भावनांवर आधारीत आहेत हे स्पष्टच आहे. नवजात बालकाला किंवा अहंकार संपूर्ण नष्ट झाला आहे अशा संतांना या तिन्ही गोष्टींचा अर्थसुद्धा कळणार नाही! आपण स्वतःला अर्जुन म्हणवितो पण आपण नक्की कोण आहे याची जाणीव जर अर्जुनाला असती तर त्याच्या जीवनात या गोष्टी आल्याच नसत्या. आणि जेव्हा त्याची नजर स्वरुपावरुन आपल्या देह-मनावर स्थिर होते तेव्हाच यांच्या जंजाळात तो अडकतो.
कर्मयोग म्हणजे नक्की काय हे इथे भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे असे वाटते. कुठलेही कर्म करीत असताना सतत आत्मरुपी भगवंताच्या अनुसंधानात असणे म्हणजे कर्मयोग होय. आपल्याहातून नक्की कुठले कर्म किती व्यावहारिक कुशलतेने होत आहे याचा इथे अजिबात संबंध नाही हे लक्षात घ्या. कर्म करुन झाल्यावर ते भगवंतांची इच्छा होती म्हणून झाले असे म्हणण्यातसुद्धा कर्मयोग नाही आणि जे काही होते ते सर्व भल्याकरीत्याच होते यावर विश्वास ठेऊन कर्म करण्यातही कर्मयोग नाही. कर्मयोग हा नेहमी वर्तमानकाळात सक्रीय असतो हे ध्यानात घ्या. भविष्यातील आश्वासने आणि भुतकाळातील व्यक्तींवर/तत्वावर विश्वास ठेवण्यात कर्मयोग कधीही सापडत नाही. आपल्यासमोर मायारुपी जादूगर प्रकृतीचे सर्व खेळ दाखवित असताना सतत आपल्या स्वरुपाकडे लक्ष ठेवणे हा कर्मयोग आहे आणि केवळ यातूनच कर्मबंधनाच्या पाशांतून सुटका होते. हे प्रत्यक्ष भगवंतांचे सांगणे आहे आणि पुढील श्लोकांतून स्वतः भगवान श्रीकृष्ण असे आपणास सांगतील. ते आपण पुढच्या वेळी बघूच! इति.
॥ हरिः ॐ ॥
 अध्याय तिसरा (२७ ते २९): 

स्वानुभवानेच विचारांत फरक पडतो

                   ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।

अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥ गीता ३:२७ ॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ गीता ३:२८ ॥

प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जंते गुणकर्मसु ।

तानकृत्स्नविदो मंदान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ गीता ३:२९ ॥

ज्ञानी पुरुषांनी सर्वसामान्य लोकांप्रमाणेच व्यवहार करावा असा स्पष्ट आदेश भगवंतांनी अर्जुनाला गेल्या दोन श्लोकांतून दिला. स्वतःमधील फरक (बाह्य कर्मांतून दिसून न येता) कर्मांमागील हेतूशून्यतेतूनच लोकांना दिसावा अशी आज्ञाच जणू या श्लोकांतून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनामार्फत सर्व साधकांना दिली आहे. ज्या माणसाची मूल प्रवृत्ती सात्विक आहे त्यालाच या आदेशाचे खरे महत्व कळेल. सर्वसाधारणपणे मनुष्य असा विचार करतो की आपल्यातील फरक लोकांना जाणवेल अशी आपली बाह्य कर्मे असावीत. उदाहरणार्थ आपण वैष्णव आहोत याची जाणीव होण्यास मनुष्य गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळावर गंध लावायला सुरुवात करायला मागेपुढे बघत नाही. कचेरीत वरीष्ठ माणसे आपले स्थान दाखविण्यास कनिष्ठांवर उगाचच अरेरावी करतात किंवा त्यांच्या गुणांचे कौतुक अगदी मोजून-मापून करतात. या जगाची ही वहिवाटच आहे. परंतु आपल्यातील फरक अशा पद्धतीने दाखविल्याचा अट्टाहास ठेवला तर एक अतिशय सूक्ष्म परिणाम लोकांवर होतो. तो म्हणजे आपले असे वेगळे वागणे हाच आपल्यात पडलेला फरक आहे अशी इतरांची समजूत होणे.
या गोष्टीवर जरा विचार करा. भगवान विष्णूंबद्दल मनात प्रेम उत्पन्न होणे म्हणजे खरे वैष्णव होणे होय. कपाळावार टीळा लावून आणि गळ्यात तुळशीमाळा घालून कुणी वैष्णव होत नाही. परंतु या बाह्य उपाधींची इतकी सवय सर्वसामान्य लोकांना झाली आहे की जीन्स पैंट व शर्ट घातलेल्या माणसाने मांसाहार करीत असताना मी वैष्णव आहे असे सांगितले तर पटतच नाही! ‘तू वैष्णव असशील तर असे वर्तन का करतोस?’ हा त्यांचा प्रश्न असतो. याचा अर्थ असा की ‘मनातील भगवंतावरील प्रेम’ या मूलभूत अमूर्त घटनेला जनता बाह्य उपचारांनी समजायचा प्रयत्‍न करण्यास उद्युक्त होते. याउलट कुठलेही बाह्य उपचार न करीता वेळ येईल तेव्हा स्वतःच्या तटस्थतेनी इतरांना आपल्या मनातील खरे प्रेम कशावर आहे हे दाखविले तर वैष्णव म्हणजे काय याची खरी कल्पना निदान काही लोकांना तरी येऊ शकते. या गोष्टीचे उदाहरण म्हणजे श्री गोंदवलेकर महाराजांकडे बघा. एकदा त्यांचे आपल्या भाऊबंदांशी जमिनीच्या वाटणीवरुन कडाक्याचे भांडण चाललेले होते. त्यांचा गोरापान चेहरा अगदी लालबुंद होऊन कपाळावरील आणि मानेवरील शिरा तट्ट फुगलेल्या होत्या आणि जोरात वाद चाललेला होता. याचवेळी महाराजांचे सत्‌शिष्य श्री भाउसाहेब केळकर आपल्या खोलीत श्रीज्ञानेश्वरी वाचत होते आणि एका ओवीच्या अर्थाबद्दल त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. त्या शंकेचे निवारण करण्यास ते महाराजांकडे आले आणि त्यांचा उग्र अवतार बघून गप्प उभे राहीले. केळकरांना महाराजांनी बघितले आणि लगेच आपला वाद थांबवून अगदी हळू आवाजात केळकरांच्या कानात त्या ओवीचा अर्थ त्यांनी सांगितला. केळकरांच्या मनातील शंकेचे निरसन झालेले दिसताच त्यांनी परत आपला आवाज चढवून भांडण सुरु केले! श्री केळकरांनी नंतर असे सांगितले की इतका रागाने तापलेला मनुष्य क्षणात इतका शांत होऊन परमार्थाचे तत्व सांगू शकतो हे प्रत्यक्ष बघूनसुद्धा माझा विश्वास बसला नाही! जेव्हा वेळ येते तेव्हा ज्ञानी मनुष्य व्यावहारीक जगाबद्दलची आपली तटस्थता प्रत्यक्ष कृतीने दाखवून देतो. आणि इतर वेळी आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करुन तो स्वतःच्या ज्ञानाची किंमत कधीही कमी करीत नाही.
असे बघा, आपल्याकडील अमूल्य वस्तूची खरी किंमत लोकांसमोर ठेवणे त्या वस्तूच्या प्राप्तीबरोबर आलेली जबाबदारी आहे. स्वतःच्या चित्तातील ज्ञानाचे खरे रुप कुठलीही तडजोड न करीता लोकांसमोर आणायचे असेल तर संसारातील कुठल्याही गोष्टीचा आधार घेणे अयोग्य आहे. आधीच लोकांचे चित्त संसारात अडकलेले असते. त्यात व्यावहारीक गोष्टींचा संतांनी वापर केला तर ते प्रेम अधिकच वृद्धींगत होईल यात शंका नाही. ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठीच जणू भगवान वरील श्लोकांतून म्हणत आहेत की: (खरे म्हणजे) संसारातील जे काही कर्म होते ते सर्व प्रकृतीच्या तीन गुणांमुळे होत असते. परंतु अहंकाराने मूढ झालेला पुरुष स्वतःला त्या कर्मांचा कर्ता समजतो (२७). परंतु ज्ञानी माणसाची नजर अहंकाराने दूषित झालेली नसल्याने तो प्रकृतीचे त्रिगुण आणि कर्म हे आपल्यापासून भिन्न आहेत हे जाणतो व स्वतःकडे कर्तृत्वाचा भाव आणत नाही (२८). अहंकाराच्या प्रभावाने विचारशून्य झालेले मानव स्वतःकडे कर्तेपणा घेतात आणि कर्मांमध्ये गुरफटतात. अशा लोकांना ज्ञानी पुरुषांनी तत्वज्ञान (शाब्दीक पद्धतीने) सांगून बिघडवू नये(२९).
निव्वळ वाद घालून वा गूढ तत्वज्ञानाचे शाब्दीक रुप दाखवून आपण लोकांची मूल विचारसरणी बदलू शकत नाही. तसे होत असते तर या जगात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असती का? धूम्रपानाचे दुष्परीणाम पूर्ण पटल्याने कुणी आपल्या या सवयीचा त्याग करीत नाही. पण एकदा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूशी सामना करावा लागला की मग ही सवय आपोआप सुटते. ज्ञानी मनुष्य आपल्या अस्तित्वाने व्यावहारीक जीवांना सर्वसामान्य जीवन जगण्याच्या सवयीच्या मृत्यूशी भेट घडवून देतात! त्यांच्या ज्ञानाची ही खरी किंमत आहे. श्री भाऊमहाराज केळकरांना ज्याप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी ‘स्वतःवर रागाचे प्रभुत्व असणारच’ या सर्वसामान्य विचारसरणीचा मृत्यू दाखविला त्याचप्रमाणे सर्व विकारांत राहूनसुद्धा अलिप्त राहणे कसे शक्य आहे हे ज्ञानी मनुष्य लोकांना दाखवितो. ज्या कुणा भाग्यवंताला या शाश्वत सत्याचा दंश होतो तो स्वानुभवाने शहाणा होतो आणि योग्य मार्गाला लागतो. नाहीतर श्री गोंदवलेकर महाराजांचा मोठेपणा त्यांनी गोंदवल्यात चालविलेल्या निरंतर अन्नछत्रातच बघणारे थोडे आहेत काय? संतांजवळ राहूनसुद्धा आपण त्यांच्यांकडून काय घेतो यावर विचार करणे स्वतःच्या हिताकरीता अत्यावश्यक आहे. संत इतके अपेक्षारहित असतात की त्यांचे चांगलेच गुण आपण घेतले पाहीजेत याचासुद्धा आग्रह ते धरीत नाहीत. ज्ञानी मनुष्याने उगाच जगाच्या भल्यासाठी जिवापाड प्रयत्‍न करण्यापेक्षा स्वतः तटस्थ राहून इतरांपुढे आदर्श वर्तनाचा धडा राहील असे वर्तन करावे अशी भगवंताची आज्ञा वरील श्लोकांतून स्पष्ट होत आहे असे वाटते. इति.
॥ हरिः ॐ ॥

 अध्याय तिसरा ( २५ आणि २६): 

वेगळे असून वेगळेपणा नको!

                    ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वंति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्‌ ॥ गीता ३:२५ ॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम्‌ ।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ गीता ३:२६ ॥
स्वतःच्या वर्तनाचे उदाहरण भगवान श्रीकृष्णांनी गेल्या श्लोकांतून अर्जुनाला दिले. ते म्हणाले की जर मी कधीकाळी उचित कर्म करण्याचे टाळले तर लोक माझ्याप्रमाणे वागायचा प्रयत्‍न करतील आणि स्वतःच्या आयुष्याचे ध्येय चुकतील. कर्मयोगाचे निरंतर पालन करण्याचा जो नियम प्रत्यक्ष भगवान जर पाळत असतील तर सामान्य लोकांना तो अपरिहार्य आहे यात शंकाच नाही. परंतु त्याहीपेक्षा ज्ञानी माणसांना या नियमाच्या बंधनाबाहेर न जाण्याची जबाबदारी जास्त आहे कारण इतरांसारखे ते आपल्या कामचुकारपणाला अज्ञानाची सबब देऊ शकत नाहीत. जगाचे रहाटगाडगे ज्या कर्मयोगावर आधारीत आहे त्याचे सर्व ज्ञान झाल्यावरसुद्धा जो त्याप्रमाणे आपले आचरण करीत नाही त्याचा अपराध सर्वसामान्यांपेक्षा अधिक आहे यात शंका नाही. कारण जेव्हा मनुष्याला ज्ञान होते त्याचबरोबर त्याप्रमाणे वागण्याचे बंधनही येते. याशिवाय अजून एक कारण म्हणजे ज्ञानी मनुष्याच्या मनात भगवंताविषयी आत्यंतिक आपुलकी असते आणि त्या प्रेमाच्या पोटी तो निरंतर भगवंताच्या अनुसंधानात रहात असतो. ज्या व्यक्तिबद्दल आपल्या मनात पराकोटीचे प्रेम आहे त्या व्यक्तिच्या मनाप्रमाणे आपण वागणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनसुद्धा ज्ञानी मनुष्याचे कर्मयोगाचे पालन करण्याचे बंधन अधिक दृढ आहे. वरील श्लोकांतून ज्ञानी मानवाच्या मनातील आपल्याबद्दल असलेल्या या प्रेमाचाच आधार भगवंतांनी घेतला आहे असे वाटते. आपणास दिसत असलेली सर्व सृष्टी भगवंताचेच दृष्य रुप आहे. म्हणून जेव्हढी आपली स्वतःच्या देह-मनावर आस्था असते तेव्हढेच प्रेम भगवंताच्या मनात या चराचरातील सर्व जीवांवर आहे. सर्वसामान्यांच्या मनातील चांगले-वाईट ही वर्गवारी भगवंतांच्या मनात नसल्याने या सर्वांचे कल्याणच व्हावे अशी त्यांची सतत इच्छा असते. त्यामुळे त्यांचे सान्निध्य प्राप्त झालेल्या महामानवांनीसुद्धा असेच वर्तन करावे अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. ते म्हणत आहेत की: फलापेक्षा मनात ठेवणाऱ्या अज्ञानी जनांना जेव्हढी कर्माबद्दलची आस्था असते त्याच आस्थेने स्वतः असक्त राहून ज्ञानी मनुष्याने कर्मे केली पाहीजेत कारण त्यायोगे सामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन होते(२५). कर्मांत (फलापेक्षेमुळे) गुरफटलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत (तत्वज्ञान सांगून) गोंधळ उत्पन्न न करीता कर्मांच्या अपेक्षित फलांबद्दल आसक्ति न ठेवता, माझे अनुसंधान न सोडता ज्ञानी पुरुषांनी स्वतः सतत सर्व कर्मांना योग्य रीतीने पार पाडावे(२६).’
एकदा कर्मफलांच्या अपेक्षेमुळे आपण भगवंतांपासून दूर जात आहोत हे कळले की मनुष्याच्या मनात कर्मांबद्दल तिटकारा उत्पन्न व्हायचा संभव असतो. परंतु भगवंताचा वियोग व्हायचे कारण कर्मांत नसून आपल्या मनातील कर्मांची परीणीती योग्य व्हयलाच हवी या अट्टाहासात आहे हे आपण विसरायला नको. मुळातून कर्मे करणे थांबविले की सर्व फलांची अपेक्षासुद्धा जाईल असे म्हणणे अयोग्य आहे. कारण जाणीवपूर्वक कर्म न करणे हेसुद्धा एक कर्मच आहे आणि ते कर्म न करण्याचे कर्म केल्याने आपल्या मनात भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होईल ही आपली त्या कर्मफलाची अपेक्षा आहे! तेव्हा कर्मांना दूर सारुन आपण कर्म करणे आणि फलाची इच्छा ठेवणे या दुश्चक्रातून मुक्त होत नाही. मग मनात वैराग्य उत्पन्न झालेल्या साधकाने करावे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर वरील श्लोकांतून भगवान देत आहेत. कुठलाही प्रयास न करीता जी कर्मे आपणहून आपल्यासमोर दत्त म्हणून उभी राहतात त्यांना सकारात्मक नजरेने सामोरे जाणे आणि असे कर्म करीत असताना त्यांच्या फलांबद्दलची अपेक्षा न ठेवणे असा दुपेडी मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे हे. या मार्गाने चालताना ज्ञानी माणसाचे बाह्य वर्तन सर्वसामान्य माणसांप्रमाणेच दिसते. त्याचा वेगळेपणा स्थूल नजरेने बघितल्यास कधीच दिसत नाही. ‘मी फक्त एकदाच जेवतो. तेसुद्धा एक ग्लास गाईचे दूध आणि काही फळे. बाकी काही आहार मी कधीच करीत नाही.’ असे ना कधी भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे आणि कुणा ज्ञानी मनुष्याने तसे म्हणावे अशी त्यांची अपेक्षा नाही. लोकांमध्ये लोकांसारखेच राहून स्वतःचा वेगळेपणा जो जतन करतो तो खरा धन्य. कारण असा वेगळेपणा ठेवण्याचे कारण निर्गुण भगवंतच असू शकते. इतर कुठले कारण असते (एखाद्या व्यक्तिबद्दलचे अतीव प्रेम, एखाद्या तत्वाबद्दलचे पराकोटीचे आकर्षण इत्यादी) तर त्या मनुष्याचे वेगळेपण या जगातच व्यक्त झाले असते. व्यवहारात कुठेही वेगळेपणा न दिसता स्वतःला वेगळे ठेवणे केवळ ज्ञानी मनुष्यालाच शक्य आहे कारण त्याच्या वेगळेपणाचे कारण या जगापलिकडील आहे. खरे म्हणजे जगापासून आपण भिन्न आहोत ही भावनासुद्धा ज्ञानी मनुष्याच्या मनात येत नाही. ‘जे मला मिळाले आहे ते तुम्हांला अगदी सहज मिळू शकते’ असेच उद्गार त्यांच्या मुखातून सतत बाहेर येतात. आपणास ज्ञान होत नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे आपली जगावेगळे काहीतरी दिव्य करायची इच्छा आहे. भगवंताजवळ जाणे हेसुद्धा आपण इतरांपेक्षा उच्च बनण्याचे साधन बनविण्याचा प्रयत्न करतो आणि जी माणसे असा प्रयत्न करीत नाहीत त्यांना या मार्गावर वळविण्याचा अट्टाहास ठेवतो. परंतु भगवंतांनी इथे स्पष्टपणे सांगितले आहे की इतरांना उपदेशात्मक भाषणे देणे चुकीचे आहे. स्वतःच्या वर्तनाचा आदर्श इतरांसमोर ठेवणे आणि त्यांच्याबद्दल अतीव सहनुभूती मनात ठेवणे हा मार्गच भगवंतांनी सर्व ज्ञानी मनुष्यांना सांगितला आहे. सर्व विश्वात संपूर्णपणे मिसळूनसुद्धा स्वतः वेगळे रहा ही भगवंताची शिकवण अतिशय सूक्ष्म आहे. अर्जुनासारखे आपले मन नविन विचार ग्रहण करण्यासारखे संवेदनशील झाले तरच आपण ही विशाल विचारसरणी आचरणात आणू शकतो.
॥ हरिः ॐ ॥
अध्याय तिसरा (२२ ते २४): 

आधी करावे मग सांगावे

                 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ गीता ३:२२ ॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ गीता ३:२३ ॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ गीता ३:२४ ॥
तृतीय अध्यायातील विसाव्या श्लोकात अर्जुनाला कर्मयोगाचे पालन करण्याची आवश्यकता समजावून सांगताना भगवान श्रीकृष्णांनी असे सांगितले की असे वागल्याने समाजाला योग्य मार्गदर्शन होईल. या मुद्याचे अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी एकविसाव्या श्लोकात त्यांनी सर्वसामान्य लोकांची मानसिक स्थिती विषद केली. ते म्हणाले की लोकांना मान्यवर जनांचे अनुकरण करणे योग्य वाटते. इथे अर्जुनाच्या मनात अशी एक शंका उत्पन्न होऊ शकते लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी स्वतः तसे वागायचे बंधन कशाला? मी कसेही वागीन पण लोकांना उपदेश योग्य तोच करीन. जर माझ्या सांगण्याप्रमाणे जनता वागणार असेल तर एवढे पुरेसे आहे. परंतु जगाची रीत तशी नाही! सर्वसामान्य लोकांना स्वतः काय योग्य आणि काय अयोग्य याचा निवाडा करण्यास वेळ नाही म्हणून त्यांनी अनुकरणाचा मार्ग निवडला असला तरी ते शब्दांचे अनुकरण न करीता वर्तनाचे अनुकरण करतात. जर वक्ता बरोबर सांगत असेल तर त्याने स्वतः तसे वागायला काय हरकत आहे? हा साधा आणि सरळ प्रश्न ते करतात. जर उपदेशकर्त्याचे वर्तन सल्ल्याशी सुसंगत नसेल तर ‘या माणसाचा स्वतःच्या बोलण्यावर विश्वास नाही. मग मी का म्हणून ठेवावा?’ असा रोखठोक प्रश्न ते विचारतात आणि अनुकरण करायचेच झाले तर वक्त्याच्या वर्तनाचे करतात. श्री रामकृष्ण परमहंस याबाबत एक फार सुंदर गोष्ट सांगायचे: एकदा एका वैद्याकडे, त्याची कीर्ती ऐकून, एक रुग्ण फार लांबचा प्रवास करुन स्वतःला दाखवायला आला. त्याच्या पोटाच्या तक्रारीचे संपूर्ण वर्णन ऐकल्यावर त्या वैद्याने दुसऱ्या दिवशी औषध घेण्यास यायला सांगितले. मग परत एवढा दूरून आलेल्या त्या रुग्णाला त्यांनी सांगितले की तू गूळ खाणे बंद कर, तुझे सर्व रोग हळू-हळू नाहीसे होतील. तेव्हा त्या रोग्याने तक्रारीच्या सुरात विचारले की हे तुम्हाला कालसुद्धा सांगता आले असते की. त्याकरीता मला परत यायला का लावले? तेव्हा वैद्य हसून म्हणाले की काल माझ्या दवाखान्यात औषधनिर्मितीसाठी गुळाच्या दहा ढेपा आलेल्या होत्या आणि तो समोर असताना मी गुळ खाऊ नकोस असे सांगितले असते तर तुझा त्यावर विश्वास बसला नसता! आज तो सर्व गुळ वापरुन संपल्यामुळे खोली रीकामी झाली आहे, म्हणून मी तुला हा सल्ला देऊ शकलो!
अगदी साध्या गोष्टीतसुद्धा आपण उपदेशकर्त्याचे वर्तन तपासून बघत असतो मग स्वतः उपदेश करताना इतरांनी तसे बघू नये ही आपली अपेक्षा कितपत रास्त आहे? स्वतः सिगारेट पिऊन मुलाला धूम्रपानाच्या दुष्परीणामावर भाष्य दिले तर परीणाम होईल का? वेळ मारुन नेण्याकरीता कित्येकवेळा मी अर्धसत्य बोलतो आणि माझ्या मुलाने वा सहकाऱ्याने वा पत्नीने माझ्याशी खरे बोलावे अशी अपेक्षा ठेवतो हे जेवढे चुकीचे आहे तेवढेच स्वतःचे वर्तन बेबंद ठेवून दुसऱ्यांकडून रास्त वर्तनाची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. तेव्हा जनतेच्या मार्गदर्शनास उपदेशाची आवश्यकता नसून स्वतःच्या योग्य वर्तनाची म्हणजेच कर्मयोगाच्या पालनाची जरुरी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन दुसऱ्यांनी कसे वागावे याबाबत फारशी चर्चा न करीता स्वतःकडे बघावे. आधी स्वतः कर्मयोग करुन मग इतरांना उपदेश केल्याचा अजून एक परिणाम म्हणजे आपले वक्तव्य पुस्तकी रहात नाही. व्यावहारीक अनुभवांच्या खांचखळग्यांतून प्रवास करुन आल्याने आपल्या शब्दांचा पुस्तकी ताठा नाहीसा होऊन ते समोरील परीस्थितीला योग्य तोंड देण्याइतके लवचिक होतात! त्यामुळे अशा वक्त्याच्या शब्दांवर लोकांचा पटकन विश्वास बसतो. याशिवाय स्वानुभवाने प्राप्त झालेल्या शक्तिला ते जणू त्यांच्या शब्दांतून श्रोत्याला प्रदान करतात ज्यायोगे ऐकणाऱ्याला अनुकरण करण्यास ताकद येते. ही ताकद पूर्ण प्रमाणात श्रीकृष्णांकडे आहे कारण ते स्वतः सतत असे वर्तन करीत आहेत. या वस्तुस्थितीचे वर्णनच ते वरील श्लोकांतून करीत आहेत. भगवान म्हणत आहेत की:अरे अर्जुना या तिन्ही लोकांमध्ये (भू, भव, स्वः) मला काही कर्तव्य उरलेली नाहीत. मी अजून नवे जिंकावे असे काही इथे उरलेले नाही आणि तरीसुद्धा मी निरंतर कर्मयोगाचे पालन करीत आहे (२२). अर्जुना, जर कधीकाळी मी (आता मला ज्ञान झालेले असल्याने) योग्य कर्म न करीता स्वस्थ बसून राहीलो तर सर्व लोक आपापल्या मतीप्रमाणे माझ्या स्वस्थ बसण्याचे अनुकरण करायला लागतील (२३). त्यामुळे (माझ्या मनात त्यांना योग्य मार्गदर्शन करायची इच्छा असली तरीसुद्धा) मी त्यांना संमोहातच पाडीन आणि त्यांना स्वतःच्या आयुष्याचे ध्येय अप्राप्त होईल. अशा परीस्थितीत जगाचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही (२५).
इथे अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे. ती म्हणजे खुद्द भगवान श्रीकृष्णांनासुद्धा असे वाटत नाही की त्यांनी आत्तापर्यंत जसे वर्तन केले आहे त्याचा आदर्श जनता आपल्या मनात सतत ठेवील. आधीच्या इतिहासाचा विसर पडून ते सध्या कसे वागत आहेत त्याचेच अनुकरण होणार आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. म्हणून ते ‘मी कधीकाळी स्वस्थ बसलो’ तर काय होईल याचे वर्णन करीत आहेत. त्यांच्या अनुचित वर्तनाने सर्व जगाचा विनाश होईल कारण त्यांना सर्वच जनता मान्यवर समजते. आपल्या वर्तनाने निव्वळ आपल्याशी संबंध जोडून असलेल्याच्या जीवनात गोंधळ उत्पन्न होईल. पण आपल्याकरीता हीच सर्व दुनिया आहे. हो ना? अर्थात, जगामध्ये शिकागो, न्यूयॉर्क इत्यादी शहरे आहेत याची आपणास जाणीव आहे पण आपल्या जीवनात ती तशी सामाविष्ट नाहीत. मी आणि माझे सहोदर इतकीच आपल्या जीवनाची खरी व्याप्ती आहे आणि जर त्या सर्वांच्या जीवनात संमोह निर्माण झाला तर माझ्या सर्व जीवनात गोंधळ निर्माण झाला असेच आपण म्हटले पाहीजे. त्यामुळे जे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या अयोग्य वर्तनाबद्दल केले आहे ते आपणा सर्वांना लागू पडते. भगवंतांनी निर्माण केलेल्या या विश्वात आपण स्वतःचे एक जग निर्माण करु पहात आहोत (हेच आपल्या जीवनाचे ध्येय असते. हो की नाही?) आणि त्यामुळे आपणा सर्वांवर अत्यंत नैसर्गिकरीत्या कर्मयोगाचे पालन करण्याची जबाबदारी येते. नाहीतर आपण एक गदारोळाने भरलेले विश्व निर्माण करु आणि आपणासहित बाकी सर्वांना विनाशाच्या रस्त्यावर पाठवू. हे ज्याला हवे आहे त्यानेच कर्मयोगाचा मार्ग सोडावा!
॥ हरिः ॐ ॥

 अध्याय तिसरा (२१): 

आपली अनुकरणाची आवड

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यद्यदाचरति श्रेष्ठस्ततदेवेतरो जनः ।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ गीता २१:३ ॥

भगवान श्रीकृष्णांनी गेल्या श्लोकात कर्मयोगाच्या मार्गात निरंतर रहाण्यास अर्जुनाला सांगताना ‘मी सांगतो म्हणून’ असे कारण न देता ‘जनक राजासारख्या लोकांनी हाच मार्ग अनुसरला होता’ आणि ‘जगातील इतर लोकांना मार्गदर्शन होईल’ अशी कारणे दिली. यातील पहिल्या कारणाबद्दल अधिक स्पष्टीकरण द्यायची गरज नसल्याने ते आता दुसऱ्या कारणाला अजून स्पष्ट करीत आहेत. भगवान म्हणत आहेत की ज्याप्रमाणे (समाजातील) मान्यवर व्यक्ती आचरण करतात त्याचे अनुकरण बाकी लोक करतात. सर्व जग श्रेष्ठ लोकांनी अनुसरलेल्या मानदंडांना रास्त समजून वागतात (२१). 
जगातील सर्वांना जीवनावर स्वतःचा ताबा हवा आहे. अगदी लहान मुलालासुद्धा त्याच्या जीवनशैलीवर पालकांचे नियंत्रण असावे असे वाटत नाही ! परंतु या स्वातंत्र्याच्या नैसर्गिक ओढीत दुसऱ्याप्रमाणे वागावे ही भावनासुद्धा प्रभावशाली असते. जगाच्या रहाटगाडग्यापासून संपूर्णपणे नवीन विचार करणारे किती माणसे असतात? त्यामुळे आपल्या मनात ‘स्वातंत्र्याचे आकर्षण’ आणि ‘इतरांचे अनुकरण’ या दोन परस्पर विरोधी शक्तींचे निरंतर द्वंद्व चालू असते. शेवटी तडजोड म्हणून बहुतांशी लोक स्वतः एखाद्या व्यक्तीला वा समुदायाला वा तत्वाला निवडतात (स्वातंत्र्याचा विजय) आणि मग त्या निवडीला साजेसे आपले जीवन व्यतीत करायचा प्रयत्न करतात (अनुकरणाचा विजय). याचे अगदी सामान्य उदाहरण पहायचे तर असे: एकदा सचिन तेंडुलकर फार ग्रेट आहे हे मानले की आपण त्याने निवडलेली टूथपेस्ट वा शूज वा गाडी वापरायला लागतो! किंवा कॅटरीना कैफ वापरत असलेला शँपू स्वतःचे केस धुण्यास वापरतो! यापेक्षा गंभीर उदाहरण म्हणजे मी श्रीज्ञानेश्वरीला श्रेष्ठ ग्रंथ मानलेला आहे आणि मग त्या ग्रंथाप्रमाणे सर्व विचार करणे मी माझे कर्तव्य मानायला लागलेलो आहे. आता दासबोधामध्ये किंवा बायबलमध्ये वा कुराणात काही वेगळे लिहीलेले असेल तर ते मी मान्य करणे शक्य नाही!! स्वतः प्रयोग करुन काय खरे आणि काय खोटे हे ठरवायला आता मी स्वतंत्र रहात नाही. अर्थात, प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहणे शक्य नसते, कशावर तरी विश्वास ठेवूनच आपले जीवन जगायला लागते हे जरी खरे असले तरी स्वतःची मानसिक स्वतंत्रता गमावुन अनुकरण करण्यात धन्यता मानणे हे तत्वतः चुकीचे आहे. याचे कारण असे की आपली स्वतंत्रतेची ओढ जन्मजात आहे, स्वयंभू आहे, खरी आहे आणि अनुकरणाची ओढ समाजात कुणी आपल्या वर्तनाबद्दल जाब विचारला तर उत्तर देण्यास सोयीस्कर म्हणून आपण बाणवलेली आहे. मला कुणी ‘का रे तू असा वागतोस?’ म्हणून विचारले तर ‘अरे प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीज्ञानेश्वरीत असेच वागायला सांगितलेले आहे’ असे म्हटले की मी मोकळा! कारण सर्वांनाच माऊली किती थोर आहेत याची कल्पना आहे. याउलट, मी असे म्हणालो की ‘माझ्या मनात असे विचार आले म्हणून तसा वागलो’ तर दुसरा माझी चुक कशी झाली हे सांगण्यास लगेच पुढे येतो (आणि असे होणार हे मला आधीच माहिती असते!).
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या मनात स्वातंत्र्याबद्दल आकर्षण असले तरी आपण तात्पुरत्या सोयीकरीता अनुकरणाचा मार्गच निवडतो. काय गंमत आहे बघा: परमार्थाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष असे समजले तर मोक्षात संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय दुसरे काहीच नाही. आणि या स्वातंत्र्याकरीता आपण अनुकरणाच्या (म्हणजे बंधनांच्या) रस्त्यावर चालतो. ही या संसारातील दारुण वस्तुस्थिती आहे आणि हीच गोष्ट भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकातून अर्जुनाला स्पष्ट करुन सांगत आहेत.
आता इथे एक मुद्दा उपस्थित होतो की असे जर असेल तर कर्मयोगाचे खरे अवलंबन फक्त श्रेष्ठ लोकांनीच करावे आणि बाकीच्यांनी त्यांच्या वागण्याप्रमाणे वागले तरी चालेल. मी स्वतःला श्रेष्ठ समजत नसल्याने या विचारसरणीने मी कर्मयोगाच्या मार्गावर चालण्याच्या बंधनातून मुक्त होतो! परंतु हा विचार रास्त नाही. मी जरी समाजात श्रेष्ठ नसलो तरी माझ्या लहान मुलाकरीता मीच श्रेष्ठ आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मला कित्येक लोक असे विचारतात ‘अहो श्री रमण महर्षी वा रामकृष्ण परमहंस वा कान्हनगडचे स्वामी रामदास खरोखर संत होते का हो?’ आता मी त्यांना ग्रेट म्हणणार म्हणून कुणी त्यांच्यावर विश्वास ठेवला तर मी त्यांच्यापेक्षा थोर झालो की! परंतु हे असेच घडत असते. सांगायची गोष्ट अशी की या जगातील प्रत्येक व्यक्ती कुणा ना कुणाकरीता श्रेष्ठ आहे. समाजातील मान्यवर व्यक्ती जास्त जणांकरीता थोर आहेत आणि मी फक्त चार जणांकरीता थोर आहे एवढाच काय तो फरक आहे. परंतु तात्विक नजरेने पाहील्यास या नंबरांमधील फरकाने माझ्यावरील कर्मयोगाचे पालन करण्याची जबाबदारी कमी होत नाही! आता अर्जुनाकडेच बघा, तो स्वतः निश्चित कृष्णालाच श्रेष्ठ मानत असणार परंतु त्याचे अनुकरण करणारे कित्येक धनुर्धर असणारच की. तो सिंहासनावर बसला की ‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायानुसार अजून कित्येक जण त्याच्या अनुकरणातच जीवनाची धन्यता मानायला लागतील. तेव्हा अर्जुनाला स्वतः कर्मयोगाचे पालन करणे जरुरी आहे. आणि त्याच न्यायाने आपणा सर्वांना कर्मयोगाच्या मार्गावर जाण्यापासून सुटका नाही. आणि का म्हणून सुटका हवी? या मार्गावर चालल्यावर भगवान आपणाजवळ येतात आणि त्याने जो आनंद मिळतो तो अनुभवायला लागल्यावर हे बंधन आपण स्वतःहून आनंदाने अंगीकारु!
॥ हरिः ॐ ॥ 

अध्याय तिसरा (१९ आणि २०):

 तटस्थता ठेवून कर्मे करा


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीता ३:१९ ॥

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।

लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ गीता ३:२० ॥

मागील दोन श्लोकांमधून कर्मांपासून सुटका झालेल्या माणसाचे वर्णन भगवंतांनी केले. जो मनुष्य या जगातील कुठल्याही वस्तूवर आणि आपल्या मनातील भावनांच्या गदारोळातील एकाही आवाजावर (स्वतःच्या सुखाकरीता) अवलंबून नाही तोच महामानव वा संत सुकलेल्या नारळाच्या कवचासारखा आपोआप कर्मांच्या खोबऱ्यापासून अलिप्त झाला आहे असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. कर्मयोगाचे वर्णन करीत असताना मध्येच अशा संताचे वर्णन करण्यामागचा भगवंतांचा हेतू असा की कर्मयोगाचे पालन केल्याने आपली अवस्था अशी होईल ही भावना अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावी. आपला हा हेतू ते आता अधिक स्पष्टपणे अर्जुनाला सांगत आहेत. कर्मयोगाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की: (तू अजून संपूर्णपणे स्वतंत्र नाहीस,) म्हणून कशातही न गुंतता जी कर्मे समोर आलेली आहेत ती निरंतरपणे करीत रहा. मनात (कर्मफलांबद्दल) तटस्थता ठेऊन जो मनुष्य सतत कर्मे करीत असतो त्याला अंतिम स्वतंत्रता मिळते (१९). राजा जनक इत्यादी लोकांनी तटस्थतेने कर्मे करुनच परमार्थ प्राप्त करुन घेतला. (दुसरी गोष्ट म्हणजे) इतर लोकांचे भले होण्यासाठी तुला (योग्य मनोवृत्ती ठेऊन) कर्मे करणे अपरिहार्य आहे (२०).’
जोपर्यंत या जगाचे भान आहे तोपर्यंत आपणास कर्मे करणे भाग आहे. नुसते स्वस्थ बसायचे म्हटले तरी तेसुद्धा कर्मच आहे. आणि कर्मयोगाद्वारे जीवनात निरंतर सुरु असणारी कर्मे चालू असताना मनात कुठले विचार ठेवावे याचे ज्ञान होते. त्यामुळे कर्मयोगाचे महत्व आपल्या जीवनात काय असू शकेल याचे वेगळे वर्णन करण्याची जरुरी नाही. वरील श्लोकांमधून भगवान श्रीकृष्णांनी असक्त राहून कर्मे करणे म्हणजे कर्मयोग आहे आणि त्याचे पालन करुनच मनुष्य परमार्थाला प्राप्त करुन घेतो असे म्हटले आहे. आपल्या म्हणण्याचे पुष्टीकरण म्हणून त्यांनी जनक राजाचे उदाहरण दिले आहे. इथे ‘कर्मयोगाचे पालन करुन मोक्ष मिळवायचा असे मानले तर ज्यांनी कर्मयोगाचे फल मिळविले आहे अशा संतांनी कर्मयोग केला नाही तर चालेल का?’ हा प्रश्न उद्भवायची शक्यता आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी विसाव्या श्लोकातील दुसऱ्या चरणात भगवान म्हणत आहेत की कर्मयोगाची फलश्रुती खऱ्या अर्थाने जरी प्राप्त झाली असेल तरीसुद्धा समाजाला मार्गदर्शन म्हणून कर्मयोगाचे पालन करणे जरुरी आहे. इथे समाजाला, म्हणजे स्वरुपाशिवाय वेगळ्या भासणाऱ्या विश्वाचा संदर्भ देण्यास एक सूक्ष्म कारण आहे. असे बघा, या जगात स्वतःशिवाय दुसरी कूठलीही वस्तू अस्तित्वात नाही अशी धारणा असेल तर आपोआप तटस्थतेनेच कर्मे होतात. ज्याप्रमाणे आईला आपली सर्व मुले एकसारखीच प्रिय असतात त्याचप्रमाणे सर्वकाही आपणच आहोत हे कळल्यावर जगातील सर्व गोष्टींबद्दल समान आपुलकी वाटते. विश्वातील सर्व गोष्टींबद्दलची साम्यावस्था म्हणजेच सक्रीय तटस्थता असल्याने अशा अवस्थेत आपल्या हातून आपोआपच कर्मयोग घडतो. म्हणजे काय, तर हातून जाणीवपूर्वक कर्मयोग करण्यासाठी या जगाचे आपल्याशिवाय वेगळे अस्तित्व आहे याचे भान असणे जरुरी आहे. ‘निरंतर कर्मयोग करुन मनात साम्यावस्था निर्माण झालेली आहे आणि तरीसुद्धा या जगाचे वेगळे भान आहे’ अशा स्थितीमध्ये स्वतःला मोक्ष मिळाला असला तरी इतरांकरीता कर्मयोग करावा असा भगवंतांचा आदेश आहे.
परंतु ही सगळी फार पुस्तकी गोष्ट झाली!! स्वतः तटस्थ राहून इतरांच्या भल्यासाठी कसे कर्म करावे याचे प्रात्यक्षिक उदाहरण बघितल्याशिवाय ते आचरणात आणणे आपणास शक्य नाही. याकरीता काय करावे? दैनंदिन जीवनात कर्मयोग कसा करावा याचे जिवंत उदाहरण बघायचे असेल तर संतांच्या जीवनाकडे आपण बघायला हवे कारण संत कधीही भगवंताच्या आज्ञेबाहेर जात नाहीत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की … परि तयांचे चरित्र । ऐकती जे ॥ ज्ञा २२६:१२ ॥ तेही प्राणापरौते । आवडती हे निरुते । जे भक्तचरित्राते । प्रशंसिती ॥ ज्ञा. २२७:१२ ॥ ज्या संतांनी भगवंताच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन न करण्याचे वचन घेतले आहे ते भगवंतांच्या वरील श्लोकांतून स्पष्टपणे दिलेल्या आदेशाबाहेर कसे जातील? इथे काही साधक असे म्हणतील की तसे असेल तर सर्व संतांचा उपदेश ‘कर्मयोग करा’ असा एकसारखा असायला हवा. परंतु कुणी संत योगसाधनेला महत्व देत आहे तर कुणी नामसाधनेला असे दिसून येते. संतांच्या उपदेशांमध्ये फरक असण्याचे कारण काय? याचे उत्तर असे की आपल्या परमदयाळू स्वभावामुळे संत नुसता भगवंताचा आदेश न सांगता त्या आदेशाचे पालन करण्यासाठी मनाची जी स्थिरता आवश्यक असते ती प्राप्त करण्याचे साधनही सांगत असतात.
लक्षात घ्या की प्रत्येक संताचा जन्म एका ठराविक मनोवृत्ति असलेल्या साधकांच्या भल्यासाठी झालेला असतो. सवयीचा परीणाम म्हणून आपल्या मनात ज्या वृत्तींनी आपली मुळे खोलवर रुजविली आहेत त्यांना संपूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपल्या हातून निरंतरपणे कर्मयोग घडणे शक्य नसते. जास्तीतजास्त आपल्या हातून काय घडेल? तर जेव्हा काही कारणाने आपल्या मनोवृत्ती दबल्या असतील तेव्हा काही काळ आपण कर्मयोगाचे पालन करु शकू. परंतु नंतर आपण परत आपल्या स्वभावाप्रमाणेच वर्तन करायला लागतो. जसे प्रत्येक रोगाला त्याचे ठराविक औषधच लागू पडते त्याचप्रमाणे आपल्या सवयींना लागू पडणारे औषध भिन्न असते. आणि म्हणून संतांचा उपदेश आपणास भिन्न दिसतो. परंतु कर्मयोगाचे ज्ञान होण्यास आपणास संतांच्या उपदेशांकडे बघावयाचे नसून त्यांच्या स्वतःच्या जीवनातील वर्तनाकडे लक्ष द्यायचे आहे. त्यांनी आपले जीवन कसे व्यतीत केले आहे हे सूक्ष्मपणे बघितल्यास सर्व संतांमधील समानता सहजपणे समोर येते. ती म्हणजे या विश्वातील कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांच्या मनात असलेली तटस्थता. तुम्ही श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवनाकडे पहा वा श्री रमण महर्षींच्या चरित्रावर नजर टाका किंवा श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनाचा अभ्यास करा. सर्वत्र एकच गोष्ट सगळीकडे स्पष्टपणे आपणास दिसून येईल. ती म्हणजे समोर आलेल्या कुठल्याही घटनेला त्यांनी विना आक्रोश आणि सहजपणे दिलेले तोंड! ‘जे काही होत आहे ते सर्व बरोबर आहे आणि ते अजून सुंदर करण्याची काहीही जरुरी नाही’ या गोष्टीवरील त्यांची अढळ निष्ठा स्पष्टपणे लक्षात येते. वस्तुस्थिती अशी आहे की सध्या आपण कुठल्याही मार्गाने भगवंताकडे जात असलो तरी शेवटी सर्व मार्ग या ‘सहज कर्म करणे’ या मार्गालाच येऊन मिळतात. एकदा आपल्या हातून होणारी कर्मे ‘योग’ म्हणून व्हायला लागली की आपले अनुसंधान निरंतर चालू रहाते. मग आपल्या देह-मनावर आधारित संकुचित अहंकाराचा संपूर्ण विनाश होतो आणि स्वतःच्या निर्गुण रुपात आपण सहजपणे विलीन होतो. भगवंतांनी निर्देश केलेली ‘परम अवस्था’ प्राप्त करुन घेतो. असे कर्मयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे! इति.
॥ हरिः ॐ ॥
अध्याय तिसरा (१७ आणि १८): 

कर्मयोगाची परीपूर्णता म्हणजे खरी स्वतंत्रता


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ गीता ३:१७ ॥
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ गीता ३:१८ ॥

गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचे पालन न करणे म्हणजे पाप करणे होय असे सांगितले. परंतु हे केवळ नकारात्मक प्रोत्साहन आहे. आता ते आपणास कर्मयोगाची फलश्रुती सांगून कर्मयोग करण्यास सकारात्मक कारणे देत आहेत. असे बघा, एखादी कृती करण्यापूर्वी आपल्या मनात जर स्वतःच्या वर्तनांबद्दल संदेह असला तर आपल्या हातून कर्म व्यवस्थित घडत नाही. विशेषतः करावयाचे काम जर लगेच संपणारे नसेल तर मनातील शंकांना फोफावायला खूप संधी मिळून शेवटी आपल्या हातून कर्म घडणे थांबते. उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होइल. अशी कल्पना करा की एके दिवशी आपण स्वतःच्या शारीरीक अस्वास्थाबद्दल कंटाळा येऊन आपण तब्येत सुधारण्यासाठी नियमित काही व्यायाम करावयाचे वा सध्याचे आपले सिगारेट ओढणे थांबवायचे वा तळकट पदार्थ न खाता फक्त पौष्टीक आहार सेवन करावयाचे ठरविले, तर किती दिवस आपला निर्धार टिकतो? तब्येत व्यवस्थित होइपर्यंत! एकदा शरीर ठीक झाले की आपण म्हणतो एक दिवस आपला नियम मोडला तरी काही हरकत नाही. मग हळू हळू आपला संपूर्ण नियमच केव्हा मोडीत निघतो ते आपणास कळत नाही. इथे काही साधक म्हणतील की आमचा स्वभावातच ‘चंचलता’ हा दोष असल्याने एकाच मार्गावर अचल चालणे आम्हांस जमत नाही. आमचे जीवन असेच चालणार. परंतु ही गोष्ट आपल्या दररोज स्नान करण्याच्या नियमाबद्दल घडत नाही हे लक्षत घ्या. तेव्हा एखादा नियम आयुष्यभर पाळणे आपल्या स्वभावात नाही असे कुणीच म्हणू शकत नाही. स्वतःच्या स्वभावाला दोष देण्यापेक्षा ‘दररोज स्नान केलेच पाहीजे’ या नियमाबद्दल ज्याप्रमाणे आपल्या मनात निःसंदेह निष्ठा आहे त्याप्रमाणे बाकी नियमांबद्दल नाही असे आपण म्हटले पाहीजे. एकदा ही गोष्ट कळली की आपली आयुष्यभर कर्मयोग करण्याबद्दलची निष्ठा कशी वाढेल यावर आपण विचार करायला लागू. ज्याप्रमाणे स्नान न करणे चुकीचे आहे हे आपणास माहीत आहे त्याचप्रमाणे नियमित स्नानाचे फायदेही आपणास माहीती असल्याने नित्य स्नान करण्यास आपण चुकत नाही. या दृष्टीने बघितल्यास, मागील श्लोकामधून कर्मयोग न करणे चुकीचे आहे असे सांगून भगवंतांनी आपणास कर्मयोग करण्याचे अर्धे महत्व सांगितले आहे. आता कर्मयोग केल्याने कसा फायदा होतो ते सांगून ते आपल्या मनातील कर्मयोगात आयुष्य व्यतीत करण्याबद्दलच्या श्रद्धेला निरंतर स्थिर होण्यास मदत करीत आहेत.
भगवान म्हणत आहेत की: जो मनुष्य स्वतःमधील आनंदात रममाण असतो, ज्याला स्वरुपानंदाव्यतिरीक्त इतर कुठल्याही गोष्टीचे आकर्षण वाटत नाही आणि जो स्वरुपात निमग्न राहण्यामध्येच आयुष्याचे सार्थक मानतो त्याची सर्व कर्मे नष्ट होतात (१७). अशा माणसाला आत्तापर्यंत घडलेल्या वा भविष्यात घडू शकणाऱ्या कुठल्याही कर्मातून लाभ होणार नाही (याची खात्री असते). (आणि म्हणून) तो स्वतःच्या लाभाकरीता या विश्वातील कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसतो (१८). इथे वरकरणी असे दिसते की भगवान कुठला महामानव कर्मयोग करण्याच्या बंधनातून सुटतो असे सांगत आहेत. परंतु याचाच अर्थ असा की ही कर्मयोगाची फलश्रुती आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे या श्लोकांतून आपण कर्मयोग कुठपर्यंत करावा? या प्रश्नाचे उत्तर ‘जोपर्यंत आपली अवस्था वरील साधकाप्रमाणे होत नाही तोपर्यंत’ असे आहे हे स्पष्ट होते. आणि जर कर्मयोग केल्याने आपली अवस्था अशी होणार नसेल तर अशी अवस्था कशी निर्माण होईल याचे वेगळे वर्णन भगवंतांनी जरुर केले असते. परंतु त्यांनी कर्मयोगा व्यतिरीक्त इतर कुठलाही मार्ग इथे सांगितलेला नाही. याचाच अर्थ असा की पराकोटीचा कर्मयोग करुन आपली अवस्था काय होईल याचेच हे वर्णन आहे असे आपण मानायला हरकत नाही.
वेगळ्या शब्दांत वरील श्लोकांबद्दल बोलायचे झाले तर भगवान असे म्हणत आहेत की जो मनुष्य खऱ्या अर्थाने या विश्वापासून स्वतंत्र आहे त्याला या संसारात कर्मयोग करण्याचे बंधन रहात नाही. म्हणजे काय तर कर्मयोगामुळे आपल्या जीवनात खरी स्वतंत्रता येते असे त्यांना म्हणावयाचे आहे. जरा विचार केला तर असे जाणविते की आयुष्यभर आपण स्वतंत्रतेकरीताच झगडत आहोत. लहानपणी पालकांच्या नियमांपासून स्वतंत्रता हवी असते, मोठेपणी दुसऱ्यांवर आर्थिकरीत्या अवलंबून असण्यापासून स्वतंत्रता हवी असते, मग स्वतःच्या नोकरीतील बंधनांपासून सुटका हवी असते तर कधी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून मोकळीक हवी असते. परंतु आपली स्वतंत्रतेची व्याख्या फार संकुचित असते. लहानपणी पालकांपासून सुटका हवी असते कारण मग मित्रांबरोबर कुठेही भटकायला आपण मोकळे असतो. मोठेपणी स्वतःच्या पायावर उभे राहीले की आपल्या मनाप्रमाणे पैसे खर्च करायला आपण मोकळे होतो. जरा विचार केल्यावर असे दिसते की आपली स्वतंत्रतेची व्याख्या ‘सध्याच्या बंधनांतून सुटका होऊन आपल्या मनाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टीत अडकणे’ अशी असते. खऱ्या अर्थाने जगापासून मुक्तता आपणास नको असते. सध्या नकोशा वाटणाऱ्या बंधनांतून हव्याशा पाशात गुरफटणे यात आपण कृतकृतत्या मानत आहोत! दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आपली स्वतंत्रता नेहमी कुठल्यातरी ठराविक पाशांपासून असते, सगळ्याच बंधनांतून नसते. भारताला १९४७ साली स्वतंत्रता मिळाली असे आपण म्हणतो. परंतु ती फक्त ब्रिटीशांपासून मिळालेली स्वतंत्रता होती. पांढऱ्या त्वचेची माणसे आपणास हुकुम सोडत नाहीत पण आता आपलीच माणसे सत्तेवर बसून हवी ती फर्माने सोडत आपले शोषण करीतच आहेत की! त्याचप्रमाणे आपण कुणापासूनतरी सुटका मिळवायचा प्रयत्‍न करत असतो आणि दुसऱ्या माणसाच्या वा तत्वाच्या सत्तेखाली जात असतो. परंतु कर्मयोग केल्याने जी स्वतंत्रता येते ती कुठल्यातरी पाशाच्या सापेक्ष नसून संपूर्ण असते. ‘परके लोक गेले आणि स्वकीय नेते आले’ किंवा ‘पालक गेले आणि जीवनसहकारीच्या मनाची मर्जी राखणे आले’ अशी अर्धवट स्वतंत्रता कर्मयोगानी मिळत नाही. भगवान म्हणत आहेत की या विश्वातील कुठल्याही घडामोडींनी आपल्या स्वरुपात वृद्धी होणार नाही (कारण ते स्वयंभू रीतीने परीपूर्ण आहे) याची खात्री झाल्याने जी स्वतंत्रता येते त्या संपूर्ण मुक्ततेत स्वच्छंद विहार करणाऱ्या अवस्थेत कर्मयोगाची परीणीती होते. लक्षात घ्या की ‘स्वतंत्रता’ हा शब्द खऱ्या अर्थाने निव्वळ संतांनाच लागू होतो. जर स्वतःची अवस्था अशी करुन घ्यावयाची असेल तर कर्मयोगाचे निरंतर पालन करणे अपरिहार्य आहे. हे भगवंतांचे सांगणे आहे.
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा १६: 

इंद्रियप्रेमात गुरफटल्याचे दुष्परीणाम

 
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ गीता ३:१६ ॥
भगवान श्रीकृष्णांनी गेल्या दोन श्लोकांतून अर्जुनाला अत्यंत संक्षिप्तपणे या जगाचे रहाटगाडगे कसे चालू आहे ते सांगितले. त्यातून मानवाचा स्वधर्मरुपी यज्ञ या जगाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यास कसा कार्यरत आहे हे स्पष्ट होते. आपणहून समोर आलेल्या कुठल्याही कर्मांना सकारात्मक नजरेने सामोरे जाणे हा आपणा सर्वांचा स्वधर्म आहे. स्वधर्माची ही व्याख्या आपल्या मानसिक पातळीवर आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. आपल्या भोवताली कुठली परीस्थिती आहे यावर कुठल्या प्रकारची कर्मे सामोरी येतात हे ठरत असते. त्यामुळे बाह्य नजरेत आपण प्रत्येकजण अतिशय भिन्न कर्मे करीत असलो तरी आपणा सर्वांचा स्वधर्म एकच आहे आणि तो म्हणजे व्यावहारिक जगातील सर्व कर्मांना मानसिक तटस्थतेने सामोरे जाणे. स्वधर्माचे पालन करण्याकरीता ‘आपण सर्वजण भगवंताची हत्यारे आहोत आणि आपला वापर करुन भगवान या जगाचे पालन करीत आहेत’ अशी कल्पना आपण करु शकतो. आपल्याच मनातील ही कल्पना असल्याने पारमार्थिक सत्याचे संपूर्ण प्रतिबिंब या विचारात नाही. परंतु असे असले तरी आपल्या हातून स्वधर्म घडण्यास या कल्पनेचा फायदा होत असल्याने भगवंताबद्दलची ही भावना ताज्य ठरत नाही. या विचारामधील भगवंत स्वतःच्या इच्छेने या जगाला चालवित असल्याने सगुणात्मक आहे. त्यामुळे असा विचार मनात सतत ठेवणे म्हणजेच निर्गुण भगवंताची सगुण भक्‍ती करणे होय. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘अहंकार ठेवायचाच असेल तर मी भक्त आहे असा अहंकार ठेवावा. त्याने आपले सर्वात कमी नुकसान होते.’ एकदा भगवंताच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत ही भावना मनात स्थिर झाली की भोवतालच्या परीस्थितीला एक ठराविक आकार द्यायचा आपला प्रयास थांबतो. मग ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील सुरी कधी ताज्या लुसलुशीत पालेभाजीला चिरण्यासाठी वापरली जाते तर कधी कच्च्या करकरीत कैरीचे लोणच्यासाठी तुकडे करण्यास वापरली जाते त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचा कधी सुख उपभोगण्यासाठी भगवान वापर करतात तर कधी दुःखाचे घाव सोसण्यासाठी अशी भावना निर्माण होते. त्यामुळे स्वतःच्या मनाला आपण इंद्रियांच्या भोगामध्ये गुंतून देत नाही. आणि एकदा शरीरभोगांपासून मन अलिप्त झाले की सुख आणि दुःख या दोन्ही घटनांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. आणि हेच आपले कर्तव्य आहे, हीच भगवंताची आपणाकडून अपेक्षा आहे.
स्वतःच्या पायावर उभे नसलेल्या मुलाने पालकाच्या आज्ञेचे पालन न करणे ज्याप्रमाणे त्याज्य मानले जाते त्याचप्रमाणे आपल्या हातून भगवंतांच्या अपेक्षेनुसार वर्तन न करणे पाप समजले जाते. किंबहुना या जगात ही एकच गोष्ट पाप आहे असे आपण समजू शकतो. वरील श्लोकामध्ये हीच गोष्ट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत असे वाटते. भगवान म्हणत आहेत की हे अर्जुना, स्वधर्माचे पालन न केल्याने जो (मी घालून दिलेल्या) जगाच्या रहाटगाडग्याप्रमाणे चालत नाही तो पापी आहे. तो इंद्रियसुखामध्येच समाधान मानणारा आहे, (आणि म्हणून) त्याचे जीवन व्यर्थ गेले (असे निःसंशय समजण्यास हरकत नाही) (१६).
वरील श्लोकातून भगवंतांनी ‘स्वधर्माचे पालन न करणे’ अशी पापाची व्याख्याच केली आहे असे वाटते. इतकेच नाही, तर सर्व पापाचे ‘इंद्रियभोगांमध्ये गुंतणे’ हे एकच मूळ आहे असेही त्यांनी सांगतले आहे. कारण आपण इंद्रियसुखात मग्न असतो तेव्हाच आपल्या हातून प्रमाद घडतो असे भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे आपल्या मन हेसुद्धा गीतेमध्ये इंद्रिय मानले आहे. तेव्हा आपण स्वतःच्या मनातील विचारांनुसार वर्तन करणेसुद्धा भगवंतांना मान्य नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. नाहीतर आपण स्वतःच्या हट्टाकरीता कित्येकवेळा आपल्या शारिरीक इंद्रियांना त्रास देतो, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. पण म्हणून आपले वागणे योग्य असेलच असे आपण म्हणू शकत नाही. इथे आपला हट्ट सामाजिक वा नैतिक दृष्टीकोनातून किती योग्य आहे याचा संबंध नाही हे ध्यानात घ्या. स्वधर्माने वर्तन केले असता मनात आपोआप एक निरव शांतता निर्माण होते आणि जोपर्यंत या शांततेचा आस्वाद आपण घेत नाही तोपर्यंत आपले काहीतरी चुकत आहे असे समजण्यास हरकत नाही. भूतकाळात आपल्या हातून कसेही वर्तन घडले असले तरीसुद्धा आपणास या शांततेचा लाभ घेता येतो (वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकींत रुपांतर होणे हे याच वस्तुस्थितीचे द्योतक आहे). जेव्हा संसाराच्या रहाटगाडग्यात आपल्या हातून भगवंताला अपेक्षित वर्तन घडते तेव्हा हे विश्वचक्र सहज, घर्षणरहित फिरून आपणास लगेच शांति देते. ही शांति भविष्यात कधीतरी उधार मिळणारी नसून आत्ता याक्षणी रोकडी मिळणार आहे. ज्याने अशा शांतीचा उपभोग घेतला नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले असे भगवान म्हणत आहेत. या वक्तव्याबद्दल कुणाचे दुमत असणे शक्यच नाही!
॥ हरिः ॐ ॥
 अध्याय तिसरा (१४ आणि १५): 

अव्यक्‍ताची व्यक्‍त खूण स्वधर्म

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
अन्नाद्भवंति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ गीता ३:१४ ॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ गीता ३:१५ ॥
संसारातील चंचलतेमागे एक स्थिर पार्श्वभूमी आहे (आणि त्या स्थिरतेच्या सापेक्षच आपणास चंचलता जाणविते) हे सनातन धर्माचे मूळ तत्व आहे. आपणा सर्वांच्या जीवनातील या स्थिरतेच्या प्रतिबिंबात बुडून जाणे म्हणजे अद्वैत प्रणाली होय. जोपर्यंत आपण चंचलतेमध्येच गुंतलेलो आहोत तोपर्यंत आपणास या स्थिरतेची, म्हणजेच अव्यक्त ब्रह्माची, कल्पना येणे शक्य होत नाही. चित्रपटगृहात जेव्हा सिनेमा चालू असतो तेव्हा आपणास त्यामागील पटाची विस्मृती होते तशी ही गोष्ट आहे. आणि ज्याप्रमाणे कधीनाकधी सिनेमा संपतो आणि आपणास परत मागील पटाचे दर्शन होते त्याचप्रमाणे आपण सर्वजण केव्हातरी या मायेच्या चित्रपटातून मुक्त होऊन भगवंतचरणी लीन होणार आहोत. भगवंताशी मिलन होण्यासाठी काही प्रयत्‍न करायलाच हवे असे अजिबात बंधन नाही. परंतु हे मिलन जर याच जन्मात हवे असेल तर आपल्यापरीने या भेटीबद्दलची उत्सुकता दाखविणे उपयुक्‍त ठरते. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एखाद्या श्रीमंत मनुष्याच्या एकुलत्या मुलाला त्याचा वाटा अठराव्या वर्षी मिळणारच आहे. परंतु पंधराव्या वर्षीच जर त्याला पैसे हवे असतील तर त्याला वडिलांजवळ सतत हट्ट करावा लागतो आणि मग त्याच्या निरंतरच्या भुणभुणीला कंटाळून त्याचे वडिल त्याला काही हिस्सा आधीच देतात. त्याप्रमाणे आपण भगवंतामागे भक्तीचा हट्ट करायला हवा. भगवंताशी भेट हा आपला जन्मसिद्ध वारसा असला तरी तो आपोआप मिळायला जो वेळ लागणार आहे त्याचा कंटाळा आला असेल तर आपणास साधनेचा आटापिटा करणे जरुरी आहे.
अशा रीतीने विचार करुन साधनेचे महत्व मनाला पटविले तरी नक्की साधना कशी करावी हा प्रश्न उरतोच. जरा नजर उघडून बघितले तर साधनेचे अनंत प्रकार आपणास दिसायला लागतात. कुणी एका ठिकाणी शांतपणे बसून ध्यान करायचा उपदेश करीत आहे तर कुणी नाम घेण्यास सांगत आहे (आणि कुठले नाम घ्यावे याकरीता ८४ लक्ष देव आहेत!) तर कुणी योगसाधनेचे महत्व सांगत आहे असे आढळते. आणि हे सर्व उपाय फक्त हिंदू धर्मातील आहेत, याशिवाय इतर अनेक धर्म आणि त्यांचे अनंत मार्ग आहेतच! आणि यातील एकही मार्ग चुकीचा असू शकत नाही कारण सर्व मार्ग एकाच भगवंताकडे घेऊन जातात (ज्याप्रमाणे कुठेही पडलेले पावसाचे पाणी एकाच समुद्राला जाऊन मिळते त्याचप्रमाणे कुठल्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी कृष्णाला मिळतो अशा अर्थाचा ‘आकाशात्‌ पतितं तोयं ..’ हा श्लोक सर्वश्रुत आहे). त्यामुळे वरील मार्गांपैकी कुठल्याही एका मार्गावर जे अढळ चालत राहीले त्यांना भगवंत भेटणार यात शंका नाही. परंतु बहुतांशी लोक अनेक मार्ग दिसले की भांबावून जातात. हिरव्यागार कुरणात गेल्यावर पाडसाला कुठले गवत आधी खावे याबद्दल संभ्रम होऊन ते नुसतेच इकडे-तिकडे पळायला लागते तशी आपली अवस्था होते. अशावेळी एकाच मार्गावर अचल राहण्याकरीता आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन होणे अत्यावश्यक असते. जेव्हा स्वतःच्या योग्य मार्गाबद्दल आपली पूर्ण खात्री असते तेव्हा दुसरे मार्ग कितीही आकर्षक वाटले तरी आपण त्यांच्यानुसार वर्तन करण्यास उद्युक्त होत नाही. कर्मयोगाचा मार्ग कुठल्याही एका धर्माचा वा ठराविक क्रियेंचा किंवा मंत्रोच्चारांचा आधार घेत नसल्याने तो सर्व मार्गांचे मूळ आहे. म्हणूनच ‘मी सृष्टी बरोबर या यज्ञाची निर्मिती केली’ असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले (पहा गीता ३:१०). संसारातील सर्व जीवांना या यज्ञाचा शाश्वत आधार आहे. हा महत्वाचा मुद्दा आपल्या मनावर जितका बिंबेल तितका उपयुक्त आहे. म्हणून दहाव्या श्लोकात सांगितलेली ही वस्तुस्थिती परत एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वरील दोन श्लोकांतून समजावून सांगत आहेत. भगवान म्हणत आहेत की: अन्नापासून जीवांची उत्पत्ती होते. पावसाने अन्न पिकते आणि पाऊस यज्ञामुळे पडतो आणि हा यज्ञ स्वधर्मरुप कर्मांच्या रुपात आहे (१४). स्वधर्मरुपी कर्मे वेदांनी प्रगट केली आहेत आणि वेद हे अक्षर, अव्यक्त ब्रह्मापासून उत्पन्न झाले असल्याने अव्यक्‍त ब्रह्माची उपस्थितीच जणू या स्वधर्मरुपी यज्ञात आहे (१५).’
अमूर्त भगवंताकडे जाण्यासाठी जे महाद्वार आपणा सर्वांसाठी निरंतर उघडलेले आहे ते म्हणजे स्वधर्म होय. जो मनुष्य स्वधर्माने सर्व आयुष्य जगत आहे तो बाकी सर्व साधकांपेक्षा उच्च अवस्थेत आहे. जी कर्मे आपणहून सामोरी येतात त्यांना स्वतः न गुंतता पार पाडत आयुष्य व्यतीत करणे म्हणजे स्वधर्माचे पालन करणे होय. मी आणि माझे यांच्यात गुंतलेल्या जीवाला हा यज्ञ अशक्य आहे आणि ज्याला अहंकाराचे नावसुद्धा ठाऊक नाही त्याचा हा सहज नैसर्गिक धर्म आहे. साधनेच्या कुठल्याही मार्गाने गेलो तरी शेवटी आपणा सर्वांना याच यज्ञाचे पालन करायचे आहे. या मार्गावर प्रतिबंध करणारा जो आपला संकुचित अहंकार आहे त्याचा विनाश व्हावा यासाठी आपले अथक प्रयत्‍न व्हायला हवेत. परंतु या साधनेचे फल म्हणून अहंकार कमी झाला की स्वधर्मरुपी यज्ञ सुरु करायला आपण विसरु नये म्हणून भगवंतांनी कर्मयोगाचे महत्व वरील श्लोकांतून आपणास सांगितले आहे. आपणा सर्वांचे अंतिम ध्येयच जणू आज सामोरे आले आहे असे वाटते.
॥ हरिः ॐ ॥

 अध्याय तिसरा  १३: 

निर्हेतुक कर्मे कशी करावी?


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यंते सर्वकिल्बिषैः ।
भुंजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात्‌ ॥ गीता ३:१३ ॥
कित्येकवेळा असा अनुभव येतो की कर्माची सुरुवात करताना आपल्या मनात उदात्त भावना असते. परंतु स्वतःच्या परोपकारी कर्मांचे कौतुक केव्हा होईल या वरकरणी रास्त दिसणाऱ्या अपेक्षेत आपल्या मनातील निर्हेतुक बुद्धी कधी नष्ट होते ते आपणास कळतसुद्धा नाही. एकदा मनात कितीही छोट्या अपेक्षेचा प्रवेश झाला की कधी तीचे रुप आक्राळविक्राळ होते याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही. उदाहरणार्थ, ‘आपले कौतुक व्हावे’ या अपेक्षेचे ‘दुसऱ्याचे कौतुक करण्याची काय गरज होती?’ या भावनेत सहज रुपांतर होते आणि त्यातून प्रत्येकाच्या वागण्यातील दोष बघण्याची नजर बनते. समाजातील बहुतांशी लोकांत दुसऱ्यांचे दोष बघण्याची जी वृत्ती आहे त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या मनातील ‘आपल्या कर्मांची कुणाला जाणीव नाही’ ही भावना होय. इथे मुद्दा जर सूक्ष्म आहे म्हणून स्पष्ट करावासा वाटतो. वरील विवेचनातून आपल्या कर्मांचे कौतुक न करणाऱ्या माणसांचे समर्थन करावयाचा उद्देश नाही. त्यांचे तसे वागणे चुकीचेच आहे. पण आपली शाबासकीची अपेक्षासुद्धा तेव्हढीच चुकीची आहे असे फक्‍त सांगायचे आहे. जी माणसे योग्य कर्मांची नोंद घेत नाहीत त्यांना या अपकर्मांची फळे भोगावी लागणार आहेतच, पण आपणसुद्धा फलापेक्षेत गुंतल्याने भगवंतापासून दूर होत आहोत असे इथे म्हणायचे आहे. आणि शेवटी स्वतःची काय अवस्था होणार इकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. इतरांच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला ते समर्थ आहेतच! असो.
असे सांगावयाचे आहे की निर्हेतुक कर्मे करणे अत्यंत अवघड आहे कारण निव्वळ कर्मांचा आरंभ करताना अपेक्षेचा अभाव असणे पुरेसे होत नाही. अशी कर्मे करीत असतानासुद्धा निरपेक्ष रहायला हवे आणि याहून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मे संपल्यावर त्यांच्याबद्दल संपूर्ण विस्मृती झाली पाहीजे. नाहीतर भूतकालात केलेल्या कर्मांची आठवण होऊन परत कुठलीतरी अपेक्षा निर्माण होते! बहुतांशी लोक स्वभावतःच आरंभशूर असल्याने ‘कर्मे निर्हेतुकपणे करण्याचा योग (कर्मयोग)’ करायची इच्छा असूनही त्यांना तो करणे अशक्य होते. एखाद्या तत्वाकरीता विना आक्रोश आयुष्यभर खस्ता काढण्याची सात्विक वृत्ती ज्यांना उपजतच प्राप्त आहे अशा भाग्यवान लोकांनाच खरा कर्मयोग करणे शक्य होते आणि ते भरभर स्वतःची प्रगती करुन घेऊन भगवंतचरणी लीन होतात. आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे जास्तीतजास्त नव्वद टक्के कर्मे निर्हेतुक करतात आणि बाकीच्या दहा टक्के कर्मांमुळे परत सांसारीक बंधनात अडकतात. ज्याप्रमाणे पुराणातील कथेमध्ये बळीराजाच्या टाचेवरील छोट्याश्या धुलीकणातून कलीने बलिराजात प्रवेश केला आणि त्याचा परीणाम कलीयुगाची सुरुवात होण्यात झाली त्याचप्रमाणे आपल्या मनातील निरंतर अस्वस्थतेचे मूळ आपली हेतुपूर्वक केलेली अल्प कर्मे आहेत. जोपर्यंत कर्मफलाच्या अपेक्षेचे प्रमाण संपूर्णपणे शून्य होत नाही तोपर्यंत आपण या जगाच्या रहाटगाडग्यात फिरत राहणार आहोत. हा संसार जर एक परीक्षा समजली तर असे म्हणा की या परीक्षेत शंभरापैकी अर्धा गुण जरी कमी पडला तर आपण नापास आहोत!
वरील श्लोकातून ही वस्तुस्थिती भगवान श्रीकृष्ण आपणास सांगत आहेत. ते म्हणत आहेत की: (कर्मयोगाच्या) यज्ञातून निर्माण झालेल्या समृद्धीचा विनियोगसुद्धा निर्हेतुक बुद्धीने केला तरच सर्व पापांपासून मुक्‍तता मिळते. परंतु (योग्यरीतीने यज्ञ करुनसुद्धा) स्वतःच्या भोगाकरीता यज्ञफलाचे विनियोग करणारे पापच खातात (१३).
पराकाष्ठेचा प्रयत्‍न करुनसुद्धा आपल्या मनात अहंकाराची वृद्धीच का होते याचे कारण इथे सांगितले आहे. स्वतःच्या देहावर आणि मनातील भावनांवर आधारीत आपल्या अपेक्षांकडे आपुलकीने बघणे म्हणजे अहंकार होय. मग या अपेक्षा कितीही रास्त वाटल्या तरी त्यातून आपला अहंकारच जोपासला जात आहे हे जाणून अत्यंत निष्ठूरपणे आपण सर्व अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे हा एकच अहंकारापासून सुटण्याचा उपाय आहे. माझे सर्वांनी कौतुक करावे ही अपेक्षा असो किंवा माझ्या हातून वृद्ध पालकांची योग्य देखभाल झालीच पाहिजे हा अट्टाहास असो या दोन्ही अपेक्षांत तात्विकरीत्या काही फारक नाही कारण या दोन्हीही आपणास मानसिक शांतीपासून दूर नेणाऱ्या आहेत. “आपल्या हातून जी कर्मे होऊ शकतात तेव्हढी अत्यंत प्रामाणिकपणे करुन पुढील सर्व घडामोडींकडे तटस्थपणे पहात राहणे आणि त्याचवेळी जे योग्य असेल ते करीत राहणे” हा उपाय सर्व संतांनी सांगितलेला आहे आणि त्याचे मूळ भगवंतांच्या वरील उच्चारांमध्ये आहे असे वाटते.
 ॥ हरि ॐ ॥

अध्याय तिसरा (११ आणि १२): 

एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
 देवान्भावयतानेन ते देवा भावयंतु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ गीता ११:३ ॥
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्‍ते स्तेन एव सः ॥ गीता १२:३ ॥
स्वतःच्या लाभासाठी दुसऱ्यांच्या जीवनात निष्ठुरपणे दुःखद प्रसंग आणणाऱ्या माणसांबद्दलच्या बातम्या जेव्हा आपण वर्तमानपत्रात वाचतो तेव्हा आपल्या मनात विषण्णतेची भावना येते. लहान मुलांच्या औषधात भेसळ करुन पैका मिळविणारी माणसे भारतभूमीच्या पवित्र मातीतून कशी जन्म घेतात असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. कितीही गरीबीत असलो तर अशा वाममार्गाने पैसे मिळविणे स्वतःला शक्यसुद्धा होणार नाही याची खात्री आपणास असते. खरोखर दुसऱ्यांच्या जीवावर धोका उत्पन्न करुन स्वतःची प्रगती करणे अतिशय निंदास्पदच आहे. परंतु आपणा सर्वांच्या जीवनाचा पाया अगदी असाच आहे ही एक दारुण वस्तुस्थिती आहे. ज्याप्रमाणे देशी दारुत भेसळ करणे चुकीचे आहे त्याचप्रमाणे समोरील रुग्णाला कारण नसताना सर्व चाचण्या करायला लावून ज्या कंपनीने आपणास सर्वात जास्त सूट दिलेली आहे तीची औषधे घ्यायला सांगणेही चुकीचे आहे. हो की नाही? अगदी लहानपणापासूनची आपली वर्गात पहिला यायच्या धडपडीतसुद्धा बाकी सर्वांना आपल्यापेक्षा कमी गुण मिळायला हवेत अशी इच्छा आहेच की! नोकरीत एकालाच बढती मिळणार असेल तर बाकी सर्वांना सोडून आपले नाव यावे या इच्छेतसुद्धा इतरांच्या नाराजीचा पाया आहेच. लक्षात घ्या की वर्तमानपत्रातील मनाला हादरवून सोडणाऱ्या सर्व घटना आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वमान्य गोष्टींचेच एक अत्यंत पराकोटीचे रुप आहे.
आता तुम्ही म्हणाल की काही मर्यादेपर्यंत दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःची प्रगती करुन घेणे ठीक आहे. परंतु जीव जाईल इतपत त्रास देणे चुकीचे आहे. परंतु हा आक्षेप निव्वळ बाह्यकृतींवर आधारीत आहे. तात्विकरीत्या आपण सर्वांनी जणू मान्यच केलेले आहे की आपले सुख दुसऱ्यांच्या दुःखावरच उभे राहणार आहे. आपल्या मनातील ‘नैतिकता’ आपण इतरांना कितपत त्रास देतो यावर अवलंबून आहे, त्रास अजिबात न देण्यावर नाही! आणि ही गोष्ट अनादी काळापासून चालू आहे. म्हणूनच जेव्हा येशू ख्रिस्ताने ‘ज्याने पाप केले नाही त्यानेच या व्यभिचारीणीवर दगड मारावेत’ असे म्हटल्यावर कुणाचीही दगड उचलायची हिम्मत झाली नाही! इथे कदाचित तुम्ही असे म्हणाल की या जगात रहावयाचे असेल तर स्वतःच्या प्रगतीकरीता सतत जागरुक राहणे अत्यावश्यक आहे. दुसऱ्यांचाच विचार करीत बसलो तर दोनवेळा पोटभर खायला मिळणेही कठीण होईल. यावर मूलभूत उत्तर असे की जरी तुम्ही खरोखर फक्‍त इतरांच्या भल्यासाठी झटलात तर कधीही तुम्हाला दोनवेळच्या खाण्या-पिण्याची ददात पडणार नाही. परंतु तुमचा मुद्दा नुसत्या पोट भरण्याचा नाही. सध्या सहजपणे अध्यारुत धरलेल्या सुखसोयीसुद्धा तुम्ही ‘पोट भरणे’ या शब्दांत सामाविष्ट केल्या आहेत. तो मतितार्थ लक्षात घेऊन असे म्हणावेसे वाटते की जरी तुम्ही इतरांसारखे जगत असलात तरी त्यांच्याप्रमाणे असे जगण्यातच जीवनाचे सार्थक आहे असे समजणे तरी थांबवू शकता ना. देहाने जी कर्मे केली आहेत त्याशिवाय अधिक काही करणे अशक्य आहे असे मानणे तुम्ही थांबवू शकता. असा विचार करणे म्हणजे परमार्थाच्या मार्गावर पदार्पण करणे आहे.
एकदा मनात स्वतःचे ‘परकीयांना त्रास देऊन स्वतःचे सुख मिळविणे’ असे वर्तन अजून चांगले होऊ शकते हा विचार स्थिर झाला की जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण सहिष्णुतेने वागायला लागतो. काही काळाने दया कशी सतत दाखविता येईल किंवा मला झालेला लाभ इतरांबरोबर कसा वाटून घेता येईल याबद्दल सतत चिंतन सुरु होते. अशावेळी माझी विचारसरणी सर्वसामान्यांपेक्षा किती वेगळी आहे अशी जाणीव ठेवण्याचा अहंकार वाढण्याचा धोका असतो. या दोषावर उपाय म्हणजे आज विवेचनाला घेतलेले श्लोक आहेत. इतरांना साह्य करुन मग स्वतःचा विचार करणे हा आपणा सर्वांचा धर्मच आहे. आपण सोडून बाकी तसे वागत नसले तरी आपले तसे वागणे नैसर्गिक आहे, त्यात विशेष काही नाही असे भगवान या श्लोकांतून आपणास सांगत आहेत. भगवान म्हणत आहेत की: समोर आलेली कर्मे निरपेक्षपणे करण्याच्या यज्ञाने या जगातील सर्व शक्ति संतुष्ट होतात व आपोआप त्या आपली काळजी घेतात. अशा रीतीने तुम्ही देवांची आणि देव तुमची काळजी घेत दोघेही परमप्राप्ती करुन घेतात (११). परंतु तुमच्या यज्ञाने संतुष्ट होऊन तुम्हाला इष्ट असलेले भोग मिळाले की तेसुद्धा तुम्ही सर्वांबरोबर विभागून मग जे उरेल त्याचा उपभोग घ्यायला हवा. कुणाला न वाटता मिळालेले भोग एकट्याने उपभोगणे म्हणजे चोरी करण्यासारखे आहे (१२). ’
लक्षात ठेवा की ‘स्वकष्टाने’ मिळविलेली संपत्ती निव्वळ स्वसुखाकरीता वापरणे चोरी करण्यासारखे आहे. खरे म्हणजे फक्त स्वतःच्या कष्टांनीच आपणास लाभ झाला आहे असे म्हणणेच बरोबर नाही कारण आपल्या इतकेच कष्ट केलेल्या सर्वांना आपल्याप्रमाणे लाभ झालेला आहे असे दिसून येत नाही किंवा आपणापेक्षा कमी कष्टात काहीजणांना जास्त लाभ झाला आहे असे दिसते. याचा अर्थ असा की आपल्या प्रयत्‍नांखेरीज जरुर काही इतर शक्‍ती आपणास मदत करत असल्यानेच आपणास फायदा झालेला आहे. या शक्‍तींना ‘नशिब’ या शब्दात गुंडाळून इतरांकडे दुर्लक्ष करायचा निर्णय आपला वैयक्‍तिक आहे हे ध्यानात ठेवा. भगवंतांनी आपल्या या विचारसरणीचे समर्थन केलेले नाही! तेव्हा वरील श्लोकांवरुन आपणास असे शिकता येईल की:
१. स्वतःच्या लाभासाठी परक्यांना कष्ट देणे अपरिहार्य आहे असे मानणे चुकीचे आहे.
२. जेव्हा सर्व जीवांची उन्नत्ती होते तेव्हाच प्रगती झाली असे म्हटले पाहिजे कारण भगवंताच्या दरबारात सर्वांना एकसारखे लेखले जाते.
३. स्वधर्माचे निरंतर यज्ञाप्रमाणे पालन करणे हा एकच उपाय आहे.
॥ हरिः ॐ ॥
 अध्याय तिसरा (१०):

 सृष्टीची व्यवस्था

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
सहयज्ञा: प्रजाः सृष्ट्‌वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ गीता १०:३ ॥
गेल्या श्लोकात भगवंतांनी आपल्यातील प्रेमाला दृष्यरुप देण्यास स्वधर्माचा मार्ग सांगितला. खरे म्हणजे आपण सर्व आयुष्यभर प्रेमाच्या शोधात फिरत असूनही कुठल्याही व्यक्‍तीचा वा प्रणालीचा आधार न घेता प्रेम करण्याची ही नैसर्गिक संधी आपणास दिसतसुद्धा नाही. मराठीत ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असे म्हणतात किंवा एखादी व्यक्‍ती कपाळावर ठेवलेला चष्मा शोधण्यात सर्व सकाळ वाया घालविते त्याप्रमाणे आपली अवस्था आहे. आपल्यासमोर आपोआप आलेल्या कर्मांना प्रेमाने पार पडणे यात सुखी जीवनाचे रहस्य दडलेले असेल असे आपणास वाटतसुद्धा नाही मग त्याप्रमाणे वर्तन करणे दूरच राहीले. वास्तविकरीत्या विनातक्रार समोरील काम पार पाडल्यानेतर मनाला एक वेगळीच शांतता लाभली आहे असे अनुभव आपणास अनेकवेळा आलेले असतात. परंतु अशा अनुभवांवरुन आपण योग्य धडा शिकत नाही. कारण अशा वागण्यामध्ये स्वतःच्या हुशारीला वाव नाही असे आपणास वाटते. बहुतांशी लोकांना नुसतीच मनाची शांती मिळविण्यापेक्षा ‘स्वतःच्या कष्टांनी’ मानसिक व शारीरीक प्रगती हवी असते. कदाचित आपणास स्वतःच्या जीवनाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देण्याबद्दलची भिती याला कारणीभूत असू शकेल. जर दुसऱ्यामुळे आपणास शांति मिळाली तर ती व्यक्‍ती कधीही ती शांती हिरावून नेऊ शकेल ही शक्यता आपणास अशा स्थितीपासून दूर नेते. या विचारांमध्ये काहीच वावगे नाही. परंतु स्वतःच्या प्रयत्‍नांनी शांति मिळविण्याचे आपले सर्व मार्ग दुसऱ्या गोष्टींवरच अवलंबून आहेत इकडे आपण लक्ष देत नाही हे चुकीचे आहे! आपण सर्वजण संपत्तीच्या जोरावर किंवा आपल्या कुटुंबाच्या बळावर अथवा सामाजिक प्रगतीच्या जोरावर सुख शोधण्याचा प्रयत्‍न करीत आहोत असे दिसून येते. या सर्व प्रयत्‍नांचे मूळ आपल्याहून वेगळे आहे हे सांगण्याची आवश्यकतासुद्धा नाही. थोडक्यात म्हणजे आपणास दुसऱ्यांनी आयती दिलेली शांतता नको असते तर स्वतःच्या कष्टांचा मोबदला म्हणून दुसऱ्यांनी दिलेली शांतता हवी असते! इथे आपण किती श्रम केले आहेत हे ठरविणार कोण? अर्थात जो मोबदला देतो तो! त्यामुळे या विचारसरणीत अशी विसंगती आहे की आपण कष्ट आपल्या क्षमतेनुसार करायचे पण मोबदला दुसऱ्याच्या अपेक्षेनुसार घ्यायचा. या दोन गोष्टींमध्ये सतत सुसंगती राहूच शकत नसल्याने केलेल्या कामाचे योग्य चीज होते का नाही याबद्दलची भिती मनात सतत असते आणि आपल्या सर्व ताणांचे हे एक मूळ आहे.
याउलट समोरील कामे प्रेमाने केली की मनातील प्रेमाच्या अस्तित्वामध्येच आपणास आपल्या कष्टांचा मोबदला मिळालेला असतो! आईने मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपणहून खास स्वयंपाक केला की त्या कृतीमध्येच तीला आनंद प्राप्त झालेला असतो. मग तो स्वयंपाक मित्रांबरोबर जाण्याच्या धुंदीत मुलाने अगदी उपकार केल्यासारखे खाल्ला तरी तीच्या मनाची शांति ढळत नाही. स्वधर्मावर प्रेम करुन कर्मे केली की आपणच स्वतःला मोबदला देतो हे लक्षात घ्या. सर्वसुखाची किल्ली आपल्याच हातात राहते. या दृष्टीने बघितल्यास प्रत्येकाच्या हातात स्वसुखाची गुरुकिल्ली आहे. या सृष्टीची रचनाच अशी केलेली आहे की ज्यातून सर्वांना सदोदित आनंद प्राप्त होऊ शकेल. ही वस्तुस्थिती स्पष्ट करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की : ‘सृष्टीची रचना करतानाच प्रजापति म्हणाले की तुमच्याबरोबरच मी स्वाभाविक यज्ञाची उत्पत्ति केलेली आहे. या यज्ञाचा आधार घेऊन तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार आनंदाला निर्माण करुन त्याचा निरंतर उपभोग घेत रहा (१०).’
आपल्या सुखासाठी आपण अनंत श्रम घेत असतो. अगदी पारमार्थिक क्षेत्रातसुद्धा योगादी साधनांमध्ये वा तीर्थयात्रेंमध्ये वा इष्टदेवताच्या उपासनेंमध्ये कष्ट असतातच. परंतु हे सर्व करुनही आपल्या मनात शाश्वत आनंदाचा झरा वाहत आहे असे दिसून येत नाही. याचे कारण असे की ब्रह्मदेवाने सांगितलेला यज्ञ न करता आपण स्वतःच्या मनाला सुचेल तसे कष्ट करीत असतो. क्रिकेटच्या खेळासाठी हॉकीची स्टीक घेऊन मग मला धावा काढता येत नाहीत असे म्हणण्यासारखी आपली स्थिती आहे. या जगाच्या खेळामध्ये आनंदासाठी काय करायला हवे याचा नियम सृष्टीनिर्मितीक्षणीच ठरविलेला आहे. आणि तो म्हणजे आपला स्वधर्म अतिशय प्रेमाने करणे. हे सोडून अन्यमार्गाने का बरे जावे? स्वधर्म म्हणजे काय हे माहित नाही असा जर तुमचा आक्षेप असेल तर त्याला उत्तर म्हणजे जे तुमच्या समोर आपोआप आलेले कर्म आहे तो तुमचा स्वधर्म आहे असे मानणे. समोरील कर्मे टाळण्यापेक्षा वा त्यापेक्षा अजून फलदायी कर्मांच्या मागे धावण्यापेक्षा त्यांना सकारात्मक रीतीने सामोरे जाण्यातील जो आनंद आहे तो स्वतः उपभोगूनच कळतो. आणि या आनंदातच शाश्वत आनंदाची गुरुकिल्ली आहे असे भगवान म्हणत आहेत. इति.
॥ हरि: ॐ ॥
अध्याय तिसरा (९): 

स्वधर्माबद्दल प्रेम हवे

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
 यज्ञार्थात्कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौंतेय मुक्‍तसंगः समाचर ॥ गीता ९:३ ॥
कुरुक्षेत्रामधून युद्ध न करता निघून जायचा जो निर्णय अर्जुनाने घेतला होता, त्यामागील हेतूंची फोड करताना भगवान श्रीकृष्णांनी कर्म न करण्याने समोरील कर्मांपासून सुटका होईल अशी अपेक्षा धरणे किती फोल आहे हे स्पष्ट करुन सांगितले. मनात वासना जागृत असल्या तर बाह्यकर्मांच्या त्यागाने दांभिकतेशिवाय काही हस्तगत होत नाही असा उपदेश निसंदेहपणे त्यांनी केला. त्यानंतर ते म्हणाले की कर्मांनी असा काय दोष केला आहे की तू त्यांचा स्वीकार करण्यास तयार नाहीस? तुझ्या मनातील संदेहाचे कारण समोरील कर्म नसून मनातील (आत्तापर्यंत सुप्त असलेल्या) मोहाची जाळी आहेत. स्वकीयांबरोबर युद्ध करण्याच्या निमित्ताने तुझ्यात दडून बसलेल्या भावना समोर आल्या आहेत आणि त्यांना तोंड द्यायच्या ऐवजी तू निरोप्याला (म्हणजे युद्धकर्माला) शिक्षा करीत आहेस हे लक्षात घे. जर कर्म करायचेच नसेल तर स्वदेहाचे पालन करण्याची कर्मेसुद्धा तुला सोडायला हवीत आणि त्याला तुझी तयारी दिसत नाही! स्वधर्मानुसार करावयास लागणारी कर्मे समोर आली तर ती निष्ठेने पार पाडणे हे सर्वभूतांचे कर्तव्यच आहे, त्याला पर्याय नाही. आणि निव्वळ कर्मांमुळे कुणीही जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये गुरफटत नाही हे ध्यानात ठेव. कर्मे करीत असताना आपली प्रवृत्ती काय आहे यावर आपण मुक्त आहोत की नाही हे ठरते. वरील श्लोकातून स्वधर्म करीत असताना आपली वृत्ती कशी असावी याचे स्पष्टीकरण देताना श्रीकृष्ण म्हणत आहेत की ‘अरे अर्जुना, यज्ञ करीत असताना आपली जी मनोवृत्ती असते ती सतत जागृत ठेवून समोरील कर्मे कर. बाकी कुठलीही वृत्ती ठेवलीस तर कर्मे बंधनात पाडतील. थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्यातरी मोहाला बळी न पडता मोकळ्या मनाने कर्मे केलीस तर तू मोक्षाला पात्र होशील (९).’
मराठीत एक म्हण आहे: नाचता येईना, अंगण वाकडे. याचा अर्थ असा की स्वतःची कमतरता झाकण्यासाठी आपण कुठलीही सबब द्यायला तयार असतो. कर्मांच्या बाबतीत आपली मनःस्थिती अगदी अशीच असते. कर्मफलाच्या आशेने आपण बंधनात पडतो असे ऐकले की आपण मग कर्मे न करणेच संयुक्तिक आहे असा निष्कर्ष काढतो पण ‘मी फलापेक्षा सोडून कर्मे करीत राहीन’ असे म्हणत नाही. खरे म्हणजे असे म्हणणेच संयुक्तिक आहे. ‘कर्म करणेच थांबवावे’ असे म्हणण्यामागे आपल्या मनात अशी भावना असते की ‘आपण पडलो एक सामान्य माणूस. आपल्याला फलापेक्षा न ठेवता कर्म करणे कसे जमणार? त्यापेक्षा कर्मे न केलेलीच बरी.’ परंतु हा विचार वस्तुस्थितीला धरुन नाही. याचे पहिले कारण म्हणजे वरील विचारसरणीत ‘कर्म न करण्याचा निर्णय घेणे’ हे कर्म आपण केलेले आहे इकडे आपण लक्ष दिलेले नाही. आणि हे “कर्म न करण्याचे कर्म” आपण ‘कर्मबंधनात अडकू नये’ या अपेक्षेने (म्हणजे फलाकडे लक्ष ठेवून!) केलेले असल्याने अधिकच धोकादायक आहे हे आपण बघत नाही. तेव्हा कर्मांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे स्पष्टच आहे.
परंतु आपली दुसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेणे ही होय. लक्षात घ्या की या जगातील भौतिकदृष्टीने सर्वात कनिष्ठ स्थितीतील माणूस आणि सर्वांवर वरचढ असणारा मनुष्य या दोघांमध्ये कर्मफलांकडे लक्ष न देता कर्मे करण्याची क्षमता आहे. म्हणूनच सर्व संत असे म्हणतात की या जगात सर्वांना भगवंताकडे जायची मुभा आहे. वरकरणी पाहता निरपेक्षपणे कर्म करणे कितीही अवघड वाटले तरी सखोलपणे पाहील्यास आपण सर्वजण ते करु शकतो. हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये असलेला एक विश्वास पाहू. तो म्हणजे या जगातील सर्वांना ‘आपण प्रेम करु शकतो’ याबद्दल असलेली खात्री. कदाचित आपणास प्रेम करण्यास योग्य अशी व्यक्‍ती वा तत्व मिळाले नसल्याने आपल्यातील प्रेमाला दृष्यरुप मिळाले नसेल पण इथे मुद्दा आपल्यातील स्वयंभू शक्तीचा आहे. त्या शक्तीचे बाह्यजगात दृष्यरुप दिसते का नाही याचा इथे संबंध नाही. वाचकांनी जरा अंतर्मुख होऊन बघितले तर त्यांना अशी खात्री होईल की योग्य संधी मिळाल्यास प्रेम करणे आपणास सहज शक्य आहे. आणि ज्याला प्रेम करणे जमते त्याला निरपेक्षपणे कर्म करणे जमायलाच हवे कारण प्रेमात याशिवाय दुसरे आहे तरी काय?! ज्या व्यक्‍तीच्या प्रेमात आपण गुंतलेलो आहोत तीच्याकरीता सर्वस्वाचा त्याग करण्याची आपली तयारी नसते काय? कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता आपण आपल्या प्रेमाकरीता कष्ट करायची तयारी ठेवतो आणि त्याचवेळी असेसुद्धा म्हणतो की कर्मफलाच्या अपेक्षेशिवाय कर्मे करणे मला शक्यच नाही!
आपण असे म्हटले पाहीजे की स्वधर्माबद्दल माझ्या मनात प्रेम नाही म्हणून मला ती करणे जमत नाही. प्रेम कुणावर आणि कशावर करावे हे आपणास माहित नाही असे आपण कबूल केले तर योग्य शिक्षकाकडे जाऊन माहिती करुन घेणे हा आपल्या संकटावरील उपाय सहज नजरेसमोर येईल. याउलट मला जमणारच नाही असे म्हटले की पुढील सर्व संभाषणच संपते! अर्जुनाला क्षत्रियधर्माबद्दल प्रेम असते तर त्या प्रेमाकरीता त्याने आपल्या सर्व स्वकीयांचा नाश आनंदाने केला असता. स्वधर्म यज्ञाप्रमाणे करणे म्हणजे निव्वळ स्वधर्माकरीता स्वधर्म करणे होय. असे करण्यासाठी प्रेमाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि समोरील कर्मांकडे प्रेमाने पहावयाचे असेल तर त्यांच्यामागे प्रत्यक्ष भगवंताचा हात आहे असा विश्वास आपण जागृत ठेवायला हवा. हा विश्वास उत्पन्न होण्यास संतसाहीत्य आणि संतचरीत्र यांचा डोळस अभ्यास आपण करायला हवा. ‘माझ्यात क्षमता नाही’ हे रडगाणे थांबवून प्रत्यक्ष कृती करायला हवी. हे ज्यांना जमले त्यांना सर्व साधले.
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा (८):

 स्वधर्माला पर्याय नाही

                  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्‍ध्येदकर्मणः ॥ गीता ८:३ ॥
आपल्या जीवनातील कधी मानसिक अस्तित्वाला तर कधी सामाजिक रुपाला सोयीस्करपणे महत्व देत समोरील आणिबाणीचा प्रसंग पुढे ढकलण्यात समाधान मानण्याचा दांभिकपणा गेल्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवून दिला. दुय्यम दर्जाचा माल विकणारा एखादा हुशार विक्रेता कुठलीतरी सबब शोधून समोरील ग्राहकाच्या तक्रारीला ज्याप्रमाणे टोलवितो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक कसोटीच्या क्षण तात्पुरता उपाय शोधून आपण पुढे ढकलतो. डोके दुखत आहे ना? एक गोळी घ्या. नक्की कुठल्या कारणाने डोके दुखत आहे याची कशाला माहिती हवी? आत्ताचे काम झाले ना, मग पुरेसे आहे! परंतु आयुष्यभर समोरील कचरा बाजूला ढकलत बसल्याने कधीतरी शेजारील जागा पूर्णपणे भरुन इतक्या सर्व दिवसांचा तो कचरा शेवटी आपल्या अंगावरच जसा येतो त्याचप्रमाणे आपणासमोर आत्तापर्यंत टाळलेली उदासीनता अचानक येते. बाह्य दृष्टीकोनातून आपले जीवन सुरळीत चाललेले आहे असे दिसत असूनही जीवनातील रस अचानक निघून जातो याचे कारण आत्तापर्यंत आलेल्या छोट्या दुःखांकडे कधीही सखोल नजरेने बघितलेले नाही हे आहे. भगवान कधीही कुणावर कारणाशिवाय दुःखाचा प्रसंग आणत नाही. आणि समोर आलेला कसोटीचा क्षणही अगदी जेव्हढा बिकट असावा तेव्हढाच असतो! जर आपण त्यातून योग्य धडा शिकलो नाही तर आणि तरच पुढील संकट येते आणि साहजिकपणे ते आधीपेक्षा अधिक दुःखदायक असते, कारण त्यापेक्षा कमी दुःखाबाबतची आपली असंवेदनाशीलता आपण पूर्ववर्तनावरुन स्पष्ट केलेली असते! अर्जुनासमोर कुरुक्षेत्रावरील संदेहाचे संकट समोर आले कारण युद्धभूमीवर यायच्या आधी कौरवांच्या हातून हजारो दुःखद अनुभव सोसूनही अजून त्याने आपल्या कुळाचा मोह संपूर्ण सोडला नव्हता. लक्षात घ्या की दुःख तेव्हाच सामोरे येते जेव्हा आपणास सुख म्हणजे काय याची पूर्ण जाणीव झालेली असते. वस्तुस्थिती अशी आहे की आनंद हा मूळातच अत्यंत स्वयंभू असल्याने त्याचे समीकरण कुणीही मांडू शकत नाही. म्हणूनच पैसा असला तर सुख मिळेल असे वाटले की कित्येक श्रीमंत माणसे दुःखी दिसतात, शारीरीक स्वास्थ्यात आनंद आहे अशी समजूत झाली की तारुण्याच्या उभारीत आक्रोश करणारे युवक डोळ्यासमोर येतात आणि पाठीमागे समर्थ आधार असला की जीवनाचे सार्थक झाले अशी खात्री पटली की आपल्या सद्‌गुरुंचे प्रेम लाभूनसुद्धा दैनंदिन जीवनात सुखी नसलेले साधक दृष्टीपत्यास येतात. अहो, या जगाच्या इतिहासात अशी एकही व्यक्‍ती दिसून येत नाही की जीने सुखाचे एक निश्चित समीकरण मांडले आहे. सर्व शास्त्रांचा आधार असलेले वेदसुद्धा सच्चिदानंद भगवंताबद्दल ‘हे नाही, हे नाही’ असेच म्हणतात, नक्की काय आहे हे सांगू शकत नाहीत!
सांगायचा मुद्दा असा आहे की सर्वसाधारण साधकाप्रमाणेच अर्जुनानेसुद्धा आपल्या नातेवाइकांशी लढण्याचा दुःखद प्रसंग आल्यावर त्यावर मूलभूत उपाय शोधण्यापेक्षा युद्धभूमीवरुन पलायन करण्याच तात्पुरता पर्याय शोधला. परंतु काही संकटे अशी असतात की त्यावर मूलभूत उपाय शोधावाच लागतो. उदाहरणार्थ, एक-दोनदा डोके दुखले तर अ‍ॅस्पिरीनची गोळी घेणे योग्य ठरते परंतु महीनोंमहीने दररोज डोके दुखायला लागले की डॉक्टरांमार्फत सर्व चाचण्या करुन डोकेदुखीचे मूळ कारण शोधणे भाग पडते. अर्जुनासमोर श्रीकृष्णांसारखा समर्थ वैद्य असल्याने त्याला तात्पुरते औषध न मिळता, कुठल्याही चाचणीशिवाय गीतारुपी अमृताची मात्रा मिळाली! त्यामुळे दांभिकपणा म्हणजे काय याचा पहिला धडा त्याला दिल्यावर भगवान श्रीकृष्ण त्याला कर्म सोडून देणे कसे अशक्य आहे अधिक स्पष्ट करुन देताना म्हणतात की: (अर्जुना) तू आपले विहीत कर्म कर. निव्वळ अट्टाहासाने कर्म सोडून देण्यापेक्षा समोर आलेले कर्म करणे कधीही श्रेयस्कर आहे. आणि तसे पहायला गेले तर आपल्या शरीराच्या अस्तित्वाला जपण्यासही कर्मांची आवश्यकता आहेच. त्यामुळे कर्म करणे सोडून दिले तर शरीरही जिवंत राहणार नाही. (८)
अर्जुनाने युद्ध न करण्याचा विचार केला तेव्हा त्याच्या डोक्यात फक्‍त कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग होता. परंतु भगवंतांची विचारसरणी बाह्य आवरणापुरती मर्यादीत नसल्याने त्यांनी अर्जुनाला त्याच्या उपायामागील मूलतत्व काय आहे हे इथे स्पष्ट केले आहे. युद्ध न करणे म्हणजे समोरील कर्म न करणे. मग ते आवडते कर्म असो वा नावडते! आणि कर्मच करायचे नाही तर श्वासोच्छवास करणेसुद्धा सोडायला हवे. तात्विकरीत्या देह सांभाळायला केलेली कर्मे आणि सुखाच्या प्राप्तीकरता केलेली कर्मे यात काहीही फरक नाही हे भगवंतांना इथे सुचवायचे आहे. भिन्न कर्मांतील फरक त्यांच्या ठराविक रुपांमध्ये असतो. ‘कर्म करणे’ या तत्वात त्याने फरक पडत नाही. बागेतील माळीसुद्धा कर्म करतो आणि अत्यंत आधुनिक विमानाचा वैमानिकही कर्मच करतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की माळ्याने वैमानिकाचे काम करावे आणि वैमानिकाने बागकाम करावे! यात दोघांचीही चुकी आहे. ज्याप्रमाणे शरीर जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे स्वधर्माचे पालन करणेसुद्धा प्रत्येक जीवाला अपरिहार्य आहे. अहिंसा या उच्च तत्वाकडे दुर्लक्ष करुन सिंहाने शिकार करायलाच हवी आणि कुलसंरक्षणाचे तत्व विसरुन अर्जुनाने युद्ध करायलाच हवे. आपल्या मनातील भावनांच्या प्रभावाखाली आपण कुठलीतरी कर्मे आनंदाने करतो तर काही करायचे टाळतो. हे सर्व बिनमहत्वाच्या कर्मांबाबत चालू शकते परंतु स्वधर्म पाळताना आपल्या भावनांची कदर करणे योग्य ठरत नाही. आपल्या जीवनात सर्वात महत्वाची आणि परमहितकारी वस्तू काय आहे तर स्वधर्म आणि स्वतःचे हित साधताना भावनेला थारा दिला नाही पाहीजे. खरा खेळाडू आज जावेसे वाटत नाही अशी सबब न देता दररोज सकाळी लवकर उठून सरावाला जातो आणि मगच आपल्या खेळात तरबेज होतो. त्याचप्रमाणे आपल्या भावनांना नक्की कुठपर्यंत महत्व द्यायला हवे हे आपणास कळले पाहीजे. भावनांना मर्यादा ओलांडायची परवानगी दिली की स्वहितकारक असलेले स्वधर्माचे गांडीव धनुष्य आपल्या हातून गळालेच असे समजा! परंतु नुसता स्वधर्म करुन भागत नाही. स्वधर्माने वागताना अंतर्गत मानसिक अवस्था कशी असावी यालाही निर्बंध आहेत आणि ही ग्यानबाची मेख भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात अर्जुनाला स्पष्ट करुन सांगतील. ते आपण पुढे बघू. इति.
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा (६ आणि ७): 

दांभिकपणाच्या सापळ्यात सापडू नका

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ ।
इंद्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ गीता ६:३ ॥
यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेंद्रियैः कर्मयोगमसक्‍तः स विशिष्यते ॥ गीता ७:३ ॥
भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात संदेह उत्पन्न झाला. त्या संदेहातून उत्पन्न झालेल्या त्याच्या ‘कामनाविरहीत होणे जर योग्य असेल तर मला युद्धकर्मात का लोटता आहात?’ या प्रश्नाने गीतेच्या तृतीय अध्यायाला प्रारंभ होतो. या प्रश्नाचे उत्तर म्हणून त्याला भगवंत सुरुवातीला असे म्हणतात की नुसत्या बाह्य कर्मांचा त्याग केला म्हणून कर्मबंधांपासून सुटका होत नाही. आणि जोपर्यंत आपण त्रिगुणात्मक प्रकृतीच्या कचाट्यात सापडलेलो आहोत तोपर्यंत कर्मे केल्याशिवाय एक क्षणदेखील आपण स्वस्थ राहू शकत नाही. आता, वरील श्लोकांद्वारे ते आपल्या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण देत आहेत. भगवान असे म्हणत आहेत की: ‘कर्मेंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर ठेवून जो मनात विषयसुखाबद्दल आस्था ठेवतो तो अत्यंत मूर्ख आहे आणि त्याचे आचरण म्हणजे निव्वळ दांभिकपणा आहे (६). ज्याच्या मनातून विषयसुखाची ओढ गेल्याने ज्याची कर्मेंद्रिये नियमित झालेली आहेत आणि जो (इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवण्याचा आग्रह न धरता) प्राप्त कर्मे असक्‍तपणे करतो त्याला श्रेष्ठ समजणे उचित आहे (७).
आपले अस्तित्व दोन रुपांत आपणासमोर येते. पहिले रुप म्हणजे आपले बाह्य जगातील अस्तित्व आणि दुसरे रुप म्हणजे फक्‍त आपणास जाणविणारे मनोविश्वातील व्यापार. ज्याप्रमाणे एखादा सरडा कुंपणझुडुपावर भक्ष्याच्या आशेने सतत वरखाली फेऱ्या मारत असतो त्याचप्रमाणे आपण सुखाच्या शोधात या दोन रुपांत, गाढ झोपेतील सुषुप्तावस्था सोडून, निरंतर येरझाऱ्या घालत असतो. स्वतःबद्दल जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकार करतो (उदाहरणार्थ, मी चांगला आहे, लोकोपयोगी आहे इत्यादी) तेव्हा खरे म्हणजे आपण स्वतःच्या या दोन्ही अस्तित्वांकडे बघून आपला निष्कर्ष योग्य आहे की नाही याची तपासणी करायला हवी. परंतु बहुतांशी माणसे सोयीस्करपणे हव्या त्या रुपाकडे बघून स्वतःचे अनुमान योग्य आहे असे ठरवून आपलीच फसवणूक करतात. या दारुण वस्तुस्थितीचे दृष्य रुप म्हणजे मनात इच्छा नसताना कुणास मदत करावी लागली तरी आपण खुशाल शाबासकी घेतो आणि दुसऱ्याला त्रास होईल असे बाह्यवर्तन केले तरी ‘माझ्या मनात त्याला मदतच करायचा विचार होता, परंतु जमले नाही त्याला काय करणार?’ या सबबीमागे लपतो. पहिल्या उदाहरणात आपण बाह्य जगातील अस्तित्वाला महत्व दिले आणि दुसऱ्यात मानसिक घडामोडींना. आपल्या विचारपद्धतीला असा सोयीस्कर विचार करायची इतकी सवय लागलेली आहे की स्वतःच्या मोठ्या चुकासुद्धा कशा बरोबर आहेत याबद्दल आपण सहज स्पष्टीकरण देऊ शकतो. अर्जुनाने जेव्हा मला युद्धकर्मात का लोटत आहेस असे विचारले तेव्हा त्याने स्वतःचे बाह्य रुपच डोळ्यासमोर ठेवले होते. परंतु कुरुक्षेत्रावरील युद्ध सोडून देऊन तो जर द्रौपदीसमोर गेला असता तर तीच्या प्रतिक्रियेंनी त्याच्या मनात विचारांचे वादळच उठले असते. कारण त्याने अजून आपल्या पत्नीच्या इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे या विचाराला दूर केले नव्हते! परंतु भावनेच्या आहारी गेल्याने त्याला या वस्तुस्थितीची जाणीव झाली नाही. कुरुक्षेत्रावरील युद्धाचा त्याग करणे ही क्रिया त्याला फक्‍त शारीरिकरीत्या करणे शक्य होते, मनोविश्वात नव्हे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याला दांभिकपणा करु नकोस असे सांगितले. निव्वळ समाजामध्ये बाह्य कर्मे केली तर त्यामुळे आपले संपूर्ण अस्तित्व बदलत नाही. त्यामुळेच वर्षोनुवर्षे गुरुपोनिर्दिष्ट साधना करुनदेखील साधकाच्या मनातील कामनांचा क्षय होतोच असे दिसत नाही.
परंतु भगवंतांच्या उपदेशाचे पालन करण्याची इच्छा अर्जुनाच्या मनात होती त्याचे काय? जर युद्ध करणे थांबवायचे नसेल तर अर्जुनासमोर आपल्या या इच्छेची पूर्तता करण्यास कुठला मार्ग उपलब्ध आहे? या प्रश्नांचे उत्तर म्हणून भगवंतांनी त्याला सांगितले की मनात स्वरुपानुसंधान नित्यजागृत ठेव. तुझ्या या कृतीने माझ्या द्वितीय अध्यायातील सल्ल्याचे पालन होईल. मग बाह्यजगातील अस्तित्वात तू जे कर्म समोर येईल ते निष्कामपणे करु शकशील. आपले मन एकावेळी एकाच गोष्टीचा विचार करु शकते. म्हणूनच मनाला अतिशय चंचलतेचा गुण प्रदान केला गेला आहे. त्या चंचलतेमुळे ते एकाच गोष्टीत न अडकता आपल्यासमोरील सर्व गोष्टींकडे ‘एकावेळी एकच’ या नियमात राहूनसुद्धा लक्ष देऊ शकते. परंतु स्वरुपाच्या ध्यानात जर मनाची नैसर्गिक चंचलता लोप पावली तर आपणास त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचणार नाही. आणि अशावेळी आपल्या हातून होणारी कर्मे प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे होतील आणि त्यांच्या बंधनांत आपण अडकणार नाही. स्वतःचे मन अतंर्यामी भगवंतावर दृढपणे ठेवून जो सर्व कर्मे प्रतिक्षिप्त क्रियेंप्रमाणे (reflex actions) करतो त्याला कर्मयोगाचे मर्म कळले आहे आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे असे भगवान म्हणत आहेत.
साधकाने गुरुंनी सांगितलेल्या उपदेशाचे सतत चिंतन आणि मनन केले पाहीजे. बाह्यजगात काही ठराविक कर्मे जबरदस्तीने करुन त्यांच्या उपदेशाचे संपूर्णपणे पालन होत नाही. कर्मबंधांतून सुटायचे असेल तर मन निर्मळ असणे जरुरी आहे. मनाला अहंकाराचा थोडासा डाग जर लागलेला असेल तर आपण कर्मयोगी बनणे अशक्य आहे असे भगवान आपणास सांगत आहेत. मनात स्वतःच्या संकुचित अस्तित्वाबद्दल प्रेम ठेवून आपल्या शरीराला बाह्यकर्मांनी कष्ट देणे म्हणजे दांभिकपणा होय. आपणा सर्वांना हे ठाऊक आहे की जशी किंमत मोजतो त्याचप्रमाणे आपणास वस्तू प्राप्त होते. त्यामुळे दांभिकपणा करुन काहीतरी पवित्र प्राप्त होईल अशी कल्पनासुद्धा आपण करु शकतो का? परंतु स्वतःच्या दांभिकतेकडे दुर्लक्ष झाल्याने आपणास असे वाटते की मनाविरुद्ध गुरुंची साधना केली तरी आपली प्रगतीच होणार आहे! मनाविरुद्ध अभ्यास केला तरी परीक्षेत गुण मिळतात हे करे असले तरी परमार्थात हा नियम लागू पडत नाही. लक्षात घ्या की मनात प्रेम नसताना साधना करणे म्हणजे मिठाशिवाय स्वयंपाक करणे आहे. त्याने सर्व जीवन अळणी बनून ना आपणास फायदा होतो, ना जगाला. असो.
॥ हरिः ॐ ॥

 अध्याय तिसरा (४ आणि ५):

कर्मांतून सुटका म्हणजे काय?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ गीता ४:३ ॥
न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ गीता ५:३ ॥
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मागील श्लोकात सांगितले की ज्ञानयोगी बनणे जरी जीवनाचे अंतिम ध्येय असले तरी ते लगेच हस्तगत होईल असे नाही. आषाढी वारीस आळंदीहून प्रस्थान होत असतानाच आपणास पंढरपूरच्या विठोबाकडे जायचे आहे हे माहीत असले तरी आधी पुणे, फलटण इत्यादी पल्ले गाठावे लागतात त्यानंतरच पंढरीला पाय लागतो. त्याचप्रमाणे ज्ञानयोगी बनण्यासाठी मनाची भगवंतावर निश्चळ निष्ठा असणे पुरेसे आहे हे कळले तरी ती मानसिक स्थैर्यता मिळविण्यासाठी कर्मयोगाची वाट आपणास चोखाळावी लागते. आणि ज्याप्रमाणे वारी करताना माउलींच्या पालखीचा रस्ता संपूर्णपणे माहीत असणे जरुरी असते त्याचप्रमाणे आपणास कर्मयोग म्हणजे काय याचे ज्ञान असणे जरुरी आहे. कर्मयोगाची फलश्रुती म्हणजे स्वतःचे निर्गुण अविनाशी अस्तित्व दिसून त्यावरील आपले ममत्व वृद्धींगत होणे. एकदा स्वरुपाला जाणून घेतले की आपल्या संकुचित अहंकाराचा लोप होऊन आपण वैश्विक एकात्मता पाहण्यात रंगून जातो. आणि आपल्या देहाद्वारे भगवंत कुठल्या क्रिया घडवून आणत आहेत हे कळले तरी उदासीन राहतो. या अवस्थेची ओढ अर्जुनाला साहजिकपणे लागली कारण सध्या समोर असलेले युद्ध लढणे त्याला नको होते. परंतु एखादी गोष्ट नको आहे म्हणून तीचा त्याग केला तर ती दान केली असे आपण म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनाविरुद्ध कर्म करणे भाग पडत असले तर ते न करणे म्हणजे ज्यामुळे समाधि प्राप्त होते असा संन्यास होत नाही. कारण आपल्या अशा त्यागाचा पाया संकुचित अहंकार आहे, मनाला सांभाळणे हे आहे. अशा कुचकामी पायावर स्थितप्रज्ञरुपी भव्य इमारत उभी राहू शकत नाही! त्याशिवाय दुसरा मुद्दा म्हणजे मी ठराविक कर्मे करणार नाही हा आपला आग्रहसुद्धा एक कर्मच आहे की! त्यामुळे अशा पळपुटेपणाने आपण कर्मत्याग न करीता फक्‍त कर्मनिवड करीत आहोत असे दिसून येते. वरील श्लोकांतून भगवान अर्जुनाला या सत्याची जाणीव करुन देत आहेत असे वाटते. ते म्हणत आहेत की: कर्म न करण्याने कर्मांपासून सुटका प्राप्त होते असे नव्हे. निव्वळ कर्मांचा त्याग करण्याने कधीही साम्यावस्था प्राप्त होत नाही (४). अरे, जीवनातील एक क्षणही असा नाही की ज्यात कर्म करणे थांबले आहे. जोपर्यंत प्रकृतिच्या सात्विक, राजसिक आणि तामसिक या त्रिगुणी पाशांमध्ये आपण अडकलेलो आहोत तोपर्यंत आपल्याहातून कर्म हे घडणारच. (५)
लक्षात घ्या की आलस्याने कर्म करण्याबद्दल विरक्ती येणे आणि मनातील तटस्थतेमुळे कर्मांबद्दल उदासीन असणे यांमध्ये जमीन आणि अस्मान इतका फरक आहे. त्याचप्रमाणे गोष्टीचा तिटकारा येऊन त्याग करणे आणि तीच्या अस्तित्वाबद्दल तटस्थ असल्याने ती आपोआप आपल्या हातून गळून जाणे या दोन गोष्टींची तुलनासुद्धा हो‍उ शकत नाही. मनात निरंतर स्वरुपाचे ध्यान असले की आपण प्रकृतिच्या त्रिगुणी खेळापासून मुक्त होतो आणि फक्त तेव्हाच आपल्या हातून कर्म घडत नाही. जोपर्यंत आपण सत्व-रज-तम यापैकी एका गुणात अडकलेलो आहोत तोपर्यंत ते गुण आपल्याकडून कुठलेना कुठले कर्म करुन घेणारच असे भगवान म्हणत आहेत. कर्मबंधांतून मुक्त व्हायचे असेल तर आपणास स्वतःच्या स्वयंभू, अविनाशी अस्तित्वाचे ज्ञान व्हायला हवे (पहा: गीता श्लोक २१, अध्याय २). त्याशिवाय कर्मांचा त्याग घडणे अशक्य आहे. अर्जुनाला युद्ध करु नये असे वाटले त्याचे कारण त्याला स्वरुपाचे ज्ञान झाले असे नसून स्वतःच्या नातेवाईकांच्या संभाव्य मृत्यूची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली हे आहे. याचा अर्थ असा की कर्मत्याग करण्याची त्याची तयारी ज्ञानावर आधारीत नसून मायेवर अवलंबून आहे. स्वतःच्या नकळत मायेच्या अतर्क्य खेळामध्ये तो अजूनच गुरफटला जात आहे! आणि ही गोष्ट आपणा सर्वांच्या जीवनात वारंवार दिसून येते. जी माणसे निव्वळ व्यावहारीक जीवनात यशस्वी होण्यात धन्यता मानतात त्यांची गोष्ट सोडूनच द्या. अशी माणसे अगदी स्पष्टपणे प्रकृतिच्या राजसिक गुणात अडकलेली आहेत. जी माणसे सतत आळशीपणाने कर्मे टाळतात ती तामसिक गुणाच्या आधीन आहेत हे दिसून येते. परंतु या दोन्हीपेक्षा सूक्ष्म बंध सात्विक गुणाचे आहेत. स्वतःला कष्ट झाले तरीसुद्धा दुसऱ्यांना मदत करण्याचा अट्टाहास ज्यांनी घेतला आहे तेसुद्धा अजून प्रकृतिच्या बंधातच आहेत हे लक्षात घ्या. स्वतःच्या देह-मनावर आधारीत असलेला कुठलाही अट्टाहास चुकीचा आहे हे ध्यानात घेणे जरुरी आहे.
सध्या आपली विचारसरणी स्वतःच्या मनातील विचार व आपल्या बुद्धीची झेप यावर संपूर्णपणे अवलंबून आहे. या दोन गोष्टींशिवाय जीवन जगण्यास आपणास दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. कर्मयोगाने आपणास जीवन जगण्यास एक नवीन पर्याय दिसून येतो. आपणास “प्रत्येक कर्म हे ते करण्यातच समाप्त होत आहे” याची निःसंदेह जाणीव होणे हे कर्मयोगाचे अंतिम फल आहे. सध्या वरकरणी दिसणाऱ्या कार्यकारण भावात आपण गुंतलेलो आहोत. उदाहरणार्थ, आज आपण परीक्षेत गुण मिळाले म्हणून चांगली नोकरी मिळाली असे म्हणतो आणि त्या नोकरीमुळे जीवन व्यवस्थित चालू आहे असा निष्कर्ष काढतो. आणि आपल्या इतकेच गुण मिळविलेल्या मुलाला आपल्यासारखी नोकरी मिळत नाही आणि आपल्याहून अधिक मानाची चाकरी करणारा सुखी दिसत नाही या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. सध्या केलेल्या एका कर्मातून दुसरे कर्म निघत आहे असे आपण समजतो कारण त्यातून आपणास जीवनावर ताबा मिळविला आहे असे वाटते. परंतु स्वतःचा जीवनावर ताबा आहे असे समजणे हे निव्वळ अहंकाराचे लक्षण आहे हे आपणास कळत नाही. कर्मांची एक शृखला आपण निर्माण केली असल्याने आपण त्यात स्वतःला बांधून घेतो. एकदा या माळेतून कर्मे मुक्त झाली की आपले मन भुतकाळांतील कर्मामध्ये अडकत नाही आणि आत्ता समोर आलेले कर्म स्वयंभू आहे, भगवंतमय आहे याची जाणीव आपणास होते. हे ज्ञान होण्यास समोरील कर्मांना योग्य मनोभूमिका ठेवून सामोरे जाणे जरुरी आहे. त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर जाणे संपूर्णपणे चुकीचे आहे. आणि हाच सल्ला भगवान वरील श्लोकांतून अर्जुनास देत आहेत. इति.
॥ हरिः ॐ ॥
 अध्याय तिसरा (३):

ज्ञानयोगाची पूर्वतयारी

 ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
श्रीभगवानुवाच –
लोकेऽस्मिन्‌ द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ गीता ३:३ ॥ 

गीतेच्या तॄतीय अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या मनातील शंकेने होते हे आपण गेल्या वेळी बघितले. भगवंतांच्या सांगण्याकडे त्याने आपल्या पूर्वग्रहदूषित नजरेने बघितल्याने त्याच्या मनात भगवान श्रीकृष्णांच्या वक्तव्याने संदेह निर्माण झाला होता. परंतु मनातील श्रीकृष्णांबद्दल असलेल्या पराकोटीच्या आदराने तो अत्यंत संभ्रमित अवस्थेतही असे म्हणाला की ‘तुम्हीच आता असा उपदेश करा की त्यायोगे मी नक्की कसे वागायला हवे हे मला सुनिश्चितपणे कळेल.’ द्वितीय अध्यायाच्या सुरुवातीला केला होता तसा आपलेच म्हणणे खरे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास अर्जुनाने इथे केलेला नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्याच्या अध्यात्मिक प्रगतीचे हे एक लक्षण आहे. संतांची वक्तव्ये आपल्यासारख्यांना पूर्णपणे कळणे शक्य नाही, पण म्हणून निराश न होता वा त्यांच्याशी वादविवाद न करीता आपण अर्जुनाप्रमाणेच त्यांना अशी विनवणी केली पाहिजे की तुम्हीच तुमचा सल्ला मला कळेल अशी कृपा करा! असो. अर्जुनानी योग्य मनोभूमिका ठेवून विचारलेल्या प्रश्नावर भगवान त्याला परत एकदा समजाऊन सांगायला लागले: ‘मी तुला आधीच युद्ध कर असे सांगितलेले आहे. परंतु युद्ध करण्याच्या क्रियेचा हेतू निव्वळ हस्तिनापुराचे राज्य प्राप्त होईल एवढा संकुचित ठेऊ नकोस हे स्पष्ट करण्याकरीता मी तुला जीवनाच्या अंतिम ध्येयाचेसुद्धा दर्शन घडवून दिले. “अरे अर्जुना दोन तऱ्हेच्या निष्ठांबद्दल मी तुला आधीच सांगितला आहेत. बुद्धीने या जगातील चोवीस तत्वांना आधार असलेले पंचविसावे तत्व म्हणजे मी अशी प्रज्ञावंतांची निष्ठा असते (सांख्ययोग) तर ज्यांना व्यावहारीक कर्मांमध्ये रस आहे त्यांच्याकरीता कर्मयोगरुपी निष्ठाच असते (आणि त्यांनी तशीच भक्ति करणे योग्य आहे) (३)”.’
ज्याप्रमाणे आपण अर्जुनाकडे साधकांचे रुपक म्हणून बघू शकतो त्याचप्रमाणे गीतेमधील श्रीकृष्ण हे सद्‌गुरुंचे अतिशय समर्पक रुपक आहे असे वाटते. सबंध गीतेमध्ये त्यांच्या मनातील अर्जुनाच्या पारमार्थिक प्रगतीबद्दलचा कळवळा आणि त्याच्या मनातील मोहाने उत्पन्न झालेल्या भावनांच्या आंदोलनांबद्दलची कठोर उपेक्षा सतत दिसून येते. युद्ध केल्याने तुझ्या कुळाला अखंड ऐश्वर्य प्रप्त होईल आणि आपल्याच नातेवाईकांची हत्या केल्याचे जे काही पाप असेल ते मी माझ्या डोक्यावर घेईन असे सांगून अर्जुनास युद्धास उद्युक्त करणे त्यांना सहज शक्य होते. परंतु हा सोपा मार्ग न निवडता त्यांनी अर्जुनाच्या मनातील मोहाला नष्ट करणे योग्य समजले यातून त्यांचा परमकृपाळू स्वभाव दिसून येतो. ज्याप्रमाणे उदार दात्याची परीक्षा त्याने किती मूल्यवान वस्तू दान दिली यावरुन होतो त्याचप्रमाणे कृपाळूपणाचा सर्वोच्च निकष म्हणजे समोरील मानवाच्या जीवनातून सर्व दुःखांचे मूळ म्हणजे मोह याचा नाश करणे हा होय. आपले सद्‌गुरुसुद्धा निरंतर याच प्रयत्‍नात असतात.
आपले मन एखाद्या अतिशय हट्टी मुलाप्रमाणे असते. अशा मुलाच्या दैनंदिन जीवनात जोपर्यंत एखादी इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत तो अगदी आदर्श मुलासारखाच वागतो. त्याच्या मनात पालकांबद्दल आदरही असतो. परंतु कुठल्यातरी इच्छेने त्याच्या मनात ठाण मांडले की त्याचे स्वरुप एकदम बदलते. मग आपल्या हट्टाने जगामध्ये कितीही उलथापालट झाली तरी आपले म्हणणे तो सोडत नाही. कुठलीही समजुत वा तडजोड त्याला मान्य होत नाही. त्याच्या आकांडतांडवाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे किंवा त्याच्या मागणीला पूर्ण करणे हे दोनच उपाय आपल्यासमोर असतात. या वर्तनामध्ये आणि मनाच्या वागण्यात किती साम्य आहे ते बघा. बहुतांशी वेळा, विशेषतः सद्‌गुरुंच्या सान्निध्यात (त्यांच्या प्रभावाने) आपले मन अगदी मवाळ होऊन स्वतःच्या सर्व मागण्या सोडून देऊन आदर्श मुलाप्रमाणे वागते. आणि मनाचे खेळ थांबल्यामुळे सद्‌गुरुंची सर्व वक्तव्ये आपणास हस्तगत होतील असे आपणास वाटू लागते. कारण पारमार्थिक ध्येय प्राप्त न होण्यास केवळ मानसिक भावनांचे खेळच कारणीभूत असतात, माउलींनी म्हटलेले आहेच की: ‘तैसे मन हे मुद्दल जाये । मग अहंभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७:५ ॥’ त्यामुळे सद्‌गुरुंनी ‘दररोज ठराविक वेळ श्रीज्ञानेश्वरी वाच’ असे म्हटले की लगेच ‘हो वाचीन की!’ असे उत्तर देतो आणि ‘सकाळी लवकर उठून ध्यान कर’ असे ऐकल्यावर ‘हो जर मी दररोज साडेसहाऐवजी सहाला उठीन आणि निश्चितपणे अर्धातास ध्यान करीन’ असे म्हणतो. आणि ‘व्यावहारीक प्रगती सहजपणे जेव्हढी होईल तेव्हढीच होऊ दे. उगाच जीवाचा आटापिटा करु नकोस’ या उच्चारांना निःसंदेह मान्यता देतो! परंतु जेव्हा गुरुगृहातून आपल्या घरी परत येतो आणि नेहमीच्या वेळेला चहा मिळत नाही तेव्हा मनामध्ये चहा पिण्याची आत्यंतिक इच्छा निर्माण होऊन आपला संताप आवरेनासा होतो आणि काही वेळापूर्वी मान्य केलेल्या सर्व सूचनांचे उल्लंघन होते. आपल्या मनातील भावनांकडे दुर्लक्ष करणे नव्वद टक्के आपणास जमते परंतु त्याचे कारण आपली साधनेतील प्रगती नसून मनामध्ये अजून हट्ट निर्माण झालेला नसतो हे असते. जेव्हा उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये मनात कुठलीतरी आत्यंतिक इच्छा निर्माण होते तेव्हा आपण त्याच्या हट्टापुढे हात टेकतो.
अशा दृष्टीने बघितल्यास पारमार्थिक जीवनाच्या परीक्षेत आपण जास्तीत जास्त नव्वद टक्के गुण मिळवितो असे आपण म्हणू शकतो. आणि या परीक्षेची गंमत अशी असते की एकतर तुम्ही शंभर टक्के मार्क कमावून पास होता वा संपूर्ण नापास होता! भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी माणसाची लक्षणे सांगून झाल्यावर भगवान म्हणतात ‘अज्ञानम्‌ यदतो अन्यथा (गीता ११:१३)’ असे म्हणत. याचा अर्थ असा होतो की जे ज्ञान नाही ते अज्ञान आहे. इथे तुम्ही पंचवीस टक्के ज्ञानी झालात किंवा आता जवळ-जवळ संपूर्ण ज्ञानी झाला आहात असे कुठेही म्हटलेले नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान असते आणि अचानक दिवा लावल्यासारखे आपण संपूर्ण ज्ञानी होतो असे इथे अध्यारुत आहे. व्यावहारीक जीवनात अशी टोकाची भूमिका कधीच दृष्टीपत्त्यास पडत नसल्याने आपण आपल्या नव्वद टक्क्यांवरच खूश राहतो. त्या नवद टक्क्यांचे शंभर टक्के करणे अपरीहार्य आहे हे आपणास कळत नाही. कर्मयोगाद्वारे आपण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात येण्याचा प्रयत्‍न करु शकत असल्याने भगवान अर्जुनाला कर्मयोग संपूर्णपणे विषद करुन सांगणार आहेत. ते कसे हे आपण पुढे बघूच!
॥ हरिः ॐ ॥
 अध्याय तिसरा (१ आणि २):

 तटस्थपणा म्हणजे निष्क्रियता नव्हे


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
अर्जुन उवाच –
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ गीता १:३ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहसयीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ गीता २:३ ॥

गीतेच्या द्वितीय अध्यायाच्या अंती भगवंतांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली. निरंतर आत्मानुसंधानात असल्यामुळे स्वतःच्या मनातील इच्छांकडे तटस्थपणे जो बघत असतो त्याची बुद्धी पूर्णपणे विकसित झाली आहे असे त्यांनी म्हटले. त्यातून ‘मानवाच्या जीवनात अशी स्थिती असणे हे खऱ्या पुरुषार्थाचे लक्षण आहे’ असे भगवान श्रीकृष्णांना म्हणावयाचे आहे ही गोष्ट चाणाक्ष अर्जुनाच्या लगेच लक्षात आली. भगवंतांच्या या वक्‍तव्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा त्याने स्वतःच्या आयुष्याकडे बघितले तेव्हा त्याला असे जाणविले की भगवान त्याला स्वतःच्या मनातील हस्तिनापूराचे राज्य आणि आपली प्रतिष्ठा परत मिळवायच्या इच्छेकरीता युद्ध करण्यास उद्युक्त करीत आहेत. जर स्वतःच्या इच्छांकडे दुर्लक्ष करावयाचे असेल तर त्यांच्या पूर्तीकरीता आपले व इतरांचे आयुष्य पणाला लावणे कसे योग्य ठरेल ही शंका त्याच्या मनात आली. आणि भगवद्गीतेचा तृतीय अध्यायाचा प्रारंभ त्याच्या मनातील या शंकेने होतो. वरील श्लोकांतून अर्जुन असे म्हणत आहे की: ‘भगवंता, जर नुसते कर्म करण्यापेक्षा बुद्धि भगवंतापाशी अनन्यतेने स्थिर ठेवणे श्रेयस्कर असेल तर आपण मला युद्धरुपी घोर कर्मात का लोटता आहात?(१). तुमच्या अशा दुतोंडी व्यवहाराने (सांगायचे एक आणि करायला दुसरेच लावावे) माझी बुद्धि अजूनच भ्रमित होत आहे. नक्की कसे वागल्याने माझे कल्याण होणार आहे हे निश्चितपणे मला एकदा सांग (२).
अर्जुनाच्या मनात वरील शंका यायचे कारण फार सूक्ष्म आहे हे इथे लक्षात घ्या. असे बघा, आपण बंगलोरात असताना जर आपणास सांगितले की दूर असलेल्या हिमालयातील एका पहाडावरील गुंफेत जाण्यात आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे तर तिकडे कसे जायला हवे असे आपण विचारतो. कारण आपला देह त्या स्थानापासून दूर आहे आणि त्याला तिकडे नेण्याकरीता प्रयत्‍नांची जरुरी आहे याची स्पष्ट जाणीव आपणास असते. परंतु अशी स्पष्ट जाणीव आपल्या मानसिक स्थितीबद्दल असत नाही हे आपले दुर्दैव आहे. त्यामुळे स्वतःच्या इच्छांकडे दुर्लक्ष करुन निरंतर आत्मनुसंधानात रहायला हवे हे ऐकल्यावर अर्जुनाला वाटले की असेच आपण वागू. मनाची तशी स्थिती होण्यासाठी आधी युद्ध लढावे लागेल याची शक्यतासुद्धा त्याच्या मनात शिरली नाही! आपणासारख्या साधकांचे रुपक म्हणून अर्जुनाकडे बघणे किती योग्य आहे हे अशा प्रश्नांवरुन स्पष्ट दिसून येते. उदाहरणार्थ, ‘दुसऱ्यांचा द्वेष करु नये’ अशी (मानसिक स्थितीबद्दल) संतवाणी ऐकली की लगेच आपण द्वेष आला नाही पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षेच्या परिपूर्णतेत अपुरे पडल्यावर अतिशय उदास होतो. वरील शब्द ऐकल्यावर कुठल्या साधनांनी मी माझ्या मनाला या स्थितीपर्यंत नेऊ असे न विचारीता लगेच त्या स्थितीत स्वतःला बदलायचा प्रयत्‍न करतो. शहरातील घराच्या बाहेर पडून लगेच दृष्टीस हिमालयातील गुहा दिसते का हे बघणे जेव्हढे अयोग्य आहे तितकाच हा प्रकार निष्फळ आहे. परंतु बहुतेकवेळा याची आपणास जाणीवसुद्धा नसते. खरे म्हणजे अर्जुनाने असे विचारायला हवे होते की ‘मी युद्ध लढलो तर माझी अशी अवस्था होईल का?’ परंतु असे विचारणे तर सोडाच, तशी शक्यतासुद्धा त्याच्या डोक्यात आली नाही!
अजून एका दृष्टीने अर्जुनाने वरील प्रश्न विचारणे अयोग्य आहे. ते म्हणजे, मनात तटस्थता असली तरी त्यामुळे आपले शरीर दगडाप्रमाणे निष्क्रिय होत नाही. आपण आत्तापर्यंत मनात इच्छा असल्याशिवाय एकाही गोष्टीला प्रारंभ केलेला नाही. त्यामुळे आपणास असे वाटते की मनातील इच्छांचा लोप झाला की आपल्या हातून काहीच क्रिया घडणार नाही. मग घनघोर युद्ध लढणे तर पूर्णपणे असंभवच आहे. परंतु भगवंतांनी कुठेही असे म्हटलेले नाही की स्थितप्रज्ञ मनुष्य जगाचा निरोप घेऊन एका गुहेत जाऊन समाधीत रममाण होतो. स्थितप्रज्ञाची सर्व लक्षणे सूक्ष्म आहेत, त्याच्या मानसिक अवस्थेचे वर्णन करणारी आहेत. त्यावरुन त्याच्या देहाच्या बाह्य वर्तनाबद्दल कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. आणि अर्जुनाच्या प्रश्नामागे असा निष्कर्ष अध्यारुत आहे म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे. अहो, व्यावहारीक जीवनातसुद्धा आपण आपल्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी बाह्य आचरणात आणतोच ना (नावडणाऱ्या नातेवाईकाचा पाहुणचार, वरीष्ठांशी अदबीने बोलणे किंवा समोरील ग्राहकाचे कुठलेही विचित्र बोलणे हसतमुखाने झेलणे इत्यादी), मग परमार्थात मनामध्ये तटस्थता असूनही बाहेर देहाने युद्ध लढणे का असंभव आहे? परंतु असे विचार अर्जुनाच्या मनात आले नाहीत हे ध्यानात घ्या.
वरील दोन दृष्टीकोन अर्जुनाच्या मनात न येण्यामागील कारण म्हणजे अर्जुनाने अजून आपल्या विचारपद्धतीत मूलभुत बदल केलेला नाही हे आहे. व्यवहारात जेव्हा आपण नवीन विचार ऐकतो, तेव्हा त्या विचारांचे संपूर्ण आकलन होण्यास आपण आपल्या अनुभवांचाच आधार घेतो. याचा अर्थ असा की आपल्या जुन्या विचारांच्या आधारे नवीन गोष्ट समजायचा प्रयत्‍न करतो, नवीन विचार खरे आहेत असा विश्वास ठेवून आपल्या पूर्वसमजुती बदलत नाही. तटस्थता म्हणजे गोष्ट करण्यातील उदासीनता असा व्यावहारीक अर्थ आत्तापर्यंत अर्जुनाच्या मनात होता. म्हणूनच अर्जुनाने वरील प्रश्न विचारला. परंतु भगवंतांच्या मनात या शब्दाचा फार खोल अर्थ असल्याने तो आपल्या बुद्धिबाहेर राहतो. अर्जुनाच्या रुपकातून श्रीव्यासमुनींना आपणास ही एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. सद्‌गुरुंचे शब्द आपल्या अनुभवांच्या आधारे समजण्याचा प्रयत्न न करीता ते शब्द शाश्वत सत्य आहेत असे मानून आपण जीवनाकडे नवीन नजरेने पहायला हवे. त्यांच्या बोलण्यातील चुकी दाखवायचा प्रयत्‍न न करीता त्यांचे बोलणे बरोबर ठरेल अशा पद्धतीप्रमाणे आपली विचारसरणी बदलायला हवी. सातत्याने जो अशी प्रक्रिया करतो त्यालाच भक्‍त म्हणायला हवे. ही भक्ती एखादी शिडी चढल्याप्रमाणे हळूहळू प्राप्त होते. गीतेमधील अर्जुनाच्या भक्‍तीची सुरुवात आपल्याप्रमाणेच शंकेखोर आहे. परंतु आता त्याचा हात धरुन भगवान त्याला कसे भक्‍तीच्या शिडीवर चढवायला सुरुवात करतील ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी अठराव्या अध्यायात अर्जुनाच्या विश्वासाची परीपक्वता होईल. तिकडे आपण हळूहळू जाऊच!!
॥ हरिः ॐ ॥

अध्याय तिसरा  (५): 

व्यक्तिमत्व आहे तोवर कर्म आहे


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ गीता श्लोक ५:३ ॥
कर्माचा नियम कुणाला चुकला आहे? भगवंताचे अवतारदेखील या नियमांचे उल्लंघन सहजासहजी करु शकत नाहीत, मग आपली गोष्ट करायलाच नको. पूर्वकर्मांच्या फळाला तोंड देताना ज्या क्रिया होतात त्यांनी नवीन कर्मबंधने निर्माण होत असल्याने कर्मांच्या तावडीतून सुटका कशी होणार ही भिती साधकाला सतत भेडसावित असते. एखाद्या दोऱ्याच्या गुंडाळीतील गुंता सोडवायचा प्रयत्‍न चालू असताना क्षणोक्षणी नवीन धागे आडव्या-तिडव्या रीतीने त्या गुंत्यात जोडले जात असले तर त्याला सोडविणे जसे अशक्य आहे तसेच स्वप्रयत्‍नांनी कर्मफळांच्या तावडीतून सुटणे असंभव आहे. अशा हतबल स्थितीमध्ये आपला विवेक नष्ट हो‍उन बुध्दी चालेनाशी होते. मग काही साधक ‘आत्तापर्यंत जी कर्मे झालेली आहेत त्यांना आपण पुसू शकत नाही. पण निदान नवीन कर्मे आरंभ करणे तर आपण थांबवू शकतो ना’ असा विचार करुन कर्मसंन्यास घेण्याचा निर्णय घेतात. परंतु एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याआधी ती गोष्ट कशी आहे, काय आहे आणि कुठे आहे याचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते. त्यामुळे वरकरणी हा निर्णय योग्य वाटला तरी हा निर्णय स्वतःच्या जीवनात अंमलात आणण्यासाठी आपणास कर्मे म्हणजे काय याचे पूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच तो आपल्या कुवतीबाहेर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी आपणास कर्म म्हणजे काय याचे संपूर्ण ज्ञान झाले आणि अथक प्रयत्‍नांनी आपण कर्मसंन्यास केला तरी ‘कर्मसंन्यास करणे’ हे आपले नवीन कर्म शिल्लक राहतेच!! तेव्हा कुठल्याही साधनेने आपण कर्मांचा त्याग करणे असंभव आहे हे अगदी स्पष्ट आहे. आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकामधून भगवान हीच गोष्ट निराळ्या रीतीने अर्जुनाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्‍न करीत आहेत. ते म्हणत आहेत की ‘आपण स्वतःची कर्मे थांबवू शकतो’ ही भावनाच चुकीची आहे!! ज्याप्रमाणे सशाची शिंगे कल्पनेच्या राज्यातच खरी असतात, वा मृगजळातील पाणी बघणाऱ्याच्या मनातच असते त्याचप्रमाणे मी स्वकर्मे थांबवू शकतो ही भावना निव्वळ काल्पनिक आहे. भगवान म्हणत आहेत: ‘कुठलाही मनुष्य क्षणभरसुध्दा कर्मरहित राहू शकत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये जे गुण आहेत ते त्यांच्या वैशिष्ट्यानुसार अनुषंगिक कर्मे करण्यास त्याला भाग पाडणारच (गीता श्लोक ५, अध्याय ३)’.
भगवंताचे प्रकृती तत्व । म्हणजे आपले व्यक्‍तिमत्व ।
असे जोवरीं त्याचे महत्व । कर्मबंधात अडकलेले भासते स्वरुप ॥
एकाच गोष्टीची अनेक स्तरांवर जाणीव हो‍उ शकते आणि सूक्ष्म जाणीव होइपर्यंत आपण सध्याच्या ज्ञानालाच अंतिम मानत असतो. उदाहरणार्थ, झाडावरील नवीन पक्षी बघितला की एक नवीन गोष्ट बघितली याचे सुख असते. नंतर संयोगवशात त्या पक्ष्याची माहिती कळली की आपण अजून खूश होतो आणि तो खूप दुर्मिळ पक्षी आहे हे लक्षात आल्यावर आपल्याला स्वतःच्या भाग्याचे कौतुक वाटायला लागते! खरे म्हणजे आपले त्या पक्ष्याला बघणे ही क्रिया केव्हाच घडून गेलेली आहे, पण त्यातील सूक्ष्म महत्व जसजसे कळत गेले तसे आपल्याला स्वतःच्या हातून काय नक्की घडले आहे याची जाणीव होत गेली. जरा विचार करा की जर तुमच्या हातात त्या पक्ष्याबद्दलची अधिक माहिती पडली नसती तर तुमचे तो दुर्मिळ पक्षी विनासायास बघण्याचे भाग्य निघून गेले असते का? नाही. फक्‍त स्वतःच्या भाग्याची जाणीव तुम्हाला झाली नसती आणि तुम्ही आयुष्यभर भगवंताला ‘माझ्या जीवनात चांगली घटना कधीच घडवून का आणली नाहीस?’ असा प्रश्न विचारला असता! सांगायची गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनातील बहुतांशी गोष्टींचे खरे वर्म आपणास कळलेले नसल्याने आपल्या मनातील त्या गोष्टींबद्दलच्या भावना सत्य परिस्थितीपेक्षा भिन्न असू शकतात. किंबहुना जास्त करुन त्या चुकीच्याच असतात असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आणि गोष्ट जेव्हढी सूक्ष्म असते तेव्हढी आपली चूक होण्याची जास्त शक्यता असते हे स्पष्टच आहे.
ही गोष्ट स्वकर्म या कल्पनेला लागू होते. असे बघा, स्वतःचे खरे रुप ओळखल्याशिवाय आपण कुठले कर्म केले आहे हे कसे कळणार? माझ्याखेरीज सचिन तेंडुलकर म्हणून एक वेगळे अस्तित्व आहे याची जाणीव झाल्यावर त्याने केलेल्या विश्वविक्रमांना आपण स्वकर्मे म्हणत नाही. त्याचप्रमाणे आपला देह हे स्वतःशिवायचे एक वेगळे अस्तित्व आहे हे जर कळले तर त्या देहाने केलेली कर्मे मी केली असे आपण म्हणू शकणार नाही. लहानपणापासून आपल्या देहात परीवर्तन घडलेले असल्याने आणि लहानपणचे आपण आणि सध्याचे आपण एकच आहोत याची पूर्ण खात्री स्वतःला असल्याने आपले अस्तित्व देहापेक्षा भिन्न आहे याची जाणीव सर्वांनाच असते. मग स्वतःच्या देहाकडून घडलेली कर्मे ‘मी केली’ असे आपण का म्हणतो?
याचे कारण असे की देहाने कर्मे करण्याआधी आपल्या मनात त्या कर्मांचा विचार आलेला असतो. देहापेक्षा आपण भिन्न आहोत हे कळलेले असले तरी मनातील विचारांत आपण नाही असे कुणाला वाटत नाही. त्यामुळे जेव्हा ‘मी अमुक एक गोष्ट केली’ असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनातील त्या गोष्टीबद्दलच्या आपुलकीमुळे तीचे कर्तृत्व आपण स्वतःकडे घेत असतो. देह आणि मन यांच्या युतीमध्ये जोपर्यंत आपण स्वतःला बघत असतो तोपर्यंत कर्मांच्या तावडीतून आपली सुटका होणे निव्वळ अशक्य आहे. स्वतःला अशा मर्यादीत रुपात बघणे म्हणजे प्रकृतीच्या कचाट्यात स्वतःला अडकविण्यासारखे आहे. म्हणून भगवान वरील श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत की तू प्रकृतीच्या पातळीवर स्वतःला ठेवशील तर तुझी कर्मे कधीही थांबणार नाहीत. श्री ज्ञानेश्वर महाराज यावर असे भाष्य करतात की “ज्याप्रमाणे रथात नुसते बसून राहीलो तरी आपण सगळीकडे हिंडतो वा वाऱ्याच्या झोताने निर्जीव पानदेखील आकाशभ्रमण करते त्याचप्रमाणे जो मनुष्य प्रकृतिला धरुन आहे तो कर्म करणारच. असे असूनही जर ‘मी कर्मे सोडीन’ असे कुणी म्हटल्यास तो त्याचा केवळ दुराग्रहच असतो”.
देखें रथी आरुढिजें । मग जरी निश्चळ बैसिजें ।
तरी चळ होऊनि हिंडीजे । परतंत्रा ॥ ६०:३ ॥
कां उचलिले वायुवशे । चळे शुष्क पत्र जैसे ।
निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ॥ ६१:३ ॥
तसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
निष्कर्मही व्यापारें । निरंतर ॥ ६२:३ ॥
म्हणऊनि संग जंव प्रकृतिचा । तंव त्याग न घडे कर्माचा ।
ऐसियाही करुं म्हणती तयांचा । आग्रहचि उरे ॥ ६३:३ ॥
सांख्यशास्त्रात आपल्या अस्तित्वाचे पुरुष आणि प्रकृति असे दोन भाग सांगितले आहेत. त्यातील प्रकृति म्हणजे आपले व्यक्‍तिमत्व होय. मी कोण आहे हे तुम्ही स्वतःचे नाव, शैक्षणिक पात्रता, सामाजिक स्थान इत्यादींचा आधार घेऊन शब्दात सांगू शकलात तर अजून तुम्ही प्रकृतिमध्येच अडकलेले आहात हे ध्यानात घ्या. आपण कोण आहोत हे जेव्हा स्वसंवेदनांनी अपरोक्षपणे तुम्हाला जाणवेल तेव्हा आपोआप कधीच कर्मात अडकलेला नव्हता याची जाणीव होऊन तुम्ही कर्मबंधनांतून मुक्‍त होता. बाकी सर्व उपाय एक बंधन सोडवून दुसऱ्या बंधनात स्वतःला घालण्यासारखे आहेत.
॥ हरि ॐ ॥

अध्याय तिसरा (19): 

आसक्‍ती न ठेवता कर्म कसे करावे?


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

तस्मादसक्‍तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्‍तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीता १९:३ ॥

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कौरवांशी युध्द करणे श्रेयस्कर कसे आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली. तेव्हा बोलता बोलता विषय निघाला म्हणून त्यांनी स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सांगितली. त्यातील अंतिम श्लोकात, म्हणजे द्वितीय अध्यायाच्या समाप्तीच्या श्लोकात, ब्रह्मस्थिती प्राप्त झाली की सर्व कामना नष्ट होऊन ब्रह्मस्थितीमध्ये साधक निरंतर स्थिर रहातो असे सांगितले. तेव्हा अर्जुनाच्या मनात असा संदेह उत्पन्न झाला की मनातून सर्व कामना नष्ट करायच्या आहेत ही अंतिम स्थिती असेल तर मी कर्म न करणेच श्रेष्ठ होय. कारण वासना असल्याशिवाय आपल्या हातून कर्मे घडत नाहीत. तेव्हा वासनांचा क्षय होणे म्हणजे कर्मांचा नाश होणे होय. मग मी युध्दाला का सुरुवात करु?
अर्जुनाच्या मनात अशी शंका निर्माण झाली तरी त्याची सारासार विचार करण्याची बुध्दी संपूर्णपणे गेली नसल्याने त्याने आततायीपणा न करीता भगवान श्रीकृष्णांनाच आपल्या संदेहाचे निराकरण करण्याची विनंती केली. त्यामुळे गीतेच्या तृतीय अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते ‘कर्म करण्यापेक्षा बुध्दीयोग श्रेष्ठ आहे तर मला युध्द करण्याच्या कर्मात का लोटतोस हे मला पटेल अशा शब्दात सांग’. त्याच्या मनातील शंकेचे निवारण करण्यास भगवंतानी त्याला कर्मयोग सांगितला आणि म्हटले की परमार्थाची अंतिम स्थिती गाठण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यातील कर्मयोग हाच मार्ग तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. दुसऱ्या एकाने संन्यास घेऊन कर्मांचा त्याग करुन भगवंताशी जवळीक साधली म्हणून तू तसे वागायचा प्रयत्‍न केलास तर ती एक घोडचुक ठरेल. आज अध्ययनाला घेतलेल्या वरील श्लोकात भगवान म्हणत आहेत: ‘ तू कर्मफळाची आसक्‍ती न ठेवता कर्म कर. आसक्‍ती सोडून योग्य कर्म करणाऱ्याला मोक्षच प्राप्त होतो (म्हणजे परमार्थातील अंतिम स्थिती त्याला अप्राप्य नसते. म्हणजे जी गोष्ट बुध्दीयोगाने मिळते तीच कर्मयोगानेही प्राप्त होते.).’
भगवंतांच्या या उच्चारांवर विचार करण्याआधी आपण अर्जुनाच्या मनातील संदेहाकडे बघू. सर्वसाधारणपणे आपली अशी खात्री असते की आपल्या मनात कर्माबद्दल जेव्हढी ओढ असते तेव्हढे चांगले कर्म आपल्या हातून होते. त्यामुळे अर्जुनाप्रमाणेच आपल्या मनात अशी शंका असते की ‘कर्म तटस्थपणे करायची, तर ती चांगली होतील याची खात्री काय? केवळ करायची म्हणून केलेली कर्मे आपणास भगवंताजवळ कशी नेतील?’ आपणास असे वाटते की वासनारहित झालो तर आपण रस्त्यावरच्या दगडासारखे निर्बुध्द, निर्विकार आणि निरुपयोगी होऊ. आपल्या मनातील ही भिती आपणास अध्यात्माच्या मार्गावर झोकून देण्यास प्रतिबंध करते. परंतु आपली ही भिती लहान मुलाच्या मनातील ‘बागुलबुवा’च्या भयासारखी आहे. अंधाऱ्या, रिकाम्या खोलीत बागुलबुवा आहे म्हणून तिथे न जाणाऱ्या मुलाने स्वतः तिथे जाऊन कधी त्या भयानक राक्षसाला बघितलेले नसते त्याचप्रमाणे आपण वासनारहित मानवाला कधी बघितले नसल्याने आपली भिती निव्वळ आपल्या कल्पनेवर आधारित आहे. या भयाचे निराकरण स्वतः वासनाविरहीत झालेल्या मानवाला बघणे यात आहे, म्हणजेच संतसंगतीत आहे. म्हणूनच परमार्थात सत्संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे. अर्जुनाचे भाग्य थोर होते की भगवान श्रीकृष्णांचा सहवास त्याला त्याच्या जीवनातील आणिबाणीच्या क्षणी मिळाला आणि त्याने त्याचा संपूर्ण फायदा उठविला. असो. कामनाविरहीत झाल्यावरसुध्दा आपल्या हातून उपयुक्‍त कर्मे कशी होतील या आपल्या संदेहाचे निराकरण करायचे असेल तर कर्म होत असताना नक्की काय होते हे आपण बघितले पाहिजे.
जेव्हा आपण प्रत्यक्ष कर्म करीत असतो तेव्हा आपल्या मनातील सर्व भावनांचा नाश झालेला असतो. कर्म सुरु करायच्या आधी आपल्या मनातील आलस्याचा नाश करण्यासाठी ज्या शक्‍तीचा आधार आपण घेतो ती शक्‍ती म्हणजे आपली वासना होय. परंतु एकदा कर्म सुरु झाले की आपली वासना एक अडथळाच होतो. एखादी गोष्ट करणे आपल्याकरीता महत्वपूर्ण आहे याची जाणीव ती गोष्ट करीत असताना सतत जागृत असेल तर आपले हात-पाय गळून जायची शक्यताच जास्त असते. जेव्हा एखादी क्रिकेट टीम विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी करीत असते, तेव्हा त्यांना असे वारंवार बजावण्यात येते की उद्याचा सामना बाकी एखाद्या सामन्यासारखाच आहे असा विचार करा. हा सामना जिंकला की विश्वकरंडक हाती येणार ह्याची सतत जाणीव मॅच खेळताना ठेवली तर खेळाडू नीट खेळू शकत नाही. एखादी चूक झाली तर भयानक परीणाम भोगावे लागतील याचे सतत स्मरण ती चूक आपल्या हातून घडण्यास कारणीभूत होते. म्हणून अत्यंत महत्वाच्या सामन्यात सर्व झेल पकडले जातात असे नाही आणि श्रीसांथने टी२०च्या अंतिम सामन्यातील सर्वात मोक्याच्या क्षणी पकडलेला मिसबाह उल हकचा सोपा झेलही खूप कौतुकास्पद होतो. तो झेल कठीण नव्हता तर तो झेल महत्वाचा होता याची जाणीव असूनही त्याने तो पकडला हे कौतुकास्पद होते. दुसरे उदाहरण म्हणजे कितीही नावाजलेला डॉक्टर असला तरी आपल्या जवळच्या नातेवाइकावरील शस्त्रक्रिया तो स्वतः करीत नाही. आपल्या हाताखालील रुग्ण बरा केलाच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर इतके पडते की त्याचे हात नेहमीप्रमाणे चालतील याची खात्री तो देऊ शकत नाही. तेव्हा सांगायची गोष्ट अशी की जेव्हा कर्मे करण्यातच आपण संपूर्ण गुंगून जातो तेव्हाच आपल्या हातून उत्तम रीतीने कर्मे होतात. म्हणजे, जेव्हा कर्म घडत असते तेव्हा त्या कर्मामुळे आपणास काय मिळणार आहे, किंवा मी हे कर्म का सुरु केले आहे इत्यादी विचारांपासून आपणास मुक्‍तता मिळाली तरच कर्म व्यवस्थित पार पडते.
म्हणजे काय तर वासना मनात जागृत असेल तर त्यामुळे कर्मे सुरु होतात पण हातातील कर्मे उत्तम रितीने पार पाडायची असतील तर त्या वासना विसरुन हातातील कर्मांमध्येच संपूर्ण विसरुन जाणे जरुरी आहे. त्यामुळे कर्मफळाची वासना नष्ट झाल्यावर उत्तम रितीने कर्म कसे पार पडेल ही आपली भिती निरर्थक आहे. ज्याप्रमाणे बागुलबुवाला अस्तित्वच नसते त्याचप्रमाणे आपल्या या भयाला वास्तवामध्ये पायाच नाही. लक्षात ठेवा की कर्मफळाच्या वासनेने आपण जास्तीत जास्त कर्माला सुरुवात करु शकतो, आणि कर्म करण्यात कंटाळा आला तर परत ते रेटू शकतो. फळांच्या इच्छेने बाकी काही होत नाही. तेव्हा कर्म सुरु करायचे आहे अशी आपली खात्री असेल आणि कर्म संपेपर्यंत सोडायचे नाही असा निर्धार असेल तर कर्मफलाच्या वासना ठेवणे आवश्यक तर नाहीच उलट धोक्याचे आहे.
कर्मफलासक्‍ती ठेवणे धोक्याचे आहे कारण कर्मफळाच्या वासनेचे दुष्परीणाम अनंत आहेत. जेव्हा एखादे फळ मनात ठेवून आपण कर्माची सुरुवात करतो तेव्हा अगदी मनासारखेच फळ मिळाल्याशिवाय समाधान होत नाही. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यावर सहलीला जाताना तेथील सूर्यप्रकाशात नाहून निघायची कामना करणाऱ्यांना, तिथे गेल्यावर ढगाळ वातावरण आढळले तर निराशा पदरात येते. ढगाळ हवेतील सौंदर्य त्यांना दिसतच नाही. याउलट नेहमीच्या वातावरणापेक्षा निराळ्या जागी जावे अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांना ढगाळ हवेबद्दल दुःख होत नाही. मनात जेव्हढी कामना प्रबळ असते तेव्हढे सुख कमी असते आणि ताण जास्त असतो. मानसिक तणावाचे मूळ कारण आपल्या मनातील अपेक्षा आहेत, दुसरे काही नाही.
या विवेचनावरुन असे सिध्द होते की कर्मे चांगली व्हावीत याकरीता कर्मफळाची वासना काढणे आवश्यक आहे आणि झालेल्या कर्मातून सुख मिळविण्याकरीता मनात एखादी ठराविक अपेक्षा नसणे जरुरी आहे. मनात आसक्‍ती ठेवण्याकरीता जी कारणे आपण पुढे करतो त्यापैकी फक्‍त एकच कारण संयुक्‍तिक वाटत आहे. ते म्हणजे, आसक्‍ती नसेल तर कर्मे सुरु कशी होतील?
या कारणाचे निराकरण करण्यास धर्म लिहिला आहे! फलासक्‍तीमुळे कर्म सुरु न करीता हे कर्म करणे माझा धर्म आहे म्हणून आपण सुरु करु शकतो. धर्मपालन करणे ही गोष्ट आसक्‍तीला पर्याय आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज वरील श्लोकावर विवेचन करीत असताना असे म्हणत आहेत:

म्हणऊनि तूं नियत । सकळ कामनारहित ।
होऊनिया उचित । स्वधर्मे राहाटें ॥ १५०:३ ॥
जे स्वधर्मे निष्कामतां । अनुसरले पार्था ।
ते कैवल्यपद तत्वता । पावलें जगीं ॥ १५१:३ ॥

भगवान अर्जुनाला म्हणाले की कर्मफळाची आसक्‍ती सोडून कर्मे कर आणि त्यावर माऊली म्हणत आहे ‘स्वतःला (धर्माच्या) नियमात बांधून आणि सर्व कामनांचा त्याग करुन आपल्या स्वधर्माचे पालन कर. जी माणसे कामनाविरहीत होऊन स्वधर्म पाळतात त्यांना कैवल्यपदाची प्राप्ती झालेली या जगात दिसून येते.’ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ‘स्वधर्म’ हा शब्द भगवंतांच्या ‘कर्म’ या शब्दाचे स्पष्टीकरण म्हणून वापरला आहे. बाकी श्लोकातील अर्थात आणि माऊलींच्या शब्दांत काही फरक नाही. परंतु या इतक्या छोट्या बदलाने अर्थात किती मूलभूत फरक पडला आहे हे वरील विवेचनाने सिध्द होते. खरोखर, महाराजांच्या सूक्ष्म आणि व्यापक प्रतिभेचे वर्णन कोण करु शकणार?
आता शेवटी वासनाविरहीत होणे म्हणजे काय यावर विचार करु.
एखादे कर्म करीत असताना ते भगवंताने आपल्यापुढे आणले आहे म्हणून आपण करीत आहोत ही भावना जागृत होणे म्हणजे त्या कर्माच्या फळाच्या आसक्‍तीपासून सुटका होणे होय. एकदा ही भावना जागृत झाली की त्यातून मला काय मिळेल हा विचार नाहीसा होतो. परंतु इथेही एक गोम आहे. आपल्यापैकी अनेकजणांना समोर आलेले कर्म भगवंताची इच्छा आहे असे मानण्याची सवय असते. परंतु त्यांना स्थितप्रज्ञ झालेले आपण बघत नाही. याचे कारण असे की त्यांनी ही गोष्ट ‘मानलेली’ असते. खरा परमार्थ मानून-सवरुन होत नाही. उदाहरणार्थ, जीवनात सर्व होते ते चांगल्याकरीताच होते असे आपण मानतो परंतु त्याने कुठल्याही गोष्टीतील आनंद दिसत नाही. कशावरुन घडलेली घटना चांगली आहे हा विकल्प मनात येतोच आणि तो येणे योग्यच आहे. कारण, घडलेली घटना माझ्याकरीता चांगली आहे हे आपल्याला ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ यासारखी स्पष्ट दिसलेली नसते. आपण ती नुसती मानलेली असते. तेव्हा समोर आलेली कर्मे भगवंताच्या इच्छेने आलेली आहेत असे मानणे आपणास तात्पुरती शांती देते. परंतु काही काळाने ‘माझ्या हातून इतकी सत्कर्मे घडली आहेत तरी माझे जीवन इतरांसारखेच सर्वसाधारण का?’ हा प्रश्न उद्भवतोच.
हा जरा सूक्ष्म मुद्दा आहे. सांगायचे असे आहे की कर्मे करीत असताना योग्य मनोभूमिका असणे जरूरीचे आहेच पण कर्म पार पडल्यावर आपल्या कष्टांचे भान विसरणेही मोक्षपदाला योग्य होण्यास जरुरी आहे. भूतकाळातील स्वकर्माची पावती कुणीतरी आपणास द्यावी ही भावनाही आपणास कर्मफळाच्या वासनेत गुंतविते आणि सत्संगतीपासून दूर करते. तेव्हा निष्काम कर्म करण्याची खुबी १. ‘कर्म करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवणे’ आणि २. ‘झालेली कर्मे विसरुन जाणे’ यात आहे. नुसते सद्यपरीस्थितीत निष्काम होऊन चालणार नाही. भूतकाळातील स्वकर्मांचे पडिसाद जेव्हा वर्तमानकाळात ऐकू येतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेही कामनाविरहित होण्यास आवश्यक आहे. सर्व संतांच्या जीवनात बघितले तर असे आढळून येते की त्यांना स्वतःच्या फायद्याकरीता वापरणारी माणसे त्यांच्यासमोर आली तरी त्यांचे अशा स्वार्थी माणसांशी वर्तन पूर्वीप्रमाणेच दयार्द्र असते. पूर्वी आपण या माणसाकरीता कष्ट केले त्याबद्दलचा हिशेब ते मागत नाहीत. भूतकाळातील कर्मांपासून ते आत्ता नफा काढत बसायच्या फंदात ते पडत नाहीत.आपणास निष्काम कर्म करायचे असेल तर अशा थोर संतांच्या दररोजच्या जीवनातील वर्तनाचा आदर्श आपण सतत आपल्यासमोर ठेवला पाहिजे. नाहीतर आजूबाजूची माणसे आपणास त्यांच्या पातळीवर आणून ठेवतीलच यात शंका नाही.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************
अध्याय नववा (३४) : 
राजविद्या साधनेचा पुनरुच्चार




॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥



मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

 मामेवैष्यसि युक्त्यैवमात्मानं मत्परायणः ॥ गीता ३४:९ ॥ 


आधीच्या दोन श्लोकांतून नवव्या अध्यायातील साधना या विश्वातील कुणीही करु शकतो असे आश्वासन दिल्यानंतर आता भगवान या साधनेचे मर्म परत स्पष्ट करीत आहेत. ते म्हणत आहेत की :
 (अर्जुना) मलाच तुझ्या जीवनातील सर्वात महत्वाची वस्तू ठरव त्यायोगे तुझे मन आणि सर्व क्रिया माझ्या इच्छेप्रमाणे कर. विश्वात सर्व ठिकाणी मलाच बघ. तुझ्यात ही अंतर्गत स्थिरता आली की तू माझ्यात विलीन होशील (माझी प्राप्ती होईल).”
प्रत्येकाच्या जीवनात कुठलीतरी वस्तू महत्वाची असते. आपण काय ध्येय ठरविले आहे यावरुन आपल्या आयुष्याला दिशा मिळत असते. कारण जेव्हा आपल्यासमोर एखादा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण असाच निर्णय घेतो की ज्यायोगे आपले ध्येय गाठण्यास अडचण येणार नाही. परंतु जेव्हा आपल्यासमोर अशी वेळ येते की आपण काहीही केले तरी चालेल तेव्हाआपले ध्येय आपणांस नक्की दिशा दाखवू शकत नाही.  

उदाहरणार्थ, जर समाजात पुढे जायचे आहे हे ध्येय असेल तर प्रतिष्ठित व्यक्तींसमोर आपण आपोआप स्वतःच्या मनाला मुरड घालून चांगले वागतो कारण त्यांच्या संगतीने आपले ध्येय प्राप्त होण्यास मदत होईल असे वाटत असते. परंतु हे ध्येय आपणांस स्वतःच्या घरी खाजगीत कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करु शकत नाही कारण तिथे कसेही वागले तरी त्याने आपल्या बाहेरील प्रतिमेला धक्का लागणार नाही याची जाणीव असते. अशावेळी आईचे वा पत्‍नीचे मन सांभाळणे असे ध्येय उपयोगी पडते. म्हणजे काय, तर आपल्या एखाद्या ध्येयाशी संबधित नसलेली घटना जर आपल्यासमोर आली तर तिथे कसे वागाचे याचा निर्णय घेण्यास आपणांस दुसरे ध्येय सुनिश्चित करावे लागते. या विश्वातील प्रत्येक गोष्ट मर्यादीत असल्याने, कुठलेही व्यावहारीक ध्येय आपणांस दिवसाचे चोवीस तास कसे वागायला हवे याबद्दल दिशा देऊ शकत नाही. म्हणून आपणांस असे दिसून येते की सर्वसाधारणपणे लोकांच्या जीवनात एकापेक्षा जास्त गोष्टी महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ, आपणांस पैसे मिळवायचे असतात शिवाय घरी,दारी मान हवा असतो आणि तब्येत चांगली हवी असते व मनाप्रमाणे वागायला हवे असते. एकाचवेळी आपण या सर्व गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्‍न करीत असतो. अशी तारेवरची कसरत करण्यात आपण इतके गुंग झालेलो असतो की जगण्यातील नैसर्गिक सुंदरतेने भारावून जाण्यास आपल्याकडे वेळ नसतो. आणि भगवंताची भक्ति करणे म्हणजे दररोजच्या जीवनातील अद्भुत सौदर्याचा सतत आस्वाद घेणे असल्याने वरील विवेचनाने असे स्पष्ट होते की भक्ति करण्यास आपल्याकडे वेळ नसतो.
अशा रीतीने आपण स्वतःसमोर निरनिराळ्या ध्येयांची आलोभने ठेऊन भगवंतापासून वंचित होत असतो असे स्पष्ट होते. यातून सुटण्याचा एक हमखास मार्ग म्हणजेबुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ज्ञानदेव हरिपाठ-१३॥ अशी भावना मनात निर्माण होणे होय. स्वतःच्या जीवनात भगवंतप्राप्ती हे एक आणि एकच ध्येय ठेवणे जरुरी आहे हे स्पष्ट झाल्यावर तेव्हढेच करणे पुरेसेसुद्धा आहे असे भगवान वरील श्लोकातून म्हणत आहेत. हा योग इतका सोपा आणि सरळ आहे की यावर विश्वास बसणे कठीण आहे म्हणून तो डोळ्यासमोर असूनही गुप्त झालेला आहे. अर्थात, या मार्गात एक बाब लक्षात ठेवणे जरुरी आहे ती म्हणजे, भगवंतांच्या एखाद्या अवताराला महत्वाचे मानायचे नसून मूळ (निर्गुणी) भगवंतांना जीवनात आद्यस्थान द्यायचे आहे. याचे कारण असे की भगवंतांचा प्रत्येक अवतार या विश्वात जन्माला आलेला असल्याने मर्यादीत आहे. त्यामुळे सतत कुठल्याही परिस्थितीत त्याचे दर्शन होणे कठीण आहे. उदाहरणार्थ रामनवमीला श्रीरामांचे अस्तित्व आपणांस जाणवेल पण त्यानंतर दशमीला ते दिसेलच असे नाही. किंवा, महाशिवरात्रीची साधना संपली की आपले जीवन परत नेहमीप्रमाणेच सुरु व्हायला लागते. म्हणून निर्गुणी भगवंतांची साधना करणे अत्यावश्यक आहे. आणि ही साधना कशी असते हे या श्लोकातून स्पष्ट केले आहे. आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रसंगाला आणि विचाराला भगवंताचे रुप मानून सामोरे जाणे आणि या क्रियेमध्येच संपूर्णपणे मग्न होण्याने आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाच्या मागण्यांकडे आपोआप दुर्लक्ष होणे असे या भक्तीचे रुप आहे. माउलींच्या शब्दांत सांगायचे तर:
तू मन हे मीचि करी । माझिया भजनी प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥५१७:९॥
माझेनि अनुसंधाने देख । संकल्प जाळणे निःशेख । मद्याजी चोख । याचि नाव ॥ ५१८॥
ऐसा मिया आथिलां होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी। … 
नवमीच्या या पूर्णोद्गारात भगवंतांनी सगळी साधना परत एकदा सांगून आपल्या जीवनाचे ध्येय काय असायला हवे हे स्पष्ट केले आहे. ही गोष्ट कळणे इतके जरुरी आहे की भगवंतांनी अठराव्या अध्यायातील पासस्ठाव्या श्लोकात वरील श्लोकाला जवळजवळ शब्दशः परत सांगितले आहे (असा दुसरा कुठलाही श्लोक गीतेत नाही). इति.
श्रीसद्‍गुरु दादासाहेब सांगवडेकरांच्या कृपाशिर्वादाने नवव्या अध्यायातील श्लोकांचे विवरण करण्याची सेवा अशा रीतीने संपूर्ण झाली. भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां ओवियां फुलें मोकळी । अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्वरुपाच्या ॥ ज्ञानेश्वरी ७०८:११॥
॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

 

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक ३२ आणि ३३):

निर्गुणी भक्तीची वैश्विकता

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः

स्त्रियो वैश्यास्तथा शुद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् :३२

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् :३३

जेव्हा एखादी कृती ठराविक आकार घेते तेव्हा आपोआप त्या कृतीला करण्याची क्षमता असणारे आणि नसणारे असे विभाजन निर्माण होते. कितीही सोपी गोष्ट असली तरी ती करु शकणारे लोक असतातच. भगवद्गीतेतील अध्यायांत विभिन्न पारमार्थिक साधना सांगितल्या आहेत. त्या सर्वांनासुद्धा वरील नियम लागू पडतो. वरील दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण नवव्या अध्यायातील राजगुह्ययोगाची भलाई करताना असे म्हणत आहेत की ही साधना या विश्वातील कुणीही करु शकतो. खऱ्या अर्थाने निर्गुण भगवंताची भक्ति वैश्विक आहे हे स्पष्ट करण्यास भगवान म्हणत आहेत कीमाझ्या (निर्गुण) रुपात आश्रय घेण्याची इच्छा असणारे सर्व स्त्री आणि पुरुष, मग भले ते कुठल्याही योनीचे वा जातीचे असो, परम गतीस प्राप्त होतात. (३२) मग ज्यांचे आचरण पुण्यवान आहे अशा सात्विक भक्तांनासुद्धा या मार्गाने गति मिळते हे वेगळे सांगायलाच नको. म्हणून, स्वतःला या नाशिवंत दुःखी जगात अडकलेले पाहून (आपल्या सध्याच्या व्यावहारीक वा सामाजिक स्थितीकडे लक्ष देता) माझ्या (निर्गुणी) भक्तीत रममाण हो (३३.”

समाजातील दुर्लक्षित वर्गांची उन्नती करण्याच्या मार्गांत एक मोठा धोका असतो. तो म्हणजे सध्या जे उच्च स्थानावर प्रस्थापित आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्. कुणालातरी कमी करून दुसऱ्या एकाला मोठे करण्यात सामाजिक असंतुलन नष्ट होत नाही तर कोण कुठे आहे हे फक्त बदलते! भगवद्गीतेत व्यावहारीक गोष्टींत मग्न असलेल्याचा उद्धार करताना, त्याचवेळी पुण्यवान, सात्विक भक्तांनासुद्धा मदत केलेली आहे इकडे लक्ष देणे महत्वाचे आहे! एकाच वेळी सर्वजनांची पीडा हरण करण्याचा मार्ग सांगणे यातून गीतेतील विचारसरणीची सखोलता व्यापक दृष्टी दिसून येते. असे खरेखुरे वैश्विक तत्वज्ञान असणे अत्यावश्यक आहे कारण परमार्थ हा व्यवहाराच्या पलिकडे आहे. व्यावहारीक गोष्टी निर्गुणी भगवंताला स्पर्शसुद्धा करु शकत नाहीत असे जेव्हा आपण मानतो तेव्हाच त्याच्या भक्तीचा मार्ग लोकांच्या व्यावहारीक पातळीवर अवलंबून नसला पाहीजे हे स्पष्ट होते. लक्षात घ्या की पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी समाजाच्या रुढींवर अवलंबून आहेत. (एका समाजातील पाप दुसऱ्या समाजात पुण्य असू शकते.) आणि म्हणून त्यांच्या सापेक्ष असलेली आपली स्थिती पारमार्थिक दृष्टीकोनातून निरर्थक आहे. म्हणून वरील श्लोकांतून उद्गारलेले साधनेचे वैशिष्ट्य गीतेमध्ये असणे जरुरी आहे, ते जर नसते तर एक विरोधाभास निर्माण झाला असता!  असो. अशा रीतीने हे सिद्ध होते की आपण सर्वजण निर्गुणी भक्ती करण्यास सक्षम आहोत. परंतु असे असले तरी वस्तुस्थिती अशी दिसून येते की फार थोडे भाग्यवान जन्माला येतात जे भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे निर्गुणी भक्तीत रममाण होतात. हे का होते याचे स्पष्टीकरण बत्तीसाव्या श्लोकातील दुसऱ्या चरणात दिलेले आहे. भगवान म्हणत आहेत की व्यावहारीक जगाचा नाशिवंत स्वभाव बघून माझ्या भक्तीमध्ये आयुष्याचे सर्वस्व आहे असे जाण. जोपर्यंत या जगातील प्रत्येक गोष्टीचे नश्वरत्व आपल्या हाडीमासी भिनत नाही तोपर्यंत आपल्याहातून निर्गुणी भक्ती शंभर टक्के होत नाही. आणि भक्तीत एक टक्का जरी उणीव राहीली तरी भगवंत आपल्या पासून दूर राहतो. (श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे की दोऱ्यातील एक धागा जरी सुईच्या भोकातून गेला नाही तरी दोरा पलिकडे खेचता येत नाही त्याचप्रमाणे भगवंतभक्तीत जरासुद्धा व्यावहारीक अपेक्षेंची भेसळ झाली तरी आपण पैलतीरावर पोहोचत नाही) सध्याच्या आपल्या सिद्धार्थावस्थेतून जर भगवान बुद्ध बनायचे असेल तर स्वशरीररुपी रथात बसून आयुष्याचा प्रवास करताना जे नश्वरत्व समोर येत आहे त्यातून व्यावहारीक प्रगतीबद्दलचे संपूर्ण वैराग्य उत्पन्न होणे जरुरी आहे. आणि हे वैराग्य क्षणिक नसून स्थायिक असणे जरुरी आहे कारण क्षणिक वैराग्याने आपण परमार्थाकडे प्रवृत्त होतो हे जरी खरे असले तरीसुद्धा त्या वैराग्याचे मूळ जर आपल्या नसानसात रुजले नसेल तर आपल्या साधनेचा वेल मध्येच खुंटतो, माउलींनी सांगितल्याप्रमाणे गगनावरी जात नाही!

आपणांस असे वाटत असते की अनुभवांनी आपण शहाणे होऊ. परंतु शहाणपणाची आपली व्याख्या या जगातील आपल्या वर्तनात चूक होऊ नये अशी आहे. आपला हा मानदंड मूलभूतपणे चुकीचा आहे. आयुष्यभर आपण अनुभव घेत आहोत की कुठलेही सुख शाश्वत नाही. आत्तापर्यंत एकही गोष्ट आपणांस मिळालेली नाही की जी सर्वकाळ तेच सुख देईल जे तीने पहिल्या प्राप्तीवेळीस आपणांस दिले होते. परंतु यातून आपण असा शहाणपणा शिकतो की दरवेळी नव्या गोष्टीची वा तत्वाची प्राप्ती करणे योग्य आहे! सर्व गोष्टींच्या आणि तत्वज्ञानाच्या पलिकडे आपण जायला हवे ही जाणीव व्यावहारीक अनुभवांमुळे निर्माण होणे जरुरी आहे. या सकारात्मक वैराग्याच्या सुपीक जमिनीत निर्गुणी भक्तीचे बीज भगवंतांनी रोवलेले आहे. आपणांस ते वेगळे कुठूनतरी आणण्याची जरुरी नाही!!

वरील श्लोकांतून भगवान आपणांस सांगत आहेत की सर्वांमध्ये भगवंत प्राप्त करण्याची शक्ति आहे. परंतु आपल्यातील या जन्मजात क्षमतेचा उपयोग करण्यास जी मनःस्थिती लागते ती असणे जरुरी आहे. ज्याप्रमाणे एखादा अत्याधुनिक संगणक विकत घेतला आणि तो चालूच केला नाही तर असून नसल्यासारखाच असतो त्याचप्रमाणे आपल्यातील शक्तीचा जर आपण उपयोग केला नाही तर आपण जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहात अडकलेलेच राहणार. चला, आपण डोळे उघडे ठेऊन जगू आणि आलेल्या अनुभवांतून खऱ्या अर्थाने शहणे होऊ, वैराग्यरुपी सख्याची संगत प्राप्त करुन घेऊ. बाकी सर्व भगवान आपोआप बघून घेतील.

हरि

 

*******************************************************************

अध्याय नववा  (श्लोक ३० आणि ३१):

पारमार्थिक साध्याची वैशिष्ट्ये

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्

साधुरेव मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ३०:

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति

कौन्तेय प्रतिजानीहि मे भक्त प्रणश्यति ३१:

गेल्या श्लोकातून भगवंतांनी स्वतःच्या समदृष्टीचे वर्णन केले. त्यातून असे स्पष्ट होते की आपण भगवंतांच्या सान्निध्याला मुकण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मनात काही प्रमाणात असलेली व्यावहारीक प्रगतीबद्दलसुद्धा ओढ होय. आता वरील श्लोकांतून, या वक्तव्यामध्ये जी दडलेली ताकद आहे ती स्पष्ट करताना भगवान म्हणत आहेत की जर माझ्यावर अनन्य भक्ती जडलेली असेल तर जगातील सर्वात दुष्ट वर्तन करणाऱ्या मनुष्यालासुद्धा सज्जनच मानायला हवे. (३०) (कारण) ज्याक्षणी त्याचे मन माझ्यावर जडते त्याक्षणीच तो धर्मात्मा बनतो आणि शाश्वत शांति (म्हणजे माझ्या सान्निध्याला) प्राप्त करतो. अर्जुना, तू एक गोष्ट निःसंदेह जाणून घे की माझा भक्त अमर असतो (म्हणजे काय, तर या जगातील कुठलीही गोष्ट वा कृति त्याला माझ्यात एकरुप होण्यास अडवू शकत नाही) (३१).”

वरील दोन श्लोकांपैकी पहिल्या श्लोकात भगवंतांनी आपल्या व्यावहारीक अस्तित्वाची पारमार्थिक क्षेत्रातील मर्यादा स्पष्ट केली आहे. भगवंतावर जेव्हा आपली अनन्य भक्ती जडते तेव्हा स्वतःच्या व्यावहारीक जीवनातील छबीवरुन आपले लक्ष पूर्णपणे दूर होऊन स्वतःच्या स्वरुपावर बसते. ज्याप्रमाणे रस्त्यावर चालताना जर स्वतःची सावली कचऱ्याच्या कुंडीवर पडली तर आपण स्वतःला अस्वच्छ मानत नाही, त्याचप्रमाणे आपले व्यावहारीक व्यक्तिमत्व जरी दुराचारी असले तरी आपल्या स्वरुपाच्या पवित्रतेवर कुठलाही डाग पडत नाही हे आपणांस त्यावेळी कळते. परंतु लक्षात घ्या की आपले स्वरुप सदाकाळी निरंतर निर्मळ, निष्कलंक आहे या वस्तुस्थितीचा उपयोग त्यालाच होतो ज्याचे लक्ष आत्मरुपावर सतत केंद्रित आहे. आणि आत्मरुपावर सतत लक्ष राहणे याचाच अर्थ भगवंतावर अनन्य भक्ती असणे. म्हणून भगवान वरील श्लोकात म्हणत आहेत की एकदा माझ्यावर अनन्य भक्ती बसली की तो मनुष्य सज्जन आहे असे मानायला हवे.

अर्थात्, या वक्तव्यामध्ये एक मेख दडलेली आहे. ती म्हणजे भक्तीची अनन्यता असणे. सध्या आपणांस अनेक गोष्टी प्रिय आहेत, त्यामध्ये भगवंतप्राप्ती ही अजून एक इच्छा जोडण्याने अनन्यता निर्माण होत नाही. आधीच्या सर्व इच्छा-आकांक्षांच्या बदल्यात एक भगवंतप्रेम मनात ठेवणे याला अनन्यता म्हणतात. या भक्तीचे बाह्य जीवनात कसे दर्शन होते याबद्दल आपण ३४व्या श्लोकाच्या विवरणात सखोल विचार करु. सध्या इतकेच बघू की भगवंतप्राप्ती होण्यास व्यावहारीक कामनांबद्दल संपूर्णपणे तटस्थ होणे जरुरी आहे. भगवंतभक्ती निर्भेळ असण्याची आवशक्यता स्पष्ट करण्यास श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे की ज्याप्रमाणे सुईत ओवलेल्या दोऱ्यातील एक धागा जरी भोकात गेला नाही तरी दोरा ओढता येत नाही त्याचप्रमाणे मनात कुठल्यातरी व्यावहारीक गोष्टीच्या ओढीची थोडीशीसुद्धा भेसळ झाली तरी भगवंतप्राप्ती होत नाही.

भौतिक आणि मानसिक जगाच्या आपल्यावरील ताब्याची मर्यादा अशा तऱ्हेने स्पष्ट केल्यावर भगवान एकतीसाव्या श्लोकात कालाबद्दल बोलत आहेत. दैनंदिन जीवनात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती लगेच प्राप्त होत नाही. त्याकरीता कष्ट घ्यावे लागतात आणि त्यामुळे इच्छा निर्माण होण्यात आणि तीची पूर्तता होण्यात अवधी लागतो. अगदी साधा चहा जरी हवा असला तरी आधी उठून पाणी उकळवायला लागते. मनात चहा हवा असा विचार आला आणि त्याच्क्षणी चहा मिळाला असे होत नाही. वर्षोनुवर्षे आलेल्या अशा व्यावहारीक अनुभवांमुळे आपला दृढ विचार झाला आहे की इच्छा उत्पन्न झाल्यानंतर वस्तूची प्राप्ती होण्यास अवधी लागतो. परंतु परमार्थात ही विचारसरणी लागू होत नाही असा इशारा वरील श्लोकांतून भगवान आपणांस देत आहेत. याचे कारण परमार्थातील वस्तू आणि आपण यात अंतर नाही हे होय. मनात एखादा विचार आला की तो स्वतःच्या बुद्धीला कळण्यास जेव्हढा वेळ लागतो तेव्हढासुद्धा कालावधी आपले भगवंताबरोबर मिलन होण्यास लागत नाही. त्यामुळे ज्याक्षणी आपल्या मनात भगवंतांबद्दल अनन्य प्रेम उत्पन्न होते त्याक्षणीच आपण धर्मात्मा बनतो आणि आपल्या मनात शांति उत्पन्न होते. लक्षात घ्या की भगवंतप्राप्तीने ही शांती उत्पन्न झालेली नसून, भगवंतावरील प्रेम हे कारण असते. सर्वसाधारणपणे आवडत्या वस्तूच्या प्राप्तीने आनंद होतो, निव्वळ आवडीने नाही. परंतु इथे प्रेम हेच साध्य असल्याने आपल्या मनातील निर्गुणी प्रेम हेच भगवंताचे रुप आहे असे आपण म्हणू शकतो.

ही शांति जगातील एकाही वस्तूवर अवलंबून नसल्याने कुठलीही व्यावहारीक घटना या शांतीला स्पर्श करु शकत नाही. आणि म्हणून ती शाश्वत असते असे भगवान म्हणत आहेत. भगवान जेव्हा माझा भक्त अमर असतो असे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ भक्ताचे शांतिस्वरुप अस्तित्व कालातीत असते असा आपण घ्यायला हवा. या संसारातील भक्ताचे शरीर-मन-बुद्धीरुपी अस्तित्व निरंतर राहील असे आश्वासन त्यांनी दिलेले नाही. ज्याप्रमाणे आपले शरीर बालकावस्थेतून यौवनात नंतर वृद्धापकाळ या अवस्थांत प्रवेश करीत असते त्याचप्रमाणे आपले मूल अस्तित्व (स्वरुप) निरनिराळ्या देहांना धारण करुन शेवटी वरील श्लोकांत वर्णन केलेल्या शांतीमध्ये पदार्पण करणार आहे. आपणां सर्वांची हीच अंतिम गति आहे. इति.

हरि

अध्याय नववा (श्लोक २९) :

 

भगवंतांच्या समदृष्टीचे महत्व

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

समोऽहं सर्वभूतेषु मे द्वेष्योस्ति प्रियः

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम् २९:

गेल्या श्लोकातून निर्गुण भगवंतांच्या भक्तीचे फळ म्हणजे माझी निरंतर संगती असे भगवंतांनी सांगितले. सर्वसाधारणपणे आपण स्वतःला आवडणाऱ्या व्यक्तीसच जवळ ठेवतो. त्यामुळे भगवंतांची जवळीक साधण्यास आधी स्वतःचे वर्तन त्यांना आवडेल असे करायला हवे का? हा प्रश्न साधकाच्या मनात उद्भवू शकतो. म्हणजे काय, तर निर्गुणी भक्तीरुपी साधना सुरु करायच्या आधी आपणांस कुठलीतरी पूर्वतयारी करायला हवी का या संदेहाचे निराकरण करण्यास भगवान वरील श्लोकातून त्यांची जगाकडे पहायची दृष्टी कशी आहे हे सांगितले आहे. भगवान म्हणत आहेत की मला सर्व लोक समान आहेत. ना मी कुणाचा द्वेष करतो ना कुणी मला अधिक प्रिय आहेत. परंतु जे माझे भक्त आहेत त्यांनाच मी प्राप्त होतो.” ते म्हणत आहेत की आपण सध्या जसे आहोत तसेच्यातसे त्यांना स्वीकाराह्य आहोत. त्यांच्या जवळ आपण पोहोचणार का नाही याबद्दलचा निर्णय ते घेत नाहीत तर आपण स्वतःच भक्त आहोत का नाही यावर घेत असतो.

इथे काही साधकांच्या मनात असा संदेह येऊ शकतो की जर भक्ती केल्यावरच भगवान प्रसन्न होत असतील तर एखाद्या व्यावहारीक व्यक्तीमध्ये आणि भगवंतांमध्ये तत्वतः काय फरक आहे? ज्याप्रमाणे दुकानातील एखादी वस्तू योग्य किंमत दिल्यावर आपणांस प्राप्त होते त्याप्रमाणे भगवंतांची आपल्याबद्दलची प्रीती आपण स्वतःच्या भक्तीची किंमत देऊन मिळवितो का? या मूलभूत शंकेला वरील श्लोकातून उत्तर मिळत आहे असे वाटते. (अव्यक्त) भगवंतांचे सर्वांवर एकसारखेच प्रेम आहे पण हे प्रेम इतके सूक्ष्म आहे की त्याची जाणीव होणे सोपे नसते. कॉलेजमध्ये एकतर्फी प्रेमात दुसऱ्या व्यक्तीला पहिल्याच्या मनातील प्रेमाची जाणीवच नसते तशी ही गोष्ट आहे. किंवा वीजेचे व्होल्टेज जर खूप कमी असेल तर वीज मोजण्याचे यंत्र वीज नाही असे दर्शविते तशी ही बाब आहे. वा जमिनीतील पाण्याचा जिवंत स्त्रोत विहीर खणली नसेल तर कळू शकत नाही त्याप्रमाणे भगवंतांच्या आपल्यावरील प्रेमाचा झरा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या कवचाने झाकलेला असल्याने कळत नाही. त्यामुळे साधकाच्या मनातील शंकेचे उत्तर असे आहे की भक्ती केल्याने भगवंतांचे प्रेम प्राप्त झाले असे होत नसून भक्तीने आपल्यावरील असलेल्या भगवंतांच्या निरंतर प्रेमाची जाणीव होते. आणि जेव्हा या प्रेमाची जाणीव होते तेव्हा आपोआप साधक कृतज्ञ होऊन भगवंतांशी जवळीक साधतो. भगवंतांच्या घराचे द्वार सदा उघडेच आहे पण जोपर्यंत आपले हृदय व्यावहारीक सृष्टीतून विरक्त होत ना तोपर्यंत आपणच तिकडे वळत नाही. मेरा घर खुला है खुलाही रहेगा तुम्हारे लिये असे भगवान या श्लोकातून सांगत आहेत असे आपण म्हणू शकतो. जरा विचार करा की जर आपण कुणावर एकतर्फी प्रेम करीत असलो तर काही काळाने समोरील व्यक्तीच्या दुर्लक्ष करण्याने आपले प्रेम हळूहळू कमी व्हायला लागते. परंतु आपण स्वतः जन्मोन्जन्मे भगवंतांकडे दुर्लक्ष करुन आपल्याच विश्वात मग्न आहोत तरी भगवंतांचे आपल्यावरील प्रेम आहे तसेच आहे! कारण वरील श्लोकात असे म्हटलेले नाही की विश्वाच्या सुरुवातील माझे सर्वांवर एकसारखे प्रेम होते आणि आता जे भक्त आहेत फक्त त्यांवरच आहे! भगवंतांची समदृष्टी विश्वौत्पत्तीपासून आहे तशीच आहे. ती कालातीत आहे, निरंतर आहे, शाश्वत आहे.

भगवान किती जगावेगळे आहेत हे अशा रीतीने दिसायला लागते. परंतु निव्वळ या विचाराने भगवंतांचे थोरपण पूर्णपणे स्पष्ट होत नाही! कारण अशा अपेक्षविरहीत प्रेमाची व्यावहारीक उदाहरणेही आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या आईचे आपल्या मुलावरील प्रेम किंवा पृथ्वीची सर्वांना आधार देण्याची तयारी वा वृक्षाची सर्वांना सावली देण्याची क्षमता इत्यादी. परंतु भगवंतांचे प्रेम या उदाहरणांपेक्षा वेगळ्याच जातीचे आहे कारण ते नुसते अस्तित्वात नाही तर सक्रियसुद्धा आहे. त्यांच्या या खेचण्याचे प्रमाण म्हणजे व्यावहारीक जीवनातील आपली कुठलीही इच्छा पूर्ण झाली तरी त्याने उत्पन्न झालेले समाधान कालानुसार नष्ट होणे हे होय. आपली शक्ती मर्यादीत असल्याने आपण कितीही अफाट कष्ट केले तरी त्यांनी मिळणारे फळ ठराविक काळाने नष्ट होते. वारंवार मिळालेल्या लाभाची हानी झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला की साधक आपोआप अढळ फळाबद्दल विचार करायला उद्युक्त होतो. अशाश्वततेने वारंवार पोळल्यावर प्रत्येक जीवाच्या मनात कधी ना कधी शाश्वत समाधानाला महत्व देण्याचा विचार येणार आहे! आणि या विश्वात असे एकच अचल ध्रुवपद आहे. ते म्हणजे भगवंतांचे पादकमल. त्यामुळे भगवंतचरणांची ओढ प्रत्येकाला लागणार आहे यात शंकाच नाही. (फक्त ती किती जन्मांनंतर लागणार आहे इतकाच प्रश्न आहे.) जगातील जीवांच्या कर्मांकडे दुर्लक्षकरुन त्या सर्वांना आपल्याकडे निरंतर ओढण्याच्या क्रियेने भगवान पूर्णपणे अद्वितीय होतात!

त्यामुळे असे स्पष्ट होते की वरील श्लोकातील निव्वळ माझे भक्तच माझ्याजवळ येतात या शब्दांत असे आश्वासनही आहे की मी सर्वांना माझी भक्ती करण्याशिवाय पर्यायच ठेवणार नाही. जो मनुष्य संवेदनशील असेल तो लवकर माझ्या संकेतांना ओळखेल आणि जे मनाने निबर असतील त्यांना मी आधी संवेदनशील करीन आणि मग ते माझ्याकडे येतील. स्थूलात रमलेल्या मानवांना सूक्ष्माची ओढ लावण्याचा भगवंतांचा उपाय म्हणजे व्यावहारीक संकटे. म्हणूनच महाभारतामध्ये कुंतीने भगवंताकडे माझ्यावर निरंतर संकटे येऊ देत (ज्यायोगे मझ्या मनातील तुझे स्मरण तीव्र होईल) असे मागणे मागितले होते. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणायचे की जीवनात आणिबाणीचा प्रसंग आल्याशिवाय खरी साधना सुरु होत नाही. अर्थात काही साधक (उदाहरणार्थ, सिद्धार्थ) जन्मापासूनच इतके संवेदनशील असतात असा प्रसंग दुसऱ्यावर आला तरी ते स्वतः सावध होतात. ज्याप्रमाणे सर्व नद्या शेवटी सागरालाच मिळतात त्याप्रमाने आपण सर्व निर्गुणी भक्तीतच रममाण होणार आहोत असे वरील श्लोकातून भगवान सांगत आहेत. स्वतःच्या जीवनात आपण व्यावहारीक इच्छेंचे किती बांध घातलेले आहेत यावर आपली अस्तित्वसरीता संगमापासून किती दूर आहे हे ठरते. अशा रीतीने आपण सर्वजण तात्विकरीत्या निर्गुणी भक्तीला पात्र आहोत. परंतु ती केव्हा सुरु होणार आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या उलट प्रमाणात (म्हणजे जेव्हढे व्यक्तिमत्व कमी तितकी भक्ती जास्त आणि जेव्हढा स्वतःबद्दलचा अहंकार जास्त तेव्हढी भक्ती कमी) अवलंबून आहे. इति.

हरि

*******************************************************************

 

अध्याय नववा  (श्लोक २८) :

निर्गुणी भक्तीचे फळ

 

 

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

 

शुभाशुभफलैरैवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः

संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥२८:

 

साधकाच्या मनातील एखादा प्रश्न, त्यावर उपाय असलेला साधनेचा मार्ग आणि त्यानंतर त्याचे महत्व स्पष्ट करण्यास त्याने उत्पन्न होणारी स्थिती सांगणे अशी अध्यायांची मांडणी गीतेत वारंवार दिसून येते. आठव्या अध्यायातील अध्यात्म म्हणजे काय इत्यादी प्रश्नांचे उत्तर दिल्यावर एव्हढे ज्ञान असण्याची जरुरी आहे का? या अर्जुनाच्या अनुच्चारीत प्रश्नाचे उत्तर म्हणून सहजपणे करता येणारा उपाय नवव्या अध्यायात राजगुह्ययोग म्हणून सांगितला गेला. आता पुढचे सहा श्लोक या मार्गाची भलावण करणार आहेत. दैनंदिन जीवनात कुठल्याही बाह्य सोपस्कारांचा बडेजाव करीता आपले नित्यनैमित्तिक जीवन भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करणे हा निर्गुण भगवंताच्या भक्तीचा मार्ग गेल्या दोन श्लोकांतून सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण या साधनेचे फळ सांगताना म्हणत आहेत की कर्म करीत असताना अनुसंधानात राहणारा (म्हणजे संन्यासयोगयुक्तात्मा) साधक शुभ अशुभ या दोन्ही कर्मांच्या बंधनांत अडकत नाही आणि (त्यामुळे आपोआपच, कुठलाही प्रयास करीता) त्यांच्या फळांपासूनसुद्धा मुक्तता प्राप्त करतो. (कर्मबंधनांतून) संपूर्णपणे मोकळा झालेला असा साधक मग माझ्याजवळ येतो.

. फळाची अद्वितीयता : काही कर्मांची फळे आपण बाह्य इंद्रियांतर्फे जाणू शकतो. उदाहरणार्थ, खूप अभ्यास केल्यावर एखाद्या परीक्षेत चांगले गुण मिळणे, वा नोकरीत जीवापाड कष्ट केल्याने बढती मिळणे, पैसे कमाविणे इत्यादी. परंतु काही कर्मे अशी असतात की ती केल्यानंतर जे फळ मिळते ते सूक्ष्म असते, फक्त कर्त्याच्या मनात त्या फळाचे पडसाद म्हणून एक समाधान उत्पन्न होते. उदाहरणार्थ, कठीण परीस्थितीतही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन योग्य वर्तन करणे. अशावेळी बाह्य जगाला कर्त्याला प्राप्त झालेल्या फळाची जाणीव होतेच असे नाही. परंतु निदान कर्ता इतरांना इतकेतरी सांगू शकतो की माझ्या मनात शांति उत्पन्न झालेली आहे. परंतु सतत भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचे फळ हे या दोन्हीहून निराळे आहे. हे फळ इतके सूक्ष्म आणि गुणातीत आहे, की मिळालेल्या स्थितीचे वर्णन करण्यास साधकाला कुठलेही शब्द सापडत नाहीत! माझ्या मनात निरंतर शांति आहे, वा मी नेहमी बरोबर वागतो इत्यादी कुठलेही शब्द या स्थितीचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे या निर्गुणी स्थितीला जाणून घेण्यास आपणास थोडे सखोल विचार करणे जरुरी आहे.

. कर्मबंधनांतून सुटणे याचे वर्णन : कुठल्याही कर्मांत भाग घेण्याआधी सर्वसाधारणपणे आपण एखादे व्यक्तिमत्व धारण करतो आणि त्याला योग्य असे वर्तन करतो. उदाहरणार्थ, घरी आपला मुलगा समोर आला की आपण पालक असे व्यक्तिमत्व अंगावर घेतो, संध्याकाळी मित्रांबरोबर नाक्यावर चहा पिताना स्वतःच्या तारुण्यरुपात विलीन होतो आणि गुरुगृही शिष्य या रुपात राहण्याचा प्रयत् करतो. एकदा स्वतःवर एखाद्या रुपाचे कवच घातले की कसे वाघायला हवे याचे नियम स्पष्ट होतात आणि समोर आलेल्या घटनेला आपण सामोरे जातो. इथे हे लक्षात घ्यायला हवे की दैनंदिन जीवनात स्वतःवर एखाद्या व्यक्तिमत्वाचा मुखवटा चढविण्यास आपली पूर्वकर्मे कारणीभूत असतात हे लक्षात घेणे जरुरी आहे. कुणालातरी आपण स्वतःचा मुलगा वा गुरु मानले आहे या जाणीवेशिवाय ना आपण पालक होऊ शकतो ना शिष्य. कर्मबंधने म्हणजे दुसरे काही नसून आपण हे वारंवार घातलेले मुखवटे आणि घेतलेल्या रुपाशी सुसंगत वागायची आपली धडपड होय. आणि कर्मबंधनांतून सुटका म्हणजे कुठल्याही परिस्थितीला सहजपणे, नैसर्गिकरीत्या सामोरे जाणे होय. आपण अगदी लहान असताना समोर आलेल्या कुठल्याही घटनेला स्वीकारत होतो आणि जसे शक्य असेल तसे सामोरे जात होतो. स्वतःची ही नैसर्गिक अवस्था आपण कोण आहोत याच्या अज्ञानाने उत्पन्न झालेली होती. आता भगवंतज्ञानानंतर (म्हणजेच आपण कोण आहोत हे कळल्यानंतर), परत त्या अवस्थेला प्राप्त करणे म्हणजे कर्मबंधनांतून सुटका मिळविणे असे म्हटले तर वावगे होणार नाही. म्हणूनच संतांचे वर्णन करताना ते लहान मुलासारखे निरागस असतात हे शब्द वारंवार उच्चारले जातात.

. शंकानिरसन : कुठल्यातरी रुपात स्वतःला घातल्याने वर्तनांत एक सातत्य येते. त्यामुळे या स्थितीचे वर्णन ऐकल्यावर कित्येक साधकांच्या मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की समाजात जर सहजपणे मी वागायला लागलो तर माझे वर्तन स्वैर होईल. अनिर्बंध होईल. मग माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचे काय होईल? परंतु या प्रश्नात एक मूलभूत चूक आहे. ती म्हणजे स्वैर वागणारा कोण आहे? लक्षात घेणे जरुरी आहे की बेजबाबदारपणे वागणे याची व्याख्या सापेक्ष आहे, व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, लहानपणी पुस्तके वाचण्यात वेळ घलवून पैसे कमाविणे हे स्वैर वागण्याचे नाही, तर अभ्यासूवृत्तीचे लक्षण आहे. परंतू हीच गोष्ट मोठेपणी केली तर जबाबदारी टाळणे आहे! त्यामुळे, स्वैर वर्तन करण्यास जरुरी असलेला एखाद्या व्यक्तिमत्वाचा पायासुद्धा नष्ट झालेला असल्याने, माझ्या व्यक्तिमत्वांचा नाश झाला तर मी स्वैर वागेन हे म्हणणे मूलभूतरीत्या चुकीचे आहे. म्हणूनच आपण बघतो की ज्यांच्या मनात स्वतःचे व्यक्तिमत्व सुस्पष्ट नसते अशी जंगली जनावरे स्वैर वर्तन करीत नाहीत. अर्थात, सहजपणे वागण्याचा पाया भगवंताचे अनुसंधान असणे हे महत्वाचे आहे. कामचोरपणाला वा स्वतःच्या शरीर-मनाला जपण्याला महत्व देऊन सहजपणे वागत आहे असे म्हणणे म्हणजे स्वतःला फसविणे आहे. सहजपणाने वागणे आपोआप झाले पाहीजे, प्रयत् करुन नाही! आपण सहजपणे वागत आहोत याची जाणीव कधीकधीच होते, इतरवेळी आपण नुसते आपोआप वागत असतो. अशावेळी साधक नेहमी भगवंताला अपेक्षित असलेले वर्तन सहजपणे करत असतो म्हणून ही अवस्था होणे म्हणजे भगवंताजवळ असणे होय.

. कर्मबंधनातून सुटका हे साधनेचे फळ आहे का? : अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात राहील्याने आपण कर्मबंधनांतून सुटतो असे शब्द ऐकल्यावर असे वाटू शकते की हे साधनेचे फळ आहे आणि आता काही करायचे शिल्लक राहीले नाही. पण ही भावना चुकीची आहे! सतत अनुसंधानात राहील्याने होते काय? तर आपल्या पूर्वकर्मांचे उरलेले भोग समोर येतात आणि त्यांना निर्द्वंदपणे सोसून आपण त्यांच्या बंधनातून सुटतो. यानंतर जी आपली अवस्था होते तीला कर्मसाम्य दशा म्हणतात. अशी अवस्था येणे हा या साधनेचा एक टप्पा आहे. हे या साधनेचे फळ नाही हे लक्षात घेणे जरुरी आहे. कारण कर्मसाम्यता प्राप्त झालेल्या क्षणानंतरसुद्धा आपले आयुष्य सुरु आहेच आणि नवी कर्मे आपल्याहातून घडत आहेतच. त्यांच्या बंधनातसुद्धा अडकणे जरुरी आहे! याकरीता कर्मसाम्य अवस्था आली तरी अनुसंधानात राहणे जरुरी आहे. त्यामुळे असे म्हणायला हवे की ही साधना करीत राहणे हेच या साधनेचे खरे फळ आहे! या गोष्टीला विसरणे अत्यावश्यक आहे. अनुसंधानात असणे ही साधना संपून मुक्ततेचे फळ मिळत नाही, तर ती निरंतर चालू राहणे हे या साधनेचे फळ आहे. कर्मबंधनांपासूनची मुक्ती हे एक आपोआप निर्माण झालेला परीणाम आहे! म्हणूनच जेव्हा माउलींनी सर्व साधकांकरीता पसायदान मागितले तेव्हा सुरुवातीच्या सर्व मागण्यांचा एका वाक्यात सारांश म्हणून असे मागितले आहे की साधक भौतिक आणि पारलौकीकरीत्या पूर्ण होऊन निर्गुणी भक्तीत नित्य रममाण राहो ( पूर्ण होऊनि तिहीं लोकीं भजिजो आदिपुरुखी निरंतर ज्ञा. पसायदान ). अशा रीतीने भगवंताजवळ जाणे (म्हणजेच नित्यानुसंधानात राहणे) हे निर्गुणी भक्तीरुपी साधनेचे खरे फळ आहे असे स्पष्ट होते. म्हणूनच वरील श्लोकाच्या अंतिम चरणांत तू माझ्याजवळ येशील असे आश्वासन भगवंतांनी दिले आहे! इति.

हरि

 

 

 

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक २६ आणि २७) :

एकलक्ष भक्तीची व्याख्या

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः २६:

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् २७:

गेल्या तीन श्लोकांतून निर्गुण भगवंताच्या एखाद्या ठराविक अवतारावर लक्ष केंद्रीत झाल्यावर भक्ताला कुठले फल प्राप्त होते याचे वर्णन केल्यावर आता निर्गुण भगवंताच्या भक्तीकडे भगवान वळले आहेत. वरील दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्णांनी अशा भक्तीची व्याख्या केली आहे. गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण भगवंताच्या एखाद्या ठराविक रुपावर लक्ष केंद्रीत करतो तेव्हा आपोआप आपणांस भक्ती म्हणजे काय हे स्पष्ट होते. ते म्हणजे त्या रुपाला आवडेल असे वर्तन करणे. त्यामुळे वैष्णव भक्त तुलसी घेऊन भगवंताकडे जातात तर शैव बेलपत्राशिवाय शिवमंदीरात जात नाहीत. आपण सर्वजण स्वतःच्या मनातील प्रेमाला बाह्यजगात व्यक्त करण्यास उद्यमशील असतो. त्यात भक्तीचे असे मर्यादीत रुप समोर आले की त्याने आपले जीवन जगण्यास एक सुनिश्चित आकार मिळतो. रामनवमीला भजन करणे वा शिवजयंतीला रात्री जागरण करणे इत्यादी. नियमबद्ध चाकोरीचे जीवन जगणे सोपे असल्याने सगुण रुपाचे ध्यान करणे सर्वसामान्य साधकांना आकर्षित करते. याउलट जो भगवंत सर्व जीवांत भरुन आहे त्याला या जगातील सर्व गोष्टी एकसारख्याच आवडतात. त्यामुळे कुठलीही एक ठराविक क्रिया वा वस्तू त्याला प्रिय आहे असे आपण म्हणू शकत नाही (कारण कुठल्याही क्रियेच्या विरुद्ध क्रियासुध्दा त्याला प्रिय आहेत!). अशा परिस्थितीत आपल्यामधील सर्वव्यापी भगवंताबद्दलचे उफाळून येत असणारे प्रेम व्यक्त कसे करावे याबद्दल साधकाच्या मनात संदेह उत्पन्न होतो. म्हणून सर्वव्यापी भगवंताच्या भक्तीचे रुप दर्शविणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीशंकरांनी स्वर्गातील गंगेचा स्त्रोत डोक्यावर झेलून जगाला पेलेल असा एक छोटा स्त्रोत सोडला, त्याचप्रमाणे आपल्या हृदयात गुरुकृपेने निर्माण झालेल्या ज्ञानोत्तर भक्तीच्या गंगेला बुद्धीरुपी माथ्यावर झेलून दैनंदिन कृतींतून बाहेर सोडणे असे या भक्तीचे रुप होते. सगुण रुपाची भक्ती प्रत्येक भक्ताच्या जीवनात एकच रुप घेते कारण त्या विशिष्ट रुपाला जे आवडते तसे प्रत्येकजण वागायचा प्रयत् करतो. याउलट साधकाच्या जीवनातील निर्गुण भगवंताच्या भक्तीरुपी गंगोत्रीचे रुप व्यक्तीप्रमाणे भिन्न असते, त्याचे दररोजचे जीवन जसे असेल त्याप्रमाणे त्याची अंतर्गत भक्ती बाह्य रुप धारण करते.

परंतु वरकरणी वेगवेगळ्या दिसणाऱ्या भक्तींमध्येही समानता आहे. वरील श्लोकांतून भगवान प्रथम भक्तींतील विभिन्नता दर्शवून मग त्यांतील समान धागा सांगत आहेत. ते म्हणत आहेत की (माझ्या निर्गुण रुपावर प्रेम ठेऊन) जो कोणी मला एखादे पान, फुल, फळ वा (अतिशय मूल्यहीन) उदक अर्पण करतो त्या प्रत्येक वस्तूला, मी त्या कृतींमागील प्रेमाकडे लक्ष ठेऊन, आनंदाने स्वीकारतो (२६). (खरे म्हणजे) स्वतःच्या दैनंदिन जीवनातील खाणे, पिणे, नित्यकर्म करणे इत्यादी जे आपले वर्तन असते तेच जर (आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाचा आधार घेता) भगवंताच्या अनुसंधानात केले तर ती (आपोआपच) माझी भक्ती होते (२७) .”

सर्व गोष्टींत जर भगवान आहे तर एखादी गोष्ट निषिद्ध कशी असू शकेल? या वस्तुस्थितीचा परीणाम म्हणजे जेव्हा आपणास निःसंदेहपणे असे जाणवते की निर्गुण भगवंत सर्व चराचराला व्यापून आहे त्यावेळी आपल्याला एक अमर्याद स्वातंत्र्य प्राप्त होते. ते म्हणजे स्वजीवनात कसेही वर्तन करणे. त्यामुळे साधकाचे वर्तन निर्बंध होऊ शकेल असा संदेह उत्पन्न होऊ शकतो. परंतु जर आपले ज्ञान निव्वळ बौद्धीक नसेल तर या अनिर्बंध स्वातंत्र्याबरोबरच त्या मोकळीकीचा फायदा घेऊ इच्छीणारे आपले संकुचित व्यक्तिमत्वदेखील नष्ट होते. उदाहरणार्थ, लहानपणी असे वाटायचे की जवळ पैसे असते तर दररोज चॉकलेट, आईसक्रीम खाल्ले असते. आज त्या गोष्टींचे आकर्षण असलेले व्यक्तिमत्व नाहीसे झाले असल्याने पैसे असूनही त्या वस्तू दररोज खाल्ल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे, मनमानी करण्याची इच्छा कोणाची असते? आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाची. भगवंतज्ञानाच्या गंगेत न्हाल्याने आपल्या अस्तित्वावर जमलेला व्यक्तिमत्वाचा मळ नष्ट होतो. त्यामुळे स्वव्यक्तिमत्वाला पुष्टी देणे हा हेतू भक्ताला निरर्थक दिसायला लागतो. म्हणून कसेही वागायचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्याच्या हातून अयोग्य वर्तन होत नाही. म्हणजे काय? तर जेव्हा ज्ञानोत्तर भक्ती असलेल्या साधकाला एखाद्या घटनेत भाग घ्यावा लागतो तेव्हा त्या घटनेशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट त्याला महत्वाची वाटत नाही. उदाहरणार्थ, आज मी असा वागलो तर उद्या माझी प्रतिमा काय होईल वा काल मी एका विशिष्ट पद्धतीने अशा घटनेला सामोरा गेलो होतो मग आज मला तसेच वागायला हवे इत्यादी विचारांचे महत्व त्याच्या मनातून नष्ट होते. याचा अर्थ असा की निर्गुण भगवंताचे खरे ज्ञान साधकास कुठल्यातरी एका साच्यात बद्ध होऊ देत नाही. प्रत्येक क्षणी समोर आलेल्या घटनेला नाविन्याने सामोरे जाणे या शब्दांचा अर्थ आपणास कळायला लागतो. तो म्हणजे आपले आधीचे ज्ञान विसरणे नव्हे तर पूर्वकल्पनांचे आपल्यावरचे वर्चस्व नष्ट होणे. स्वतःच्या पूर्वकर्मांबद्दलचे वैषम्य भविष्यकाळाबद्दलची काळजी या दोन गोष्टींचा आपल्यावरील ताबा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त असतो. ही मुक्तता अतिशय बेजबाबदार व्यक्तीतही असते. परंतु भक्ताच्या मुक्ततेचा पाया भगवंतभक्तीचा असतो, स्वतःची मनमानी करण्याचा नसतो. त्यामुळे त्याच्या मनात निरंतर शांति असते ज्याचा अभाव बेजबाबदार व्यक्तींत दिसून येतो. ही आपोआप उत्पन्न झालेली स्वयंभू शांति म्हणजे भगवंतांनी आपली सेवा स्वीकारली याची पावती आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे.

स्वतःला आपण सर्वसाधारणपणे सुखी समजतो, पण आपल्यापैकी कितीजणांनी काहीही करीता, कुठल्याही भौतिक वा मानसिक कारणाशिवाय आलेली आनंदाची उर्मी अनुभवलेली आहे? गाडी चालविताना, स्वतःच्या आजारी मुलाची काळजी घेताना वा शारीरीक कष्ट करताना सुद्धा जेव्हा मनात आनंदाचा घडा भरभरुन वहायला लागतो तेव्हा आपण भगवंतभक्तीत रममाण असतो. याउलट जर पूजा करतानासुद्धा जर मनात कारणविरहीत आनंद भरलेला नसेल तर आपण निर्गुण भगवंताला विसरलेलो आहोत. जोपर्यंत आपल्या मनात भगवंतसान्निध्याची ही शांतिरुपी रोकडी पावती पोहोचलेली नाही तोपर्यंत आपले निर्बंध वर्तन म्हणजे स्वव्यक्तिमत्वाचेच एक रुप आहे, स्वतःला फसविणे आहे, आणि ज्या ज्ञानावर आपले असे मुक्त वर्तन उभारलेले आहे ते ज्ञान पोकळ आहे. निर्गुण भगवंताच्या भक्तीची ही मेख गीतेतील या अध्यायात उघडपणे मांडलेली आहे. या अध्यायाच्या अंतिम श्लोकात या साधनेचे पुनरुच्चारण होईल तेव्हा आपण परत एकदा यावर विचार करु. आज इतकेच.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक २३-२५) :

एकलक्ष भक्तीची आवश्यकता

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयाऽन्विताः

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् गीता २३:

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता प्रभुरेव

तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चयवन्ति ते गीता २४:

यान्ति देवव्रता देवान् पितृन् यान्ति पितृव्रताः

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् गीता २५:

नवव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकातून भगवंतांचे खरे रुप जाणून भक्ति करणाऱ्या साधकांना कुठले फल मिळते हे सांगितले. वरील श्लोकांतून इतर सर्वसाधारण भक्तांना काय मिळते याबद्दल सांगताना भगवान म्हणत आहेत: (माझ्या अनंत रुपांपैकी) काही ठराविक रुपांवर परमभक्ती करणारेही खरे म्हणजे माझेच भक्त आहेत, परंतु त्यांची भक्ति विधीपूर्वक नसते (२३). (खरी गोष्ट अशी आहे की) कुणाचीही भक्ती केली तरी ती माझीच भक्ती असते. पण या वस्तुस्थितीबद्दल भक्त अनभिज्ञ असल्याने त्यांची साधना अपुरी राहते (२४). म्हणून, असे भक्त ज्या ज्या इष्ट देवतेची भक्ती करतात, त्या त्या देवतेच्या लोकांत त्यांना गति मिळते. फक्त मला जाणून भक्ति करणारेच माझ्यापर्यंत पोहोचतात (२५).”

आपणास या श्लोकांतून भगवान साधनेचे लक्ष्य साधकाच्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे हे सांगत आहेत. भगवंताकडे जाण्यास प्रत्येक साधक उत्सुक असला तरी भगवंताचे कुठले रुप त्याच्या मनात आहे हे महत्वपूर्ण आहे. लक्षात घ्या की जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात परमार्थ म्हणजे काय, किंवा भगवंताचे रुप कसे आहे याबाबत सुनिश्चित कल्पना असतात. उदाहरणार्थ, कोण म्हणते की दीनदुबळ्यांना मदत करणे म्हणजेच भगवंताची पूजा होय, तर कुणी स्वतःकडे दुर्लक्ष करुन कुटुंबातील व्यक्तींची योग्य काळजी घेण्यात साधनेची परमावधी मानतो. कुणाला समोरील व्यक्तीच्या समाधानात भगवंत दिसतो तर कुणी आपले (व्यावहारीक) कर्म कुशलतेने करण्यात भगवंताची भक्ती आहे असे मानतो. या वस्तुस्थितीचा एक परीणाम म्हणजे सिनेमातील नटांपासून राजकारणी व्यक्तीपर्यंत प्रत्येकजणांची भगवान म्हणजे काय याबद्दलची व्यक्तव्ये वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवणीत छापून आलेली दिसतात. जर या सर्वांनासुद्धा भगवान म्हणजे काय हे कळले असेल तर यांच्यात आणि संतांमध्ये काय मूलभूत फरक आहे? किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर एखाद्या प्रसिद्ध कवीने लिहीलेल्या भक्तीगीतात आणि श्रीसंत तुकारामांच्या अभंगात काय फरक आहे? असे प्रश्न साहजिकपणे निर्माण होतात. वरील श्लोकांतून भगवान आपणास हा फरक सांगत आहेत असे वाटते. प्रत्येकजण आपापल्या मतिनुसार देवाची साधना करीत असला तरी पूर्ण ज्ञान नसलेले साधक जास्तीतजास्त त्यांच्या इष्ट देवतेच्या स्थानापर्यंतच पोहोचू शकतात. आपणांस जर भगवान श्रीकृष्णांपाशी जायचे असेल निव्वळ संतांच्या सांगण्यावरच आपण विश्वास ठेवायला हवा. कारण केवळ त्यांचीच वक्तव्ये ज्ञानोत्तर भक्तीवर आधारीत असतात.

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, वरील श्लोकांतील चेतावणी निव्वळ भगवान श्रीकृष्णांच्या निर्गुण रुपाकडे दुर्लक्ष करुन इतर देवतांना भजणाऱ्या भक्तांसाठीच आहे असे नव्हे तर भगवंताच्या खऱ्या रुपाकडे लक्ष ठेऊन सुरु केलेल्या साधनेत मग्न असलेल्या साधकांनाही आहे. कारण अशा साधनेच्या मार्गात क्षणोक्षणी क्षुद्र अपेक्षेंचे अनंत फाटे फुटत असतात. वरकरणी समांतर दिसत असलेले हे मार्ग हळूहळू वळण घेऊन काही काळाने वेगळ्याच स्थानाला घेऊन जातात. प्रसिद्धीची अपेक्षा, गुरुकृपेने झालेल्या ज्ञानाबद्दलचा अभिमान, आपलाच मार्ग योग्य आहे अशी खात्री इत्यादी भावना साधकाच्या जीवनात अतिशय सूक्ष्मपणे शिरतात आणि नंतर इतक्या प्रभावी होतात की साधना व्यवस्थित चालू ठेवणारे साधकसुद्धा सर्वोच्च पदाला पोहोचता वेगळ्याच ठीकाणी स्थिर होतात. अशी मूळ लक्ष्याहून भिन्न असलेली स्थिती वरकरणी कितीही लोभनीय असली तरी त्यामधील अवस्था शाश्वत नसते. उदाहरणार्थ, आज सर्व जगानी आपल्याला मान दिला तरी उद्या तेव्हढाच मान मिळेल याची खात्री नसते, आपल्या ज्ञानाइतकेच (किंवा जास्त) ज्ञान असलेले इतर साधक असण्याची शक्यता असते इत्यादी. साधकाच्या अवस्थेची अशाश्वतता त्याच्या मनात अशांति किंवा भय निर्माण करते आणि मग त्याचे लक्ष सद्यपरीस्थितीची अस्थिरता नष्ट करण्याकडे वेधले जाते भगवंतापासून विचलित होते.

अशा रीतीने अतिशय प्रामाणिकपणे गुरुपोनिर्दिष्ट्य साधनेत मग्न असलेले साधकही सर्वोच्च पदापासून वंचित राहण्याचे मूळ कारण वरील श्लोकांतून सुस्पष्ट होते. साधनेच्या राजमार्गापासून निघालेले अनंत मानसिक फाटे सुरुवातीला इतके समांतर असतात की त्यांच्यात आणि साधनेत फार फारक दिसत नाही. त्यांच्यातील फरक नजरेसमोर आणून, तिकडे दुर्लक्ष करुन, मूळ मार्गावर चालत राहणे नुसते अवघड नाही तर अशक्य आहे. निव्वळ सद्गुरुकृपेनेच साधकाला मार्गातील धोक्यांची निरंतर जाणीव होऊ शकते. ज्या लहान बालकाचा हात आईने धरलेला असतो (बाळाने आईचा हात धरुन उपयोग होत नाही!) तो रस्त्यांतील सर्व अडथळ्यांपासून वाचून सुखरुप घरी पोहोचतो त्याचप्रमाणे ज्या भाग्यवान साधकाचा हात गुरुंनी धरलेला आहे त्यालाच सर्वोच्चपदाची प्राप्ती होते. अंतःस्फुरणेतून सद्गुरु सतत शिष्याला योग्य मार्गाची जाणीव देत असतात. ज्या साधकांचे लक्ष अशा ईशारांकडे असते तो मार्गातील विश्रांतिस्थळात अडकून रहात नाही अंतिम साध्य हस्तगत करतो. वरील श्लोकांतून भगवान आपणांस स्वतःच्या जीवनातील गुरुंचे महत्वसुद्धा सांगत आहेत असे वाटते. इति.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक २२ ):

निरंतर शांतिनिष्काम भक्तीची खूण

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

अनन्याश्चिन्तयन्तो मां जनाः पर्युपासते

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् २२:

भगवंताच्या सर्वव्यापी अस्तित्वाला जाणणाऱ्या भक्तांचे दोन प्रकार असतात आणि त्यातील व्यावहारीक इच्छांचा लोप झालेल्या भक्तांची उन्नती कशी तात्पुरती असते हे आपण २० आणि २१व्या श्लोकांच्या विवरणात बघितले. आता या श्रीमद्भगवद्गीतेतील अतिशय प्रसिद्ध श्लोकातून निव्वळ भगवंतभक्तीला प्राधान्य देऊन जगणाऱ्या भक्तांबद्दल बोलताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत: बाकी कुठलीही इच्छा महत्वाची मानता निव्वळ माझ्यावर प्रेम ठेऊन दैनंदिन जीवन जगणाऱ्या भक्तांची काळजी (क्षेम) आणि जवळीक (योग) मी स्वतः सांभाळून घेतो (गीता २२:).”

आपल्या जीवनातील बहुतांशी घटना नियमबद्ध असतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर दात घासणे, भूक लागल्यावर खाणे इत्यादी. परंतु बऱ्याचवेळा आपणास समोरील प्रसंगाला तोंड देण्यास विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, घरातील व्यक्तींची मर्जी सांभाळणे, कचेरीत सहकाऱ्यांशी कितपत संबंध ठेवणे इत्यादी. आपण या दुसऱ्या प्रकारच्या गोष्टींवर प्रतिक्रिया कशी देतो यातून आपले व्यक्तिमत्व दृष्यरुपात समोर येते. उदाहरणार्थ, घरात मनासारखे घडल्यावर जर आपण आरडाओरड करत असलो तर आपण रागीट आहोत आणि जर तसे होण्यामागचे कारण संतुलितपणे शोधत असलो तर समजुतदार आहोत इत्यादी (जर आपल्या वर्तनातून कुठलाही निष्कर्ष निघत नसेल तर आपण बेभरवशी आहोत असे म्हणायला हरकत नाही). त्यामुळे, विचार करुन तोंड द्याव्या लागणाऱ्या घडामोडींत स्वतःचे वर्तन कसे होते हे बघितले तर आपण आपले व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो.

जोपर्यंत देह अस्तित्वात आहे तो पर्यंत मनात इच्छा येणे साहजिक आहे. त्यामुळे साधकाने निष्काम होणे म्हणजे मनात कुठलीच इच्छा नसणे अशी अवस्था होणे नसून, मनातील इच्छा आपल्या वर्तनाला आकार देणे थांबणे होय. ही गोष्ट ओळखणे कठीण आहे. परंतु निष्काम भक्तीची दृष्य खूण आहे ती म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा लोप. भगवंताचे सर्वव्यापी रुप जाणून त्याच्या भक्तीत रममाण होणाऱ्याचे व्यक्तिमत्व नाश व्हायला लागते कारण निर्गुण, विश्वव्यापी भगवंताचे ध्यान करणे आणि संकुचित व्यक्तिमत्व बाळगणे या दोन गोष्टी इतक्या परस्परविरोधी आहेत की त्या एकत्र नांदणे असंभव अहे. त्यामुळे साधकाला आपली भक्ती निष्काम आहे की नाही हे कळण्याचा मार्ग म्हणजे स्वतःवर आपल्याच व्यक्तिमत्वाचा पगडा कितपत आहे हे बघणे. आता स्वव्यक्तिमत्वाचा नाश होणे म्हणजे काय? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपण स्वतःला सांभाळणारच, ज्यायोगे आपले व्यक्तिमत्व आहे असे वाटणारच. व्यक्तिमत्व नष्ट होणे याचा अर्थ असा की आपले व्यक्तिमत्व नक्की काय आहे हे कळायला मार्ग शिल्लक राहणे. आपण वर बघितले की विचार करुन वागावे अशा घटना जोपर्यंत आपल्या जीवनात अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपण स्वतःचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो. त्यामुळे भगवंताचे निरंतर अनुसंधान ठेवणाऱ्या साधकांच्या जीवनात विचार करुन वागावे अशी घटना रहात नाही हे स्पष्ट होते. एखादे लहान बालक जसे प्रत्येक गोष्टीला सहजपणे सामोरे जाते त्याप्रमाणे अशा भक्ताची अवस्था असते (आणि लहान बालकाचे व्यक्तिमत्व काय आहे हे तो मोठा होईपर्यंत कळत नाही).

त्यामुळे निष्काम भक्त एखाद्या बालकाप्रमाणे जीवनाला सामोरे जातो हे स्पष्ट होते. दैनंदिन जीवनात बालकावस्थेत राहण्याचा परीणाम म्हणजे स्वतःला अनुकूल गोष्टी घडतीलच याचा भरंवसा नष्ट होणे. किंबहुना तशा घडणार नाहीत याचीच जास्त शक्यता असते. म्हणूनच ही अवस्था सर्वसाधारण साधक टाळत असतो. आपणा सर्वांना आधी संसार सांभाळ आणि मग तुझा काय परमार्थ आहे तो कर असा सल्ला हितचिंतकांकडून अनेकवेळा मिळतो याचे मूळ कारण हेच आहे. स्वतःचे जीवन अनिश्चिततेत जगणे कुणाला पसंत आहे?! म्हणूनच बहुतांशी साधक परमार्थाचे तत्व संपूर्णपणे जाणूनसुद्धा स्वतःला सांभाळून भक्ती करतात. परंतु, क्वचित एखादा साधक भगवंतभक्तीतील हा शेवटचा अडथळासुद्धा ओलांडून स्वतःचे जीवन बेदरकारपणे भगवंतभक्तीत संपूर्णपणे झोकून देतो. लहान बालकाला ज्याप्रमाणे सांभाळण्यास पालक जबाबदार असतात त्याचप्रमाणे या बालकावस्थेतील प्रौढाला कुणीतरी सांभाळणे अत्यावश्यक असते. (याचे एक पराकोटीचे उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. ते कालीमातेच्या भक्तीत इतके भान विसरायचे की दिवसेंदिवस खाणे खायचे विसरायचे! त्यांचा भाचा हृदयनाथ जबरदस्तीने त्यांच्या मुखात कधी एक-दोन चमचे दूध वा भात घालायचा म्हणून त्यांचा देह अस्तित्वात राहीला.) या विवेचनावरुन परमभक्ताची कुणीतरी दुसऱ्याने काळजी घेणे जरुरी आहे हे स्पष्ट होते. या वस्तुस्थितीमुळेच वरील श्लोकातून भगवान असे आश्वासन देत आहेत की जेव्हा भक्त निष्काम भक्तीत स्वतःला विसरतो तेव्हा लहान अर्भकाची सर्व काळजी जशी आई (अतिशय प्रेमाने) घेते त्याहीपेक्षा अधिक काळजी घ्यायला मी स्वतः पुढे येतो.

परंतु अनन्य भक्ताचे आयुष्य सुरळीत जाईल याची काळजी मी घेतो या भगवंतांच्या आश्वासनामध्ये एक मेख आहे. ती म्हणजे सुखी असणे म्हणजे काय याची व्याख्या. सर्वसामान्यपणे स्वतःचे शरीर तंदुरुस्त असणे, आपल्या कुटुंबियांचे कल्याण होणे आणि भविष्याची तरतूद असणे अशा स्थितीला आपण सुखी असणे म्हणतो. परंतु खरी गोष्ट अशी आहे की आपल्या मनातील अस्वस्थता निघून जाणे हे आपण सुखी होण्याचे कारण आहे. याचा अर्थ असा की जीवनात सर्व ठीक आहे ही आपली समजूत होण्याचे मूळ कारण स्वतःच्या मनातील शांतता आहे. म्हणून जो साधक कुठलीही पर्वा करता निव्वळ भगवंतभक्तीत स्वतःला झोकून देतो त्याची काळजी घ्यायला भगवान त्याच्या मनात निरंतर शांती ठेवतात. अशावेळी कदाचित इतर लोकांच्या दृष्टीत साधकाचे जीवन अतिशय खडतर दिसत असण्याची शक्यता आपण नाकारु शकत नाही. म्हणजे काय तर ज्या साधकाची काळजी स्वतः भगवान घेत आहे त्याला एखादवेळेस दोन वेळचे अन्न मिळत नसेल, कदाचित त्याच्या घरी त्याला कुणी मान देत नसेल आणि त्याच्या मनाप्रमाणे या जगात काहीच घडत नसेल. परंतु तरीसुद्धा त्याच्या मनात कायम शांति असणार यात शंका नाही! भगवंताचे योगक्षेम वहाम्यहम्‌’ या वचनाचा संदर्भ भारतीय जीवन विमा निगम सारखा बाह्यबाबतीत नसून संपूर्णपणे अंतर्गत आहे. आपले जीवन सुरळीत आहे याची जाणीव फक्त त्या भाग्यवान साधकाला असते. त्याच्या कुटुंबियांनासुद्धा तसेच वाटेल याची जबाबदारी भगवान इथे घेत नाहीत हे जाणणे जरुरी आहे! याचे एक उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी श्रीसंत शारदामाता होय. कित्येक वर्षे त्या दक्षिणेश्वराच्या मंदिरात अतिशय कठीण परिस्थितीत राहल्या. जिन्याखालच्या खोलीत दिवसभर रहायचे, तिथेच अनेक लोकांचा स्वयंपाक करायचा, आणि अनेक महिन्यांतून कधीतरी एकदा श्रीरामकृष्णांबरोबर एकट्याला थोडा वेळ मिळणे अशी त्यांनी अनेक वर्षे काढली. पण नंतर त्या स्वतः त्या काळाबद्दल म्हणाल्या की तेव्हा इतकी प्रतिकूल स्थिती असतनासुद्धा माझ्या हृदयात एक आनंदाने भरलेला हंडा असायचा, जो निरंतर ओसंडून वहायचा. त्यामुळे मी दुःखात आहे या भावनेचा स्पर्शसुद्धा तेव्हा मला कधी झाला नव्हता. भगवंतांची भक्तांची काळजी घेण्याची पद्धत अशी आहे! भक्ताच्या ते मनात आनंदाचा घडा निरंतर भरलेला ठेवतात मग भले त्याचे बाह्य जीवन लौकीकरीत्या सुरळीत असेल वा नसेल. त्यांच्या अशा क्षेम घेण्यातच आपोआप योग होतो. बाह्य जीवन मनासारखे झाले तरी योग होईल याची खात्री आपण देऊ शकत नाही. पण या देवदत्त शांतीतच योग भरलेला आहे (म्हणूनच पुढे बाराव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात भगवान म्हणतील की सर्व गोष्टींमधील श्रेयस्कर गोष्ट म्हणजे निरंतर शांति होय).

थोडक्यात सांगायचे झाले तर अनन्य भक्तांचे जीवन सुखरुप होते यात शंका नाही. पण हे सुख संपूर्णपणे अंतर्गत असून फक्त त्या भक्ताचा त्यावर मालकीहक्क असतो. त्याच्या बाह्यजीवनात कुणी कितीही जवळ असले तरी त्याला ते सुख मिळेल असे भगवान कुठेही म्हणाले नाहीत हे लक्षात ठेवणे जरुरी आहे! आपण भक्तीत मग्न राहीलो तर प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घेईल असा समज असणाऱ्यांनी प्रामाणिकपणे विचार करायला हवा की आपल्याला अशा सुखाबद्दल खरोखर ओढ आहे का?

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक २० आणि २१):

निष्काम भक्तीची आवश्यकता

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् गीता २०:

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते गीता २१:

परमार्थाचे ज्ञान होण्यास भगवंताचे खरे रुप जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच नवव्या अध्यायातील सोळाव्या श्लोकाच्या अहं क्रतु .. पासून एकोणीसाव्या श्लोकातील .. सदसच्चाहमर्जुन पर्यंत भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचे सर्वव्यापी रुप प्रगट केले आहे. भगवंताच्या कुठल्यातरी विशिष्ट रुपालाच सर्वस्व मानता या विराट रुपाची पूर्ण कल्पना असलेले साधक विरळाच आढळतात. ज्या साधकांना या रुपाची ओळख नाही त्यांची दिशाभूल कशी होते हे आपण पुढे बघूच (श्लोक २३ ते २५), परंतु इथे, वरील दोन श्लोकांतून, निव्वळ ज्ञान असणेसुद्धा पुरेसे असत नाही हे भगवंतांनी सांगितले आहे. भगवंताच्या विश्वव्यापी रुपाची जाणीव असणारे साधकसुद्धा प्रपंचात कसे अडकतात हे सांगताना भगवान म्हणत आहेत की (मला संपूर्ण जाणून घेऊन मग) सोमरसाचा आस्वाद घेणारे, ज्यांच्या पापांचा क्षय झाला आहे असे साधक जेव्हा वेदांच्या सांगण्यानुसार माझी भक्ति करताना स्वर्गाची इच्छा धरतात तेव्हा त्यांना स्वर्गप्राप्ती होऊन तेथील उपभोग प्राप्त होतात (२०). स्वर्गलोकातील अनंत भोगांचा लाभ घेण्याने त्यांची (जमा केलेली) पुण्ये खर्च होतात आणि ते मृत्यूलोकात परत येतात. अशारीतीने वेदांनुसार कर्मकरणारे आपल्या इच्छांनुसार (स्वर्ग आणि पृथ्वी अशा) निरंतर येरझाऱ्या घालत असतात (२१) .”

जगात सूक्ष्म गोष्टीचा आनंद जाणणारे क्वचित आढळतात. उदाहरणार्थ, शास्त्रीय संगीतापेक्षा चित्रपटातील गाणी जास्त लोकप्रिय असतात, पौष्टीक खाण्यापेक्षा चमचमीत आहार आवडतो आणि सखोल विचार शांतपणे सांगणाऱ्यांपेक्षा भावनिकपणे, टाळ्या पडतील असे बोलणारे चतुर वक्ते आवडतात. ही गोष्ट पारमार्थिक साधकांनाही लागू पडते. बरेचसे साधक गुरुंकडे एखाद्या साचेबद्ध साधनेच्या शोधात येतात. स्वतःला ठराविक नियमांमध्ये बांधून, समविचाराच्या व्यक्तींच्या सान्निध्यात काल व्यतीत करणे यामध्ये साधनेची परीसीमा आहे अशी त्यांची विचारधारणा असते. या दृष्टीकोनाने साधकांचे विश्व सिमीत होते आणि सीमारेखा असलेल्या प्रांगणात विश्वरुपी भगवंताला बघणे अशक्य आहे. परंतु काही साधक साधनेला एका चौकटीत वावरायचे बंधन घालता स्वतःच्या संपूर्ण जीवनाचे प्रांगण बहाल करतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना म्हणजे साधनेचे रुप आहे अशी त्यांची खात्री असते. वेदांमधील भक्ती म्हणजे बाकी काही नसून आपल्या संपूर्ण अस्तित्वाला भगवंतात विलीन करणे आहे याची जाणीव त्यांना असते. परंतु असे साधकसुद्धा संसारचक्रात अडकून पडू शकतात असे भगवान या दोन श्लोकांतून सांगत आहेत.

आपल्या मनात कुठल्या इच्छा दडलेल्या आहेत हे कळणे अशक्यप्राय आहे कारण मन स्वतःच्या कामना दडविण्यात अतिशय चलाख आहे. परंतु सुप्त इच्छा जेव्हा जागृतावस्थेत यायला लागतात तेव्हा आपले वागण्यातील संतुलन जाते. आणि ही गोष्ट लपून रहात नाही. इच्छांच्या या वैशिष्ट्यामुळे आपणापुढे स्वतःच्या लपलेल्या इच्छांना जाणण्याचा एक मार्ग उपलब्ध होतो. तो म्हणजे स्वतःच्या दैनंदिन वर्तनाकडे तटस्थेपणे पाहून जेव्हा एखाद्या प्रसंगात आपले संतुलन जाते तेव्हा आपली कुठलीतरी इच्छा कार्यांन्वित झाली आहे असे निःशंकपणे समजणे. संतुलन जाणे म्हणजे काय, तर त्या प्रसंगाला योग्य तऱ्हेने सामोरे जाता भावनिकपणे तोंड देणे होय. अचानक प्रेमाचा खूप पुळका येणे वा प्रचंड राग येणे या दोन्ही गोष्टींतून समदृष्टीचा विनाश दिसून येते हे जाणणे जरुरी आहे. जेव्हा आपली अशी अवस्था होते तेव्हा आपण भगवंतभक्तीला विसरून आपल्या व्यक्तिमत्वात अडकलेलो असतो. आणि एकदा संकुचित व्यक्तिमत्वाचा स्वीकार केला की स्वतःच्या देह वा मनाने केलेल्या कर्मांच्या बंधनांना आपण टाळू शकत नाही. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या चक्रांत गुंतण्याखेरीज आपणास पर्याय रहात नाही. सबंध आयुष्य भगवंतभक्तीत व्यतीत करुनही जर शेवटी काही इच्छा राहीली असेल तर परत जन्म घ्यावा लागतो ही गोष्ट आपणांस पुराणातील भरतराजाची कहाणी सांगते. परम भगवंतभक्ती असूनही हरीणाच्या पिल्लावर प्रेम असल्याने त्याला परत दोन जन्म घ्यावे लागले (एक हरीणाचा आणि दुसरा जडभारताचा). लक्षात घ्या की आपल्या आयुष्यात साधनेचे उपचार कठीण नसले तरी निव्वळ साधनेच्या मार्गावर निरंतर राहणे ही आपल्यावरची जबाबदारी सांभाळणे कठीण असते. परमार्थाचा मार्ग खडतर आहे तो याच कारणानी. कारण सर्वसाधारणपणे, साधना सुरु करताना जो उत्साह असतो तितकाच उत्साह दहा-बारा वर्षांनंतर रहात नाही! उदाहरणार्थ, पहिल्यांदा वारी करताना आपले मन खूप तरल आणि संवेदनाशील असते. त्यामुळे पहिल्या वारीत आपले सर्व लक्ष साधनेकडे असते. एकदा वारीची सवय झाली की मनाची तशी अवस्था रहात नाही! अतिपरिचयात् अवज्ञा हा नियम साधनेला (आणि गुरुंना) सुद्धा लागू पडतो.

स्वतःचे मन साधनेविषयी निबर झाले की मगच मनात इच्छांचा वावर सुरु होतो. त्यामुळे जीवनात ऐहिक वा पारलौकीक इच्छांचा प्रवेश होऊ नये यासाठी आपणापुढे एक उपाय निर्माण होतो. तो म्हणजे आपली साधना नित्यनूतन बनविणे. नवीन गोष्ट आवडीने शिकताना आपले सर्व मन त्या ठिकाणी एकाग्र होते आणि बाकी सर्व गोष्टींना विसरते. ही अवस्था आपल्या जीवनात साधनेच्या बाबतीत निरंतर जागृत ठेवणे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. साधनेचे बाह्य उपचार जरी तेच तेच असले तरी ते करतानाची आपली मानसिक स्थिती नित्यनूतन असते याची जाणीव ज्या साधकाला असते तो साधक आपल्या नित्यनैमित्तिक साधनेला सतत नव्या नजरेने पाहतो. ही वस्तुस्थिती आपल्या मानसिक स्थितीकडे तटस्थपणे पाहील्याखेरीज दिसत नाही. आणि स्वतःकडे त्रयस्थासारखे पाहणे म्हणजेच प्रपंचातून मुक्त होणे आणि त्याचाच अर्थ म्हणजे भगवंताचे स्मरण करणे. माउलींनी हरिपाठात म्हटलेले आहेच की प्रापंचिक इच्छांचा लोप म्हणजे हरिनाम घेणे होय. पहा: नामपाठ मौन प्रपंचाचे ॥ज्ञा. हरि. ९॥

सांगायची गोष्ट अशी की एकदा भगवंताच्या सर्वव्यापी अस्तित्वाची जाणीव झाली आणि त्यायोगे भगवंतभक्ति निर्माण झाली तरी त्यानंतर आपण स्वतःचे आयुष्य कसे जगतो यावर आपली गति अवलंबून असते. जो साधक आपल्या इच्छांकडे (मग त्या कितीही उदात्त असू दे) दुर्लक्ष करीत नाही त्याच्या भक्तीचा विनियोग आपोआप इच्छापूर्तींकरता होतो. या परीणामावर साधकाचे नियंत्रण नसते! आणि भक्तीच्या अशा वापराने जे सुख लाभते ते शाश्वत नसून तात्पुरते असते. त्यामुळे कालांतराने साधक परत भक्तीपूर्वीच्या पदावर येतो. लक्षात घ्या की जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याकरीता फक्त भक्ती पुरेशी नसून, “निव्वळ भक्ती, बाकी काही नाहीही अवस्था होणे आवश्यक असते. आपणा सर्वांना स्वजीवनात असे सावध राहणे जरुरी आहे. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास हातून जाण्याचा धोका आहे. आपण पुढच्या श्लोकात शंभरटक्के भक्ती करण्याऱ्यांना आपोआप, इच्छा करीता कुठले फल मिळते हे पाहू.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक १८ आणि १९) :

                        भगवंताचे सर्वव्यापी अस्तित्वभाग 

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्

प्रभव: प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् १८

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्यत्सृजामि

अमृतं चैव मृत्युश्च ससच्चाहमर्जुन १९


गेल्या लेखातून आपण भगवंतांचे अमूर्त अस्तित्व सर्व जगाला कसे व्यापून आहे हे बघितले. आता, वरील दोन श्लोकातून, या निर्गुण अस्तित्वाचे अजून काही गुण भगवान अर्जुनास सांगत आहेत, त्यांच्यामुळे आपल्या जीवनावर कुठले दूरगामी परिणाम होतात हे आपण बघू. भगवान म्हणत आहेत की : सर्व कर्मांचे उद्दीष्ट्य (गति), त्या कर्मांना पोसणारा (भर्ता), त्यांचा स्वामी (प्रभु), कर्मे बघणारा (साक्षी), कर्मे करताना जी जागा लागते ती जागा (निवास), कर्मांत अडचण आली तर ज्याला शरण जावे अशी शक्ति (शरणं), सर्वांना कुठल्याही परतफेडीची अपेक्षा ठेवता मदत करणारा (सुहृत), ज्याच्यामुळे हे सर्व चराचर उत्पन्न झाले आहे असा (प्रभवः) आणि ज्याच्यातच ते विलीन होणार आहे असा ( प्रलयः), ज्याच्यातच हे विश्व स्थिर आहे (स्थानं) आणि ज्याच्याकडे सर्वकर्मांची फले साठविलेली आहेत (निधानं), आणि विश्वाच्या उत्पत्ती केल्यानंतरही ज्याच्यात काहीच बदल झालेला नाही (बीज-अव्ययम्), ज्याच्या तेजाच्या आधारावर सूर्य बाष्पीभवन करु शकतो (तपाम्यमहं) आणि वरुणदेव पाऊस पाडतो (वर्षं). अशारीतीने बाष्परुप पाणी साठविणारा आणि परत देणारा (निगृह्णाम्युत्सृजामि), भक्तांना अमरत्व देणारा (अमृतं) आणि व्यावहारीक जीवांना मृत्यु देणारा (मृत्युश्च), एखादी वस्तू अस्तित्वात आहे अशी भावना देणारा (सत्) आणि (कालांतराने) ती नाहीशी झाली अशी जाणीव उत्पन्न करणारा (असत्) सर्वकाही मीच आहे अर्जुना. (श्लोक १८,१९)

वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण असे सांगत आहेत की सर्व कर्मे, ती करण्याचे स्थळे आणि त्यांची फले इत्यादी सर्व त्यांच्यातूनच उत्पन्न होतात आणि त्यांच्यातच विलीन होतात. परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या सर्व साधकांना या सत्याचे (बौद्धीक) ज्ञान असते. यात नवीन असे काही नाही. परंतु प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात या वस्तुस्थितीचे दर्शन आपणास होत नाही. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की मी अभ्यास केला आणि त्यामुळे मार्क्स् चांगले मिळाले पण ते मी भगवंताला अर्पण केले वा आज गाडी चालविताना मी सावधान असल्याने अपघात झाला नाही. माझ्याऐवजी दुसरा कुणी असता तर नक्की अपघात झाला असता किंवा आज मी स्वयंपाक चांगला केला आहे, तरीसुद्धा तो कुणाला आवडला नाही तर भगवंताची इच्छा. या सर्व प्रचलित असलेल्या वाक्यामधून असे दिसून येते की कर्म करताना आपली भावना ती मी करीत आहे अशी आहे. निव्वळ त्यामुळेच स्वतःच्या कर्मांची फले भगवंतांना आपणास अर्पण करावी लागतात! म्हणजे काय, तर साधक सर्व काही भगवानच आहे हे मानतो आणि त्याचवेळी आपल्या कर्मांचे कर्तृत्वसुद्धा स्वतःकडे घेतो. यामुळे आपोआपच त्यांची फले स्वतःची आहेत अशी त्याची समजूत होते ती परत भगवंताला अर्पण करण्याची पाळी येते. जर भगवान स्वतः ही कर्मे आपल्या देहाचे उपकरण वापरुन करवून घेत आहे अशी समज असेल, तर केलेल्या कर्मांची फले परत त्यालाच अर्पण करण्याचा आपणास अधिकार रहात नाही! विचारातील ही मूलभूत विसंगती साधकाला भगवंतापासून दूर ठेवते.

साधकाच्या जीवनात ही विसंगती असण्याचे एक मुख्य कारण म्हणजे परमार्थाचे नक्की काय कार्यक्षेत्र आहे याबद्दलची अनभिज्ञता. सर्वसाधारणपणे आपण परमार्थाचे नियम जीवनातील प्रमुख, ढोबळ गोष्टींना लावतो. उदाहरणार्थ, अतिशय कठीण परीक्षेत यशस्वी होणे, अचानक आलेल्या संकटाला सामना देणे इत्यादी. परंतु दररोजचे दात घासताना, मित्रांबरोबर फिरायला जाताना, ब्रेड आणायला दुकानात असताना इत्यादी क्षुल्लक गोष्टींत आपण परमार्थाची जाणीव ठेवणे जरुरी मानत नाही. जीवनात महत्वाच्या गोष्टी क्वचित येत असल्याने होते काय तर, परमार्थाचे कार्यक्षेत्र आपले दैनंदिन जीवन रहात नाही. दुपारचे जेवण करत असताना भगवद्गीतेतील श्लोकांचा काय उपयोग? अशी आपली विचारसरणी होते. या वैचारीक दृष्टीकोनाचा दुष्परिणाम म्हणजे आपला दैनंदिन कर्मे मी करीत आहे हा अहंकार नष्ट होता हळूहळू वाढायला लागणे. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवान दूर आहेत. माउलींच्या शब्दांत सांगायचे म्हणजे मजही शरण रिघिजे आणि जिवित्वेंचि असिजे धिक बोलीं यियां लजे प्रज्ञा केवीं ज्ञा. १४०२:१८॥वैचारीक गोंधळामुळे उत्पन्न झालेल्या स्वतःच्या अशा अहंकाराचा संपूर्ण विनाश करण्यास हे दोन श्लोक अतिशय उपयुक्त आहेत. आपल्या जीवनातील यच्चयावत क्रिया परमार्थाच्या कार्यक्षेत्रात आणणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे असे यांच्यामुळे असे लक्षात येते. जोपर्यंत आपण व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी विभागणी करीत आहोत तोपर्यंत आपणास आत्मशांतिचा अनुभव येणे अशक्य आहे. वरील श्लोकांमध्ये भगवंतांनी फक्त महत्वाची कर्मे मी करतो असे म्हणता सर्व कर्मे मी पोसतो असे सांगितले आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे.

आपले सर्व अस्तित्व आणि कर्तृत्व भगवंतांनी सांभाळलेले आहे, यात स्वतःचा कार्यभाग काहीही नाही अशी जाणीव जेव्हा आपल्या विचारसरणीत मूळ घेऊ लागते तेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाचे ओझे आपल्या मनावरुन उतरते आणि आपण स्वच्छंदपणे या विश्वात विहार करु लागतो. आपण जीवनात काहीही केलेले नाही या ज्ञानामुळे आपल्यात एक नैसर्गिक नम्रता येते. विचारसरणीवरील अहंकाराचा काळा चष्मा गेल्यामुळे सर्व चराचरात भरलेला भगवानरुपी प्रकाश दिसायला लागतो. आपल्या मनात ओसंडून वाहणारा आनंद भरतो. फक्त काही महत्वाच्या गोष्टी भगवंतांना अर्पण करुन दैनंदिन जीवनात स्वकर्तृत्वाचा झेंडा फडकविणाऱ्यांना ही स्थिती प्राप्त होणे असंभव आहे. या श्लोकांवरील भाष्यात अशा सर्वसाधारण साधकांच्या अवस्थेचे वर्णन करताना माउली म्हणते की म्हणोनि अर्जुना मी नसे ऐसा कवण ठाव आहे परी प्राणियांचे दैव कैसे जे देखती माते ज्ञा. ३००:९॥आणि परमार्थाचे कार्यक्षेत्र मर्यादीत ठेऊन जीवन जगणाऱ्या साधकांबद्दल माउली म्हणते की आंधळेया गरुडाचे पांख आहाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेंविण ज्ञा. ३०६:९॥

व्यावहारिक जीवन आणि साधना या दोन्हींकडे समान लक्ष ठेवणाऱ्या साधकांची शेवटी काय अवस्था होते याचे वर्णन पुढील दोन श्लोकांत भगवंतांनी केलेले आहे. ते आपण पुढच्या वेळी बघू. आज एव्हढेच.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा

श्लोक १६ आणि १७ : भगवंतांचे सर्वव्यापी अस्तित्व

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाऽहमहमौषधम्

मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् १६:

पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामहः

वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव १७:

गेल्या दोन श्लोकांतून आपण असे बघितले की दैवीगुणसंपन्न साधक वेगवेगळ्या मार्गांनी भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या जीवनात निरंतर जागृत ठेवायचा प्रयत् करीत असतात. वरकरणी इतके विभिन्न दिसणारे उपाय एकाच भगवंताकडे कसे नेतात असा इथे प्रश्न उद्भवतो. याचे उत्तर देण्यास वरील दोन श्लोकांतून भगवान आपणास स्वतःचे असे रुप दाखवित आहेत जिथे या जगातील सर्व मार्ग एकवटलेले आहेत. पृथ्वीवरील निरनिराळ्या नद्या आपापल्या मार्गांनी एकाच समुद्राला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात तशी ही घटना आहे. साधकाच्या प्रयत्नांनुसार जाणविलेले भगवंताचे अस्तित्व विभिन्न असेल, पण हे सर्व अवतार एकाच भगवंताची रुपे आहेत. वरील उदाहरणाचा आधार घेऊन आपण असे म्हणू शकतो की भगवंतांच्या सर्वव्यापी अस्तित्वाच्या समुद्राच्या कुठल्या किनाऱ्याला आपण पोहोचतो एव्हढेच साधनेच्या मार्गावर अवलंबून आहे. भगवंत भिन्न होत नाहीत तर त्यांचे दृष्य रुप प्रत्येक साधकाला पटेल असे निरनिराळे होते. भगवंतांचे असे सर्वव्यापक मूल रुप स्पष्ट करण्यास वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की मीच क्रतु नावाची (अतिशय कठीण) यज्ञक्रिया आहे, (निव्वळ तेव्हढेच नव्हे, तर) स्मृतीमध्ये सांगितलेल्या सर्व होम क्रिया मीच आहे. सर्व प्राण्यांना जीवन प्रदान करणाऱ्या सर्व वल्ली खाद्यपदार्थ मीच आहे. (ज्यांच्या उच्चारणांनी अन्न शुद्ध होऊन देवादिकांना अर्पण करण्याजोगे पवित्र होते ते) मंत्रही मीच आहे. (देवांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण केलेला) अग्निही मीच आहे आणि तो प्रज्वलित ठेवण्यासाठी वापरलेले घृतही मीच आहे. (एव्हढेच नव्हे तर) मनात भगवंताबद्दल आस्था ठेऊन नेवैद्य प्रदान करण्याची क्रियासुद्धा मीच आहे (श्लोक १६). या सर्व जगाला उत्पन्न करणारे माता आणि पिता मीच आहे, त्यांना उत्पन्न करणाराही (पितामह) मीच आहे. कुठल्याही शिकण्याचा शेवट (म्हणजे सर्वप्रकारचे ज्ञान) मीच आहे, पवित्र ओंकार हे माझेच रुप आहे, त्यामुळे ऋक, साम आणि यजुर्वेदही मीच आहे (श्लोक १७).” थोडक्यात सांगायचे झाले तर या जगात भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, वा स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी वा इतर कुठल्यातरी व्यावहारीक कारणासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात वा ज्या क्रिया केल्या त्या सर्व मीच आहे असे भगवान इथे स्पष्टपणे सांगत आहेत. कुंडाच्या पाण्यात उभे राहून आपण आंघोळ करुन शुद्ध होतो आणि तेच पाणी सूर्याला अर्पण करतो त्याहून हा प्रकार व्यापक आहे. कारण या उदाहरणात निदान आपले शरीर आणि सूर्य हे कुंडाचा भाग नाहीत. परंतु इथे तेसुद्धा भगवंतच आहेत!

वरील श्लोकांतून असे स्पष्ट होते की सर्व विश्व विचार (आत्तापर्यंत जे काही म्हटले आहे ते आणि भविष्यात जे कळणार आहे ते सर्व विचार) हे भगवंताचे रुप आहे. साधकाच्या जीवनात हे ज्ञान निव्वळ बौद्धीक नसून ते स्वप्रचितीच्या स्तरावर आले आहे हे कळायचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या आयुष्यात पडलेला मूलभूत फरक. विश्वव्यापी भगवंतसान्निध्याची खात्रीची खूण म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार मूळापासून नष्ट होणे. माउलींच्या शब्दांत सांगायचे म्हणजे:

मजही शरण शरण रिघीजे आणि जीवत्वेंचि असिजे धिग् बोली यिया लजे प्रज्ञा केवीं ॥ज्ञा.१४०२:१८।

आपले संकुचित व्यक्तिमत्व नष्ट झाले आहे हे कळण्यास आपला दैनंदिन जीवनातील व्यवहार बघायला हवा. एकदा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव लोप पावली की प्रत्येक क्षणी जे योग्य आहे तसे वर्तन करण्याशिवाय आपणासमोर पर्याय रहात नाही. तसे म्हटले तर सर्वच दर वेळी शक्य तितके योग्य वागायचाच प्रयत् करीत असतो. पण आत्तापर्यंत योग्य म्हणजे काय याची व्याख्या आपल्या संकुचित व्यक्तिमत्वावर आधारीत होती, सापेक्ष होती. समोरील प्रसंगाची जी स्वाभाविक मागणी असते तिकडे आपले लक्ष नसते तर आपल्या जीवनात हवे तसे कसे घडेल इकडे आपले ध्यान असते. जेव्हा ही स्वकेंद्रित वृत्ती लोप पावते तेव्हा भगवंत जवळ आला आहे असे समजायला हरकत नाही. तेव्हा या दृष्टीकोनातून आपले वर्तन कितपत योग्य आहे हे आपण बघायला हवे.

आपणास या श्लोकांत दडलेली मेख कळली हे कळायचा दुसरा निकष आहे. तो म्हणजे आपणांत सर्वांभूती सहिष्णूता येणे. ही सहिष्णुता जगाचे भले करणे या वृत्तीहून भिन्न आहे हे लक्षात घ्यायला हवे. कारण या मनःस्थितीत जे आहे तसे ( बदलता) स्विकारणे आहे. हे कसे, हे आपण बघू. आपले सर्व अवयव एकसारखे सुंदर वा शक्तिशाली नसले तरी आपणास कल्पना असते की शरीर सुस्थितीत असण्याकरीता त्यांना असेच असायला हवे. उदाहरणार्थ आपण नखांना ओठांसारखे मुलायम करायचा कधीही प्रयत् करीत नाही. नखांच्या काठीण्यातच त्यांची उपयुक्तता आहे याची आपणांस जाणीव असते. त्याचप्रमाणे, जेव्हा वरील श्लोकांतील भगवंत दिसू लागतो तेव्हा प्रत्येक जीव आपापल्या परीने विश्वाची रचना सांभाळत आहे हे दिसायला लागते. त्यामुळे साधकाच्या मनातील सहिष्णुतेत माधुर्य येते. म्हणजे काय, तर स्वतःच्या मनातील सहानुभूतीच्या आधारावर साधक दुसऱ्याला सुधारवायचा प्रयत् करीत नाही, तर समोरील व्यक्ति जशी आहे तशी स्विकारतो. आपण सर्व स्वतःला आहे तसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असल्याने संतांच्या सान्निध्यात आपणास आपोआप एक शांति लाभते. म्हणून असा साधक आणि विश्व यात एक परम सुखद नाते आपोआप निर्माण होते. त्याचेच वर्णन करताना भगवान पुढे म्हणणार आहेत की यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते यः (गीता श्लोक १५/१२)”. दैवीगुणसंपन्न साधकांच्या साधना विभिन्न असल्या तरी ते एकाच भगवंताची आराधना करीत आहेत कारण प्रत्येकात स्वव्यक्तिमत्वाचा लोप आणि सहिष्णुता हे गुण दिसतात. अशा रीतीने सर्व साधनमार्गांतील एकात्मता वरील श्लोकांतील भगवंतांच्या रुपामुळे स्पष्ट होते. इति.

हरि

Posted on मे 2, 2018Categories अध्याय नववाLeave a comment on श्लोक १६ आणि १७ : भगवंतांचे सर्वव्यापी अस्तित्व

श्लोक १५: नित्य नूतन साधना

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् श्लोक १५

गेल्या श्लोकातून आपण पूर्वसुकृतांची जोडी असलेल्या साधकाची मानसिक स्थिती कशी असते हे बघितले. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की स्वानुभवाने व्यावहारीक सुखांचे अनित्यत्व कळल्यावर साधकाची भगवंतप्राप्तीची धडपड (शाश्वत सुखासाठी) सुरु होते. परंतु दैवीगुणसंपन्न साधकाला निर्गुण भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आधी होऊन मग त्याच्या निरंतर प्राप्तीची धडपड सुरु होते. म्हणजे काय तर अशा साधकांच्या मनात सद्यपरीस्थितीबद्दल वैराग्य येण्याचे कारण नकारात्मक (व्यावहारीक अडचणी) नसून सकारात्मक (एका दिव्य अस्तित्वाची जाणीव होऊन त्याबद्दल आलेले प्रेम) असते. त्यामुळे अतिशय आनंदाने साधक उपासना करण्यास उतावीळ होतो. आणि ज्याप्रमाणे अतिशय हुशार असलेल्या मुलांची परीक्षेचा अभ्यास करण्याची पद्धत सर्वसामान्यांहून वेगळीच असते त्याचप्रमाणे या महात्म्यांची साधनासुद्धा जगावेगळी असते. ती कशी हे सांगण्यास वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत: काही स्वतःच्या झालेल्या ज्ञानाची आहुती मला अर्पण करुन माझी उपासना करतात तर काही स्वतःमध्ये आणि माझ्यात काहीच फरक नाही या भावनेमध्ये मुरून जातात तर काही हे सर्व विश्व माझीच रुपे आहेत असे समजतात तर अजून काही समोर येईल ते सर्व भगवंताचेच मनोगत आहे असे जाणून आपले आयुष्य व्यतीत करतात.”

वरील श्लोकातील मार्गांवर विचार करण्याआधी इथे साधकांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी सुनिश्चित केलेल्या मार्गातच व्यतीत होते असे सांगितलेले आहे इकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचे कारण असे की साधकाच्या मनात साधनेआधीच (निर्गुण) भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न झालेले आहे. मनातील प्रेमाला बाह्य जगात रुप देण्याच्या हौसेपोटी साधना चालू आहे. त्याच्या हातून होत असलेली साधना निव्वळ प्रेमापोटी होत असल्याने ती स्वतःच फलरुप आहे. त्यामुळे ती कधी थांबेल अशी शक्यतासुद्धा उद्भवत नाही. आपण अनेकवेळा असे ऐकलेले आहे की साधना करणे हेच साधनेने मिळणारे साध्य आहे. या वाक्याचे मूर्तिमंत रुप म्हणजे दैवीगुणसंपन्न साधक आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आता आपण श्लोकातील मार्गांचे मर्म शोधायचा प्रयत् करु. प्रथम असे सांगितले आहे की ज्ञानयज्ञेन. ज्याप्रमाणे अश्वमेध यज्ञामध्ये विश्व फिरलेल्या अश्वाचा बळी देण्यात येतो त्याचप्रमाणे ज्ञानयज्ञात आजपर्यंत जमा केलेल्या ज्ञानाची आहुती देण्यात येते. म्हणजे काय? ज्ञानाला स्वतःचे शरीर नसल्याने त्याची आहुती देणे याचा अर्थ असा घ्यायला हवा की भूतकाळात (म्हणजे अगदी याक्षणापर्यंत!) झालेल्या ज्ञानाच्या आधारावर वर्तमानकाळात वागण्याचे बंधन स्वतःवर घालणे. संत सतत वर्तमानकाळात जगत असतात या वाक्याचा अर्थ असा आहे की ते सतत ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवतात! ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे, पूर्वज्ञानाकडे दुर्लक्ष करणे याचा अर्थ जाणूनबुजून कालच्या उलट आज वागणे नव्हे. याचा अर्थ असा की आज समजा आत्तापर्यंतच्या आपल्या ज्ञानाला मोडीत काढायची वेळ आली तर त्याला तयार राहणे. ज्ञानयज्ञ करणाऱ्या साधकांना इतके वर्षे मी ठराविक समजुतींना मान्य करत होतो मग आज त्यांना तडा जाईल असे कसे वागू? हा प्रश्न पडत नाही. कल्पना करा की आपले आयुष्य म्हणजे ज्ञानाच्या अथांग सागरावर मनसोक्त जलतरण करणे होय. प्रत्येक क्षण आपणास जीवनाकडे बघण्यास नवी नजर देत आहे. अशा सागरात क्रिडा करण्याऐवजी एका ठिकाणी नांगर टाकून आपण राहणे म्हणजे भूतकालातील ज्ञानानुसार जीवन जगणे. खरे म्हणजे या स्वानुभवी सागराच्या लाटा इतक्या प्रचंड आहेत की कितीही मजबूत नांगर टाकला तरी असे अनुभव येतात की आपणास नव्या गोष्टी स्विकाराव्या लागतातच. परंतु मोठ्या लाटांची वाट बघता अगदी छोट्या अनुभवांनीसुद्धा शहाणे होत राहणे म्हणजे ज्ञानयज्ञ करणे होय. पूर्वानुभवांचे ओझे बाळगता स्वच्छंदपणे जीवन जगणे ही स्थिती या शब्दातून इथे व्यक्त केली आहे. या अत्युच्च स्थितीचे वर्णन निरनिराळ्या शब्दांनी भगवद्गीतेत केले आहे. उदाहरणार्थ, बाराव्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोकात आपल्या परम भक्ताचे वर्णन करताना भगवंतांनी वापरलेला अनिकेतः हा शब्दसुद्धा हीच स्थिती सूचित करीत आहे असे वाटते. असो. मूळ मुद्दा सांगायचा असा की ज्ञानयज्ञ करणारा साधक झालेल्या ज्ञानावर पुढील आयुष्य व्यतीत करीत नाही तर झालेल्या ज्ञानाला मोडीत काढायची तयारी ठेऊन जीवनाला सामोरे जातो, नित्यनूतन जीवन जगतो.

याशिवाय कुणी दैवी साधक एकच भगवान अस्तित्वात आहे या जाणीवेत राहतात (एकत्वेन), तर कुणी एकाच भगवंताचे अनेक भिन्न अवतार आहेत या वस्तुस्थितीला निरंतर ध्यानात ठेवतात (पृथक्त्वेन) तर अजून कुणी या जगातील सर्व जीवजंतू भगवंताचीच रुपे आहेत (विश्वतोमुखम्) याचा अनुभव घेत आपले जीवन व्यतीत करतात. अशा रीतीने भगवंतांबद्दल अनन्य प्रेम उत्पन्न झालेला साधक स्वतःच्या स्वभावानुसार मनातील प्रेमाला व्यक्त करतो. इतर लोकांना त्याचे फक् बाह्य वर्तन दिसल्याने असा संभ्रम पडू शकतो की हे साधक भिन्न साध्याची अपेक्षा करीत आहेत. परंतु हा समज वस्तुस्थितीशी सुसंगत नाही हे आपण सर्वांनी, विशेषतः संतांच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य लाभलेल्या सुदैवी लोकांनी, ध्यानात ठेवले पाहीजे. नाही तर बाह्य सोपस्कारांच्या बंधनांत आपण कधी अडकू हे लक्षातसुद्धा येणार नाही. भगवंतप्राप्तीचे अनेक मार्ग दाखविताना कधीही ठराविक कर्मे करायलाच हवी अशी आग्रहाची सूचना आपणास दिलेली नाही हे भगवद्गीतेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बाह्यकर्मांपेक्षा, कर्मे करण्यांमागील भूमिका कशी हवी याचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे. म्हणूनच अडीच हजार वर्षांपूर्वी लिहीली गेली असूनही ती आजसुद्धा तितकीच उपयुक्त आहे. आपण अशा वैश्विक शिकवणुकीला ठराविक संप्रदायांच्या मर्यादेत ठेवायचा प्रयत् करणे म्हणजे किनाऱ्यावरील एका मनपसंद ठिकाणी बसून अथांग समुद्राची ओळख झाली असे मानणे होय. दैवीगुणसंपन्न साधक असे करत नाहीत ही वरील श्लोकाची शिकवण आहे. मनातील ईश्वरप्रेमाच्या ईंधनाचा वापर करुन निर्भयपणे असे साधक आपल्या आयुष्याची नौका अनिश्चित भविष्याच्या सागरात घालतात आणि जे मिळेल त्यात सुखी राहतात.

जगातील सर्वच भविष्याबाबत निर्धास्त व्हायचा प्रयत् करत असतात. परंतु आपले हे प्रयत् जीवनातील काही व्यक्ती, वा वस्तू, किंवा तत्वे सतत जवळ ठेवण्याच्या पायावर उभे असतात. जेव्हा निव्वळ भगवंतभक्तीवर आधारीत निर्भयता आपणामध्ये येईल, तेव्हा स्वतःच्या जीवनाचे सार्थक झाले असे समजण्यास काहीच हरकत नाही.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा

(श्लोक १४)):

साधनेचा पाया कसा हवा?

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः

नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते १४:

गेल्या श्लोकातून आपण असे बघितले की निर्गुण भगवंताचे अस्तित्व जाणल्याने सुप्तावस्थेत असलेले साधकातील दैवी गुण जागृत होतात आणि मग परमोच्च भक्तीचा प्रारंभ होतो. ज्याप्रमाणे साधकाची प्रवृत्ती असेल त्याप्रमाणे या भक्तीचे बाह्य रुप इतरांना दिसते. उदाहरणार्थ, कुणी योगमार्ग अनुसरेल तर कुणी एका विशिष्ट नामाचा जप करेल तर अजून कुणी वेदांताचा अर्थ समजून घेण्याच्या प्रयत्नात असेल. परंतु या सर्व विभिन्न बाह्य क्रियांमागील मनोभूमिका एकच असते. ज्याप्रमाणे एकाच सूर्यापासून निघालेले किरण वेगवेगळ्या दिशेने प्रवास करतात त्याचप्रमाणे सर्व दैवीगुणसंपन्न साधकांच्यात असलेल्या एका विशिष्ट समान मनोभूमिकेतूनच साधनेचे भिन्न मार्ग सुरू होतात. दृष्य साधनेला एखाद्या सुंदर इमारतीसारखे मानले तर साधना सुरु करण्यापूर्वीची साधकाची मानसिक स्थिती या इमारतीचा पाया होय. जितका पाया मजबूत असेल तितकी इमारत नैसर्गिक आपत्तींना समर्थपणे तोंड देते. त्याचप्रमाणे आपला साधना सुरु करण्याचा हेतू जितका पवित्र असेल तितके आपण दैनंदिन जीवनातील घडामोडींना साधना थांबविता तोंड देऊ शकतो, नाहीतर थोड्याशा व्यावहारीक चलबिचलतेतही साधनेचा बळी लगेच जातो! नवव्या अध्यायातील वरील श्लोक अशा सर्वोच्च मनःस्थितीचे वर्णन करीत आहे की असा पाया ठेऊन साधना सुरु करणाऱ्या महात्म्याची उपासना कधीही थांबत नाही. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण असे म्हणत आहेत की (दैवीगुणसंपन्न महात्मे) मनात माझ्या स्वरुपाबद्दल सतत आदर ठेऊन ते (माझ्या लीलांसमोर) नतमस्तक होतात. आपल्या मनाला आणि शरीराला (शम, दम इत्यादी साधनांद्वारे) ताब्यात ठेऊन ते माझ्या स्वरुपाशी सतत निगडीत राहतात. अशा भक्तीत निरंतर राहून ते वेगवेगळ्या मार्गांनी माझी उपासना करण्यात आपले जीवन व्यतीत करतात.

व्यावहारीक जीवनातील सर्व वस्तूंची प्राप्ती एका ठराविक क्षणी पूर्ण होते. उदाहरणार्थ, मोबाईल फोन दुकानात पैसे दिल्यावर हातात येतो आणि मग त्याच्या प्राप्तीकरीता अजून प्रयास करावे लागत नाहीत. एकदा लग्न झाले की साथीदार प्राप्त होतो आणि मग जोडीदार मिळविण्याची सर्व खटपट थांबते. परंतु हा नियम भगवंतप्राप्तीला लागू नाही हे जाणणे अत्यावश्यक आहे. याचे कारण असे की व्यवहारातील वस्तूप्रमाणे भगवंत सिमीत नसून अमर्याद आहे. त्यामुळे भगवंताचे रुप नित्यनूतन आहे. काल भगवंत म्हणजे काय याचे ज्ञान झाले असेल तर आज पुन्हा आपणास त्याच्या स्वरुपाबद्दलच्या नव्या माहितीला स्वीकारावे लागते. असे वागण्याला सर्वात मोठा अडथळा म्हणजे मन आणि बुद्धी यांचा स्वभाव. हे दोघे प्रत्येक गोष्टीबद्दल अंतिम निर्णय घेण्यास उतावीळ असतात! अगदी जरुरी असल्याखेरीज दररोज नवीन गोष्ट स्वीकारायचा यांना अतिशय कंटाळा असतो. त्यामुळे मला भगवंत कळला या विचाराचा वारादेखील आपल्या मनाला आणि बुद्धीला लागू देणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. या वस्तुस्थितीची जाणीव असल्याने दैवीगुणसंपन्न साधकाच्या मनात आपोआप ज्या साधनांनी मनाचा चंचलपणा कमी होतो (म्हणजे शम, दम, अहिंसा, इत्यादी साधने) त्यांच्याबद्दलची आत्मीयता वृद्धींगत होते. या सर्व उपचारांचे अपरिहार्यता पटल्याने त्यांचे ओझे वाटणे बंद होऊन त्यांच्याबद्दल प्रेम साधकाच्या मनात उत्पन्न होते. आणि प्रेमाखातर आपण काहीही करण्यास उत्सुक असतो. म्हणून दैवीगुणसंपन्न साधक त्यांत रमू लागतो. ही त्याची उत्साहपूर्वक व्रतानुष्ठित दृढस्थिती भगवंतांनी वरील श्लोकात प्रथम उल्लेखलेली आहे.

एकदा मनाचा इंद्रियांवर आधारीत असलेला चंचलपणा कमी झाला की वृत्ती व्यावहारीक जगापासून अलिप्त व्हायला लागतो. साधक या जगातील घटनांना आहे तशा बघण्यास सक्षम होतो. पूर्वग्रहविरहीत नजरेने जगाकडे बघितल्यावर सर्व गोष्टींत दडलेला भगवंताचा हात त्याला स्पष्टपणे दिसू लागतो. आंधळ्या माणसास नजर आली की तो सर्वसामान्य गोष्टींकडेसुद्धा आश्चर्यचकीत होऊन बघू लागतो, तसेच साधकाच्या मनात भगवंताच्या नित्यनूतन लीलांबद्दलचे कौतुक पराकोटीला जाते. भगवंताशी आत्तापर्यंत कधीच सांगड घातलेल्या वस्तूंतही त्याला आता भगवान दिसायला लागतो. खरे म्हणजे अशा दुर्लक्षित, नगण्य वस्तूंतही भगवंत सतत होताच परंतु साधकाच्या संकुचित व्यक्तिमत्वाच्या कवचामुळे या सत्यस्थितीचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आता त्याच्या स्वची शिकार झाल्याने साधकाची संवेदनशीलता इतकी सूक्ष्म झाली आहे की ज्या वस्तूंत भगवंताच्या अस्तित्वाचा उजेड मंद आहे त्यासुद्धा त्याला भगवंतमय वाटू लागतात. अशा स्थितीतील साधकाला सतत भगवंत समोर दिसत असतो. त्या विभिन्न अस्तित्वरुपी भगवंताच्या अस्तित्वाचा डंका जगभर सातत्याने करण्यावाचून त्याला दुसरा पर्याय समोर दिसत नाही! या स्थितीचे वर्णन वरील श्लोकातील सततं कीर्तयन्तो मां या शब्दांतून केले आहे.

भगवंताच्या अपार कर्तृत्वाला स्पष्टपणे बघितल्यावर साधकात लीनपणा जागृत होतो. आपण सर्व कुणा ना कुणासमोर लीन असतोच. उदाहरणार्थ, लहानपणी पालकांसमोर, मोठेपणी वरीष्ठांसमोर इत्यादी. ज्यावेळी या व्यक्ती आपल्यासमोर नसतात तेव्हा आपला लीनपणा गायब होतो आणि आपण स्वकर्तृत्वाचा अभिमान दाखवायला लागतो (लहानपणी आपल्यापेक्षा छोट्या मुलांसमोर आणि मोठेपणी आपल्य्कनिष्ठांवर)! दैवीगुणसंपन्न साधकाचा लीनपणा भगवंतासमोर असतो आणि त्याला जगातील प्रत्येक व्यक्तीत तो भगवंत दिसत असतो. त्यामुळे त्याचा लीनपणा कमी होईल अशी वेळच शिल्लक रहात नाही! माउलीनी या अवस्थेचे वर्णन आपल्या अपूर्व प्रतिभेने फळलिया तरुची शाखा सहजें भूमीसी उतरे देखा तैसे जीवमात्रा अशेखा खालावती ते ॥ज्ञा. २२५:९॥ अशी केली आहे. खरे म्हणजे मला किती छान फळे आली आहेत या जाणीवेने झाडाची छाती फुगून मान ताठ व्हायला हवी. परंतु ते अगदी याउलट वर्तन करते. त्याचप्रमाणे भगवान सर्व ठिकाणी दिसत आहेत या सर्वोच्च वस्तुस्थितीने साधक गर्विष्ठ होता उलट सर्वांसमोर विनम्र होतो. ही नम्रता दुबळी नसून सक्षमतेने भरलेली आहे. सर्वसाधारणपणे विनम्रतेचे उदाहरण म्हणून गवताच्या पात्याचे रुपक वापरतात. परंतु गवतात काडीचीही क्षमता नसते. म्हणून माउलींनी इथे फळांनी लगडलेल्या वृक्षाची उपमा दिली आहे. त्यामुळे विनम्रतेबरोबरच साधकाची अंतर्गत सक्षमताही काय सुंदरपणे वर्णन केली गेली आहे! असो. सांगायची मुद्दा असा आहे की या परमोच्च स्थितीतील साधकाला आपला स्वामी निरंतर समोर दिसत असल्याने नम्र राहण्यावाचून पर्याय रहात नाही कारण. म्हणून वरील श्लोकात नमस्यन्तश्च मां असे म्हटले आहे.

अशा रीतीने भगवंताच्या निर्गुण स्वरुपाची कल्पना आलेला भक्त दैनंदिन जीवन जगताना शरीराच्या नौकेतून ज्ञानाच्या सागरात निरंतर विहार करत असतो. मला आता संपूर्ण ज्ञान झाले आहे हा नांगर कधीही टाकता विहार करणारा विनम्र भक्त स्वतःच्या इंद्रियांना आपोआप ताब्यात ठेवतो भगवंताच्या सान्निध्यात आपले जीवन परीपूर्ण करतो. साधनेचा हा पाया ठेऊन स्वतःच्या नैसर्गिक स्वभावानुसार ज्या विविध उपासना त्याच्या हातून आपोआप घडतात त्यांचे वर्णन पुढील श्लोकातून आपण बघू. इति.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक १३ ):

सकारात्मक उदासीनता म्हणजे भक्ति

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् गीता १३:

गेल्या श्लोकामध्ये आपण बघितले की मनुष्याची बुद्धी स्थूल गोष्टींमध्ये गुंतलेली असेल तर जीवन शेवटी दुःखांनी भरुन जाते. आपण फक्त सुखाचीच अपेक्षा ठेवल्याने जेव्हा दुःख समोर येते तेव्हा आपली आत्तापर्यंत केलेली सर्व कर्मे विफल झाली असे वाटायला लागते. अशा वारंवार येणाऱ्या तडाख्यांनी मनोवृत्ती बदलायला लागते आणि सर्वसाधारण व्यक्तिमध्येसुद्धा सूक्ष्म गोष्टींबद्दलची ओढ लागायला लागते. ज्याप्रमाणे सुरुवातीला, म्हणजे उगमाच्या जवळ, उथळ आणि चंचल असलेला नदीचा उच्छृंखळ प्रवाह मैदानी क्षेत्रात आल्यावर खोल आणि संथ होतो, त्याचप्रमाणे कालानुसार आपली इंद्रियांवर केंद्रित असलेली वृत्ती (दुःखरुपी घणाच्या आघातांनी) इंद्रियांतीत वस्तूकडे आकर्षित होऊ लागते. अर्थात हे लक्षात घ्यायला हवे की कालाची संकल्पना इथे खूप व्यापक आहे. केवळ एका जन्मातील अस्तित्वावर अवलंबून नाही. म्हणजे असे की आपण कित्येक जन्म इंद्रियांवर आधारीत आनंदांचा उपभोग घेण्यात सार्थकता मानतो आणि मग हळूहळू आपल्या विचारसरणीत बदल व्हायला लागतो. पूर्वी शिकारीला राजा गेला असताना हाकाऱ्यांच्या आवाजाने दूर असलेल्या श्वापदांना राजा ज्याठिकाणी आहे तिकडे जाण्याशिवाय पर्याय रहात नाही त्याचप्रमाणे प्रकृती आपणास निर्गुण भगवंताकडे ढकलत आहे. तिथे पोहोचल्यावर आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाची शिकार होणार आहे! (अर्थात ही गोष्ट सर्वसामान्य लोकांची झाली. कित्येकवेळा, काळाची गरज पाहून, भगवान असे संत निर्माण करतात की जे उपजताच भगवंताची आराधना करु लागतात. त्यांना अनेक जन्म घ्यावे लागत नाहीत!) अशा रीतीने या जगातील सर्व जीव शेवटी निर्गुण भगवंताच्या भक्तित रममाण होणार आहेत, भगवंत्संगतीचा आस्वाद घेणार आहोत. वरील श्लोकातून भगवान भगवंताच्या जवळ आलेल्या भाग्यवान लोकांचे वर्णन करताना म्हणत आहेत की (सर्वांत सुप्त असलेले) दैवी गुण काही महात्म्यांत प्रबळ होतात ज्यायोगे ते माझ्या अव्यय आणि सर्वव्यापक स्वरुपाला जाणून घेतात आणि मग त्यांच्या जीवनात माझ्याशिवाय काहीही उरतच नाही

भगवंतांनी या अध्यायात दैवी गुण कुठले आणि त्यांच्या विरुद्ध, म्हणजे आसुरी गुण कुठले हे सांगितलेले नाही. पुढे सोळाव्या अध्यायात यावर स्वतंत्रपणे विचार करण्यात आलेला आहे. आपण नवव्या अध्यायातील विचारसरणीकडे बघत असल्याने दैवी गुणांबद्दल जास्त उहापोह करणे इथे योग्य वाटत नाही. अध्यायाच्या संदर्भानुसार सध्या महत्वाची गोष्ट म्हणजे दैवी गुण जीवनात प्रबळ झाल्यावर काय घडते याकडे (हे वरील श्लोकाचा आधार घेऊन) लक्ष देणे! असे वाटते की दैवी गुणांच्या प्रभावाखाली स्वतःचे जीवन व्यतीत करणे म्हणजे काय याची व्याख्याच इथे केली आहे. ती म्हणजे निव्वळ भगवंताशिवाय जीवनात काहीही उरणे. अशा अवस्थेत आणि भगवंतभक्ति जीवनात सर्वात महत्वाची असणे यात जमीन-अस्माना सारखा फरक आहे हे समजून घेणे इथे अत्यावश्यक आहे. कारण जीवनात भगवंताकडे जाणे सर्वात महत्वाचे आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या भक्तिशी तुलना करण्यासाठी बाकी गोष्टी शिल्लक असतात! याचा स्पष्ट अर्थ असा की आपली नजर अजून इतर सर्व गोष्टींपासून दूर झालेली नसते. उदाहरणार्थ मला आम्रफळ सर्वात जास्त आवडते असे आपण म्हणतो तेव्हा या म्हणण्यातच आपण बाकी फळांचे अस्तित्व मान्य करीत असतो. याउलट आंब्याशिवाय या जगात कुठले फळच नाही अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा आंबा हे फळ सर्वात जास्त आवडते असे आपण म्हणू शकत नाही कारण तुलना करायला बाकी काही शिल्लकच राहीलेले नसते. परमार्थाला जर एका परीक्षेसारखे मानले तर आपण असे म्हणू शकतो की भगवंतभक्ति हा जीवन व्यतीत करायचा एकमेव मार्ग दिसणे म्हणजे पैकीच्यापैकी गुण मिळविणे आणि भगवंतभक्ति जीवनात सर्वात महत्वाची असणे म्हणजे ९०% गुण कमविणे. परंतु आपणांसाठी दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या परीक्षेत १००% गुण मिळविल्याखेरीज पास होत नाही! श्रीमद्भागवतातील जडभारताच्या गोष्टीकडे वरील नजरेने पहीले तर असे दिसते की ९९.९९% गुण मिळविले तरी प्रकृतीच्या कचाट्यातून सुटका होत नाही, मग ९०% वाल्यांची गोष्टच सोडा!

या श्लोकातून बोध घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताशिवाय जगणे असह्य होण्यामागील कारण. श्लोकाचा शेवटचा चरण म्हणत आहे ज्ञात्वा भूतादीमव्ययम्‌”. याचा अर्थ असा की या महात्म्याचे मन जीवनात कटू अनुभव आले म्हणून वा सर्व सुखांचा आस्वाद घेतल्याने मन विटले म्हणून भगवंतावर जडलेले नाही. निर्गुण भगवंताच्या अस्तित्वाला प्रत्यक्ष जाणल्यामुळे त्याच्यामधील भगवंतप्रेम प्रगट झालेले आहे. प्रकृतीने दिलेल्या अनुभवांवर आधारित आपली भक्ति इंद्रियातीत वस्तूकडे जाणे इथे नामंजूर आहे हे जाणणे महत्वाचे आहे. आपण बघतोच की वृद्धापकाळी गात्रे शिथिल झाली, बुद्धी काम करेनाशी झाली आणि इतरांवरचे प्रभुत्व कमी व्हायला लागले की बहुतांशी लोक साधनेकडे वळतात. अर्थात त्यांचे असे वागणे हे अजिबात चुकीचे नाही पण या वस्तुस्थितीचा अर्थ त्यांच्यातील दैवी गुण वाढले आहेत असे मानणे चुकीचे आहे. हे या श्लोकावरुन स्पष्ट होते. महाभारतात कुंतीने भगवंताकडे दुःखाची मागणी केली की ज्यायोगे तीच्यामधील भगवंतभक्ति प्रबळ होईल तशी ही गोष्ट नाही. जीवनात दैवी गुणांचा उदय झाला की सर्व सृष्टी आनंददायी होते आणि तरीसुद्धा मन भगवंताशिवाय उदास असते. ही सकारात्मक उदासीनता अनुभवाला यायला लागली की साधकाचे जीवन अतिशय उदात्त बनते. निव्वळ त्याच्याच नव्हे तर त्याच्या सहवासात येणाऱ्या सर्वांच्याच जीवनात एक सूक्ष्म आनंद सतत वहात असतो. निव्वळ एकाच पंथाला वा ग्रंथाला कवटाळून बसून त्या संकुचित अस्तित्वात धन्यता मानणे बंद होते. जगातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक विचार भगवंताचीच लीला आहे हे साधकाला विचार करीता कळू लागते. माउलींनी सांगितल्यासारखे तो बोलाआधीच प्रमेयाला जाणू लागतो! त्यायोगे दररोजचा प्रत्येक क्षण त्याला भगवंताच्या रुपाचा एकेक पैलू दाखवायला लागतो. साधकाच्या अशा अवस्थेचा सन्मान करण्यासाठीच या श्लोकात महात्मा या नावाने संबोधिलेले आहे.

कारणविरहीत आनंदात डुंबत असताना भगवंताबद्दलच्या आपुलकीने स्वतःला मधाळ करणे हा दैवी गुणांचा परिणाम आहे असे हा श्लोक सांगत आहे. साधकाची अंतर्गत म्हणजेच मानसिक स्थिती अशी व्यापक झाल्यावर त्याचे बाह्य वर्तन कसे असते? ज्याप्रमाणे जमिनीतील एकाच झऱ्याचे दर्शन जशी विहीर खणलेली आहे तसे होते त्याचप्रमाणे अशा साधकाचा मूळ स्वभाव जसा असेल त्याप्रमाणे या अंतर्गत ज्ञानाचे जगात बाह्य दर्शन होते. ते कसे हे पुढील श्लोकांतून आपण बघू. इति.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा

(श्लोक १२):

स्थूल बुद्धीचा परिणाम – विफलता

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः

राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः गीता १२:

गेल्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सगुण परमेश्वराकडे बघण्याची नजर सूक्ष्म असायला हवी असा इशारा दिला. सूक्ष्म बुद्धी म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या देहाचा आधार घेऊन भगवान सृष्टीमध्ये कार्यरत होतात तेव्हा त्या जीवाचा स्वभाव आणि भगवंतांचे अस्तित्व दूध आणि पाण्यासारखे मिसळून जातात. त्या मिश्रणातील फक्त भगवंताच्या अस्तित्वावर ज्याची नजर स्थिर असते आणि बाकी सगळ्याकडे जो दुर्लक्ष करतो त्याची बुद्धी सूक्ष्म आहे. इतरांची दृष्टी स्थूलामध्येच अडकलेली आहे. आणि आपण जे बघतो त्यावरच आपली ध्येये, कर्मे आणि आशा उभारलेली असतात. ज्याप्रमाणे एखाद्या इमारतीचा पाया कच्चा असला की ती थोड्याशा भूकंपाने कोसळणार हे ठरलेले असते, त्याचप्रमाणे ज्या जीवाची बुद्धी स्थूल आहे त्याचे जीवन आयुष्यातील धकाधकींनी दुःखरुप होणार हे नक्की आहे.

खरे म्हणजे आपल्या जीवनात आलेले दुःख म्हणजे भगवंतांनी आपणांस स्वतःची बुद्धी बदलण्यास दिलेली सुवर्णसंधी होय. कारण कुठल्याही दुःखदप्रसंगी आपणापुढे दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे आलेल्या दुःखाचे प्रयत् करुन तात्पुरते निवारण करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे ते दुःख निवारण करण्याचा प्रयत् करीता त्याला पूर्णपणे सोसणे (तितिक्षा) आणि त्या अनुभवाचा आधार घेऊन स्वतःच्या जीवनाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात मूलभूत बदल करणे. बहुतांशी लोक पहिल्या प्रकारच्या प्रयत्नांमध्येच गुंतून असतात. परंतु, त्याचवेळी त्यांना हेसुद्धा कळत असते की सद्यपरीस्थितीतील दुःखाला जरी दूर सारता आले तरी असेच दुःख परत भविष्यकाळात येणार नाही याची खात्री कुणी देऊ शकत नाही. आणि या अनिश्चिततेच्या जाणीवेमध्ये आपल्या जीवनातील भय दडलेले आहे.

मनात एकदा भयाचा शिरकाव झाला की मानवाची बुद्धी भरकटायला लागते. मग अशा विचलित विचारसरणीला सरळ मार्गावर आणण्यास भगवान परत आपणापुढे बदलण्याची संधी, म्हणजे दुःख, आणतात. परत एकदा दुःख सामोरे आले की आपली सुप्त भिती अजून दॄढ होते आणि आपण अजून परमार्थापासून दूर होतो. अशा दुष्टचक्रात अडकलेल्या जीवांचे वर्णन करताना भगवान म्हणत आहेत की अशा (सगुण भगवंताकडे चुकीच्या नजरेने बघणाऱ्या) जीवांचे ज्ञान व्यर्थ असते, (त्यामुळे) त्यांचे मनोरथसुद्धा दुःखदायक असतात (आणि या दोघांवर उभारलेले) कर्मही पूर्णपणे निष्फळ असते. आणि (अशा अर्थहीन चक्रात अडकल्याने, शेवटी) हे जीव राक्षसी आणि आसुरी वृत्तींत प्रवेश करुन तिथेच आश्रय करतात.”

कुठल्याही कारणाशिवाय उत्पन्न झालेला स्वयंभू आनंद हे आपल्या जीवनातील अमूर्त भगवंताचे दृष्य रुप होय. ज्याप्रमाणे कस्तुरीमृग आपल्याच पोटात लपलेल्या कस्तुरीच्या शोधात सर्व आयुष्य वेचतो त्याचप्रमाणे आपण स्वतःतच असलेल्या या निर्मळ आनंदाला प्राप्त करण्यास सर्व जग पालथे घालतो! एखादी व्यावहारिक वस्तू प्राप्त झाल्यावर आपल्याला जो आनंद होतो तो याच आनंदाचे प्रतिबिंब असते. परंतु अशा वस्तूरुपी आरशात दिसलेल्या वस्तूकडे बघण्याऐवजी आपण वेगवेगळे आरसे जमविण्यात धन्यता मानतो. जेव्हा स्वतःच्या जीवनातील वस्तूंपासून (वा व्यक्तींपासून) आनंद मिळेनासा होतो तेव्हा आणि तेव्हाच आपली नजर आरशांवरुन हटते आणि परमार्थाला सुरुवात होते. वरील श्लोकातून भगवान ज्यांची नजर अजून वैविध्यपूर्ण आरशांवर खिळलेली आहे अशा लोकांचे वर्णन करीत आहेत. ज्याप्रमाणे गाढवासमोर काठीला गाजर बांधले की गाजर खायला मिळण्याच्या अपेक्षेत तो भरभर चालायला लागतो, पण शेवटी त्याला अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते, त्याचप्रमाणे पुढे सुख मिळेल या अपेक्षेने आपण स्वतःची कर्मे करीत असतो. भविष्यकाळातील सुखाच्या प्राप्तीकरीता धडपड करणे मूलतः चुकीचे आहे. कारण सुख म्हणजे स्वतःला विसरणे होय (पहा ज्ञा. १२७ ते १३३, अध्याय १३) आणि हे नेहमी वर्तमानकाळातच घडते, भूत किंवा भविष्यकाळात नाही! जेव्हा भविष्यकाळाचे वर्तमानकाळात रुपांतर होते तेव्हा आपल्या मानसिकतेत इतके बदल झालेले असतात, की (सध्याच्या आपल्या अस्तित्वाने) ज्या सुखाची अपेक्षा केलेली असते ते तितक्याच उत्कटतेने तेव्हा मिळणे असंभव होते. चिंचेची पाने अगदी हलक्या झुळूकीनेसुद्धा विचलित होतात. आणि चिंचेच्या पानांसारखेच आपले मन क्षणोक्षणी इच्छांरुपी झुळुकेने सतत अस्थिर आहे. आणि त्याच्या पायावरच आपली भविष्यकाळात मिळणाऱ्या सुखाची इमारत बांधणे चालू आहे! अशी सर्व धडपड व्यर्थ आहे हे इथे भगवान आपणांस सांगत आहेत.

स्वतःच्या कर्मांबद्दलची ही वस्तुस्थिती आपल्या नसानसात भिनायला हवी. निव्वळ बौद्धीक ज्ञान प्राप्त झाले तरी आपला मूळ स्वभाव बदलत नाही. कारण ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याकडे बुद्धी वापरायला वेळ नसतो आणि तेव्हा आपली कृती अंगात भिनलेल्या वृत्तीनुसारच होते (बौद्धीक ज्ञानानुसार होत नाही). म्हणून भगवंत असे म्हणत आहेत की व्यावहारिक जगात सुख शोधायचा प्रयत् करणारी माणसे आसुरी वृत्तींमध्ये गुंतलेली आहेत. या श्लोकाच्या आधारावर आपण आसुरी वृत्ती म्हणजे काय याची व्याख्याच अशी करु शकतो कीजी वृत्ती पुढे दुःख मिळणार आहे अशा गोष्टींमागे धावण्यातच आपल्या जीवनाचे सर्वस्व मानायला लावते.”

इथे अशी शंका मनात येते की आसुरी वृत्ती असणारे जीव (सुरुवातीला वर्णन केलेल्या दुष्टचक्रात अडकेलेले असल्याने) भगवंताकडे कसे जाणार? ते कायमचे प्रकृतीच्या कचाट्यातच राहणार का? नाही. ज्याप्रमाणे आजचा पराभव उद्याच्या यशाचा पाया ठरु शकतो त्याचप्रमाणे आजच्या आसुरी वृत्तीचे अचानक दैवी गुणांत परिवर्तन होऊ शकते. होऊ शकते असे नव्हे तर होतेच होते. भगवंतांचे अस्तित्व सूर्यासारखे तेजस्वी असल्याने ते अनंत काल राक्षसी वृत्तींखाली लपविणे असंभव आहे. वाल्या कोळ्यासारख्या निर्दयी मनुष्याचे जर वाल्मिकी ऋषिंमध्ये परिवर्तन होऊ शकते तर इतरांची गोष्ट काय? हे परिवर्तन कसे होते? तर भगवंताबद्दल विपरीत कल्पना केल्याने आयुष्य इतके तणावपूर्वक होते की शेवटी (विश्वातील सर्वात असंवेदनशील मनुष्यालासुद्धा) स्वतःचे जीवन असह्य व्हायला लागते. त्यामुळे त्याला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पहायला उद्युक्त होण्याखेरीज पर्याय रहात नाही आणि शेवटी योग्य मार्गाकडे तो वळतोच वळतो. लक्षात घ्या की आपल्या जीवनातील दुःखांमध्ये स्वतःला बदलविण्याची शक्ती आहे. म्हणूनच असे म्हणतात की आपण सर्वजण शेवटी भगवंतातच विलिन होणार आहे. अर्थात्‌, सद्गुरुंनी सांगितलेली साधना श्रद्धापूर्वक केली तर दुःखे सहन करताच उपरति होते आणि आपणांतील सुप्त असलेले दैवी गुण प्रभावी व्हायला लागतात.

वरील श्लोकात वर्णन केलेली आसुरी वा राक्षसी वृत्ती शाश्वत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कच्चे द्राक्षफळ जिभेला चटका देण्याइतके आंबट असते त्याप्रमाणे या श्लोकातील राक्षसी वृत्ती मानवाचे जीवन संघर्षपूर्ण करुन टाकते आणि त्याचीच परिणती भगवंतभक्तिच्या माधुर्यात होते. असा मनुष्य मग दैवी गुणांनी भरतो आणि स्वतःचेच नव्हे तर त्याच्या सान्निध्यात आलेल्या इतरांचे जीवनसुद्धा खऱ्या अर्थाने संपन्न करतो. ते कसे हे आपण पुढील काही श्लोकांतून बघू!

हरि

*******************************************************************

अध्याय नववा

(श्लोक ११):

गैरसमजाचे मूळ – स्थूलदृष्टी

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् श्लोक ११:

स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आपणांस जन्म घेतल्यापासून आहे. कालानुसार आपल्या शरीरामध्ये आणि मानसिक धारणेत अनंत बदल घडले तरी या जाणीवेत बदल होत नाही, उलट असे वाटते की या बदलांमुळे आपल्या अस्तित्वाची प्रगती होत आहे. जशी एखादी कळी कालांतराने उमलते त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ होत आहे असे आपणांस वाटते. हे स्वतःचे उमलणे, विकसित होणे अमर्याद चालूच राहणार आहे की त्याला शेवट आहे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे भगवंताच्या अमूर्त अस्तित्वामध्ये आपण विलीन होणे अशी आपणां सर्वांची अंतिम स्थिती होणार आहे. गीतेमधील नवव्या अध्यायामध्ये अशा या अमूर्त भगवंताचे प्रकृतीशी काय नाते आहे हे गूढ स्पष्ट केले आहे. त्यावर आपण विचार करीत आहोत. आत्तापर्यंत आपण असे बघितले की या विश्वातील वरकरणी भिन्न दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक शाश्वत समानता आहे आणि ती समानता हीच भगवंताचे अस्तित्व आहे (श्लोक ), परंतु या विश्वातील कुठल्यातरी एका वस्तूमधून (मग ती कितीही भव्य असो) भगवंत म्हणजे काय हे शोधायचा प्रयत् केला तर त्याचा उपयोग होणार नाही (श्लोक ) कारण कुठल्याही जीवातून (तो केवळ एक अंश असल्याने) या अमूर्त भगवंताचे अर्धवट दर्शन होते, संपूर्ण नाही. (श्लोक ,). इतकेच नव्हे तर अशा जीवांचे अस्तित्व प्रकृती निर्माण करत असते (भगवान नाही) आणि म्हणून ते सर्व जीव कर्माच्या नियमांत अडकलेले असतात. परंतु भगवान या प्रकृतीपासून अलिप्त आणि उदासीन असल्याने या नियमांच्या पलिकडे आहेत, ते केवळ एखाद्या पर्यवेक्षकाप्रमाणे प्रकृतीचा खेळ बघत आहेत आणि या एकमेव प्रेक्षकाच्या निव्वळ उपस्थितीच्या प्रभावाने प्रकृतीचा खेळ सुरु आहे (श्लोक ,,१०). विश्वाच्या उत्पत्तीतील भगवंतांच्या अशा सूक्ष्म सहभागाचे गुह्य या श्लोकांतून प्रगट होते. यातून असे स्पष्ट होते की भगवान सर्व जीवांत उपस्थित राहून आपल्या प्रकृतीच्या लीलांचे कौतुक पहात आहे. खास करुन ज्या मनुष्यांमधील अहंकाराचा लोप झाला आहे त्यांच्यात भगवान इतक्या प्रकर्षाने प्रगट होतात की अशा जीवांमध्ये आणि भगवंतात तात्विकरीत्या काहीही फरक उरत नाही. परंतु बहुतांशी मानवांना ही वस्तुस्थिती जाणवत नाही. अशा लोकांचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की मनुष्य देहाचा आश्रय घेऊन प्रगट होणाऱ्या भगवंताला सामान्य मानव ओळखत नाहीत. अशा जीवांचा आसरा घेऊन परमेश्वर आपल्या लीलांना पुढे चालवत आहे ही वस्तुस्थिती त्यांच्या आवाक्यापलिकडे असल्याने ते मला ओळखू शकत नाहीत.

श्रीसंत गोंदवलेकर महाराजांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर सद्गुरुंच्या शोधात भटकत असताना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना भेटले. तेव्हा त्यांच्या उग्र स्वभावामुळे भाऊसाहेबांना त्यांना गुरु मानण्याची इच्छा झाली नाही. जेव्हा ते गोंदवलेकर महाराजांना भेटले तेव्हा त्यांच्या मृदू स्वभावाने भाऊसाहेबांना जिंकले. तात्विकरीत्या श्री स्वामी समर्थ आणि गोंदवलेकर महाराजांमध्ये काय फरक होता? परंतु त्यांच्या मानवी शरीराचे जे भिन्न स्वभाव होते त्याने श्री भाऊसाहेबांच्या मनात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उत्पन्न झाल्या. अतिशय उच्च साधकही अशा रीतीने प्रत्येक संतांमध्ये स्पष्टपणे प्रगट असलेल्या भगवंताला समजू शकत नाही. मग सामान्यांची गोष्टच बोलायला नको. असे का होते? तर जेव्हा एखाद्या देहामध्ये भगवान प्रकर्षाने प्रगट होतो तेव्हा त्या मानवाच्या मानसिक स्थितीमध्ये आमुलाग्र बदल होतो. परंतु ह्या कायमस्वरुपी झालेल्या बदलाची जाणीव, म्हणजेच भगवंताच्या या जिवंत अस्तित्वाची जाणीव, बाकी सगळ्यांना काही खास परिस्थितींमध्येच होते. इतरवेळी तो देह सर्वसामान्यांसारखेच वर्तन करीत असतो. ज्याप्रमाणे वाघाची खरी शक्ती तो शिकार करतानाच प्रगट होते, इतरवेळी तो एखाद्या मोठ्या मांजरासारखाच दिसतो तशी ही गोष्ट आहे. सर्वसाधारण गोष्टींतील संतांचे सामान्य वागणे आपली दिशाभूल करते. कालानुसार अशा संतांच्या देहाचे अस्तित्व संपले की बाकी लोकांना त्यांचे साधारण वर्तन आठवता फक्त खास प्रसंगी ते कसे वागले होते हेच आठविते आणि मग त्यांचे मोठेपण कळते! म्हणूनच गुरु हयात असताना शिष्यांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा भाव आणि त्यांनी देह ठेवल्यावर त्यांच्याबद्दलचा अत्यंत आदर यांत जमीन-आस्मानाचा फरक दिसतो. मग आपल्याला पारमार्थिक प्रगतीची आलेली एव्हढी संधी आपण कशी वाया घालविली याबद्दल शिष्यांना हळहळ वाटायला लागते.

वरील श्लोकातून भगवान सगुण भगवंताला (म्हणजे संतांना) ओळखणे किती अवघड आहे हे स्पष्ट करुन सांगत आहेत. या श्लोकातील मूढ या शब्दाचा अर्थ मूर्ख असा घेता सर्वसामान्य असा घेतला आहे कारण आपणा सर्वांचीच ही अवस्था आहे! व्यावहारीकरीत्या अतिशय हुशार असणारे मानवसुद्धा इथे सर्वसामान्यांमध्येच मोडतात हे लक्षात घेतले पाहिजे! ज्याप्रमाणे सुंदर फुलांचा सुगंध सर्वच घेतात पण फक्त मधमाशीच फुलांतील मधाला गोळा करते, त्याचप्रमाणे जेव्हा संत समोर येतात तेव्हा आपणा सर्वांनाच एका विशिष्ट आनंदाची जाणीव होते, पण त्यांच्या शिकवणुकीचे मर्म जाणून, स्वतःचे जीवन समृद्ध करणारे साधक विरळाच. हे मर्म जाणणे म्हणजेच या श्लोकात उल्लेख केलेला सगुण भगवंतांचा परं भाव जाणणे होय.

आपल्या गुरुंमधील परमेश्वराचे अस्तित्व त्यांच्या शारीरीक आवडींत दिसत नसून त्यांच्या शिकवणुकीतील वैशिष्ट्यांत असते. हे मर्म जाणता बाह्य शरीराकडे ज्या साधकाची नजर असते ते सर्वसामान्य आहेत. अशा मूढ जनांना जे ज्ञान झालेले असते त्यावर त्यांचा इतका विश्वास बसलेला असतो की त्यापुढे ते काहीही बघू शकत नाही. अंधारात चालत असताना अचानक डोळ्यावर उजेड आला तर त्याने अंधार दूर व्हायच्या ऐवजी जे थोडेफार दिसत असते तेसुद्धा दिसेनासे होते. म्हणजे काय, जर ज्या उजेडाने काळोखी दूर व्हायला हवी त्यानेच अंधार वाढतो! अगदी त्याचप्रमाणे संतांच्या बाह्य वर्तनांवर आपली नजर बसली की पारमार्थिक अज्ञानाचा अंधार अधिकच गडद होतो. संतांचे सान्निध्य अंधारातील दिव्याप्रमाणे असले तरी त्या दिव्याचा प्रकाश समोरील रस्त्यावर (म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावर) पडला तरच उपयोग होतो. जर त्या आयत्या मिळालेल्या प्रकाशाने स्वतःचे डोळेच दिपले (म्हणजे आपण त्यांच्या शारीरिक सान्निध्यालाच महत्व देत बसलो) तर काय उपयोग? म्हणूनच या श्लोकाचे विवरण करताना माउली म्हणतात की

मातें येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनि आकारें

म्हणऊनि ज्ञानचि ते आंधारें ज्ञानासि करी ज्ञा. १७१ :

आणि एकदा बुद्धीभ्रंश झाला, विपरीत ज्ञान सत्य वाटू लागले, की स्वतःच्या सर्व क्रिया घातक ठरतात. ते कसे हे आपण पुढच्या श्लोकात पाहू.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक १० ):

प्रेमाला पर्याय नाही

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

मयाऽध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचराम्

हेतुनाऽनेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते १० :

 

नवव्या अध्यायातील चवथ्या श्लोकापासून जे गुह्य भगवान श्रीकृष्ण सांगायला लागले आहेत त्याची पूर्तता या श्लोकात होत आहे. गेल्या दोन श्लोकांतून त्यांनी अर्जुनाला असे सांगितले कीमीच हे सर्व जीव उत्पन्न करतो (श्लोक )’ आणिमी सर्व कर्मांपासून अलिप्त उदासीन आहे (श्लोक )’. या दोन परस्परविरोधी वाक्यांमुळे अर्जुन गोधळून जाऊ नये म्हणून या श्लोकात भगवान म्हणत आहे कीप्रकृती सर्व चल आणि अचल जीव उत्पन्न करते त्याचे कारण माझे पर्यवेक्षकरुपी (supervisor) अस्तित्व आहे. त्यामुळेच या सृष्टीचे चक्र अव्याहत चालू आहे.

व्यवहारात कित्येकवेळा आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेवरून आपण जो निष्कर्ष काढतो तो सखोल विचारांती पूर्णपणे चुकीचा ठरतो. उदाहरणार्थ, सर्वांना मदत करणाऱ्या लोकांकडे बघून असे वाटते की यांच्यासारखे कनवाळू कोणी नाही. पण जेव्हा असे कळते की समाजात मान्यता मिळावी म्हणून त्यांचे असे वर्तन आहे तेव्हा अशा व्यक्तींची मदत निरपेक्ष नाही हे कळते आणि आपला समज चुकीचा होता हे दिसून येते कारण कनवाळू या शब्दात कुठल्याही अपेक्षेला वाव नाही. अगदी त्याचप्रमाणे, भगवान या सृष्टीला उत्पन्न करुन पालन करतात या वचनावरुन आपल्या मनात प्राथमिकपणे काय विचार येतो? तर या जगाच्या निर्मितीमध्ये भगवंतांचा सहभाग आहे. आपल्यामधील या सूक्ष्म समजामुळेच आपण असे म्हणू शकतो कीया जगात इतक्या अन्यायी घटना होताना दिसतात की भगवंतांवरचा विश्वास उडायला लागतो”. विशेषतः स्वतःच्या जीवनात धर्माचे पालन करुनही जेव्हा विपरीत अनुभव यायला लागतात तेव्हा आपल्या मनात ही भावना येतेच येते! वरील श्लोकातून भगवान असे सांगत आहेत की आठव्या श्लोकाच्या आधाराने झालेला आपला असा समज संपूर्णपणे चुकीचा आहे. जर आठ आणि नऊ या दोन श्लोकांपैकी एका श्लोकाला प्रमाण मानायचे ठरविले तर नववा श्लोक वस्तुस्थितीच्या जास्त जवळ आहे हे इथे स्पष्ट होते. कारण भगवान केवळ साक्षीरुपाने उपस्थित आहेत आणि या उपस्थितीमुळेच बाकी व्यवहार होत आहेत.

परंतु स्वतःच्या जीवनात नववा श्लोक प्रमाण ठेवण्यामध्ये एक मेख दडलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ती म्हणजे आपल्या जीवनात कारण नसतानाचांगलेघडले (उदाहरणार्थ, काही प्रयत् करता श्रीगुरु भेटले) तर त्यावरुन भगवंतांवरील विश्वास वाढणे हेसुद्धा चुकीचे आहे! (कारण या श्लोकात असे म्हटलेले नाही की फक्त वाईट गोष्टींबाबतच ते उदासीन आहेत आणि चांगल्या गोष्टी स्वतः करीत आहेत). बहुतांशी लोकांचा परमेश्वरावरील विश्वास स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर आधारीत असतो. वरील श्लोक आपणा सर्वांच्या मनातील हा विश्वासाचा पायाच हिरावून घेत आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. इतकेच नव्हे तर आपले या विश्वातील सर्व प्रयत् (ज्यामध्ये साधनासुद्धा आली) या प्रकृतीमध्येच असल्याने भगवंतांचे खरे रुप जाणण्यास फोल आहेत असे दिसायला लागते. कारण आपली साधना भगवंतापर्यंत पोहोचायला या जगाचा आणि परमेश्वराचा काहीतरी संबंध असायला हवा. पण ते तर विश्वापासून अलिप्त आणि उदासीन आहेत आणि कुठेही हस्तक्षेप करणारे आहेत असे नवव्या आणि दहाव्या श्लोकांतून स्वतः भगवान सांगत आहेत!

अशारीतीने, भगवंत आणि या सृष्टीचे नाते, त्यामध्ये आपला स्वतःचा नक्की काय सहभाग आहे आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी नक्की काय केले पाहिजे या तीन गोष्टींबद्दल आपला जो सर्वसाधारण समज आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे असे या नवव्या दहाव्या श्लोकांतून स्पष्ट होते. आणि वरकरणी खऱ्या वाटणाऱ्या गोष्टींमागील सत्य वस्तुस्थिती समोर मांडणे म्हणजेच गुपित सांगणे. त्यामुळे नवव्या अध्यायातील मार्गालाराजगुह्यया नावाने उल्लेखिलेले आहे असे वाटते. म्हणूनच वरील श्लोकावरील भाष्यामध्ये माउली म्हणत आहे.

हे सर्वस्व आमुचे गूढ परि दाविले तुज उघड

आता इंद्रिया देऊनि कवाड | ह्रुदयीं भोगी ३५

हा दंशु जंव ये हाता तंव माझे साचोकारपण पार्था

संपडे गा सर्वथा जेंवि तुषीं कणु ३६

थोडक्यात सांगायचे झाले तर वरकरणी जरी या विश्वाची सर्व रचना भगवंतांमुळे झाली असे वाटले तरी भगवंतांपर्यंत या जगातील, म्हणजेच व्यवहारातील, एकही गोष्ट पोहोचू शकत नाही हे गुपित इथे उघडपणे सांगितलेले आहे. परंतु श्रीमद्भगवद्गीता अतिशय प्रेमळ आहे, माउली आहे. त्यामुळे ती नुसतेच आपण कसे चुकीचे आहोत हेराजगुह्यसांगून थांबणारी नाही! चुका दाखवून झाल्या की अतिशय प्रेमाने ती योग्य मार्गसुद्धा आपणापुढे मांडणार आहे. हीराजविद्यापुढच्या श्लोकांतून आपल्यासमोर येणार आहे. म्हणूनच या अध्यायाला राजविद्या-राजगुह्ययोग अशा नावाने वाखाणिलेले आहे.

परंतु पुढचे वाचायच्याआधीच जर आपणास पुढे काय येणार आहे याचा अंदाज बांधायचा असेल तर आपण स्वतःच्या जीवनातील अशी वस्तू शोधायला हवी जी सर्व व्यवहारांपलिकडे आहे कारण भगवान सर्व व्यवहारांपलीकडे आहेत. आपल्या जीवनात व्यवहारातीत एक आणि एकच वस्तू आहेप्रेम. प्रेम हे सर्व व्यवहारांपेक्षा वरचढ असल्यामुळेच खऱ्या प्रेमामध्ये आपण सर्व व्यावहारिक नियम झिडकारायला तयार असतो. या निर्भेळ आणि पवित्र प्रेमाचा झरा आपल्या जीवनात निरंतर वहात आहे पण त्यावर व्यावहारीक अपेक्षांचे आच्छादन असल्याने आपणास कायम तृषार्तच रहावे लागते. साधनेमुळे भगवंत मिळू शकत नाही हे जरी खरे असले तरी श्रीगुरुंनी निर्दिष्ट केलेली साधना अपेक्षेविरहीत केल्याने या प्रेमाच्या झऱ्यावरील व्यावहारीक गोष्टींचे जे दगड पडलेले आहेत ते दूर व्हायला लागतात. लक्षात घ्या की सर्व साधनांचा शेवट आपल्या जीवनात भगवंतांबाबत खरे प्रेम उत्पन्न होण्यात होतो. या प्रेमाच्या धारेत न्हाऊन गेले की आत्म्यावरील आपल्या व्यक्तिमत्वरुपी मलाचा नाश होतो स्वतःचे स्वरुप स्पष्टपणे दिसू लागते. जोपर्यंत या प्रेमाचा उदय आपल्या जीवनात होत नाही, तोपर्यंत आपली पारमार्थिक समज म्हणजे

एऱ्हवी अनुमानाचेनि पैसे आवडे कीर कळले ऐसे

परि मृगजळाचेनि वोलांशे काय भूमि तिमे ३७

स्वतःमधील निरपेक्ष प्रेमाचा अनुभव घेता भगवंताला जाणण्याचा प्रयत् करणे म्हणजे एखाद्या निखाऱ्याला माणिक समजून हातात घेणे होय. परंतु या प्रेमाला विसरुन निव्वळ पुस्तकी ज्ञानाला वा कर्मप्रधान साधनेला महत्व देणे इतके सर्वमान्य आहे की या अध्यायातील पुढील काही श्लोक अशा लोकांचे वर्णन करीत आहेत. त्यानंतर खऱ्या प्रेमाच्या वर्षावाखाली तृप्त असणे म्हणजे काय हे सांगितले आहे. त्यासर्वांवर आपण पुढे विचार करु. आज इतकेच!

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक ९) :

 

कर्मबंधनांतून सुटकेचा मार्ग – प्रेम

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।

उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥९:९ ॥

गेल्या दोन श्लोकांमधून भगवान श्रीकृष्णांनी सृष्टीमधील सर्व जीव प्रकृतीच्या वर्चस्वाखाली कसे पराधीनपणे जगत आहेत आणि निव्वळ देहाच्या विनाशाने कुणालाही सुटका कशी मिळत नाही हे स्पष्ट करुन सांगितले. प्रकृतीने तयार केलेल्या कर्मबंधनांच्या चक्रव्यूहात आपण जन्म घेतल्याक्षणीच अडकलेलो आहोत. त्यातून जीवाने स्वतःची सुटका कशी करून घ्यायची हे आता भगवान स्वतःचे उदाहरण पुढे करुन स्पष्ट करताना म्हणत आहेत की : “(प्रकृतीचे रुप घेऊन केलेली) ही कर्मे मला बांधू शकत नाहीत कारण मी त्या सर्व कर्मांपासून अलिप्त आहे आणि त्यांच्याबाबतीत उदासीन आहे. ”

भगवंतांनी सर्व सृष्टीला निर्माण केले आहे असे आपण मानतो. त्यांनी निर्माण केलेल्या काही घटकांना (स्वतःची बुद्धी, शारीरीक क्षमता इत्यादी) हाताशी धरुन आपण स्वतःच्या सर्व कर्मांची निर्मिती करतो. अशा रीतीने बघितल्यास आपली सर्व कर्मेसुद्धा भगवंतांच्या विश्व निर्माण करण्याच्या कर्माचाच परिणाम आहेत आणि तरीपण भगवान त्यांच्यापासून मुक्त आहेत आणि आपण अडकलेलो आहोत! गंमत बघा, भगवंतांच्या मनात अचानक, कारणविरहीत एक इच्छा निर्माण झाली की आपण एकातून अनेक व्हावे. या आदिसंकल्पाचा परिणाम म्हणून आपण सर्व जन्माला आलो आणि कर्मे करीत बसलो. पण अडकलेले कोण आहे? आपण. भगवान नाही! हे कसे? ज्याप्रमाणे एखादी श्रीमंत व्यक्ति लांबच्या यात्रेला जाताना आपले सर्व अवजड सामान बैलगाडीत ठेऊन स्वतः मोकळेपणाने घोड्यावर बसून पुढे जाते आणि बिचारे बैल ते दुसऱ्याचे ओझे ओढत बसतो आणि सगळी यात्रा करुन झाल्यावर यात्रेचे पुण्य यजमानालाच मिळते, बैलांना नाही! अशी आपली स्थिती आहे. आणि हे सर्व असूनसुद्धा दयाळूपणाची ख्याती परत भगवंताचीच! हे कसे? याचे मुख्य कारण म्हणजे भगवंतांनी आपणास वरील दिलेला सल्ला होय. वरील श्लोकातून त्यांनी स्वतःच्या मुक्तीचा मार्ग उघडपणे आपणास सांगितला आहे. जन्माला आल्याक्षणापासून आपणास कर्मांच्या कचाट्यात अडकवून ठेवलेले आहे हे जितके खरे तसेच त्यांनी त्यातून सुटायचा मार्गदेखील सांगितला आहे हेसुद्धा तितकेच खरे आहे. अतिशय गुह्य असे म्हणून त्यांनी ज्या मार्गाची प्रशंसा केली होती तो उघडपणे इथे आपल्यासमोर मांडलेला आहे. आता यानंतरसुद्धा जर आपण जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेलोच राहीलो, तर त्याने भगवंतांच्या कृपाळूपणाला बाधा येत नाही हे आपण जाणायला हवे.

वरील श्लोकाचे असे महत्व जाणल्यावर त्यात नक्की काय सांगितले आहे यावर विचार करु. कर्मांच्या बंधनातून भगवान सुटले कारण त्यांची अलिप्तता आणि उदासीनता असे त्यांनी सांगितले आहे. या दोन गोष्टी भिन्न आहेत हे लक्षात ठेवणे जरूरी आहे. उदाहरणार्थ, शेजाऱ्याने स्वतःचा छोटा बंगला मोडून मोठी इमारत बांधण्याचे जे कर्म केले आहे त्यात आपला सहभाग काहीच नाही, त्यापासून आपण अलिप्त आहोत. परंतु त्यामुळे आपल्या घरातील खेळती हवा व नैसर्गिक उजेड कमी होईल का या चिंतेमुळे आपण त्या कर्माबाबत उदासीन नाही. याउलट, कचेरीत वरीष्ठांच्या जबरदस्तीने मनाविरुद्ध असे काम करावे लागते की त्यातून आपणास काहीही फायदा होणार नाही (सर्व श्रेय वरीष्ठांनाच मिळणार!) त्यात आपण अलिप्त नसतो पण उदासीन असतो. या उदाहरणांवरुन “अलिप्त असून उदासीन नसणे” आणि “अलिप्त नसून उदासीन असणे” या दोन्ही गोष्टी घडतात हे दिसते. थोडक्यात सांगायचे झाले तर अलिप्तता कर्मे करीत असताना भगवंताच्या अनुसंधानात आहे आणि उदासीनता कर्मफलांबद्दलच्या संपूर्ण दुर्लक्षामध्ये आहे. यावरुन या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत हे स्पष्ट होते.

पुढचा (आणि जास्त महत्वाचा) प्रश्न असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनात कर्म करताना अलिप्तता आणि नंतर त्याम्च्या फलांबद्दलची उदासीनता आणायची कशी? कुठलीतरी एक नवीन साधना या दोन गोष्टींच्या प्राप्तीसाठी सुरु करायच्या आधी जरा विचार करा. आपण केलेली कुठलीही साधनासुद्धा एक कर्मच आहे. ज्याप्रमाणे आपण काट्यानेच पायातील काटा काढतो त्याचप्रमाणे साधनेमार्फत कर्मबंधनातून मुक्त होणे आहे. जर त्या नवीन काट्याचा उपयोग कसा करावा हे कळले नाही, तर एकाच्या ऐवजी दोन काटे पायात घुसतील! साधना करायची कला अशी आहे, की ती करताना इतर व्यावहारिक अपेक्षा तर सोडाच, पण साधनेमुळे माझी जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ति होईल ही अपेक्षासुद्धा मनात नसली पाहिजे. कारण ही (उच्च) अपेक्षासुद्धा कर्मफलाची आसक्ती दर्शविते. लक्षात घ्या की कर्मफलाची अपेक्षा ठेऊन आपण कर्मबंधनांतून मुक्त होणे अशक्य आहे. साधना करायचे एकमेव कारण म्हणजे साधनेवरील प्रेम हे जर असेल तर आणि तरच आपली साधना एक नवीन बंधन न होता पूर्वकर्मांचे निर्दलन करणारी शक्ति होईल. आयुष्यभर शुष्क व्यावहारिक जीवन जगणाऱ्या माणसाने हे दिव्य प्रेम जीवनात आणायचे तरी कसे हे जाणणे आता आवश्यक ठरते.

याचे उत्तर असे की भगवंतांनी आपल्या हृदयात अशा प्रेमाचा झरा जन्मजात ठेवलेला आहे. आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाच्या धोंड्याने या झऱ्याचे तोंड बंद झाले आहे. जेव्हा आपली सद्बुद्धी जागृत होते तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाचा विलोप होतो आणि आपल्या हृदयात निरंतर असणाऱ्या परंतु सध्या दडलेल्या या निरपेक्ष प्रेमाचा झरा मोकळा होतो हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ही सद्बुद्धी एकच आहे (पहा : व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह .. ॥गीता ४१:२॥), पण आपल्या आयुष्यात गरजेनुसार ती वेगवेगळे अवतार घेऊन ती प्रगट होते. वरील श्लोकाच्या संदर्भात बघायचे झाले, तर ही सद्बुद्धी आपल्या मनात अलिप्तता व उदासीनता यांच्याबद्दल परम ओढ लागणे या रुपात येते. गीतेमधील हा श्लोक वाचल्यानंतर जर आपल्या मनाची पूर्ण खात्री झाली की प्रत्येक कर्म करताना त्याच्याबद्दल मानसिक अलिप्तता आणि नंतर कायमस्वरुपी उदासीनता असणे अत्यावश्यक आहे, तर आपोआप आपल्या जीवनात एक वेगळा प्रकाश संचरेल. या प्रकाशात दिसणाऱ्या मार्गावर चालणे याशिवाय अजून दुसरे काही करण्याची जरुरी नाही. माउलींच्याच शब्दात सांगायचे म्हणजे:“जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजाते प्रकटी । तैसी सद्बुद्धी हे थेकुटी । म्हणो नये ॥ ज्ञा. २३८:२। ।” कुठल्याही गोष्टीची सुरुवात एका छोट्या उपक्रमातूनच होते. उदाहरणार्थ, आळंदीहून पंढरपूरला पायी चालत जाणे या वारीची सुरुवातदेखील विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत एक छोटे पाऊल घेण्यानेच होते, २५० कि.मी. चालायचे आहे म्हणून आपण लांब उड्या मारत प्रवास सुरु करीत नाही! त्याचप्रमाणे, प्रकृतीच्या तावडीतून सुटणे हे जीवनातले सर्वात मोठे कर्मदेखील अलिप्तता आणि उदासीनता यांबद्दलची भिती जाण्याच्या छोट्या उपक्रमातूनच होते.

अशा रीतीने, वरील श्लोकातून आपणापुढे प्रकृतीच्या कचाट्यातून सुटण्याचा एक सोपा मार्ग दिसला आहे. तो म्हणजे व्यावहारिक कर्मांबद्दलची अलिप्तता व उदासीनता याबद्दल आपल्या मनात प्रेम जागृत होणे. या प्रेमाच्या सुखवर्षावाखाली आपली वाटचाल सुरु झाली की आपोआप आपली अवस्था अशी होईल की “देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणे नाही समस्ता । संसारदुःखा ॥ ज्ञा.३३८:२॥” मग आणखी काय करावयाला हवे?

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा(श्लोक ८):

सृष्टीची व्यवस्थाभाग 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृज्यामि पुनः पुनः ।

भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌ ॥ ८:९ ॥

नवव्या अध्यायातील सातव्या श्लोकातून भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की अर्जुना, शेवटी या जगातील सर्व जीव शेवटी माझ्या प्रकृतीतच विलीन होतात आणि योग्य वेळ आली की परत जन्म घेऊन आपले आयुष्य व्यतीत करतात. हे जन्ममृत्यूचे चक्र कधीही न थांबणारे आहे हे स्पष्ट करण्यास भगवान या श्लोकात असे म्हणत आहेत की “ माझ्यात असलेल्या प्रकृतीमुळे सर्व सृष्टी निर्माण होते. यातील सर्व जीव प्रकृतीच्या नियमांनी बांधलेले असून, ते आपल्या गुणांनुसार (आपोआप) परत परत उत्पन्‍न होतात.” एकदा प्राण गेला की प्रत्येक जीवाचे शरीर नष्ट पावते. ते परत उद्भवणे असंभव असल्याने वरील श्लोकात निर्देश केलेला पुनर्जन्म देहाचा नसणार हे स्पष्टच आहे. मग नक्की कोण प्रकृतीच्या कचाट्यात अडकून परत परत जन्म घेतो यावर विचार करणे या श्लोकाचा गूढार्थ समजण्यास आवश्यक आहे. कारण एकदा जन्म-मरण्याच्या चक्रात अडकलेल्या आपल्या अस्तित्वाचा बोध झाला की स्वतःला त्यापासून वेगळे ठेवणे ही साधना जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग होते.

एकच व्यक्ति निरनिराळ्या स्तरांवर अस्तित्वात असते. आपले शरीरावर आधारीत असलेले अस्तित्व यापैकी अगदी जन्मल्यापासून आपल्या नजरेसमोर आहे. परंतु आपण म्हणजे निव्वळ देह नाही याची कल्पनासुद्धा आपणास निश्चितपणे आहे. याचे कारण असे की जन्मल्यापासून आत्तापर्यंत आपल्या देहामध्ये इतके बदल झालेले असूनसुद्धा आपण स्वतःला एकच व्यक्तिमत्व समजतो. एकाच अस्तित्वाचा आपण प्रकर्षाने अनुभव घेतो. आपले दुसरे अस्तित्व म्हणजे आपल्या मनाची घडण. शारीरीक अस्तित्वापेक्षा हे निश्चित जास्त महत्वाचे आहे. अमुक व्यक्तीला तुम्ही ओळखता का? असे आपणास विचारल्यास आपण काय म्हणतो? मी त्यांना पाहीलेले आहे पण जवळीक नसल्याने ओळखत नाही. यातून हे स्पष्ट होते की निव्वळ व्यक्तीच्या शरीराचे ज्ञान झाले तरी आपले समाधान होत नाही. याउलट त्या व्यक्तीची विचारसरणी पूर्णपणे कळली की आपण म्हणतो मी त्याला चांगला ओळखतो. याचाच परीणाम म्हणजे एखाद्या व्यक्तीशी मैत्री टाळायची असेल तर आपण आपल्या मनात काय चालले आहे हे सांगत नाही. म्हणजे आपले खरे व्यक्तिमत्व आपल्या शरीरावर नसून मनातील घडामोडींवर जास्त अवलंबून आहे असे दिसून येते.

त्यामुळे जर आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांचा पुनर्जन्म झाला तर तो आपलाच दुसरा अवतार आहे असे आपण मानायला हरकत नाही. पण असे होऊ शकते का? शरीर भस्मसात झाल्यावर मनातील भावनांची काय अवस्था होत असेल? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यास अडचण अशी येते की जसे आपण स्वतःच्या शरीराला ओळखतो तसे मनाला जाणत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर बघायचे असेल तर मन म्हणजे काय हे बघायला हवे. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या मते मन म्हणजे बुद्धी आणि इंद्रिये यांच्या संयोगामध्ये आपोआप तयार झालेले आहे. ते बुद्धीच्या नंतर आणि अहंकाराच्या आधी असे दोन्हींच्या सांध्यात प्रगट होते (पहा अध्याय १३, ओवी १०४ ते ११५). म्हणजे आपले मानसिक अस्तित्व स्वतःच्या अहंकारावर अवलंबून आहे असे दिसून येते. सर्वसाधारणपणे आपला अहंकार भूतकाळात घडलेल्या शारीरीक कर्मांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, महाविद्यालयातील विद्यार्थी स्वतःच्या शालेय कामगिरीवर आपला अहंकार ठेवतो, कचेरीतील बॉस आपल्या कर्मचारी अवस्थेतील कर्तबगारीवर बढाई मारतो आणि पारमार्थिक साधक आत्तापर्यंत केलेल्या साधनेवर स्वतःची प्रगती मोजत असतो. अशारीतीने विचार केल्यास असे दिसून येते की आपला पुनर्जन्म होतो म्हणजे काय, तर देहाचे पतन होईस्तो आपल्या हातून जी काही कर्मे झाली आहेत त्यांच्याबद्दल आपल्या ज्या भावना आहेत त्या नष्ट न पावता परत दुसऱ्या एका देहाचा आश्रय घेऊन जन्म पावतात. ज्याप्रमाणे क्षारयुक्त पाणी उकळून नष्ट जाल्यावर त्यामधील क्षारांचा थर भांड्यात राहतो त्याचप्रमाणे देह काळाच्या तापाने नाहीसा झाला तरी त्याने केलेल्या कर्मांचा अवशेष प्रकृतीच्या भांड्यात बाकी राहतो. नवीन देहारुपी द्राव त्यावर पडला की तो क्षार पूर्णपणे विरघळून त्या देहात सुप्त रुपाने राहतो. आता या नव्या देहाकडून जी कर्मे होतील त्याबद्दलच्या भावना या पूर्वीच्या भावनांना जोडल्या जाऊन आपल्या अस्तित्वातील अहंकाराची खारट चव अजूनच वाढते आणि आपण जन्म-मृत्यूच्या चक्रात अजून गुरफटले जातो!

इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती म्हणजे भूतकाळातील ज्या कर्मांचे ज्ञान आपणांस आहे त्याने अहंकार वाढतो पण जी कर्मे आपण करतो आणि विसरुन जातो त्यांचे काय होते? जर अशी कर्मे अहंकाराची वृद्धी करत नसतील तर पुनर्जन्मापासून सुटका करुन घेण्यास केलेली कर्मे विसरुन जाणे हा एक सोपा उपाय आपणास उपलब्ध होईल. परंतु जर जगाकडे बघितले तर असे होत नाही असे दिसून येते. कारण असे जर असते ज्या वृद्ध माणसांना विस्मृतीचा रोग जडलेला असतो ती सर्व मोक्षाला पात्र जाली असती. परंतु अशा लोकांमध्ये सतत आनंदी वृत्ती आढळत नाही. आणि शास्त्रात असे लिहीले आहे की ज्याप्रमाणे पहाट दिसल्याशिवाय सूर्योदय होत नाही त्याचप्रमाणे मनात निरंतर आनंदाचा झरा वहात असल्याची स्थिती असल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, विस्मृतीत सुटका असती तर संतांनी आयुष्य़ कसेही जगा पण म्हातारपणी विस्मृती वाढवा अशी साधना सांगितली असती! परंतु असे कुठल्याही संताने सांगितलेले आढळून येत नाही. त्यामुळे मी नक्की काय कर्मे केली आहेत याची जाणीव नसणे त्यांच्या बंधनांतून सुटका करीत नाही असे म्हटल्याशिवाय पर्याय रहात नाही.

स्वतः केलेया कर्मांचा लेप आपल्या अस्तित्वाला लावायचा नसेल तर कर्म करतानाच आपण अतिशय सावध रहायला हवे हे आपण निःसंदेह जाणून घेतले पाहीजे. एकदा बेसावधपणे कर्मे केली ती आपल्यामागे लागतातच. यातून सुटण्याचा मार्ग दुहेरी आहे. एक म्हणजे सद्गुरुंनी सांगितलेली साधना अतिशय प्रेमाने करणे (ज्याने आत्तापर्यंत अविचाराने केलेल्या कर्मांचा लेप हळूहळू धुतला जातो) आणि यापुढे जी कर्मे करु ती करतानाच सावध रहाणे, विचारपूर्वक करणे. सद्गुरुंची साधना आपल्यासमोर आहेच, त्यामुळे त्याबद्दल मनात संदेह रहात नाही. पण कर्म करताना सावध कसे रहावे हे आपणांस समजून येत नाही. म्हणूनच भगवान पुढच्या श्लोकातून जीवनातील सावधपणा म्हणजे काय हे अर्जुनाला शिकवितील. ते आपण पुढच्या वेळी बघू, आत्ता एव्हढेच.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा(श्लोक ७):

सृष्टीची व्यवस्था

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌ ॥ ७:९ ॥

नवव्या अध्यायातील सहाव्या श्लोकातून भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की या जगातील यच्चयावत जीव माझ्या निर्गुण रुपी वातावरणात पृथ्वीवरील हवेप्रमाणे भ्रमण करीत आहे. हवेच्या प्रभावाखाली धूळीचा कण वातावरणात कितीही उंच गेला तरी कालांतराने तो परत पृथ्वीवरच येतो. अगदी त्याचप्रमाणे सर्व भूतांची अवस्था होते हे स्पष्ट करण्यास भगवान या श्लोकात असे म्हणत आहेत की “अर्जुना, शेवटी या जगातील सर्व जीव शेवटी माझ्या प्रकृतीतच विलीन होतात आणि योग्यवेळ आली की परत जन्म घेऊन आपले आयुष्य व्यतीत करतात.

भगवद्गीतेचा उद्देश्य काय आहे? ढोबळपणे बघितले, तर अर्जुनाच्या मनातील युद्ध लढण्याबाबतचा संदेह दूर करणे असा दिसतो. परंतु माऊलींच्या दृष्टीने बघितले तर “श्लोकाक्षर द्राक्षलता । मांडव जाली आहे गीता । संसारपथश्रांता । विसंबावया ॥ १६७०:१८ ॥ ” म्हणजे काय, तर सर्वांना व्यावहारीक मनःस्तापांतून शांति मिळावी याकरीता भगवंतांनी गीता सांगितली आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या व्यावहारीक अडचणी आहेत. कुणाला पैसे कसे कमवायचे याची विवंचना आहे, तर कुणी जमविलेले पैसे कसे आपल्याकडेच राहतील याच्या काळजीत आहे. एकजण पुत्रप्राप्तीकरता प्रयास करत आहे तर दुसरा पुत्राचे चांगले संगोपन करु शकू का नाही या चिंतेत आहे. जर प्रत्येकाला स्वतःच्या विवंचनेतून सुटायचे असेल, तर गीतेचा अभ्यास प्रत्येक साधकाचा एकदम व्यक्तिगत होतो. एखाद्या शालेय विषयांप्रमाणे पुस्तकी रहात नाही. त्यामुळे भगवद्गीतेचा मला जो वैयक्तिक लाभ होईल तोच लाभ बाकी अभ्यासकांना होईल असे नाही. या वस्तुस्थितीतही एक गोष्ट सर्वांना समान आहे. ती म्हणजे सुखप्राप्ती. निरनिराळ्या रोग्यांनी आपापल्या रोगाप्रमाणे वेगवेगळे औषध घेतले तरी सर्वजण निरोगी या एकाच अवस्थेला पोहोचतात, तसेच गीतेचा वैयक्तिक अर्थ वेगळा निघाला तरी स्वतःला समजलेल्या अर्थाप्रमाणे जीवन व्यतीत केल्यास सर्वांना एकाच शाश्वत सुखाचा अनुभव येतो.

आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपणास अनुभवायला मिळालेले कुठले सुख शाश्वत आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपली सुखाची व्याख्या “आत्तापर्यंत जे काही आपण दुःख म्हणून मानत आलो आहोत त्यापासून सुटका” अशी असल्याने सुख ही वस्तू अतिशय सापेक्ष आहे, प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून आहे. ( निरोगी अवस्था म्हणजे शरीरातील सर्व ग्रंथी व अवयव आपापले काम सुरळीतपणे करीत असणे होय. आपणा सर्वांनाच ही समान व्याख्या लागू आहे. सुख ही कल्पना अशी नाही.) याशिवाय आपण दुःख म्हणजे काय ही व्याख्या बदलली की सध्याचे सुख नष्ट होते. उदाहरणार्थ, जो सतत भुकेला आहे, त्याला दररोज व्यवस्थित भोजन मिळणे हे सुख होते. पण त्याच माणसाच्या दररोजच्या जेवणाची तरतूद झाली की नुसते जेवण मिळून त्याला सुख मिळत नाही नाही तर जेवायला कुठले पदार्थ मिळतात यावर सुख अवलंबून राहते. गर्दभासमोर गाजर टांगते ठेवून मालक त्याला सतत कामाला लावतो त्याचप्रमाणे आपली सुखाची संकल्पना सतत बदलत राहून आपण निरंतर सुखाच्या मागे धावत असतो. सुखाच्या आपल्या या व्याख्येतच अशाश्वतता भरलेली आहे. आपल्या या क्षणिक सुखामागे धावण्याच्या अवस्थेलाच संतांनी “भवरोगी”, “संसारश्रांत”, “अज्ञानी” इत्यादी नावांनी संबोधिले आहे. अशा परीस्थितीत भगवद्गीता आपणा सर्वांना शाश्वत सुख कसे देऊ शकते हे बघणे जरुरी आहे.

वर आपण बघितले की आपली सुखाची संकल्पना भोगलेल्या दुःखांवर म्हणजेच आत्तापर्यंत आपणांस आलेल्या अनुभवांवर अवलंबून आहे. आणि स्वतःच्या इच्छांच्या आत्यंतिकेवर आलेल्या अनुभवांपासून किती खोल धडा घ्यायचा हे ठरत असते. उदाहरणार्थ, लहानपणी पतंग विकत घ्यायला माझ्याजवळ पैसे नव्हते (आणि मला पतंग उडवायची अतिशय हौस असेल) तर या वरकरणी अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या अनुभवाच्या जोरावर पैसे जवळ असले म्हणजे सुख असे माझे मन ठामपणे ठरवू शकते. याउलट जर माझी कुठलीही इच्छा अतिशय प्रबळ नसेल तर इच्छांची अपूर्तता हे दुःख रहात नाही. आणि दुःखच नसेल तर सुख म्हणजे काय हे नक्की ठरवायला माझ्याकडे काही उपाय रहात नाही. अशावेळी जे काही घडेल त्याला आपण विनाआक्रोशे सामोरे जातो. आयुष्य असेच आहे याचा स्वीकार करतो. उदाहरणार्थ, जिवंत राहण्यास दरक्षणी श्वास घेणे जरुरी आहे या कायमच्या बंधनाबद्दल कोण दुःख करतो?! श्वास घेतल्यावाचून जगायला हवे ही इच्छा माझ्यात प्रबळ नाही म्हणून निरंतर श्वास घेण्याचे जे कष्ट होतात त्याचे कधीच दुःख होत नाही! भगवद्गीतेचा आपणांस शाश्वत सुख देण्याचा मार्ग म्हणजे यातील श्लोकांवर चिंतन आणि मन केल्यास (स्वानुभूतीने, निव्वळ पुस्तकी अर्थाने नव्हे!) आपल्या मनातील आत्यंतिक इच्छा नष्ट होऊ लागतात. शेवटी दुःख उत्पन्न होईल अशी शक्यताच रहात नाही आणि या अवस्थेला “शाश्वत सुखी” असेच म्हणायला हवे.

वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण आपल्या हातात असे एक शस्त्र देत आहेत की ज्यामुळे आपण मनातील इच्छांच्या जंजाळाचा छेद करु शकतो. जर श्लोकात सांगितल्याप्रमाणे सर्व विश्व प्रकृतीच्या नियमांप्रमाणे वर्तन करीत आहे तर माझ्या जीवनातील घटनासुद्धा माझ्याच पूर्वकर्मांचे फल म्हणून सामोऱ्या आल्या आहेत हे स्पष्ट व्हायला लागते. म्हणजे काय, तर निव्वळ आपणच स्वतःवरील आपत्तींना कारणीभूत आहोत हे सत्य दिसायला लागते. जर स्वतःच्याच पायावर आपण कुऱ्हाड मारली तर आपण दुःख “घाव घालायची बुद्धी का झाली?” यावर करतो, झालेल्या जखमेबद्दल नाही!! त्याचप्रमाणे वरील श्लोकावर चिंतन व मनन केले तर जीवनातील सर्व घटनांना माझेच संचित कारणीभूत आहे हे कल्पना आपणांमध्ये इतकी दृढ होईल की समोरील घटनांवर दुःख करण्यापेक्षा परत चूक करु नये असा आपला दृष्टीकोन राहील. या श्लोकामुळे असे जाणविते की आपले सध्याचे अस्तित्व म्हणजे दुसरे काही नसून आपल्याच पूर्वसंचितातील काही कर्मांचे फल भोगण्यास प्रकृतीने निर्माण केलेली एक व्यक्ती आहे. त्यामध्ये स्वतःच्या इच्छांची भर आपण घातली तर या देहाचे पतन झाल्यावर त्यांचे फल भोगण्यास परत एक व्यक्ती (ज्याला आपला पुनर्जन्म म्हटले पाहिजे) निर्माण होणार आहे आणि हे चक्र कल्पांतापर्यंत चालणार आहे. यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मनातील सुखाच्या कल्पनांचा नाश होणे होय, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होणे होय. वरील श्लोकातील मननामध्ये ही ताकद आहे. म्हणूनच माऊली या श्लोकाचे वर्णन करताना म्हणते “म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसे वर्म जे आहें फुडे । ते दावो आतां ॥ ९६:९ ॥” आपले अस्तित्व या जगाच्या प्रारंभापासून निर्माण झालेले आहे आणि सध्याचा जन्म म्हणजे या अस्तित्वाच्या प्रवासाचा केवळ एक टप्पा आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि या सत्याला विसरून आत्ताच्या जन्मावरच प्रेम करणे ही आपली निद्रा आहे. वरील श्लोकाच्या अभ्यासाने ही निद्रा लवकरात लवकर मोडू दे अशी माऊलींच्या चरणीं प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा(श्लोक ६):

आपले कर्मांशी नाते

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

यथाऽऽकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्

तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय :

नवव्या अध्यायातील गेल्या दोन श्लोकांतून स्वतःच्या निर्गुण स्वरुपाच्या अस्तित्वानेच जरी हे सर्व विश्व गोचर होत असले तरी माझा त्याच्याशी काहीही संबध नाही असे ठामपणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. हीच गोष्ट अधिक स्पष्ट होण्यास वरील श्लोकातून ते एक उदाहरण देत आहेत. भगवान म्हणत आहेत: ज्याप्रमाणे पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा सर्व साठा कायम आकाशात राहून त्यातच सतत भ्रमण करीत असतो, त्याचप्रमाणे या विश्वातील सर्व गोष्टी माझ्यात अस्तित्वात आहेत.आकाशात हवा आहे असे आपण म्हणतो परंतु आकाशाचा हवेशी काहीही संबंध नसतो. एव्हढेच नव्हे तर जिथे हवा संपते तिथेच आकाश सुरु होते! परंतु आकाशाच्या अस्तित्वानेच हवेला चलनवलन करण्यास जागा मिळते आणि हवेचे संपूर्ण अस्तित्व अशा संबंधरहीत आकाशानेच तयार होते. अगदी त्याचप्रमाणे भगवंतांच्या निव्वळ अस्तित्वाच्या छत्राखाली हे चराचर उत्पन्न झाले आहे असे भगवान म्हणत आहेत. या लेखातून आपण या उदाहरणाचा आधार घेऊन साधकाच्या दैनंदिन जीवनाला यामुळे कुठली दिशा मिळू शकेल यावर विचार करु.

खरे म्हणजे कुठल्याही उदाहरणाला जास्त समजण्याचा प्रयत् करणे परमार्थाच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरु शकते. स्वामी स्वरुपानंदांचे सत्शिष्य श्री सत्यदेवानंद सरस्वती ही गोष्ट स्पष्ट करण्यास म्हणायचे की चिंधीच्या बाहुलीत काय दडलेले आहे हे पहायला चिंध्यांच्या गाठी सोडल्या तर हातात नुसत्या चिंध्याच राहतात. त्याचप्रमाणे कुठल्याही उदाहरणात उगाचच खोलवर शिरुन जास्त समजण्याच्या प्रयत्नांत मूळ मुद्दा काय आहे हे विसरुन निव्वळ शब्दांच्या जंजाळात अडकण्याचा धोका असतो. परंतु गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अर्थ नित्यनूतन आहे असे भगवान शंकरांनी पार्वतीदेवीला सांगितले असल्याने (तेथ हरु म्हणे नेणिजे। देवी जैसे का स्वरुप तुझे। तैसे हे नित्यनूतन देखिजे। गीतातत्व ॥ज्ञा. ७१:१॥ ), आपणांस वरील उदाहरणावर तारतम्य ठेऊन अधिक विचार करायला हरकत नाही असे वाटते.

या श्लोकातील आकाश आणि हवा यांच्या संबंधाचे उदाहरण देण्यास संदर्भ काय आहे? तर आधीच्या दोन श्लोकांत सांगितलेले भगवंतांचे विश्वाशी नाते. म्हणजे आकाश हे भगवंतांचे रुपक आहे आणि या चराचरातील सर्व जीव म्हणजे हवेतील अणू-रेणू. हवेतील अणूंचे अस्तित्व सतत असते परंतु ते दृष्यस्थितीत येण्यास त्यांना प्रवाहीत होणे जरुरी असते. त्यातसुद्धा, त्यांचे प्रवाहीत होणे त्यांचे स्वतःचे कर्म नसते तर बाह्य तपमानावर अवलंबून असते आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे गेल्यावरसुद्धा त्यांच्या मूळ रुपात बदल पडत नाही. उदाहरणातील या वैशिष्टांचे आपल्या जीवनात काय प्रतिबिंब पडते हे आपण इथे बघणार आहोत.

हवेतील रेणूंप्रमाणेच चराचरातील सर्व जीव सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांच्या प्रभावात येऊन कर्मे करीत असतात असे दिसून येते. एव्हढेच नव्हे तर हवेचा कण या जगात नक्की कुठे आहे या माहीतीवरुन त्याचे स्वरुप जाणणे जसे अशक्य आहे त्याचप्रमाणे या देह-मनाच्या आधारावर घडलेल्या आपल्या कर्मांवरुन स्वतःची ओळख करुन घेणे अशक्य आहे. म्हणजे काय तर कुठलीही कर्मे हातून घडली तरी आपल्या मूळ अस्तित्वात बदल पडत नाही. (म्हणूनच लहानपणापासून आत्तापर्यंत इतकी कर्मेकरुनसुद्धा आपण स्वतःचे अस्तित्व जन्मापासून एकच आहे असे मानतो.) त्यामुळे हवेचा कण आकाशात एका ठीकाणाहून दुसरीकडे जाणे याचा अर्थ आपल्या जीवनात कर्मे करणे असा होतो. अशा रीतीने विचार केल्यास वरील उदाहरण आपणांस असे सांगत आहे की जसे जन्माला येताना होतो तसेच आपण आत्ताही आहोत आणि आत्तापर्यंत आपल्याहातून झालेली कर्मे म्हणजे त्रिगुणांच्या प्रभावाखाली भगवंतांच्या विश्वरुपामधील आपला प्रवास होय. हा प्रवाससुद्धा आपोआप त्रिगुणांच्या प्रभावामुळे आणि पूर्वसंचितामुळे झालेला आहे. म्हणजे काय तर आपण या संसारात नक्की किती आणि कुठली कर्मे केली आहेत यावरुन आपल्या स्वरुपाची ओळख होऊच शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराजांना जेव्हा अनुग्रह मिळाला तेव्हा अगदी हेच वाक्य (तू जन्माला आलास तेव्हाच्या तुझ्यात आणि आत्ताच्या तुझ्यात काहीही फरक नाही) त्यांच्या गुरुंनी का सांगितले हे या श्लोकाने स्पष्ट होते. केवळ या वाक्यावर चिंतन आणि मनन करुन मी सिद्ध झालो असे नंतर स्वतः श्रीनिसर्गदत्त महाराजांनी सांगितले.

खरोखर, स्वतःच्या जीवनाबद्दलचे हे सत्य जर आपणास निःसंशय पटले तर आपोआप आपल्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल होतो. स्वतःच्या आई, बाबा, मुलगा, नुलगी, सेवक, अधिकारी अशा अनेक जवळ बाळगलेल्या रुपांचे ममत्व आपणांस आहे कारण त्यातून आपण स्वतःला बघायचा प्रयत् करीत असतो. अगदी खोलवर आपल्या मनात अशी एक समजूत रुजलेली आहे की स्वतःकडुन घडलेल्या या कर्मांमुळे आपण या जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करीत आहोत. आपल्या या मानसिक धारणेचे संपूर्ण उच्चाटन करणे जरुरी आहे. कारण जोपर्यंत कर्मांच्या आधारावर स्वतःच्या आयुष्याचे समर्थन करण्याचा विचार मनातून पूर्णपणे निघून जात नाही, तोपर्यंत स्वतःच्या गुणातीत, कर्मरहित अस्तित्वाला जाणून घेण्याची योग्यता आपणास लाभत नाही. आत्तापर्यंतची आणि पुढे होणार असलेली आपली सर्व कर्मे तैसा अन्वयाचेनि आधारें। जातीचेनि अनुकारें। जे जेणें अवसरें। करणे पावे ॥ज्ञा. ४५:६॥ अशी केवळ प्रकृतीच्या आणि पूर्वसंचितांच्या परीणामांनी झालेले आहे हे कळणे अतिशय महत्वाचे आहे. या जाणीवेत क्षेत्र-क्षेत्रज्ञ यांच्यामधल्या भेदाची पूर्ण कल्पना आहे. म्हणून या ज्ञानामुळे आपोआप अमानित्व आणि अदंभित्व हे गुण आपल्यामध्ये विकसित होऊन सिद्धत्वाची प्राप्ती होते. वरील उदाहरणावरील चिंतनाने आपणास असा विचार करण्यास साह्यता मिळते.

या उदाहरणातील हवेच्या कणामध्ये स्वतःला बघण्याचा दुसरा परीणाम आता आपण बघू. हवेच्या कणाचे वातावरणातील सध्याचे ठीकाण म्हणजे आपले या संसारातील सध्याचे स्थान. ज्याप्रमाणे हवेचा कुठलाही कण स्वतःला ठराविक स्थळांतच बांधून ठेवत नाही त्याचप्रमाणे आपण स्वतःला ठराविक रुपांत बंदिस्त करणे योग्य होत नाही. स्वतःला कुठल्यातरी एका रुपात बघण्याचा प्रयत् करणे म्हणजे स्वतःच्या चलनशीलतेला सोडून एका चाकोरीत राहणे. आपली नैसर्गिक परीव्राजकता सोडून गृहस्थ बनणे. परमार्थातील सर्व साधनेच्या मार्गांत परीव्राजकतेला महत्व का आहे हे इथे स्पष्ट होते. भगवंतांना प्रिय असलेल्या नराप्रमाणेअनिकेत” (पहा: श्लोक १९, अध्याय बारा) व्हायचे असेल तर स्वतःच्या सर्व प्रतिमांतील मिथ्यत्व जाणणे अत्यावश्यक आहे. व्यावहारीक दृष्टीने प्रपंचात राहूनसुद्धा बेघर होणे म्हणजेच स्वतःचे आकाशातील हवेप्रमाणे सर्वत्र विहार करण्यास तयार असणे होय. एकदा आपण स्वतःच्या हातून घडलेल्या कर्मांशी जोडलेले नाते तोडले की ही अवस्था सहज प्राप्त होते. मग आपण जे समोर येईल त्याचा सकारात्मक स्वीकार करतो आणिजन्माला येऊन काय केलेस?” असे कुणी विचारले तरकाहीही नाहीअसे सत्यवचन आपल्या मुखातून आपोआप बाहेर पडते. जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर म्हणून आपण स्वतःची व्यावहारीक वा आध्यात्मिक कर्तबगारी दाखवीत आहोत तोपर्यंत आपणांस पारमार्थिक सत्य कळलेले नाही असे समजण्यात काहीच चूक नाही. स्वानुभूतीने स्वतःच्या संपूर्ण नैष्कर्म्याची सत्यता पटणे म्हणजेच परमार्थ होय. भगवंतांनी वरील श्लोकात दिलेल्या उदाहरणावर अशा तऱ्हेने चिंतन-मनन घडले तर जरुर या सत्यतेच्या प्रकाशात आपल्या आयुष्याची वाटचाल होईल. भगवद्गीतेचा अभ्यास करणे म्हणजे असे चिंतन सतत करणे आणि त्यातून जो बोध होईल त्याप्रमाणे आयुष्य जगणे. बरोबर ना?

हरि

*******************************************************************

अध्याय नववा (श्लोक ५):

भगवंतांचे विश्वाशी नातेभाग 

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्

भूतभृन्न भूतस्थो ममात्मा भूतभावनः :

भुईमुगाच्या शेंगेचे टरफल टाकून त्यात लपलेला दाणा ज्याप्रमाणे आपण जवळ ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाच्या कवचाकडे दुर्लक्ष करुन त्यात असलेल्या भगवंतांच्या अस्तित्वाला जवळ कर असे गेल्या श्लोकातून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. आयुष्यभर आपले सामाजिक अस्तित्व जपण्यात धन्यता मानत असल्याने हा सल्ला बुद्धीला पटला तरी प्रत्यक्षात उतरविणे आपणांस कठीण होते. म्हणून या उपदेशाला अजून स्पष्ट करण्यास भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकातून म्हणत आहेत: कुठल्याही संकुचित व्यक्तिमत्वाला माझ्यात अजिबात थारा नसतो. माझ्या आणि या विश्वाच्या मिलनाची कमाल बघ: चराचरातील सर्व व्यक्तिमत्वे माझ्यामुळेच अस्तित्वाला येतात आणि त्यांना जगायला मीच कारणीभूत आहे पण मी त्यांच्यात अजिबात सापडणार नाही ().

गेल्या श्लोकातून आपण असे बघितले की अतिशय सहजपणे प्राप्त होणारे पारमार्थिक ज्ञान आपण संकुचित व्यक्तिमत्वांना महत्व देण्याने धिक्कारतो. म्हणजे काय, तर आई, बाबा, मुलगा, सेवक, गुरु, बंधू, मित्र यापैकी एखाद्या नावात स्वतःला विसर्जित करण्याने आपण स्वतःभोवती असे एक कवच निर्माण करतो की ज्यातून ज्ञानाचे किरण आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कालानुसार आणि संदर्भाप्रमाणे एकसंध असलेले आपले अस्तित्व वेगवेगळ्या नावांत समोर येत असल्याने आपल्या या अज्ञानाच्या कवचाचे स्वरुप सतत बदलत असते! वैद्यकीय शास्त्रात सर्दीवर लस नाही कारण लस जीवाणूच्या रुपावर अवलंबून असते आणि सर्दीचा जीवाणू आपले बाह्य रुप सतत बदलत असतो. त्यामुळेच सात दिवस त्रास भोगण्याशिवाय सर्दीवर उपाय रहात नाही! अगदी याचप्रमाणे आपण या विश्वात गुंतण्याची कारणे नित्यनूतन असल्याने भवरोगावर उपाय आपल्याकडे नाही आणि केवळ सात दिवस नव्हे तर जन्मोन्जन्मे या रोगाला सहन करण्याशिवाय पर्याय नाही. या दारुण अवस्थेचे वर्णन करताना माऊली म्हणते जया देहसंबंधा आंतु प्रतिपदी आत्मघातु भुंजता उसंतु कहीच नाही १२७६:१८॥

भवरोगातून सुटण्याचा मग उपाय काय? ज्याप्रमाणे देह असताना कालानुसार कुठलातरी रोग बळावतोच आणि देहत्याग केल्यानंतरच सर्व रोगांपासून आपोआप सुटका होते, त्याचप्रमाणे आपल्या सर्व व्यक्तिमत्वांचा त्याग केल्यावरच भवरोगाचे निवारण होते. भागवतामध्ये भरत राजाची गोष्ट आहे. त्याने आपल्याहरीणाच्या पाडसाचा पालकहे सोडून बाकी सर्व व्यक्तिमत्वांचा त्याग केला होता. केवळ त्या एका संकुचित व्यक्तिमत्वामुळे त्याला भगवंतांशी एकरुप होण्याआधी दोन जन्म अजून घ्यावे लागले. साधकाच्या साधनेचा मार्ग कुठलाही असो, भगवंतांशी जवळीक करुन भवरोगापासून सुटका हवी असेल तर स्वतःच्या सर्व संकुचित व्यक्तिमत्वांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे अत्यावश्यक आहे. माऊलींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मजही शरण रिघे आणि जीवत्वेंचि असिजे धिग्बोली यिया लजे प्रज्ञा केवीं ॥१४०२:१८॥ आणि मा मी विश्वेश्वरु भेटे आणि जीवग्रंथी सुटे हे बोल वोखटें कानी लाऊ ॥१४०४:१८॥ निर्गुण भगवंताला भेटण्यास स्वतःच्या सर्व वेगवेगळ्या संकुचित अस्तित्वांचा (म्हणजेच वरील दोन ओव्यांत निर्देश केलेल्याजीवत्वाचा) त्याग करणे जरुरी आहे. एखाद्या घरात बसून निरनिराळ्या खिडक्यांतून आपण बाहेरील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला तरी प्रत्यक्ष निसर्गात राहण्याचे सुख मिळविण्याकरीता घराचा त्याग करावा लागतो. निसर्गाच्या सर्वव्यापकतेची खरी कल्पना आणि त्याचे निरंतर बदलणारे खरे रुप आपण तेव्हाच जाणू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या देहाचा आधार घेत वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या झरोक्यांतून भगवंताची लीला बघायला लागलो तर त्याचे खरे रुप आपणांस कधीही दिसणार नाही. पाण्यावरील फेसात पाणी नसून फक्त हवाच असते, कितीही फेस गोळा केला तरी त्यात पाण्याचा एक थेंबही सापडत नाही. त्याचप्रमाणे आपली सर्व व्यक्तिमत्वे जरी भगवंताच्या आधारावरच उभी असली तरी त्यांचा आधार घेऊन भगवंताकडे जाणे कधीही शक्य नाही (व्यावहारीक दृष्टीने ती कितीही भव्य असोत) हे वरील श्लोकातून भगवान आपणास सांगत आहेत.

परंतु हे सर्व माहीत असूनसुद्धा आपल्या हातून स्वव्यक्तिमत्वांचा त्याग होत नाही. याचे कारण म्हणजे आपणास भगवंताचे अस्तित्व जितके खरे वाटते तितकेच (किंबहुना जरा जास्तच!) या जगाचे अस्तित्व खरे वाटणे होय. मनामध्ये या जगाच्या सत्यतेबद्दल थोडासा विश्वास जरी असला तरी तो साधकाला सिद्ध होऊ देत नाही. श्रीरामकृष्ण परमहंस या अवस्थेचे वर्णन करण्यास म्हणायचे की सुईमध्ये दोरा ओवताना त्यातील एक धागाजरी भोकातून गेला नाही तरी दोरा पूर्णपणे पलिकडे खेचला जात नाही. आपल्या मनातील या जगाच्या सत्यतेचा विश्वास पूर्णपणे काढून टाकण्यास आपण या श्लोकाचा आधार घ्यायला हवा. या विश्वाची मिथ्यता स्पष्ट करण्यास माऊलीनी या श्लोकावरील भाष्यात म्हटले आहे हे असो आंगी भरलिया भवंडी जैशा भोंवत दिसती अरडीदरडी तैशी आपलिया कल्पना अखंडी गमती भूतें ॥८१:९॥(ज्याप्रमाणे भोंवळ आल्यावर सर्व जग गरगर फिरत आहे असा भास होतो, त्याचप्रमाणे या जगातील व्यक्तींत आपल्या कल्पनेने सत्यता निर्माण होते). आई मुलाच्या वा पति पत्नीच्या बंधनात अडकण्याचे का मान्य करते/करतो? जर दुसरी व्यक्ती मुलाप्रमाणे पत्नीप्रमाणे वर्तन करण्यास नकार देत असेल तर आपणासही स्वतःच्या आई वा पति या व्यक्तिमत्वाला झुगारणे कठीण होणार नाही. पण आपणांस असे वाटत असते की दुसरी व्यक्ती त्यांच्यावरील या नात्यांनी आणलेल्या बंधनांचे पालन करीत आहे मग फक्त आपणच या नात्यांना कसे झटकावे? मनातील या कल्पनेने आपण या जगाला सत्यत्व देत आहोत. आपणा सर्वांना वाल्या कोळ्याची गोष्ट माहीती आहे. या कथेतून असे स्पष्ट होते की जेव्हा त्याला कळले की त्याची पत्नी मुले स्वतःवर या नात्यांमुळे येणाऱ्या जबाबदारीला (म्हणजे वाल्याच्या पापातील त्यांचा वाटा) उचलण्यास तयार नाहीत तेव्हा त्याला स्वतःच्या जबाबदारीला (काहीही करुन त्यांचे पालन करणे) महत्व देण्यास अजिबात कठीण झाले नाही. आणि ही गोष्ट स्पष्ट झाल्यावरच तो श्रीनारदमुनींच्या उपदेशाला ग्रहण करण्यास पात्र झाला. या जगातील निरनिराळ्या व्यक्तींबरोबर आपण जे नाते मानले आहे त्यामधील सत्यता केवळ आपण कल्पनेने भरलेली आहे हे पूर्णपणे जाणणे संकुचित व्यक्तिमत्वाला दूर करण्यास जरुरी आहे. एकदा डोळ्यांवरील कल्पनांची झापड काढून या जगाकडे आपण बघायला लागलो की सर्व नात्यांतील मिथ्यता स्पष्टपणे दिसायला लागते. मग माऊलींच्या तैसे भूतजात माझ्या टायी कल्पिजे तरी आभासी काही निर्विकल्पी तरी नाही तेथ मीचि मी आघवें ॥९०:९॥या ओवीची सत्यता पटेल आणि या जगात रमण्यामागील आपले नैतिक आधिष्ठानच नष्ट होईल. आणि जेव्हा मनात कर्मांबद्दल नैतिक पाठबळ नसते तेव्हा कृति घडणे अशक्य असते. त्यामुळे या मनःस्थितीचा एक परीणाम म्हणून आपण वाल्या कोळ्याप्रमाणे पूर्वजीवनाला तिलांजली देऊन भगवंताच्या सान्निध्यात राहण्यास तयार होऊ, देहरुपी घराचा आश्रय सोडून भगवंताच्या व्यापकतेचा आस्वाद घेऊ. अठराव्या अध्यायातील अर्जुनाप्रमाणे आपणसुद्धा म्हणू शकू की गुंतलो होतो अर्जुनगुणे तो मुक्त झालो तुझेपणे आतां पुसणे सांगणे दोन्ही नाही ॥१५६३:१८॥ आयुष्यभर कष्ट करुन अर्जुनाने स्वतःचे व्यक्तिमत्व आपल्यापेक्षा कितीतरी भव्य बनविलेले होते. जर तो त्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत सर्व गोष्टींचा त्याग करु शकला तर आपणांस तसे करायला काय कठीण आहे? भगवद्गीतेचा अभ्यास म्हणजे हा त्याग, याशिवाय दुसरे काही नाही. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे की गीता हा शब्द दहा वेळा सलग म्हटला की तागी (म्हणजे त्याग) होतो. एवढे कळले की सर्व गीता हातात आली! वरील श्लोकातून भगवान आपणांस स्वव्यक्तिमत्वाचा त्याग करण्यास जीवनातील सत्यता सांगत आहेत. याचा आधार घेऊन अर्जुनाप्रमाणे आपल्या विश्वाबद्दलच्या दृष्टीकोनात ज्याने आमुलाग्र बदल केला त्याने (आणि केवळ त्यानेच) सर्व साधले.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा(श्लोक ४):

भगवंतांचे विश्वाशी नातेभाग 

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना

मत्स्थानि सर्वभूतानि चाहं तेष्ववस्थितः गीता :

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नवव्या अध्यायातील चवथ्या श्लोकापासून पारमार्थिक ज्ञान सांगायला लागले आहेत. ते म्हणत आहेत: “या विश्वातील सर्व गोष्टींना माझ्या अव्यक्त रुपाने व्यापून टाकलेले आहे. सर्व गोष्टी माझ्यामुळे अस्तित्वात आहेत परंतु माझे हे रुप त्यांच्यात बंदिस्त नाही.”

पहिल्या तीन श्लोकांमध्ये भगवंत असे म्हणाले होते की सर्वोत्तम अध्यात्मिक ज्ञान, म्हणजे आपल्यात सुप्त असलेल्या भगवंतांची ओळख, अतिशय सहजपणे प्राप्त होते. पारमार्थिक तत्वांवर अश्रद्धा असणे हा एकच अडथळा साधक आणि भगवंत यांत एकरुपता येण्यात असतो असेसुद्धा त्यांनी अर्जुनाला सांगितले. त्यामुळे स्वतःच्या जीवनात भगवंत प्रगट झाला नाही ही जाणीव स्वतःची अश्रद्धाच दर्शविते असे मानले तर वावगे ठरणार नाही. परंतु आपण अश्रद्धाळू आहोत यावर साधकाचा विश्वास बसणे कठीण असते. त्यामुळे सर्वप्रथम भगवान प्रगट झाल्याचा निकष ठरवून आपण खरोखर अश्रद्धाळू आहोत का हे बघणे अत्यावश्यक आहे. भगवंतांच्या आगमनाची वार्ता देणारा एकमेव चोपदार म्हणजे निर्भेळ आनंद होय सर्व शास्त्रांत ठामपणे सांगितले आहे. या खास आनंदाची विशेषता म्हणजे तो स्वयंभू (म्हणजे कारणविरहीत) आणि इंद्रियातीत असतो. बाह्य जगातील घडामोडींची जाणीव असून त्यांना योग्य तोंड देतानासुद्धा जेव्हा स्वतःमध्ये असलेल्या आनंदाचा वियोग होत नाही तेव्हा भगवंतांचे आपल्या जीवनात आगमन झाले आहे असे निःसंशय मानण्यास हरकत नाही. या मनस्थितीचे एक उदाहरण म्हणजे श्री निसर्गदत्त महाराजांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हाची त्यांची अवस्था होय. घरातील लोकांचे सांत्वन केल्यानंतर ते जरा घराबाहेर बसले होते तेव्हा एक शिष्य पारमार्थिक शंका घेऊन त्यांना भेटायला आले. त्या शंकांचे शांतपणे निवारण केल्यावर त्यांनी सांगितले कीआत्ताच पत्नींचे निधन झाले आहे, जमले तर संध्याकाळी दहनक्रिया आहे त्याला या.” तोपर्यंत त्या शिष्याला असे काही घडले असेल याची कल्पनासुद्धा महाराजांना बघून आली नव्हती. बाह्य जगातील ही स्थितप्रज्ञता म्हणजे आतून स्वयंभू आनंदात रममाण असण्याचे दृष्य रुप होय. आपल्यातभवरोगआहे की नाही याचे निदान करणारी नाडी म्हणजेच जीवनातील स्वयंभू आनंदाची अनुपस्थिती.

एकदा रोगाचे निदान झाले की त्यावर वैद्य औषध देतो. वरील श्लोक म्हणजे या भवरोगाच्याअश्रद्धानामक कारणास काढून टाकण्यास श्रीकृष्णांनी दिलेली पहिली मात्रा आहे! गेल्या लेखात आपण बघितले की ही अश्रद्धा म्हणजेच आपण विश्वात रमणे होय. या जगातील वस्तूंबद्दल आपण ओढा ठेवतो कारण स्वतःच्या जीवनात सुख कुणा दुसऱ्यांमुळे प्राप्त झाले हा आपला समज आहे. सतत सुखी रहायच्या आपल्या नैसर्गिक वृत्तीमुळे जीवनातील ज्या घटनांमुळे, ज्या व्यक्तींमुळे आपल्या जीवनात सुखाची भावना निर्माण झालेली असते त्यांना जवळ ठेवायचा प्रयत् आपण निरंतर करीत असतो. हळूहळू या ठराविक व्यक्तींचे आणि घटनांचे महत्व इतके वाढते की त्यांच्याशिवाय सुख मिळू शकते हे आपणांस अशक्य वाटते. त्यामुळे साधकाच्या मनात सुख आणि काही ठराविक स्थळे, व्यक्ति वा घटना यांची अतूट सांगड बसते. साधकाच्या मनातील सुखाच्या या व्याख्या (मग त्या कितीही उदात्त असोत) म्हणजेच परमार्थाविषयी चुकीच्या कल्पना असणे होय, पारमार्थिक धर्मावर अश्रद्धा असणे होय.

त्यामुळे श्रद्धावान होण्यास सुख कशाने मिळते याबद्दलच्या आपल्या कल्पना बदलणे जरुरी आहे असे स्पष्ट होते. आणि सत्याशिवाय दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपल्या कल्पना बदलणे म्हणजे एक पूर्वग्रहाची जागा दुसऱ्या पूर्वग्रहाने घेणे. म्हणून सत्य काय आहे हे जाणले पाहिजे. सगळ्यांच्या जीवनात खरी असणारी गोष्ट म्हणजे माऊलींची सुखाची व्याख्या. ती म्हणजे: “सुख ही अशी गोष्ट आहे की ज्याने आपल्या जीववृत्तीला मनुष्य विसरतो, देहस्मृतीच्या त्रिगुणी बंधनातून मुक्त होतो, त्याच्या इंद्रियवृत्ती ह्रुदयात विलीन होतात आणि तो आत्मरुपात असतो. अशी एक अवस्था सोडून जे काही जगले जाते ते सर्व दुःख होय (ओवी क्र. १२७ ते १३३, अध्याय १३).” याचा अर्थ असा की या विश्वातील आपल्या व्यक्तिमत्वाला आपण प्राधान्य दिले की सुख निघून जाते, परमार्थ दूर होतो. आपल्यामध्ये उपजत असणाऱ्या आनंदाला आपणच झाकत असतो आणि ही क्रिया जेव्हा थांबते तेव्हा आपोआप सुख निर्माण होते. आपली ही सुख झाकण्याची सवय जन्मजात नव्हती. नवजात मुल स्वतःशीच खेळत आनंदात असते पण त्यालाच मोठेपणी मित्रांच्या संगतीशिवाय कंटाळवाणे होते हे आपण सर्वजण बघतोच. कारण आपण नक्की कोण आहोत याची समज लहानपणी नसते आणि मोठेपणी आपण कोण आहोत हे आणि आपणास काय हवे याबद्दलचा दृष्टीकोन दृढ झालेला असतो. याचा अर्थ असा की स्वतःच्या अस्तित्वाला एका व्यक्तिमत्वामध्ये बंदिस्त करण्याची आपली वृत्तीच आपणास सुखापासून दूर करते. सुरेल संगीत ऐकताना, प्रिय व्यक्तीच्या सहवासात असताना वा गुरुगृही सेवा करताना जेव्हा आपण स्वतःला विसरलेलो असतो तेव्हाच सुखाची अनुभूती येते. जर मनात विवंचना असेल (म्हणजेच आपले विश्वातील व्यक्तिमत्व जागृत असेल) तर यातील कुठलीही गोष्टी आपणास सुख देऊ शकत नाहीत हा अनुभव आपणा सर्वांना आहे.

आपल्यामधील हा स्वयंभू आनंद म्हणजेच वरील श्लोकात वर्णन केलेले भगवंतांचे अव्यक्त रुप होय. या निर्गुणी आनंदाच्या रुपात आपणांस भगवंतांनी व्यापलेले आहे. या जगातील सर्व व्यक्तींना आनंद माहिती आहे. परंतु हा आनंद स्वतःमध्येच बांधून ठेवू शकेल अशी एकही वस्तू या जगात नाही असेसुद्धा या श्लोकात म्हटले आहे. याचा अर्थ असा की स्वतःचे संकुचित व्यक्तिमत्व जागृत ठेऊन कुठलीही व्यक्ती हा आनंद मिळवू शकत नाही. म्हणजे, हा श्लोक आपणास असे सांगत आहे की आपण आयुष्यभर कष्ट करुन निर्माण केलेल्या स्वव्यक्तिमत्वाला तिलांजली देणे आनंदमय होण्यास जरुरी आहे. (म्हणूनच सद्गुरु अनुग्रह देताना शिष्याला आता तुझा नवीन जन्म झाला आहे असे सांगतात!) परमार्थाच्या दृष्टीकोनातून बघितले तर गोड करण्यास खारट समुद्रात चमच्याने विहीरीतील पाणी घालण्याप्रमाणे आत्तापर्यंतचे व्यक्तिमत्वाला जोपासायचे आपले सर्व प्रयत् व्यर्थ आहेत. वरील श्लोकातून या कटू सत्यरुपी मात्रेचा पहिला डोस भगवंतांनी आपणास दिला आहे. एकदा हे औषध पचनी पडले की मानवाचे लक्ष आपोआपच विश्वातील घटनांवरुन उठेल आपल्या आत्मरुपाकडे, सुखाच्या कंदाकडे जाईल. म्हणूनच माऊलींच्या या श्लोकावरील भाष्याचे पूर्णोद्गार तैसी भूतें इये माझ्याठायी बिंबती तयांमाजी मी नाही परी मज आंत पैसो दिठी तुझी॥ असे आहेत. दृष्टीला ही परीपक्वता येणे म्हणजेच मनुष्य श्रद्धावंत होणे होय. आणि परमार्थावर श्रद्धा असणाऱ्या साधकाला सुखरुप होण्यास काय विलंब?

हरि

*******************************************************************

अध्याय नववा(श्लोक ३):

परमार्थावरील अश्रद्धेचे परीणाम

श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मसास्य परंतप

अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि श्लोक :

मागील श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अव्यय आनंद देणारी विद्या तुला अतिशय सहजतेने प्राप्त होईल असे अर्जुनाला सांगितले. परंतु सहजपणे सामोऱ्या आलेल्या गोष्टीला धारण करण्याससुद्धा योग्यता लागते, तीच्याशिवाय हातातोंडाशी आलेला घासपण वाया जाऊ शकतो. उदाहरणार्थ, गंगा स्वर्गातून पृथ्वीवर यायला तयार झाली तरी त्या पवित्र स्त्रोताला झेलायची क्षमता पृथ्वीमध्ये नव्हती. त्यामुळे भगीरथाला शंकरांना प्रसन्न करुन घ्यावे लागले कारण फक्त भगवान श्रीशंकरांकडेच गंगेला झेलायची ताकद होती. अगदी त्याचप्रमाणे, पारमार्थिक ज्ञानाची गंगा आपल्या जीवनात अवतरायला आतुर असली तरी तीचे ग्रहण करण्यास इंद्रियसुखाबद्दल वैराग्य असणे जरुरी आहे. वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण ही वस्तुस्थिती स्पष्ट करीत आहेत. ते म्हणत आहेत: अरे शत्रूंना नेस्तनाबूत करणाऱ्या (अर्जुना), पारमार्थिक तत्वांवर श्रद्धा नसलेले मानव जन्म-मृत्युच्या रहाटगाडग्यात अडकून बसतात त्यांना कधीही माझी प्राप्ती होत नाही.

वरील श्लोकात भगवान अश्रद्धाळू मानवांबद्दल नाही तर, ज्यांची श्रद्धा परमार्थावर नाही त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कारण गीतेमधील सतराव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की प्रत्येक मनुष्य आपल्या परीने श्रद्धायुक्तच आहे आणि एखाद्या मनुष्याची श्रद्धा कुठल्या गोष्टीवर आहे यावर त्याचे व्यक्तिमत्व बनते. म्हणजे काय तर या जगातील सर्व व्यक्ती श्रद्धामयच आहेत. मग प्रश्न असा पडतो की परमार्थावर श्रद्धा नाही अशा लोकांची श्रद्धा कुठल्या गोष्टींवर असते? एकदा परमार्थावरुन, म्हणजेच आपल्या सद्गुरुंपासून नजर हटली की काय दिसते हे इथे पहायला हवे. माऊलींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर तू जयाप्रति लपसी तयां विश्व हें दाविसी प्रकट तै करिसी आघवेंचि तू ज्ञा. :१४ (अर्थ: ज्यांची नजर सद्गुरुंवर नसते त्यांनाच विश्व दिसायला लागते, कारण सद्गुरु प्रगट झाल्यावर सर्व जीवन सद्गुरुमयच झालेले असते.) याचा अर्थ असा की एकतर आपल्या जीवनात परमार्थ असतो नाहीतर भौतिक वा पारलौकीक सुखाची गोडी असते. त्यामुळे वरील श्लोकातीलपारमार्थिक धर्मावर अश्रद्धा असणारामानव म्हणजे इंद्रियसुखाची गोडी मनात बाळगणारा मानव असे स्पष्ट होते. आता, ध्यास ही बाब मानसिक आहे, बाह्य कर्मांतून मनातील आस्थेचे दर्शन होईलच असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ठगाने मैत्री केली तरी ती नंतर फसवण्याकरीताच असते, वा कसायाने जनावराची उत्तम काळजी घेणे ही घटना त्याच्या मनातील प्रेम दाखवित नाही तर व्यावहारीक कुशलता दर्शविते. या दृष्टीने बघितल्यास श्लोकातील इशाऱ्याचा अर्थ असा होतो की आपल्या कर्मांमागील हेतूंवर भगवंतांची प्राप्ती होणार का नाही हे ठरते, बाह्य कर्मे कुठली केली त्यावर नाही. उदाहरणार्थ, निव्वळ आपल्या गुरुंचा श्रद्धापूर्वक आदर करणारा साधक परम ज्ञानाचे ग्रहण करण्यास समर्थ राहीलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्या श्रद्धेचे कारण काय आहे यावर लाभ अवलंबून आहे. (सद्गुरुसान्निध्यात आवडीने दीर्घकाळ राहीलेले साधकसुद्धा पारमार्थिक अनुभूतीरहित का राहतात याचे हे स्पष्टीकरण आहे असे वाटते.) आपल्या इच्छांवर काय लाभ होणार आहे हे अवलंबून आहे असेच पसायदानातील जो जे वांछील तो ते लाहोहे चरण सांगत आहे. साधकाने एखाद्या इशाऱ्यासारखे हे उद्गार ध्यानात ठेवायला हवे. असो.

परंतु श्लोकातीलअप्राप्यया शब्दाचा निव्वळप्राप्ती होणार नाहीअसा अर्थ नाही, तर भगवंताचीप्राप्ती होणे कधीही शक्यच नाहीअसा आहे. याचे कारण असे की साधनेचे सर्व मार्ग शेवटी साधकाला प्रेममय, सहिष्णु बनवितात. हे विश्वचि माझे घर अशा अवस्थेत सर्वच साधक पोहोचतात त्यायोगे भक्त या नात्यातच विलिन होतात. आणि भगवंतभक्ति म्हणजे आस्थेची, प्रेमाची अशी जीवंत ज्योत जी अहंकाराच्या वा व्यावहारीक अपेक्षांच्या धुराने आच्छादित नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्या मनात व्यावहारीक गोष्टींवर प्रेम आहे, आस्था आहे तोपर्यंत भक्तीचे बीज आपल्या ह्रुदयात रुजत नाही. आणि जिथे भक्ती नाही तिथे भगवंत कसे येतील? भगवंत आणि भक्त यांच्या उत्कट नात्याचे वर्णन करताना या अध्यायावरील विवेचनातच माऊली म्हणतात: भगवान एकवेळ वैकुंठी नसतील, योगी लोकांनासुद्धा गंवसणार नाहीत पण जो साधक निव्वळ त्यांच्या नामांतच सर्व विश्व बघतो त्याच्यापाशी ते निश्चितच सापडतील (पहा: ओवी क्र. २०७,२०८). इथे मुद्दा असा आहे की भगवंताच्या निव्वळ नामावर प्रेम उत्पन्न होणे म्हणजेच त्यांच्या निर्गुण रुपाच्या आस्थेने मन दयार्द्र होणे होय. (भगवंताच्या एका ठराविक रुपाबद्दल आपुलकी वाटणे आणि त्यांच्या नामातच जिव्हाळा वाटणे यात फरक आहे. तो म्हणजे भगवंतांचा कुठलाही अवतार हा त्यांच्या नामाच्या पूर्ण शक्तीचा निव्वळ एक थिजलेला पैलू आहे आणि नाम त्यांच्या निर्गुण रुपाचे पूर्ण प्रतिबिंब आहे!) आणि जेव्हा निर्गुणी भगवंतांबद्दल प्रेम निर्माण होते तेव्हा त्रिगुणांत गुरफटलेल्या जगाबद्दल आपोआप तटस्थता येते. किंबहुना, आपण असे म्हणू शकतो की जेव्हा इंद्रियांवर अवलंबून असलेल्या आनंदापासून साधकाची नजर जेव्हा दूर होते तेव्हाच त्याच्या जीवनात खऱ्या भगवद्भक्तीचा सूर्योदय होतो. आणि या भक्तिप्रकाशातच परमार्थाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकाच्या पहिल्या चरणात पारमार्थिक तत्वांवर प्रेम नसणाऱ्या मानवाला मी कधीही सापडणे शक्य नाही असे म्हणत आहेत.

इथे श्लोकामध्ये अर्जुनाला परंतप का म्हटले आहे हे आपोआप स्पष्ट होते. असे बघा, जीवनात एकच खरे शौर्य आहे. ते म्हणजे स्वतःच्या इंद्रियांचे दमन करुन स्वतःमध्ये जन्मजात असलेल्या पारमार्थिक ज्ञानाला कार्यरत होण्यास संपूर्ण मुभा देणे, आणि त्यातून उत्पन्न झालेल्या प्रेमप्रकाशामध्ये आयुष्याची वाटचाल करणे. आपण सर्वजण जन्मजातच असे शौर्यवान आहोत. परंतु या शौर्याचा उपयोग करायची गरज आपणांस भासत नाही वापरल्याने आपला हा गुण सुप्त अवस्थेत गेला आहे. गीतेमधील अर्जुन म्हणजे आपल्यासारखा साधक आहे. त्यामुळे वरील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णपरंतपया नावाने केवळ अर्जुनालाच नव्हे तर आपणा सर्वांना संबोधित आहेत आणि त्यायोगे आपल्यामध्ये सध्या सुप्त असलेल्या या शौर्यालाच जागृत करीत आहेत असे वाटते. भगवंतांना माहिती आहे की एकदा हे शौर्य आपल्यात जागृत झाले की भौतिक आकर्षणांच्या दलदलीतून झडझडून उठून भक्तिच्या मार्गावर चालण्याशिवाय आपणांस दुसरा पर्यायच राहणार नाही!

शेवटी व्यावहारीक श्रद्धा मनात ठेवणाऱ्या साधकांची नक्की काय गति होते हे भगवान सांगत आहेत. ते म्हणत आहेत की असे साधक जन्म-मरणाच्या फेऱ्यांतच अडकून राहतात. काळाच्या तोंडात टाकलेले भक्ष्य अशा रुपातच त्यांचे अगणित जन्म व्यतीत होतात. कारण आपल्या जीवनात आनंद असावा या भावनेला त्यांनी एका नाशिवंत गोष्टीशी जोडलेले असते. ज्याक्षणी आनंद जोडलेल्या व्यक्तीचा वा गोष्टीचा क्षय होईल त्याचक्षणी अशा मानवाच्या जीवनात नव्या शोधाचा जन्म होईल. अशा रीतीने ते सतत नव्या गोष्टींच्या शोधात मग्न राहणारच आहेत आणि या जन्म-मृत्यूचा खेळातून त्यांची सुटका नाही. चुकून घरात शिरलेल्या पक्ष्याला जशी बाहेर जायची वाट सापडत नाही तो एका काचेच्या दारावरुन दुसरीकडे ठोकर खात स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत् निकराने करीतच राहतो, त्याचप्रमाणे असा गृहस्थ नवनवीन वस्तूंवर ममत्व वाढवित शाश्वत आनंदाची अपेक्षा करीत राहतो. या दुष्टचक्रातून साधकाला सोडविण्यास भगवान त्याच्या जीवनात दुःखाचे प्रसंग आणतात. कारण प्रत्येक दुःखदायक प्रसंगामध्ये आपणांस भौतिक जगापासून दूर ओढण्याची क्षमता आहे. परंतु व्यावहारीक जगात रमलेला मनुष्य या भगवद्कृपेला नावे ठेवतो आणि आयुष्यात कधीही दुःख येऊच नये अशाच प्रयत्नात राहतो. त्यामुळे त्याला भगवान अप्राप्य राहतात. इंद्रियांच्या आकर्षणातून सुटायचे असेल तर सुखद क्षणांची अपेक्षा करणे आलेल्या दुःखाच्या क्षणांतून सावध होणे जरुरी आहे. असे केले नाही तर शाश्वत आनंद आपल्यापासून कोटीएक जन्म झाले तरी दूरच राहील.

हरि

*******************************************************************

अध्याय नववा(श्लोक ):

अकल्पनाप्य कल्पतरो’ ज्ञान

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्‌ ।

प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्‌ ॥ श्लोक २ : ९ ॥

स्वर्गातील कल्पतरु वृक्षालासुद्धा दोन मर्यादा आहेत. त्या म्हणजे आपल्या मनात ज्या गोष्टींबद्दल पूर्ण कल्पना आहे अशाच गोष्टी तो आपणांस प्रदान करु शकतो आणि आपणांस त्या वृक्षाखाली जाणे जरुरी असते. माउलींनी म्हणूनच अठराव्या अध्यायातील सद्‌गुरुस्तवनात आपल्या गुरुंना ‘अकल्पनाप्य कल्पतरो’ असे संबोधून त्यांना कल्पतरुपेक्षाही श्रेष्ठ म्हटले आहे. कारण ज्याची आपणांस कल्पना करणेही अशक्य असते असा मोक्ष ते आपल्या हातात घरबसल्या देतात, त्याकरीता इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नसते! नवमीतील ज्ञान असेच आपल्या पूर्ण कल्पनेबाहेरील आणि विनासायास मिळणारे आहे हे वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. ते म्हणत आहेत : ‘ही विद्या सर्व विद्यांची परीसीमा आहे, सर्व गुपितांच्यामागे दडलेले गुपित आहे आणि (याच्या ज्ञानाने) तू सर्व पापांतून मुक्त होशील. कुठल्याही अधर्माचा यात प्रवेश होत नाही, हे ज्ञान (दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टींच्या आधाराने जाणून न घेण्यासारखे) अपरोक्ष व अक्षय आहे आणि (इतके गुण असूनसुद्धा) या ज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग अतिशय सोपा आहे.’

आता आपण या श्लोकातील शब्दांच्या आवरणामागे दडलेल्या अर्थांचा विचार करु.

१. राजविद्या : स्वकष्टाने प्राप्त केलेल्या कुठल्याही विद्येमागील आपला हेतू काय असतो? तर पुढे होणाऱ्या ज्ञानाने आपल्या आयुष्यात आनंद प्राप्त होईल असा आपला समज. या जगात एकही व्यक्ती असा जाणूनबुजून अभ्यास करीत नाही की ज्यायोगे आयुष्यात फक्त दुःखच निर्माण होईल. परंतु व्यवहारातील कुठल्याही ज्ञानाने आपणांस दिवसाचे चोवीस तास सतत आनंद मिळत नाही. उदाहरणार्थ, चहा कसा करावा याच्या ज्ञानाने क्रिकेट खेळायच्या वेळी आनंद मिळत नाही! किंवा पैसे कसे मिळवावे, समाजात मान्यता कशी मिळवावी यांच्या संपूर्ण ज्ञानाने प्रिय व्यक्तीच्या वियोगाच्यावेळी समाधान लाभत नाही. याचा अर्थ असा की, व्यवहारातील प्राप्त केलेल्या विद्यांमुळे मिळणारा आनंद सीमीत आहे, इतर परीस्थितींवर अवलंबून आहे. या कारणामुळे जगातील सर्व व्यावहारीक विद्या मर्यादीत आहेत असे म्हणावे लागते. याच्याउलट, एकदा का परमार्थाच्या मार्गात प्राप्त केलेले ज्ञान पचनी पडले की आयुष्यात कधीही संध्यासमय नसलेल्या आनंदी दिवसाची पहाट होते! कुठल्याही परीस्थितीत सातत्याने आनंदाला मिळवून देणारी ही विद्या आपोआपच इतर सर्व विद्यांपेक्षा श्रेष्ठ ठरते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अशा ज्ञानाला राजविद्या या नावाने बहुमान देत आहेत.

२. राजगुह्य : श्रीगोरक्षनाथ आणि श्रीदत्तप्रभूंमध्ये एकमेकांपासून लपण्याचा खेळ खेळला गेला असे नाथांच्या चरीत्रात सांगितलेले आहे. पहिल्यांदा एका लहानशा मासोळीचे रुप घेऊन विराट जंगलातील एका छोट्या तळ्यात लपलेल्या गोरक्षनाथांना श्रीदत्तप्रभूंनी सहजासहजी पकडले. नंतर जेव्हा दत्तप्रभू लपले, तेव्हा श्रीगोरक्षनाथांना ते कुठे लपलेले आहेत हे सर्व त्रिलोकाचा शोध घेऊनही सापडले नाहीत. तेव्हा चिंताक्रांत होऊन त्यांनी सद्‌गुरु स्मरण केल्यावर लगेच श्रीमत्स्येंद्रनाथ प्रगट झाले व त्यांनी सांगितले की दत्तप्रभू कुठल्यातरी टराविक अशा एका रुपात लपलेले नसून त्यांनी आपले तेज तेजात लपविलेले आहे, पाणी जलतत्वात विलीन केलेले आहे इत्यादी. म्हणजे ते असे लपलेले आहेत की त्या पंचमहाभूतांच्या रुपाने सर्वदा ते तुझ्यासमोरच आहेत!! लक्षात घ्या की, डोळ्यासमोरचीच वस्तू निव्वळ मनावरील पूर्वग्रहांच्या पटलाने गुप्त होणे हे सर्वात मोठे गुपित आहे. नवमीतील ज्ञान म्हणजे असेच एक सर्वांपुढे सतत उघडरुपाने वावरणारे गुपित आहे. ज्या गोष्टीला आपण भगवान समजतच नव्हतो (म्हणजे आपले दैनंदिन जीवन) तीच गोष्ट भगवंताच्या रुपाने जेव्हा समोर येते तेव्हा जो आश्चर्याचा धक्का बसतो तो दुसऱ्या कुठल्याही गुपिताच्या उघडकीने बसत नाही. म्हणून हे ज्ञान सर्व गुपितांचा राजा आहे.

३. सर्वोत्तम पवित्रता : माउलींनी नवव्या अध्यायावरील विवरणात सांगितले आहे की जीवनात आपण जीवनभर फक्त पापेच करीत असतो. काही पापे पुण्याच्या रुपात करतो (ज्यायोगे स्वर्गप्राप्ती होते) आणि काही पापांच्या रुपात करतो (ज्यायोगे आपण नरकात जातो). म्हणजे काय तर आपण स्वतः ठरवून केलेली सर्व कर्मे पापयुक्त आहेत असे दिसून येते. या परीस्थितीत गेल्या कित्येक हजार जन्मांमध्ये आपण केलेल्या कर्मांच्या पापांतून जे ज्ञान आपणास सोडविते ते अतिपवित्र आहे हे वेगळे सांगायला हवे का? किंबहुना असे म्हणायला हवे की निव्वळ हे एक ज्ञानच पवित्र आहे, बाकी सर्व विटाळ आहे. म्हणून भगवान ‘पवित्रं इदं उत्तमम्‌’ या शब्दांत या ज्ञानाची वाखाणणी करीत आहेत.

४. प्रत्यक्षावगमं : स्वयंपाक चांगला झाला आहे हे कसे कळते? त्याची चव घेतल्यावर. सचिन तेंडुलकर चांगला फलंदाज आहे हे त्याने शोएब अख़्तरच्या गोलंदाजीला साऊथ आफ़्रिकेतील हिरव्या खेळपट्टीवर आणिबाणीच्या सामन्यात तोंड दिल्यावर कळते. समजा असा प्रसंग आलाच नसता तर खुद्द सचिनलासुद्धा कळले नसते की आपण किती चांगले फलंदाज आहोत. व्यवहारातील सर्व ज्ञानांमध्ये ही एक उणीव आहे की जेव्हा त्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा प्रसंग येतो तेव्हाच आपणांस स्वतःला झालेल्या ज्ञानाची पूर्णपणे जाणीव होते. परंतु जे ज्ञान सतत कार्यरत आहे आणि त्याची जाणीव फक्त त्या सद्‌गृहस्थाला आतून, कुठल्याही इंद्रियाची मदत न घेता, निरंतर होत आहे ते ज्ञान इतर कुठल्याही ज्ञानापेक्षा अधिक प्रत्यक्षरीत्या अनुभविले जाते. अगदी स्वतःच्या जिवंत असण्याच्या जाणीवेतसुद्धा हे ज्ञान उपस्थित असते. या ज्ञानाचा हा गुण इतर कुठल्याही ज्ञानात नसल्याने भगवंतांनी याचा विशेष उल्लेख वरील श्लोकात केला आहे.

५. धार्मिकता : जीवनात धर्माला महत्व का आहे? श्रीकृष्णांच्या गोरक्षणापासून मोझेसच्या ‘टेन कमांडमेंट्स’ त्याकाळच्या मानवी समाजाला अध:पतनापासून वाचविण्याकरीता निर्माण झाल्या आहेत असे दिसून येते. जेव्हा मानवाच्या मनात समुदायामध्ये कसे वागावे याबाबत गोंधळ निर्माण होतो तेव्हा नवा धर्म निर्माण होतो. हे सर्व धर्म त्याकाळच्या संस्कृतीवर, सामाजिक रुढींवर अवलंबून आहेत. परंतु सबंध विश्वामध्ये एकच मनुष्य जिवंत आहे अशी जेव्हा परीस्थिती असेल, तेव्हा तो मानव जे वर्तन करेल तोच धर्म होतो. अशावेळी तो सहजतेने, काहीही प्रयत्न न करीता सर्व धर्मांच्या पलिकडे जातो. स्वरुपाचे ज्ञान झाल्यावर सर्व विश्व आपलेच रुप आहे अशी जाणीव निर्माण होते आणि धर्म-अधर्म या कल्पनांच्या पलिकडे आपण जातो. आणि मग माउलींच्या शब्दांत सांगायचे झाले तर:

तैसे शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासें । जंव एक न प्रकाशें । सर्वत्र मी ॥ १२५५:१८ ॥’

भगवंतांच्या ‘धर्म्यं’ या शब्दातून या ज्ञानाची प्रचलित असलेल्या कुठल्यातरी एका धर्माबरोबरची सुसंगतता अभिप्रेत नसून स्वयंभू निर्माण झालेल्या धर्माचे अस्तित्व प्रकाशित होत आहे. अशा नूतन धर्माचे संस्थापन करण्यासाठीच भगवंतांचे (संतांच्या रुपात) युगानुयुगे आगमन होत असते.

६. सुसुखं कर्तुम्‌ : सुखामध्ये कष्टांचा अभाव आहे. ज्याप्रमाणे श्वास घेणे अतिशय सहजरीतीने मानवाला जमते त्याचप्रमाणे विनासायास आपल्या समोर आपोआप आलेल्या कर्मांंना स्वीकारणे आहे. त्यांना डावलायलाच कष्ट करावे लागतात! या सहजतेत, कष्ट निर्माण होण्याकरीता जरुरी असलेल्या प्रयत्नांची अभावता आहे. अहंकाराने निर्माण झालेल्या अपेक्षांची उणीव आहे. भगवंतांना या जगातील सर्वजनांत आणि सर्व घटनांत बघणे हे ज्ञान अगदी विनासायास होते. आपण स्वतःच अहंकाराने उत्पन्न झालेल्या भावनांचे कष्ट झेलून या सहज होणाऱ्या ज्ञाना प्रतिबंध करत असतो! माऊलींच्या शब्दांतच सांगायचे म्हणजे: माळिये जेऊतें नेलें । तेऊते निवांतचि गेलें । तया पाणिया ऐसे केलें । होआवें गा ॥ १२०:१२ ॥ अशी आपली अवस्था झाली की ज्ञान प्रगट होते. या स्थितीमधील सहजताच वरील श्लोकामधील ‘सुसुखं कर्तुम्‌’ या शब्दांतून भगवंतांनी व्यक्त केली आहे.

७. अव्ययता : ज्याप्रमाणे एखाद्या अंध माणसाला दैवयोगाने वा गुरुकृपेने दृष्टी प्राप्त झाल्यावर त्याच्या नजरेसमोरचा अंधार कायमचा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे एकदा ही राजविद्या प्राप्त झाली की त्यापासून वंचित करायची शक्ती असलेली एकही वस्तू या जगात शिल्लक रहात नाही. या ज्ञानाची अव्ययता कालनिरपेक्ष आहे कारण एकदा या मार्गाने विद्या प्राप्त केली की साधक कालातीत होतो.

अशा रीतीने भगवंतांनी या विद्येचे महत्व वरील श्लोकातून अर्जुनास स्पष्ट केले आहे.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा श्लोक (१) :

परमार्थातील उघड गुपित

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

श्रीभगवानुवाच :

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।

ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ श्लोक १ ॥

भगवद्गीतेतील नवव्या अध्यायाची सुरुवात भगवंतांच्या वरील उच्चारणाने झालेली आहे. ज्याप्रमाणे व्यवहारात आपणांस जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पूर्ण अवधान आपल्या बोलण्याकडे हवे असते तेव्हा आपण “आता मी तुला एक खास गोष्ट सांगतो बघ” असे म्हणून बोलण्यास प्रारंभ करतो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या तीन श्लोकांमध्ये अर्जुनाचे पूर्ण लक्ष वेधून घेण्यास आपल्या पुढील उपदेशाची प्रशंसा केली आहे. त्याची सुरुवात म्हणून पहिल्या श्लोकात ते म्हणत आहेत की “अरे माझ्या उपदेशांमध्ये कधीही चुका न शोधणाऱ्या (अर्जुना), आता मी तुला (परमार्थातील) असे एक गुपित सांगतो की त्याच्या संपूर्ण ज्ञानाने आणि (त्यायोगे आलेल्या) अनुभवांमुळे तू सर्व अशुभांपासून मुक्त होशील”

जेव्हा एखादी गोष्ट नाविन्यपूर्ण असते तेव्हा ती गोष्ट कानावर पडल्यावर ऐकणाऱ्याचे संपूर्ण लक्ष त्या शब्दांवर आपोआपच केंद्रित होते. अशावेळी त्या व्यक्तीला माझ्याकडे एकाग्र लक्ष दे असे निराळे सांगण्याची जरुरी पडत नाही. परंतु जेव्हा नेहमीच्या गोष्टींकडेच निराळ्या नजरेने जेव्हा पहायची गरज असते तेव्हा ऐकणाऱ्याच्या मनातील पूर्वग्रह दूर करुन नव्या उमेदीने, उत्साहाने आणि नम्रतेने ते शब्द ऐकणे जरुरी असते. जर ऐकणऱ्या व्यक्तीच्या मनात ‘मला हे आधीच माहिती आहे’ अशी भावना असेल तर शब्दांमागील व्यक्त्याचा भावार्थ लक्षात येत नाही आणि आपण स्वतःचे पूर्वज्ञानच त्याच्या शब्दांत बघायला लागतो, आणि ते तसे दिसायला लागतेही. याप्रकारच्या श्रवणाने श्रोत्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येत नाही. नवव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला स्वतःच्या दैनंदीन जीवनामधूनच भगवंताकडे कसे जावे याचे सूक्ष्म वर्णन करणार आहेत. अर्जुनाच्या मनात साधना या शब्दाबद्दल आत्तापर्यंत ज्या काही पूर्वकल्पना झाल्या होत्या त्यांना पूर्ण विसरुन गेल्याखेरीज हे नवे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात रुजणार नाही याची कल्पना भगवंतांना असल्यामुळे त्यांनी गुपितांमधील गुपित आता मी सांगतो अशी सुरुवात केली आहे. यामुळे अर्जुनाचे लक्ष एकाग्र झाल्यावर जो उपदेश केला जाईल त्याने अर्जुनाच्या जीवनात नेहमीचेच ऐकलेले शब्द नव्या अर्थाचे लेणे लेऊन त्याच्या आयुष्याला सर्वसुंदर करतील.

वरील श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंतांनी “अनसूयवे” अशा शब्दानी संबोधिले आहे तेसुद्धा महत्वपूर्ण आहे कारण स्वतःच्या मनातील सर्व पूर्वग्रह सोडून परत नाविन्यतेने एखाद्या गोष्टीकडे बघण्यास काही गोष्टींची जरुरी असते. सर्वप्रथम नवी नजर असणारी एक व्यक्ती उपस्थित असावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल इतके प्रेम असले पाहिजे की अतिशय आपुलकीने, सकारात्मक नजरेने स्वतःचे ज्ञान आपणांस प्रदान करायला तीची तयारी हवी. अर्थात, या दोन्ही गोष्टी भगवंतांच्या रुपातून अर्जुनापुढे मूर्तिंमंत उभ्या होत्याच. परंतु नवे ज्ञान होण्यासाठी अजून ज्या दोन गोष्टी हव्या त्या म्हणजे श्रोत्याच्या मानात वक्त्याबद्दलचा नितांत आदर आणि ऐकण्याची आत्यंतिक इच्छा. गुपित या शब्दामुळे अर्जुनाचि ऐकण्याची उत्सुकता जागृत केली गेली आहे आणि अनसूयवे या शब्दाने अर्जुनाला उल्लेखून त्याच्या मनातील भगवंतांबद्दलचा परीपूर्ण आदर दर्शविला आहे. जेव्हा या चार गोष्टींचे मिलन कृष्णार्जुनांच्या रुपाने होते तेव्हा आपोआपच असे श्रवण होते की ‘एथ मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजि ॥’ इथे निव्वळ अर्जुनच नाही तर ज्या साधकाला अनुसूयवे हा शब्द लागू पडतो तोसुद्धा या अध्यायातील उपदेशाने धन्य होऊन जाईल असे आश्वासनच भगवंतांनी जणू इथे दिले आहे.

असे खरे श्रवण अर्जुनाने केले तर काय होईल? श्लोकाच्या अंतिम विधानांतून भगवान अर्जुनाला पुढील उपदेशाचा परीणाम सांगत आहेत. ते म्हणत आहेत की ऐकल्याप्रमाणे वर्तन केलेस तर तुझे ज्ञान इतके दृढ होईल की या सांसारीक आयुष्यातच (विज्ञानातच) तुला अनुभव यायला लागून सर्व अशुभांतून तू मुक्त होशील. जीवनातील अशुभ म्हणजे काय? अर्थात याठिकाणी भगवंतांना अशुभ या शब्दात अभिप्रेत असलेली गोष्ट सर्वांसाठीच अशुभ आहे, काही ठराविक व्यक्तींसाठी नाही. व्यवहारात असे आढळून येते की जी गोष्ट एका व्यक्तीसाठी अशुभ आहे तीच गोष्ट तीच्या वैऱ्यासाठी शुभ आहे! व्यावहारीक अशुभता सापेक्ष असते, सर्वव्यापक नसते. त्यामुळे वरील श्लोकातील अशुभता या शब्दाचा अर्थ पारमार्थिक असला पाहिजे. त्याचा व्यावहारीक पातळीवर म्हणजेच कुठल्यातरी एका धर्माच्या वा एकाद्या समाजाच्या चौकटीतून अर्थ घेणे योग्य ठरणार नाही. पारमार्थिक अशुभता म्हणजे जीवनातील अशाश्वतता होय. लक्षात घ्या की परमार्थातील “संसारापासून अलिप्त रहा” असे वारंवार सांगण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यातील अशाश्वता होय. श्रीसंत गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सर्वजण सांसारीक सुखाच्या प्राप्तीमागे असतात यात आश्चर्य वाटत नाही, परंतु असे सुख सतत आपल्याबरोबर राहील या भ्रमात ते असतात याचे महाआश्चर्य वाटते. तेव्हा वरील श्लोकातून भगवंतांना अर्जुनाला असे सांगायचे आहे की ऐकलेल्या गुपिताप्रमाणे वर्तन करशील तर शाश्वतपदाची प्राप्ती होण्यास विलंब लागणार नाही. याचे प्रमाण बघण्यास या अध्यायातीलच तेहतीसाव्या श्लोकातील भगवंतांचे “अनित्यमशुभं लोकमिमं प्राप्य ” हे उच्चार पहा.

अशा रीतीने पहिल्या श्लोकाचा भावार्थ लक्षात घेतला तर माउलींनी या अध्यायावरील विवरणात “तरी अवधान एकले दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥” असे का सांगितले आहे हे लक्षात येते. चला आपण सर्व आपल्या सर्वांगाचे कान करुन नवमीतील भगवंतांचे बोलणे ऐकू आणि धन्य होऊन जाऊ.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (३५१/९):

परमानंद स्वयंभू असतो

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

एऱ्हवी पाहे पा पांडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां ।

मीवांचुनि भोक्‍ता । कवणु आहे ॥ ३५१:९ ॥

या जगातील सर्व क्रियांचा शेवट मीच आहे असे भगवान श्रीकृष्ण अत्यंत आत्मविश्वासाने सांगत आहेत. ‘आकाशात्‌ पतितं तोयं यथागच्छति सागरम्‌ । सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥’ असे म्हटले आहे त्याचेच प्रतिबिंब म्हणजे गीतेमधील नवव्या अध्यायाच्या चोविसाव्या श्लोकात पडले आहे. भगवान म्हणतात की: “अहं हि सर्वयज्ञानां भोक्‍ता च प्रभुरेव च … ॥ २४:९ ॥”. या श्लोकावरील भाष्यात माऊलींनी उपरनिर्दिष्ट ओवी लिहिली आहे. ते म्हणत आहेत: “जर स्वतःची दृष्टी निर्मळ करुन बघितलेस तर अर्जुना या जगात जे निरनिराळे यज्ञ केले जात आहेत त्या सर्वांना भोगणारा मीवाचून दुसरा कुणी नाही हे तुला स्पष्टपणे कळेल (३५१).” पूर्वीकाळी यज्ञ करणे जीवनाचे एक महत्वाचे उद्दीष्ट होते. तेव्हा भगवंतांच्या वक्तव्याचा अर्थ जीवनात कुठलेही ध्येय ठरवून जगलात तरी तुम्ही माझीच उपासना करीत आहात असा होतो. त्यामुळे माउलींचे ‘या यज्ञोपहारा समस्ता’ हे शब्द आजच्या आपल्या दैनंदिन जीवनातील धडपडींना दर्शवित आहे असे मानले तर चुकीचे ठरणार नाही. या विवेचनामुळे असे मानायला अजिबात हरकत नाही की सगळ्यांची धडपड भगवंताची भेट होण्यासाठीच चालली आहे. प्रत्येकाच्या मनातील भगवंत म्हणजे काय ही व्याख्या वेगळी असली तरी आपण सर्वजण आपापल्या परीने एकाच भगवंताची उपासना करीत आहोत. आपणापैकी कुणी समाजसेवेला वाहून घेतले आहे तर कुणी स्वतःच्या उन्नतीसाठी जीवापाड झटत आहे तर कुणी आपल्या शरीराला कुठलीही तोशीस पडणार नाही याची खात्री घेण्याच्या काळजीत मग्न आहे. परंतु हे सर्वजण भगवंतप्राप्तीच्या साधनेतच आहेत. ही वस्तुस्थिती मान्य केली तर सूज्ञ साधकाच्या मनात परमार्थासाठी वेगळी साधना करण्याचे प्रयोजनच काय असा प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. आज त्यावर आपण या प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्‍न करु.

प्रयत्‍नांती जे काही उद्भवते । त्यात सत्यता कधीच नसते ।

स्वकष्टाने जो मिळतो आनंद । म्हणू नका तो परमानंद ॥

प्रवचनाला नियमित येणाऱ्या एक बाई आज बरेच दिवसांनी आल्या. त्यांच्या न येण्याचे कारण त्यांनी ‘मी चार धाम यात्रा करुन आले’ असे सांगितले. याशिवाय ‘मला बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री वगैरे बघून खूप आनंद झाला. एव्हढी कठीण यात्रा या वयात माझ्या हातून पार पडली या कल्पनेनेच आनंद होतो.’ असे त्या म्हणाल्या. इतकी कष्टदायक यात्रा व्यवस्थित पूर्ण केल्याने आलेल्या आत्मविश्वासामुळे पुढच्यावेळी कुठे जायचे याचा विचार त्या आता करीत होत्या.

परमार्थामध्ये कुठले साधन आपले म्हणावे याला काही नियम नाही. कुणाला गुरुंच्या शोधात भटकणे योग्य वाटते, कुणाला दूरदूरच्या देवांचे दर्शन घेण्यात अध्यात्मिक आनंद मिळतो तर कुणी संतसाहित्याचा अभ्यास करुन मनाला पटेल असा मार्ग शोधण्याचा प्रयत्‍न करीत असतात. या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे आपल्या सद्यपरिस्थितीपासून दूर जाऊन स्वतःच्या अध्यात्मिक साधनेला शोधण्याचे प्रयत्‍न सर्व करीत आहेत. आणि या सर्वांना त्यांच्या वैयक्‍तिक प्रयत्‍नांतून आनंद मिळत असल्याने आपला मार्ग चुकीचा आहे असे त्यांच्या मनातसुध्दा येत नाही. जर अध्यात्माचे ध्येय जीवनात आनंद शोधणे आहे तर आमच्या प्रयत्‍नांतून आनंद मिळत आहे म्हणजे आम्ही योग्य मार्गावर आहोत हे सिध्द होते अशी त्यांची विचारसरणी असते. परमार्थाचा मार्ग असा ठरविल्याने ही माणसे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या चर्चेचा विषय सध्या नवीन केलेला गुरु वा नुकतीच कष्टाने पूर्ण केलेली यात्रा वा आजकाल वाचनात असलेले पुस्तक यापैकी असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत छोट्या गोष्टींकडे बघण्याची माझी नजर पूर्वीपेक्षा आता निराळी झाली आहे की नाही यावर कुणी चर्चा करताना दिसत नाही. आणि समजा दिसले तर केव्हा तर त्यांना आपली दृष्टी आधीपेक्षा जास्त समंजस झाली आहे असे जेव्हा जाणविते तेव्हाच. म्हणजे साधकांच्या मेळाव्यात स्वतःच्या वर्तनाबद्दल आपण तेव्हाच बोलतो जेव्हा ते एका आदर्श साच्यात बसायला लागते. सांगायचा मुद्दा असा की आपली साधना निवडताना आपणास त्यातून किती आनंद मिळत आहे हाच आपला एकमेव निकष असतो.

पण आनंदातही प्रकार असतात. सर्व आनंद एकसारखे नसतात. उदाहरणार्थ, लहान मुले एकत्र येऊन त्यांच्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या मुलाला चिडवितात तेव्हासुध्दा त्यांना आनंदच मिळतो आणि आपला रंगात आलेला खेळ टाकून एखाद्या आंधळ्याला रस्ता ओलांडायला मदत करतात तेव्हाही आनंदच मिळतो. या दोन आनंदात फरक आहे हे सांगायची वेगळी गरज नाही. त्यामुळे स्वतःचा साधनामार्ग शोधताना निव्वळ त्यातून मिळणारा आनंद हा निकष ठेवून भागत नाही. प्राप्त झालेला आनंद कुठल्या पातळीवर आहे हे बघणे महत्वाचे आहे. अर्थात आपल्याला ह्याची जाणीव असते. आपला आनंद दुसऱ्याच्या दुःखावर अवलंबून नाही याची खात्री करुनच आपण आपला मार्ग ठरवितो. खरे म्हणजे यात्रा करणे वा गुरुंच्या शोधात ठीकठीकाणी भटकणे यामध्ये स्वतःला कष्टच होत असतात. आपणास शारिरीक आणि मानसिक कष्ट होत असतानाही आनंद मिळत आहे यामुळे आपली मार्गावरची श्रध्दा अजून दृढ होत असते.

इथे मुद्दा सहजपणे आला म्हणून सांगतो. साधकाने फार सावध राहिले पाहिजे. एकदा आपण साधना योग्य आहे की नाही याचा निर्णय घ्यायला लागलो की साधनेपेक्षा आपली बुध्दी जास्त महत्वाची ठरायला सुरुवात होते. मनाला आजची साधना बरोबर झाली की नाही हे बघायची सवयच लागते. मग साधनेमध्ये रममाण होणे थांबते आणि चालणाऱ्या साधनेतून काय अनुभव मिळत आहे हे पाहणे सुरु होते. आणि आपल्या मनाचा स्वभाव असा आहे की जे त्याला हवे आहे ते सर्व त्याला दिसते. जर साधनेमुळे आनंद हवा असेल तर आनंद मिळत आहे अशी भावना होते. नाही मिळाला तर न मिळण्याची कारणे शोधली जातात (आज शेजारच्या घरात जोरात टी.व्ही. लावला होता वा आज माझ्या मुलाला बरे नव्हते इत्यादी). साधना चुकीची आहे असे मानले जात नाही. आपण जे करीत आहोत ते योग्यच आहे हे स्वतःला पटवून द्यायची सवय आपल्या जणू रक्‍तात भिनली असल्याने स्वतःहून आपला मार्ग बरोबर आहे की नाही हे ठरविण्याचे कुठलेही परीमाण ठेवले तरी चुकीचे आहे. असो.

दुसरी गोष्ट म्हणजे आनंद मिळाला आहे हे खरे असले तरी मिळणारा आनंद योग्य आहे हे कुणी ठरवायचे? प्रत्येक आनंदामध्ये सात्विक, तामसीक आणि राजसीक छटा असतात. त्यातील कुठल्या घटकाला आपण महत्व द्यायचे हे ठरविणे फार अवघड असते. उदाहरणार्थ, शरीराला कष्ट देऊन यात्रा करुन आलो हा सात्विक आनंद झाला, तीर्थस्थानामधील देवालयात पुजाऱ्यांनी आपणास फार फसविले नाही याबद्दलचा आनंद राजसीक झाला आणि यात्रेहून परत आल्यावर ज्यांनी ही तीर्थयात्रा केली नाही त्यांना आपल्या प्रवासाचे वर्णन रंगवून सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील ‘तुमची मजा आहे बुवा’ हा भाव बघून जो आनंद झाला तो तामसीक झाला. आता यात्रा करताना कष्ट झेलल्याचा आनंद दुसऱ्याचे दोष पाहून मिळणाऱ्या आनंदापेक्षा वा स्वतःच्या प्रगतीने मिळणाऱ्या आनंदापेक्षा हीन आहे हे कुणी ठरविले आणि का? खरे म्हणजे संसारात मिळणारा सर्व आनंद एकाच पातळीवर आहे. सामाजिक मान्यतेमुळे अमुक आनंद झाला असे कबूल करताना आपण बिचकत नाही ही गोष्ट स्वतःच्या सामाजिक स्थितीवर अवलंबून आहे, आनंदावर नाही. भारतीय विचारसरणीमध्ये संसारातील सर्व गोष्टींना समान मानले आहे. सात्विक, राजसीक आणि तामसीक गुणांमुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टी परमार्थात एकसमान भासतात. यात्रा करुन खूप आनंद झाला असे जेव्हा तुम्ही म्हणता त्यात हे सर्व आनंद सामील आहेत हे विसरु नका! यातील एकही घटक कमी झाला असता तर तुम्हाला पार पडलेल्या यात्रेमुळे झालेला आनंद निर्भेळ नसता. ‘यात्रा चांगली झाली हो, पण बडव्यांनी फार पैसे घेतले. परत तिथे कधी जाणार नाही!!’ असे तुम्ही तुमच्या यात्रेचे वर्णन केले असते. हो की नाही?!

जो आनंद संतांनी अनुभविलेला आहे तो या आनंदांचे मूळस्वरुप असल्याने यापेक्षा भिन्न आहे. तो आनंद आपल्या प्रयत्‍नांवर अवलंबून नसतो. अध्यात्माचे ध्येय आनंद मिळविणे आहे असे जरी असले तरी जो आनंद परमार्थामध्ये अभिप्रेत आहे तो संसारातील कुठल्याही गोष्टीमधून मिळणे शक्य नाही. खूप सामाजिक सेवा करुन तो मिळणार नाही, अवघड तीर्थयात्रा करुन मिळणार नाही, आपल्या साधनेतूनही तो मिळणार नाही. तो आनंद स्वयंभू आहे, आपोआप उद्भवणारा आहे. एव्हढेच नव्हे तर व्यावहारिक जगात मिळणाऱ्या सर्व आनंदाचे मूळ तो आनंद आहे. संसारातील सात्विक आनंद त्या आनंदाचे सर्वात स्वच्छ प्रतिबिंब आहे. पण राजसीक आणि तामसीक आनंदही त्याच आनंदाचे तात्पुरते दर्शन आपणास देतात. तेव्हा साधना करताना आनंद मिळतो म्हणून आपली साधना योग्य आहे असे मानू नये. जो आनंद मिळायला हवा तो सदासर्वकाळ आपल्याजवळ असतोच. त्याकरीता साधनेची जरुरी भासत नाही. साधना अशाकरीता करायची की आपल्या आनंदमयी स्वरुपाला झाकणारे आपले संकुचित व्यक्‍तिमत्व नाहीसे व्हावे. आपल्या जीवनात कारणविरहीत आनंद जेव्हा वाढू लागतो तेव्हा समजा की आपली साधना योग्य मार्गाने जात आहे.

जगातील यच्चयावत जन आत्मरुपी आनंदाचे प्रतिबिंब बघण्यात मग्न आहेत म्हणून सर्वजणांचे सर्व कष्ट भगवंताची साधनाच आहे. पण परमार्थाची ओढ असणारे साधक भगवंताच्या ‘मुखदर्शनावर’ समाधान न मानता आतल्या गाभाऱ्यात सतत रहाण्याची इच्छा ठेवतात हा फार मोठा फरक सर्वसामान्य माणसात आणि साधकांत आहे. पंढरपूरला जाऊन पटकन मुखदर्शन घेऊन ज्यांचे समाधान होते त्यांना साधनेचे वेगळे कष्ट सहन करायची जरुरी नाही. स्वजीवनात प्रगती करण्याचे त्यांचे मार्गच त्यांना त्यांच्या देवाकडे घेऊन जातील. आज विचार करायला घेतलेल्या “साधना का करावी?” या प्रश्नाचे उत्तर ती कुणी करावी हे ठरविण्यात आहे!

॥ हरि ॐ ॥

 

*******************************************************************

अध्याय नववा (306/9) :

Correct Attitude for Satkarma

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती ।

तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥ ३०६:९ ॥

 

भगवद्गीतेमधील नवव्या अध्यायावर ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय प्रेम होते. नववा अध्याय म्हणतच त्यांनी संजीवन समाधी घेतली असे म्हणतात. त्या अध्यायातील वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत मार्मिकपणे म्हणत आहेत ‘आंधळ्या गरुडाचे पंख कितीही सक्षम असले तरी संपूर्णतः निरुपयोगी असतात, त्याचप्रमाणे ज्ञानचक्षू प्राप्त केल्याशिवाय केलेली सत्कर्मे आयुष्यात निष्फळ ठरतात.’ निव्वळ सत्कर्मे करीत रहाण्यापेक्षा, कुठलेही कर्म करण्यामागील हेतू महत्वाचा असतो असे महाराज म्हणत आहेत. आज ह्या ओवीतून आपणास अजून काय संदेश मिळत आहे हे पाहण्याचा प्रयत्न करु.

 

निष्फळतेची व्याख्या

 

सत्कर्मे निष्फळ होत असतील तर जीवनात चांगली वर्तणुक ठेवण्याचा आपला अट्‍टाहास चुकीचा आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी इथे माउलींना फलश्रुती या शब्दाचा कुठला अर्थ अभिप्रेत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. भगवंतप्राप्ती हेच एकमेव ध्येय समोर ठेवून ज्ञानेश्वर महाराज आपले जीवन जगले. त्यांचे कुठलेही अभंग बघितले, वा हरिपाठ वाचला किंवा ज्ञानेश्वरीतील आत्मरुपी भगवंताच्या प्राप्तीची ओढ बघितली की ही बाब प्रकर्षाने जाणविते. प्रत्येकजण आपल्या ध्येयाप्रमाणे फलप्राप्तीची व्याख्या करत असतो. तेव्हा माउलींच्या ‘निष्फळ’ या शब्दाची व्याख्या भगवंतापासून दूर होणे हीच असणार यात संदेह नाही. ह्या व्याख्येला पुष्टी म्हणून जर तुम्ही ज्ञानेश्वरीतील पुढील ओव्या वाचल्या तर असे स्पष्ट दिसून येईल की पुण्यकर्मे करुन स्वर्गप्राप्तीची इच्छा धरणाऱ्या लोकांबद्दल माउलींना आत्मीयता नाही. ते म्हणतात

 

मज येता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हाटा ।

स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५:९ ॥

स्वर्गा पुण्यात्मके पापे येइजे । पापात्मके पापे नरका जाइजे ।

मग माते जेणे पाविजे । ते शुध्द पुण्य ॥ ३१६:९ ॥

 

म्हणजे ‘ माझ्याकडे येण्यास स्वर्गलोक आणि नरकलोक हे दोन रस्ते चुकीचे आहेत. पुण्याचे आवरण घेतलेल्या पापाने तुम्ही स्वर्गात घुसता आणि आतून बाहेरुन पाप केल्याने नरकात जाता. ज्या कृतीने माझी प्राप्ती होती होते तेच शुध्द पुण्य होय.’ त्यामुळे सत्कर्मे केल्याने कुठलेही फळ मिळत नाही असे माउलींना म्हणायचे नाही. स्वर्गाचे दार तुम्हाला सत्कर्मरुपी किल्लीनेच उघडायचे आहे. परंतु ते महाद्वार उघडणे चुकीचे आहे अशी खात्री ज्या संतांची आहे त्यांना सत्कर्माबद्दल आत्मीयता वाटणार नाही हे स्पष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही जाणूनबजून दुष्कर्मे करावित असा लावू नका. नरकात जाणेसुध्दा महाराजांना मंजूर नाही हे विसरु नका! असे समजा की संतांचा त्यांच्या हातून फक्‍त सत्कर्मेच घडावित असा हट्‍ट कधीच नसतो. ‘सहज’ जीवन जगत असताना ज्या क्रिया त्यांच्यामार्फत होतात त्या सर्वांबद्दल त्यांना एकसारखीच आत्मीयता असते. याचे पराकोटीचे उदाहरण म्हणजे श्रीसंत गोरा कुंभारांच्या पायतळी त्यांचा रांगता बाळ तुडविला जाणे होय. या दुष्क्रियेने त्यांना दुःख झाले तरी ती भगवंताची इच्छा असणार यात त्यांना संदेह नव्हता. स्वतःचे हे कर्मदेखील त्यांनी सहज स्वीकारले आणि त्या क्रियेच्या परीणामांना ते सहज सामोरे गेले हे सर्वश्रुत आहे.

 

आपल्या जीवनातील सत्कर्मे

 

साधनेचा मार्ग शोधताना आपण संतांची मदत घेतो. ज्या महामानवाने स्वतः भगवंताची प्राप्ती करुन घेतली आहे त्याच्या पायाशी बसून आपण शिकावे ही भावना आपल्या मनात असते. परंतु साधनेच्या दृष्टीकोनातून संतसाहित्याकडे, म्हणजे त्यांच्या उपदेशाकडे, बघितल्यास असे दिसते की ‘जेव्हढे संत तेव्हढे पंथ’. नाथसंप्रदायात ध्यानाला महत्व दिले आहे तर भक्‍तीसंप्रदायात नामस्मरणाला. याहून योगमार्ग वेगळा आहेच, विवेकाने ‘नेति,नेति’ म्हणणारे आहेत आणि ‘काही करु नका, नुसते स्वतःकडे बघत रहा’ असे सांगणारे संतही आहेत. आपण जितके जास्त वाचन करतो तितके जास्त गोंधळून जातो! त्यात आणि कुणावर विश्वास टाकावा अशी आपली वृत्ती नसते. आपण आयुष्यभर घेतलेल्या पाश्चिमात्य शिक्षण पध्दतीमुळे आपल्या मनाची ठेवण ‘गोष्ट व्यवस्थित पडताळून बघून मगच विश्वास ठेवावा’ अशी झालेली असते. त्यामुळे साध्याभोळ्या खेडवळ माणसांची जी सरळ सहज श्रध्दा असते तीला आपण मुकलेले असतो. आपल्या संशयी वृत्तीचा फायदा व्यावहारिक जीवनात झाला असल्याने ‘बाप दाखव नाहीतर श्राध्द कर’ ही वृत्ती आपल्या हाडीमांसी भिनलेली असते. त्यामुळे कुठल्या संतावर विश्वास टाकावा हे आपणास कळत नाही. याशिवाय दररोजच्या जीवनात भगवंत आपल्याबरोबर असलाच पाहिजे याची जाणीवही आपल्याला नसते. याचा परीणाम असा होतो की आपण अध्यात्म म्हणजे आहे तरी काय हे बघायचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला तरी आपणास नक्की काय करावे हे कळत नाही आणि अधिक शक्‍ती खर्च करण्यास कारण मिळत नाही. मग आपण सेवानिवृत्तीनंतर बघू अशी टाळाटाळ करतो आणि नेहमीच्या जीवनात परत गुरफटतो किंवा फारतर आपल्या संपर्कात आलेल्या माणसांना मदत करण्यात धन्यता मानू लागतो. परदेशी संस्कृतीच्या प्रभावाखाली नसणारे तरुणही स्वतःच्या आत्मोन्नतीपेक्षा समाजसेवा करण्यातच जीवनाची सार्थकता मानतात याचे प्रमुख कारण त्यांच्या मनातील हा गोंधळ आहे असे वाटते. असो.

तेव्हा नेहमीच्या जीवनापेक्षा अधिक सुसंस्कृत, व्यापक आणि सुंदर जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करणाऱ्या साधकाच्या मनाची स्थिती अशी होते: ‘भगवंत आहे का हे माहित नाही. असला तरी त्याच्याकडे कसे जावे हे कळत नाही. आणि ही सृष्टी त्याचीच लीला आहे असे मानले तर निदान आपल्या कुटुंबियांच्या हिताकरीता वा समाजाच्या उन्नतीकरीता मी आयुष्यभर झटलो तर भगवंताचीच सेवा करण्यासारखे आहे. कदाचित यातच माझ्या जीवनाचा अर्थ आहे.’ आपली ही मनोवृत्ती असताना आपल्या हातून झालेली सर्व सत्कर्मे म्हणजे ज्ञानचक्षूविना झालेली सत्कर्मे होय.

 

ज्ञानाची व्याख्या

 

ज्ञानचक्षू प्राप्त करणे म्हणजे काय हे आता आपण बघू. स्वतःच्या जीवनात भगवंताचे निरंतर सान्निध्य असावे ही भावना अखंड जागृत असणे म्हणजे ज्ञानदृष्टी मिळविणे होय. ही गोष्ट सर्वांना माहित असतेच असे नाही. श्री रामकृष्ण परमहांसांचे सुप्रसिध्द शिष्य ‘एम’ जेव्हा पहिल्यांदा परमहंसांना भेटले तेव्हा स्वतःच्या पत्‍नीबद्दल असे म्हणाले की ‘ती ठीक आहे पण तीला फार ज्ञान नाही.’ तेव्हा लगेच श्रीरामकृष्ण म्हणाले की ‘आणि तुला फार ज्ञान आहे. हो ना!’ एम त्याकाळचे द्विपदवीधर असल्याने त्यांना खरोखर वाटत होते की आपणास काहीतरी कळले आहे! आणि ज्ञानाच्या वर केलेल्या व्याख्येतच मगाशी निर्देश केलेल्या साधकाच्या मनातील गोंधळाचे निरसन आहे. खरी गोष्ट अशी आहे की कुठलीही साधना आपणास भगवंताकडे घेऊन जात नाही. जर साधनेने भगवंत मिळणार असता तर भगवंत साधनेवर अवलंबून आहे असे म्हणायला हवे. म्हणजे साधना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते! साधना करुन मिळवायचे काय असते तर भगवंताशिवाय पर्याय नाही ही भावना. संतांनी सांगितलेल्या सर्व साधना या भावनेची ठिणगी आपल्या मनात पाडतात आणि नंतर त्या ठिणगीला निरंतर प्रज्वलित ठेवतात. साधना भिन्न का असतात तर ठिणगीला कसे प्रज्वलित ठेवायचे हे त्या ठिणगीच्या स्थानावर अवलंबून असते. जिथे फार वायू नाही तिथे आपोआप आग जळत रहाते (काही करु नका, नुसते स्वतःकडे बघत रहा असे सांगणारे संत या पातळीवर बोलत असतात). याउलट जिथे संसाररुपी वादळाचे थैमान चालू आहे तिथे ठिणगीला फार जपावे लागते (निरंतर नाम घेत रहा हा उपदेश या पातळीवर असतो). साधकाच्या मनाची जशी अवस्था तशी त्याची साधना! परंतु मुख्य गोष्ट काय आहे? भगवंताच्या सान्निध्याची अनन्य आस्था.

काही प्रसंगाने आपल्या सद्य परिस्थितीबद्दल अनास्था वाटू लागली की आपल्या जीवनात एक पोकळी निर्माण होते आणि ती भरुन काढण्यास आपली साधना सुरु होते. ही अस्वस्थता म्हणजे ठिणगी निर्माण होण्यास उपयुक्‍त स्थिती. म्हणूनच आयुष्यभर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा घरोबा असला तरी भगवद्गीता अर्जुनाच्या जीवनात पोकळी निर्माण झाल्यावरच सांगितली गेली. आपल्या निराशकाळी भगवान जवळ आहे का नाही यावर आपली पोकळी कशी भरुन निघते हे ठरते. एखादी साधना दृढ ठरवून आयुष्यभर त्या मार्गावर निव्वळ भगवंतप्राप्तीकरीता जाणाऱ्या साधकांजवळ भगवंत प्रत्यक्ष होते असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. भगवान श्री रमणमहर्षींना अत्यंत लहानपणी अचानक मृत्यूचा झटका बसला (आपण मरण पावलो आहोत असे त्यांना वाटले. त्यांचे शरीर निश्चेष्ट झाले होते पण मन जागृत होते. त्यांना दिसून आले की काही काळ दुःख केल्यावर घरातील सर्व मंडळी आपापल्या व्यवधानाबद्दल विचार करु लागले आहेत आणि त्यांचे नातेवाइकांबद्दल असलेले ममत्व कायमचे गेले) आणि त्यांचे डोळे असे उघडले की त्यांनी घराचा त्याग करुन महर्षीपद प्राप्त करुन घेतले. आता असा अचानक दुःखद प्रसंग फक्‍त त्यांच्याच जीवनात आला असे नाही. आपल्या सर्वांच्या जीवनात येतोच. पण आपल्यातील अस्वस्थता लगेच मिटते आणि आपण परत पूर्वीच्याच जीवनपध्दतीत रममाण होतो. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हाच फरक आहे. ते एका धड्यात सर्व शिकतात आणि आपण आयुष्यभर अपेक्षेभंगाचे धडे मिळूनही काही शिकत नाही. आहे त्याच ठिकाणी बसून आजूबाजूला स्वच्छता करायचा प्रयत्‍न करतो परंतु मूळ घाण फार अंतर्यामी आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच भगवंताची प्राप्ती समाजसेवकांना झाली आहे असे दिसून येत नाही. मनाची अचल शांती त्यांना मिळाली आहे असे होत नाही. माझ्या पश्चात माझे कार्य पुढे कोण चालविणार याची चिंता वा मला पाहिजे तशी समाजमान्यता मिळाली नाही याची खंतच त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आढळून येते. ही वस्तुस्थिती सत्कर्मांना परमार्थाची जोड नसेल तर ती व्यर्थ आहेत हेच दर्शवित आहेत. म्हणजे काय, तर ‘सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञानेंविण.’ आचार्य विनोबा भाव्यांसारखी वा स्वामी विवेकानंदांसारखी परमार्थावर विश्वास ठेवून समाजसेवा करा. निव्वळ समाजसेवा करण्यातच जीवनाची सार्थकता मानू नका. भगवंताचे नामस्मरण निरंतर चालू ठेवा. नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात मनाची समाधानी आणि शांत अवस्था प्राप्त होणे अशक्य आहे असे माउली म्हणत आहे असे वाटते. आणि एकदा मनात ज्ञानाची स्थिरता झाली की तुम्ही जे काय कराल ते शुध्द पुण्यच आहे कारण त्यामुळे तुम्हाला भगवंताचे सान्निध्य निरंतर लाभणार आहे. तेव्हा आपले काम काय असेल तर भगवंताची ओढ सतत आपल्यामध्ये प्रखरतेने जागृत ठेवणे. बाकी सर्व आपोआप होते.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (171/9):

Focus attention on the main point

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

माते येणे येणे प्रकारे । जाणती मनुष्य ऐसेनि आकारे ।

म्हणऊनि ज्ञानचि ते आंधारे । ज्ञानासि करी ॥ १७१:९ ॥

आज निरुपणाला घेतलेल्या ओवीचा शाब्दीक अर्थ असा आहे: मला वेगवेगळी माणसे निरनिराळ्या रुपात बघतात (किंवा एकाच माणसाची माझ्याकडे पहायची दृष्टी काळानुसार बदलत असते). म्हणून हे त्यांचे (अर्धवट) ज्ञानच (खऱ्या) ज्ञानाला झाकत असते.

नाही निर्मळ मन । तेथे काय करील साधन! ॥

संतांची दृष्टी आणि आपली बघण्याची पध्दत यामध्ये असा काय फरक असतो की त्यांना सहजरीत्या भगवंताची प्राप्ती होते आणि आपण मात्र आयुष्यभर फक्‍त साधनेतच गुरफटलेले असतो? जरा विचार करा, आपल्यामध्ये ह्या जन्मात भगवंताची प्राप्ती होणार आहे असा आत्मविश्वास आहे का? अखंड साधना चालू रहावी हेच आपले अंतिम ध्येय आहे की नाही? अनेक वर्षांच्या गुरुपोनिर्दिष्ट साधनेनंतरही भगवंत आपल्यापासून अजून खूप दूर आहे याची प्रखर जाणीव आपणांस क्षणोक्षणी होत असते. असे का होते? आणि संतांच्या गतायुष्यांतील सत्कर्मे प्रबळ होती, त्यांच्या पूर्वसुकृताने त्यांना भगवंताची प्राप्ती झाली याउलट आपल्यात तेव्हढी योग्यता नसणार म्हणून आपण भगवंतापासून दूर आहोत असे आपण मानायला गेलो तर संतमंडळी स्वतःला कमी मानायचे स्वातंत्र्यसुध्दा आपणांस देत नाहीत! उदाहरणार्थ, गीतेमधील सहाव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनास योगमार्गाचा परिचय करुन दिला आहे. त्यावरील आपल्या भाष्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या मुखातून स्वतःच्या योग्यतेबद्दलचा संदेह व्यक्‍त करतात. तो संवाद असा आहे:

हां हो जी अवधारिलें। हे जे साधन तुम्ही निरुपिले।

ते आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके? ॥ ३३७:६ ॥

की योग्यतेवीण नाही। ऐसे हन आहे काही।

तेथ कृष्ण म्हणती तरी काई। धनुर्धरा ॥ ३३८:६॥

पै योग्यता जे म्हणिजे। ते प्राप्तीचे अधीन जाणिजे।

कां योग्य होऊनि कीजे। ते आरंभी फळे ॥ ३४०:६ ॥

तरी तैसी येथ कांही। सावियाचि केणी नाही

आणि योग्यांची काई। खाणी असे? ॥ ३४१:६ ॥

नावेक विरक्‍तु। जाहला देहधर्मी नियतु।

तरि तोचि नव्हे व्यवस्थितु। अधिकारिया? ॥ ३४२:६ ॥

वरील ओव्यांच्या अर्थ असा आहे: `अहो हा योगमार्ग तुम्ही सांगितला तो कुणालाही करता येईल का? का ठराविक योग्यता अंगात असल्याशिवाय ह्या मार्गाने जाणे उचित नाही? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की योग्यता प्राप्तीच्या अधीन असते (म्हणजे फळ प्राप्त झाल्यावरच कळते की आपण त्या फळाच्या प्राप्तीला योग्य होतो की नाही.) आणि समजा तूझ्यात योग्यता आहे म्हणून काय लगेच तुला फळ मिळेल की काय? (म्हणजे मिळेपर्यंत योग्य आहे की नाही हे कळणार नाही आणि योग्य असलो तरी लगेच फळ मिळणार नसल्याने साधना करीत असताना स्वतःच्या योग्यतेबद्दलचा संभ्रम राहणारच! आपण स्वतःच्या योग्यतेचा विचार का करु नये हे केवळ दीड ओव्यांत इतक्या सुंदररीत्या सांगणे केवळ भगवंतांना शक्य आहे.) आणि (आत्ता योग्य नाही पण योग्यता प्राप्त करायची आहे असे म्हटले तर) योग्यतेची काय खाण असते की काय?( जिथे जाऊन स्वतःला योग्य बनवावे! ) तूझ्यात जराशी विरक्‍ती असेल आणि देहाचे लाड न करीता तू नियमित वागत असशील तर तू (ह्या मार्गावर चालण्यास) अधिकारी पुरुष आहेस.’ म्हणजे काय, तर आपल्याजवळ मी भगवंताची प्राप्ती होण्यास योग्य गृहस्थ नाही ही पळवाट माउलींनी बंद केली आहे! म्हणजे माझ्यात कमीपणा आहे असे मी म्हणू शकत नाही आणि त्याचवेळी स्वतःला भगवंतापासून दूर मानत आहोत ह्या वस्तुस्थितीत काही फरक अजून पडलेला नाही हेसुध्दा तितकेच खरे आहे. ह्या दोन गोष्टींमध्ये परस्पर विरोधाभास नाही का?

नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे (अर्थातच) खरे आहे आणि आपल्या जीवनातील भगवंताचा अभावही तितकाच खरा आहे. आणि या दोन गोष्टींमध्ये विसंगती नाही. याचे कारण असे की ज्ञानेश्वरांच्या जाणीवेतील भगवंत, त्यांना अभिप्रेत असलेला भगवान आणि आपल्या कल्पनेमधला देव यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्या भगवंताच्या प्राप्तीकरीता साधना चालू ठेव असे माउलींनी सांगितले आहे तो देव आपल्याजवळही तितकाच आहे जितका त्यांच्या जवळ होता. पण आपल्यालाच त्याच्या त्या रुपाबद्दल ममत्व नाही, आत्मीयता नाही, आपुलकी नाही. आपल्या ह्या उपेक्षेमुळेच तो आपणास दिसत नाही असे वरील निरुपणाला घेतलेल्या ओवीचे सांगणे आहे. `काखेत कळसा आणि गावाला वळसा’ ह्या म्हणीप्रमाणेच स्वतःजवळ असलेल्या भगवंताच्या शोधात आपण सर्व संसार ढुंडाळत आहोत. हे कसे याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अशी कल्पना करा की कुणी संताने तुम्हाला याक्षणी येऊन सांगितले की तुम्हाला देवाची प्राप्ती झाली आहे. आता काही करायचे शिल्लक राहिले नाही. तुमच्या मनात काय विचार येतील? मी जर देव असेन तर माझे जीवन दिव्य झाले असते. सर्वसामान्य व्यक्‍तीप्रमाणेच माझ्या जीवनात अनेक संकटे येत आहेत, क्वचितच सुख वाट्याला येत आहे आणि मी भगवंत आहे हे कसे शक्य आहे? एकदा ही शंका मनात उद्भवली की आपण मानवाच्या जातीत परत येतो! खरोखर आपल्या सर्वांच्या मनात देव म्हटले की एखादे भव्य वा दिव्य रुप समोर येते, वा उच्च कोटीची मानसिक अवस्था प्राप्त होईल ही आशा निर्माण होते. वास्तविकरीत्या आपल्या मनातल्या ह्या अपेक्षांना कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही हे आपण विसरतो. श्री संत तुकाराम, श्री रामकृष्ण परमहंस, भगवान श्री रमण महर्षी यांच्या आयुष्यात कुठेही श्रीमंती, वैभव दिसत नाही. प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांना चुलीत घालायला गोवऱ्यांची भीक मागावी लागली आणि त्यासुध्दा त्यांना प्राप्त झाल्या नाहीत ही घटना त्यांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या एकीत बाधा आणत नाही ही खात्री आपणास आहे की नाही? मग स्वतःच्या दिव्य अस्तित्वाबद्दल शंका घ्यायला भौतिक बंधनांना आपण का पुढे आणतो?

आता ह्या विवेचनाला जरा अजून खोल विचार करणारे म्हणतील की `आपल्या देहाला पाहिजे ते सुख हवे तेव्हा मिळत नाही ह्यापेक्षा आपल्या मनातसुध्दा शांति नाही ही वस्तुस्थिती आम्हांस भेडसावते. संतांकडे भौतिक सुख नसले तरी त्यांच्या मनात असलेली शांति आपल्याकडे नसल्याने आम्ही स्वतःला कमी मानतो.’ हा मुद्दा एकदम बरोबर आहे. सर्व संतांच्या जीवनात जर कुठली एक गोष्ट समान असेल तर ती म्हणजे त्यांची कुठल्याही परिस्थितीतील स्थितप्रज्ञता. ती आपल्याजवळ नसल्याने आपण त्यांच्यासारखे नाही हे लगेच सिध्द होते. पण म्हणून लगेच स्वतःला कमी मानू नका. विचार करायचा आहे ना? मग तो पूर्ण करा. आपल्याजवळ शांति नाही हे खरे असले तर असा विचार करा की का आपल्या मनात शांति नाही? यासंदर्भात श्रेष्ठ संत श्री निसर्गदत्त महाराजांच्या जीवनात घडलेले एक संभाषण आठविते. त्यांना कुणी एका साधकाने प्रश्न विचारला होता की `सर्व लोक एकसमान आहेत, मनातील अचल शांति हा प्रत्येकाचा जन्मसिध्द अधिकार आहे ही गोष्ट जर खरी असेल तर ती सगळ्यांना मिळत नाही हे कसे?’ यावर त्यांचे उत्तर होते `जो मनुष्य आपल्यात असलेल्या शांतीचा भंग करीत नाही त्यालाच शांति प्राप्त होते!’ म्हणजे असे की आपणच आपल्या मनातील शांतीला घालवून देत असतो. `स्वतःच खाजवून खरुज काढणे’ ह्या गोष्टीप्रमाणे आपली अवस्था आहे. याचा अर्थ असा की आपल्या मनात संतांसारखी शांति नाही याचे कारण आपण त्यांच्यापेक्षा हीन आहोत असे नाही तर आपल्याजवळ असलेली शांती आपणच काहीतरी चाळे करुन नष्ट करीत आहोत. म्हणजे आपण कुठलीतरी गोष्ट संतांपेक्षा जास्त करीत आहोत, कमी नाही!

यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर अजून थोडा विचार करा. जरा बघा की आपण अस्वस्थ होतो त्याआधी काय घडते? कुठलीही अस्वस्थता अपेक्षाभंगाशिवाय येत नाही. अशांति येण्याचे कारण म्हणजे आपल्या कुठल्यातरी अपेक्षेला तडा गेलेला असतो. आता ती अपेक्षा कुठली होती, कितपत योग्य होती, ती ठेवणे कसे बरोबर होते इत्यादी गोष्टींकडे सध्या दुर्लक्ष करा. अपेक्षाभंग झाल्याशिवाय अशांति नाही ही मूळ गोष्ट तेवढी लक्षात घ्या. (श्री निसर्गदत्त महाराजांच्या मते `योग्य अपेक्षा’ हे दोन शब्द एकाच वेळी उच्चारणे पूर्णपणे चुकीचे आहे! सर्व अपेक्षा चुकीच्या आहेत. मग भले ती अपेक्षा कितीही समाजमान्य असू दे. कुठलीही अपेक्षा ठेवणे म्हणजे भविष्यात काय घडले पाहिजे हे आपण आत्ता ठरविणे. अध्यात्मिक पातळीवर ते कसे योग्य असेल?) आपल्या अपेक्षा आपणच ठरविलेल्या असतात. म्हणजे आपणच आपल्या शांतीचा नाश करत असतो. आपण अपेक्षा ठवण्याचे कारण, त्यांचे मूळ म्हणजे आपले ध्यान, आपले लक्ष व्यवहारातील प्रगतीकडे वा सामाजिक भल्याकडे वा स्वतःच्या अध्यात्मिक उन्नतीकडे लागले आहे हे होय. ते ध्यान लागण्याचे कारण काय तर आपली अशी खात्री होती की त्यायोगे आपल्याला मानसिक शांति मिळेल!!! म्हणजे ज्या गोष्टीच्या प्राप्तीकरीता आपण साधन ठरविले होते त्या साधनांमध्येच आपण इतके गुरफटलो आहोत की त्यामध्ये आपण आपले मूळ लक्ष्य (मनातील अपार, अभंग शांती) विसरलो आहोत. मानसिक समाधान मिळविण्याकरीता आपली धडपड चालू आहे त्या धडपडीमध्येच आपण इतके गुंततो की त्यामुळे आपली सहज, स्वयंसिध्द, स्वयंभू, जी परम सुखदायी अवस्था आहे ती गमावली आहे हे आपल्या लक्षातदेखील येत नाही.

एखाद्या गोष्टीची प्राप्ती, कुठल्यातरी ठराविक व्यक्‍तीचे प्रेम, सामाजिक मान्यता प्राप्त मिळविण्याचा आपला अट्टाहास काय दर्शवितो? खरे म्हणजे आपला कुठलाही आग्रह आपल्या जीवनात कुठली गोष्ट महत्वाची आहे हे दाखवित असतो. जोपर्यंत भगवंतप्राप्ती झाली पाहिजे ह्या आग्रहाशिवाय दुसरा कुठलातरी आग्रह आपल्या जीवनात आहे, तोपर्यंत आपणास शांति मिळणार नाही. आपली शांती आपल्या आत्मरुपी देवाची संपत्ति आहे. ती आपण बाह्य जगातील धपडीने मिळविण्याचा प्रयत्‍न करीत आहोत. म्हणून स्वतःच्या सुखीपणाचे आपले सध्याचे निकष म्हणजे `माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनि आकारे’ ही अवस्था होय. जोपर्यंत आपले हे प्रयत्‍न थांबत नाहीत तो पर्यंत भगवंताचे दर्शन (म्हणजे कधीही न ढळणारी मनातील शांति) होणार नाही कारण आपले `ज्ञानचि ते आंधारे ज्ञानासी करी’. तुम्हाला खरे अध्यात्म करायचे आसेल तर संसारातील इच्छांमध्ये अडकू नका. प्रारब्धानुसार जे काही तुमच्या हातून घडायचे आहे ते घडत आहे, घडणार आहे ही स्वतःची खात्री करुन घ्या आणि स्वतःला भगवंताच्या अनुसंधानात झोकून द्या. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की ` देह प्रारब्धावर सोडून स्वतःला नामस्मरणात झोकून देणारे लोक मला खूप आवडतात.’ असे जर तुम्ही केले तर तुमचे अर्धवट ज्ञान दूर होईल व खरे ज्ञान प्रगट होईल. त्याकरीता `नावेक विरक्‍ती’ मनात बाणवा व `देहधर्मी नियतु’ व्हा. सुख, शांति कशी मिळवावी याबद्दलचे आपले सर्व निकष दूर सारा व आपला सर्व भार भगवंतावर आहे याची खात्री सारासार विचार करुन मिळवा. असे करणे कठीण आहे पण निदान असे प्रामाणिक प्रयत्‍न तरी करायला सुरुवात करा. तुमच्या एकेक अडखळणाऱ्या पावलाबरोबर भगवंत लाखो पावले आपणहून जवळ येईल.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (1+2+19)/9:

You always had what you want

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

तरी अवधान एकले दीजे । आणि सर्वसुखासि पात्र होईजे ।

हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥ १:९ ॥

परी प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजी ।

देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २: ९ ॥

म्हणऊनि मज लेकुरवाचेनि बोलें । तुमचे कृपाळुपण निदैले ।

ते चेईले ऐसे जी जाणविले । यालागी बोलिलो मी ॥ १९:९ ॥

श्री ज्ञानेश्वरीतील कुठल्याही एका ओवीचा संपूर्ण अर्थ जाणून घेणे शक्य नाही असे संतमंडळी आपणास बजावितात. शहाण्या माणसाने कधीही असे म्हणू नये की मला ज्ञानेश्वरी समजली. परंतु याचा अर्थ असा नव्हे की ज्ञानेश्वरीतील ओव्या अगम्य आहेत. कुठल्याही वेळेला आपण ज्ञानेश्वरी वाचली तर ओव्यांचा अर्थ आपणास जाणवितोच. आणि प्रज्ञेला गोचर झालेला अर्थ अगदी बरोबर आहे ह्याबद्दल स्वतःच्या जीवनातील घटनांवरुन आपली पूर्ण खात्री झालेली असते. अशावेळी असे वाटण्याची शक्यता असते की अमुक एका ओवीचा अर्थ आता मला कळला. तो अर्थ किती बरोबर आहे हे स्वसंवेदनांनी जाणविल्याने आपली ज्ञानेश्वरीवरील प्रीती अजून दृढ, अजून खोल होते व आपण नित्यनैमित्तिक ज्ञानेश्वरी वाचायचीच असा जणू पणच करतो. परंतु काही काळाने असे लक्षात येते की जसजशी आपली विचारशक्‍ती प्रगल्भ होत आहे, अनुभवविश्व व्यापक होत आहे तसतसा ओव्यांचा अर्थ बदलत चालला आहे. पूर्वीचा अर्थ चुकीचा नव्हता हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा अजून अधिक खरा अर्थ आपणास आता सापडला आहे हे ध्यानात यायला लागते. मग श्रीसंत नामदेव महाराजांच्या `ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एकतरी ओवी अनुभवावी ॥’ या उक्‍तीची सत्यता जाणवू लागते. या विवेचनाचा अर्थ असा की ओव्यांचा अर्थ कळला असे म्हणू नये हे जरी खरे असले तरी आज जाणविलेला अर्थ आपणाकरीता बरोबर आहे हा विश्वाससुध्दा आपण स्वतःबरोबर ठेवावा. असा विश्वास जवळ नसेल तर पुढील प्रगती कशी होणार? फक्‍त आपल्या आजच्या या सार्थ विश्वासाचा उद्या एक गंड तयार होत नाही ना याकडे जागरुकतेने बघायला शिकणे जरुरी आहे. नाहीतर उद्या जेव्हा अधिक सुंदर, अधिक व्यापक अर्थ प्रगट होईल तेव्हा आपले त्याकडे (आपल्या पूर्वग्रहांमुळे) दुर्लक्ष होईल. असे करायचे नाही हे आपण शिकले पाहीजे. `ठिक आहे, काही काळापूर्वी कळलेला अर्थ बरोबर होताच परंतु आज लक्षात आलेला अर्थही तितकाच बरोबर आहे’ अशी मनाची ठेवण ठेवण्याचा प्रयत्‍न जो साधक सतत करतो त्या साधकावर ज्ञानेश्वरी प्रसन्न होऊन आपले अंतरंग दाखवायला लागते यात संदेह नाही. याउलट जो साधक काल मला (वा माझ्या सद्‌गुरुंना, वा कुणा दुसऱ्या अधिकारी व्यक्‍तीला) कळलेलाच अर्थ बरोबर आहे हा पूर्वग्रह ठेवून ज्ञानेश्वरी वाचतो त्याला अधिक खोल अर्थ समजणे कसे शक्य आहे?

ही गोष्ट आज सांगायचे कारण म्हणजे काही काळापूर्वी नवव्या अध्यायाच्या पहिल्या ओवीवर निरुपण झाले होते. परंतु परवा नववा अध्याय वाचताना एक नवीनच अर्थ समोर प्रगट झाला. या ओवीबद्दल आधी मी असे म्हटले होते की आपल्या पहिल्या ओवीतील प्रतिज्ञावचनाने संतमंडळींचा अपमान होत तर नाही ना या शंकेने श्री ज्ञानेश्वर महाराज पुढच्या अनेक ओवींत त्यांची क्षमा मागतात. परंतु आपण हे ध्यानात ठेवायचे आहे की म्हणून त्यांनी आपली पहिली ओवी बदलली नाही. तेव्हा ती सत्यच आहे. परंतु आता दृष्टीपत्त्यास आलेला अर्थ याहून खोल आहे. आता असे दिसून आले की ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढील सतरा ओव्याही खऱ्या आहेत. केवळ कुणाचा अपमान होईल म्हणून त्या सांगितल्या नाहीत तर आपल्या पहिल्या ओवीतील खरा अर्थ प्रगट करण्यासाठी त्यांनी त्या सांगितल्या आहेत. तेव्हा आज मी नवा जाणविलेला अर्थ आपणापुढे माडण्याचा प्रयास करणार आहे. अजून पुढे काय दिसेल ते स्वीकारायची तयारी ठेवून हा प्रयत्‍न चालला आहे!

प्रथमतः ओव्यांचा शाब्दीक अर्थ जाणून घेऊ. माउली म्हणत आहे: तुम्ही फक्‍त माझ्या सांगण्याकडे नीट लक्ष दिलेत तर तुम्हाला सर्वसुखाची प्राप्ती होईल हे मी उघडपणे प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे. परंतु ह्या बोलण्यात माझी प्रौढी मी मिरवित नाही तर तुम्हा सर्वज्ञ लोकांना `माझे बोलणे ऐका’ ही एक केवळ जवळीकीच्या नात्याने केलेली विनंती आहे. कारण माझ्या बोलण्याच्या निमित्ताने तुमचे सध्या निद्रित अवस्थेत असलेले खरे रुप जागृत होणार आहे याची जाणीव झाल्याने मी असे शब्द उद्गारले.

आहोत आपण सर्व गर्भश्रीमंत । पण नसे ह्याची जाणीव मनात ।

चला व्हा आता उत्तिष्ठ, जागृत । आणि भोगा जन्मजात संपत्तीस ॥

कल्पना करा की एक राजघराणे पिढ्यानपिढ्या राज्य करीत आहे. पूर्वापार चालत आलेल्या राज्यात पुढची पिढी अजून भर घालत आहे आणि आता आपल्या भरभराटीच्या अगदी परमोच्च अवस्थेत सध्याचा राजा सुखाने राज्य करीत आहे. अचानक त्याच्या मनात असा विचार येतो की आपल्याकडे एका ठराविक प्रकारचा मुकुट असता तर किती बरे झाले असते. चौकशी केल्यावर त्याच्या लक्षात येते की त्याच्या मनाप्रमाणे कारागिरी करणारे सोनार आता हयात नाहीत. काळावशात त्यांची खास कारागिरी (जी त्यांनी गुप्त ठेवली होती) नष्ट पावली आहे. आता त्या पध्दतीचा मुकुट तयार होणे शक्य नाही. ही वार्ता कळल्यावर राजाला काय करावे कळेना. बाकी सर्व सुखे हात जोडून समोर असताना त्याला आपल्याकडे नसलेल्या मुकुटाचे ध्यान लागून तो बिचारा व्याकूळ झाला. त्याची ती अवस्था बघून त्याच्या प्रधानमंत्र्याने सर्व खजिना नीट ढुंडाळला आणि त्याच्या लक्षात आले की राजाच्या पूर्वजांपैकी एकाने असा मुकुट तयार करुन घेतला होता. त्या गोष्टीचे विस्मरण सर्वांना झाले होते. मुकुटाला सुंदर झळाळी करुन प्रधानमंत्र्याने जेव्हा तो मुकुट राजाला सादर केला तेव्हा त्याचे सर्व दुःख क्षणात पळून गेले. त्याने मंत्र्याचा खूप सत्कार केला तेव्हा तो चतुर मंत्री म्हणाला `महाराज, मी काय केले? मी तुमचीच वस्तू तुम्हाला परत दाखविली आहे. तुम्हाला विस्मरण झाले होते म्हणून काय झाले? सत्य परिस्थिती बदलत नाही की मी काहीही निर्माण केलेले नाही. जे आहे तेच दाखविले. तेव्हा माझा सत्कार नको.’

राजाने तरीही मंत्र्याचा सन्मान केला असणारच यात शंका नाही. अगदी हीच गोष्ट आज निरुपणाला घेतलेल्या ओव्यांतून महाराज सांगत आहेत असे वाटते. ज्या परिपूर्ण शांतिसाठी, अखंड सुखासाठी आपण धडपडत आहोत ती शांति, ते सुख आता कुठे मिळत नाही असे आपले सर्व सहकारी, मित्रमंडळी सांगत आहेत. या कलियुगात कुणाला शांति मिळते? सर्व कुठल्याना कुठल्या दुःखात आहेतच. थोडक्यात समाधान मिळण्याचा काळ आता गेला असे आपणास आपले मन सांगते की नाही? मग अत्यंत उद्विग्न अवस्थेत असताना आपणासमोर श्री ज्ञानेश्वर महाराज येतात आणि त्या सर्वसुखाची प्राप्ती करवून देईन असे उघडपणे वचन देतात. आपली अवस्था वरील गोष्टीतील राजासारखीच आहे. परंतु त्यातील चतुर मंत्र्याप्रमाणेच माउलींना जाणीव आहे की त्यांनी काय केले आहे? आपल्यामध्येच सुप्त अवस्थेत असलेल्या सुखाला बाहेर व्यक्‍त व्हायला वाव दिला आहे एवढेच. त्यांनी ते सुख निर्माण केले आहे का? नाही. वस्तुस्थिती अशी आहे की आपण आत्ताच या क्षणी, कुठलाही नवा उपाय न करीता सुखी आहोत. समजा एखाद्या गरीब माणसाला झोपेत उचलून झोपडीतून राजवाड्यात नेऊन ठेवले तरी त्याच्या मनातील राजवाड्यात झोपण्याची इच्छा पुरी झाली असे तो केव्हा म्हणेल? जागे झाल्यावरच. जोपर्यंत तो जागा होत नाही तोपर्यंत त्याच्या आर्ततेची शांति होत नाही. शेजारच्या माणसाने जागा केल्यावर त्या माणसाला धन्यवाद दिले तर त्या सद्‌गृहस्थाची जशी अवस्था होईल तशी अवस्था सर्व संतांची होते हे ध्यानात घ्या. त्यांना पूर्ण जाणीव असते की त्यांनी फक्‍त झोपी गेलेल्याला जागे केले आहे. आपल्या सच्चिदानंदरुपी अस्तित्वाचे निर्माता ते नव्हेत. ते अस्तित्व स्वयंभू आहे, आपोआप निर्माण झालेले आहे. आपल्या ह्या जाणीवेतच ते अत्यंत नम्र होतात व सांगतात की `प्रौढी न बोले हो जी.’

कुठल्याही वस्तूचे मोल संसारातील प्रगतीमध्ये करायची आपली सवय म्हणजे आपली प्रगाढ निद्रा आहे. आपली व्यावहारिक जगात रमण्याची ही जी वृत्ती आहे ती म्हणजे आपल्या डोळ्याला जणू एक झापडच बांधले आहे. `अमुक एक मोठे संत होऊन गेले हे खरे पण शेवटपर्यंत जेवायला दोन घास मिळतील का नाही याची त्यांना भ्रांतीच हो.’ किंवा `ते थोर होते पण त्यांच्या कुटुंबियांचे काय झाले?’ इत्यादी सर्व असा विचार आपण करतो की नाही हे सांगा. असेच विचार आपल्या मनात बाकी सर्वसामान्य माणसांबद्दलही येतात. म्हणजे काय, तर संतांचे मोजमापसुध्दा आपण सर्वसामान्यांसारखेच करतो. कुठल्याही घटनेला व्यावहारिक निकष लावल्याशिवाय ती कळणार कशी ही आपल्या मनात शंका असते. खरे आहे, व्यावहारिक निकषांचा एक मोठा फायदा म्हणजे आपण ते चारचौघांना सांगू शकतो. एखाद्या माणसाला तू का एवढा मानतोस असे आपल्या पत्नीने विचारले की त्याने आपल्या धंद्यात यश मिळविले आहे तसे मला मिळवायचे आहे असे सांगितले की पुढे प्रश्न उद्भवत नाहीत. कारण हे दुसऱ्या माणसाचे यश तीला (त्याच्या संपत्तिमध्ये) जाणवित असते. परंतु `त्याने मानसिक शांति प्राप्त करुन घेतली आहे म्हणून मी त्याला मानतो’ असे म्हटले की लगेच `हे तुला कशावरुन कळले?’ हा प्रश्न तिकडून येतोच! आणि तो बरोबरच आहे. असे होऊ नये हे टाळायचा आपण शक्य तितका प्रयत्‍न करीत असतो आणि ह्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजेच आपल्या मनाला सर्व गोष्टींना व्यावहारिक गोष्टींमध्ये मोजायची लागलेली सवय होय.

परंतु खरा परमार्थ हा फक्‍त स्वतःच्या उध्दाराकरीता असतो. त्यातील अद्वैत आनंदामध्ये दुसऱ्या व्यक्‍तीला सामील करणे तत्वतः अशक्य आहे. आपल्या कितीही जवळच्या, कितीही आवडत्या व्यक्तीचा सामावेश आपण त्या आनंदात करु शकत नाही. हा स्वयंभू आनंद कुणावरही वा कशावरही अवलंबून नाही. तो आपल्याला मिळतो याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे तो आपल्यामध्ये जन्मापासून सतत आहे. हे लक्षात घ्या, यावर विश्वास ठेवा.

लक्षात घ्या की विश्वास हे अध्यात्मिक प्रगतीचे मूळ आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की जो साधक स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवतो तो फार लवकर पुढे जातो. आपणास असे वाटत असते की मी फक्‍त स्वतःच्या बुध्दीवर विश्वास ठेवतो. उगाच अंधश्रध्दाळूपणा आपणास आवडत नाही. परंतु आपले वर्तन ह्या भूमिकेशी सुसंगत आहे का या गोष्टीचा विचार करायची वेळ आता आली आहे. का म्हणून देहाच्या त्रासाला दुःख म्हणायचे? स्वतःचा अनुभव काय आहे? आवडते पाहुणे आल्यावर त्यांच्या सरबराईला कितीतरी शारिरीक कष्ट घ्यावे लागतात. पण त्या सर्व कष्टांतून गृहीणीला वा त्यांच्या सोयीकरीता पैसे खर्च करताना कर्त्या माणसाला दुःख न होता आनंदच होतो. स्वतःच्या अशा अनंत अनुभवांवर विश्वास न ठेवता शरीरसुखाला अंतिम ध्येय मानणे हा अंधविश्वास नव्हे का? विचार करा. आयुष्यातील अनेक गोष्टी आपण समाजमान्य आहेत म्हणून करीत असतो. स्वतःला विपरीत अनुभव येऊनसुध्दा त्यांवर विश्वास ठेवत नाही. तेव्हा आपल्याजवळ स्वतःच्या अनुभवांवरचा विश्वास नाही हे ध्यानात घ्या आणि तो स्वानुभवावरील विश्वास परत मिळवा. खरे म्हणजे आपली सर्व साधना हा विश्वास मिळविण्यासाठीच आहे. एकदा हा विश्वास मिळविला की तुम्हाला जीवनातील कारणविरहीत सुख जाणविते त्यावर श्रध्दा ठेवावयासी वाटेल. बायको, मुले काय म्हणतील हा विचार येणे बंद होईल आणि अनिर्वाच्य सुखाचे महत्व जाणवेल. तसे बघायला गेले तर जी गोष्ट शब्दांत सांगता येते ती कधीही पूर्णपणे खरी नसते. घडलेल्या गोष्टीच्या आठवणींचे जवळपास खरे असलेले वर्णन फक्‍त आपण दुसऱ्यांस सांगू शकतो. खऱ्या गोष्टीचे वर्णन करता येईल असे शब्द अजून कुठल्याही भाषेत निर्माण झालेले नाहीत ना कधी होतील. ज्याप्रमाणे `ओम शांति ओम’ या चित्रपटात शाहरुख खान प्रेयसीला म्हणतो `तुझे वर्णन करु शकेल असे शब्द अजून झाले नाहीत’ अगदी तसेच सर्व वेद सत्याबद्दल म्हणत आहेत. `हे नाही, हे नाही’ असे नकारात्मक वर्णन करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहीला नाही. हेच शब्दांना न गवसणारे शाश्वत सत्य आपल्या जीवनात आनंदरुप घेऊन जन्माला आलेले आहे. सदा सर्वदा आपल्याजवळ असलेल्या ह्या सुखाला ओळखा आणि त्यात रमण्यातच जीवनाची सार्थकता माना. ज्ञानेश्वरीतील ओव्यांतून तुमच्या विचारांना ही नवी जाग देण्याचे काम माउली करीत आहेत. बाकी मूळ आनंद तुमच्याजवळ आहेच. फक्‍त तुम्हाला ना तो कधी कळला होता ना त्याच्यात स्वारस्य वाटले होते. ही आपली मानसिक स्थिती बदलण्याचे काम करणारे आपले पंतप्रधान म्हणजे संतमंडळी होय. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा व व्यावहारिक प्रगतीकरीता गहाण ठेवलेला स्वतःवरचा विश्वास परत मिळवा. तुमचे निदैले कृपाळूपण एकदा जागे झाले की कशाची कमतरता आहे? तुम्हांस सर्वसुखाचि प्राप्ती होणारच.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (49/9):

Guru shows what you always have

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मोटके गुरुमुखे उदैजत दिसे । आणि ह्रुदयी स्वयंभचि असे ।

प्रत्यक्ष फावो लागे तैसे । आपैसयाचि ॥ ४९:९ ॥

नवव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आता मी तुला अत्यंत गुह्यातील गुह्य सांगणार आहे. हे गुपित जाणून घेशील तर तुला ज्ञानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. आणि गंमत अशी आहे की सर्वांत उत्तम ज्ञानाची प्राप्ती करुन देणारे हे गुह्य फार कठीण आहे असे काही नाही. खरी गोष्ट अशी आहे की `तरि पवित्र आणि रम्य । तेवीचि सुखोपायेचि गम्य । आणि स्वसुख परि धर्म्य । वरि आपणपा जोडे ॥५५:९॥’. याचा अर्थ असा की जे पवित्र आणि मनपसंद आहे आणि सहज प्राप्त होत आहे आणि त्यामुळे स्वानंदसुख आपोआप हातात येते असे हे गुपित आहे. यापुढे ते असेही म्हणतात की अर्जुना गोष्ट एवढी सोपी असेल तर बहुतांशी लोकांना ती का मिळत नाही अशी शंका घेऊ नकोस कारण सर्वसामान्य लोकांना स्वरुपाची ओढच असत नाही. ज्याप्रमाणे कमळाजवळ बसूनही बेडूक चिखलातच रमतो (आणि त्यातील परागकण भुंगे घेऊन जातात) किंवा गायीच्या आचळावर बसूनही गोचीड रक्‍तच पीते (आणि आचळातील दूधाला मुकते) त्याप्रमाणे `तैसा ह्रुदयामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु । की भ्रांतासि कामु । विषयावरी ॥६०:९॥’. सर्वसामान्य साधकांना निखळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही याचे कारण ते ज्ञान खूप गहन आहे हे नसून, त्यांची ज्ञानप्राप्तीबद्दलची आस्था कमी आहे हे आहे.

गहन ज्ञान उघडे करणाऱ्या आणि कळायला सोप्या असणाऱ्या गुपिताबद्दल वरील वर्णन ऐकल्यावर ते जाणून घ्यायची उत्सुकता साहजिकपणे आपल्या मनात उद्भवली असेल. आज निरुपणाला घेतलेल्या ओवीतून माउली आपणास त्या गुपिताची ओळख करुन देत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की `गुरुमुखातून ऐकल्यावर (त्या ज्ञानाच्या उदयाची) पहाट झाली असे दिसते, पण आपल्या ह्रुदयात ते जन्मजातच असते आणि त्याची प्रचिती (साधकाला) स्वसंवेदनांनी (प्रत्यक्ष फावो) आपोआप यावयास सुरुवात होते.’

स्वतःबद्दल आहे जे प्रेम, जो निःसंदेह विश्वास ।

बघा त्याच्यात निखळ ज्ञानाचा दृष्य निश्‍वास ॥

ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, `मोटके गुरुमुखे उदैजत दिसे’. म्हणजे गुरुंच्या मुखातून निघालेल्या शब्दांमुळे त्याचा उदय झाला आहे असे भासते. गुरु आपणास आपले म्हणतात म्हणजे काय, तर अनुग्रह देऊन आपला ते शिष्य म्हणून अंगीकार करतात. गुरुंनी दिलेल्या अनुग्रहानी काय स्पष्ट व्हायला लागते? आपणास त्यांच्या परंपरेत सामावून घेताना त्यांनी एक कुठला तरी मंत्र दिला असेल. तो मंत्र म्हणजे स्वतःच्या साधनेने सिध्द केलेले जिवंत शब्द असतात. श्रीगुरुंनी असा सामर्थ्यवान मंत्र आपल्याला देऊन परमकृपा केलेली असते यात संदेह नाही. पण त्यांच्या कृपाळूपणाची सुरुवात याच्या आधीच सुरु झालेली असते. जेव्हा ते आपणास सांगतात की अमुक एका दिवशी मी तुला दीक्षा देईन, तेव्हा त्यांच्या ह्या कृतीने एक सूक्ष्म क्रिया केलेली असते. ती म्हणजे त्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास किंवा तुम्ही त्याला त्यांनी आपल्यावर दाखविलेले प्रेम असेसुध्दा म्हणू शकता. कारण दुसऱ्यावर टाकलेला संपूर्ण विश्वास आणि केलेले निरपेक्ष प्रेम यात फारसा फरक नाही. जरा आठवा तुमची अनुग्रहापूर्वीची अवस्था. आपण किती अस्वस्थ होतो तेव्हा! जीवनात स्वतःबद्दल पूर्ण खात्री तेव्हा होती का? नव्हती. आत्मविश्वास नसल्याने स्वतःच्या हातून घडलेल्या प्रत्येक महत्वाच्या कृतीची वारंवार तपासणी करुन बघण्याची सवयच आपणास तेव्हा होती. माझ्या हातून जे काही वर्तन घडले आहे ते बरोबर आहे की नाही या प्रश्नाची एकप्रकारची टोचणी आपल्या मनाला सतत लागलेली होती. हो की नाही? आणि मग ज्याप्रमाणे एका परीकथेतील सुंदर, नाजूक राजकुमारीला सात मऊसूत गाद्यांखाली असलेला वाटाणा टोचून नीट झोप लागत नव्हती, त्याचप्रमाणे व्यावहारिक जगात सुखे असूनही आपल्या मनाची बेचैनी काही कमी होत नव्हती. कारण स्वतःबद्दल विश्वास नव्हता. आपल्यापैकी कितीजणांना गुरुंची भेट व्हायच्या आधी स्वतःबद्दल विश्वास होता?

आणि आपली गोष्ट कशाला, जे जगद्गुरु व्यासांचे असामान्य पुत्र होते अशा शुकाचार्यांना बघा. त्यांनासुध्दा स्वतःबद्दल विश्वास नव्हता. जेव्हा त्यांच्या पित्याने, म्हणजे व्यासमहर्षींनी, परमार्थातील उच्चतम ज्ञान प्राप्त झाल्यावर होणारी लक्षणे सांगितली तेव्हा ती शुकाचार्यांना आपल्यात स्पष्टपणे दिसून आली. तरीपण त्यांना विश्वास बसला नाही. म्हणून त्यांनी मग विचारले, `एवढीच लक्षणे आहेत की अजून काही आहे?’ व्यासांना लगेच लक्षात आले की ह्याला असे वाटत आहे की मी पिता असल्याने एखादवेळेस सगळ्या गोष्टी याला सांगू शकलो नाही. याच्या मनातील संभ्रम दूर व्हायला गुरुंची भेट जरुरी आहे. म्हणून त्यांनी शुकाचार्यांना सांगितले की `अजून तुझ्या मनातील संदेह गेलेला नाही. म्हणून तू जनक राजाला जाऊन भेट. तो सर्वज्ञानी आहे आणि तोच तुला सांगू शकेल की तुला ज्ञान प्राप्त झाले आहे की नाही.’ शुकाचार्य पोहोचले जनकराजाकडे. जनकराजाने शुकाचार्यांची परीक्षा घेण्याकरीता सात दिवस त्यांना बाहेरच थांबविले आणि त्यातील एखादे दिवशी सन्मान तर दुसऱ्या दिवशी अपमान करविला आणि त्या प्रसंगी शुकाचार्यांंची प्रतिक्रिया काय होते याचे निरीक्षण केले. नंतर सातव्या दिवशी आपल्या सभेत बोलावून त्यांनी सांगितले की हा पाण्याने भरलेला पेला जमिनीवर आखलेल्या रेषेवरुन फिरवून आण. त्या आखलेल्या वर्तुळाच्या भोवती जनकराजाने जत्रेसारखे वातावरण निर्माण केलेले होते. त्या सर्व मन विचलीत करणाऱ्या प्रसंगातून निभावून जेव्हा शुकाचार्यांनी भरलेला पेला परत आणला तेव्हा जनक राजाने त्यांना सांगितले की तुला पूर्णपणे ब्रह्मज्ञान झालेले आहे. त्या गुरुमुखातून निघालेल्या शब्दांनी शुकाचार्यांच्या मनातील सर्व शंकांचे पूर्ण निरसन झाले व ते आपल्या आत्मानंदात निःशंकपणे मग्न झाले.

सांगायची गोष्ट अशी आहे की गुरुंकडून आपणास गुरुमंत्र मिळतो ही एक दृष्य घटना आहे. आपणा सर्वांना ती माहिती आहे. आपल्या साधनेचे दृष्य रुप त्या मंत्रातच आहे. पण त्यापेक्षाही अधिक महत्वाची सूक्ष्म गोष्ट म्हणजे गुरु आपल्यावर विश्वास ठेवतात याची जाणीव ते आपल्यास करुन देतात. त्याम्चे आपल्यावर प्रेम आहे ही भावना जागृत करतात. त्यांनी ठेवलेल्या ह्या विश्वासरुपी बीजाची, निरपेक्ष प्रेमाची आपल्या साधनेद्वारे प्रचंड वाढ होते व आपले सर्व जगच विश्वासमय होते, प्रेमळ होते. जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी आपले सद्‌गुरुच आपल्या भल्याकरीता घडवित आहेत अशी जाणीव निर्माण होते. एकदा ही भावना उद्भवली की गोष्टींना अजून चांगली करायची आपली धडपड संपूर्णपणे थांबते. जे काही होत आहे ते सर्व बरोबर आहे याची जाणीव सतत असल्याने सर्व चिंतांचे हरण होते. सर्व घटना आपल्याकरीता बरोबर आहेत ही खात्री बुध्दीने होऊ शकते का? नाही, अजिबात नाही. कारण बुध्दी वापरुन विचार केला तर घडलेल्या घटनेला अनेक (वरकरणी अजून चांगले असे) पर्याय दिसू लागतात. परंतु एक कुणालाही समजावून न सांगता येणारा विश्वास (मग त्याला तुम्ही श्रध्दा असे म्हणा, गुरुभक्‍ती असे म्हणा) आपणास सांगतो की जे काही घडले आहे ते सर्व बरोबर आहे.

इथे एक उदाहरण द्यायचे म्हणजे स्वामी विवेकानंदांचे देता येईल. आयुष्याच्या उत्तरार्धात ते स्वतः नेहमी म्हणायचे की ठाकुरांनी (म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांनी) मला ज्या दोऱ्याने अगदी बांधून ठेवले होते तो दोरा म्हणजे त्यांचा माझ्यावरील असलेला विश्वास. स्वामींच्या जीवनात (त्यांच्या पित्याच्या निधनानंतर) इतकी विघ्ने अचानक निर्माण झाली होती की त्यांचा परमेश्वरावरील विश्वास उडून गेला होता. आणि त्यांचा स्वभाव मनाला जे पटले आहे ते स्पष्टपणे, निर्भिडपणे बोलण्याचा असल्याने त्यांच्या बऱ्याच मित्रांना त्यांनी देव म्हणून काही नाही हे पटवून दिले होते! ह्या सर्व गोष्टी ठाकुरांच्या कानावर घालणारे महाभाग होतेच की. आणि अशी माणसे स्वभावानुसार त्यात आपल्या पदरचेही काही घालण्यात कमी करीत नाहीत! परंतु त्यांच्या तोंडून आपल्या नरेंद्राबद्दल काहीही वेडेवाकडे ऐकले तरी त्या सर्वांना रामकृष्ण परमहंस एवढेच म्हणायचे की मला नरेनला स्वतः बघू दे. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाला असेल तर त्याला बघितल्यावर मला कळेल. आणि जेव्हा नरेंद्र समोर यायचा तेव्हा ते ह्या गोष्टींचा उल्लेखदेखील करायचे नाहीत. त्यावेळी स्वामी विवेकानंदांच्या मातोश्रींनी देखील त्यांच्याकडे संशयाने बघितले होते पण ठाकुरांनी कधीच नाही. हा विश्वासच नरेन्द्रनाथांचे स्वामी विवेकानंदांमध्ये परिवर्तन करण्यास कारणीभूत होता.

गुरुमुखातून प्रेम आणि विश्वास जाणवितो आणि त्यामुळेच आपल्यात जास्त बदल होतो याची पुष्टी देणारी एक बाब म्हणजे प्रत्येक संताच्या जीवनात त्यांनी सामाजिकरीत्या पतीत असलेल्या लोकांचा उध्दार केला आहे अशी उदाहरणे दिसून येतात ही होय. उदाहरणार्थ, भगवान चैतन्य महाप्रभूंनी गावातील कुविख्यात गुंड `जगाई आणि मथाई’ याचा मार सहन करुन त्यांच्याशी प्रेमाने बोलले, अजूनही गुंडगिरी सोडाल तर भगवंताकडे जाल हा विश्वास त्यांना दाखविला आणि त्यांना आपले म्हटले. या घटनेने त्या दोघात संपूर्ण बदल पडला व काही काळाने ते भगवान श्रीकृष्णांचे परमभक्‍त म्हणून विख्यात झाले.

दुसरी गोष्ट अशी की असा निःसंदेह विश्वास, हे निरपेक्ष प्रेम आपण गुरुंची भेट होईपर्यंत जीवनात बघितलेले नसते. ते गुरुमुखातूनच येते! या प्रेमाच्या अगदी जवळचे प्रेम, विश्वास म्हणजे आपल्या आईचे आपल्यावरचे प्रेम, आपल्यावरचा विश्वास. पण तुम्ही बघा स्वतःची आईसुध्दा आपणास एका साच्यात घालण्यातच समाधान मानत असते. त्या प्रेमाची वा विश्वासाची पातळी अत्यंत उच्च असूनही आई स्वतः अज्ञानात असल्याने त्याचे दृष्य रुप गुरुंच्या विश्वासाएवढे पवित्र नसते. परंतु इथे एक मेख आहे. गुरुंनी आपल्यावर विश्वास टाकला खरा, निरपेक्ष प्रेम दिले खरे पण त्याची जाणीव आपणास कशी झाली? कुठलीही गोष्ट कळण्यास ती आधी आपल्याला माहिती असावी लागते. लहानपणी सर्वच पक्षी काऊ वा चिऊ होते. मग त्यांतील फरक मोठेपणी ज्ञान वाढल्यावर झाला. मग गुरुंचे निरपेक्ष प्रेम कळायला आपणास निरपेक्ष प्रेम संपूर्ण विश्वास माहिती असायला हवा. तो कसा कळला?

इथे दुसरे चरण महत्वाचे आहे. माउलींची विचारसरणी अत्यंत खोल व सूक्ष्म आहे. `ह्रुदयी स्वयंभचि असे’. खरे म्हणजे हे प्रेम आपल्यात असतेच. फक्‍त त्याचे बाह्य जगात दृष्य रुप न बघितल्याने आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्या जीवनातले हा संपूर्ण विश्वास कुठे आढळतो? निरपेक्ष प्रेम कुठे दिसते? अगदी जन्मापासून आपण असे प्रेम स्वतःवर करीत असतो. कितीही अडचणी आल्या, स्वतःची वागणूक कितीही चुकीची वाटली तरी स्वतःच्या अस्तित्वावरचे आपले प्रेम कधीही कमी होत नाही. आपण जिवंत आहोत ही भावना सतत जागृत आहे आणि त्यात बदल करावा असे कधीतरी वाटले आहे का? आपले हे स्व अस्तित्वावरील असलेले विनाकारण प्रेम आणि गुरुंनी आपल्यावर टाकलेला विश्वास, दिलेले प्रेम यात काय फरक आहे? त्यांनीसुध्दा आपली सामाजिक, आर्थिक, नैतिक अवस्था न बघता आपल्यावर प्रेम केले आहे आणि आपणही स्वतःचे अस्तित्व तसेच जपत आहोत. परंतु महत्वाचा फरक हा आहे की आपण स्वतःला आपल्या जिवंतपणाची खूण म्हणून स्वतःकडे देहाने आखलेल्या संकुचित रुपात बघत होतो. देहभावना जागृत झाली की त्याच्या अनुषंगाने असलेल्या सर्व वासना बरोबर येतातच. त्यामुळे स्वतःच्या प्रेमाला लायक अशी आपली मूर्ती डोळ्यासमोर कधी आलेली नव्हती. त्यामुळे काय होत होते तर स्वतःवर प्रेम करायची आपली नैसर्गिक प्रवृत्ती आणि देहाचे विचित्र वागणे यातील विसंगती आपणास खात होती. स्वतःबद्दलचा विश्वास नसण्याचे हे एक मूळ आहे. एकदा गुरुंनी आपल्यावर विश्वास दाखविला आणि गुरुमंत्र दिला की त्या साधनेद्वारे आपण स्वतःला `मी देह आहे’ या भावनेतून मुक्‍त करुन घेतो. गुरुंनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर आपण स्वतःला देहभावनेतून मुक्‍त करुन घेतल्यावर आपले खरे निर्गुण रुप आपणास स्पष्ट व्हायला लागते. मग आपल्यामधील असलेल्या स्वतःबद्दलच्या प्रेमाला लायक असे आपले `स्वरुप’ दिसते. आपण प्रेम करायला मोकळे होतो. त्या अत्यंत मोकळेपणाने केलेल्या प्रेमाच्या शक्‍तीमुळे सर्वसुखाची प्राप्ती होते.

म्हणून ज्ञानेश्वर महाराज `मोटके गुरुमुखे उदैजत दिसे’ असे म्हटल्यावर लगेच म्हणत आहेत `ह्रुदयी स्वयंभचि असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे, आपैसयाचि.’ आपोआप सर्व प्राप्ती होते. स्वतःचे रुप ओळखणे याशिवाय दुसरे काही घडत नाही. पूर्वी त्रिमीती दृष्य असलेली चित्रे मिळायची. वरकरणी नुसत्या चित्रविचित्र रेघोट्या दिसत असायच्या. परंतु नक्की कुठल्या बिंदूवर दृष्टी केंद्रीत करायची हे कळले की त्या गोतावळ्यातून अचानक एक सुंदर विहंगम दृष्य दिसायचे. आपली नजर बदलली की सर्व सुंदर दिसते. बाकी काही करावे लागत नाही. ते चित्र तिथे होतेच. आपणच आपली नजर चित्राच्या पृष्ठभागावर ठेवली असल्याने दिसत नव्हते. त्या चित्राच्या पलिकडे नजर स्थिर केली की खरे चित्र दिसू लागते. त्याचप्रमाणे देहाकडे नजर जोपर्यंत केंद्रीत आहे तोपर्यंत जीवनात सुसंगती दिसणार नाही. गुरुंनी दाखविलेला विश्वास, प्रेम यांचे आयुष्यात रोपण झाले, एकदा त्यांची जाणीव झाली की आपली नजर देहापलिकडे असलेल्या स्वरुपावर केंद्रीत होऊन स्थिर होते. मग आयुष्य सुंदर होते. आपोआप.

तेव्हा वरील ओवी आपणास काय सांगत आहे? गुरुंनी आपल्यावर (अनुग्रह देण्याच्या क्रियेने) जो विश्वास ठेवलेला आहे, जे प्रेम दाखविले आहे तो विश्वास, ते प्रेम स्वतःच्या देहरुपी अस्तित्वावर नसून आपल्या स्वरुपावर आहे हे सतत लक्षात ठेवा. त्यांनी आपला अंगीकार करण्यात `स्वतःमध्ये स्वरुप ओळखायची क्षमता आहे’ हा विश्वास दाखविला आहे हे जाणून त्यांचा तो विश्वास सार्थक करण्याचा अथक प्रयत्‍न करीत रहा. तुमच्याजवळ सतत असलेले स्वरुपानुसंधानातील सुख तुम्हाला आपैसयाचि प्राप्त होईल.

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा(395to397)/9:

Develop the natural sadhana

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

पै भक्‍ती एकी मी जाणें । तेथ साने थोर न म्हणे ।

आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ ३९५:९ ॥

 

येर पत्र पुष्प फळ । हे भजावया मिस केवळ ।

वांचुनि आमुचा लाग निष्कळ । भक्‍तितत्व ॥ ३९६:९ ॥

 

म्हणोनि अर्जुना अवधारी । तूं बुध्दी एकी सोपारी करीं ।

तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबे माते ॥ ३९७:९ ॥

 

साधकाच्या जीवनात एकवेळ अशी येते की त्याच्या हातून जे काही घडते ते सर्व त्याची साधनाच असते. अशा साधनेला `सहज साधना’ म्हणतात. साधनेच्या प्रथमदशेत आपण दिवसातील एक ठराविक काळ साधनेचा असा सुनिश्चित केलेला असतो. प्रत्येकाने स्वतःच्या दिनक्रमानुसार हा काळ ठरविलेला असतो. म्हणूनच आपण बघतो की काही साधक साधनेकरीता सकाळी लवकर उठतात तर काही रात्री शय्येवर पडल्यावर निद्रा येण्याआधी आज घडलेल्या सर्व घटना सद्‌गुरुंना सांगून झोपतात. दिवसाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कुठलाही वेळ आपण आपल्या सोयीप्रमाणे साधनेत व्यतीत करतो. अश्या वेगवेगळ्या साधकांच्या निरनिराळ्या वेळा एकच भगवंत सांभाळत असतो. याचा अर्थ असा की तो सतत आपल्याबरोबर असलाच पाहिजे. नाहीतर केव्हाही साधना केली असती तर त्याला कशी पोचली असती? अशा विवेकाचा साधकाच्या मनात उदय झाला की त्याला सतत परमेश्वराचे अस्तित्व शोधून काढायचा छंद लागतो. काहीकाळाने त्याला भगवंताच्या आपल्याबरोबर सतत असण्याचा स्वसंवेदनांनी अनुभव यायला लागतो व त्याची साधना हळूहळू सहज होते. अशा सहज घडणाऱ्या अनुसंधानात रममाण होऊन जो आपले आयुष्य जगतो त्याने परमार्थात खूप प्रगती केली यात शंका नाही. अशा अवस्थेचे महत्व अनन्यसाधारण आहे. वरील ओव्यांमध्ये अशा उच्च अवस्थेत कसे पदार्पण करावे याचा एक उपाय माऊली आपणांस कथन करीत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: `अर्जुना तू एक गोष्ट नीट जाणून घे. आम्ही कुठल्याही व्यक्‍तीच्या सामाजिक वा नैतिक स्थितीचा विचार न करीता तीच्यातील माझ्याबद्दल असलेल्या भक्‍तीकडे लक्ष देतो. कुणाच्याही मनात (माझ्याबद्दल) असलेल्या (प्रेम)भावावर आम्ही फिदा होतो. पाने, फुले व फळे अर्पण करुन (म्हणजे बाह्य साधनांनी) केलेल्या भक्‍तीने नव्हे तर अंतर्गत भावाने आमची प्राप्ती होते. (हे जाणून) अर्जुना तुझ्या बुध्दीला सोपी करुन (तीला आपल्या ताब्यात ठेवून, एकांगी करुन) जीवन जगलास, तर तुझी साधना आपोआप `सहज’ होऊन सतत माझ्या सान्निध्यात राहशील.’

 

अहंगड नसावा हे खरे, पण न्यूनगंड का ठेवता बरे?!

 

तेथ साने थोर न म्हणे. भगवंत म्हणताहेत की आम्ही कोण छोटे आणि कोण मोठे याचा अजिबात विचार करीत नाही. भगवंत नेहमी वर्तमानकाळात जगत असतात! आपले मोठेपण आणि लहानपण दोन्ही भूतकाळावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या. का तुम्ही स्वतःला कमी समजता? तुमच्यात न्यूनगंड का आहे? आत्तापर्यंत तुमच्या हातून काहीच महत्वाचे घडले नाही म्हणून. हो की नाही? माझ्या आयुष्याची संध्याकाळ होत आली आणि अजून देवाबद्दल माझ्या मनात प्रेमभाव नाही. म्हणजे मी पापी आहे. अजून, अगदी या क्षणापर्यंत मला देवावर प्रेम करावे हे केवळ बौध्दीकरीत्याच कळले आहे. परंतु खरे उमगलेले नाही. असे विचार हजार लोकांच्या मनात येतात. अशावेळी कुणी तरुण साधक त्यांच्या दृष्टीस पडला तर ह्यांच्या नकारात्मक भावनांना अजून उत येतो. बघा त्याने किती तरुण वयात भक्‍ती निर्माण केली आहे असे वाटते. प्रवचनाला आपण येतो, साधना करायला बसतो तेव्हा आधीपासूनच आपली अशी गर्भगळीत अवस्था झालेली असते. आपल्या मनाचे आणि बुध्दीचे हे सर्व खेळ आहेत. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटु दुसऱ्या संघातील खेळाडूंना खेळ सुरु होण्याआधीच नाउमेद करुन टाकतात, अगदी तसेच आपली बुध्दी परमार्थाच्या मार्गात पदार्पण करण्याआधीच आपल्याला खच्ची करण्याचे प्रयत्‍न करीत असते. कुणी तुम्हाला सांगितले की कालपर्यंत तुमच्या हातून भगवंताची भक्‍ती झाली नाही म्हणून आजसुध्दा होणार नाही म्हणून. आपण व्यवहारातील निकष साधनेला लावत असतो. जगात कुणाची प्रगती होत आहे हे दिसून येत असते. गरीब माणूस श्रीमंत होण्याआधी मध्यमवर्गीय होतो आणि त्याच्या तशा होण्यात त्याला खात्री होत असते की आपण योग्य मार्गावर आहोत. परंतु साधनेतील सर्व गोष्टी चमत्कारीक आहेत. इथे वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो. तुम्हाला वाटेल पण त्याने तपश्चर्या केली आणि हळूहळू त्याचा वाल्मीकी झाला. असे नसते. ज्याक्षणी वाल्याच्या मनात स्वतःच्या पूर्वजीवनाबद्दल आत्यंतिक घृणा निर्माण झाली तेव्हाच त्याचा वाल्मिकी झाला होता. नंतर तपश्चर्या करुन त्याने काय मिळविले तर आपले ज्ञान दुसऱ्यांना देण्याचे सामर्थ्य. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आत्महत्या करायला अगदी नखे कापायची सुरी सुध्दा पुरेशी असते. परंतु एखाद्या युध्दात जय मिळवायचा असेल, अनेक वैऱ्यांना ठार मारायचे असेल तर मोठमोठी शस्त्रास्त्रे जवळ असणे जरुरी आहे. म्हणजे काय की स्वतःचा उध्दार ज्यांना करायचा आहे तो एका क्षणात, कुठल्याही वेदांच्या ज्ञानाशिवाय़ होऊ शकतो. त्याकरीता व्यावहारिक जगाबद्दलची आत्यंतिक निरीच्छा तेवढी जवळ असायला हवी. पण तुमच्यामुळे अनेक लोकांचा उध्दार होणार असेल तर तुम्हाला वेदशास्त्रांचे ज्ञान असणे जरुरी आहे. प्रत्येक माणसाच्या मनातील शंकांचे निरसन करायचे असेल तर त्याकरीता तुमची भाषा तेवढी समृध्द पाहिजे, साधना तेवढी पवित्र पाहिजे.

ज्यांना आत्तापर्यंतचे आपले आयुष्य निरर्थक वाया गेले आहे अशी खंत आहे त्यांच्याकरीता दुसरा दृष्टांत आहे. असे बघा, पूर्वी शेतकरी शेतात दोन-तीन पिके घेतल्यावर ते शेत एक वर्षभर खाली ठेवायचे. त्याकडे अजिबात लक्ष न देता कुठलीही तणे तिथे माजू द्यायचे, गुरांना तिथे बसू द्यायचे. मग काही काळाने तेथील माजलेले रान जाळून मग परत तो भाग शेतीखाली आणायचे. असे करण्याने त्या जमिनीचा कस वाढायचा. मग नंतर काढलेले पिक आधीपेक्षा दुप्पट येण्याची शक्यता असायची. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील वरकरणी साधनेविरहीत वाटणारा काळ असतो. आपली साधना जन्मोजन्मी चालू असते. या जन्मातील संसारात आवड असणारा काळ म्हणजे भगवंताने आपल्या आयुष्याची जमिन तात्पुरती माळरानासारखी सोडून दिली आहे. लावा तो वैराग्याचा वणवा ह्या व्यावहारिक आयुष्य जगण्याच्या माळरानाला. मग बघा किती नवीन जोमदार भक्‍तीचे पीक येते ते. खरे म्हणजे आपली भगवंताबद्दलची समज, त्याच्याबद्दलची भक्‍ती आपल्या पूर्वजीवनातील अनुभवांवर फार अवलंबून असते. ज्याने आत्तापर्यंतचे आयुष्य संसारातील प्रगतीच्या आशेवर काढले आहे त्याने आपल्या आधीच्या जीवनातील सर्व विरोधाभासांचा भक्‍ती वाढविण्याकरीता उपयोग करावा. म्हणजे तुमच्या गतायुष्याचा तुम्हाला फायदाच होत आहे. मग त्याबद्दल का बाळगावा न्यूनगंड? टाकून द्या ती बागुलबुवासारखी खोटी भिती आणि अत्यंत आत्मविश्वासाने साधनेच्या मार्गावर पदार्पण करा. स्वतःबद्दलच्या न्यूनगंडामधील खच्ची करण्याच्या शक्तीपासून आपणास वाचवा. भगवंत सांगताहेत `येथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे, भलतेया’.

 

अपेक्षांचा अभाव जिथे असे, भाव तिथेच निर्माण होतसे

 

काही शब्द असे असतात की ज्याचा अर्थ दुसऱ्यांना सांगणे अशक्य असते. उदाहरणार्थ, तुम्ही गोड या शब्दाचा काय अर्थ सांगू शकाल? जास्तीत जास्त गोड पदार्थांची नावे घेऊन त्यांची चव म्हणजे गोड असे सांगू शकाल. साखर गोड असते. पण ज्याने आयुष्यात साखर खाल्ली नाही त्याला ह्या अर्थाचे काय महत्व? मग तुम्ही त्याच्या आयुष्यात आलेला प्रामुख्याने गोड चव असलेला पदार्थ शोधून काढणार. नाही मिळाला तर? ठीक आहे, जेव्हा तुला साखर खायला मिळेल ना तेव्हाच तुला गोड म्हणजे काय हे कळेल असे सांगून आपण स्वस्थ बसणार. दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हीच गोष्ट वरील ओवींतील `भाव’ या शब्दाची आहे. भाव ही मनाची अशी अवस्था आहे की त्याची गोडी स्वतः चाखल्याशिवाय कळत नाही. अशा भावाची आपल्यामध्ये उत्पत्ती झाली की प्रत्यक्ष भगवंत सहजपणे आपल्या जवळ येतो. ज्याप्रमाणे फुल उमलले की आपणहून त्याच्या सुगंधाच्या ओढीने भुंगे जवळ येतात त्याचप्रमाणे भगवंत भावाचे पाहुणे आहेत. भगवंताचे भावाच्या ओढीने होणारे आगमन इतके क्षणार्धात होत असते की कळत नाही आधी भाव निर्माण झाला की आधी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण झाली! कोंबडी आधी की अंडे आधी? कोण सांगू शकतो का? अंडे आधी तर ते आले कुठून आणि कोंबडी आधी तर ती आली कुठून? हो की नाही? त्याचप्रमाणे भाव निर्माण झाला कसा? भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली म्हणून आणि भगवंत आपल्याला त्या अस्तित्वाची जाणीव होण्याइतपत जवळ का आला? तर भाव निर्माण झाला होता म्हणून! खूप गंमतीशीर गोष्ट आहे ही. परंतु भगवंत म्हणत आहेत की आम्ही भावाचे पाहुणे. मग कुणाही भलत्या माणसाच्या मनात तो आला तरी आम्ही पर्वा करीत नाही. तेव्हा भाव आधी असे तुम्ही म्हणू शकता. पण भाव निर्माण कसा होतो याचे काही शास्त्र नाही. खरे म्हणजे आपल्याजवळ जन्मजात भगवंताबद्दलचा भाव होताच. त्या भावाचे बोट चाटवूनच परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे. त्या चाटलेल्या भावाच्या सुखाच्या आठवणीच्या जोरावरच आपली व्यवहारात सुखाच्या प्राप्तीकरीता धडपड चालू आहे. तेव्हा भाव निर्माण होत नाही, आत्मपुरुष निर्माण होतो का? त्या सतत अस्तित्वात असलेल्या भगवंतासारखाच त्याचा भावसुध्दा सतत आपल्याजवळ असतो. त्याची नित्य सान्निध्यात असलेल्या भावाची जाणीव जेव्हा आपणांस होते तेव्हा तो निर्माण होतो असे म्हटले जाते. तेव्हा आपल्याला भाव निर्माण करायचा नाही तर जवळ असलेल्या भावाची जाणीव होण्यास ज्या गोष्टींचा अडथळा होत आहे त्यांचे निवारण करायचे आहे. कुठल्या ह्या गोष्टी?

आपल्या मनाला आणि बुध्दीला एक स्वाभाविक बंधन आहे. एकावेळी एकच गोष्ट ते जाणू शकतात. परमेश्वराच्या भावाची जाणीव होण्यास त्याविरुध्द असलेल्या सर्व गोष्टी जाणविणे बंद झाले पाहिजे. आपले भूतकाळातील जगणे बंद व्हायला हवे. आपल्या मनात असलेल्या सर्व अपेक्षा आपल्या भुतकाळातील घटनांवर अवलंबून असतात. तेव्हा तुमच्या मनातील अपेक्षांचा जेव्हा अस्त व्हायला लागतो तेव्हा आपोआप भगवंताबद्दलच्या भावाचा उदय होतो. इथे अपेक्षा या शब्दात सर्व अपेक्षा गृहीत धरल्या आहेत. अगदी सर्वमान्य, सामाजिकरीत्या उत्कृष्ट अशा अपेक्षासुध्दा. एकदा श्री निसर्गदत्त महाराजांना कुणी विचारले, `जगात सगळीकडे सुख असावे, लोकांनी एकमेकांशी सह्रुदयतेने वागावे अशी अपेक्षा ठेवण्यात काय चुक आहे?’ महाराजांचे त्यावरचे उत्तर म्हणजे `सर्व अपेक्षा चुकीच्या आहेत!’ तुम्ही वयोवृध्द पालक असाल तर आपली काळजी आपल्या मुलांनी घ्यावी ही अपेक्षा चुकीची आहे. तरुण नवऱ्याची बायकोकडून असलेली सुखाची अपेक्षा चुकीची आहे. अपेक्षा चुकीची आहे याचा अर्थ आपल्याला हवी तशी गोष्ट घडली तर मुद्दामहून त्याला नकार द्यावा असे नाही. कुठलीही अपेक्षा ही आपल्या मनाची एक अवस्था असते. ती चुकीची आहे. बाह्य घटना चुकीच्या नाहीत. असेच घडावे असे वाटणे चुकीचे आहे. जेव्हा मनात भविष्यकाळातील घटनांबद्दल भूतकाळामुळे इच्छा निर्माण होतात तेव्हा त्याला व बुध्दीला भगवंताच्या भावाकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. म्हणून तो भाव माझ्यात नाही असे आपण म्हणतो. माऊली म्हणते `जाणतेनि गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लवे संतोषिती ॥२५:१॥’. जाणीव ठेवून भगवंतावर प्रेम करा. आपल्यामध्ये भगवंताबद्दल असलेल्या प्रेमाची ही जाणीव म्हणजेच भाव होय. नाहीतर भगवंत सगळीकडे आहेच आणि आपले त्याच्यावरील प्रेमही सतत आहेच. पण जाणीव होत नाही तोपर्यंत ते प्रेम आपल्याकरीता अस्तित्वात नाही. भाव नाही. भक्‍ती नाही. एकदा जाणीव झाली की काम फत्ते झाले. जेवढ्या अपेक्षा कमी होतील तेवढी भावाची जाणीव फोफावेल, भगवंत जवळ येईल. मग बाह्य जीवनात भले तुम्ही साधना करा वा करु नका. भगवंताला त्याच्याशी कर्तव्य नाही.

 

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (513/9):

Religion Vs Spirituality

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परी असते जात न गणिती । गहिंसपणे ॥ ५१३:९ ॥

 

नवव्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला परमार्थातील गूढार्थ जाणून घेण्यातच मानवाची भलाई आहे हे बिंबविण्याकरीता भगवान श्रीकृष्ण व्यावहारिक जगाबद्दलची वस्तुस्थिती समजावून सांगतात. वस्तुस्थिती कळणे म्हणजे जी वस्तू आहे तशी, त्यावर कुठल्याही भावनांचे आरोपण न करीता, जाणणे. अशा कळण्यामध्येच त्या वस्तूचे खरे ज्ञान होत असते. परमार्थाच्या मार्गात पुढे जाण्यास दृष्य जगाची वस्तुस्थिती जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे असे कुणास वाटेल. आपले ध्येय समजा पूर्वेस असेल तर पश्चिमेस काय आहे हे संपूर्णपणे जाणल्यास तिथे आपले ध्येय नाही हे स्पष्ट होईल आणि मग आपोआपच आपण पूर्वेकडे वळू. त्याचप्रमाणे ही गोष्ट आहे. अध्यात्मात बाह्य संसारातून मन काढून घेऊन स्वतःमध्ये असलेल्या स्वरुपाकडे वळवायचे असते. म्हणून बाह्य जगाचे खरे रुप कळणे जरुरी आहे. कारण अंतर्गत साधनेला पर्याय म्हणजे दृष्य जग होय. आणि जोपर्यंत आपल्याकडे दुसरा पर्याय आहे तोपर्यंत आपले मन अध्यात्मात एकाग्र होणार नाही याची पूर्ण जाणीव भगवंतांना आहे. एखादी गोष्ट केल्याखेरीज दुसरा पर्याय नाही याची संपूर्ण जाणीव जेव्हा आपणांस होते तेव्हा आपले मन अगदी सहजरीत्या ती गोष्ट करण्यास उद्युक्‍त होते. परमार्थाला पर्याय म्हणजे व्यावहारिक जग. आपले लक्ष संपूर्णपणे साधनेकडे लावायचे असेल तर त्याच्याकडे असलेला दुसरा पर्याय काढून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या देहाची आपणांस जाणीव आहे तोपर्यंत जगाचा नाश होणे अशक्य आहे. मग हा पर्याय काढून टाकायचा म्हणजे काय? तर आपल्या मनातील जगाबद्दलचे ममत्व काढून टाकायचे आहे. समजा आपणांस डॉक्‍टरने आपल्या अतिशय आवडत्या पक्वान्नाने असाध्य रोग होण्याची शक्यता आहे असे सांगितले तर त्या ज्ञानाच्या प्रभावाने आपोआपच आपली त्या पदार्थाबद्दलची आवड कमी होते. मग तो पदार्थ सतत आपल्या डोळ्यासमोर राहिला तरी उचलून तोंडात टाकावा अशी भावना निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या भवरोगाचे निवारण करणारा श्रीकृष्णरुपी वैद्य आपणांस संसारात गुंतल्यामुळे आपली पुढे काय गती होणार आहे हे सांगत आहे. ज्या कुणाला भगवंताचे सांगणे पूर्णपणे पटेल त्याचे मन आपोआपच भौतिक जगावरुन उडून पारमार्थिक जगाकडे आकर्षिले जाईल. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज नवव्या अध्यायाची सुरुवात करतानाच `अवधान एकले दीजे । आणि सर्वसुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥१:९॥’ असे म्हणतात.

आज निरुपणाला घेतलेली ओवी म्हणत आहे की संसारात गुंतलेली माणसे कशी असतात? तर `त्यांना मर हा शब्द ऐकवत नाही, यदाकदाचित कुणी आपला देह सोडला तर यांच्या शोकाला पारावार रहात नाही आणि असे असताना दररोज आपले आयुष्य कमी होत आहे याची पर्वा स्वतःच्या मूर्खपणाने करीत नाहीत.’ इथे आयुष्य हा शब्द रुपकात्मक आहे. केवळ आपल्या देहाचे आयुष्यच कमी होते असे नव्हे तर येथील सूर्य हासुध्दा अस्त होण्यासाठीच उदयास येतो, येथील चंद्रालासुध्दा क्षयरोग झालेला आहे, येथील इतिहासाच्या मोठमोठ्या कहाण्या केवळ किती लोक मेले (महायुध्दांमध्ये) हेच सांगतात असेसुध्दा माऊली म्हणते. खरी घटना काय आहे ते पहा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत रस घेतो तेव्हा आपण आपले लक्ष त्या गोष्टीत, घटनेत गुंतवितो. त्या आपल्या लक्ष देण्यात आपण स्वतःचे थोडेसे आयुष्य त्या गोष्टीला देतो असे म्हणल्यास वावगे होणार नाही. कारण तुम्ही लक्षच दिले नाही तर कुठे आहे ती गोष्ट? आत्ता या क्षणी दिल्लीला राजपथावर काय चालले आहे हे आपणास माहिती नाही म्हणून ह्या क्षणी तिथे जी घटना घडत आहे तीला अस्तित्वच नाही. आपल्या कळण्यामध्येच त्या घटनेला जीवन प्राप्त होते. म्हणजे आपण आपले आयुष्य असे गोष्टींना उधार देत जीवन जगत असतो. मग मन भरले की आयुष्य परत घेतो, मन काढून घेतले असे म्हणतात बघा. त्याचा अर्थ हा आहे. तेव्हा आयुष्य कमी होत आहे याचा अर्थ या जगातील सर्व गोष्टींचे अस्तित्व क्षय होत आहे हे बघ असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. म्हणजे कुठलीही वस्तू स्थिर नाही. सुख मिळायला जी वस्तू हवी होती तीचे रुप क्षणोक्षणी अस्तंगत होत असेल तर तीच्यावर अवलंबून असलेले सुखही कमीच होत राहणार, आणि शेवटी नष्ट होणार यात कुठला संदेह आहे? म्हणजे काय तर सर्व आयुष्य ज्या सुखाच्या शोधात तू घालवित आहेस त्या सुखाची प्राप्ती या जगात होईल का याचा तूच विचार कर हा त्यांच्या सांगण्याचा उद्देश्य आहे. आपण स्वतःला अर्जुनाच्या रुपात घालून हा विचार केला पाहिजे की सध्या मी माझ्या आयुष्यात महत्वाचे म्हणून जे काही ठरविले आहे त्या सर्व गोष्टींची यथासांग पूर्तता झाली तर मग मी कायमचा सुखी होईन का? का मला परत सुखाच्या शोधात भटकावे लागणारच आहे? पूर्णपणे वस्तूस्थिती जाणून घ्या की या जगात सुख मिळाले आहे असे कळेकळे पर्यंतच ते टिकते, मी सुखी आहे हे कळले की लगेच आपला `आता पुढे काय?’ हा प्रश्न परत आ वासून उभा राहणारच आहे. तुम्हाला हे पूर्णपणे कळले तरच तुम्ही आपल्या सुखाच्या प्राप्तीची व्याख्या बदलायला तयार व्हाल. ज्या गोष्टी लहानपणापासून आपण गृहीत धरल्या आहेत त्यांच्या योग्यतेचा सारासार विचार करणे ह्या विवेकसूर्याचा उदय आपल्या मनात झाला की आपल्या मनातील शारिरीक भोगाच्या आसक्‍तीचा अंधार नष्ट होण्यास सुरुवात होते. मग जेव्हा हा विवेकरुपी भानू मध्यान्ही डोक्यावर तळपू लागतो तेव्हा वैराग्याच्या तापात सर्व पापे भस्म होऊन पुढील प्रगतीचा मार्ग गोचर होतो. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला साधकाच्या प्रगतीचा हा मार्ग आजही तितकाच उपयुक्‍त आहे. याउलट असे म्हणायला हवे की आजकालच्या `वैज्ञानिक’ युगात या मार्गाशिवाय आपणांस पर्यायच नाही. कारण विवेक-वैराग्य या मार्गाखेरीज दुसरा साधनेचा मार्ग म्हणजे ब्रह्मज्ञानी गुरुंच्या सान्निध्यात राहून, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून आपले आयुष्य व्यतीत करणे. मग त्यांनी `टाक विहीरीत उडी’ असे सांगितल्यावर `का? कशाला?’ असे न विचारता उडी टाकायची आपली तयारी पाहिजे. पण सध्याच्या जगात अशारीतीने आपल्या गुरुंवर संपूर्ण विश्वास टाकू शकणारे कल्याणस्वामींसारखे महाभाग किती आहेत? तेव्हा गुरुंचा सल्ला लक्षात ठेवून स्वतःच्या बुध्दीचा वापर करणे हा एकच मार्ग आपल्यासारख्या `सुशिक्षितांच्या’ आवाक्यातला आहे असे वाटते. ज्याच्या मनात संपूर्ण आणि निःसंदेह श्रध्दा नाही त्याने बुध्दी वापरावी. त्याला दुसरा पर्यायच नाही. बुध्दी योग्य रीतीने वापरली की श्रध्दा आपोआप वृध्दींगत होते आणि मग कधी मति व कधी भक्‍ती अशा दुहेरी मार्गाने साधक झटपट ध्येयापाशी येतो. सध्या मोठमोठी यंत्रे वापरुन जलद रीतीने राजमार्गांचे दुहेरीकरण चालू आहे, त्याचप्रमाणे आपण स्वतःच्या बुध्दीच्या उपकरणाने आपला साधनेचा मार्ग दुहेरी केला पाहिजे! मग त्यावरुन साधनेतील अनुभवांचे बोजड ट्रक सहज रीतीने पार होतील!! नाहीतर साधनेतील सुखद अनुभवांतच अडकण्याचा ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यताच जास्ती.

 

धर्म आणि परमार्थ यातील फरक

 

स्वतःची बुध्दी वापरावी असे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनात एक प्रकारची दहशत उत्पन्न होते. लहानपणी शाळेत परीक्षेकरीता केलेल्या अभ्यासाची आठवण जागृत होते व दडपण वाटायला लागते. खरोखर, आपण आपले जास्तीत जास्त आयुष्य विचार न करीता घालवायचा प्रयत्‍न करीत असतो. तुम्ही जरा विचार करा (!!) की तुमची सुखीपणाची कल्पना काय आहे म्हणून. सगळे आयुष्य सुरळीत करुन शेवटी आपण सोफ्यावर तंगडी पसरुन बसायचे असे तुमच्या डोळ्यासमोर येते की नाही?! जे हवे ते मागितल्यावर हजर होईल तर अजूनच सुखाची परमावधी. या दृष्यात मेंदूतील पेशींचा अभावच जाणवितो!! जर सुखाची कल्पना काही तकलीफ न होता आयुष्य जगायचे अशी असेल तर अत्यंत आवडत्या क्षणी बुध्दीला सोडून दिले असे होते. प्रिय व्यक्‍तीला आपण सुखाच्या क्षणी सोडतो का? म्हणजे आधीपासूनच आपण बुध्दीला आपले मानले नाही हे स्पष्ट होते. कितीजणांची सुखाची कल्पना एक अत्यंत कठीण सुडोकूचा वा आपल्या विश्वातील दुसरा कुठलातरी प्रश्न सोडवित तासंतास घालविणे अशी आहे? हे तर काम झाले! त्यात कसला आनंद? या पार्श्वभूमीवर अत्यंत खोल विचार करा असे जेव्हा आपणांस ऐकू येते तेव्हा ऐकताक्षणीच आपण गर्भगळीत झालेलो असतो. मग त्यापेक्षा दररोज सकाळी पहाटे उठून अर्धा तास नामस्मरण करा हे चांगले वाटते. यात विचार करण्याचा सवाल नसतो तर आज्ञापालन करण्याचा प्रयत्‍न असतो. तेव्हा साधना म्हणजे एक ठराविक कृती असे आपण समजण्यास अगदी उत्सूक असतो. अत्यंत सात्विक बुध्दीचे आणि प्रामाणिक साधकही अशा विचारात अडकून आपली खरी साधना विसरतात. देवाच्या नावात आपली साधना उत्तम सुरू आहे असे समजतात. कुठले हे देव? तुमच्या हिंदू धर्मातच अनंत देव आणि देवता आहेत. यापैकी तुम्ही कुणाला भजणार? आणि का म्हणून? त्यांनी तुम्हाला शाश्वत सुख द्यावे म्हणून? जरा पुराणातील गोष्टी बघा. खुद्द या देवांनाच शाश्वत सुख लाभले आहे असे दिसून येत नाही. इंद्राची अवस्था भयभीत झालेली आहे, त्याने परस्त्रीची अभिलाषा धरलेली आहे अशा घटना पुराणांत लिहीलेल्या आहेत. यथा राजा तथा प्रजा! ज्या देवांचा राजाच असा आहे त्यातील कुठल्या देवाकडे तुम्हाला शाश्वत सुख देण्याचे सामर्थ्य आहे? तशी शक्‍ती असती तर ते स्वतःच सुखी राहीले असते की! शाश्वत सुखी कोण असे बघाल तर संतमंडळीच डोळ्यासमोर येतात. स्वामी स्वरुपानंद सतत आनंदी होते. श्री संत ज्ञानेश्वरांनी सतत आत्मानंदाचा आस्वाद घेतला आणि श्री रामकृष्ण परमहंस स्वतःला घशाचा कर्करोग झाला असतानाही आनंदात डुंबत होते. त्यांना ना परस्त्रीची अभिलाषा झाली ना सत्तेच्या आकर्षणामुळे भीती वाटली. ही मंडळी सतत आनंदी होती. म्हणून ज्या साधकाला शाश्वत सुखाची, आनंदाची तल्लफ आहे त्याने आधी आपले लक्ष धर्मातून काढून परमार्थात घातले पाहिजे. म्हणून साधकाला नित्य-नैमित्तिक साधनेच्या कसरतींच्या पळवाटेत गुंतण्याच्या धोक्यापासून दूर रहायला हवे. खरी साधना नित्य नूतन हवी. क्षणोक्षणी आपण `आता ह्रुदय आपुले, चौफाळूनिया भले, वरी बैसवू पाऊले, श्रीगुरुंची ॥१:१५॥’ असे म्हणायला हवे. सवयींच्या जळमटांचा त्रास श्रीगुरुंच्या पदकमलांना होऊ द्यायचा नसेल तर वेळच्यावेळी कळ दाबल्यासारखी साधना सुरू करायची आणि ठराविक काळाने गजर झाल्यावर बंद करायची यात परम सौभाग्य मानणे बंद करा. एकदा सवयीची साधना गेली की मग परमार्थात काय उरेल? एकतर सद्‌गुरुंवर निव्वळ, निखळ विश्वास आणि ते सांगतील तसे वागायची तयारी किंवा प्रत्येक गोष्ट विवेकरुपी उजेडात बघायची बुध्दी. संपूर्ण विश्वास माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे का? असेल तर उत्तम नाहीतर आपली बुध्दी वापरा असे म्हटले आहे. त्यात घाबरु नका!

आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या. परमार्थात धर्माचे महत्व फार कमी आहे. आपणांस श्री ज्ञानेश्वरांनी भावार्थ गीतेच्या पहिल्याच ओवीत सांगितल्याप्रमाणे आत्मरुपी देवाकडे जायचे आहे. हा आत्मरुपी देव केवळ हिंदू लोकांमध्येच आहे का? नाही. हा केवळ मनुष्यात नव्हे तर प्रत्येक जीवजंतूत आहे. आणि त्या सर्वांना त्या देवाकडे जायचा जन्मसिध्द अधिकार आहे. शेवटी धर्म धर्म म्हणजे काय आहे? काही थोर योगींनी (जसे जीझस क्राईस्ट, भगवान बुध्द, मोहंमद पैगंबर) स्वतः कष्टाने आत्मरुपी देवाची प्राप्ती करुन घेतली आणि आपला मार्ग अनुयायांना सांगितला. त्या मार्गावरच प्रेम करणाऱ्या अनुयायांनी त्या मार्गाचे महत्व वाढविले आणि काही काळाने त्याचे धर्मात रुपांतर झाले. याचा अर्थ असा की परमार्थात आपल्याला अशा ठिकाणी जायचे आहे की जीच्या अस्तित्वाने सर्व धर्मांना जीवन प्राप्त झाले आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की वेगवेगळे धर्म म्हणजे एकाच नदीकाठच्या एकाच गावात अनेक घाट बांधले असतात तसे आहेत. सर्व घाटांनी उतरुन एकाच पाण्याचे प्राशन करता येते. मग काही घाटांतून ब्राह्मणच उतरतील तर काहीतून मुसलमान. पाण्याला त्याचे काय? आपणांससुध्दा पाण्याशी संबंध राखायचा आहे, घाटाशी नाही. वेळप्रसंगी घाटाशिवाय, किनाऱ्यावरुनच सूर मारायची तयारी असली पाहिजे (म्हणजे कुठल्याही धर्माचा आधार न घेता स्वमतीने आत्मज्ञान करुन घ्यायची तयारी हवी). जरा बघा की कुठल्याही संताने ठाम असे काही करायलाच हवे असे बंधन घातलेले नाही. जर धर्म पाळायचा असता तर बंधन पाळणे जरुरी असते. श्रीगणेशाची खास पूजा चतुर्थीलाच करावी लागते. षष्ठीला नाही. ते बंधन पाळावेच लागते. पण परमार्थात कुठलेही बंधन असे घातले नाही. कुठलीही गोष्ट स्वीकाराच असा आग्रह नाही. विवेक करा असा आग्रह आहे. स्वतः विचार करा असे सांगणे आहे ते यासाठीच. आणि विचार कसला करा? तर या जगातील यच्चयावत गोष्टींच्या अनित्यतेचा. जगात सुख नाही असे म्हणू नका. जगातील सुख शाश्वत नाही असे म्हणा. मग तुमच्यातील काहीजण सध्या सुख मिळतेय ना त्यातच आनंदी राहू असे म्हणतील आणि काही म्हणतील शाश्वत सुख कुठे मिळेल हे बघायला हवे. पहिल्यां पठडीतील लोकांचे मन वळवायचा प्रयत्‍न न करीता दुसऱ्या लोकांनी आपले सुख शोधायला हवे असे भगवान आज आपणांस सांगत आहेत. विचार करा, तुम्ही पहिल्या टाईपचे की दुसऱ्या पठडीचे. जे तुम्हाला जाणवेल त्याच्याशी प्रामाणिक राहून आपले जीवन जगायचा प्रयत्‍न करा.

आपण इथे एकत्र येतो ते एक नवीन मंडळ जमवायला नाही. प्रत्येकाला स्वतःचा मार्ग शोधून काढायचा आहे. त्याकरीता सत्संगतीने एक शक्‍ती मिळावी म्हणून आपण एकत्र येतो हे कधीही विसरु नका. एकत्र येण्यातच समाधान मानू नका. येथे येऊन मिळालेल्या शक्‍तीचा उपयोग दररोजच्या जीवनात करा. मग तुम्हाला तुमचा मार्ग स्पष्ट दिसू लागेल यात संदेह नाही.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (9/9):

Choose to be with God

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

अवधारां आवडे तेसणां धुंधुरु । परि महातेजी ना मिरवे काय करु ।

अमृताचियां ताटी वोगरुं । ऐसी रससोय कैची ॥ ९:९ ॥

 

श्री ज्ञानेश्वर महाराजांना भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाबद्दल अतीव प्रेम आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी या अध्यायाच्या निरुपणाला प्रारंभ करताना `तरी अवधान एकले दीजे। मग सर्वसुखासी प्राप्त होइजे। हे प्रतिज्ञोत्तर माझे। उघड ऐका ॥१:९॥‘ असे उद्‌गार काढले आहेत. असे शब्द उच्चारण्यामध्ये त्यांच्या मनात स्वतःच्या ज्ञानाबद्दल अहंकार आहे की काय? ही कुशंका कोणाच्याही मनात येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्या तीस ओव्यांत श्रोत्यांची मनधरणी केली आहे. त्यात स्वतःकडे लघुपणा घेत त्यांच्या ज्ञानाची स्तुती करुन आपणांसारख्या श्रोत्यांची साथ मिळाली म्हणूनच माझ्याहातून ही भावार्थ टीका होत आहे असे वारंवार प्रक्षेपिले आहे. शेवटी श्रीगुरुंनी `आम्हांला तुझ्या मनातील भाव पूर्ण ठाऊक आहे, आता निरुपणास प्रारंभ कर’ अशी आज्ञा केल्यावर अत्यानंदाने माऊलींनी भावार्थ उकलून दाखविण्यास सुरुवात केली. आज निरुपणाला घेतलेली ओवी त्यांच्या वरील वर्णन केलेल्या श्रोत्यांच्या क्षमायाचनेमधीलच आहे. स्वतःच्या निरुपणाला काजव्याची आणि श्रोत्यांच्या ज्ञानाला सूर्याची उपमा देत ते म्हणत आहेत: `कितीही मोठ्या काजव्याची कल्पना केली तरी त्याला सूर्याएवढा तेजःपुंज आपण कल्पू शकणार नाही. (कल्पनेच्या परिसीमेतही) अमृताला तोड देईल अशा स्वयंपाकाचे वर्णन सांगता येणार नाही.’

ज्ञानेश्वरीतील संदर्भानुरुप वरील ओवीचा अर्थ आपण बघितला, यापुढे `एकतरी ओवी अनुभवावी’ ह्या श्री संत नामदेवांच्या उक्‍तीनुसार आपल्या जीवनात कुठला अर्थ लागू शकेल यावर आपण विचार करायचा प्रयत्‍न करु. असा अर्थ लावण्यात स्वतःच्या जीवनातील प्रसंगांशिवाय आणि स्वसंवेदनांनी जाणलेल्या बोधाखेरीज कशाचाही उपयोग होत नाही. आणि तो अर्थ कितीही सामान्य वाटला, साहित्यीक दृष्टीने अलंकारीक भाषेत अवतरला नसला, तरी स्वतःच्या जीवनात त्याचे महत्व निव्वळ पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हे सर्वांनी जाणून घेणे जरुरी आहे. स्वतःच्या अर्थाबद्दलच्या अशा निःसंदेह खात्रीमध्येच आपल्या साधनेला पुढे नेण्याची शक्‍ति असते.

 

साधनेतला आपला डळमळीत प्रयत्‍न!

 

आज इथे आलेल्यांपैकी कोणालाच संसारात काही कमी असे आत्यंतिकरीत्या जाणवित आहे असे वाटत नाही. परीश्रमाने प्राप्त केलेल्या उच्च शिक्षणाने व पाठीमागे असलेल्या श्रीगुरुंच्या आशिर्वादाने आपणां सर्वांच्या जीवनात एकप्रकारची स्थैरता आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपणांस जे काही हवे आहे ते सर्व आपल्याजवळ आहे. सध्या हवीहवीशी वाटणारी वस्तू आपल्या आवाक्याबाहेर नाही याची खात्री आपणा सर्वांस आहे. काही दिवस प्रयत्‍न केले तर जे पहिजे ते मिळेलच असा आत्मविश्वास आपल्यात आहे. हा, वस्तुस्थितीवर आधारीत असलेला, विश्वास आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे यात शंका नाही आणि तो असणे हे एक भाग्यच आहे. परंतु व्यवहारातील कुठलीही गोष्ट वा घटना संपूर्णपणे चांगली (वा वाईट!) नसते. स्वतःबद्दलच्या आत्मविश्वासाचा व्यावहारिक जगातही कधी कधी तोटा होतोच. उदाहरणार्थ, क्वचितप्रसंगी यातून अहंगंड निर्माण होतो वा आहे ती स्थिती टिकवून ठेवलीच पाहिजे हा दुराग्रह निर्माण होऊ शकतो. केवळ व्यवहारातच नव्हे तर परमार्थातही आपल्या सांसारिक सुखी स्थितीचा फायदा आणि तोटा होत असतो.

स्वतःवरील विश्वासाचा परमार्थातील फायदा असा की आपण गुरुउक्‍तींवर स्वतंत्र विचार करण्याची शक्‍ति प्राप्त करतो. बहुतांशी भक्‍त त्यांच्या पायावर लोटांगण घालण्यात वा त्यांच्या शरिरीक सुखाची सोय करण्यात धन्यता मानत आहेत असे बघूनसुध्दा आपण त्यांचे अनुकरण करण्यास उद्युक्‍त होत नाही. त्यांच्या उक्‍तीचा जो अर्थ स्वतःला उमगलेला आहे त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनात वर्तन करणे हीच खरी गुरुसेवा आहे हे उमगुन त्याप्रमाणे वागण्याचे धैर्य आपल्या अंगात येण्यास स्वतःबद्दलचा विश्वास असणे जरुरी आहे. खास करुन आपल्याला कळलेला अर्थ बाकी शिष्यांपेक्षा भिन्न असेल तर त्यानुसार वर्तन करण्यास अतिशय धैर्य लागते यात संदेह नाही. हे धैर्यसुध्दा आपले गुरुच आपणांस पुरवित असतात हे जरी खरे असले तरी आपल्या आत्मविश्वासाचा परिणाम, खारीने रामसेतु निर्माणात केलेल्या मदतीप्रमाणे का होइना, पण होत असतोच.

पण (श्रीमती देवकी पंडित यांच्या `सारेगमप” या दूरचित्रवाणीतील कार्यक्रमातील विख्यात `पण’ या शब्दाप्रमाणे!) आपल्या विश्वासाचा तोटा साधनेत व्हायची शक्यता असते. पहिला, आणि अगदीच ढोबळ असा, तोटा म्हणजे काही जणांची `गुरुंना सांगे तत्वज्ञान’ अशी अवस्था होते. साधनेत काही दिव्य अनुभव आले की आपल्या गुरुंचे आता काही महत्व नाही अशी वेडगळ भावना मनात उद्भवते व त्यात साधक गुंतला तर त्याचा सर्वनाश होणार यात शंका नसते. परंतु स्वतःकडे सारासार बुध्दी असल्याने आपण अशा ढोबळ तोट्यापासून दूर होतो. गुरुंमुळेच आपली साधना सुरळित चालू आहे, स्वतःच्या प्रयत्‍नांच्या मानाने आपली प्रगती खूपच वेगाने होत आहे हे प्रामाणिकपणे मान्य करुन त्या साधनेतील प्रगतीचे सर्व श्रेय सद्‌गुरुंना देऊन आपण कृतज्ञ राहतो. मनातील कृतज्ञतेचा आधार घेऊन गुरुंचे श्रेष्ठत्व अखंड मानण्यास आपणांस कठीण होत नाही. परंतु वरील तोट्यापेक्षा अजून एक खूप सूक्ष्म तोटा स्वतःवरील विश्वासाचा होत असतो. आणि ह्यात आपण फसण्याची प्रचंड शक्यता असते.

आपण आपल्या साधनेचे अंतिम ध्येय थोडेबहुत विसरणे हा तो सूक्ष्म तोटा होय. असे बघा, साधना करण्याचे खरे ध्येय आत्मरुपी भगवंताचे स्वसंवेदनांनी ज्ञान करुन घेणे हे होय असे आपण मान्य करुन आता बराच काळ लोटला आहे. हे ध्येय मान्य करताना आपल्या मनाची जी स्थिती होती त्या मानसिक स्थितीमुळे स्वतःच्या मार्गाचा अंत भगवंताला आतूनबाहेरुन ओळखण्यामध्येच आहे हे स्वीकारण्यास काही अडथळा आला नव्हता. आपली खरी साधना ध्येय (म्हणजे `साध्य’) काय हे ठरविल्यावरच सुरु होत असते. परंतु आपल्या मनाची ती देवाबद्दलची आत्यंतिक तळमळता सतत ठेवणे आपणास शक्य होत नाही. भावनेची तेवढी तीव्रता सतत सहन करण्याची शक्‍ति आपणामध्ये नसते. त्यामुळे काही काळाने भगवंताची प्राप्ती करण्याशिवाय गत्यंतर नाही ही भावना जाऊन `भगवंतप्राप्ती झाली तर बरी’ असे वाटू लागते. ह्या बदलत्या स्थितीचे वर्णन करणारा एक सुंदर शब्द म्हणजे `स्मशानवैराग्य’ होय. एखाद्या जीवलग व्यक्‍तीच्या निधनानंतर जेव्हा स्मशानभूमीत जावे लागते तेव्हा त्या ठिकाणी आपणांस जीवनाच्या क्षणभंगुरतेची संपूर्ण जाणीव होऊन संसाराबद्दल विरक्‍ती बाणते. ह्याला स्मशानवैराग्य असे म्हणतात. असे म्हणण्याचे कारण असे की ते वैराग्य स्मशानात असेपर्यंतच राहते. तेथून घरी आल्यावर आंघोळ झाली की परत आपण स्वतःच्या संसारात गुरफटतो! श्री संत भगवान रमणमहर्षी आणि परमहंस स्वामी स्वरुपानंदांना संसाराची आंतर्बाह्य विरक्‍ती स्वतःच्या मरणाचा प्रसंग प्रत्यक्ष अनुभविल्याने आला हे इथे सांगावेसे वाटते. त्यांच्यात आणि आपल्यात फार मोठा फरक म्हणजे त्यांनी ती विरक्‍ती टिकवून ठेवली व आपण तसे करु शकत नाही. असो. तर मूळ मुद्दा असा की आपल्या संसारातील गोष्टी मिळविता येतील ह्या आत्मविश्वासाचा एक तोटा म्हणजे `आता जीवनात यापेक्षा अजून काही करायची गरज नाही’ अशी भावना मनात निर्माण होणे. भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे या उच्च भावनेतून थोडे खाली उतरुन आपण आहे ती अवस्था चांगलीच आहे, यात सहज जमल्यास भगवंत दिसला तर चांगलेच असा विचार करायला लागतो. अशावेळी आपल्या घरातील इतर मंडळी जर संसारसुखातच धन्यता मानत असतील तर त्यांच्या सुखात आपणसुध्दा रमून जाऊन परमेश्वरापासून (आपल्या नकळत) दूर व्हायला लागतो.

याचे कारण असे की आपल्या कुटुंबातील इतर व्यक्‍तींना व्यावहारिक सुख देण्याची क्षमता स्वतःच्या निर्गुण परमेश्वराच्या साधनेवर अवलंबून नसल्याने साधना करताना आपले मन संपूर्णपणे एकाग्र होणे थांबते. साधना नाही जमली तरी मी संसारात सुखी आहेच की ही खात्रीच जणू आपणांस साधनेत जीवापाड प्रयत्‍न करुन देत नाही! खालील उदाहरण पहा: छत्रपति शिवाजींच्या काळात सिंहगड किल्ला मुगलांच्या ताब्यात होता. तो प्राप्त करण्याकरीता श्री तानाजी मालुसरे घोरपडीच्या सहाय्याने कड्यावर दोर लावून आपल्या सैन्यासहित गडावर चढले. वर चढल्यावर लढाई चालू असताना पराजय होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर तानाजीने पळून जायचे दोर कापून टाकले आणि सैन्याला सांगितले की आता तुम्हांला लढण्याशिवाय काही पर्याय नाही. त्यानंतर त्याच्या सैनिकांना प्राण पणाला लावून लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांच्या आत्यंतिक लढाईमुळेच त्यांना जय प्राप्त झाला. ह्या गोष्टीप्रमाणेच आपण संसारातील सुखाचे पळवाटरुपी दोर कापून साधना केली तरच भगवंताच्या दुर्गाची प्राप्ती होइल हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संसारातील सुखाची कुठलीही पर्वा करायची नाही असे ठामपणे ठरविले तरच आपली साधना निर्विघ्न पुढे चालू राहील हे मनावर बिंबविले पाहिजे. आपला स्वतःच्या व्यावहारिक कर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास आपणांस साधनेतील हे पळवाटेचे दोर कापू देत नाही हा सूक्ष्म तोटा फार कमीजणांच्या ध्यानात येतो.

साधना करताना आपण स्वतःचे दात घासण्याइतके वा वेळच्यावेळी भोजन करण्याइतके तत्पर का रहात नाही याचे एक सूक्ष्म कारण आपला `संसारात पुढे जाता येईल’ हा आत्मविश्वास आहे हे ध्यानात घ्या. एकदा हे ध्यानात आले की आपली साधना नीट का चालत नाही याबद्दलचा न्यूनगंड आपल्या मनातून दूर होईल. संसारात अजून गुंतलो आहोत, त्यात प्रगती होणार आहे याची खात्री आहे म्हणून साधना जीव पणाला लावून होत नाही हे ध्यानात आले की साधना परत मार्गी आणण्यास काय उपाय करावे हे सुचते. आजची ओवी आपणांस एक उपाय सुचवित आहे असे वाटते.

 

साधनेतील सुख एक महातेज आहे, संजीवन अमृत आहे!

 

आधी हे लक्षात घ्या की आत्मविश्वासाचा साधनेत होणारा तोटा आपणास नष्ट करायचा आहे, आपला आत्मविश्वास नष्ट करायचा नाही! आत्मविश्वासच नाहीसा झाला तर आपले स्वतःचे असे वैशिष्ट्यच नाहीसे होईल आणि परमेश्वराला हे मान्य नाही. आपण `स्वधर्मा’ने जगून त्याच्याजवळ जावे अशीच त्याची इच्छा आहे. तेव्हा स्वतःच्या व्यावहारिक आत्मविश्वासाला धक्का न लावता आपणास त्याच्यापासून उद्भवलेल्या दोषांपासून दूर व्हायचे आहे यात शंका नाही. त्याकरीता एक उपाय म्हणजे स्वकर्तृत्वाने जे व्यावहारिक यश मिळणार आहे त्याचे भगवंतप्राप्तीच्या मानाने असलेले लघुत्व जाणणे हा आहे. एखादा लहान मुलगा परीक्षेत `कॉपी’ करण्याचा विचार केव्हा करतो? आपल्या सर्व प्रयत्‍नांनीसुध्दा मनासारखे गुण मिळणे शक्य नाही याची खात्री पटल्यावरच. संसारातील सर्वात उच्चतम सुखापेक्षा जर भगवंतप्राप्ती उच्च आहे हे आपणांस पटले तर ते सर्वोत्तम सुख प्राप्त करण्याची धडपड आपण संसारातील सुखाच्या प्राप्तीने कधीच सोडणार नाही हे स्पष्ट आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने जास्तीत जास्त आपणांस व्यावहारिक सुखाचाच लाभ होणार असल्याने अंगात अमानित्व गुण ठेवून गुरुभक्‍ति बाणविण्यास हा एक उपाय सहज डोळ्यासमोर येतो.

याचा दररोजच्या जीवनात आचरण्याजोगा मार्ग म्हणजे तुम्ही मनाला साधनेमुळे लाभणारा आनंद आणि संसारातील ठराविक गोष्टींच्या प्राप्तीमुळे लाभणारे सुख यांची तुलना करण्यास शिकवा. साधनेतील आनंद तात्पुरता होता, ध्यान सुटल्यावर तो गेला हे जरी सत्य असले तरी तो जेव्हा होता तेव्हा आपणांस काय वाटत होते? यावर विचार करा. तुमच्या लक्षात येण्यास वेळ लागणार नाही की त्यावेळी जगातील कुठल्याही गोष्टीचे भान आपणांस नव्हते. केवळ स्वतःच्या अस्तित्वातच आपण सुखी होतो. साधनेतील सुख दुसऱ्या कुठल्याही गोष्टींवर अवलंबून नसून स्वयंभू आहे याची तुम्हाला खात्री पटेल. मग तुम्हांला लक्षात येईल की तत्वतः हे एकच सुख सतत आपल्याजवळ असू शकते. ज्याप्रमाणे पाण्याचा नळ उघडला की पाणि वाहायला लागते त्याचप्रमाणे स्वतःमध्ये गुंगलो की सुखाने आपले मन तुडुंब भरणार आहे याची विनासंदेह खात्री तुम्ही करुन घ्या. आत्ता जो आनंद ध्यानाच्या एकाग्रतेमध्येच मिळत आहे तो साधनेत प्रगती झाल्यावर दिवसाचे चोवीस तास आपल्याजवळ राहणार आहे ही खात्री आहे. तेव्हा त्याचा आज असलेल्या क्षणिकपणाकडे सध्या दुर्लक्ष करा. एवढेच नव्हे, तर ह्या सुखामध्ये संसारातील कुठल्याही दुःखाचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे हे तुम्ही स्वतःवर प्रयोग करुन स्वतः जाणून घ्या. साधनेतील एकाग्रता म्हणजेच आपले आणि परमेश्वराचे सान्निध्य होय. त्या सान्निध्यात सर्व संसाराची होळी करण्याची शक्‍ति असते म्हणून आपण त्या सुखाला `महातेज’, म्हणजे सूर्य अशी उपमा देऊ शकतो हे तुमच्या सहज लक्षात येईल.

जगातील सर्वात कठोर अशा दुःखाने पोळून आपले जीवन वैराण झाले असेल तरीही साधनेत एकाग्रता आली की तीच शांति लाभते हे बघा. अर्थात असे होण्यास आधी तुमच्या जीवनात आत्यंतिक दुःख आले पाहिजे. खरोखर जीवनात दुःखद क्षण येणे ही साधनेच्या दृष्टीकोनातून एक प्रचंड संधी आहे. ह्याक्षणीच आपले मन संसारसुखातून विरक्‍त होऊन अधिक गूढ ध्येयाचा शोध घेण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता असते. आपल्या स्वतःच्या मनाचा पीळ सोडविण्याची शक्‍ति केवळ दुःखातच आहे. थोर योगी परमहंस योगानंद यांच्या परमशिष्या श्री संत ग्यानमाता ह्यांनी तर जीवनाच्या दुःखद क्षणांकडे तुम्ही आदरसत्कारे बघा असे सांगितले आहे! (अर्थात याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक गोष्टीत तुम्ही दुःख बघा. जीवनात `सहज’ आलेले दुःखच खरा बोध देऊ शकते). तर सांगायचे असे की दुःखरुपी दाहाने वैराण झालेल्या आपल्या जीवनाला परत सुख देण्याची शक्यता साधनेतील शांतीत आहे हे लक्षात आल्यावर साधनेतील आनंदाला `अमृताची’ उपमा देण्याला तुम्ही तयार व्हाल. व्यवहारातील अनुभव काजव्यासारखे क्षुल्लक वाटू लागले की तुमची साधना सहज होते, सतत चालू राहते असा अर्थ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वरील ओवीतून आपण घेण्यास काहीच हरकत नाही. स्वतःच्या जीवनातील अनुभवांतून हा अर्थ आपण अनुभविला तर आपले कल्याण झाले असे म्हणण्यास श्री नामदेवांच्या `एक तरी ओवी अनुभवावी’ उक्‍तीचा आधार आहेच!

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (315/9):

Think beyond doing good deeds

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

मज येता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हाटां ।

स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५:९ ॥

 

स्वर्गा पुण्यात्मके पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे ।

मग मातें जेणें पाविजे । तें शुध्द पुण्य ॥ ३१६:९ ॥

 

श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये सतत असे विधान केले आहे की भगवंताच्या प्राप्तीमध्ये सात्विक गुणांचाही अडथळाच होतो. `जो सर्व गुणांच्या पलिकडे गेला आहे तो माझ्याजवळ आहे असे समज’ हे तत्व वारंवार सांगितलेले आहे. वरील ओवीतही श्रीज्ञानेश्वर महाराज असेच सांगत आहेत. ते म्हणत आहेत: `माझ्याजवळ येण्याच्या रस्त्याला दोन आडवाटा फुटलेल्या आहेत. त्यातील एक स्वर्गाकडे जाते तर एक नरकाकडे. त्या दोनपैकी कुठल्याही वाटेने जाणे हे पापच आहे. स्वर्गाकडे नेणारी आपली कर्मे म्हणजेसुध्दा पाप होय. फक्‍त ते पुण्यरुपी कवचात लपलेले असते. याउलट नरकात जायला कारणीभूत कर्मे म्हणजे निव्वळ पाप होय.’

 

परमार्थात कुठलीही महत्वाकांक्षा असू नये

 

अध्यात्मिक बैठक असलेल्या सर्वसाधारण साधकाला असे वाटते की जीवनात उच्च विचार ठेवून जगणे हा भगवंताच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच आपण बघतो की बरेचसे साधक सामाजिक सुधारणेसाठी आपले जीवन व्यतीत करतात. श्री विनोबा भावे, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज इत्यादी उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून आपण शक्‍य तितके समाजाच्या हिताकरीता झटायचा प्रयत्‍न करु लागतो. काही काळाने अशा कार्यातील रस वाढून आपण एवढे मग्न होतो की त्या कार्यांमुळे आपणांस नित्यनैमित्तिक साधना करण्यास लागणारा निवांतपणा मिळेनासा होऊ लागतो. तरीसुध्दा आपण भगवंताचेच काम करीत आहोत ह्या भावनेने आपली परोपकारी वृत्ती आपण सोडत नाही. अगदी थोर सामाजिक कार्य केले नाही तरी परोपकारात आपली साधना होत आहे असे सर्वचजण मानतात. उदाहरणार्थ, माझ्या गुरुंचे नाव मी जगात पसरवीन, त्यांची थोरवी सर्वांना जाणवून देईन असे विचार करुन आपला संप्रदाय वाढवायचा प्रामाणिक प्रयत्‍न करणारे साधक आपणां सर्वांच्याच जीवनात दिसून येतात. गुरुंचा अपमान झालेला त्यांना अजिबात चालत नाही. कुणाला ज्ञानेश्वरांबद्दल विनाआदर बोललेले खपत नाही. आता आपलेच उदाहरण बघा. गेला काही काळ आपण दर शनिवारी एकत्र येऊन ज्ञानेश्वरीवर विचार करायचा प्रयत्‍न करीत आहोत. नेहमी ठराविकच माणसे येथे येतात व सत्संगाचा आनंद लुटतात. त्यामुळे कदाचित आपणांस काही लोक `बंगलोर ग्रुप’ म्हणूनही ओळखत असेल. पण बाकी लोक असे म्हणतात म्हणून आपणसुध्दा असा समज केला की `आता आपला एक ग्रुप जमला आहे, तो सांभाळणे आपले कर्तव्य आहे, त्याने आपल्या गुरुंचे कार्य आपण पुढे चालवित आहोत’ तर ते संपूर्ण चुकीचे होईल. खरी गोष्ट अशी आहे की आपण सर्वांनी स्वतःची साधना स्वतःच वाढवायला हवी. ह्यामध्ये जर एकत्र येण्याचा फायदा होत असेल, आपल्या मनातील संदेह फिटत असतील तरच आपण एकत्र यायला हवे. समविचार करणारी मंडळी जवळ असल्याने साधना करायला हुरुप येतो, मनातील संदेह फिटण्यास मदत होते हे निश्चित आहे. पण काही काळाने स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे जरुरी असते. त्यावेळी सभोवतालच्या मित्रांपासूनदेखील दूर जाणे आवश्यक असते. श्री रामकृष्ण परमहंसांनी आपला देह ठेवल्यावर त्यांच्या संन्यासी शिष्यांनी एका ठिकाणी राहून साधना सुरु केली होती व एकमेकांना मदत करीत ते आपले जीवन जगत होते. परंतु काही काळाने प्रत्येकजण भिक्षु होऊन आपापल्या मार्गाला लागला (अर्थात, पुढे स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण आश्रम स्थापून परत सर्वांना एकत्र केले. पण ती घटना पुढची आहे!) ज्याक्षणी ग्रुप सांभाळण्यामध्ये आपल्या साधनेला हितकारक असलेल्या गोष्टींना आपण गमवायला लागतो त्यावेळी अत्यंत कठोरपणे आपण ह्या ग्रुपपासून दूर व्हायला हवे. हे स्वातंत्र्य जवळ बाळगून जर आपले मित्रमंडळ जमत असेल तर ठीक. नाहीतर मित्रमंडळीच्या सहवासाच्या सुखात (म्हणजे स्वर्गाच्या आडवाटेत) आपण फसून जाऊ. परमेश्वरापासून दूर होऊ. आपले हे एकत्र येणे म्हणजे एखाद्या पाणपोईसारखे आहे. जोपर्यंत कुणाला तहान लागलेली आहे तोपर्यंतच त्याने येथे येणे जरुरी आहे. जो मनुष्य येथे येण्यातच व सत्संगाचा आनंद उपभोगण्यातच आनंद मानतो, त्याने आपली तहान कधीच भागविली नाही असे होईल. मग या पाणपोईचा उपयोग तरी काय?!! या उदाहरणामध्ये मी प्रवचन देईनच वा दर शनिवारी प्रवचनाला जाऊन आपला ग्रुप वाढवायचा प्रयत्‍न करीन ह्या महत्वाकांक्षा आपणास देवापासून वंचित करीत आहेत हे लक्षात घ्या. ह्याचा अर्थ कधीच प्रवचनाला जाऊ नये असा नव्हे. प्रवचनाला जाण्यामुळे साधनेत प्रगती होत आहे तोपर्यंत जाईन असा विचार करुन सत्संग करण्यास यावे. आपल्या हातून जे काही कर्म घडत आहे त्याची अनिवार्यता जाणविणे म्हणजे खरी प्रगती होय. जोपर्यंत मी काही करीत आहे (मग भले ते कार्य आपल्या गुरुंच्या नावाने तुम्ही करा) अशी भावना आहे तोपर्यंत तुम्ही आडवाटेतच फसला आहात यात काहीही शंका नाही. जेव्हा आपली कर्मे `सहज’ होत आहेत हे जाणवायला लागते तेव्हा तुमची साधना खरी सुरु झाली असे समजण्यास काहीच हरकत नाही.

 

लिलिपुट राज्यातील आपले जीवन

 

आता येथे काही भले गृहस्थ असे म्हणतील की आम्ही काही फार पुण्य केलेले आम्हांस दिसत नाही. प्रामाणिकपणे बघितल्यास आमच्या गुरुंचे कार्यसुध्दा आम्हाला मनापासून करावेसे वाटतेच असे नाही. याउलट आमच्या हातून क्षणोक्षणी होत असणाऱ्या चुका आम्हांला प्रकर्षाने जाणवितात. म्हणजे स्वर्गाकडे जाण्याचा आमचा मार्ग बंदच दिसतो. आमची ना साधनेत प्रगती होत आहे ना आम्ही स्वर्गात जात आहोत. परंतु असे नसते. आपले जीवन हे लिलिपुट राज्यासारखे आहे. लहान मुलांच्या गोष्टींमध्ये सिंदबाद खलाशाच्या प्रवासवर्णनाची पुस्तके फार प्रसिध्द आहेत. मी लहानपणी त्यांची बरीच पारायणे केली आहेत! माझ्या स्मरणात जे काही आहे त्यावरुन आज मी बोलत आहे. एकदा (नेहमीप्रमाणे!!) सिंदबादचे जहाज वादळात अडकून फुटले व बेशुध्द अवस्थेत आपला नायक किनाऱ्यावर फेकला गेला. काही काळाने त्याला शुध्दी आली तेव्हा त्याने उठायचा प्रयत्‍न केला आणि त्याला जाणविले की तो अजिबात उठू शकत नाही. त्याची मान वळविणेसुध्दा त्याला अशक्य होते. त्याच्या लक्षात आले की त्याच्या शरीरावरचा प्रत्येक केस एका सूक्ष्म धाग्याने जमिनीवर छोट्याशा खिळ्याला बांधला गेला आहे. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे बारीक असलेले ते धागे त्याला कुठलीही हालचाल करुन देत नव्हते. काही काळाने त्याच्या अंगठ्याएवढ्या व्यक्‍ती त्याच्या अंगावर चढल्या आणि त्याला कळले की तो अशा प्रदेशात आला आहे की जेथील माणसे खूप लहान आहेत. त्या राज्याचे नाव होते लिलिपुट. आपली अवस्था सिंदबादसारखी झाली आहे. आपले भव्य विश्वरुप विसरुन आपण व्यावहारिक जगात अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीत गुंतले गेलो आहोत. तुम्हांला तुम्ही केलेले पुण्य दिसत नाहीत असे म्हणता पण जेव्हा आईसक्रिमच्या दुकानात गेल्यावर घरी असलेल्या आपल्या लहान मुलाची आठवण येऊन तुमची खाण्याची इच्छा निघून जाते तेव्हा तुम्ही स्वतःच्या आकर्षणाचा त्याग करुन पुण्यच मिळविले असते. ज्याक्षणी आपल्या मित्राकरीता स्वतः कष्ट सहन करता तेव्हा अजून एक धागा तुम्हाला गुरफटवुन टाकत असतो. ही सर्व चांगली कर्मे आपल्या मनात अपेक्षा निर्माण करीत असतात. मुलाने आपणांस मान द्यावा वा आपल्यावर वेळ आली तर मित्राने आपल्याकरीता कष्ट सहन करावे इत्यादी. ह्या अपेक्षांच्या जंजाळाने आपणांस भगवंताचे विस्मरण होते!

वरील विवेचन ऐकून तुम्ही `मग कुणाला मदत करणे अयोग्य आहे का?’ अशी विपरीत शंका काढू नका. योग्य वा परोपकारी कर्म करणे उचितच आहे (कारण त्यामुळे स्वर्गाकडे आपण जातो) पण त्याहून उचित असलेली गोष्ट म्हणजे गोष्ट करुन झाली की भगवंताचे आभार मानणे. आभार ह्याकरीता की त्याने तुम्हांला हे उचित कर्म करायला निवडले व अशी शक्‍ती दिली की तुमच्या हातून ते कर्म पार पडावे. मी एक निमित्तमात्र आहे ही कल्पना कधीही न सोडता समोर आलेली कर्मे निर्धारपूर्वक जो करतो त्याने ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शविलेल्या दोन्ही आडवाटा चुकविल्या असे समजायला काहीही हरकत नाही.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (207-209)/9:

Bhagavamtaace Naam Kase Ghyaave?

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

तो मी वैकुंठी नसे । वेळू एक भानुबिंबीं न दिसे ।

वरी योगियांचींहि मानसें । उमरडोनि जाय ॥ २०७:९ ॥

 

परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।

जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥ २०८:९ ॥

 

कैसे माझ्या गुणी धालें । देशकाळाते विसरले ।

कीर्तनसुखें सुखावले । आपणपांचि ॥ २०९:९ ॥

 

ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायात साधकाच्या प्रगती मधील एक महत्वाचा टप्पा म्हणजे भगवंताबद्दल निर्माण झालेले निरपेक्ष प्रेम होय. एकदा ह्या जगामधील घडामोडींमध्ये भगवंताच्या लीलेचे दर्शन दिसू लागले की साधकाचे मन अवर्णनीय आनंदाने भरुन जाते. स्वतःच्या भोवताली होत असलेल्या सर्व गोष्टींत त्याला देवाचा हात आहे असे स्वसंवेदनांनी जाणविते. भगवंताच्या ह्या साक्षात्काराचे कारण त्याला शोधूनही सापडत नाही. मन आणि बुध्दीच्या पलीकडून त्याला जाणीव झालेली असते की आपल्याबरोबर सतत भगवंताचे अस्तित्व आहे. ही गोष्ट दुसऱ्याला सांगायला त्याच्याकडे शब्द नसतात. तो फक्‍त हे जग किती सुंदर आहे असे वारंवार म्हणू लागतो व परत परत भगवंताचे नाव घेत त्याच्या प्रेमात संपूर्ण बुडुन जातो. अशा भक्‍ताबद्दल भगवंताला सुध्दा अतिशय आपुलकी वाटते. त्याच्या सहवासाकरीता भगवान कुठलेही कष्ट सहन करु शकतो. (म्हणूनच नाथांच्या घरी पाणि भरण्याचे काम करायला श्री विठ्ठलाला काहीही दिक्कत वाटली नाही.) श्री ज्ञानेश्वरीत भगवंत आणि व्यावहारीक जग यात फरक न पाहण्याच्या क्रियेला अव्यभिचारी भक्‍ती असे नाव दिले आहे. अशा अव्यभिचारी भक्‍ताबद्दल भगवंताच्या मनात असलेल्या प्रेमाचे वर्णन वरील ओव्या करीत आहेत. भगवंत म्हणत आहेत: `एकवेळ मी वैकुंठातही सापडणार नाही वा योगी लोकांच्या एकाग्रतेलाही मी महत्व देणार नाही. पण माझ्या गुणांची सतत जाणीव होत असल्याने जे महाभाग कुठल्याही परिस्थितीत माझी स्तुती करीत आनंदीत आहेत त्यांच्या जवळ मी निश्चित सापडेन.’

 

भगवंत आणि त्याचे नाम यात तिळमात्र फरक नाही

 

परमेश्वराच्या प्राप्ती करीता अनंत मार्ग आपणांस उपलब्ध आहेत. त्या सर्व मार्गांमध्ये भक्‍तीमार्ग हा सर्वात सोपा असे अनेक संतांनी सांगितलेले आढळून येते. कलियुगात मानवाचे जीवन अल्प आहे व इंद्रियसुखाची ओढ नैसर्गिक आहे. त्यामुळे आपणांस भगवंताकडे लक्ष द्यायला फार वेळ मिळत नाही. तेव्हा साधना सहज आणि सोपस्कार रहीत असलेली उत्तम असा विचार करुन भगवंताचे नाम घेणे हा भक्‍तीमार्ग अनेक संतांनी उपदेशिला आहे. आज निरुपणाला घेतलेल्या ओवींतून श्री ज्ञानेश्वर महाराज हाच आदेश आपणांस देत आहेत. तुम्ही फक्‍त भगवंताचे नाव घेत रहा मग विनासायास भगवंत तुमच्याकडे स्वतःच्या इच्छेने धावत येईल असे ते आपणांस सांगत आहेत. थोडक्यात म्हणजे निरंतर देवाचे नाव घेत राहणे हा आपल्या सर्व दुःखांवरचा रामबाण उपाय आहे असे माऊली म्हणत आहे. परंतु आपले मन अत्यंत विचित्र आहे. आपणांस आयुष्यभर सतावत असलेल्या काळजीचे, पुढे काय़ होणार आहे या चिंतेचे एवढे सोपे निराकरण पाहून आनंद व्हायच्या ऐवजी आपल्या मनात संशयच निर्माण होतो. आपण अर्जुनासारखेच

 

जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगीं घालिती उडी ।

ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं ॥५४:९॥

 

असे उद्‌गार काढतो! आपल्याला पीडणाऱ्या भवरोगा पासूनची सुटका एवढी सोपी असली तर आत्तापर्यंत सर्वजन मुक्‍त होऊन भगवंताचे नाव घेत आनंदात राहीले असते अशी शंका मनात येते. अशा शंकेचे परिणाम फार दारुण असतात. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याने भरलेल्या पात्राच्या बुडाला अगदी छोटे छिद्र जरी असले तरी कालांतराने ते पात्र पूर्ण रिकामे होते त्याचप्रमाणे आपल्या मनात आपल्या साधनेबद्दल थोडीशी जरी शंका असली तरी त्या साधनेचा परिणाम हळूहळू कमी व्हायला लागून शेवटी आपली स्थिती परत `येरे माझ्या मागल्या’ अशीच होते. स्वतःच्या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही हे लक्षात आल्यावर आपला नाम घेण्याच्या मार्गाच्या उपयुक्‍ततेबद्दलचा संशय अजूनच वाढतो. ह्या दुष्टचक्रातून सुटका व्हायला आपण आपल्या बुध्दीचा उपयोग केला पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे असे निःसंदेह जाणून घेणे की भगवंताचे नाम आणि भगवंत यात काहीही फरक नाही. संदर्भ म्हणून पुराणातील खालील कथा बघा. एकदा सत्यभामेच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की आपण भगवान श्रीकृष्णांची सुवर्णतुला करावी. आपल्या वडीलांकडून अपार सुवर्णाच्या राशी आणून तीने श्रीकृष्णांना एका पारड्यात बसविले व दुसऱ्या पारड्यात सोने भरण्यास सुरुवात केली. कितीही सुवर्ण घातले तरी तराजू तीळमात्र हलायला तयार नाही हे बघून श्री सत्यभामेला काय करावे सुचेना. शेवटी तीने रुक्मिणीची मदत मागितली. इतका बाजूला बसून शांतपणे गंमत बघणाऱ्या रुक्मिणीने एका तुळशीच्या पानावर कृष्ण असे लिहिले आणि ते पान सुवर्ण भरलेल्या पारड्यात टाकले. त्याचक्षणी श्रीकृष्ण ज्यात बसले आहेत ते पारडे वर उचलले जाऊन तुला पूर्ण झाली. या गोष्टीमधील तुला पूर्ण होणे म्हणजे भगवंताची प्राप्ती होणे, सत्यभामेने घातलेले सुवर्ण म्हणजे आपले व्यावहारीक जगातील प्रयत्‍न असे आपण मानू शकतो. कितीही सुवर्ण घातले तरी तुला तसूमात्र हलली नाही म्हणजे आपल्या प्रयत्‍नांतून भगवंताची प्राप्ती होण्याची सुतराम शक्यता नाही. व्यावहारीक दृष्ट्या तुळशीच्या पानाला काहीही महत्व नाही. तेव्हा त्यावर नाम लिहील्यावर तुला पूर्ण होणे म्हणजे संपूर्णपणे शरणागती पत्करुन परमेश्वराचे नाम घेतल्यावर साधना फलश्रुतीला येणे होय.

ज्या लोकांचा पुराणातील कथांवर फारसा विश्वास नाही त्यांनी विचार करावा की जगात सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्या मनात शब्दरुपाने आहे. कावळा ह्या शब्दाने आपल्या मनात त्याचे रुप, त्याचा कर्कश आवाज इत्यादी वैशिष्ट्ये जागृत होतात. आई या शब्दातच स्वतःच्या जीवनातील आईबरोबरचे जिवलग क्षणांची आठवण जागृत होते. त्याचप्रमाणे श्रीराम असे म्हटल्याक्षणी आपल्या मनात श्री रामचंद्रांच्या आपल्याला आवडलेल्या पैलूची आठवण जागृत होते. आपल्या आठवणींच्या रुपात ते आपल्या जवळ येतात. ज्या नामाच्या उच्चारणाने ते आपल्या जवळ आलेले आहेत त्या नामात आणि त्यांच्या जवळीकीत काहीही फरक नाही हे लगेच आपणांस जाणवेल. अशा रीतीने आपण चिंतन आणि मनन करुन स्वतःची संपूर्ण खात्री करुन घेतली पाहिजे की नामात आणि भगवंतांमध्ये काडीचाही फरक नाही.

 

जेवढी भक्‍ती तेवढी मुक्‍ती!

 

आता तुम्ही म्हणाल की माझी संपूर्ण खात्री पटली आहे की नाम हे भगवंताचेच रुप आहे. परंतु मी इतक्यावेळा मनापासून नाम घेतले आहे तरी माझ्यामध्ये फार फरक पडलेला दिसत नाही. म्हणजे एकतर साधनेत प्रगती झालेली नाही किंवा माझी झलेली प्रगती माझ्या दररोजच्या वागण्यात बघण्यात माझी चुक होत आहे. याचे उत्तर असे आहे की आपली परमार्थातील प्रगती दैनंदिन व्यवहारातील आपले वर्तन बघण्यात काहीही चुकी नाही. उलट खऱ्या प्रगतीची निशाणी आपले नेहमीचे वागणे बदलले आहे की नाही यातच आहे. तेव्हा दैनंदिन वर्तन बदलले नसले तर खरी प्रगती झालेली नाही हा तुमचा समज योग्यच आहे. मग प्रगती का होत नाही याचे उत्तर काय?

आधी हे लक्षात घ्या की प्रगतीचे मोजमाप करण्याचे आपले मानदंड अत्यंत ढोबळ असतात. सूक्ष्म नसतात. त्यामुळे आपली प्रगती सूक्ष्म झालेली असली तर ती स्वतःला कळतेच असे नाही. असे बघा की ग्रीष्मकाळी अरबी समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन कधी होते हे आपणांस बंगलोरमध्ये बसून कळत नाही. परंतु नंतर येणाऱ्या वर्षाऋतुत पाण्याने ओथंबणारे ढग पाहून आपण बाष्पीभवनाची क्रिया झाली असणार याची कल्पना करु शकतो. त्याचप्रमाणे सध्या आपली साधनेतील प्रगती स्वतःच्या व्यवहारातील वागण्यात सध्या दिसत नसली तरी ती सूक्ष्मरुपाने होत असण्याची शक्यता आहे. नंतर काहीकाळाने वागण्यात फरक पडला की जाणवेल की प्रगती होत होती. ज्याप्रमाणे दूरवरील मेक्सिकोच्या तटावरील `एल नीनो’ प्रवाहाच्या जोरामुळे बंगलोरमधील पावसाळा दुरावण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे स्वतःला विस्मरण झालेल्या आपल्याच पूर्वकर्मांच्या फलश्रुतीमुळे आपले व्यवहारात वागणे बदलायला उशीर होऊ शकतो. पण म्हणून मनाच्या धारणेत झालेला बदल नष्ट होत नाही. जमिनीत बी पेरल्यावर ते कितीही उत्तम असले तरी लगेच पीक येत नाही. ते रुजून रोप फुटेपर्यंत बी उत्तम आहे की नाही याची काळजी शेतकरी करीत नाही त्याप्रमाणे आपण संयम दाखविला पाहिजे. तेव्हा प्रगती होत नाही असे स्वतः म्हणणे बरोबर नाही. सद्‌गुरुंनी दाखविलेल्या वाटेवर चालून प्रगती होणार नाही हे अशक्य आहे यावर विश्वास ठेवा व आपली साधना निःसंदेह चालू ठेवा.

दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे आपली नामसाधना ही मध्यम प्रतीची असते म्हणून आपली प्रगती दिसायला वेळ लागतो. उत्तम प्रतीची भक्‍ती कशी असावी याबाबत विचार केला तर असे दिसून येईल की श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत

 

कैसे माझ्या गुणी धालें । देशकाळाते विसरले ।

कीर्तनसुखें सुखावले । आपणपांचि ॥ २०९:९ ॥

 

आपण आपले नाम असे घेत आहोत का? तुमची खरी प्रगती व्हायला देवाचे नाव घेताना संसाराचे आपणांस विस्मरण होते का याचा विचार आपण केला पाहिजे. आपण तोंडाने देवाचे नाव घेताना हाताने खाणाखुणा करुन दुसऱ्यांशी संभाषण चालूच ठेवतो आणि परत प्रगती का झाली नाही असा विचार करतो! या दोन गोष्टींमधील विसंवाद लक्षात घ्या. आधी मनापासून नाव घ्यायला शिका आणि मग प्रगतीचा विचार करा. मनापासून नाव घेणे याचा एकच मानदंड माऊलींनी आपणांस दिलेला आहे. तो म्हणजे देवाच्या नावात गुंग होऊन जगाला विसरणे. श्री गोरोबा कुंभारांना जगाचे इतके विस्मरण झालेले होते की स्वतःचे नाजुक बाळ पायाखाली आलेले आहे याचीही जाणीव त्यांना नव्हती. भगवंत त्यांच्याजवळ सतत होता यात काय नवल आहे? श्री बाबा महाराज वैद्य हे श्री स्वामी स्वरुपानंदांचे गुरु होते. ते नेहमी म्हणायचे की `जेवढी भक्‍ती तेवढी मुक्‍ती’. त्यांचे हे वाक्य स्वतःच्या मनावर कोरुन ठेवा. मग आपल्या भक्‍तीमार्गावरील विश्वास उडायला लागला की ते आपोआप आठवेल व तुमच्या मनावरची संभ्रमाची जळमटे साफ करुन टाकेल. खरी गोष्ट अशी आहे की आपण आपले व्यावहारीक जगातील अस्तित्व सांभाळूनच साधना करीत असतो. कितीही गडबड असली तरी आंघोळ उरकल्याशिवाय आपण घराबाहेर पडत नाही (नाहीतर लोक काय म्हणतील?!) पण आंघोळीनंतरचे आपले नामस्मरण वेळेच्या अभावामुळे न करण्यास आपणांस संकोच वाटत नाही! जोपर्यंत आपल्या आयुष्यात ह्या दोन गोष्टींचे महत्व उलटे होत नाही तो पर्यंत आपण श्री ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेली भक्‍ती केलेलीच नाही असे मानण्यास हरकत नाही. आणि जर खरी भक्‍तीच केलेली नाही तर मुक्‍ती कुठून येणार?!!

वरील सर्व विवेचनावरुन हे स्पष्ट होईल की भगवंताचे नाम सतत घेण्यात आपले सुख दडलेले आहे. परंतु स्वतःला त्या सुखाची जाणीव होण्याकरीता एक म्हणजे आपण ते नाम संपूर्ण निष्ठेने घेतले पाहिजे आणि व्यवहारातील आपले कुठल्याही कर्मांला नाम घेण्यापेक्षा अधिक महत्व न देता एकाग्रतेने घेतले पाहिजे. वरील दोन नियम न पाळता नाम घेतले तरी आपली प्रगती होईलच पण ती स्वतःला दिसेलच याची खात्री देता येत नाही. आपण `मला खऱ्या भक्‍तीची चुणुक ह्या जन्मातच दाखव’ अशी भगवंताकडेच प्रार्थना करुया. मग एखादी पारंपारीक कला ज्याप्रमाणे वडील आपल्या मुलाला शिकवून त्याला त्या कलेत निपुण करतात तसे स्वतः भगवंत आपल्याला त्याचे नाम कसे घ्यावे हे शिकवेल! नाहीतर आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आपण एकनिष्ठेने नाम कधीतरी घेऊ शकतो का?!

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा(40+41)/9:

Are we fit enough for knowledge?

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

यालागी सुमनु आणि शुध्दमति । जो अनिंदकु अनन्यगति ।

पैं गा गौप्यहि परी तयाप्रति । चावळिजे सुखे ॥ ४०:९ ॥

 

तरी प्रस्तुत आता गुणीं इहीं । तूं वांचून आणिक नाहीं ।

म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपवूं नये ॥ ४१:९ ॥

 

गीतेच्या नवव्या अध्यायावर आपली टीका सुरु करतानाच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी `अवधान एकले दीजे । मग सर्वसुखासी प्राप्त होईजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥१:९॥’ असे म्हणून स्वतःच्या मनात ह्या अध्यायाबद्दल असलेला आदर दर्शविला आहे. ह्या अध्यायातील पहिल्या श्लोकातच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात: `मी आता तुला सर्वांत गुह्यतम गोष्ट उघड करुन दाखविणार आहे’. ह्या श्लोकावरील ज्ञानेश्वरीतील विवेचनामधील दोन ओव्या आज आपण निरुपणाला घेतल्या आहेत. त्यांचा अर्थ असा आहे: `ज्या माणसाचे मन शुध्द व बुध्दी निर्मळ असते, जो दुसऱ्याची निंदा न करीता आपल्या (भगवंतप्राप्तीच्या) ध्येयाकडे सतत नजर ठेवून असतो त्याला आपल्या मनातले गुपित सांगायला अजिबात हरकत नाही. अर्जुना, तू तर ह्या गुणांचा पुतळाच आहेस म्हणून माझ्या मनातील गुढ गोष्ट तुला काहीही न लपविता सांगतो.’

 

परमार्थातील गूढ आपणांस केव्हा कळेल?

 

एखाद्या गुरुंचे अनेक शिष्य असले तरी आपणांस असे दिसून येते की त्यामधील काही जणांची प्रगती फार लवकर होते तर बहुतेक शिष्यांना आपल्या गुरुंच्या शिकवणुकीचा खरा अर्थ कळायला वेळ लागतो. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की माझ्या शिष्यांमध्ये ब्रह्मानंदांना राम नाम कसे घ्यावे हे लगेच कळले आणि म्हणून त्यांची प्रगती झटपट झाली. श्री रामकृष्ण परमहंसांच्या अनेक शिष्यांमध्ये स्वामी विवेकानंदांना जसा त्यांच्या शिकवणुकीचा बोध झाला तसा इतर कुणालाही झाला नाही. त्यांचेच एक ख्यातनाम शिष्य श्री महेंद्रनाथ गुप्तांना, ज्यांनी `एम’ ह्या नावाखाली आपले साहीत्य लिहिले आहे त्यांना, विवेकानंदांच्या सामाजिक कार्याबद्दल अजिबात ओढ नव्हती. रामकृष्ण मठाच्या स्थापनेनंतर सुरुवातीला ते म्हणायचे की ठाकुरांनी (म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांनी) आधी स्वतःची अध्यात्मिक प्रगती करा आणि मग समाजाकडे लक्ष द्या असेच सांगितले आहे. आपल्या मठातील साधूंनी कायम साधना केली पाहीजे, सामाजिक कार्य आत्मबोध झाल्यावर करा. याउलट स्वामींना पूर्ण खात्री होती की सर्वांभूती परमेश्वर पहायचा असेल तर त्याकरीता दिवसाचे चोवीस तास साधना करण्यापेक्षा दररोज ठराविक काळ आपली साधना करुन उरलेला वेळ लोकोध्दारात घालविणे हेच श्री रामकृष्ण परमहंसांच्या उपदेशाचे सार आहे. असा काही काळ गेल्यावर `एम’ना स्वामींच्या मार्गाच्या योग्यतेची पूर्ण खात्री पटली. एकदा ते वाराणशीला गेलेले असताना तेथील रामकृष्ण मठाचे होत असलेले सामाजिक कार्य बघून त्यांनी कबूल केले की मठाच्या सामाजिक कार्यातसुध्दा त्यांना ठाकुरांचाच हात दिसून येतो. या गोष्टीचा अर्थ असा आहे की एकाच गुरुंच्या वेगवेगळ्या शिष्यांना आपल्या गुरुंच्या शिकवणुकीचा भिन्न अर्थ लागलेला असतो. `एम’ सारख्या शिष्यांनासुध्दा पूर्ण बोध होणे कठीण असेल तर आपल्यासारख्यांची गोष्टच करायला नको!

हे असे का होते? ठराविक माणसांना जगातील सर्व गोष्टी सोप्या वाटतात, त्यामागील कार्यकारणभाव सहजतेने आकलन होतो तर बहुतांशी लोक नवीन गोष्टीला लवकर समजून घेऊ शकत नाहीत या वस्तुस्थिती मागे काय कारण असू शकेल? काही लोकांना मिळालेली देवदत्त देणगी असे म्हणून आपण या शंकेचे निराकरण केले तर आपल्या हातात काहीच उरत नाही. पूर्वकृतांमुळे जन्मापासूनच आपण काही समजायच्या पात्रतेचे नाही असे मान्य केले तर स्वतःचे प्रयत्‍न सुरु करायच्या आधीच आपण बाजी हारलेले असतो. मनात असे निराशावादी विचार न आणता आपण या गोष्टीवर शांतपणे विचार केला पाहीजे. ज्या भाग्यवान माणसांमध्ये काही गुण उपजतच असतात ते सध्या आपल्यात दिसले नाहीत तरी स्वकष्टाने ते आपण अंगात बाणवू शकलो तर काही काळाने का होईना, पण कधीतरी गूढ आपल्याला कळायची शक्यता आहे. वरील ओवींमध्ये कुठले गुण आपणांस प्राप्त झाले की भगवान श्रीकृष्ण स्वतः गीता आपल्याला समजावून सांगावयास धावतील हे स्पष्ट केले आहे. ज्या माणसाचे मन साफ आहे, बुध्दी शुध्द आहे, जो दुसऱ्याची निंदा करीत नाही व एकाग्रतेने आपल्या ध्येयाकडे बघतो त्याला प्रत्यक्ष माऊलींचा आधार आहे हे ह्या ओवींवरुन आपण ध्यानात घेतले पाहीजे. तेव्हा आपणांस परमार्थातील गूढ स्पष्ट दिसायला हवे असेल तर आधी आपण आत्मपरीक्षण करुन आपल्यामध्ये हे गुण आहेत की नाही हे प्रामाणिकपणे बघितले पाहीजे. हे गुण आपल्यात नसतील तर गुरुंनी दाखविलेल्या ज्ञानाची आपल्या जीवनातील प्रतिमा डागाळलेली असण्याची शक्यता अधिक आहे. असे बघा, आपण जेव्हा गावात लागलेल्या मेळ्यातील विचित्र आरसे असलेल्या तंबूत जाऊन स्वतःची प्रतिबिंबे बघतो तेव्हा प्रत्येक आरशामध्ये आपल्या शरीराचे एक वेगळेच दर्शन आपणांस होते. ज्याप्रमाणे एकाच शरीराचे वेगवेगळ्या दर्पणांतील रुप भिन्न असते त्याचप्रमाणे एकाच गुरुंच्या एकाच शिकवणुकीचे भिन्न शिष्यांच्या मनातील प्रतिबिंब भिन्न असते. विचार करा की गुरुंच्या हातात काय आहे तर त्यांना प्राप्त झालेले खरे ज्ञान आपल्या वर्तणुकीने लोकांना दाखविणे. त्यांच्या वर्तनाचा आपण कसा अर्थ काढू यावर आपली प्रगती अवलंबून आहे. आपल्या अर्थ काढण्याच्या प्रक्रीयेत मन आणि बुध्दीचा उपयोग होतो व मनाच्या एकाग्रतेने आपल्या प्रयत्‍नांमध्ये सातत्य येते, परनिंदा करण्यामध्ये आपली जी शक्‍ती खर्च होते, मनाच्या एकाग्रतेचा जो भंग होतो तो दुसऱ्या कुठल्याही कर्म करण्याने होत नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण वरील ओवीत वर्णन केलेल्या गुणांनी युक्‍त असलेल्या अर्जुनाकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतात.

 

गुरुवाणीचे बीज आपल्यात कसे रुजेल?

 

आता प्रश्न असा उद्‌भवतो की आपल्यामध्ये मनाची निर्मळता कशी आणावी? आपल्या बुध्दीला लागलेली जळमटे कशी साफ करावी? ठीक आहे, आपल्यामध्ये हे गुण जन्मजात असलेले दिसून येत नाहीत. पण म्हणून हात गाळून निराश होण्यापेक्षा स्वतःच्या कुठल्या प्रयत्‍नांनी आपण हे गुण आत्मसात करु शकतो हे आपण बघितले पाहीजे. जाणविण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे हे दोन्ही गुण आपल्याला संसारातील कुठली गोष्ट प्राप्त करुन मिळण्यासारखे नाहीत. विचार करा की कुठल्या दुकानात जाऊन तुम्ही मन शुध्द करु शकता वा बुध्दी निर्मळ करु शकता? आपले प्रयत्‍न व्यावहारीक असून उपयोग नाही हे कळल्यावर आपल्या साधना न करण्याबद्दलच्या अर्ध्या सबबी नष्ट होतात! पाहीजे तेव्हा गुरुंचे दर्शन होत नाही, जवळ पैसे नाहीत, जवळच्या माणसाच्या भवितव्याची काळजी लागलेली आहे, संसाराचा व्याप मागे लागला आहे इत्यादी कारणे देऊन आपण साधना करण्यापासून मुक्‍तता मिळवू शकणार नाही हे ध्यानात घ्या. आत्ता आहे त्या परीस्थितीत आपल्याला साधना करता येते ह्याची पूर्ण जाणीव साधकाला होणे अत्यावश्यक आहे. अशा खात्रीमध्येच त्याच्या अथक प्रयत्‍नांचे बीज रोवलेले असते. तेव्हा स्वतःला आधी पटवून द्या की साधना केली नाही तर कुठलीही सबब आपण देऊ शकणार नाही.

मनाचा असा निर्धार झाला की आपण `सुमनु’ आणि `शुध्दमति’ व्हायचा खरा प्रयत्‍न करु शकतो. स्वतःची सारासार विचार करण्याची शक्‍ती हे आपल्या हातातील साधन आहे. आपल्या कुठल्या अपेक्षा रास्त आहेत आणि कुठल्या न ठेवणे योग्य आहे हे सतत बघण्याचा विवेक मनात जागृत ठेवणे ही आपली साधना आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या विवेकाबद्दल अनेक ठिकाणी गौरवोद्गार काढले आहेत. दोन उदाहरणे द्यायची झाली तर बघा `मज ह्रुदयी सद्‌गुरु । जेणे तारीलो संसारपुरु । म्हणौनि विशेषे अत्यादरु । विवेकावरी ॥२२:१॥’ आणि `तरी गुरु दाविलियां वाटां । येऊनि विवेकतीर्थतटां । धुवूनि मळकटां । बुध्दीचा तेणे ॥१०११:१८॥’. प्रामाणिकपणे स्वतःच्या इच्छांकडे बघून त्यांची योग्य व अयोग्य अशी सतत वर्गवारी करीत राहणे निश्चितपणे आपल्या हातात आहे. परंतु असे शक्य तितक्या तटस्थपणे स्वतःकडे बघताना दोन नियम पाळणे जरुरी आहे. (नियमांशिवाय एखादा मार्ग अस्तित्वात असलेला दिसत नाही!!) त्यातील पहिला नियम म्हणजे काल एखादी इच्छा बरोबर आहे असे आपण ठरविले तरी आज तीच इच्छा उद्‌भविल्यावर परत नवीन निर्णय घ्यावा लागतो याची जाणीव ठेवणे. उदाहरणार्थ, काल खूप काम करुन दमून आल्यावर घरच्या कामात मदत न करणे योग्य वाटले तरी आज अंगावर काम कमी पडले असेल तर घरी मदत न करणे योग्य नाही!!

खरी गोष्ट अशी आहे की आपले अस्तित्व दरक्षणी इतके वेगळे असते की कालचा निर्णय आज आपल्याला लागू होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. आपण स्वतःला एका साच्यात घालून ठराविक प्रतिमेत जगायचा प्रयत्‍न करीत असतो म्हणून स्वतःचे नित्यनूतन रुप आपल्या ध्यानात येत नाही. तेव्हा दरक्षणी सद्यपरीस्थितीचे ध्यान ठेवून स्वतःच्या विचारांकडे बघणे जरुरी आहे.

विवेक जागृत ठेवून आयुष्य जगताना ध्यानात ठेवायची दुसरी गोष्ट, दुसरा नियम, म्हणजे `ठीक आहे, मला कळले कुठल्या इच्छा चुकीच्या आहेत. मग पुढे काय करु?’ हा विचार मनात न येऊन देणे. लक्षात ठेवा की आपल्या इच्छांची वर्गवारी करणे हेच आपले ध्येय आहे! ती वर्गवारी करुन आपल्याला पुढे काहीही मिळवायचे नाही. तुम्ही फक्‍त चांगल्या इच्छांनाच जाणूनबुजून प्रोत्साहन द्यायचे नाही की अयोग्य इच्छांना टाळायचे नाही. आपोआप तुमच्या मनात जे विचार येतील त्यांना कुठलेही वळण द्यायचा प्रयत्‍न आपल्याला करायचा नाही तर फक्‍त कुठले विचार येतात हे जाणून घ्यायचे आहे. एखादा सूर्यास्त बघताना त्यामध्ये काळा ढग आला तरी आपण शांतपणे बघतो तसे स्वतःच्या मनाकडे बघायला आपण शिकले पाहीजे. आपल्यात जर खरा मूलभूत बदल व्हायचा असेल तर तो आपोआपच होतो, स्वतःच्या प्रयत्‍नांनी झालेला बदल आपल्या स्वतःच्या कल्पनांवरच आधारीत असल्याने मूलभूत नसतो. फक्‍त बघत बसण्याने माझ्या मनात व बुध्दीत कसा फरक होईल असा विचार न करीता तुम्ही नुसते स्वतःकडे बघत रहा. काही काळाने तुम्हांला आपोआप जाणवेल की तुमच्यात बदल पडलेला आहे. तुम्हाला स्वतःलाच याबद्दल आश्चर्य वाटेल. हे कधी झाले असा विचार तुम्ही करु लागाल. तुमच्या ह्रुदयातील सद्‌गुरु हा बदल घडवून आणत असतात. आपल्या कल्पनेच्या बाहेर स्वतःला बदलवायचे असल्याने हा एकच मार्ग आपणांस उपलब्ध आहे. माऊली म्हणते की `जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो । स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनी ॥१०:१८॥’. आपल्या आत्मरुपात स्थित असलेले सद्‌गुरु आपल्याला बदलायचा, भगवंताच्या जवळ न्यायचा सतत प्रयत्‍न करीत आहेतच. स्वतःच्या तटस्थतेमुळे आपण त्यांना हा बदल घडवून आणायला पूर्ण वाव देतो इतकेच.

तेव्हा, स्वतःमध्ये गीतेतील परमार्थाचे पूर्ण ज्ञान होण्यास आवश्यक असे गुण नाहीत याबद्दल खंत न करीता आपण स्वतःकडे तटस्थपणे बघायचा विवेक जागृत करुया. यामुळे आपले मन आपोआप साफ होईल व बुध्दी निर्मळ होईल. मग पुढची प्रगती करायला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण धावून येतील यात शंका नाही.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा225/9:

Taming of the Ego

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखां ।

तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५:९ ॥

 

ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात गुरु भक्‍तीच्या मार्गाने चालून साधनेचे ध्येय गाठणाऱ्या साधकांची अवस्था कशी होते ते दर्शविणारी वरील ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की ` ज्याप्रमाणे फळांनी लगडलेली झाडाची फांदी सहजतेने, नैसर्गिक नियमाने लवते, त्याचप्रमाणे हे ज्ञानी भक्‍त (ज्ञानप्राप्ती झाल्यावर) आपोआप या जगातील सर्व प्राणीमात्रांपुढे विनम्रपणे वागतात.’

 

अहंकारवृध्दीची कारणे

 

आधुनिक जगात स्वतःचीच प्रौढी मिरविल्याशिवाय समाजात मान मिळत नाही असे आपल्याला दिसते. थोड्या काळापूर्वीच समाजात शांत राहून एखादी विद्या प्राप्त करणाऱ्याला जेवढा मान मिळत असे तेवढा मान तर सोडाच पण त्याच्या एकाग्र साधनेबद्दल कौतुकसुध्दा आजकाल होत नाही. अशा माणसाचे कौतुक होण्याकरीता त्याला आपल्या साधनेतून सन्मान वा पैसा मिळविणे जरुरी असते. व्यवहारात स्वतःच्या कर्तुत्वाचा डांगोरा न पिटणाऱ्या माणसाचे कौतुक तर सोडाच, उलट त्यात काहीतरी दोष असला पाहीजे, नाहीतर एवढा शांत कसा राहीला असता ह्या दृष्टीकोनातूनच समाज बघायला लागला आहे. त्यामुळे ज्ञानप्राप्ती झालेल्यावर स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल अहंकार येण्याऐवजी अंगी नम्रता कशी येईल असा प्रश्न मनात उद्‌भवणे साहजिक आहे. त्याचे उत्तर देण्याआधी आपण आधी अहंकार उत्पन्न कसा होतो याबद्दल विचार करु.

खरे म्हणजे अनादीकाळापासून चालत आलेल्या आपल्या सनातन धर्मात मनुष्याच्या स्वभावातील विनय या गुणाला अतिशय महत्व दिलेले आहे. आपल्या गुरुकुल पध्दतीमध्ये शिष्याच्या मनात गुरुंबद्दल आदर व स्वतःच्या गुणांबद्दल विनय असणे अत्यावश्यक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर राखून आपण कितीही वागायचे ठरविले तरी भोवतालच्या समाजातील रीतींचा प्रभाव आपल्या नकळत आपल्यावर होत असतो. पाश्चिमात्य पध्दतीच्या विचारांवर जीवनशैली उभारण्याचा एक परीणाम म्हणजे स्वकष्टार्जित प्राप्तीबद्दल अभिमान असणे; झालेल्या प्राप्तीत आपल्या कर्मांखेरीज दुसरी अदृश्य कारणे असू शकतील हे न मानणे होय. समाजातील बहुतांशी माणसे अशी विचारपध्दती ठेवत असल्याने त्याचा आपल्यावर परीणाम होतो. कोळसा ठेवलेल्या खोलीत सतत आपला वावर असला तर आपण कितीही सावधानता ठेवली तरी काळे डाग अंगावर पडल्याशिवाय रहात नाहीत तशीच ही गोष्ट आहे. आपण नेहमीच स्वतःच्या वागण्याबद्दल विचार करताना समाजातील चार माणसे ह्या परीस्थितीत कशी वागली असती असा विचार करुनच निष्कर्ष काढतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात: `एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्म ठेविती । तें चि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥१५८:३॥’. म्हणून आपल्याहातून घडलेल्या उत्तम कर्मांबद्दल अहंकार ठेवणे योग्य आहे अशी समजूत होण्यास सर्वप्रथम कारण म्हणजे आपल्या कर्मांखेरीज दुसऱ्या कुठल्याही कारणांचे अस्तिव न मानणे होय.

परंतु समाजातील सर्वच लोकांना आपल्या कर्तुत्वाचा गर्व होत नाही. आपण काहीतरी चांगले व जगावेगळे कर्म केले आहे याची जाणीव होणे अहंकाराने मान ताठ व्हायला अत्यावश्यक आहे. म्हणून अहंकाराची वृध्दी होण्यास अजून दोन कारणे म्हणजे आपल्या कर्तुत्वाने आपण काही जगावेगळे प्राप्त केले आहे याची जाणीव व त्याचबरोबर आपली ही प्राप्ती जगातील अनेक लोकांकडे हवीशी असूनसुध्दा नाही याची खात्री. असे बघा की एखाद्या सर्कसमध्ये दोरीवरील कसरत करणाऱ्याने वा अनेक चेंडूंबरोबर खेळ करणाऱ्या विदूषकाने अनेक वर्षे अथक प्रयत्‍न करुनच त्यांची विद्या प्राप्त केली असते. परंतु त्यांना हे पूर्ण ठाऊक असते की जगातील फार थोड्या लोकांना ह्या विद्येची खरी कदर आहे. त्यामुळे त्यांनी जगावेगळी कला प्राप्त करुनदेखील त्यांना गर्व होत नाही. परंतु गुरुकुलात राहून गायनकला शिकलेल्या उच्चप्रतीच्या गायकाला जी कला प्राप्त झालेली असते ती एकतर खूप कमी जणांकडे असते आणि प्रत्येकालाच आपल्याला चांगले गाता आले असते तर किती बरे झाले असते असे वाटत असते. एवढेच नव्हे तर त्या गायकालासुध्दा ह्या गोष्टीची जाणीव असल्याने त्याचा अहंकार वाढतो. हीच गोष्ट श्रीमंत माणसांबद्दल सांगता येते. म्हणूनच आपल्याला स्वतःची प्रौढी न मिरविणारा गायक वा श्रीमंत मनुष्य क्वचितच आढळतो.

तेव्हा अहंकारवृध्दीची सर्वसाधारण कारणे पहायला गेल्यास असे आढळते की समाजातील अनेक लोकांना अभिलाषित वस्तू आपल्याकडे आहे पण त्यांच्याकडे नाही याची जाणीव (मग भले ती गायनकलेसारखी एखादी विद्या असो, पैशासारखी स्वकष्टार्जित भौतिक वस्तू असो वा स्वतःच्या सौंदर्यासारखी/ बुध्दीसारखी देवदत्त देणगी असो) असणे जरुरी आहे. स्वतः ज्ञानेश्वरमहाराज तेराव्या अध्यायात असे म्हणतात की `नवल अहंकाराची गोठी । विशेषे न लगे अज्ञानापाठी । सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥ ८२:१३ ॥’. ह्या ओवीतील `सज्ञान’ या शब्दातून अहंकारी गृहस्थाच्या मनातील वरील वाक्यात दर्शवलेली जाणीव सूचित केली आहे असे वाटते.

 

गुरुभक्‍तीने अंगात भिनलेला विनम्रपणा

 

आता आपण असे लक्षात घ्यायचा प्रयत्‍न करु की गुरुभक्‍तीने ज्ञान प्राप्त केलेल्या साधकाकडे नैसर्गिकरीत्या नम्रता का उत्पन्न होते. नम्रतेच्या विरुध्द असलेला जो अहंकार हा गुण आहे त्याला मुळापासून उखडून टाकल्यामुळे जे काही उरते ती केवळ नम्रताच होय. अहंकारवृध्दीची वा त्याची जोपासना होण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता होती ते घटकच अशा साधकाच्या जीवनातून अदृश्य झाल्याने आपोआप अहंकार निघून जातो व नम्रता अंगात भिनते. त्यांचा अंगात विनम्रपणा एवढा मुरलेला असतो की पुढील ओवीत माऊली म्हणते `अखंड अगर्वता होऊनि असती । तयांते विनयो हेचि संपत्ती । जे जयजयमंत्रे अर्पिती । माझ्याचि ठायी ॥ २२६:९ ॥’. त्याच्यातील विनयता हीच त्यांची संपत्ती आहे.

गुरुभक्‍तीमध्ये शारीरीक व मानसिक असे दोन ढोबळ भाग आपण पाडू शकतो. पहिल्या भागात गुरुंची शारीरीक सेवा करणे येते तर दुसऱ्या भागात गुरुवचनाप्रमाणे वर्तन करणे येते. शारीरीक सेवा सिमीत असते. जोपर्यंत गुरु आपल्याजवळ असतात आणि त्यातूनसुध्दा जेव्हा त्यांना सेवेची जरुरी असते तेव्हाच आपण त्यांच्या देहाची सेवा करु शकतो. कितीही प्रेमाने अशी सेवा केली तरी त्यांच्या अनुपस्थितीत आपण कसेही वर्तन केले तरी आपल्याला त्यात विरोधाभास आढळत नाही. तेव्हा शारीरीक गुरु-भक्‍ती म्हणजे एखाद्या तीर्थात स्नान करण्यासारखे आहे. अशा अर्थाने की स्नान करताना सर्व पापांचा नाश झाला तरी तीर्थकुंडातून बाहेर आल्यावर परत सर्व दोष अंगात भिनतातच!! रामकृष्ण परमहंस म्हणायचे `गंगेत स्नान केल्यावर आपला नाश होणार आहे हे पापकर्मांना ठाऊक असल्याने ते स्नानाआधीच गंगाकाठच्या झाडावर चढून बसतात व स्नान करुन बाहेर आल्यावर परत अंगात भिनतात!!’ त्यामुळे असे ध्यानात येते की शाश्वत पापमुक्‍ती हवी असेल तर त्याकरीता आपण स्वतःच्या हृदयातच गंगा उत्पन्न केली पाहीजे. ज्याप्रमाणे योगेश्वर भगवान श्रीशंकरांच्या जटेतच गंगा बांधली आहे त्याप्रमाणे आपल्या नसानसात गुरुआज्ञेचे पालन करणे ही गंगा प्रवाहीत झाली पाहीजे. असा विचार केला तर असे स्पष्ट होते की श्रीगुरुंच्या पवित्र मुखातून उच्चारलेल्या सर्व वचनांचे पालन करणे ही खरी गुरुसेवा होय.

अखंड केलेल्या मानसिक गुरुसेवेने आपोआपच आपल्याला अशी जाणीव व्हायला लागते की स्वतः श्रीगुरुच आपल्याकडून ठराविक कर्मे करवून घेत आहेत. आपल्या कर्मांबद्दल अभिमान तर सोडाच, याउलट आपल्या हातून झालेली कर्मे आपण केलेली आहेत याबद्दलच आपल्या मनात संशय यायला लागतो. अशी खात्री वाटते की एक वेगळी शक्‍ती आपल्यामार्फत काही कर्मे करून घेत आहे. तेव्हा स्वतःच्या कर्मांची जाणीव असणे हा अहंकाराचा एक महत्वाचा पायाच उध्वस्त होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे मनोभावे गुरुआज्ञेचे पालन करुन प्राप्त काय होते तर आपल्या हृदयातील सद्‌गुरुंचे सतत दर्शन. ज्याक्षणी सद्‌गुरुंचे अस्तित्व जाणविते तेव्हाच हे स्पष्ट होते की आपल्या हृदयाप्रमाणेच जगातील यच्चयावत लोकांच्या हृदयात त्यांचे सद्‌गुरु वसत आहेत. ह्या जाणीवेमुळे अहंकाराचा दुसरा पाया म्हणजे `आपण प्राप्त केले आहे ते दुसऱ्या कुणाकडे नाही ही जाणीव’ निघून जाते. आपण दर क्षणी श्वासोश्वास करतो याबद्दल आपल्याला कधीतरी अभिमान निर्माण होईल का? भूक लागल्यावर आपण दररोज भोजन करतो याबद्दल गर्व कुणाला आहे? त्याचप्रमाणे आपल्याबरोबर नित्य सहवास असणाऱ्या सद्‌गुरुंना आपण ओळखले याचा अहंकार होणे शक्य आहे का? खरे म्हणजे सद्‌गुरुंना ओळखणे ही प्राप्ती नसून आपली सहज अवस्था आहे. आपल्या व्यावहारीक विवंचनांमुळे वा आपल्या चुकीच्या दृष्टीमुळे आपली ही सहज अवस्था आपल्यापासून दूर गेली आहे. त्यामुळे ज्या कुणा संताने आपल्या आत्मरुपी स्थित असलेला भगवंत प्राप्त करुन घेतला त्याने काही प्राप्त केले असे नसुन आपल्या आधी जमा केलेल्या सर्व गोष्टींचा त्याग केला असे आहे. म्हणून झालेल्या ज्ञानाचासुध्दा गर्व येणे अशक्य आहे.

आता तिसरी गोष्ट म्हणजे साधकाला अशी संपूर्ण जाणीव होणे की या जगात त्याला मिळालेल्या सद्‌गुरुंबद्दल कुणालाच फारसे स्वारस्य नाही. ज्याप्रमाणे पूर्वकथित उदाहरणातील विदूषकाच्या कलेबद्दल लोक उदासीन असतात त्याचप्रमाणे जगातील फार थोड्या लोकांना आपल्या सद्‌गुरुंबरोबर सतत राहणे पसंत असते. आपण स्वतः असे ऐकलेले असेलच की `अरे तू गुरु केलास? मग आता त्याचे ऐकायला वगैरे लागेल. त्याने काही सेवेची मागणी केली तर? कशाला या उद्योगात पडलास? काय कमी आहे का?’ म्हणजे सर्वसाधारण माणसे असाच विचार करतात की गुरुंकडे का जायचे तर व्यावहारीक जगातील कमीपणा पूर्ण करायलाच जायचे. त्यांच्याकडे जाऊन सद्‌गुरु मिळतील म्हणून जायचे असे सांगितले तर आपल्याला ते वेड्यातच काढायची शक्यता जास्त असते. खालील गोष्टच बघा. श्री रमणमहर्षींच्या काळातील ही गोष्ट आहे. कान्हनगड येथे रामनामावर गाढ विश्वास असणारे रामदास स्वामी होऊन गेले. एकदा त्यांनी जमिनीवर गोल वर्तुळ आखले आणि ते आपल्या शिष्यांना म्हणाले की या वर्तुळात या. तुम्हाला मोक्ष मिळेल. कुणीही पुढे आले नाही! तीन वेळा या घोषणेचा उच्चार करुनसुध्दा जेव्हा कुणीही आपले सध्याचे आयुष्य सोडायला तयार झाला नाही तेव्हा ते म्हणाले की आता मी माझी `ऑफर’ परत घेतली आहे!! खरोखर, जेव्हा प्रत्यक्ष आपले जीवन मूलभूत बदलायचा क्षण येतो तेव्हा किती माणसे व्यावहारीक जीवनाचा त्याग करायला तयार होतील? तेव्हा ज्ञानी साधकाचा अहंकार येण्याचे तिसरे कारणदेखील त्याच्या डोळ्यादेखत नष्ट होते. मग आपोआपच विनम्रता अंगात भिनते.

खरे म्हणजे असा ज्ञानी साधक `पूर्ण फळांनी लगडलेल्या वृक्षासारखा’ समाजाला खरा उपयुक्‍त झालेला असतो. केवळ त्याच्या सहवासाने, त्याने कुठलीही क्रिया न करीता, लोकांना आनंद मिळायला लागतो. त्यांच्या संसारव्यथेतून मुक्‍तता मिळवायचे द्वार म्हणजेच असा परीपूर्ण साधक होय. परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की साधकाच्या ज्ञानी होण्याच्या क्रियेनेच त्याच्या मनातील अहंकार उत्पन्न करणारी कारणे निघून जातात!! ज्याप्रमाणे परीपक्व फळांनी लगडलेली शाखा लवल्यावर लोकांच्या आवाक्यात येते त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या नम्रतेने तो समाजातील सर्वलोकांना हवासा वाटतो. याचे कारण असे की त्याच्या शब्दांत एवढी ताकद आलेली असते की विनम्रता भिनलेली नसती तर लोक त्याच्यापासून दूर राहीले असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची वरील ओवीतील फळझाडाची उपमा नुसती सुंदरच नाही तर सर्वदृष्टीने समर्पक आहे.

आता शेवटची गोष्ट म्हणजे खरे म्हणजे ज्ञान आल्यावर अशी मूलभूत नम्रता प्राप्त होते हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे की अशी नम्रता शरीरातील नसानसात मुरायला खरे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा की याठिकाणी लक्षण व त्या लक्षणाचे कारण एकरुप झालेले आहे. म्हणून स्वतः गुरुभक्‍तीकरुन ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या सर्व साधकांनी आपल्या अंगात किती नम्रता भिनली आहे हे पहावे. स्वतःची खरी प्रगती पाहण्याचा हाच एक उपाय या मार्गावर चालणाऱ्या साधकांना उपलब्ध आहे.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा 333/9:

Look Inside, Not Outside

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

अर्जुना वेदविदु जरी जाहला । तरी माते नेणता वायां गेला ।

कण सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३:९ ॥

 

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की ` अरे अर्जुना एखाद्याला जरी सर्व वेदांचे ज्ञान असले तरी त्याला माझ्या स्वरुपाचे ज्ञान नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ गेले असे समजायला हरकत नाही. नुसता कोंडा कितीही कांडला तरी त्यातून धान्याचा कण निघणे शक्य नसते त्याचप्रमाणे नुसत्या वेदांच्या ज्ञानात जीवनाचे खरे सार्थक होणे अशक्य आहे.’

 

वेदांचे भव्यत्व

 

भारतीय संस्कृतीत वेदांना अनन्यसाधारण महत्व आहे. असे म्हणतात की या जगात वेदांमध्ये नाही अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वातच नाही. एका दृष्टीने पहायला गेल्यास आपणांस असेसुध्दा म्हणता येईल की आपले संपूर्ण जीवन आपण वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी मूर्तरुप करण्यातच व्यतीत करतो! वेदांच्या व्यापकतेचे आकलन होण्यास श्रीगुरुचरित्रातील अध्याय सव्विस बघा. त्यात श्रीगुरु वेदांचे माहात्म्य वर्णन करताना म्हणतात की एकदा भारद्वाज ऋषींनी प्रचंड तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेतले व त्यांच्याकडे `सर्व वेद मला शिकवा’ असा वर मागीतला. त्यावेळी ब्रह्मदेव त्या मागण्याची पूर्तता करण्याची असंभवता स्पष्ट करताना म्हणाले: `मला स्वतःलाच सर्व वेद अगम्य आहेत. याचे कारण काय असे विचारशील तर हे सर्व वेद बघशील तर आपोआप कळेल.’ भारद्वाज ऋषींनी बघितले तर काय, त्यांना तीन उत्तुंग पर्वतांच्या आकाराएवढी वेदपुस्तकांची राशी दिसली व त्या दर्शनाने ते अत्यंत भयभीत झाले. अत्यंत विनम्र होऊन त्यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की आता मला पूर्ण कळून चुकले आहे की सर्व वेदांचे ज्ञान होणे अशक्य आहे. म्हणून ह्या सर्व वेदांचे सार म्हणून तूम्ही जे काही द्याल त्याचा अभ्यास करण्यातच माझे आयुष्य मी घालविन. हे ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्या तीन गिरीसमान राशींतून तीन मुठी वेद त्यांनी भारद्वाज ऋषींना दिले. त्या तीन मुठी वेदांच्या मंत्रजाळाचे सार म्हणून चार वेद तयार करुन ह्यांचा अभ्यास कर असा उपदेश ब्रह्मदेवांनी भारद्वाज मुनींना केला! ही गोष्ट सांगून श्रीगुरु ह्या तीन मुठी मंत्रांचे सार असलेल्या चार वेदांमध्ये काय आहे याची फक्‍त अनुक्रमणिकाच पुढील सव्वा-दोनशे ओव्यात सांगतात!! म्हणजे तीन गिरींसमान राशींतून तीन मुठी ज्ञानाच्या सारांशाचा अभ्याससुध्दा एका माणसाला शक्य नाही हे समजते. वेदांची भव्यता दर्शविणारे दुसरे उदाहरण म्हणजे ज्या व्यासमुनींनी चार वेदांचे भाग केले त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये जे काही घडले आहे वा घडणार आहे त्याबद्दल व्यासांनी आधीच भाष्य केले आहे व त्यांच्या त्या भाष्य करण्याने हे सर्व जग उष्टे झाले आहे. माऊलींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर `… व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७:१॥’.

वरील विवेचनानंतर हे स्पष्ट होते की वरील ओवीत भगवंत असे म्हणत आहेत की या जगात जे काही जाणणे शक्‍य आहे ते सर्व स्वतःच्या करतळावरील डोलणाऱ्या वाटोळ्या आवळ्याला जाणतो तितके स्पष्ट जाणले (म्हणजेच सर्व वेदांचे ज्ञान जरी प्राप्त केले) तरी ईश्वराचे खरे ज्ञान झाले नाही तर आपले जीवन व्यर्थ गेले असेच आपण मानले पाहीजे. म्हणूनच ह्या ओवीचा भावार्थ असा आहे की `तीन लोकांतील कुठल्याही एका गोष्टीत वा गोष्टींच्या समुच्चायाच्या प्राप्तीमुळे माझी प्राप्ती होणार नाही. जगातील वस्तूंमध्येच मला बघण्याचा प्रयत्‍न करणे हे अगदी मूळापासून फोल आहे.’ ज्या साधकांची परमार्थामध्ये प्रगती करण्याकरीता पुस्तके वाचली पाहीजेत, गूढ तत्वज्ञान ऐकले पाहीजे वा योग सामर्थ्य प्राप्त केले पाहीजे अशी समजूत आहे त्यांनी ह्या भावार्थावर जरुर विचार करावा.

 

तुझे आहे तुजपाशी!

 

परमार्थाच्या मार्गावर येण्याआधी जे काही आपण प्राप्त केले त्या सर्वांच्या लाभाकरीता काही अटी लागू होत्या. उदाहरणार्थ, लहानपणी वडिलांकडून हवे ते खेळणे मिळवायला त्यांना खुश करणे जरुरी होते. त्यानंतर मोठे झाल्यावर नोकरी मिळवायला पदवी हवी आणि त्याशिवाय आपल्या भावी वरीष्ठांना प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये प्रभावीत करणे जरुरी होते (किंवा कंपनीच्या मालकाशी ओळख जरुरी होती!!), मनसोक्‍त संसारसुख मिळण्यास पत्‍नीचे मन सांभाळणे महत्वाचे होते. आयुष्यभर आपण असेच बघत आलो आहोत की महत्वाची गोष्ट हवी असेल तर त्याच्या प्राप्तीकरीता ज्या अटी असतात त्या आपण पूर्ण केल्या तरच ती वस्तू मिळू शकते. (कधी कधी तर सर्व अटी सांभाळूनही मनपसंद वस्तू मिळत नाही, परंतु ती एक वेगळीच गोष्ट आहे.) परंतु ईश्वरप्राप्तीकरीता कुठल्याही गोष्टीची वा अनुभवाची आवश्यकता नाही, कुठलीही अट नाही हे आपण ह्या ओवीतून जाणले पाहीजे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की परमेश्वराची प्राप्ती सहजसाध्य आहे. तुम्ही भगवंतासाठी चोवीस तास जरी डोळ्यातून पाणी काढले तरी तो तुम्हाला भेटायला धावत येईल. अजामेळाने केवळ आपल्या मृत्यूसमयी मनापासून देवाचे नाम उच्चारले आणि त्याला भगवंतप्राप्ती झाली हे सर्वश्रुत आहेच.

खरे म्हणजे भगवंताच्या प्राप्तीकरीता काही अटी असल्या तर देवाचे देवपणच नाहीसे होईल. त्याने स्वतःबद्दल एखादी अट घातली तर ती अट पाळू न शकणाऱ्यांना तो कधीही मिळणार नाही असे होईल. उदाहरणार्थ, योगसामर्थ्याची अट असेल तर अपंग लोकांना देव दुर्लभ होईल. वेदांच्या ज्ञानाची, वा भक्‍तीची अट असेल तर अडाणी माणसांना वा बुध्दीवादी लोकांना देव दिसणे शक्‍य होणार नाही. देव ह्या शब्दामध्येच असे गृहीत आहे की तो दुर्बळांतील दुर्बळांना व सर्वांत शक्‍तीमान माणसाला उपलब्ध आहे; ज्ञानी आणि अडाणी या दोन्ही तऱ्हेच्या माणसाला प्राप्त होणारा आहे. अशी कुठलीही अट दिसत नाही की ती सर्व लोकांना पूर्ण करता येईल (सगळ्यांनाच पूर्ण करता आली तर ती अट कसली?!). म्हणूनच देवाच्या जवळीकीला आपण कुठलेही सामाजिक वा नैतिक वा शारीरीक अट जरुरी आहे असे आपण समजणे चुकीचे आहे. इतिहासात काही थोर माणसांनी स्वतःवर आपणहून बंधने लावली व त्या मार्गाने चालत जाऊन त्यांनी भगवंताची प्राप्ती करुन घेतली. पण ते पाहून आपण तीच बंधने स्वतःला लावली तरच आपल्याला देव लाभेल असे मानणे चुकीचे आहे हे जाणून घ्या.

उदाहरणार्थ भक्‍तीमार्ग बघा. अनेक थोर संतांनी भक्‍तीमार्गाची वाखाणणी केली आहे. कलियुगात भगवंताचे नाम घेणे हा उपाय त्यांना सर्वात सोपा वाटला व स्वतः आचरणात आणून त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श उभा केला. पण म्हणून नाम घेतले नाही तर भगवंत मिळणार नाही असे नाही. जगातील हजारो लोकांकरीता भक्‍तीमार्ग सोपा आहे असे जरी मानले तरी त्यामुळे माझ्याकरीता त्या मार्गावर चालणे बरोबर आहे हे सिध्द होत नाही. तो शोध प्रत्येकाला स्वतःच घ्यायला हवा. उदाहरणार्थ, भक्‍तीमार्गावर चालण्यास भगवंतावर वा आपल्या गुरुंवर संपूर्ण श्रध्दा हवी. असा पूर्ण विश्वास ठेवणे जर मला शक्य होत नसेल तर मग मी या मार्गावर जबरदस्तीने, बाकी माणसे चालतात म्हणून, चालणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणे होय.

वस्तुस्थिती अशी आहे की भगवंत आपल्या आत्मरुपातच दडलेला असल्याने त्याच्या प्राप्तीचा मार्ग प्रत्येकाच्या जीवनात जन्मापासूनच ठरलेला असतो. स्वतः त्या मार्गावर चालून भगवंताची प्राप्ती करणारा आपला गुरुसुध्दा आपल्या जन्माबरोबरच ठरलेला असतो. या कारणास्तव खरे संत त्यांच्याकडे आलेल्या कुणालाही अनुग्रह देऊन आपला शिष्य बनवायचा प्रयत्‍न करीत नाहीत. एखाद्या पुण्यवंताला गुरु सापडला तरी त्या गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने चालून शेवटी आयुष्यात भगवंतप्राप्तीच्या साधनेचा आपला स्वतःचा मार्ग सापडणे ही एक अत्यंत महत्वाची आणि दुर्मिळ गोष्ट आहे. याहून पुढे केवळ आपल्याकरीता असलेल्या साधनेच्या त्या मार्गावर चालण्याचे धैर्य मनात उत्पन्न होणे हे अधिकच भाग्याचे वा खऱ्या गुरुकृपेचे लक्षण आहे. जीवशास्त्रातील उदाहरण द्यायचे झाले तर आपण असे म्हणू शकतो की आपल्या गुरुंनी सांगितलेली साधना आपल्या शरीरातील हाडांसारखी आहे. दृष्य नसलेल्या त्या हाडांमुळेच आपल्या शरीराला कणखरपणा आलेला असतो, सुदृढ आकार येतो. म्हणून त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु आपले दृष्य रुप हे केवळ आपल्या हाडांवर अवलंबून नसते. आपल्या पेशींचे, स्नायूंचे जे अनेक थर हाडांवर असतात त्या पेशींच्या व स्नायूंच्या थरांवरच आपले दृष्य रुप जास्त अवलंबून असते. त्याचप्रमाणे गुरुंच्या आदेशाप्रमाणे साधना करण्यातच आपली पूर्ण प्रगती होईल असे आपण न मानता त्यांनी सांगितलेली साधना करुन उरलेल्या वेळांत आपल्या स्वतःच्या अंतर्मनातील स्फूर्तीने जी साधना सुचेल त्याकडे लक्ष देणे साधकाला अत्यावश्यक आहे. काही काळाने साधकाला हे ध्यानात येते की गुरुपोनिर्दीष्ट साधना ही आपल्या स्वतःच्या अंतःर्स्फूतीवर पूर्ण विश्वास बसणे याकरीताच होती. खरी साधना अथकपणे, दिवसाचे चोवीस तास, आपल्या स्वसंवेदनांकडे तटस्थपणे बघून त्यांच्याशी सुसंगत व्यवहारात वागणे ही असते. साधनेचे जे अनंत मार्ग आहेत (भक्‍तीमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग इत्यादी) ते सर्व ह्या तटस्थतेच्या स्थितीपर्यंतच पोचवितात. मानसिक तटस्थता येणे, स्वतःच्या मनातील विकारांनी चलबिचल न होणे या स्थितीत आधीच्या सर्व मार्गांची एकरुपता होते. यानंतरची आपली साधना `सहज साधना’ होते. आयुष्यात जे काही तुम्हांला स्फुरेल त्याप्रमाणे वर्तन करणे इतके सोपे रुप आपल्या साधनेला येते. खरोखर, आपल्या स्वतःकडे ज्यांना तटस्थतेने बघता येते त्यांना भगवंताची प्राप्ती होणार यात काहीही संदेह नाही. असो.

याचा अर्थ असा की नुसते आपले साध्यच (म्हणजे परमेश्वराचे रुप) आपल्यामध्ये असते असे नव्हे तर ते प्राप्त करायची साधनादेखील आपल्यात सुप्तस्थितीत (स्वसंवेदनारुपात) आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जे काही आपल्याला हवे आहे ते सर्व काही आपल्याकडेच जन्मापासून आहे! पण ज्याप्रमाणे आपल्याकडील दागिन्याचे खरे मूल्य सराफाकडून (म्हणजे दुसऱ्याकडून) कळते त्याचप्रमाणे आपल्यामध्ये दडलेल्या भगवंताला व त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला जाणण्याकरीता आपल्याला गुरुंची आवश्यकता असते हे ध्यानात घ्या. पूर्वजन्मींच्या सुकृतांनी आपल्याला ह्या जन्मात प.पू. श्री दादासाहेबांसारखे गुरु लाभले आहेत. त्यांनी सांगितलेली साधना मनापासून करुन त्याशिवाय आपला स्वतःचा मार्ग शोधण्यात आपण आपले सर्व सामर्थ्य खर्च केले पाहीजे. असे केले नाही तर `अकल्पनाप्य कल्पतरो’च्या बुंध्याशी बसून केवळ त्याच्या सावलीचा आनंद उपभोगीत बसण्यासारखे आपले जीवन होईल.

आत्ता जे काही सांगितलेले आहे त्याच्यावर चिंतन व मनन करा. मग ज्या अंतःर्स्फूर्ती येतील त्याकडे लक्ष देऊन त्या आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करा. असे वागताना सुरुवातीला काही चुका झाल्या तरी त्यांच्यामध्येच तुमचा खरा मार्ग सापडण्याची किल्ली आहे. आपले गुरु सर्वकाही करतील (आपली अध्यात्मिक प्रगतीसुध्दा!) ह्या विश्वासावर कितीकाळ आयुष्य काढायचे याचा निर्णय घेण्याची क्षमता केवळ तुमच्याकडेच आहे! परमार्थातील साध्य व साधना हे सर्व आपल्याकडे उपजतच आहे यावर विश्वास ठेवून त्यांना शोधायचा प्रयत्‍न करण्यातच आपले खरे हित आहे.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा 234/9:

Leave It To God!

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

येरें चकोरें तिये आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे ।

तेवीं आम्ही विनवूं ते थोकडें । देवो कृपासिंधू ॥ २३४:९ ॥

 

वरील ओवींचा अर्थ आहे: `(आपल्या भुकेखातर) ज्याप्रमाणे चकोर पक्षी (पौर्णिमेच्या) चंद्राकडे आपली चोच वासून त्याच्या प्रभेने आपले पोट भरतात, त्याचप्रमाणे दयेचा सागर असणाऱ्या तुम्हांला आम्ही जे काही विनवू ते (आपल्या क्षमतेच्या मानाने) क्षुद्रच आहे.’

 

पुराणांतील अद्भुत पक्षी

 

पुराणांमध्ये अनेक विचित्र पक्षी वर्णन केले आहेत. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे होमा नावाचा पक्षी. असे म्हणतात की होमा पक्ष्याचे सर्व आयुष्य आकाशातच जाते. तो कधीही जमिनीवर उतरत नाही. आपले प्रजनन करण्यासाठी तो आपले अंडे खूप उंचावरुन हवेत सोडतो. हवेच्या घर्षणाने त्या अंड्याला उब मिळते व नवीन पिल्लू हवेतच जन्माला येते. आपण खाली पडत आहे हे लक्षात येऊन ते उडायला शिकते व वर जाऊन आपल्या जन्मदात्यांना मिळते! श्री रामकृष्ण परमहंस या पक्षाचे उदाहरण देऊन अवतारी पुरुषांचे वर्णन करायचे. ते म्हणायचे की ज्याप्रमाणे होमा पक्षाचा आणि जमिनीचा कधीही संबंध येत नाही त्याचप्रमाणे ईश्वरकोटी मनुष्याचा आणि संसाराचा संबंध येत नाही. बाळपण पूर्णपणे संपायच्या आतच त्यांना आपल्या मूळस्वरुपाचे ज्ञान होऊन ते परत आपल्या आत्मज्ञानात मग्न होतात. त्यांचा जन्म केवळ लोककल्याणाकरीता झालेला असतो. दुसरा असा विचित्र पक्षी म्हणजे चातक होय. तो जमिनीवरचे कुठलेही पाणी पीत नाही. फक्‍त पावसाचे पाणी पिऊन तो आपली तहान भागवितो. संसारातील गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन फक्‍त भगवंताच्या दर्शनाची आस चातकाच्या मेघवर्षावाच्या प्रतिक्षेसारखी ठेवावी असे म्हणतात.

वरील ओवीतील चकोर हा पक्षीसुध्दा असाच अद्भुत आहे. तो म्हणे फक्‍त चंद्रप्रकाशावर जगतो. झाडे जशी सूर्यप्रकाशावर जगतात तशी ही गोष्ट आहे. परंतु चकोर झाडांपेक्षाही अधिक विचित्र आहे. तो फक्‍त कुठलेही मळभ नसलेल्या आकाशातील पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्यावरच जगतो! म्हणजे ह्याला खायला महीन्यातून एकदाच. तेसुध्दा जर आकाशात ढग नसतील तरच. सर्वसाधारणपणे चकोर पक्ष्याची उपमा अशा व्यक्‍तीला देतात जी एका सुंदर, प्रगल्भ ध्येयाकरीताच आपले जीवन जगत असते. जगात अस्तित्वात असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपण ठरविलेल्या अत्यंत निर्मल, शुध्द ध्येयाकरीता (म्हणजे भगवंताच्या अतूट सान्निध्याकरीता) अथक प्रयत्‍न करणाऱ्याला जगातील सर्व खाद्यपदार्थ नाकारुन कधीतरी मिळणाऱ्या स्वच्छ चंद्रप्रकाशावर जगणाऱ्या चकोराची उपमा देतात. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत मार्मिकपणे चकोराची उपमा आपल्या परमार्थातील प्रयत्‍नांच्या सीमा दाखवायला केला आहे. विचार करा की जेव्हा निरभ्र रात्री पौर्णिमेचा चंद्र उगवतो तेव्हा चकोर पक्ष्याची आतुरता किती असेल? आपली चोच वासून तो जणू सर्व चांदणेच पिऊन टाकायचा प्रयत्‍न करीत असेल याबद्दल शंका नाही. परंतु प्रत्यक्षात बघायला गेले तर चंद्राच्या प्रभेचा किती अंश तो प्राशन करीत असेल? चिमणीएवढ्या त्या पक्ष्याची चोच ती किती मोठी असणार आणि त्याचे उदर किती विशाल असणार? सर्व जगाला शीतल प्रकाश देणाऱ्या चंद्राच्या प्रभेचा अत्यंत क्षुल्लक अंशच तो प्राशन करतो. अगदी त्याचप्रमाणे आपण आपले सर्व जीवन परमार्थाला वाहून घ्यायचे असे ठरविले आणि स्वतःचे सर्व प्रयत्‍न फक्‍त भगवंताला जाणून घेण्याच्या उद्देशालाच वाहून घेतले तरी ज्याच्या रुपाचा एक अंश म्हणजे हे विश्व आहे अशा परमेश्वराचे कितपत ज्ञान आपणांस होईल?

 

एकाच गोष्टीवर चिंतन व मनन करणे योग्य

 

वरील ओवीचा भावार्थ जाणण्याआधी ही ओवी कुठल्या संदर्भात अर्जुनाने म्हटली आहे यावर थोडा विचार करु. वरील ओवीचा ज्ञानेश्वरीतील संदर्भ असा आहे की भगवान श्रीकृष्ण नवव्या अध्यायात ज्ञानमार्गाने चालणाऱ्या साधकाचे वर्णन करायला प्रारंभ करायच्याआधी अर्जुनाला विचारतात की मी आधीच तुला अशा भक्‍तांचे वर्णन (अध्याय चार, श्लोक ३३ पासून शेवटपर्यंत) केलेले आहे तेव्हा आता परत करु की नको? तेव्हा अर्जुनाने, आपल्या समजुतीच्या सीमेची संपूर्ण जाणीव असल्याने, ह्या ओवीत भगवंताना असे सांगितले आहे की तुम्ही जितक्यावेळा एकच गोष्ट परत सांगाल तितक्यावेळा आम्हांला नवनवीन अर्थ कळत आहे. म्हणून तुम्ही जरुर मला आधी सांगितलेलीच गोष्ट परत सांगा.

खरी गोष्ट अशी आहे की परमार्थामध्ये आपल्याला फार काही जाणून घ्यायची आवश्यकता नसते. श्री रामकॄष्ण परमहंस नेहमी म्हणायचे की `गीता’ हा शब्द दहा वेळा म्हटला की तो `तागी’ असा ऐकू येतो. तागी म्हणजे त्यागी. म्हणजेच सध्याच्या व्यावहारीक जीवनाचा त्याग करुन भगवंताच्या स्मरणात आयुष्य घालविणे. सबंध गीतेचा अर्थ ह्यात स्पष्ट होतो. मग गीता कशाला वाचायला हवी?! त्यांचा एक शिष्य उपनिषदे वाचून वेदांत शिकायचा खूप काळ प्रयत्‍न करीत होता. एकदा रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले, `या सर्व वेदांमध्ये काय सांगितले आहे? हे जग म्हणजे माया आहे, त्या मायेचा त्याग करुन निश्चळ, शाश्वत सत्याकडे आपल्याला जायला हवे हेच ना. मग हे कळल्यावर पुढे वाचत कशाला बसायला पाहीजे? मायेपासून दूर जायचा प्रयत्‍न करणे महत्वाचे आहे. मायेबद्दल अधिकाधीक गोष्टी जाणणे महत्वाचे नाही.’

प्रामाणिकपणे पहायला गेल्यास असे आढळून येईल की आपल्यालासुध्दा परमार्थात काय करायला हवे याची जाणीव पदोपदी होत असते. परंतु काय करायला हवे हे कळणे आणि झालेल्या आकलनानुसार वर्तन करायची क्षमता आपल्यात आहे याची खात्री होणे यात खूप अंतर आहे. या अंतरामुळेच आपल्यासारखे साधक `हे आपल्या कुवतीबाहेरचे आहे’ असा समज करुन आपली समज आचरणात आणायचे टाळतात. नेहमीच्या, नित्यनैमित्तिक साधनेमुळे आपल्या मनात असा आत्मविश्वास जागृत होतो की आपल्याला समजलेले अध्यात्म आचरणात आणणे शक्य आहे. निदान त्याप्रमाणे वागायचा प्रामाणिक प्रयत्‍न तरी आपण करुन बघायला पाहीजे. हा आत्मविश्वास जागृत व्हायला आपण स्वतःला कळलेल्या एखाद्या गोष्टीवर सतत विचार करायला पाहीजे. म्हणून परत परत एकच गोष्ट ऐकण्यात काहीच गैर नाही. अर्जुनाने या कारणास्तवच भगवंतांना विनविले की तुम्ही मला पूर्वकथित गोष्टी परत एकदा जरुर सांगा.

या कारणास्तव साधनेला बसताना आपणां सर्वांनी ठराविक ओव्या वा मंत्र म्हणणे अत्यावश्यक आहे. त्या नेहमीच्या उच्चारणाने आपल्या मनाला आपोआपच असे जाणवायला लागते की पुढील काही काळात आपल्याला भौतिक जीवनाच्या विचारांपासून दूर रहायचे आहे. त्यामुळे संसारातील चिंतांपासून आपले मन प्रयत्‍न न करीता फारकत घेऊ लागते, स्वस्थ होते. नाहीतर व्यावहारीक विवंचनांपासून दूर होण्यातच आपला इतका वेळ व शक्‍ती खर्च होते की पुढील साधना करायची फार ताकद आपल्यात शिल्लक रहात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच गोष्टीवर प्रदीर्घ काळ चिंतन मनन केल्यावर आपल्याला जे खोल ज्ञान होते ते संदेहरहीत असते. मनाच्या सर्व कुशंकांचे समाधान करुन प्राप्त झालेले ज्ञान शाश्वत असते. केवळ अशा ज्ञानालाच आपण निःशंक आचरणात आणू शकतो. परमार्थाचे खरे रहस्य स्वतःला जे काही ज्ञान झाले आहे त्यानुसार व्यवहारात आचरण करणे हे होय. गीतेच्या शेवटी अर्जुन ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना ठामपणे सांगतो की मला तुमचे बोल पूर्ण पटले आहेत व मी युध्द करायला तयार आहे, त्याप्रमाणे आपण आपल्या ह्रुदयातील सद्‌गुरुंना अंतर्स्फूर्ती आचरणात आणण्याचे अभिवचन दिले पाहीजे. म्हणूनच जो साधक साधनेमध्ये नित्यनूतन अनुभवांच्या पाठी न लागता आपल्या अंतर्मनाला आत्तापर्यंत ज्या स्फूर्ती झाल्या आहेत त्यावर चिंतन व मनन करुन त्या आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करील त्यावर सद्‍गुरु प्रसन्न होतील यात शंकाच नाही.

 

साधनेत ध्येयप्राप्तीची धडपड नको

 

वरील ओवी ज्ञानेश्वरीत कुठल्या संदर्भात आली आहे यापासून आपण एकच उपदेश परत परत ऐकायचे महत्व जाणलेच. आता ओवीचा भावार्थ बघू. ही ओवी आपल्याला असे सांगायचा प्रयत्‍न करीत आहे की साधनेत आपण कितीही सात्विक, उच्च, प्रगल्भ असे ध्येय ठेवले (उदाहरणार्थ, मला ज्ञानेश्वरी समजावी, वा श्रीज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन व्हावे वा आत्मरुपाचे ज्ञान व्हावे इत्यादी) तरी परमेश्वराच्या सत्यरुपापुढे ते नगण्यच आहे. आत्तापर्यंतचे जीवन डोळ्यासमोर एखादे प्राप्त होण्यासारखे ध्येय ठेवूनच आपण व्यतीत केले आहे. असे, ध्येय समोर ठेवून, जगण्याचा एक फायदा म्हणजे आपल्या प्रयत्‍नांनी ध्येयाच्या किती जवळ आलो आहोत हे आपल्याला पाहता येते. आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावरचा विश्वास वाढण्याकरीता हे अत्यंत उपयुक्‍त आहे. आपण परमार्थाच्या मार्गावर आलो आहोत म्हणून आपली ही आयुष्यभरची सवय काही जात नाही. याउलट ठराविक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवूनच साधना करणे चांगले असेच आपल्याला वाटते. म्हणूनच साधनेत गुरुंचे दर्शन झाले, वा सुगंध जाणविला वा इतर काही चांगले अनुभव आले तर आपण आपली साधना व्यवस्थित सुरु आहे असे मानतो. जर विशिष्ठ अनुभव आले नाहीत तर निराश व्हायला लागतो. परंतु असे निराश होण्यामध्ये गुरुंनी सांगितलेल्या शब्दांपेक्षा आपल्या अनुभवांवर आपण जास्त विश्वास ठेवत आहे हे आपल्याला कळतसुध्दा नाही. एकीकडे गुरुंवर आत्यंतिक श्रध्दा आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनी सांगितलेली साधना करुनसुध्दा अनुभव येत नाही म्हणून हताश व्हायचे यामध्ये विसंवाद आहे हे आपल्याला कळत नाही. या सर्वांपाठी असलेले कारण म्हणजे आपल्याला ध्येय ठरवुन त्याच्या जवळ जात आहे की नाही हे पहायची सवय होय. ह्या सवयीतून सुटका करण्याचा एक मार्ग म्हणजे मनात कुठलेही ध्येय न ठेवता साधना करणे होय. केवळ आपल्या सद्‌गुरुंनी सांगितली आहे म्हणून साधना करावी. अशा रीतीने विचार केल्यास आपली साधना हे गुरुवाक्यांचे फळ होते. साधना हे फळ आहे असे मानले तर त्यापासून आधिक काही मिळायची अपेक्षा नाहीशी होते. साधनेतून काही मिळणार आहे ही अपेक्षा नाहीशी झाली की अनुभव नाही आले तरी श्रध्दा डळमळीत होण्याचा संभव नसतो.

परंतु असा विचार करणे सोपे नाही. आयुष्याभरची सवय एका क्षणात नाहीशी होत नसते. तीचा संपूर्ण नाश व्हायला ह्या विचारावर मनन करणे आवश्यक आहे. वरील ओवीतून असा विचार करायला आपण एक आधार घेऊ शकतो. आपले कुठलेही ध्येय साधनेच्या खऱ्या क्षमतेच्या मानाने खूप कमी आहे हे जाणविले की ध्येय ठेवण्यातील चुक आपोआपच ध्यानात येईल. संत प. पू. श्री मामा देशपांडे यांनी सांगितलेली खालील गोष्ट वाचली की माझा मुद्दा स्पष्ट होईल. एका मोठ्या कुटुंबातील एका वृध्द माणसाने एकदा घरातील सर्व लहान मुलांना जवळ बोलावून सांगितले की माझ्याजवळ ही मोठी पिशवीभरुन गोळ्या आहेत. तुम्ही पाहीजे तेवढ्या घ्या. सर्व मुलांनी पिशवीत हात भरुन त्यांच्या चिमण्या मुठीत मावतील तेवढ्या गोळ्या आनंदाने घेतल्या. फक्‍त एकच मुलगा स्वस्थ उभा होता. तो म्हणाला तुम्हीच मला द्यायच्या तेवढ्या गोळ्या द्या. त्या वयोवृध्द माणसाला त्या मुलावरच्या संस्कारांचे कौतुक वाटून आपल्या स्वतःच्या मुठीत मावतील तेवढ्या गोळ्या त्याने दिल्या. त्या मुलाच्या दोन्ही हातात, व सर्व खिशांत मावतील तेवढ्या गोळ्या त्याला मिळल्या. नंतर तो म्हणाला की मला माहीती होते की तुमचा हात माझ्या हातापेक्षा मोठा आहे म्हणूनच मी तुम्हाला गोळ्या द्यायला सांगितल्या!

आपण ध्येय ठरवुन साधना केली तर आपले वागणे म्हणजे बाकी मुलांसारखे होईल. तुम्ही मागितलेले सर्व मिळाले तरी ते कमीच आहे कारण आपली मागण्याची क्षमता सीमीत आहे. आपल्या सद्‌गुरुंची देण्याची क्षमता निस्सीम आहे. म्हणून त्या बुध्दीमान मुलाप्रमाणे आपण आपल्या गुरुंनाच विनविले पाहीजे की तुम्हीच मला तुमच्या मुठीतून खाऊ द्या. मग जे काही मिळेल त्याने आपली सध्याची भूक भागली नाही असे वाटले तरी ते आपल्या दूरगामी भल्याकरीताच असेल यात शंका नाही. कुठलाही हेतू न ठेवता, केवळ गुरुंनी सांगितली म्हणून साधना करणे म्हणजेच आपले त्या बुध्दीमान मुलाप्रमाणे विनविणे होय. खरोखर, आपल्या कल्पनेच्या बाहेर काही प्राप्त करायचे असेल तर कुठलीही कल्पना न करीता केवळ विश्वासाने, श्रध्देने साधना करण्यावाचून पर्याय नाही. आपण सर्वांनी आपले वर्तन वरील विचारावर चिंतन व मनन करुन मगच ठरवावे असे आवाहन करुन थांबतो.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा 288/9:

True Meaning of Surrender

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारीं मी जन्ममरण ।

यालागीं शरणागता शरण्य । मीचि एक ॥ २८८:९ ॥

 

नवव्या अध्यायातील वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज अर्जुनास सांगत आहेत की ` माझ्या विश्वरुपाला जो संपूर्ण शरण जाईल त्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्या कायमच्या थांबतील. म्हणून (आयुष्यात) शरण जायला योग्य अशी एकच वस्तू म्हणजे माझे अमूर्त रुप होय.’

बहुतांशी साधक असेच समजतात की `संपूर्ण शरणागती’ ह्या मार्गावर चालत साधना करणे आपल्याला शक्‍य नाही. अशी भावना निर्माण व्हायला काही जणांना आपल्या कर्तुत्वाचा अभिमान असतो. दुसऱ्याला शरण जाऊन साधना करण्यापेक्षा आपल्या बळावर प्रयत्‍न करणे त्यांना जास्त योग्य वाटत असते. मग अशा साधनेला जास्त वेळ लागला तरी त्याकरीता त्यांची तयारी असते. तर काही साधकांच्या शरणागती म्हणजे काय याबद्दल इतक्या पराकोटीच्या कल्पना असतात की त्यांच्या अनुसार आपल्याला सतत वागणे जमणार नाही अशी खात्री त्यांना असते. मग हा मार्ग त्यांना आपलासा वाटला तरी त्यावर चालण्याचे धाडस ते करु इच्छित नाही. म्हणून शरणागती म्हणजे काय याबद्दल आधी आपण विचार करु.

शरणागती म्हणजे काय याची व्याख्या अशी आहे: जर आपल्या जीवनातल्या वर्तनात एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीचा ध्यास सतत दिसून येत असेल तर त्या गोष्टीला आपण शरण गेलो आहेत असे समजले पाहीजे.

व्यवहारातसुध्दा ज्या मनुष्याला आपल्या पत्‍नीला सुखी ठेवायचा ध्यास लागला आहे त्याबद्दल बोलताना तो त्याच्या बायकोच्या हातात आहे असेच आपण म्हणतो. एखादा मनुष्य आपल्या नोकरीत वा धंद्यात खूप पुढे जायचे आहे असे ठरवून त्याकरीता तो अथक कष्ट घेतो तेव्हा त्याने आपल्या नोकरीला वाहून घेतले आहे असे सर्व म्हणतात. तेव्हा ज्या साधकांना असे वाटत असेल की आपण कुणाला शरण जाणे शक्‍य नाही त्यांनी हे ध्यानात ठेवावे की आयुष्यभर ते सतत कुणाला ना कुणाला शरण गेलेले आहेत! वरील व्याख्येचा आणखी एक परीणाम म्हणजे शरण जाणे म्हणजे सतत त्या व्यक्‍तीच्या पायाशी बसणे वा त्या गोष्टीच्या प्राप्तीकरीता अत्यंत भावुक होणे नव्हे हे स्पष्ट होते. ज्याप्रमाणे कुरणात चरायला गेलेल्या गाईचे लक्ष गोठ्यातील आपल्या पाडसाकडे असते तसे लक्ष सतत आपल्या ध्येयाकडे ठेवून रोजचे जीवन जगणे म्हणजेच त्या ध्येयाला संपूर्ण शरण जाणे. शरणागती म्हणजे काय याबद्दल पराकोटीच्या कल्पना ठेवून त्यामुळे शरण जाण्यास टाळण्याऱ्या साधकांनी हे जाणून घेतले तर त्यांची ह्या मार्गाबद्दलची भिती निघून जाईल.

तेव्हा ध्यानात घ्या की आपणां सर्वांना ही ओवी लागू आहे. `शरणागती’ हा शब्द ऐकल्यावर `बापरे, हे काही आपल्याला जमणार नाही’ असे वाटून आपल्या मनाची द्वारे बंद करु नका! आपण सर्वजण कुणालातरी वा कुठल्यातरी वस्तूला किंवा सिध्दांताला सतत शरण जाऊनच जीवन जगत आहोत. शरण न जाता जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतंत्र जीवन जगणे. आपल्यासारख्या, आयुष्यभर काहीतरी प्राप्त करण्याची धडपड करणाऱ्या, जीवांनी ही स्वतंत्रता कधीतरी उपभोगली आहे का?

वरील विवेचनाने ह्या ओवीचा भावनिक अर्थ ` आपले रोजचे जीवन माझ्या अमूर्त रुपाच्या प्राप्तीची आस ठेवूनच जगा. नाहीतर तुमची जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका कधीही होणार नाही’ असा स्पष्ट होतो.

 

भगवंताचे अमूर्त रुप आणि आपले रोजचे ध्यान यांचा संबंध

 

बऱ्याच जणांना आता आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटेल! शरणागती ह्या शब्दाबद्दलची भिती निघून जाईपर्यंत भगवंताचे `अमूर्त रुप’ समोर आले! हे अमूर्त रुप म्हणजे काय? आणि जर ते रुपच माहीती नाही तर त्याच्या प्राप्तीकरीता रोजचे जीवन जगणे कसे शक्य आहे असे वाटून आपण परत निराश व्हायला लागतो. परंतु जरा धीर ठेवा. समजा तुम्हांला अशी एक वस्तू सापडली की जीच्यात तुम्ही भगवंताच्या अमूर्त स्वरुपाचे प्रतीक पाहू शकता तर त्या वस्तूच्या चिंतनात जीवन जगणे म्हणजे वरील ओवीप्रमाणे परमेश्वराला शरण जाणे असे होईल व आपली साधना फळाला येण्यास वेळ लागणार नाही. म्हणून तुमच्या जीवनातील अशी कुठली वस्तू आहे की ती परमेश्वराच्या अमूर्त रुपाचे प्रतीक म्हणून तुम्ही वापरु शकाल याचा विचार करा.

आधी हे ध्यानात घ्या की आपल्या जीवनात अशी एखादी वस्तू असली पाहीजेच यात शंका नाही. कारण असे जर नसेल तर भगवंताची प्राप्ती होणे म्हणजे आपल्या जीवनात नसलेल्या वस्तूची निर्मिती होणे असे होईल. कुठलीही गोष्ट निर्माण होण्यास काही बाकीच्या गोष्टी आवश्यक असतात. मग भगवंताच्या प्राप्तीला, त्याच्या आपल्या जीवनातील निर्मितीला, आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर भगवंत अवलंबून आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. हे कसे शक्य आहे? म्हणून आधी ही पूर्ण खात्री करुन घ्या की जन्माला आल्यापासून तुमच्याबरोबर अशी एक गोष्ट आहे की जीच्यात तुम्ही परमेश्वर बघू शकता.

ही गोष्ट म्हणजे आपली ध्यानात लागलेली तंद्री होय. दररोजचे ध्यान करताना कधीतरी अचानक अशी अवस्था येते की आपण आपल्याच मनातील विचार बघू शकतो. ज्याप्रमाणे रस्त्यात चालताना वेगवेगळी माणसे आपल्या समोर येत असतात त्याचप्रमाणे आपल्यासमोर आपल्या मनातील विचार यायला लागतात. ही आपली अवस्था आपण नीट जाणून घेतली पाहीजे. ही अवस्था म्हणजेच भगवंताच्या अमूर्त अस्तित्वाची आपल्या जीवनातील खूण आहे.

हे सांगणे पटवून देणे आवश्यक आहे. असे बघा, एखादी वस्तूची जाणीव आपल्याला व्हायला दोन गोष्टींची जरुरी आहे. एक म्हणजे आपण त्या वस्तूपासून दूर असणे आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे ती वस्तू बघण्याचे साधन असणे. उदाहरणार्थ आपल्याकडे ५ व्होल्टपेक्षा जास्त वीज बघायचे साधन असेल तर २ व्होल्टचा करंट आपण मोजू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्याच मनातील विचारांचे संपूर्ण ज्ञान होते या क्रियेत आपण आपल्या मनापासून वेगळे असणे हे जरुरी आहेच पण त्याहीपेक्षा आपली अवस्था मनापेक्षाही सूक्ष्म असणे हे जरुरी आहे. म्हणून जेव्हा आपण देहाच्या पातळीवर असतो तेव्हा मनापेक्षा भिन्न अवस्थेत असूनही आपल्या मनात काय चालले आहे याचा पूर्ण पत्ता आपल्याला नसतो.

तेव्हा ज्याक्षणी आपल्याला मनातील विचार स्पष्ट दिसायला लागतात तेव्हा आपण नुसते मनापासून दूर नसतो तर मनापेक्षाही सूक्ष्म अवस्थेत असतो हे स्पष्ट होते. आपल्या ज्ञानेंद्रीयांच्या आकलनाच्या क्षमतेच्या बाहेरची ही अवस्था असते. म्हणून चांगल्या ध्यानात वा गाढ झोपेत आपली जी अवस्था असेल तीचे वर्णन आपण कुणाला करु शकत नाही. केवळ ती अवस्था उपभोगण्यातच त्या अवस्थेचे अस्तित्व सिध्द होते. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ही अवस्था अचानक प्राप्त झालेली असते. तीच्या प्राप्तीमध्ये आपले प्रभुत्व नसते. कारण दुसऱ्या कुठल्याही गोष्टींवर ही अवस्था अवलंबून नसते (की ज्यांच्या मार्फत आपण ही स्थिती प्राप्त करुन घेऊ शकतो). उदाहरणार्थ ध्यान सुरु करताना आपल्या खात्री नसते की ते कसे होईल. ही पराकोटीची तटस्थता आज अनुभवता येईलच अशी खात्री कुणाला असते? कधी कधी सर्व उपचार व्यवस्थित करुन ध्यान नीट लागत नाही तर कधी जरा दोन मिनीटे बसूया म्हणून बसले तरी ते अत्यंत सुंदर होते.

म्हणजे अत्यंत गंभीर ध्यानात आपली जी अवस्था असते त्या अवस्थेचे सर्व गुण परमेश्वराच्या गुणांसारखेच असतात. आपल्या सर्व इंद्रीयाहून सूक्ष्म अशी ही अवस्था आपल्या कुठल्याही प्रयत्‍नांचा परीणाम म्हणून उपलब्ध होत नाही आणि ती जेव्हा असते तेव्हा आपल्या अस्तित्वाइतकीच नैसर्गिक वाटते. ह्या विचारांमुळे आपण असे मानायला हरकत नाही की अमूर्त परमेश्वराचे आपल्या जीवनातील रुप म्हणजे ध्यानात असलेली तटस्थता. त्या पराकोटीच्या तटस्थतेमध्ये आपल्या स्वतःच्या जीवनातील घडामोडीसुध्दा आपण परक्याच्या जीवनातील घटनांसारख्या बघू शकतो. तेव्हा ह्या ओवीचे आपल्याकरीता सांगणे असे आहे: `रोजच्या जीवनामध्ये जगताना सतत तटस्थ होऊन स्वतःकडे बघायला शिका. असे करणे म्हणजेच भगवंताच्या अमूर्त स्वरुपाला शरण जाणे आहे. जो गृहस्थ असे करु शकेल त्याच्या जन्ममरणाचा फेरा चुकला असे समजायला हरकत नाही.’

अशी तटस्थता अंगात बाणवायला त्याबद्दल आत्मीयता येणे जरुरी आहे. कुठल्याही गोष्टीची आत्मीयता यायला त्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे आवश्यक असते. खरी तटस्थता सुरुवातीला केवळ ध्यानात अनुभवायला मिळते. म्हणून तटस्थतेबरोबर वेळ घालविणे म्हणजे आपले ध्यान जास्तीत जास्त खोल, गंभीर करणे होय. म्हणूनच आपल्या साधनेत रोजच्या ध्यानाला अनन्यसाधारण महत्व आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवून आपण आपले ध्यान करु व शरणागतीच्या मार्गाने जायचा प्रयत्‍न करु.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १६ जुन २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारीत.)

Posted on जून 18, 2007Categories अध्याय नववाLeave a comment on 288/9: True Meaning of Surrender

(513+522)/9: Know the Need for Change

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

सुरुवातीचे नमन

 

प्रवचनाच्या आधी आपण दोन मिनिटे शांत बसून आपापल्या इष्ट देवतेचे ध्यान करु व अशी प्रार्थना करु की आज जे काही ऐकायला मिळणार आहे त्याने माझ्या जीवनात अगदी थोडा का होईना पण फरक पडावा. ही प्रार्थना करायचे कारण असे की आपण ऐकतो म्हणजे काय करतो? तर कानावर पडलेल्या वाक्याचा अर्थ बुध्दीने जाणून घ्यायचा प्रयत्‍न करतो. त्यामुळे आजपर्यंत जे काही आयुष्य आपण जगलो आहोत त्याचा परिणाम ह्या ऐकण्यावर होत असतोच. म्हणून वक्‍त्याच्या एकाच वाक्याचे वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात निरनिराळे अर्थ निर्माण होतात आणि गंमत म्हणजे त्यातील प्रत्येक अर्थ (ऐकणाऱ्याच्या जीवनात) खरा आहे! आता, प्रत्येकाच्या जीवनात इतक्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात की त्यातील कुठल्या घटनेचा आपला ऐकण्यावर परीणाम होणार आहे हे सांगणे अशक्यच असते. म्हणून प्रवचनाच्या आधी दोन मिनिटे स्तब्ध राहून आपण देवाकडे अशी प्रार्थना करु की पुढील एक तासामध्ये जे काही मला ऐकायला मिळणार आहे त्याचा योग्य अर्थ समजण्याची बुध्दी मला दे.

दोन मिनिटे शांत बसून प्रवचन सुरु करण्याचा दुसरा उपयोग असा की अशा शांत बसण्याने आपले मन नेहमीच्या विचारातून मोकळे होते आणि नवीन काही शिकायचा संभव निर्माण होतो. या दोन कारणांनी नेहमी आपण सर्वांनी दोन मिनिटे शांत राहून, आपापल्या देवाची प्रार्थना करुन, मगच प्रवचनाला प्रारंभ करतो.

 

आता नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

प्रवचन सुरु करण्याआधी वरील तीन ओव्यांवर विचार करुया. अध्यात्मामध्ये आपण जे काही प्रयत्‍न करतो त्याचा हेतु काय आहे हे बघणे जरुरी आहे. व्यवहारातसुध्दा आपल्याला कोणी मदत केली तर आपण त्याने का असे केले हा विचार करतोच. कर्माचे-चांगले त्यामागच्या हेतूप्रमाणे ठरत असते. असे बघा, बकरी ईदच्या आधी बोकडाला अत्यंत पौष्टीक आहार खाटीक देत असतो, पण त्या चांगल्या कर्माचा हेतू बोकडाचे भले व्हावे असा नसून नंतर आपल्याला चांगले मांस खायला मिळावे असा असल्याने त्याचे हे कर्म चांगले की वाईट हे ठरविणे अवघड होते. याउलट आईने मुलाला वळण लावण्याकरीता शिक्षा केली (आणि त्यामुळे त्या मुलाला शारीरीक दुःख झाले) तरी आईचे ते कर्म चांगले आहे असेच आपण मानतो. म्हणून आपण प्रवचनाला जाणे, ज्ञानेश्वरी वाचणे इत्यादी क्रियांना चांगले म्हणण्याआधी कुठल्या हेतूने ते करीत आहोत हे जाणणे जरुरी आहे. असे बघा, धृतराष्ट्राने अर्जुन व संजयबरोबरच पूर्ण गीता ऐकली पण त्या गोष्टीचा त्याला काही फायदा झाला नाही. सगळ्यात शेवटी, गीता पूर्ण झाल्यावर, त्याने काय विचारले, तर `संजया, जय कुणाचा होईल ते सांग’. त्याचे हे विचारणे म्हणजे सबंध रामायण ऐकून नंतर `रामाची सीता कोण’ असे विचारण्यासारखे आहे! धृतराष्ट्राच्या या स्थितीचे कारण ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायातच सांगितले आहे: `तरी पुत्रस्नेहे मोहितु, धृतराष्ट्र असे पुसतु, म्हणे संजया सांगे मातु, कुरुक्षेत्रीची ॥८५:१॥’. त्याचा हेतू फक्‍त आपल्या पुत्रांचे क्षेम जाणून घेण्याचाच असल्याने गीता प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडातून ऐकूनसुध्दा त्याच्यात काही बदल झाला नाही. नमनाच्या पहिल्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की आदिपुरुषाला जाणून घेणे हा हेतू अध्यात्माच्या मार्गावर चालताना ठेवणे सर्वोत्तम आहे.

वरीलपैकी दुसऱ्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुंची स्तुती केली आहे. व्यवहारातसुध्दा एखादी नवीन गोष्ट शिकायला आपण ती गोष्ट ज्यांना नीट माहीती आहे त्यांच्याकडे जाऊन शिकतो. तेव्हा आदिपुरुष म्हणजे कोण हे जाणून घ्यायचे असेल तर त्याकरीता योग्य गुरु हवे असे आपण मानायला काहीच हरकत नाही. पण आपल्याला, विशेषत: जी माणसे शहरात वाढली आहेत त्यांना, गुरु म्हटले की `बुवाबाजी’ आठविते! गुरु ह्या कल्पनेबद्दलच एक प्रकारची भिती त्यांना वाटत असते. खरे म्हणजे मनुष्य स्वभावच असा आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीचे वाईट गुण लगेच दिसतात (आणि पटतात). याउलट, चांगले गुण जरी दिसले तरी त्यावर पटकन विश्वास बसत नाही, हा मनुष्य वा वस्तू इतकी चांगली कशी असेल असे वाटते. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनात महाभारतातील युधिष्ठिर हे नाव आठविले की काय विचार येतात ते पहा.

आपल्यापैकी काही जणांना त्याने द्युतामध्ये द्रौपदीला पणाला लावले हे आठवेल, तर काही जणांना त्यावे `नरो वा कुंजरो वा’ हे वाक्य आठवेल आणि त्यामुळे त्याचा रथ जमिनीच्या दोन इंच वर चालायचा तो खाली आला हे आठवेल. खरे पाहता सबंध आयुष्यात त्याने ह्या दोनच गोष्टी विवादास्पद केल्या आहेत! परंतु आपल्यापैकी बहुतेकांना तेवढेच आठविते! एकदा यक्षांनी बाकी सर्व पांडवांना बांधून ठेवले असताना केवळ आपल्या बुध्दीच्या बळावर युधिष्ठिराने त्यांना पराभूत करुन सोडविलेले कितीजणांना आठवेल? शिवाय त्याचा रथ इतकी वर्षे जमिनीला लागत नव्हता ह्याचे महत्व न वाटता `शेवटी त्याचापण रथ खाली आलाच ना’ असेच आपण म्हणतो!

तेव्हा, दुसऱ्यांच्या वागण्यातील दोष आपल्याला विनासायास दिसतात आणि अनेक वर्षांच्या ह्या सवयीने दोष बघण्याचा आपला स्वभावच झाला आहे. म्हणूनच `गुरु’ हा शब्द जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा गुरुंनी इतक्या जणांच्या जीवनाचे कल्याण केले आहे, त्यांचे खूप शिष्य जीवनात आनंदी आहेत हे आपल्या लक्षात येत नाही तर गुरुंमुळे शिष्याला दररोज संध्याकाळी ध्यान करावे लागते, वर्षातून एक वेळतरी गुरुंच्या उत्सवाला जावेच लागते इत्यादी बंधनेच डोळ्यात भरतात. असे दिसल्याने गुरु ह्या शब्दाबद्दल भिती वाटू लागते व आपण परमार्थाच्या मार्गावर, गुरु करावे लागतील ह्या विचाराने, जातच नाही.

पण व्यवहारातील शिक्षकांना आपण एवढे घाबरत नाही, याउलट त्यांचे महत्व कबूल करायला तयार असतो. दहावीच्या परीक्षेचे गेल्या दहा वर्षांचे प्रश्नसंच आपल्याकडे असले, बुध्दी चांगली असली तरी आपण पैसे देऊन कोचिंग क्लास लावतोच ना. `अहो अशा वर्गांना गेल्याशिवाय चांगले गुण मिळत नाहीत’ असे सांगण्यात आपल्याला काही कमीपणा वाटत नाही. त्या गुरुंबद्दल भिती वाटत नाही याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे आपल्याला असे वाटते की आपले त्या गुरुंवर नियंत्रण आहे. उदाहरणार्थ, आपण केव्हाही क्लास बंद करु शकतो व त्याने आपले फार नुकसान होणार नाही असे वाटते. याउलट परमार्थातील गुरुंकडे अतिंद्रीय शक्‍ती असतात, म्हणून आपण त्यांच्याकडे जाणे बंद केले तर त्याचे परिणाम काय होतील ह्याबद्दल भिती उत्पन्न होते. आणि आयुष्यभर त्यांच्याकडे जाऊच अशी खात्री नसते. त्यामुळे, आपण एकतर अध्यात्माच्या मार्गावर पायच ठेवत नाही वा एखादे पुस्तक वाचून त्यावर विचार करण्यात परमार्थ साधायचा प्रयत्‍न करतो. व्यवहारातील गुरुंकडे सहजपणे जायचे दुसरे कारण म्हणजे असे करण्यातील सर्वमान्यता. माझा मुलगा क्लासला जातो ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण कुणाला द्यावे लागत नाही. पण तुम्ही (अध्यात्मिक) गुरु केलेत असे कळले की तुमच्या जवळच्या लोकांना ते करण्यामागचे कारण हवे असते. `माझ्या जीवनात काहीही कमी नाही, केवळ देवाजवळ जायची ओढ लागली आहे व त्यात मदत म्हणून गुरु केले आहेत’ असे कितीही सांगितले तरी लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. `कारण सांगायचे नसेल तर सांगू नकोस, पण थापा कशाला मारतोस?’ असे ते म्हणतात!! हे माहीती असल्याने आपण ह्या मार्गावर जायचे उद्यावर (म्हणजे आपल्या म्हातारपणी) ढकलतो.

परंतु हे आजचे काम उद्यावर ढकलण्यात आपले स्वतःचेच नुकसान आहे हे जाणून आपण धैर्य दाखवून गुरुंकडे जायला हवे. जेव्हा आपल्याला असे वाटते की आयुष्याचे ध्येय स्वतःचे घर, गाडी आणि समाजात मानसन्मान मिळविणे हे नाही तेव्हा आपले या जन्मातील ध्येय नक्की काय आहे हे व्यवस्थित कळायला गुरुंकडे आपण जायला हवे. आता आयुष्याचे ध्येय संसारातील गोष्टी मिळविणे हे नाही हे ओळखावे कसे? तर तुम्ही बघा की वरील सर्व गोष्टी थोड्याबहुत प्रमाणात तुमच्याकडे आहेतच. आपण सर्वजण तरुण आहोत, शारीरीक दुःख भोगायचे दिवस अजून आपल्यापासून खूप दूर आहेत. आपल्या सर्वांचे लौकीकदृष्ट्या उत्तम आयुष्य आहे, पैशाची काळजी नाही. पण आठवड्यातील किती दिवस आपण सुखात गेले असे म्हणतो? जर या गोष्टींच्या प्राप्तीमध्येच जीवनाची सार्थकता असेल तर आत्ता आपण दिवसाचे चोवीस तास सुखी असायला हवे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मनाला शांतता देणारे क्षण आपल्या आयुष्यात विरळाच आहेत. तेव्हा स्वतःच्या जीवनाकडे बघून असे शिकायला हवे की व्यवहारात पुढे जाण्यामध्ये आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय नाही. आता विचार करायची वेळ आली आहे. किती दिवस आपण डोळ्यावर झापड बांधलेल्या घोड्यासारखे जीवन जगायचे? ह्या क्षणी अशी वेळ आलेली आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करायला पाहीजे. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असू शकतील, पण आपले जगण्याचे ध्येय बदलण्याची वेळ आलेली आहे हे ध्यानात घ्या. तुम्ही असे प्रयत्‍न करा, असे नवीन शिका की ज्याने तुमचे आयुष्य अजून सुखी, परीपूर्ण होईल. आज जर मी आठवड्यातून सरासरी दहा तास सुखी आहे तर पुढच्या आठवड्यापासून ही सरासरी १२ तास झाली पाहीजे असा निर्धार करुन त्याकरीता काय केले पाहीजे याचा विचार आपण करायला हवा. ज्यामुळे आपली सुखी जगण्याची सरासरी वाढेल असे ज्ञान देण्याकरीता गुरुंकडे जायला हवे. त्या गुरुंचे वर्णन करणारी आपली दुसरी ओवी आहे. ती सांगत आहे की जीवनात देवाचे दर्शन आपल्याला ज्या स्वसंवेदनरुपी मार्गाने घ्यायचे आहे त्या मार्गाची सुरुवात, त्या वृक्षाचे बीज पेरणारे आपले गुरु आहेत. जरी आपल्याला स्वतःच परमार्थाच्या मार्गावर चालायचे असले तरी योग्य वाट दाखविणारे गुरु असणे जरुरी आहे.

गुरुंकडे जायचे दुसरे कारण म्हणजे आपली एकटेपणाची भिती. एकटे राहणे हे इतके कठीण मानले जाते की तुरुंगातसुध्दा सर्वात कठोर शिक्षा म्हणजे एकांतवास मानला जातो. भरदुपारच्या उन्हात उभे राहून दगड फोडण्यापेक्षा एका खोलीत दिवसेंदिवस कोंडून ठेवणे भयंकर मानले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ह्याच शिक्षेला सामोरे जावे लागले होते. ह्या शिक्षेत तसे पहायला गेले तर शारीरीक त्रास काहीच नसतो. फक्‍त एका खोलीत कुणाशी संबंध न ठेवता रहायचे असते एवढेच. पण त्या शिक्षेने लोकांना वेड लागते. अगदी पाषाणह्रुदयी गुन्हेगारालासुध्दा ही शिक्षा सहन होत नाही मग आपल्यासारख्यांचे काय होईल ही कल्पनासुध्दा करणे अशक्य आहे. परंतु गुरुस्तुतीच्या वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की आपण कधीही ह्या जगात एकटे नाही, सतत आपल्या जवळ गुरु आहेत (स्वसंवेदनाच्या वृक्षाचे बीज पेरायला ते जवळ हवेतच!). म्हणून गुरु करण्याचे दुसरे कारण म्हणजे परमार्थातील मार्गावरील जाणविणारे एकटेपणा जायला आपल्याबरोबर ते हवेत हे आहे. जोपर्यंत आपल्यात एवढा आत्मविश्वास येत नाही की माझ्यामुळे हे सर्व जग आहे, मी ब्रह्मदेवासारखे माझे जग निर्माण केले आहे तोपर्यंत आपल्याबरोबर कुणीतरी लागतेच. मग आपण आपल्या नातेवाईकांमध्ये अशी व्यक्‍ती शोधायचा प्रयत्‍न करतो. पण जगातील प्रत्येक व्यक्‍तीला स्वतःची काहीतरी अपेक्षा असतेच. त्यामुळे ती व्यक्‍ती तुमच्या सतत जवळ असायला हवी असेल तर तुम्हाला आपल्या जीवनात (त्या व्यक्‍तीचे मन राखायला) तडजोड करावीच लागते. मग एखादी गोष्ट करणे बरोबर नाही हे माहीती असूनसुध्दा करावी लागते. उदाहरणार्थ, संसार सांभाळायला नवरा आणि बायको या दोघांना तडजोड करावी लागतेच. ज्याक्षणी आपण तडजोड करतो, मनातील सत्य भावनेप्रमाणे वागत नाही, त्याक्षणी आपण सत्यापासून दूर होतो, आत्मरुपी देवापासून दूर होतो. पण समजा तुमच्या जीवनातील व्यक्‍तीला तुम्ही सतत स्वसंवेदनांप्रमाणे वागणेच अपेक्षित आहे, त्याशिवाय त्या व्यक्‍तीची स्वतःची काही अपेक्षा नाही. तर तुम्हाला सोबतपण मिळेल आणि तडजोडपण करावी लागणार नाही. पण दुर्भाग्यवशात संसारात अशी व्यक्‍ती मिळत नाही. तुमची आई, वडील, नवरा/बायको, मुलगा या सर्वांची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेच. आणि वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला त्या प्रत्येकांच्या अपेक्षेंचे ज्ञान आहे! जर त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे माहीती नसले तर खूप बरे झाले असते. आपण कसेही वागायला मोकळे झालो असतो. पण ह्या सर्वांनी कधी उघडपणे तर कधी सूचितपणे तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे तुम्हांला सांगितले आहे. `आमच्या ह्या अपेक्षा सांभाळून मग तू कशीही वागलीस/कसाही वागलास तरी चालेल’ असे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. अपेक्षेंच्या त्या ओझ्यामुळे ह्या व्यक्‍ती तुमच्याजवळ ठेवण्याकरीता तुम्हाला तडजोड करणे भागच आहे. पण आपले गुरु ही एकच अशी व्यक्‍ती आहे की जीची आपल्याकडून फक्‍त बरोबर वागण्याची अपेक्षा आहे, स्वतःकरीता गुरुंचे काहीही मागणे नसते. ह्या दृष्टीकोनातून विचार केला तर आपणांस गुरुंकडे जायला अजून एक कारण दिसते.

असा विचार करा आणि धाडस करुन गुरुंजवळ जायची जरुरी आहे हे मान्य करा. आपली बुवाबाजीची भिती दूर सोडून त्यांच्याजवळ जायची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओवीचे हे सांगणे आहे असे वाटते.

आता तिसरी ओवी काय म्हणत आहे हे पाहू. पसायदानातील ह्या ओवीचे मुख्य सांगणे `संयम ठेवा’ हे आहे. जरी तुम्हांला देवाकडे जायची उत्सुकता लागली असेल, कितीही पटले असेल की या जगातील इतर लोकांपेक्षा थोडे वेगळे वागून आयुष्य अजून परिपूर्ण करायला हवे तरी लगेच सर्व सोडून परमेश्वराकडे जायची घाई करणे बरोबर नाही असे ह्या ओवीचे सांगणे आहे. सध्याच्या आपल्या इच्छांचे पूर्ण निरसन करुन आपल्याला पुढे जायचे आहे हे लक्षात घ्या. इच्छांचे निरसन कसे होईल? इच्छा पूर्ण करायला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे हवी असलेली वस्तू हातात येणे व दुसरी म्हणजे आपला हवेपणा जाणे. उदाहरणार्थ, लहानपणी पैसे असले तर चॉकलेट विकत घेईन अशी जी तीव्र इच्छा होती ती मोठेपणी आपण कशी पूर्ण केली? सतत चॉकलेट जवळ ठेवून ती इच्छा आपण पूर्ण केली नाही तर चॉकलेट खाण्यामधील आपले स्वारस्यच कमी करुन पूर्ण केली आहे. आता चॉकलेटचे दुकान समोर आले तरी ते विकत घेतोच असे नाही. तेव्हा आपले मन उडून जाणे हे इच्छा पूर्ण करायला एक साधन आहे. खरे म्हणजे या एका घटनेनेच आपल्या इच्छा पूर्ण होतात. जोपर्यंत आपले मन एका गोष्टीत गुंतले आहे तोपर्यंत त्या गोष्टीतून आपण मुक्‍त होत नाही, मग ती गोष्ट सतत आपल्याजवळ असली तरी आपले समाधान होत नाही. तेव्हा परमेश्वराकडे जाण्याकरीता आपले पहिले पाऊल म्हणजे सध्याच्या स्वतःच्या तीव्र इच्छांमधले आपले स्वारस्य कमी करणे होय. नीट विचार करुन बघा की आत्ता कुठल्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत आहेत. मग आत्ता महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्रयस्थासारखे बघून विचार करा की ही जरी मला मिळाली तरी माझ्या आयुष्यात मूलभूत फरक पडणार आहे का? नाही मिळाली तर काय दुःख होणार आहे? असा विचार करुन जेव्हा तुमच्या मनाची अवस्था अशी होईल की आत्ता हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर बरे पण नाही मिळाल्या तरी चालेल तेव्हा तुम्ही भगवंताचा विचार करायला सुरुवात करा. साधनेच्या मार्गावर झोकून देण्याआधी हा विचार करायचा संयम शिकविण्याकरीता आपण तिसरी ओवी नेहमी म्हणतो.

खरे म्हणजे साधनेच्या मार्गावर चालण्यास प्रतिबंध करणारी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर आपली भिती (म्हणून निर्भयत्व हा संतांचा एक मोठा गुण मानला जातो). ही भिती म्हणजे संसारात आत्ता असलेल्या स्वतःच्या स्थानाबद्दलच्या अनिश्चिततेची भिती. आपले लक्ष देवाकडे नसून संसाराकडेच पूर्ण आहे याचे मुख्य कारण म्हणजे व्यवहारातील ज्या गोष्टी आपणांस प्राप्त झाल्या आहेत (आणि हव्याहव्याशा वाटत आहेत) त्या कधीही जीवनातून निघून जातील ही भिती सतत आपल्याला त्या वस्तूंकडेच लक्ष द्यायला भाग पाडते आहे. उदाहरणार्थ, बायकोला नवरा केव्हाही विचित्र वागायला लागेल ही भिती आहे, आईला आपल्या मुलाला कधीही वाईट संगत लागेल ही शंका आहे, नवऱ्याला गुंतविलेले पैसे कुठल्याही क्षणी बुडू शकतात ही जाणीव आहे. आपल्याला ह्या अनिश्चिततेनी पछाडलेले आहे व त्यामुळे मोकळा विचार करणे आपल्याला जमत नाही. ज्ञानेश्वर महाराजांसारखे आपण परमेश्वराकडे जात नाही याचे मुख्य कारण असे की आपली अजून खात्री होत नाही की हा संसार मला पाहीजे तसा आहे व तसाच राहील. जे काही प्राप्त झाले आहे त्यात स्वतःच्या कर्तुत्वापेक्षा नशिबाचा भागच जास्त दिसून येतो. उदाहरणार्थ, तुम्ही व तुमची जिवलग मैत्रीण यांनी सारखाच अभ्यास केला, तुमची बुध्दी सारखीच असली तरी तुम्हाला नव्वद टक्के मिळाले आणि तीला फक्‍त पंच्याहत्तर टक्केच मिळाले आहेत असे दिसल्याने उद्याच्या परीक्षेत आपली अवस्था त्या मैत्रीणीसारखी होईल ही भिती आपल्या मनात सुप्तरुपात असते. ही भिती सोडून थोडे `बिनधास्त’ रहायला हवे. जे काही मला मिळणार आहे ते मिळेल अशी खात्री ठेवून आपण बिनधास्त जगावे. आपले गुरु आपल्या पाठीशी आहेत ही जाणीव झाल्यावर बिनधास्त होणे तुम्हांला जमेल व साधना करायचे धाडस येईल. दरवेळी नमनाच्या ओव्यांचे वेगळे रुप आपल्यासमोर येते (आणि ते निरुपणाला घेतलेल्या ओव्यांना सुसंगत असते!). आज त्यांचे सांगणे वरीलप्रमाणे वाटते.

 

निरुपणाच्या ओव्या

 

आजच्या निरुपणाच्या ओव्यांमध्ये धृतराष्ट्राचा उल्लेख आहे. कुरुक्षेत्रात युध्द सुरु व्हायच्या आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता होय. परंतु आपल्याला श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील हा संवाद प्रत्यक्ष दिसत नाही तर संजय धृतराष्ट्राला हा संवाद वर्णन करीत आहे असे दिसते. कृष्णार्जुनाच्या ह्या संवादात धृतराष्ट्राला फार स्वारस्य नव्हते, त्याला नंतर होणाऱ्या युध्दात कोणाला जय मिळणार आहे याचीच चिंता खात होती. पूर्वी मूळ सिनेमाआधीच्या दाखविण्यात येणाऱ्या `फिल्म डिव्हीजन’च्या बातमीपत्रात आपल्याला अजिबात स्वारस्य नसायचे. ज्याकरीता आलो आहोत तो अमिताभचा सिनेमा केव्हा सुरु होईल याची अस्वस्थपणे वाट बघत आपण इंदिरा गांधींच्या मॉरिशसच्या दौऱ्याची बातमी बघायचो त्याप्रमाणे धृतराष्ट्राची अवस्था होती. त्याला युध्दाचा सिनेमा बघायचा होता! खालीलपैकी दुसऱ्या ओवीत हीच अवस्था वर्णन केली आहे.

 

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परि असते जात न गणिती । गहिंसपणे ॥ ५१३:९ ॥

 

अहो ऐकिजत असे की अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी का पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२:९ ॥

 

पहील्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या संसारातील माणसे कशी वागतात याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात: `मरणे हा शब्दसुध्दा त्यांना सहन होत नाही आणि कोणी मरण पावले तर त्यांस अत्यंत दुःख होते. पण ह्याचवेळी दररोज आपण मरणाच्या जवळ जात आहोत हे केवळ मूर्खपणाने ते जाणत नाही’. उदाहरणार्थ, दरवर्षी स्वतःचा वाढदिवस साजरा करताना आपल्या मनात आपण मोठे झालो अशीच भावना असते, पाठच्या वर्षी जे काही शिकलो त्याचा अभिमान असतो. पण आज आपण आपल्या मृत्यूला एक वर्षाने जवळ आलो आहोत असे कधीतरी वाटते का? दुसऱ्या ओवीत धृतराष्ट्राची अवस्था काय होती याचे वर्णन केले आहे: `आत्तापर्यंत जी गीता ऐकायला मिळाली होती त्याबद्दल कुठलाही विकार मनात न येता हा `म्हातारा’ निवांत बसला होता. ज्याप्रमाणे एखादी म्हैस खाल्लेल्या चाऱ्याचे रवंथ करीत चिखलात बसून असते तशी त्याची अवस्था होती’. रवंथ करणाऱ्या म्हशीच्या तोंडात घास असतो, अंगाला माखलेल्या चिखलाने उन्हाचा तडाखा फार जाणवित नसतो आणि या सर्वांमुळे ती अत्यंत सुखात असते. आपली अवस्था अशीच आहे. `मी किती विद्वान आहे’ किंवा `माझी मुले सगळ्यात पुढे आहेत’ अशा आपल्या आयुष्यातल्या आधी घडलेल्या गोष्टींबद्दल आपण एवढे खुश असतो की आता त्यापुढे काही करायला हवे असा विचारसुध्दा डोक्यात येत नाही, मग नवीन काही करणे दूरच राहीले. वरील उदाहरणातल्या म्हशीसारखेच आपण जीवनाच्या सध्याच्या स्थितीपर्यंत यायला इतके अधाशासारखे खाल्ले आहे की ते पचायला उरलेले सबंध आयुष्य आपणांस रवंथ करीत बसावे लागते! त्यामुळे जो काही रिकामा वेळ आपल्याला मिळतो तो सर्व मिळालेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यातच आपण वाया घालवितो. धृतराष्ट्राची अवस्था अशीच होती. आपल्या मुलांच्या कर्तुत्वाच्या आठवणीत तो शांत बसला होता व वाट बघत होता की केव्हा हे युध्द सुरु होईल. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे त्याला अजिबात महत्व वाटत नव्हते.

वरील ओवींत असे जाणविते की ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द कधी कधी अतिशय कठोर होऊ शकतात. या जगातल्या माणसांच्या व धृतराष्ट्राच्या वरील वर्णनात त्यांनी अजिबात मृदु शब्द वापरले नाहीत. सबंध ज्ञानेश्वरीत अनेक वेळा घणाघाती प्रहारासारखे त्यांनी शब्द वापरले आहेत. आपण झोपलेलो आहोत, तोंडावर गार पाण्याचा हबका मारल्याशिवाय आपण उठणार नाही ही जाणून त्यांनी ह्या शब्दांचा वापर केला आहे. किंवा लहान मुलाला कधी कधी थप्पड मारावीच लागते त्याप्रमाणे त्यांनी हे कठोर शब्द वापरले आहेत. कधी कधी संतांच्या वागण्यात कठोरपणा दिसतो. समोरच्या माणसाबद्दलच्या खऱ्याखुऱ्या आपुलकीच्या भावनेतूनच त्यांच्या अशा वागण्याचा उगम होत हे जाणणे जरुरी आहे. नाहीतर त्यांच्या संतपणाबद्दलच मनात शंका उत्पन्न होऊ शकते. असो.

ह्या ओवींचा शब्दार्थ आपण आता बघितला आहे. आजच्या आपल्या नमनाच्या ओवीच्या सांगण्याशी तो सुसंगतच आहे. कारण आज नमनाच्या ओवींतून आपण असे बघितले की आपल्याला आयुष्यात नवीन विचार करायची गरज आहे. आत्तापर्यंत डोळ्यांवर झापड बांधल्यासारखे आपण आपले आयुष्य जगत आलो आहोत. त्याने आपल्याला काय सुख दिले आहे याचा हिशोब करायची वेळ आली आहे. जर तुम्हांला आत्तापर्यंतच्या आयुष्यात तोट्याचा व्यवहार दिसला तर नवीन धंदा, म्हणजे परमार्थाबद्दल विचार, सुरु केला पाहीजे असे आपण बघितले. वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की आपला व्यवहार कसा तोट्याचा आहे. ज्या गोष्टींच्या प्राप्तीमध्ये आपण सुखाची कल्पना केली आहे त्या सर्व गोष्टी आजचा म्हशीच्या पोटातील चारा जसा उद्या पूर्ण निरुपयोगी होऊन बाहेर निघतो तशा नाशिवंत आहेत. आपण आज निवांत रवंथ करीत बसलो आहोत पण उद्या परत भूक लागणार आहेच. कारण आलेली प्रत्येक गोष्ट हळूहळू नाश पावत आहे आणि केवळ मूर्खपणाने आपण जात असलेल्या गोष्टींबद्दल विचार न करीता स्वस्थ बसलो आहोत असे त्यांना सांगायचे आहे. थोडक्यात म्हणजे आपली अवस्था धृतराष्ट्रासारखी आहे असे त्यांना म्हणायचे आहे.

अशा रीतीने ओवींचा भावार्थ लक्षात घेतल्यावर आता एवढेच शिल्लक राहते की आपल्या स्वतःच्या साधनेत वरील ओवींचा उपयोग कसा करुन घ्यायचा. ह्या ओवींतून आपण आयुष्यात काय करायला शिकायचे? आपण असा सतत विचार करायला शिकले पाहीजे की या जगामध्ये माझ्याकडे आहेत त्यांपैकी कुठली गोष्ट अशी आहे की जीच्या सतत आपल्याबरोबर असण्याबद्दल आपण निःशंक आहोत. आपण असा विचार जर केला नाही तर स्वतःला `असते जात न गणिती, गहिंसपणे’ या वर्णनातच मोडले पाहीजे हे जाणून आपण हा विचार करायला सुरुवात केली पाहीजे. आपल्याला शहाणे व्हायचे असेल तर आधी मूर्खपणा (गहिंसपणा) सोडला पाहीजे, म्हणून सतत असे बघायची सवय लावून घ्यायला पाहीजे की `कुठली गोष्ट माझ्याजवळ आहे की कसलीही काळजी घेतली नाही तरी ती माझ्याजवळ राहीलच’. तुम्ही `मित्रांचा स्नेह’, `बैंकेतील पैसे’, `बायकोचे/नवऱ्याचे प्रेम’, `मुलांचा आदर’ यापैकी कुठली गोष्ट सतत आपल्याजवळ राहील अशी खात्री आपल्याला आहे का याचा विचार करा. माझ्याबाबतीत बोलायचे झाले, तर आत्तापर्यंत एकच वस्तू मला अशी दिसली आहे की तीच्याबद्दल मी खात्रीने सांगू शकीन की ती सतत माझ्याजवळ आहेच. ती म्हणजे माझ्या ह्रुदयातील सद्‌गुरुंचा मला असलेला आधार. आत्तापर्यंत हजारो वेळा त्यांच्या सांगण्याविरुध्द काम करुनसुध्दा त्यांचा निरपेक्ष सहवास अजून आहेच! एकदा स्वसंवेदनांनी ही गोष्ट तुम्हांला जाणविली की `जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो, स्वसंविद द्रुमबीजप्ररो, हणावनि’ ह्या ओवीचा खरा अर्थ तुम्हाला समजायला लागेल. ज्यांच्या आयुष्यात परमेश्वराचे स्थान नाही, त्यांना या सद्‌गुरुचे अस्तित्वच माहीती नाही. मग त्यांच्या आयुष्यात कुठली गोष्ट स्थिर असू शकेल याची कल्पना मला येतच नाही. अशी गोष्ट त्यांच्या जीवनात आहे की नाही याचा विचार त्यांनी केला पाहीजे. परमेश्वराशिवाय दुसरी वस्तू त्यांना सापडली तर जरुर त्यांनी मला येऊन सांगावे. संसारातील अशी एखादी गोष्ट पहायला मी अत्यंत उत्सुक आहे.

तेव्हा, वरील ओवींचे आपल्या दररोजच्या जीवनात अंमलात आणण्यासारखे हेच सांगणे आहे कि तुमच्या आयुष्यात जी कुठली स्थिर वस्तू आहे तीच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या, तीच्या प्राप्तीमध्ये सुख माना. अस्थिर गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे मृगजळाच्या पाण्याच्या मागे धावण्यासारखे आहे. तुमच्या जीवनात परमेश्वराऐवजी एखाद्या दुसऱ्या व्यक्‍तीचे वा वस्तूचे स्थान अढळ असेल तर खुशाल त्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये सुख आहे असे माना. पण या जगात अशी कुठलीही वस्तू तुम्हांला सापडणार नाही की जीचा नाश होत नाही, जी असताना सतत नाहीशी होत नाही. मी खात्रीपूर्वक असे सांगू शकतो कारण माझ्या जीवनातील ही सत्य घटना आहे आणि शास्त्राने ह्या गोष्टीला आधार दिलेला आहे. हीच गोष्ट जर तुम्हांला स्वसंवेदनांनी कळली आणि खरे वाटली तर लगेच परमेश्वराचे ध्यान करायला सुरुवात करा, त्यात परत चालढकल करु नका. थोडक्यात म्हणजे डोळे उघडे ठेवून जगा. आत्ता ज्या गोष्टी बदलणार नाही असे वाटत आहे त्या गोष्टींनी दगा दिला तर आपले त्यांच्याबद्दलचे मत बदलायचे स्वातंत्र्य गमावू नका. एखाद्या व्यक्‍तीला तुम्ही आपले मानले आहे, तीच्या भल्याकरीता स्वतःचे आयुष्य वेचायची तयारी तुम्ही ठेवलेली आहे, पण अशा व्यक्‍तीने आपले खरे रुप दाखविले तर तीचा आत्यंतिक मोह सोडा. अनेकवेळा त्या व्यक्‍तीच्या वागण्याबद्दल वाईट अनुभव येऊनसुध्दा त्या व्यक्‍तीवरचे वा गोष्टीवरचे तुमचे प्रेम वा मोह कमी होत नाही ही अंधश्रध्दा नव्हे काय? स्वसंवेदनांनी, स्वतःच्या अनुभवांनी, जाणविलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन विरुध्द भावना जवळ करणे म्हणजेच अंधश्रध्दा होय.

फक्‍त देवावरच्या श्रध्देला अंधश्रध्देचे नांव देणे चुकीचे आहे हे समजून घ्या. खरे म्हणजे ज्यांना देवावर प्रेम नाही त्यांचेच जीवन अंधश्रध्देवर आधारित आहे. कारण ज्या ज्या गोष्टींचा मोह त्यांना आहे त्यापैकील कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, कधीही नाश पावू शकते (नव्हे, दरक्षणाला नाश पावतच आहे) असे जाणूनसुध्दा त्यांचा त्या गोष्टींवर आपले जीवन (जे नाश पावू नये हेच आपल्या जीवनाचे ध्येय असते!) उभारायचा प्रयत्‍न थांबत नाही ही अंधश्रध्दा नव्हे तर दुसरे काय आहे?

आता काही लोक म्हणतील की माझे जीवन खरेच सुखी आहे. मी त्यात का बदल करु? स्वतःच्या जीवनाबद्दल बोलताना सारासार विचार सुटायची शक्यता खूप असते. म्हणून त्यांची ही भावना खरी आहे की एक अंधश्रध्दा आहे हे पाहणे त्यांना जरुरी आहे. कारण सत्य गोष्ट जाणली नाही म्हणून ती खोटी होत नाही! तुम्हांला चोरी करणे चुकीचे आहे हे माहीती नसले तरी त्यामुळे केलेल्या चोरीची शिक्षा कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला आपण सुखी आहोत असे आत्ता वाटत असले तरी त्यामुळे उद्याच्या दुःखाचा झटका कमी होणार नाही हे जाणून घ्या व वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्‍न करा. नाहीतर वाळवंटात वाळूचे वादळ आले की शहामृग वाळूत आपले डोके खुपसून वादळ आले नाही असे म्हणतो तशी तुमची अवस्था होईल. सध्याच्या जीवनात आपण सुखी आहोत असे ज्यांना वाटत आहे त्यांनी आपली खात्री अंधश्रध्दा आहे की योग्य आहे हे पाहण्याकरीता खालील एक अत्यंत साधा प्रयोग करुन पहावा. तो प्रयोग असा आहे:

आधी कागदावर एक तक्‍ता तयार करा. तो तयार करण्याकरीता दिवसाच्या बारा तासांना दोन दोन तासांमध्ये विभागून उभ्या रेषा मारा. उदाहरणार्थ, सकाळी ६ ते ८, नंतर ८ ते दहा, वगैरे. त्याखाली प्रत्येक दिवसाकरीता एक अशा आडव्या रेषा मारा. मग एक महीना त्या तक्‍त्यामध्ये वरील दोन तासांच्या खाली त्यावेळात आपण किती सुखी होतो याची नोंद करा. उदाहरणार्थ, सकाळी ७ला उठताना ऑफिसमध्ये जायचा कंटाळा येऊन तुम्ही उठला असाल तर ६ ते ८ च्या खाली १०पैकी ४ गुण भरा, याउलट सकाळी उत्साहाने उठलात तर ८ गुण द्या. दोन तासातील आपल्या जीवनाला विसरण्याआधीच तक्‍ता भरायचा असल्याने दररोज दिवसातून दोनवेळा हा तक्‍ता भरा. उदाहरणार्थ, दुपारच्या जेवणाच्या वेळी व रात्री झोपताना. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हे दहापैकी गुण तुमच्या स्व्तःच्या कल्पनेने तुम्हांला द्यायचे आहेत. कधी कधी सर्व जग तुम्हांला सुखी समजत असताना तुमच्या मनात कुठलेतरी दुःख सलत असते. अशावेळी तक्‍त्यात २ गुण भरा. याउलट सर्वांच्या दृष्टीकोनातून दुःखदायक घटना घडली तरीसुध्दा तुमचे मन शांत असेल तर ९ गुण द्या. आपले आपण स्वतःला किती सुखी मानत आहोत हे बघायचा हा खेळ आहे. यात जगाचा काही संबंध नाही, म्हणून आपल्या मनाच्या अवस्थेवरच गुण भरा. सुरुवातीला दोन तासाच्या मनाच्या सरासरी अवस्थेवर गुण द्या. मग हा दोन तासांचा वेळ कमी करुन एक तासाचा तक्‍ता करा. ज्याप्रमाणे वजन कमी करायला व्यायामशाळेत गेल्यावर आपल्या अंगाच्या विविध भागांच्या आकाराची नोंद एका तक्‍त्यात करण्यात येते आणि आपली प्रगती त्या तक्‍त्यातील नोंदींवरुनच आपल्याला पूर्णपणे कळते तशीच ही गोष्ट आहे. दररोज आपल्या मनाच्या विविध अवस्थांच्या नोंदी ह्या तक्‍त्यात करायच्या आहेत व शेवटी कुठली अवस्था प्रामुख्याने येते हे बघायचे आहे!! म्हणून जेवढ्या कमी वेळाच्या नोंदी कराल तेवढे तुम्हांला स्वतःच्या आयुष्याचे अधिक ज्ञान होईल. महिनाभरातच तुम्हांला लक्षात येईल की तुमची स्वतःच्या सुखीपणाची समजूत कितपत खरी आहे आणि कितपत मानलेली आहे. जर तुम्ही सुखी नाहीत असे कळले तर ते मान्य करुन सुखी होण्याकरीता प्रयत्‍न करायला तुम्ही आपणहूनच सुरुवात कराल! मी स्वतः हा प्रयोग आपल्या मनात करुनच ज्ञानेश्वरीकडे वळलो आहे!!

जर तुम्हांला आपण सुखी नाही असे कळले तर मग स्वतःला कुठल्या गोष्टीने सतत सुख मिळू शकेल याचा विचार करा. स्वतःला अगदी साधे सरळ प्रश्न विचारा. मी अमुक अमुक गोष्टींच्या प्राप्तीकरता का जीवापाड धडपड करीत आहे? असे विचारा. स्वतःच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी स्वतःला धृतराष्ट्रच समजतो. ह्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये मला लागू होणारे व्यक्‍तिमत्व केवळ धृतराष्ट्राचे आहे हे मला पूर्णपणे कळलेले आहे. असे बघा, इतक्यावेळा ज्ञानेश्वरी वाचून माझ्या आयुष्यात काय फरक पडला आहे? जगातील कितीजणांना मी उपदेश करतो यात मला महत्व वाटत नाही. प्रगतीची एकमेव खूण म्हणजे माझे नेहमीचे आयुष्य जगताना मी कसा वागतो ही आहे. आणि हे बघितले तर माझ्यात आणि धृतराष्ट्रात काही फरक आहे असे मला वाटत नाही. अत्यंत प्रामाणिकपणे मी ही गोष्ट कबूल करत आहे. दरवेळी संसारातील गोष्टींना महत्व देण्यात अर्थ नाही हे कळूनसुध्दा शेवटी वागण्यात काही फरक होतो का? अध्यात्मिक प्रगती बघायला मनात किती शांती आहे हे बघणे हा एकच मानदंड आहे. जोपर्यंत मन अस्वस्थ आहे, नवीन गोष्टींची मागणी करीत आहे तोपर्यंत आपली अवस्था धृतराष्ट्रासारखीच आहे. हे जाणून घेऊन सतत प्रयत्‍न करीत रहा असेच या ओवींचे सांगणे आहे असे वाटते.

खरे म्हणजे या ओवींचे सांगणे आपल्या अज्ञानालासुध्दा लागू आहे! म्हणजे आपले अज्ञानसुध्दा कधीतरी जाणारच आहे (व नित्य नाश पावत आहे!) ही खात्री मनात ठेवून, सध्याच्या अज्ञानाबद्दल निराश न होता प्रयत्‍न करीत राहणे एवढेच आपल्या हातात आहे. तसा प्रामाणिक प्रयत्‍न करायला आपण आजच सुरुवात करुया.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (517-520)/9:

Worshipping the Abstract God

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सुरुवातीचे नमन

 

नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

ज्ञानेश्वरीतील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ह्या ओव्या म्हणून मगच आपण प्रवचनाला का सुरुवात करतो? याचे कारण असे की, ह्या ओव्यांतून ह्या प्रवचनाला (किंवा अध्यात्माच्या मार्गावर) आपण का आलो हे आपल्याला नीट ध्यानात येते म्हणून. कुठल्याही गोष्टीचा संपूर्ण फायदा आपल्याला हवा असेल तर ती गोष्ट आपण का करतो याचे सतत ध्यान ठेवणे जरुरी असते. नाहीतर त्या गोष्टीच्या मुख्य अंगाकडे दुर्लक्ष होऊन दुसऱ्या कमी महत्वाच्या अंगाकडेच लक्ष जायची शक्यता असते. अर्थात जी गोष्ट मुळात चांगली असते तीचा फायदा हा होणार असतोच पण संपूर्ण फायदा व्हायला हेतूचे ध्यान सतत ठेवणे जरुरी आहे. या गोष्टीचे एक उदाहरण म्हणजे जेव्हा आपण तीर्थयात्रा करतो, आपल्या गुरुंच्या ठिकाणी जातो, तेव्हा साधनेत प्रगती व्हावी म्हणून आपण येथे आलो आहोत ह्या हेतूचे विस्मरण झाले तर आपल्या यात्रेचा व्हावा तेवढा फायदा होत नाही. यात्रेच्या ठिकाणाहून परत आल्यावर परत आपले आयुष्य नेहमीसारखेच सुरु होते. जेव्हा आपल्याला असे वाटते की देवाकडे लक्ष द्यायची वेळ आलेली आहे तेव्हा कुठल्या देवाकडे आपण जावे? विष्णूकडे, का रामाकडे का भगवान शंकराकडे आपण जावे? ज्ञानेश्वर महाराज पहील्या ओवीत म्हणत आहेत की आपल्या संवेदनांनीच जाणून घेऊ शकणाऱ्या, ज्याच्याबद्दल सर्व वेद लिहीले आहेत अशा देवाकडे आपल्याला जायचे आहे, त्या देवाचे निवासस्थान आपले आत्मरुप हे आहे. पहिल्या ओवीतील सांगितलेल्या परमेश्वराकडे जायचे आहे आणि त्या आपल्या आत्मरुपात स्थित असलेल्या परमेश्वराच्या जवळ जाण्याकरीता आपण येथे जमलो आहोत.

आपल्यापैकी बऱ्याचजणांना देवाच्या एका मूर्तीची आवड असते. संध्याकाळी रामाच्या देवळात जाऊन आले की मन प्रसन्न होते असा कित्येकांचा अनुभव आहे. ही देवाच्या एका ठराविक अवताराची आवड चांगली आहे यात प्रश्नच नाही, पण ह्या चांगल्या गोष्टीचा उपयोग करुन आपल्याला त्याच्यापेक्षाही चांगली गोष्ट प्राप्त करायची आहे हे लक्षात ठेवा. ती मूर्तीप्रेमापेक्षा उच्च असलेली गोष्ट म्हणजे परमेश्वराचे आपल्या बरोबर असलेले अजोड नाते जाणणे होय. देवाच्या एका ठराविक मूर्तीवर भक्‍ती करणे लोकांना सोपे वाटते, याचे एक कारण असे की रामाची मूर्ती पाहीली की लगेच त्याचे अनेक चांगले गुण आठवितात. त्याचे सत्य बोलणे, आई-वडिलांचा मान राखणे, रावणाचा नाश करणे इत्यादी गोष्टी आठवून असा अवतार झाला हे किती बरे झाले असे वाटायला लागते व मन भरुन येते. त्याचप्रमाणे कृष्णाची मूर्ती बघितली की प्रत्येकाच्या मनात (त्याच्या वयानुसार!) एका आदर्श मुलाची, सख्याची, प्रियकराची वा गुरुची प्रतिमा दिसते व त्या आदर्शत्वामुळे आपल्या मनाला त्या अवताराबद्दल साहजिकच ओढ लागते, प्रेम उत्पन्न होते. मनात भक्‍तीचा आपोआप उदय होतो. ही गोष्ट अतिशय चांगलीच आहे यात प्रश्न नाही. परंतु ही मूर्तीमुळे निर्माण झालेली भक्‍ती हे एक साधन आहे (साध्य नाही) हे लक्षात ठेवणे जरुरी आहे. या भक्‍तीचा उपयोग करुन आपल्याला अजून पुढे जायचे आहे हे आपण विसरता कामा नये. वास्तविक पाहता अशा भक्‍तीने आपले मन बराचवेळ प्रसन्न राहते, दररोजच्या धकाधकीच्या जीवनाचा विसर पडतो हे खरे आहे. त्यामुळे ह्यापुढे जायचे कारण काय असे तुम्हांला कदाचित वाटेल. ह्या भक्‍तीत गुंगून न जाता त्याहूनही पुढे जायचे असेल तर अशा भक्‍तीचा तोटा काय हे आपण सतत नजरेसमोर ठेवले पाहीजे. एकदा मूर्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या भक्‍तीच्या तोट्याची पूर्ण जाणीव झाली की त्यापुढे जायला हवे हे तुम्हाला वेगळे सांगावे लागणार नाही.

मूर्तीवर, वा एखाद्या गुरुतुल्य व्यक्‍तीवर असलेल्या भक्‍तीचा एक मोठा तोटा म्हणजे आपल्या मनातील ही भक्‍ती आणि आपले दररोजचे जीवन यात आपल्याला काहीही संबंध दिसत नाही हा होय. ज्याला रामाची ओढ आहे, त्याने रामनवमी साजरी केली, दररोज त्याची पूजा केली की आपले जीवन कसेही जगायला तो तयार होतो. आपल्या नातेवाईकांशी कठोर वागणे आणि रामावर भक्‍ती असणे यात कितीजणांना विसंगती दिसेल? एकदा मूर्तीची पूजा केली की आपली भक्‍ती सिध्द झाली असे म्हणून आपण आपले नेहमीचे जीवन आहे तसेच ठेवतो. (अर्थात, काही अत्यंत सूज्ञ माणसे रामाच्या भजनातच दिवसाचे चोवीस तास घालवितात व त्यामुळे या भक्‍तीशिवाय वेगळे जीवनच त्यांना रहात नाही. परंतु आपली अशी पुढील प्रगती करुन घेणारी माणसे फार विरळा आढळतात. आपण त्यांना सोडून आपल्यासारख्या माणसांची गोष्ट बघू.) माझ्या बायकोशी मी कसा वागतो, माझ्या आईची काळजी कशी घेतो (वा कशी घेत नाही!) यामध्ये रामाचा संबंध काय आहे असेच आपल्याला वाटते. रामाच्या देवळातून घरी आल्यावर तुमची भक्‍ती कुठे जाते? फार थोडी माणसे असे म्हणतात की मी रामावर भक्‍ती करतो म्हणजे मला त्याच्यासारखेच वागावे लागेल. माझ्या आयुष्यात रामासारखे वागणे हेच माझे ध्येय असायला हवे असे म्हणून भक्‍ती करणारे या जगात किती असतील? आपण आहोत का? रामाच्या मूर्तीसमोर लोटांगण घालून घरी परत आल्यावर माझ्या मुलावर मी उगाचच ओरडलो किंवा बायकोला कारणाशिवाय कठोर शब्द बोललो तर त्यामध्ये मला माझ्या भक्‍तपणात काही विसंगती दिसत नाही. `शेवटी व्यवहार हा वेगळाच असतो हो, त्यात साधे राहून चालत नाही’ असे परत म्हणायला आपण मोकळे! आपल्या अशा वागण्यात आपली चुकी न दिसणे हा या भक्‍तीचा मोठा तोटा आहे. याचा अर्थ असा की आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या रामाच्या भक्‍तीचा उपयोग कसा करुन घ्यावा हे न कळणे हा आपल्या भक्‍तीचा कमीपणा आहे.

याउलट, देवाला आपण जर आत्मरुपात बघितले तर ज्याक्षणी आपण स्वयंपाक करीत आहोत, आपल्या सुनेशी बोलत आहोत वा आपल्या मुलांकडे बघत आहोत त्या प्रत्येकक्षणी आपल्याबरोबर देव आहेच की! मग ज्याप्रमाणे देवळात आपण देवाचा आदर राखायला वागण्यात शुचित्व राखतो त्याचप्रमाणे (देव सतत बरोबर असल्याने) जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण वागण्यात आपोआप शुचित्व ठेवायला लागू. दररोजचा व्यवहार करताना देवळात असल्यासारखे वागू. आपण सतत देवासमोरच आहोत ही जाणीव जेव्हा जागृत होते तेव्हा आपली भक्‍ती एका वेगळ्याच, उच्च, पातळीवर गेली आहे असे समजायला काहीच हरकत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला न आवडणारी माणसे देवळात भेटली तरी आपण त्यांच्याशी सभ्यतेने वागतो, त्याचप्रमाणे देव सतत जवळ आहे ह्या भावनेमुळे तुम्ही जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीकडे सहीष्णुतेने बघायला लागाल. तुम्ही मनाने चांगले व्हाल!

असे बघा, एखादी कृती करत असताना आपल्या मनात चांगले विचार असणे याला फार महत्व आहे. बाहेरुन कृती चांगली असणे हेसुध्दा चांगलेच आहे, पण त्यात आपले मन शुध्द नसेल तर आपल्याला त्या चांगल्या कृतीचा अध्यात्मिक फायदा फार होत नाही. म्हणूनच सामाजिक कार्य करणारी माणसे अध्यात्मिक जगात उच्च पातळीवर असतीलच असे नाही. एखादेवेळी पाहुणे आल्यावर तुम्ही त्यांना वेळच्यावेळी चहा करुन दिला हे चांगलेच आहे पण त्यावेळी तुमची मनःस्थिती कशी होती हे स्वतः पाहणे आवश्यक आहे. काय कटकट आहे या भावनेने चहा करणे आणि `अतिथी देवो भव’ या भावनेने चहा करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे सांगायला हवे असे नाही. कर्तव्य म्हणून दुसऱ्यांना मदत करीत असताना तुमच्या मनात काय विचार येतात हे फक्‍त तुम्हांला माहीत आहे. सगळे जग तुमच्या बाह्य कृतींकडे बघून वाहव्वा करीत आहे पण केलेल्या चांगल्या गोष्टी प्रेमाने केल्या आहेत की नाही हे फक्‍त आपल्या स्वतःला माहीत असते. आयुष्यात जेवढ्या गोष्टी तुम्ही प्रेमाने कराल तेवढी अध्यात्मात तुमची प्रगती लवकर प्रगती होईल कारण आत्मरुपी देव आपल्या प्रेमयुक्‍त वागण्यानेच प्रसन्न होत असतो.

मग प्रश्न असा येतो की मनाने चांगले व्हायचे कसे? त्याकरीता पुढील एक विचार फार उपयुक्‍त आहे. तो म्हणजे दुसऱ्याला मदत करताना जी कंटाळवाणेपणाची भावना आपल्या मनात होती ती फक्‍त आपल्याला माहीती आहे असे तुम्हाला वाटत आहे ते चुकीचे आहे हा होय. जर आत्मरुपात देव आहे तर त्या देवाला तुमच्या मनाच्या अवस्थेची पूर्ण जाणीव आहे हे सहजच आहे. जगात तुम्ही मोठे सामाजिक कार्य केले, दहा जणांनी कौतुक केले तरी त्याचे महत्व फार नाही. मी इतक्या लोकांना सल्ला दिला तो त्यांनी परत माझ्याकडे यावे ह्या हेतूने दिला की परत यायची पाळी कधीही येऊ नये म्हणून दिला हे फक्‍त दोघांना माहीती आहे. एक तुम्ही आणि दुसरा म्हणजे तुमच्या आत्मरुपातील देव. याची जाणीव तुम्ही सतत ठेवा. ही जाणीव सतत ठेवणे म्हणजेच आत्मरुपी देवाचे अस्तित्व मान्य करणे होय आणि म्हणूनच त्याची भक्‍ती करणे होय.

आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या सर्व चुका देवाला माहीती आहेत या भावनेने अस्वस्थ होऊ नका. मनुष्यजन्माला आल्यावर कुणीही आदर्श राहूच शकत नाही. मनुष्याचा देह आल्यावरच का, आपल्या हिंदू धर्मातील देवसुध्दा आदर्श व्यक्‍तीमत्व नाहीत हे ध्यानात घ्या. इंद्रासारखा देवांचा राजादेखील स्वतःच्या देहाचे रुप बदलून दुसऱ्याच्या पत्नीचा उपभोग घ्यायला उद्युक्‍त होतो, तर आपल्यासारख्यांच्या हातून चुका होणार यात नवल काय आहे? म्हणून आपल्या हातून घडलेल्या चुकांनी बेचैन होऊ नका. त्या स्वीकार करा व आत्मरुपात स्थित असलेल्या देवाच्या चरणांवर अर्पण करा, आदर्श व्यक्‍ती बनायचा अजिबात प्रयत्‍न करु नका. कुठल्या भावनेनी तुम्ही कार्य करीत आहात हे नीट बघा असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा फक्‍त तेवढेच करणे अपेक्षित आहे हे ध्यानात घ्या. मी अमुक एका कारणाने अमुक एक वागलो हे मला कळले आता पुढे काय? तर पुढे काहीही करायचे नाही! फक्‍त लक्ष द्यायचे आहे. आपल्याला एका साच्यात (आदर्श व्यक्‍तिमत्वाच्या) घालायचे नाही हे ध्यानात ठेवा. खरे म्हणजे आदर्श व्यक्‍तीमत्वाची कल्पना काही एक नाही. उलट जेवढ्या व्यक्‍ती आहेत तेवढ्या आदर्शतेच्या कल्पना आहेत. उदाहरणार्थ, लग्न झाल्यावर मुलीला आदर्श सून बनायचे असते तर सासूला असे वागायची इच्छा असते की लोकांनी आपला आदर्श ठेवावा. मुलाला आईची काळजी व्यवस्थित घ्यायची असते. आपापल्या कल्पनेप्रमाणे आपण स्वतःला साच्यात घालायचा प्रयत्‍न करत असतो. परंतु अशा प्रयत्‍नात आपण हे विसरतो की परमेश्वराने अशी कुठलीही अट घातली नाही की आधी अमुक अमुक व्यक्‍ती बना आणि मग माझ्याकडे या. तुम्ही असाल तसे स्वीकार करायची त्याची तयारी आहे. त्याची आपल्याकडून अपेक्षा फक्‍त आपण त्याच्याकडे जायचा प्रामाणिक प्रयत्‍न केला पाहीजे एवढीच आहे. आत्मरुपी देवाकडे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न म्हणजेच आपण आहे तसे प्रामाणिकपणे स्वीकार करणे होय.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या जीवनाचे ध्येय आपल्या अगदी जवळ असलेल्या परमेश्वराचे रुप जाणून घ्यायचे आहे असे ठेवा. मग बाकीच्या फार गोष्टी कळल्या नाहीत तरी चालेल. एकदा श्री हनुमान शांतपणे वनात श्रीराम, श्रीराम असा जप करीत बसलेले असताना त्यांना कुणीतरी विचारले की एवढा श्रीरामाचा जप तूम्ही करता, आयोध्येला कसे जायचे हे आम्हांला सांगितले तर आम्हीसुध्दा श्रीरामाचे दर्शन घेऊ. यावर तो म्हणाला, बाबांनो मला श्रीराम श्रीराम हे नाम घेणे या शिवाय या जगातील कुठलीही गोष्ट माहीती नाही. आयोध्येचा मार्ग तर सोडाच, आज पौर्णिमा आहे की अमावस्या आहे वा आत्ता दिवस आहे की रात्र आहे हेसुध्दा मला नीट सांगता येणार नाही. तुम्हीसुध्दा या श्रीरामाचे नाव कसे घ्यायचे हेच शिका. बाकी काही महत्वाचे नाही. याउलट आपल्याला आज कुठली तिथी आहे हे माहीती आहे, आयोध्येला कुठली गाडी जाते हे माहीती आहे फक्‍त हनुमानासारखे श्रीराम कसे म्हणावे हेच माहीती नाही! मूळ गोष्ट बाजूलाच ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्येच आपले सगळे लक्ष आहे! आता वेळ आलेली आहे की आपले ध्येय तरी आपण व्यवस्थित ठेवले पाहीजे, जगण्याचा हेतू शुध्द असला पाहीजे. मग ते ध्येय साध्य करु की नाही, शुध्द हेतू आचरणात आणू की नाही ही गोष्ट आपण नंतर पाहू. आपल्या नमनाच्या तीन ओव्यांपैकी पहीली ओवी कुठले ध्येय ठेवणे बरोबर आहे, कुठला हेतू शुध्द आहे, हे सांगत आहे आणि म्हणून आपण ती दरवेळी म्हणतो. आपल्या आत्मरुपात स्थित असलेल्या देवाचे दर्शन घेणे असे आपले ध्येय ठेवून जीवनातील सर्व कर्मे करावी असे श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पहील्या ओवीत सांगत आहेत.

आता दुसऱ्या ओवीकडे बघा. जेव्हा आपले ध्येय आत्मरुप जाणून घेणे आहे असे आपण निश्चयपूर्वक ठरवितो तेव्हा बाकीच्या लोकांचे आपल्या जीवनातील महत्व कमी व्हायला लागते. मी आणि देव ह्या दोघांतलाच खेळ खेळायचा असल्याने बाकीची सर्व माणसे, घटना म्हणजे केवळ त्या आत्मरुप जाणून घेण्याच्या खेळाचे साहित्य ठरतात. अशावेळी आपल्याला एक पोकळी जाणविण्याची शक्यता असते, ती पोकळी भरुन काढण्याकरीता आपण `जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो, स्वसंविद द्रुमबीजप्ररो, हणावनि’ ही ओवी म्हणतो. आता ही पोकळी कोणती जे जाणण्याकरीता जरा कल्पना करा की तुमच्या जीवनातून तुमची मुले, सुना, बायको, आई-वडिल या सर्वांना काढून टाकले तर तुम्हाला काय वाटेल? खरे पहायला गेले तर आयुष्यभर आपण सतत दुसऱ्याचा विचार करुन जगत आलो आहोत असे दिसेल. लहानपणी आई काय म्हणेल या विचाराने आपले वागणे घडत होते तर मोठेपणी बायको (बाईच्या बाबतीत सासरची माणसे!) व नंतर वृध्दाप्यकाळी समाज काय म्हणेल याची काळजी करीतच आपण जगलो आहोत. अगदी स्वतःच्या मनासारखे वागायला आपल्याला कधी-कधीच मिळाले आहे. दुसऱ्यांकरीता सतत तडजोड केल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांकडूनसुध्दा तशीच अपेक्षा असते. जीवन जगताना आपल्या अपेक्षा दुसऱ्यांनी पुऱ्या केल्या की जगण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. म्हणूनच बऱ्याच बायकांची आयुष्य सफल झाले ह्याची व्याख्या म्हणजे `समाजात मान आहे आणि मुलगा व सून माझ्याशी नीट वागतात बरं का’ अशी असते! अशावेळी ह्या सर्वांचे महत्व आपण कमी केल्यावर, त्यांच्या निघून जाण्याने, आपल्याला एकप्रकारचे स्वातंत्र्य मिळते हे खरेच आहे पण त्याचबरोबर जीवनात एक पोकळीसुध्दा तयार होते. ती पोकळी भरुन काढणे आवश्यक आहे. सर्व जगाच्या नाशाने आपल्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरायला एकच व्यक्‍ती समर्थ आहे. ती म्हणजे आपले सद्‌गुरु.

सध्या मला माहीती नसलेल्या परमेश्वराला शोधून काढायचे आहे असे जीवनाचे ध्येय ठरविले आणि या जगातील कुठलीही गोष्ट मला त्या ध्येयापर्यंत पोहोचविणार नाही तर केवळ आपल्या संवेदनांनी मला माझ्या जीवनातल्या भगवंताला जाणून घ्यायचे आहे अशी खात्री झाल्यावर जी एकटेपणाची भावना निर्माण होते, तीला काढून टाकणे जरुरी आहे. त्याकरीता हा जो स्वसंवेदनाचा वृक्ष तुमच्या जीवनात तयार झाला आहे त्याचे बीज आपल्या गुरुंनी पेरले आहे हे लक्षात ठेवा. ही गोष्ट ध्यानात आल्यावर आपला जन्म होण्याआधीपासून गुरु आपली काळजी घेत आहेत व सतत घेणार आहेत ही खात्री तुमच्या मनात होईल व जगातील आपल्या एकलेपणाची भावना नष्ट होईल.

तुम्ही म्हणाल की मला कुणी अनुग्रह दिला नाही, मला कुणी मंत्र सांगितला नाही मग माझे गुरु आहेत असे मी कसे मानू? असे बघा, अनुग्रह देणारे गुरु हे तुमच्या सद्‌गुरुंची एक छाया आहे. ज्या गुरुंकडून तुम्ही मंत्राची वा अनुग्रहाची अपेक्षा करता, त्या गुरुंचा देह तुमचे गुरु नाहीत, तर त्या देहामार्फत तुमच्या स्वतःच्या सद्‌गुरुंनी एक बाह्य अवतार घेतला आहे असे तुम्ही मानले पाहीजे. श्री रमणमहर्षी नेहमी म्हणायचे की एकच गुरु या जगात आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की मी काही कुणाचा गुरु नाही, खरे गुरुतत्व हे एकच आहे, ते म्हणजे निर्गुण परमेश्वर. म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञानी गुरुंचा अनुग्रह मिळाला आहे त्यांनी आपल्या पूर्वप्रारब्धामुळे या जगात ह्रुदयातील सद्‌गुरुंचे प्रतिबिंब प्राप्त झाले आहे असे मानायला पाहीजे. आपले पूर्वसुकृत त्यांच्याएवढे चांगले नसले तरी निर्गुणरुपात आपल्या सर्वांकडे गुरु आहेतच ही भावना जागृत ठेवा. ह्या निर्गुण रुपातील गुरुंचे अस्तित्व आपल्या नेहमीच्या जीवनात बघायची सवय लावा. असे बघा की जेव्हा जेव्हा आपल्याला अत्यंत अस्वस्थ करणारी घटना घडते, मन पराकोटीचे चलबिचल होते तेव्हा तेव्हा आपल्या सर्वांना ह्या कठीण प्रसंगी कसे वागावे याचे एक आपोआप ज्ञान आतून होते. (आपण त्याप्रमाणे वागू शकतो की नाही हा भाग वेगळा आहे.) ही कठीण प्रसंगीची अंतर्स्फूर्ती कुठून आली? कशी आली? तुम्ही विचार केला तर असे दिसून येईल की त्या मोक्याच्यावेळी आतून आलेल्या सूचनेमध्ये कुठलीही भावना अजिबात नसते. अगदी निर्विकारपणे, एखाद्या परीक्षेतील प्रश्नाचे उत्तर द्यावे तसे आपल्याला कळते की आता काय करावे, कुणाला मदत मागावी, कसे वागावे. हे उत्तर आपल्या मानसिक चलबिचलतेहून अगदी भिन्न असते, जसे काही कुणी दुसऱ्या माणसाने उपदेश केला आहे असे आपल्याला तेव्हा वाटते. ह्या उत्तर येण्यातच आपल्या ह्रुदयातील निर्गुण रुपातील सद्‍गुरुचे अस्तित्व सिध्द होते हे ध्यानात घ्या. त्या उत्तरामधील तटस्थता असे सांगत आहे की हे उत्तर आपल्या बुध्दीने आलेले नाही. कधी कधी मिळालेले उत्तर एवढे विचित्र असते की आयुष्यात ते लागू करण्याचे धैर्य आपल्यात नसते! असे कसे करता येईल? या विचाराने आपण मग ते उत्तर आणि आपले आत्तापर्यंतचे जीवन (व आपल्या भविष्याच्या अपेक्षा) यात एक तडजोडीचा मार्ग काढतो. ही तडजोड करणे म्हणजे सद्‌गुरुंच्या सल्ल्याप्रमाणे न वागणे होय हे आपल्या लक्षातसुध्दा येत नाही व आपल्या नकळत आपण सद्‌गुरुंहून दूर जात असतो. साधनेच्या मार्गावर चालताना सुरुवातीला तुम्हाला असे वाटायची शक्यता आहे की मी कुणाची मुलगी नाही, आई नाही, बायको नाही, सून नाही तर मी आहे तरी कोण? या नात्यांमध्ये आपण सतत राहीलो असल्याने ओळखीने प्राप्त झालेली एक सुरक्षितता आहे ती गमावू अशी भीती तुम्हाला वाटेल (आणि ती वाटणे साहजिक आहे) तेव्हा तुम्ही फक्‍त असा विचार करा की मी जी काही व्यक्‍ती आहे तीच्याबरोबर सद्‌गुरु सतत आहेत. हे दुसऱ्या ओवीचे सांगणे आहे.

आता ही प्रक्रिया केव्हा सुरु करायची? जीवनाचे ध्येय बदलायची वेळ आली आहे हे केव्हा समजायचे ह्या करीता तिसरी ओवी आहे. ती पसायदानातील ओवी म्हणत आहे `पूर्ण होऊनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित’. तुमची सध्याची जी जीवनातील ध्येये आहेत ती सर्व पूर्ण झाल्यावर तुम्ही आदिपुरुषाला भजा (हा आदिपुरुष आणि पहिल्या ओवीतला `आद्या’ एकच आहेत. म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्ञानेश्वर महाराज एकच गोष्ट परत परत सांगत आहेत!). आपली सध्याची जी ध्येये आहेत ती पुरी झाल्यावर आपण लगेच जीवनाचा अंत करायला तयार आहोत का? समजा तुमच्या मुलाला मैट्रीकच्या परिक्षेत उत्तम गुण मिळालेच पाहीजेत हे सध्याचे तुमचे ध्येय आहे, त्याकरीता अहोरात्र तुम्ही त्याच्या अभ्यासात मदत करीत आहात. त्या मुलाला खरेच चांगले गुण मिळाल्यावर तुम्ही असे म्हणत नाही की माझ्या सर्व इच्छा पुऱ्या झाल्या आहेत, आता पुढे काहीही नको. लगेच त्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहीजे अशी इच्छा निर्माण होते. त्याचे सर्व शिक्षण पूर्ण झाले तरी आपले समाधान होत नाही. चांगली नोकरी पाहीजे, त्यानंतर चांगली बायको, त्याहीपुढे मूले, मग त्या मुलांच्या मुलांचे शिक्षण, मुंज आहेच की!! आपणच आपल्यापुढे सतत नवनव्या इच्छा निर्माण करीत असतो. त्याच्या पूर्तीमध्येच आपले समाधान ठरवितो. खरे म्हणजे कुठलीही गोष्ट आपण ठरविली नाही की ती मिळाल्यावर आपण लगेच जीवनाचा अंत करु. खरे म्हणजे जीवनाचे ध्येय पूर्ण झाले असेल तर मग पुढे जगायचे कशाला? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लगेच समाधी घ्यायची इच्छा व्यक्‍त केली कारण आता यापुढे जगण्यात काय अर्थ आहे असे त्यांना वाटले होते. परंतु आपल्या सर्व इच्छा अशा असतात की त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपले जीवन अस्वस्थ होते पण त्या पूर्ण झाल्यामुळे जीवनात फारसा फरक पडत नाही हे ध्यानात घ्या. म्हणूनच परत नवनव्या इच्छा निर्माण होतातच. हे तुम्ही पूर्ण जाणून घेतले की सध्याच्या इच्छांचा मोह, त्यांचा तुमच्यावर असलेला पगडा कमी होईल, हळूहळू त्या इच्छाच नाहीशा होऊ लागतील. ज्ञानेश्वरांना सर्वजण पूर्ण होऊन मग अध्यात्माला लागावे असे जे वाटत आहे ती पूर्ण होण्याची अवस्था म्हणजे हे सध्याच्या इच्छांचे क्षुल्लक रुप जाणविणे होय. त्या इच्छांच्या पूर्तीमध्ये खरे समाधान नसते तर त्या इच्छांचा आपल्या मनावर पगडा कमी होणे यात त्यांची पूर्ती असते हे जाणून घ्या. तेव्हा तिसरी ओवी आपल्याला काय सांगत आहे तर अध्यात्माच्या मार्गावर पूर्ण झोकून द्यायची अवस्था आली आहे हे ओळखायला सध्याच्या जीवनातील इच्छांचे महत्व कमी झाले आहे का हे आपण बघावे. जर त्या इच्छांमध्ये फारसा रस वाटत नसेल तर आणि तरच तुम्ही आत्मरुपी देवाचे अखंडित भजन करायच्या पातळीवर आला आहात. नाहीतर व्यावहारीक इच्छांबद्दल तात्पुरते वैराग्य आले असेल, त्यांचा तुमच्यावर असलेला पगडा कमी झाला नसेल तरी जबरदस्तीने निर्गुण परमेश्वराच्या प्राप्तीकरीता प्रयत्‍न सुरु करणे म्हणजे सध्याची खोली घाण आहे म्हणून शेजारच्या खोलीत जाण्यासारखे आहे. त्या खोलीतील घाणीचा वास दुसऱ्या खोलीत येणार आहेच. आधी ती खोली साफ करा (वैराग्य अंगात आणा) मग दुसऱ्या खोलीत जा (साधना सुरु करा) असे ज्ञानेश्वर महाराजांना पसायदानातील ह्या ओवीतून सांगायचे आहे असे वाटते. व्यवहारातील एखाद्या गोष्टीकरीता मी जगतोय असे जोपर्यंत तुम्हाला वाटत आहे तोपर्यंत तुम्ही आदिपुरुषाचे भजन करायला योग्य नाही हे लक्षात घ्या. जगात अशी एकही गोष्ट नाही की त्याच्या प्राप्तीकरीताच मी जगत आहे असे जेव्हा तुम्हांला वाटायला लागले तर तुमची खरी साधना करायची वेळ आलेली आहे असे माना. या वेळीसुध्दा तुम्ही साधना सुरु केली नाही तर तुमच्या जीवनाचा संपूर्ण फायदा तुम्ही घेतला नाही असे होईल. तिसऱ्या ओवीचे हे सांगणे आहे असे वाटते.

खरे म्हणजे इतकावेळ आपण जे ऐकले ते म्हणजे प्रवचन देण्यामागचा उद्देश्य स्पष्ट करणे होय, अजून मूळ प्रवचन सुरुच झाले नाही! परंतु हा वेळ फुकट गेलेला नाही. कुणीही आपल्याला एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्या मनुष्याचा हेतू काय आहे हे कळणे जरुरी आहे. हेतू शुध्द आहे अशी खात्री तुम्हाला झाली तर तुम्ही आपणहून आज ऐकलेल्या विचारांना गंभीरपणे घ्याल. असे बघा प्रवचनकार एका मोठ्या शाश्वत सत्याबद्दल बोलण्याचा प्रयत्‍न करीत असला तरी त्याच्यात आणि घरी येऊन स्वस्तात कपडे धुवायचा साबण विकण्याऱ्यात तत्वतः फरक आहे असे मला वाटत नाही. दोघांना आपल्याजवळ असलेली वस्तू तुमच्याकरीता चांगली आहे असे पटवून तुमच्या गळ्यात मारायची असते!! साबणाचा विक्रेता तुमचे कपडे स्वच्छ होईल असे सांगतो तर प्रवचनकार तुमचे जीवन शुध्द होईल असे म्हणत असतो! आता फुकटात प्रवचन ऐकायला मिळते असे तुम्ही म्हणाल तर प्रवचन ऐकण्यामध्ये तुम्ही पैश्यापेक्षाही फार मोलाची किंमत देत असता. ती गोष्ट म्हणजे तुमचे अवधान, अथवा पूर्ण लक्ष. ज्याप्रमाणे साबणाच्या विक्रेताच्या बोलण्याकडे नीट लक्ष देऊन ते पटले तरच तो साबण विकत घेता, त्याचप्रमाणे आजच्या बोलण्याकडे नीट लक्ष देऊन ते पटले तरच ऐकलेले विचार घरी न्या. विचार पूर्ण पटलेले आहेत तरी त्याप्रमाणे वागायची तयारी नाही असे मात्र करु नका. कारण त्यामध्ये तुम्ही स्वतःशी अप्रामाणिक राहता. आणि स्वतःशी अप्रामाणिक म्हणजे आपल्या ह्रुदयात असलेल्या देवाशी अप्रामाणिक राहणे होय. मग तुम्ही खरे भक्‍त कसे होणार? जे काही मनापासून पटले आहे ते सर्व आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करणे हेच आत्मरुपी देवाच्या खऱ्या भक्‍तीचे रुप आहे. अशा भक्‍तीनेच आपल्यातील सुप्त देवाची आणि आपली ओळख होत असते हे लक्षात ठेवा व त्याप्रमाणे वागायचा सतत प्रयत्‍न करा.

 

 

 

आजचे निरुपण

 

आज आपण गीतेच्या नवव्या अध्यायातील सर्वांत शेवटच्या श्लोकावर विचार करण्याचा प्रयास करणार आहोत. तो श्लोक असा आहे:

 

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्तैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४ : ९ ॥

 

ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या अशा आहेत:

 

तूं मन हे मीची करी । माझ्या भजनी प्रेम धरी ।

सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥ ५१७: ९ ॥

 

माझेनि अनुसंधाने देख । संकल्पु जाळणे निःशेख ।

मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८:९ ॥

 

ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।

हे अंतःकरणींचे तुजपासी । बोलिजत असे ॥ ५१९:९ ॥

 

अगा अवघिया चोरिया आपुले । जे सर्वस्व आम्ही ठेविले ।

ते पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥ ५२०:९ ॥

 

ह्या ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे: तूझे सर्व मन माझ्यावर ठेव, माझ्या भजनावर प्रेम ठेव आणि सगळीकडे मला एकालाच नमस्कार कर. माझ्या अशा अनुसंधानाने जीवनातले सगळे संकल्प जाळून टाक. मग तू माझा खरा भक्‍त होशील. असे जर तू केलेस तर तुझ्यात आणि माझ्यात काहीही फरक राहणार नाही. सगळ्यांपासून चोरुन ठेवलेला हा मार्ग मी तुला उघड सांगत आहे त्याप्रमाणे तू वाग आणि सुखी हो.

आत्तापर्यंत आपण असे बघितले की जे काही आपल्या मनाला पटेल, स्वसंवेदनाने जाणवेल त्याप्रमाणे वागायचा प्रयत्‍न करावा हा एक भक्‍तीचा प्रकार आहे. वरील श्लोकात भगवान श्रीकृष्ण असे सांगत आहेत की जगात जे काही होत आहे त्याला तू माझेच रुप समजून नमस्कार कर, तसे वागण्यामुळे तू माझ्या स्वरुपाला पावशील. आधीच्या विचारांशी सुसंगत असाच हा श्लोक आहे. तेव्हा आत्तापर्यंतचे व्यक्‍तव्यसुध्दा ह्या श्लोकावरचेच निरुपण आहे असे समजायला हरकत नाही. तेव्हा ह्या श्लोकाचा नुसता शाब्दीकच नव्हे तर परमार्थाच्या मार्गातला अर्थसुध्दा आपल्याला कळला आहे. आता उरलेला वेळ आपण ह्या अर्थाप्रमाणे का वागायला हवे याचा विचार करु.

अर्थात पहिले कारण म्हणजे भगवंतांनी आपल्याला सतत माझे ध्यान कर असे सांगितले आहे तेव्हा ते बरोबरच असणार हे आहे. देवाने सांगितले आहे त्याप्रमाणे आपण वागू शकतो की नाही हे बघणे म्हणजे आपल्या भक्‍तीची खरी परीक्षा आहे. आपल्या असे लक्षात येईल की ह्या परीक्षेमध्ये आपल्याला फार गुण मिळत नाहीत! परंतु म्हणून निराश व्हायला काहीही कारण नाही. आपली विचारप्रणाली बुध्दीवादी असल्याने दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागू शकत नाही हे कळल्यावर त्या बुध्दीचा उपयोग करुन आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. त्याकरीता आपल्या बुध्दीला असे पटवून द्यायला हवे की सतत भगवंताचा विचार करणेच आपल्याला उपयुक्‍त आहे, आणि त्यानेच आपले जीवन परीपूर्ण होईल. एकदा बुध्दीला पटले की मग आपोआपच आपले मन देवाचा विचार करायला लागेल.

भगवंताच्या ध्यानातच खरे सुख आहे हे पटण्याकरीता सध्याच्या जीवनात तुम्हाला काय कमी आहे याचा विचार करा. तुमच्या जीवनात तुम्ही पूर्ण सुखी असाल तर आहात तसेच रहा की. परमेश्वराचा विचार करुन मग सुखी व्हायची काहीच जरुरी नाही. तेव्हा तुम्ही आधी स्वतःच्या जीवनाकडे बघा आणि ठरवा की तुम्ही सुखी आहात की नाही. जर सुख अजून वाढावे अशी अपेक्षा असेल आणि भगवंताकडे जाऊन ते वाढत असेल तरच देवाकडे यायचा प्रयत्‍न करा. असे प्रयत्‍न आपण खूप मनापासून आणि दीर्घकाळ करु शकतो. जीवनातले दुःख सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे शारीरीक आणि दुसरे म्हणजे मानसिक. पहिल्यात शारीरीक वेदना जाणविते तर दुसऱ्या प्रकारच्या दुःखात मनाला अस्वस्थ वाटते. शारीरीक दुःख कमी करायला देवाची प्रार्थना करणे बरोबर नाही कारण अमूर्त देवाला सगुण देहाची काळजी करायला सांगणे तत्वतःच चुकीचे आहे. परंतु ज्या मनाला मानसिक दुःखात त्रास होत असतो ते मनसुध्दा अमूर्त आहे. त्याचे दुःख दूर करायला अमूर्त उपायच शोधायला हवा (ज्याप्रमाणे काट्याने काटा काढता येतो तशी ही गोष्ट आहे!). म्हणून साधना सुरु करण्याकरीता जीवनातले दुःख बघताना फक्‍त मानसिक दुःखच बघा.

खरे म्हणजे जीवनातले सगळे दुःख मानसिकच असते. शारीरीक वेदना केवळ निमित्तमात्र असते. लहानपणी भरदुपारच्या उन्हात, डांबरी रस्त्यावर अनवाणी पायांनी क्रिकेट खेळताना शरीराला काय कमी त्रास व्हायचा? पण तो अजिबात जाणवायचा नाही कारण त्यावेळी आपले सगळे लक्ष खेळाकडे असायचे. तेव्हा शरीराला वेदना झाली म्हणून दुःख होतेच असे नाही. याउलट त्याचवेळी खेळातून आईने काम करायला बोलाविले (जा, हे गहू गिरणीतून दळून आण!) की लगेच त्या दुपारच्या उन्हाची, तहानेची जाणीव होऊन दुःख व्हायचे, मनाची तडफड व्हायची! शारीरीक त्रास क्रिकेट खेळताना जास्तच असतो पण त्याने दुःख होत नाही तर जवळच्या दुकानात चालत जाण्यात दुःख होते. म्हणून शारीरीक व्यथांमध्ये दुःख नसते हे आधी जाणून घ्या व त्या बाजूला ठेवा. शरीरामध्येच इतके वर्षे गुंतून गेल्यामुळे शारीरीक व्यथांकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही हे मान्य आहे पण त्या व्यथांमध्ये तुमच्या दुःखाचे मूळ नाही ही सत्य परीस्थिती आपण जाणून घेतली पाहीजे. केवळ आत्तापर्यंत माहीती नव्हती म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. विचार करा आणि बघा की शरीर हे निर्जीव आहे आणि सगळे दुःख मनात होत असते. म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करायला शिका. परमार्थाच्या प्रगतीत आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करता येणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. तो गाठा.

मानसिक दुःखाकडे बघायचे झाले तर तुमच्या असे लक्षात येईल की तुम्ही सारखे दुःखातच आहात. सकाळी उठल्यावर नवऱ्याकरीता चहा केला पाहीजे. नंतर डब्यात जेवण द्यायला स्वयंपाक केला पाहीजे आणि तो नीट झाला पाहीजे, मग आंघोळ करुन भाजी आणायला जायला पाहीजे इत्यादींपैकी किती गोष्टी तुम्ही आनंदाने करीता? प्रत्येकवेळी छोट्या छोट्या दुःखालाच सामोरे जायला लागते. मग कधी कधी अचानक मुलगा वा नवरा म्हणतो की आज भाजी छान झाली होती तेव्हा सुख लाभते. पण असे सुख किती क्षणिक आणि दुर्मिळ असते हे आपण सर्व जाणतोच. आपल्या दररोजच्या जीवनातला कामाचा रगाडा आनंदाने करणारे फार थोडे भाग्यवंत जन्माला आले आहेत. आपण सर्वजण लहानपणी क्रिकेट खेळताना सूर्याचा तडाखा जाणवित नाही, तापलेला डांबरी रस्ता, डोक्यावरचा सूर्य जाणवित नाही अशा अवस्थेत आहोत. आपल्या संसाराच्या खेळात आपण एवढे गुंगून गेलो आहोत की हे दररोजची छोटी छोटी दुःखे आपल्याला जाणवित नाहीत. म्हणून आपल्याला संतांच्या सांगण्याप्रमाणे वागताना आईने बऱ्याचवेळाने खेळात फलंदाजी आलेली असताना `आत्ताच्या आत्ता दळण आण’ असे सांगितल्यावर कसे वाटते तसे वाटते. खरे म्हणजे त्या दळण आणण्यात कमी कष्ट आहेत आणि त्या कृत्याचा परीणाम चांगला आहे (आपल्याला वेळच्यावेळी जेवण मिळणार आहे!) हे माहीती असूनसुध्दा आपण खेळातच अधिक रमतो तशी आपली अवस्था आहे. दररोजच्या अनंत छोट्या छोट्या दुःखातून सुटण्याकरीता संसाराच्या खेळापासून थोडे अलिप्त होणे जरुरि आहे ही वस्तुस्थिती जाणून घ्या. मग तुम्हाला संसाराच्या खेळात अजून रमायचे असेल तर जरुर रमा. पण आज त्या खेळाची ओढ आधी जेवढी होती तेवढी नाही अशी तुमची अवस्था झाली असेल तर हा खेळ सोडायचे धैर्य दाखविणे जरुरी आहे.

एकदा तुमच्या मनात अशी भावना आली की मी सारखा उन्हात आहे की मग हा खेळ का खेळत आहे हा प्रश्न आपोआप येईल. सतत छोट्या छोट्या दुःखांची जाणीव झाली की सध्या संसारात जेवढे रमत आहात ते कमी कमी व्हायला लागेल. तेवढे तुम्ही देवाकडे जायचा आपोआप प्रयत्‍न करायला लागाल. `माझिया भजनी प्रेम धरी’ हे का करावे? तर त्याशिवाय जगणे असह्य आहे याची जाणीव झाल्यावरच. आणि ही जाणीव केव्हा होईल तर तुमच्या जीवनाकडे तुम्ही तटस्थतेने बघून त्यात दुःख आहे हे कबूल केल्यावरच. आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणे म्हणजेच आत्मरुपी देवाची भक्‍ती होय. `सर्वत्र नमस्कारी मज एकाते’ असे व्हायला, असा नमस्कार करायला, आधी आपण आपल्या जीवनातून थोडे दूर व्हायला हवे. आपला आपण स्वतःला नमस्कार करु शकतो का? आपल्या जीवनाकडे तटस्थपणे बघायला लागाल तेव्हा त्यातील परमेश्वराच्या रुपाला नमस्कार करायच्या ठिकाणी पोहोचाल. तुमच्या दररोजच्या जीवनाकडे जेवढे तुम्ही शांतपणे बघाल, स्वतःच्या भावनांचे विसर्जन करुन तटस्थपणे बघाल तेवढे तुम्ही परमेश्वराचे भजन करत आहात असे म्हणायला हरकत नाही. यालाच अनुसंधान म्हणतात. अनुसंधान म्हणजे सतत एका गोष्टीकडे लक्ष देणे. सतत स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे बघायचा प्रयत्‍न करणे म्हणजेच `माझेनि अनुसंधाने देख’. आयुष्यभर असे बघायचा चाळा लागला की स्वतःला काही हवे आहे असा विचार करायला वेळच उरत नाही. नुसते बघण्यातच आपला सर्व वेळ जात असल्याने आपल्याला स्वतःला काय हवे हा विचार करायलासुध्दा वेळ मिळत नाही. ही अवस्था म्हणजेच `संकल्पु जाळणे निःशेख’ होय. ज्याप्रमाणे रोमांचकारी सिनेमातल्या नटाच्या जीवनात घडणारे प्रसंग बघताना त्याला पुढे काहीतरी मिळावे अशी भावना यायला वेळच नसतो त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनात सतत होत राहीले की एक शांत भावना सतत मनात राहील. ही स्थितप्रज्ञता येईल त्यात तुम्ही राहीलात तर तुमच्यात आणि देवात काहीही फरक नाही असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. `ऐसा मिया आथिला होसी तेथ माझिया स्वरुपा पावसि’ असे ते अर्जुनाला सांगत आहेत हे लक्षात घ्या.

यात एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे. परमेश्वराजवळ गेल्यावर काय होईल याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात फार अतिरेकी कल्पना असतात. रामाने रावणाला मारल्याची आठवण येऊन, किंवा कृष्णाने अचानक प्रगट होऊन द्रौपदीला साड्या पुरविल्या ह्या गोष्टीने किंवा इतर कुठल्याही कारणाने देवाजवळ जाण्यात बऱ्याचवेळा आपण काही सिध्दींची अपेक्षा करीत असतो. जर आपण परमेश्वरासारखे झालो तर कुठेनाकुठे आपल्या सर्वांना असे वाटत असते की आपल्या हातात काही दिव्य शक्‍ती येतील. परंतु आपल्याला अशा दिव्य शक्‍ती असलेल्या देवाकडे जायचे नाही हे ध्यानात ठेवा. मूर्तींच्या देवाकडे जायचे नाही हे आपण पहिल्यांदाच बघितले. आपल्याला एवढ्या सूक्ष्म देवाकडे जायचे आहे की त्याच्यात सिध्दी असायला वावच नाही. आत्ता या क्षणी तो तुमच्यासमोर आहे असे मानायला हरकत नाही. तटस्थपणे बघण्यात देवाकडे जाणे आहे कारण तटस्थपणे बघायला एकाच जागा आहे ती म्हणजे परमेश्वराचे घर होय. म्हणून सतत जगातील सर्व गोष्टींपासून दूर झाल्यावर आपोआपच आपण देवाच्या रुपात विलीन होऊ हे लक्षात ठेवून आपण प्रयत्‍न केले पाहीजे. एवढी साधी गोष्ट म्हणजे साऱ्या परमार्थाचे सार आहे असे भगवान अर्जुनाला सांगत आहे. `अवघिया चोरीया आपुले, जे सर्वस्व आम्ही ठेविले’ ते आता उघड करुन सांगत आहेत.

तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपायला जाईपर्यंत आपले स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे पहायचा प्रयत्‍न करा असे या श्लोकाचे सांगणे आहे असे वाटते. रामायणातील खारीसारखा सतत प्रयत्‍न करीत रहा. मग रामाने अचानक त्या खारीला जवळ घेतले तसेच आत्मरुपी देव तुम्हांला जवळ घेईल. आपल्याच जीवनाकडे तटस्थपणे बघण्यातल्या आनंदाची एकदा सवय लागली की तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागलात असे समजा. हा आनंद उपभोगायची सवय लावून घ्या त्यामुळे कल्पनेच्या पलीकडची शांति तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्याकडून फक्‍त प्रयत्‍नांची अपेक्षा आहे, प्रयत्‍न जरी नाही तरी विचार करा. स्वतःची स्वतः प्रगती करण्यातच खरा परमार्थ आहे असे सतत लक्षात ठेवा. नामदेवांच्याकडे दररोज स्वतः विठ्ठल जेवायला यायचे, पण देवाशी एवढी जवळीक असूनही त्यांना सर्वलोकांपुढे `मडके अजून कच्चे आहे’ हे ऐकावे लागले, ही मानहानी सहन करावी लागली. खरी प्रगती देवाच्या एका अवताराच्या सान्निध्यात नाही असे आपण ह्या गोष्टीवरुन शिकायला हवे. स्वतःचे मन कुठल्याही परिस्थितीत किती शांत आहे, प्रत्येक गोष्टीत देवाचा हात दिसत आहे की नाही याच्यातच आपली खरी प्रगती आपण पहायला शिकले पाहीजे आणि सतत प्रयत्‍न सुरु ठेवले पाहीजेत.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा 1/9:

Dnyaneshwar’s Promise

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

तरी अवधान एकले दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे ।

हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥ १ : ९ ॥

 

बहुतेकशा अध्यायांची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुंना वंदन करुन केली आहे. परंतु नवव्या अध्यायाची सुरुवात त्यांनी वरील ओवीने केली आहे. या ओवीचा अर्थ आहे: `तुम्ही फक्त माझ्याकडे नीट लक्ष द्या, त्यामुळे तुम्हांला सर्व सुखांची प्राप्ती होईल हे मी सर्वांसमोर प्रतिज्ञेपूर्वक सांगत आहे.’ अत्यंत उत्साहाने आपण जे काय बोललो आहोत त्याचा अर्थ स्वतःला मोठेपणा घेत आहे असा होऊ शकेल याची ज्ञानेश्वर महाराजांना लगेच जाणीव होते. मग नंतरच्या ३० ओव्या ते श्रोत्यांची मनधरणी करतात आणि `ह्या ओवीचा तुम्ही वाकडा अर्थ काढू नये, मी स्वतःला तुमच्यापेक्षा मोठा समजत नाही, मी जो काही आहे तो तुमच्या कृपेमुळेच आहे’ असे ते परत परत सांगतात. शेवटी श्रीनिवृत्तिनाथ त्यांना ३२ व्या ओवीत `तू स्वतःला मोठेपणा घेत नाहीस हे आम्हांला आधीच माहिती आहे. आम्हाला काय वाटेल याची काळजी न करीता आता भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितले ते सांग’ असा आदेश देतात. यानंतर ज्ञानेश्वर महाराज अध्यायाच्या निरुपणाची सुरुवात करतात असा ह्या अध्यायाचा प्रारंभ होतो. परंतु ह्या सर्व संभाषणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपली पहिली ओवी बदलली नाही हे महत्वाचे आहे. बाकीच्या ओव्या महाराजांच्या अत्यंत नम्रपणाचे लक्षण आहे असे आपण जाणले पाहिजे व पहिल्या ओवीचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. ह्या ओवीकडे गंभीरपणे पहायचे आणखी एक कारण म्हणजे वरील ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी नवव्या अध्यायाच्या सुरुवातीला लिहिली आहे हे आहे. ह्या अध्यायाबद्दल ज्ञानेश्वरांना किती आदर होता हे सर्वांना माहितीच आहे. पुढच्या दहाव्या अध्यायातील प्रस्तावनेत खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितले आहे की `मागील नवव्या अध्यायावर टीका लिहायला सुरुवात करताना माझ्या मनात दहशत होती हे मी कबूल करतो. परंतु केवळ श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेनेच मी त्या अध्यायावर टीका लिहू शकलो’. अशा तऱ्हेचे उद्‍गार त्यांनी दुसऱ्या कुठल्याही अध्यायाबाबत काढले नाही ही गोष्ट आपणांस सांगायची जरुरी आहे असे वाटत नाही. तेव्हा वरील ओवीतून `तुम्ही आता नीट माझ्याकडे लक्ष द्या, त्यातच तुमची सर्व साधना आहे’ असे खरोखरच त्यांना सांगायचे आहे असे आपण मानण्यास काहीच हरकत नाही. हाच अर्थ गृहीत धरुन वरील ओवीकडे आपण बघूया.

 

संपूर्ण अवधान देणे म्हणजे काय?

 

साधनेकरीता शारीरीक वा मानसिक कष्ट सोसायची जरुरी नाही हे ज्ञानेश्वर महाराजांनी चवथ्या अध्यायातसुध्दा सांगितले आहे. ते म्हणतात की दुसरे काहीही न करीता फक्‍त नीट ऐकण्याने तुम्हांला फुकट मोक्ष मिळेल. `तैसा मनाचा मारु न करीतां । आणि इंद्रियां दुःख न देता । एथ मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजि ॥ २२३ : ४ ॥’. याशिवाय आपल्या सर्वांना माहिती आहेच की गीतेच्या शेवटी अर्जुनाला पूर्ण बोध प्राप्त झाला. त्या बोधाने त्याच्या मनातील संदेहाचा पूर्ण नाश झाला व अठराव्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने सांगितले की `आपले सर्व कुटूंबीय घेऊन माझ्या मनातील मोह नाहीसा झाला आहे व मला कसे वागावे याचे ज्ञान झाले आहे.’ दृष्य रुपात अर्जुनाने गीता ऐकण्याशिवाय दुसरी कुठलीही साधना केली नव्हती. तेव्हा केवळ ऐकण्याने, दुसरी काहीही साधना न करीता, मोक्षप्राप्ती वा सर्व सुखाची प्राप्ती होऊ शकते हे सिध्द होते.

परंतु स्वतःच्या जीवनात आपण ज्ञानेश्वरीची एवढी पारायणे केली, त्यावरील अनेक प्रवचने ऐकली तरी आपल्याला अर्जुनासारखा मोक्ष का मिळाला नाही? आपल्यातील कुठली उणीव साधनेच्या फळापासून आपल्याला वंचित करीत आहे हा प्रश्न साधकाच्या मनात येणे साहजिक आहे. या शंकेचे निरसन होण्याकरीता `श्रवण’ किंवा `अवधान एकले देणे’ याचा कुठला अर्थ ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे हे जाणण्याचा प्रयत्‍न करणे जरुरी आहे. मग आपले ऐकणे त्या अर्थानुरुप आहे की नाही हे आपल्याला कळेल. एकदा कसे वागायचे हे कळले की केवळ ऐकण्याने मोक्ष मिळण्यास आपण अर्जुनासारखे लायक आत्ता जरी नसलो तरी तसे बनण्याचा प्रयत्‍न आपण करु शकू.

गोष्टींवर आपले ध्यान कसे असते? एखादा भुंगा ज्याप्रमाणे एकामागे एक फुलांवर उड्या मारत त्यातील मधाचा थोडा थोडा आस्वाद घेत असतो, त्याचप्रमाणे आपले मन व बुध्दी एकामागे एक गोष्टींची थोडी थोडी जाणीव आपल्याला करुन देत असते. मन आणि बुध्दीचे हे उड्या मारणे इतके पटापट होत असते की आपल्याला मन एका ठिकाणी स्थिर आहे असा भास होतो. संगणकाचे प्रोसेसर एक काम करीत असताना त्याच्याबरोबर, आपल्याला नकळत, बरीच कामे करीत असतो, पण प्रत्येक कामाला इतका थोडा वेळ घेतो की आपल्याला असे वाटते की तो एकच काम सतत करीत आहे. आपल्या मनाचे असेच आहे. ज्यावेळी आपण हा लेख वाचत आहोत असे म्हणत असतो त्याचवेळी मध्येच शेजारुन गेलेल्या स्कूटरच्या आवाजाकडे आपले लक्ष जाते, किंवा बायको चहा करीत आहे की नाही इकडे ध्यान जाते! पण मुख्य करुन आपण लेख वाचत असतो व त्यामुळेच आपण अशी कल्पना करुन घेतो की गेले काही मिनिटे मी फक्‍त ज्ञानेश्वरीवरील हा लेख वाचण्यात घालविला. आपले मन कुठे कुठे भटकून आले हे सर्व जगाला सांगायची काहीच जरुरी नाही आणि ते शक्यही नाही. परंतु स्वतःशी तरी आपण असे कबूल केले पाहिजे की माझे सगळे लक्ष कधीच एका ठिकाणी नसते. कदाचित्‌ त्यामुळेच इतकी प्रवचने ऐकली, इतके वेळा ज्ञानेश्वरीची पारायणे केली, तरी आपल्यामध्ये फारसा फरक पडलेला आढळत नाही. याचा अर्थ नुसत्या ऐकण्याचा मार्ग आपल्याकरीता नाही असे आपण समजावे का? थांबा. हा निष्कर्ष काढण्याच्या आधी आपण आयुष्यात कधी एकाग्र मन करु शकलो आहोत का याचा तपास करा. जर असे प्रसंग जीवनात आढळले तर त्यावेळी आपण मन का एकाग्र करु शकलो ह्याचा मग शोध घ्या. तशीच परीस्थिती ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचताना जर आपण आणली तर आपले मन योग्य वेळी एकाग्र व्हायची शक्यता आहे. अशा अर्थाने केवळ संपूर्ण अवधान देऊन सर्व सुखांची प्राप्ती होणार हे ऐकायला जरी मोहक आणि सोपे वाटले तरी त्या मार्गावर चालण्याकरीता वरील तयारीची आपल्याकरीता आवश्यकता आहे.

जरा विचार केल्यावर असे आढळून येईल की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला एवढी महत्वाची वाटते की ती पूर्णत्वाला नेल्याशिवाय आपल्याला अजिबात चैन पडत नाही तेव्हाच आपले मन त्या गोष्टीवर एकाग्र होत असते. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावर जर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचे असेल तर आपल्याला आधी असे वाटले पाहिजे की हे शब्द ऐकण्यापेक्षा जगात दुसरी महत्वाची गोष्टच नाही. असा दृष्टीकोन होण्याकरीता त्या शब्दांचे महत्व आपल्याला निःसंशय पटले पाहिजे. आपल्याला सर्वसुखाची प्राप्ती करुन देण्याचे त्यांचे वचन आपल्याला आकर्षक वाटून त्यामुळे आपण त्यांचे शब्द महत्वाचे आहेत असे मानू शकतो. परंतु मानून सवरून आपण जास्त वेळ मनाचे समाधान करु शकत नाही. स्वतःच्या आयुष्यात आलेली प्रचीतीच आपल्याला साधना चालू ठेवण्यासाठी पुरेसे बळ देऊ शकते. म्हणून ज्ञानेश्वरीमुळे आपल्याला झालेला फायदा आपल्याला तळहातावरील डोलण्याऱ्या आवळ्यासारखा स्पष्ट दिसला पाहिजे.

म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शब्दांची स्वतःच्या आयुष्यात प्रचीती आली तरच आपला त्यांच्या सांगण्यावर संशयविरहीत विश्वास बसेल. परंतु आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की ज्ञानेश्वरीतील शब्दांची आयुष्यात आलेली प्रचीती आपल्या लक्षात यायलासुध्दा साधनेची आवश्यकता आहे! ही प्रचीती `प्रमोशन मिळणे’, `परीक्षेत अचानक सोपे प्रश्न येणे’, `एखादे अडकलेले काम पार पडणे’ या सारख्या व्यावहारीक गोष्टीत बघायची आपली सवय आपण मोडली पाहिजे. संसारातील गोष्टींमध्ये प्रचीती बघण्यात आपण व्यवहाराला ज्ञानेश्वरीपेक्षा जास्त प्राधान्य देत आहे हे आधी आपण जाणून घेतले पाहिजे. याचे कारण असे की एक हजार रुपये खर्च करुन कधी आपण दहा रुपयाची वस्तू मिळवत नाही. त्या पैशांनी मिळालेल्या वस्तूचे महत्व हजार रुपयापेक्षा जेव्हा जास्त असते तेव्हाच आपण ते पैसे खर्च करायला तयार होतो. म्हणजे कष्ट केल्यावर जी गोष्ट प्राप्त होते तीचे महत्व केलेल्या कष्टांपेक्षा कमी असेल तर आपण कशाला कष्ट करु? असा बट्ट्याचा व्यवहार करायला आपल्याला कुणीच शिकविलेले नाही. मग ज्ञानेश्वरीमुळे जर सांसारीक सुखाची अपेक्षा आपण ठेवली तर हे साहजिकच आहे की संसारातील सुखाला आपण ज्ञानेश्वरीपेक्षा (म्हणजे केलेल्या साधनेपेक्षा) जास्त महत्व देत आहोत. ही गोष्ट तत्वतः चुकीची आहे. म्हणून व्यवहारातील गोष्टींमध्ये साधेनची प्रचीती पाहणे योग्य नाही.

मग प्रचीती बघायची तरी कशी? ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केल्यानंतर कधीतरी आपणांस अचानक, काहीही कारण नसताना शांत वाटते, मन भरुन येते अशा घटनेत आपण प्रचीती बघितली पाहिजे. अगदी एवढा अनुभव नाही आला, तरी ज्ञानेश्वरी आपणहून (केवळ गुरुंनी सांगितली आहे म्हणून नाही) परत वाचाविशी वाटणे यातसुध्दा ज्ञानेश्वरीच्या शब्दांचे सामर्थ्यच दिसून येते. परंतु वरील सांगितलेल्या अनुभवांमध्ये समाधान आपण मानत नाही. याचे कारण असे की अशा घटनांमध्ये सुख बघायची आपल्याला सवय नाही. भौतिक सुखातील समाधान आपण लगेच कबूल करतो. म्हणजे समाधानाची व्याख्या ठरविण्यामध्येच आपली चूक होते व ती आपल्या लक्षातसुध्दा येत नाही! जर ज्ञानेश्वरीमुळे मिळणाऱ्या सुखाची व्याख्याच चुकीची असली तर आपल्या मनातील सुखाची प्रचीती येण्याची गोष्ट करायलाच नको. म्हणून ज्ञानेश्वरांनी नक्की कुठल्या सुखाच्या प्राप्तीचे वचन दिले आहे हे आपण आता बघायला हवे.

 

सुखाच्या कल्पना

 

आपल्या प्रत्‍येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. एखाद्या लहान मुलाला चॉकलेटच्या राज्यात रहायला आवडेल तर कुणाला खूप पैसे मिळवण्यामध्ये धन्यता वाटेल. आणखी कुणाला आपला संसार व्यवस्थित होण्यामध्ये सुख लाभेल. जितकी माणसे आहेत तितक्या सुखाच्या कल्पना आहेत! एवढेच नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या मनातसुध्दा सुखाच्या कल्पना स्थिर नसतात. कालपर्यंत हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीबद्दल उद्या तितकीच ओढ असेल असे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणजे सुखाच्या कल्पना जगातील माणसांपेक्षाही अधिक आहेत कारण प्रत्येक माणसाची सुखाची कल्पना ही नित्य बदलणारी आहे. आपल्या मनातील सुख हे इतके अशाश्वत आहे! त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचे सदासर्वदा सर्वसुखाची सर्वजणांना प्राप्ती करून देण्याचे उद्‌गार प्रथमदर्शनी अतिशयोक्‍तीपूर्ण वाटतात. परंतु असा समज करुन घेण्याआधी आपण जरा विचार केला पाहिजे. जरी सुखाच्या कल्पना असंख्य असल्या तरी त्या सर्व एकाच गोष्टीची वेगवेगळी रुपे आहेत. एका गोष्टीमध्ये चार आंधळे एकाच हत्तीचे, त्याचा आपल्याला झालेल्या स्पर्शानुरुप, संपूर्ण वेगवेगळी वर्णने करतात तसाच हा प्रकार आहे. `खरे सुख’ म्हणून जी एकसंध गोष्ट आहे तीचा आपल्या जीवनात कुठल्या तऱ्हेने प्रवेश होतो यावर आपली सुखाची व्याख्या होते. मग आपली समज म्हणजेच खरी व्याख्या आहे असा समज आपण करू लागतो. ज्याप्रमाणे वरील गोष्टीतील आंधळ्यांना खरा हत्ती कसा असतो हे कुणी दृष्टी देऊन दाखविले तर (आणि तरच!) त्यांना सत्याचे दर्शन होऊ शकेल, त्याचप्रमाणे आपल्याला कुणी दिव्य दृष्टी देऊन खरे सुख म्हणजे काय हे दाखविले तरच आपल्याला सर्वसुखाची प्राप्ती होऊ शकेल. ही दिव्य दृष्टी येण्याकरीता आपण आपले सर्व अवधान ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांकडे देणे जरुरी आहे!

आपण परत आपल्या (सतत बदलणाऱ्या) सुखाच्या कल्पनेबद्दल विचार करु. आत्ताच्या आपल्या सुखाच्या कल्पनेबद्दल विचार केला तर बहुतांशी असे दिसून येईल की आपण सुखाची सांगड आपल्याकडे सध्या नसलेल्या, किंवा सध्या आहे पण सतत असेलच अशी खात्री नसलेल्या, एखाद्या गोष्टीबरोबर लावली आहे. आपल्या मनाची अशी सवय आहे की सतत आपल्याबरोबर असण्याऱ्या गोष्टीवरुन त्याचे लक्ष उडते व अजून परिपूर्ण गोष्टीचा ध्यास त्याला लागतो. आपले आयुष्य व सुख उपभोगायची आपली क्षमता अतिशय मर्यादीत आहे. म्हणून जगातल्या यच्चयावत गोष्टी आपण कधीच मिळवू शकत नाही, वा त्यांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुळे जवळ असलेल्या गोष्टीपेक्षा अधिक चांगली गोष्ट आपल्यास सतत दिसत असतेच. उदाहरणार्थ, आज माझ्याकडे स्वतःची गाडी नसेल तर गाडी हवी असे वाटते आणि उद्या गाडी मिळाली की त्यापेक्षा अधिक चांगली, वातानुकुलीत गाडी असावी असे वाटते. ती जरी मिळाली तरी स्वतः चालवायला लागत आहे याचा खेद व्हायला लागतो व ड्रायव्हर असलेला बरा असे वाटू लागते! हीच गोष्ट पैशाबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दल आपण बघतो. काल काही लाख हवेत असे वाटत असते तर आज काही लाखात काय येणार असे वाटायला लागते. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपली सुखाची कल्पना ही स्वतःच्या आयुष्यात सध्या प्रकर्षाने जाणविणाऱ्या कमतरतेवर उभारलेली असते.

परंतु जगातील अनेक गोष्टी आपल्याकडे नसतात आणि त्या सगळ्यांची आत्यंतिक अभिलाषा आपल्याला होतेच असे नाही. उदाहरणार्थ, सबंध आयुष्यात मर्सिडीज गाडी चालवायला मिळणार नाही याची मला जाणीव झाली तरी सुखाची व्याख्या मर्सिडीज गाडी मिळणे अशी मी करीत नाही. दुसरी गाडी जरी मिळाली तरी मी समाधान मानतो. पैशाच्या बाबतीतसुध्दा टाटा, बिर्लाएवढे पैसे मला कधीच मिळणार नाहीत याची जाणीव झाली तरी फारसे दुःख मला होत नाही. म्हणजे केवळ उणीव भासणे यावरच सुखाची कल्पना अवलंबून नसते तर नसलेल्या गोष्टीबद्दल आत्मीयता येणे हे पण जरुरी आहे. आवड निर्माण झाल्याखेरीज वस्तू हवीहवीशी वाटत नाही हे आपण सर्व जाणतोच.

म्हणजे आपली सुखाची कल्पना जरी बदलत असली तरी त्या कल्पनेमागे असलेल्या वरील दोन गोष्टी कधीच बदलत नाहीत हे दिसून येते. प्रथम गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची उणीव भासणे किंवा गोष्ट जवळ असली तरी उद्या ती असेलच याबद्दल खात्री नसणे आणि दुसरी म्हणजे त्या वस्तूबद्दल जबरदस्त आकर्षण वाटणे. सुख आपल्या जीवनात कुठल्या रुपाने येते हे वरील दोन गोष्टींवरच अवलंबून आहे. ह्या दोन गोष्टींच्या अस्तित्वामुळेच आपल्याला दुःख होते व त्या दुःखाच्या निरसनात आपण सुख बघतो.

परंतु याचाच अर्थ असा की वरील दोन गोष्टींपैकी एखादी गोष्ट आपल्या जीवनात नसली तर आपल्याला दुःखाची जाणीवच होणार नाही व त्यामुळे सुखाचा शोध घ्यायची गरजच भासणार नाही. ज्या माणसाच्या जीवनात एकाही गोष्टीची उणीव नसते किंवा ज्या भाग्यवान माणसाच्या मनात नसलेल्या गोष्टींबद्दल फारसी आत्मीयता नसते तो सदा सुखातच असतो. मग अशी व्यक्‍ती जगाच्या दृष्टीने शारीरीक कष्टात जरी असली तरी तो माणूस स्वतःच्या नजरेत सुखीच असतो. केवळ ह्याच कारणाने आपण बघतो की आपल्या आवडीकरीता अनेक (शारीरीक आणि मानसिक) कष्ट सोसूनसुध्दा आपण सुखातच असतो. वारीमध्ये अनेक त्रास सहन करताना वा गुरुंच्या उत्सवात कष्ट करताना आपल्या मनात एक वेगळाच आनंद भरलेला असतो. अशावेळी सुख म्हणजे काय याचा वेगळा शोध घ्यायची आपल्याला जरुरी भासत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात सुखाचा हाच अर्थ भरलेला आहे. ते जेव्हा आपल्याला सर्वसुखाची प्राप्ती होण्याचे वचन देतात तेव्हा आपल्या जीवनात कुठल्याही गोष्टीची उणीव नसेल हे त्यांना म्हणायचे नाही तर एखाद्या गोष्टीची उणीव जरी तुम्हांला भासली तरी त्या गोष्टीबद्दल आत्यंतिक आत्मीयता तुम्हाला कधीच भासणार नाही ही खात्री त्यांना द्यायची आहे. म्हणजे सर्वसुखाची प्राप्ती ते आपल्याला दुःखच होणार नाही या मार्गाने करुन देणार आहेत. जिथे दुःख नाही तिथे सुख आहेच!

ही खात्री ते आपल्याला कुठल्या आधारावर देऊ शकतात? आपली दुःखे नाहीशी करण्याचा त्यांचा मार्ग असा आहे: आपल्याकडे आत्ताच असलेल्या अशा गोष्टीची ते जाणीव करुन देणार आहेत की एका त्या गोष्टीच्या असण्यापुढे आपल्याला जीवनात नसलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल दुःख होणार नाही. कधी कधी एखाद्या कोट्याधीशाला वाटते की आपल्याकडे अजून थोडे पैसे असले तर बरे. परंतु अधिक पैशाकरीता फार दुःख त्याला वाटत नाही. त्याला ज्या तीव्रतेने पैसे हवेत असे वाटते त्याच उत्कटतेने आपल्याला जीवनात सध्या नसलेल्या गोष्टींबद्दलचे आकर्षण वाटेल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जे सुख देणार आहेत ते सुख नसलेल्या गोष्टींची जाणीवच नाहीशी करून देणार असे नाही. काही वस्तू जरी प्राप्त झाल्या तरी ते मूळ एकसंध सुख आपल्याला जीवनातील नसलेल्या गोष्टींचे आकर्षण कमी करुन देणार आहेत. अशी कुठली गोष्ट आहे की आपल्या जीवनातील नसलेल्या गोष्टींचे आकर्षण ती कमी करु शकेल?

ती आपल्याकडे नेहमीच असलेली गोष्ट म्हणजे आपले व परमेश्वराचे असलेले नित्य सान्निध्य. परमेश्वर आपल्या इतका जवळ आहे की ज्याप्रमाणे आपण आपली बुबुळे पाहू शकत नाही त्याचप्रमाणे आपण त्याला पाहू शकत नाही. ज्ञानेश्वरांच्या बोलण्याकडे संपूर्ण अवधान देणे म्हणजेच आपल्या हातात साधनेचा आरसा येणे. त्या आरशाच्या योगाने आपल्यामध्येच स्थित असलेल्या परमेश्वराचे अस्तित्व आपण जाणतो व त्या सुखापुढे संसारातील सर्व दुःखांचे महत्व एवढे कमी होते की आपण सदा सुखातच राहतो. ह्या सत्य परीस्थितीच्या जोरावरच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वरील प्रतिज्ञावचन लिहून दिलेले आहे. अत्यंत गूढ अशा नवव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराजांनी हा संदेश आपल्याला दिला आहे. ह्या शब्दांवर खोल विचार करुन त्यांचा स्वतःच्या जीवनात उपयोग करुन घेणे म्हणजेच आपल्याला लाभलेल्या मानवी जीवनाचा संपूर्ण लाभ करुन घेणे होय.

 

॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय नववा (126+135)/9:

God and World

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

हे असो पर्वताचिये ह्रुदयींचे । जेविं पर्जन्यधारास्तव न खोचे ।

तेवि कर्मजात प्रकृतीचे । न लगे मज ॥ १२६ : ९ ॥

हे सर्वस्व आमुचे गुढ । परि दाविले तुज उघड ।

आता इंद्रिया देऊनि कवाड । ह्रुदयी भोगी ॥ १३५ : ९ ॥

 

श्री ज्ञानेश्वरांना गीतेतील नवव्या अध्यायाबद्दल किती आदर होता ते त्यांच्या दहाव्या अध्यायावरील निरुपणात त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की गीतेतील सर्वच अध्याय अत्यंत गोड आहेत परंतु नववा अध्यायामध्ये सर्व गीतेचे सार आहे. तो `अनिर्वाच्य’ आहे व माझी ह्या अध्यायावरील टीका म्हणजे माझ्या गुरूंचे श्री निवृत्तीनाथांचेच सामर्थ्य आहे. ते पुढे असे म्हणतात की ज्याप्रमाणे राम-रावण यांच्या युध्दाला उपमा देता येत नाही, त्याचप्रमाणे नवमीतील कृष्णार्जुनाच्या संवादाला दुसरी उपमा देता येणे शक्य नाही. अशा ह्या नवव्या अध्यायातील १२६ वी ओवी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मते `आमुचे सर्वस्व’ आहे. अशा अत्यंत महत्वाच्या ओवीमध्ये काय अर्थ दडलेला आहे हे जाणुन घ्यायचा आपण प्रयत्न करुया.

 

भगवंत व सृष्टी यांतील संबंध

 

प्रत्येकाचा मनांत अशी खात्री असते की दिसणाऱ्या ह्या चराचर सृष्टीचा कोणीतरी कर्ता आहे. आपल्यापैकी भाविक माणसांना असे वाटते की त्यांच्या भगवंतानेच ही सृष्टी निर्माण केली आहे. बुध्दीवादी माणसांचा भगवंतावर सहजा सहजी विश्वास बसत नाही पण ते सुध्दा असे मानतात की ही सर्व सृष्टी काही नियमांवर आधारीत आहे व आधुनिक शास्त्रांद्वारे ते नियम शोधायचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे आपली सध्याची परिस्थीती अजुन चांगली करायचे आपले सततचे प्रयत्नच ह्या गोष्टीचा पुरावा आहे की आपण `ही सृष्टी नियमांनी बांधलेली आहे’ असे मानत आहोत. कारण जर सृष्टीमध्ये कधीही काहीही घडत असते तर आपल्या प्रयत्नांवर आपण विश्वास ठेवला नसता तर केवळ नशिबावर भरंवसा ठेवुन जगलो असतो. अशा रीतीने हे स्पष्ट होते की प्रथमदर्शनी भगवंतावर विश्वास न ठेवणारे सुध्दा भगवंताच्या ह्या नियमरुपी, अमूर्त रुपावर विश्वास ठेवुनच जगत असतात. तात्पर्य असे की प्रत्येकाचा भगवंताच्या कुठल्यातरी रुपावर विश्वास असतो व ही खात्री असते की आपल्या भगवंतानेच ही सृष्टी निर्माण केली आहे. म्हणूनच प्रत्येकाला भगवंताला अंतर्बाह्य जाणून घ्यायची एक नैसर्गिक ओढ असते. आपली अध्यात्मिक साधना ह्या दिशाहीन नैसर्गिक ओढीला योग्य मार्ग दाखवते व भगवंतापाशी जाण्याचा रस्ता सुलभ करते.

सध्या आपल्यापाशी भगवंताकडे जायला ही एकच माहीती आहे की चराचर विश्व त्याने निर्माण केले आहे. परंतु भगवंत आहे कुठे? जर ही सृष्टी भगवंताने केली असेल तर साहजिकच ह्या सृष्टीमध्ये भगवंत नाही असे प्रथमदर्शनी वाटते. वस्तु निर्माण करणारा त्या वस्तूच्या आधीपासुन अस्तित्वात असतो व निर्माण केलेली वस्तू त्याच्यापासुन भिन्न असते हा सृष्टीचा नियमच आहे. चहाची पत्ती कधीच चहा करू शकत नाही! चहा बनविणारा निराळाच असतो व चहाकडे बघुन तो कसा असेल हे कळायची अपेक्षासुध्दा आपण करीत नाही. ही गोष्ट जगातील सर्व बाबतीत लागु पडते. बांधलेले घर पाहुन बांधणाऱ्या माणसाला दाढी आहे का हे कळायची सुतराम शक्यता नसते! तेव्हा साहजिकच अशी कल्पना होऊ शकते की भगवंताने सृष्टी निर्माण केली आहे म्हणजे त्याला सृष्टीमध्ये शोधणं ही चुकीची गोष्ट आहे. पण थांबा! जरा विचार करा. चहाकडे बघून चहा करणाऱ्या माणसाला चश्मा आहे का नाही हे जरी कळले नाही, तरी बाकीची एखादी गोष्ट कळायचा संभव असतो. उदाहरणार्थ, चहा अत्यंत गोड असेल तर करणाऱ्याला गोड आवडते असा अंदाज आपण बांधु शकतो. जर बांधलेल्या घरातील भिंती खुप जाड असतील, खिडक्या, दारे अत्यंत भक्कम असतील तर बांधणाऱ्याच्या मनातील कसलीतरी भीती प्रदर्शित होते. खंर म्हणजे केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये करणारा आपली एक छाप सोडीत असतो. ह्या दृष्टीकोनातुन बघितल्यास केलेल्या गोष्टींतून करणाऱ्याचे व्यक्तिमत्व प्रगट होत जाते. आता ही सर्व सृष्टीच परमेश्वराने केली आहे, म्हणजे ह्या द्वारे त्याने आपल्याला त्याला जाणून घेण्यासाठी मार्ग ठेवला आहे. गोड चहा बघून करणाऱ्याची साखरेबद्दलची आवड जशी आपल्याला कळली तशीच ह्या सृष्टीतील एकेक वस्तू बघून आपल्याला भगवंताबद्दल माहीती करून घ्यायची आहे. (कदाचित म्हणुनच अर्जुनाने गीतेच्या पुढच्या (म्हणजे दहाव्या) अध्यायात भगवंताच्या विभूती जास्त कुठे आढळतात हे विचारले असावे. असो.) तर भगवंताचा आणि सृष्टीचा संबंध हा असा आहे. ह्या सृष्टीमध्ये तो आहे पण आपल्याला ज्या रुपात त्याला जाणून घ्यायचे आहे त्या रुपात तो नाही. सृष्टीत घडणाऱ्या सर्व गोष्टींपासुन तो अलिप्त आहे पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ह्या सृष्टीतील प्रत्येक घटनेद्वारे प्रगट होणारे परमेश्वराचे व्यक्तिमत्व बघणे हा आहे.

 

भगवंताला जाणून घेण्याची साधना

 

सृष्टीतील घडामोडींतुन भगवंताला जाणण्याची साधना कशी असेल? असा साधक कसा वागेल? याचा आपण विचार करूया. मागे आपण बघीतले की गोड चहावरून आपण करणाऱ्या व्यक्तीबद्दल माहीती काढू शकलो. परंतु चहा गोड नसेल, सर्वसामान्य चहासारखा असेल तर साहजिकच आपण करणाऱ्याबद्दल काही माहीती काढू शकत नाही. अशा वेळी आपण त्या व्यक्तीची दुसरी एखादी कृती बघायला हवी. जर त्या व्यक्तीचे बरेचसे कपडे एखाद्याच रंगाचे असतील तर त्याला तो रंग आवडतो हे सिध्द होते. तसे नसेल तर अजुन एखाद्या वेगळ्या कृतीकडे आपण बघायला हवे. म्हणजे आपल्याला आधी मनाचा असा संयम शिकायला हवा की प्रत्येक गोष्टींमधील परमेश्वराचा ठसा दिसेलच असे नाही. आपल्या मनाची अशी तयारी हवी की जीवनामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आपण कधी कधीच जाणु शकू. आणि अश्या गोष्टी केव्हा घडतील, परमेश्वराचे अस्तित्व केव्हा जाणवेल, याचा काही अंदाज नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्येच परमेश्वराचा ठसा बघायची सवय आपल्याला लागली पाहीजे. अशी सवय लागल्यावर घटनांमध्ये गुंतून जायचा आपला स्वभाव हळूहळू कमी होऊ लागतो. (कारण वस्तूमध्ये गुंतल्यावर त्यातील परमेश्वराचे अस्तित्व जाणण्याची शक्यता नसते.) एखादी वस्तू आपल्याकडे असावी वा ठराविक घटना आपल्या जीवनात घडायलाच हवी असा आपला हव्यास असेल तर तो कमी व्हायला लागतो. सततच्या ह्या प्रयत्नांमुळे साधक सृष्टीतील प्रत्येक घटनांपासुन अलिप्त व्हायला लागतो. परंतु ह्या सृष्टिमुळेच भगवंताकडे आपण जाऊ शकतो ही जाणिव असल्याने त्याचे जगातील गोष्टींबद्दलचे प्रेम मात्र वाढतच जाते. अशा रीतीने साधकाचे निरपेक्ष प्रेम वाढते, गोष्टींवरचा मालकीपणाचा आग्रह कमी होतो. प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे प्रतिबिंब बघायचे आहे ह्या दृष्टीमुळे घडणाऱ्या घटना आहेत तशा बघण्याचे व स्वीकारण्याचे सामर्थ्य त्याच्या नजरेत येते. स्वतःचे गुण व दोष (जास्त करून दोषच!) प्रकर्षाने जाणवू लागतात व त्यामुळे सहिष्णुता वाढते. परमेश्वरानेच सर्व वस्तू निर्माण केल्या आहेत याची सतत जाणिव असल्याने आहेत त्या गोष्टी अधिक चांगल्या कराव्या असे वाटत नाही. म्हणून लोकांना आपणहून मदत करायचा स्वभाव असेल तर तो कमी होतो. स्वभावातील हे बदल म्हणजेच साधना चांगली सुरु असण्याची खूण आहे. ह्या बदलांमुळे साहजिकच ह्या मार्गावर चालणारा साधक सर्वांना हवा-हवासा वाटतो. त्याच्या सहवासाची गोडी लोकांना वाटू लागते. म्हणजे साधकाला स्वतःला परमेश्वराची प्राप्ती होवो न होवो, जगाला त्याच्या अस्तित्वाने सुखाची प्राप्ती होते!

आता परमेश्वराचा ठसा ओळखायचा कसा ? याबद्दल १३५व्या ओवीत ज्ञानेश्वरांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात, `आता इंद्रियां देउनि कवाड । ह्रुदयी भोगी ॥’ गीतेत (व ज्ञानेश्वरीमध्ये) माणसाची पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रिये व मन अशी अकरा इंद्रिये आहेत असे सांगितले आहे. ह्या सर्वाना बंद करून ह्रुदयामध्ये आपल्याला हा ठसा बघायचा आहे. ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेले हे ह्रुदय शारीरीक ह्रुदयापासून भिन्न असून ते छातीत उजव्या बाजूला असते. ज्याप्रमाणे साखरेची गोडी म्हणजे काय हे स्वतः अनुभविल्याशिवाय सांगता येत नाही त्या प्रमाणेच एखाद्या घटनेतील परमेश्वराचा ठसा हा स्वतः अनुभविल्याशिवाय सांगता येत नाही. परंतु ढोबळपणे सांगायचे झाले तर ते असे: ज्या क्षणी आपल्याला परमेश्वराचा ठसा जाणवितो, त्या क्षणी आपल्याला ती वस्तू वा घटना आहे तशीच असायला हवी याची पूर्ण जाणिव होते. ती वस्तू वा घटना बदलण्याकरीता, अजुन चांगली करण्याकरीता, खटपट करायची आवश्यकता वाटत नाही. ह्या आपल्या संपूर्ण स्वीकारण्याने आपल्या मनात एक प्रकारची शांतता निर्माण होते. त्याचवेळी छातीत उजव्या बाजुला एका पोकळीतून आनंदाचा झरा वाहतो आहे अशी जाणिव होते व शारीरीक, मानसिक स्तब्धता प्राप्त होते. अशी स्थिती निर्माण झाली की समजावे की आपण परमेश्वराचा अंश घटनेमध्ये पाहत आहोत. असे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळी होत राहील त्या त्या वेळी आपण परमेश्वराजवळ आलो आहोत असे समजावे. `ह्रुदयी भोगी’ ह्या शब्दांचा अर्थ हा होय.

 

साधनेचे फळ

 

अर्थात्‌ साधनेचे अंतिम फळ म्हणजे आपली व भगवंताची सततची भेट होणे. परंतु ह्या फळाबद्दल दोन गोष्टी सांगण्यासारीख्या वाटतात.

पहिली म्हणजे ही भेट ह्रुदयाच्या पोकळीत होत असल्याने भगवंताची भेट म्हणजेच आपल्या आत्मरुपाची भेट. याचे कारण असे की एखाद्या भांड्यात गंगेचे पाणि ओतल्यावर शेवटी त्या अनंत वाहण्याऱ्या स्त्रोताला भांड्याचाच आकार येतो तसेच सर्व चराचर व्यापणाऱ्या भगवंताची भेट आपल्या ह्रुदयात होत असल्याने भगवंत आत्मरुप होऊनच आपल्याला भेटतो. अशा रीतीने जरी सुरुवातीला भगवंताला वेगळेपणा देऊन (सर्व सृष्टीचा कर्ता म्हणून आपण भगवंताकडे पहायला सुरुवात केली होती) द्वैत रुपात साधना सुरु केली असली तरी शेवट अद्वैतात म्हणजे आत्मरुपातच होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे हे फळ प्राप्त होणे कसे शक्य आहे? आपल्या साधनेचे मार्ग व प्रयत्न हे सर्व ह्या सृष्टीमधीलच आहेत व १२६व्या ओवीत असे सांगितले आहे की `कर्मजात प्रकृतीचे । न लगे मज ॥ ‘. आपली साधना व इतर प्रयत्न हे `कर्मजात प्रकृतीचे’ मध्येच येतात व त्यामुळे ह्या प्रयत्नांनी आपण परमेश्वराकडे कसे पोहोचू? अशी शंका येण्याची शक्यता आहे. या शंकेचे उत्तर असे की भगवंतप्राप्ती ही साधनेने झाली नसून परमेश्वरकृपेने झालेली आहे. खालील उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट होईल. जर आपला एखादा पाळलेला कुत्रा असला तर आपण त्याच्याकरीता घर तयार करतो, त्याला वेगळ्या थाळीत खाणं, वाटीत पाणि ठेऊन शक्यतो सुखात ठेवायचा प्रयत्न करतो. असे सर्व केल्यानंतर जर तो बांधलेल्या सांखळीला सारखे हिसके द्यायला लागला तर आपण त्याला दुसरं काहीतरी देऊन समाधान करायचा प्रयत्न करतो. एवढे करूनसुध्दा जर त्याचे समाधान झाले नाही तरच आपण त्याला बाहेर फिरायला घेऊन जातो, त्याच्याशी खेळतो. आपली अवस्था ही त्या कुत्र्यासारखी आहे. आपला मालक म्हणजे भगवंत. जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी म्हणजे परमेश्वराने आपल्याकरीता केलेली तरतूद. त्या गोष्टींमध्येच जर आपण समाधान मानत राहीलो तर आपला मालक आपल्याकडे येत नाही. आपली सततची साधना म्हणजे साखळीला हिसके देणे. साधनेतील चांगले अनुभव (इष्ट देवताचे दर्शन, अनपेक्षीत सुगंध येणे, गुरुंचे अस्तित्व जाणवणे इत्यादी) म्हणजे परमेश्वराने आपल्याकरीता केलेली दुसरी व्यवस्था. ह्या अनुभवांत गुंतुन राहीलो तर परमेश्वर आपल्याकडे येणार नाही हे आपण लक्षात ठेऊन साधना नेटाने पुढे चालू ठेवली पाहीजे. आपल्या हातात एवढेच आहे. यामुळे भगवंताला दया आली तरच तो आपल्याला जवळ करेल. त्याच्या मनांत दया आणणे हे आपल्या हातात नाही!! ही दया त्याच्या मनात उत्पन्न होण्याकरीता आपण केवळ त्याला शरण जाऊन आवाहन करु शकतो. आपल्या पुरुषार्थाने ही दया प्राप्त होण्यासारखी नाही. म्हणजे, आपली साधना ही आवश्यक गोष्ट असली तरी साधनेचे फळ हे परमेश्वरकृपेशिवाय प्राप्त होत नाही. ह्या अर्थाने वरील ओवीतील दिसणारा विरोधाभास नाहीसा होतो.

 

साधकाला ह्या गोष्टी कळायला थोडा वेळ लागतो. सुरुवातीला त्याची अशी कल्पना असते की जशी साधना तशी प्राप्ती. परंतु जेव्हा त्याला फळ म्हणजे काय याची थोडी थोडी कल्पना येऊ लागते तेव्हा अशी जाणीव होते की हे फळ साधनेच्या मानाने कितीतरी मोठे आहे. आपल्या साधनेतल्या अनेक त्रुटी लक्षात येतात व तरीसुध्दा फळ मिळू शकेल ह्या खात्रीने त्याचे मन अत्यंत भावनाशील होऊन परमेश्वराबद्दल आपुलकी वाटू लागते. देवाच्या करुणामय स्वभावाची अशी स्वसंवेदनाने जाणीव झाली की त्याला आपल्या साधनेचा जो काही थोडासा अभिमान असतो तो सुध्दा रहात नाही व तो खऱ्या अर्थाने परमेश्वरप्राप्तीला पात्र होतो. साधकाची ही अवस्था बघितली की मात्र देवाला राहवत नाही व तो लगेच धावून येतॊ आणि सर्व साधनेला खऱ्या अर्थाने पूर्णत्व येते.

 

॥ हरि ॐ ॥

 

*******************************************************************

अध्याय बारावा

(211): How many homes do you have?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥



आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसे नाहीं ।

तैसा न धरीच कहीं । आश्रय जो ॥ २११:१२ ॥

बाराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्‍तियोग म्हणजे काय हे स्पष्ट करतात. त्यामध्ये भक्‍तिमार्गावर चालून भगवंताची प्राप्ती केलेल्या भक्‍ताचे वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत त्यापैकी एका श्लोकात `अनिकेतः’ हे विशेषण वापरण्यात आलेले आहे (भगवद्गीता: श्लोक १९, अध्याय १२). या शब्दाचा अर्थ आहे `बेघर’. रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या आश्रमाचे नाव शांतिनिकेतन ठेवले कारण त्यामुळे तो आश्रम शांतीचे घर आहे हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी वापरलेला `अनिकेत’ हा शब्द परिपूर्ण भक्‍ताच्या मनातील आश्रयाच्या आसक्‍तीचा संपूर्ण अभाव दर्शवित आहे. वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी अशा अवस्थेचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणत आहेत: `ज्याप्रमाणे हवेची झुळुक एका ठिकाणी थांबली आहे असे होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांना प्रिय झालेला भक्‍त एका ठिकाणी आश्रय धरु शकतच नाही.’ तेव्हा महाराज म्हणत आहेत की परमभक्‍त नुसता बेघर होतो असे नाही तर तसे होणे हा त्याचा स्वभावच होतो.
शाब्दीक अर्थात आपण फारसे गुंतू नये! याचे कारण असे की एकाच शब्दाचे प्रत्येकाच्या मनात भिन्न अर्थ असतात. शब्द ऐकल्यावर आपल्या मनात उत्पन्न झालेला बोध वक्‍त्याच्या मनात असेलच ह्याची खात्री आपण कधीच देऊ शकत नाही. म्हणून संदर्भाशिवाय गीतेतील श्लोकांचा आधार घेऊन काही महाभाग आपल्याला हवे ते सिध्द करण्यात काहीही चुकीचे मानत नाहीत. आता वरील शब्दच बघा. जो भक्‍त भगवंताच्या चरणी विलीन झालेला आहे तो बेघर होतो असे खुद्द भगवंतांनी सांगितलेले आहे. पण प्रत्यक्षात पहायला गेलो तर तसे घडलेले दिसत नाही. श्रेष्ठ भक्‍त नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई इत्यादी आपल्या घरातच रहात होते की! आणि समजा आपण इतिहासाकडे लक्ष न देता भविष्याकडे बघितले तर ज्यांना भगवंताच्या भक्‍तीची आवड आहे त्यांना कळले की भक्‍ती स्थिर झाली की आपण बेघर होणार तर त्यांना ते आवडेल काय?!! बेघर होण्याची भिती त्यांना संपूर्णपणे भक्‍ती करुनच देणार नाही. खरे ना? म्हणून आपण या शब्दाच्या उच्चार करण्यामागे भगवंतांचा हेतू काय होता हे बघितले पाहिजे. आज आपण अनिकेत या शब्दाचा कुठला अर्थ श्रीकृष्णांना अभिप्रेत होता हे जाणून घ्यायचा प्रयत्‍न करु.

जे रुप दिसते लोचनी । आश्रय त्याचा होतो मनी ।

अवस्था होते जेव्हा उन्मनी । अनिकेत होतो आपण जनी ॥

भगवंताजवळ पोहोचलेल्या भक्‍ताच्या जीवनातील `अनिकेत’ या गुणाचा नक्की अर्थ काय आहे हे जाणून घ्यायच्या आधी आपण अर्थ जाणून घेणे का जरुरी आहे याचा विचार करु. कारण `मी माझ्या साधनेत मग्न आहे, मला इतर गोष्टी जाणून घ्यायची काय गरज आहे?’ असा विचार काही साधकांच्या मनात उद्भवण्याची शक्यता आहे. खरोखरच, जेव्हा आपली साधना व्यवस्थित चालू असते, तेव्हा ती सोडून आपल्याला काहीही माहिती करुन घ्यायची गरज नसते. परमभक्‍त हनुमंताला रामनवमी केव्हा आहे असे कुणीतरी विचारल्यावर तो म्हणाला की `अरे, मला आत्ता दिवस आहे की रात्र आहे हेसुध्दा नीट माहिती नाही. केवळ रामनाम घेण्यात मी इतका मग्न आहे की बाकी कशाचेही भान मला नाही. तेव्हा रामनवमी केव्हा आहे हे मला विचारु नकोस!’ परंतु आपल्या साधनेत एकाग्र असणे योग्य असले तरी आपल्या जीवनात सर्वच काळ आपली साधना सुरळीत चालू नसते. साधनेत वारंवार अडथळे येत असतात आणि दरवेळी आपणांस त्यांच्यावर मात करुन परत आपली साधना सुरु करायची असते. अशावेळी मिळेल त्या आधाराचा आपण उपयोग करुन घेतला पाहिजे. अनिकेत या शब्दाचा अर्थ तुम्हाला स्वतःच्या स्थगित झालेल्या साधनेचा जीर्णोध्दार करण्यास उपयोगी पडेल. याचे कारण असे की गीतेमधील भक्‍तांच्या, वा स्थितप्रज्ञ माणसांच्या वा ज्ञानी लोकांच्या गुणांचे जे वर्णन केलेले आहे ते त्यांना ओळखण्याकरीता केलेले नाही. उदाहरणार्थ, एखाद्या आपत्तीत डोके थंड ठेवणारा भगवंताच्या जवळ असतोच असे नाही. त्याच्या शांत राहण्याचे कारण काय आहे यावर तो ज्ञानी आहे की नाही हे अवलंबून असते. बाह्य वर्तनावरुन ज्ञानी माणसांना ओळखणे अशक्य असूनही त्यांच्या गुणांचे वर्णन बाह्य गोष्टींनीच केलेले आहे याचे कारण असे की भगवंताचा सहवास प्राप्त झालेल्या माणसांना असे वर्तन सहजपणे शक्य असते व आपल्या सारख्या साधकांकरीता तो एक साधनेचा मार्ग असतो. ज्या दारातून घरातील दिव्याचा प्रकाश बाहेर येत असतो त्याच गवाक्षातून घरात प्रवेश करायला कीटकांना संधी असते! त्याचप्रमाणे ज्या वर्तनातून ज्ञानी माणसांचे ज्ञान प्रगट होत असते त्याचे अनुकरण करुन आपण हळूहळू आपले अंतरंग बदलू शकतो. म्हणूनच गीतेमध्ये वेळोवेळी उच्चतम साधकांच्या बाह्य वर्तनाचे वर्णन केलेले आहे. तेव्हा अनिकेतपणा हा परिपूर्ण भक्‍तांचा गुण काय आहे हे कळले तर आपल्या जीवनात तो शक्य तितका आणायचा प्रयत्‍न आपण करु शकतो आणि ही आपली साधनाच होईल. जेव्हा नित्यनैमित्तिक साधनेत खंड पडेल, वा त्यातील गंमत निघून जाईल तेव्हा ही नवी साधना आपण करु शकतो आणि परत आपल्या साधनेत नवी चेतना आणू शकतो. म्हणून या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया.
अनिकेत. बेघर. कुणाला हे शब्द लागू आहेत? ज्याचे जसे रुप आहे तसे त्याचे घर होते. मुंगी मानवाच्या घरात राहिली तरी ते घर तीचे घर होत नाही. ती त्यामध्ये आपले वारुळ करुन राहते! तेव्हा घर या शब्दामध्येस त्यात रहाणारा मनुष्य आहे हे अध्यारुत आहे. मग जसा मनुष्य तसे त्याचे घर. उदाहरणार्थ, शिक्षक म्हटला की शाळा वा कॉलेज डोळ्यासमोर येते. शिक्षक या रुपाचे ते घर आहे. नोकर म्हटला की ऑफिस, मित्र म्हटले की अड्डा आणि स्वयंपाकी म्हटले की स्वयंपाकघर डोळ्यासमोर येते. तेव्हा कोण बेघर होतो यावर कुठले घर नष्ट होते हे ठरते. आता एखादा मित्र शाळेत नोकरी करुन स्वयंपाक करीत असेल तर वर वर्णन केलेली सर्व घरे त्याची आहेत. त्याचे जेव्हा जे रुप असेल तेव्हा तो त्या रुपाला योग्य अशा घरात असणार. मित्र असेल तेव्हा शाळा नष्ट होते, स्वयंपाकी असेल तेव्हा अड्डा आणि शाळा नष्ट होते इत्यादी. मग जेव्हा तो गाढ झोपेत असतो तेव्हा त्याचे घर कुठले आहे? त्याला कुठलेही रुप नसेल तेव्हा त्याचे घर काय? सांगता येईल का?! आणि घर कुठले हे सांगता येत नाही म्हणजे तो बेघर झाला की! तेव्हा अनिकेत या शब्दातून भक्‍ताचे बाह्यजगातील घर नाहीसे होत नाही तर त्याची स्वतःची सर्व रुपे नष्ट होतात. जेव्हा जेव्हा आपण आपल्या एका रुपात अडकतो तेव्हा आपण स्वतःला एक घर निर्माण करीत असतो आणि त्या घरात राहणे पसंत करीत असतो. परंतु जो साधक जो काळाबरोबर अखंड प्रवास करीत आहे त्याला कुठले घर आहे? वाहत्या नदीला घर असते काय? तेव्हा अनिकेत या शब्दातून साधकाच्या मनातील व्यवहारातील सर्व गोष्टींबद्दलची संपूर्ण उदासीनता दृष्टीस पडते. थोडक्यात म्हणजे आपली जी रुपे जगासमोर येतात त्यातील प्रत्येक रुप हे आपल्या मनाचे घर आहे. मनुष्य जेव्हढा जास्त गोष्टींची उलाढाल करतो तेव्हढी त्याची घरे जास्ती व तो जेव्हढा निरिच्छ, कर्तृत्वहीन तेव्हढी घरे कमी! संतलोक कुठलेही काम मी केले असे म्हणतच नाहीत तर भगवंताच्या मर्जीने ते झाले असे म्हणतात व हात झटकतात. म्हणजे ते संपूर्णरीत्या कर्तृत्वहीन होतात, बेघर होतात!! त्यांच्या व्यावहारिक जगातील कुठल्याच रुपाला `ते मी आहे’ असा मान्यतेचा शिक्का ते लावत नाहीत म्हणून ते अनिकेत आहेत.
हे विश्लेषण पटले नसेल तर दुसऱ्या बाजूने बघा. घर म्हणजे सुरक्षितता. जिथे गेल्यावर आपण शांतपणे डोळे बंद करुन बिछान्यावर पडू शकतो अशी जागा. जिथे आपल्याला कुठल्याही मुखवट्याचा सांभाळ करावा लागत नाही अशी जागा म्हणजे घर. आपल्या व्यावहारिक जगातील रुपांना आपल्या मनाचे घर म्हणण्याचे कारण म्हणजे त्या प्रत्येक रुपांतून आपले मन एक सुरक्षितता शोधायचा प्रयत्‍न करीत असते. आई या रुपात गेले की आपल्या मुलांच्या कल्याणाची काळजी करण्यात स्त्री आपल्या जीवनाची साफल्यता शोधू लागते. (स्त्रीयांना आपले आई हे घर मोडणे सर्वात कठीण गोष्ट आहे. बाकी सर्व गोष्टींचा त्याग त्या क्षणात करु शकतात पण आपल्या मुलांवरचे प्रेम?! ते जर मोडता आले नाही तर ते प्रेम एव्हढे मोठे करावे की त्याच्या भिंती तुमच्या साधनेला बंधन घालू शकत नाहीत. म्हणजे आईपणा विसरता येत नसेल सर्व जगाची माता व्हा!) अशा सहज पडताळा येऊ शकणाऱ्या गोष्टींमध्ये जीवनाचा अर्थ शोधायला खूप सोपे आहे. मी स्वतः सुखी आहे की नाही याचा मानदंड म्हणून जगातील काही गोष्टींचे स्वामीत्व हे प्रमाण धरले की आपण सहजपणे लोकांना पटवून देऊ शकतो की मी खराच किती सुखी आहे ते. परंतु स्वतः सुखी आहेत की नाही याचे प्रमाण स्वतःच ठरवायचे आणि कितीही लोकांनी तुमची कीव केली तरी स्वतःच्या भाग्यावरचा विश्वास डळमळू द्यायचा नाही हे कितीजणांना जमेल? जरा बघा, जगात आपण अनेक रुपे घेऊन जगत आहोत. कधी मी पिता आहे, कधी शिक्षक आहे तर कधी ज्ञानेश्वरीवर भाष्य करणारा वक्‍ता आहे. कधी मित्र, कधी शत्रू कधी खेळाडू तर कधी आळशी. या सर्व रुपांतून मला त्या त्या क्षणी एक सुरक्षितता मिळत असते. एका ठराविक रुपात गेल्यावर `मी’ म्हणून जे काही अस्तित्व या देहात वावरत आहे त्याच्या अस्तित्वाला काही धोका नाही हे मला जाणवित असते ही ती सुरक्षितता. एखाद्या कापलेल्या पतंगाप्रमाणे मी आयुष्यात भरकटत फिरत नाही ह्याची जाणीव होत असते ही ती सुरक्षितता. जिथे ही सुरक्षितता नाही (जे आपले घर नाही) तिथे जाण्यास आपण कचरतो. म्हणूनच आपण शांतपणे आपल्यातच रमायला घाबरतो. छान जेवण झालेले आहे, दुपारची वेळ आहे, काहीही करायला नाही आणि नुसते शांतपणे सोफ्यावर बसलो आहोत असे कधी घडते का? सोफ्यावर बसल्याक्षणी `आज टी.व्ही. वर काय आहे हे बघू’ असा विचार येतोच की नाही? किंवा `चला आता शांतपणे बसून पेपर वाचूया’ असे आपण म्हणतो की नाही? अगदीच नाही तर `चला झोपूया’ आहेच! शुन्यात नजर लावून काहीही न करीता आपण जिवंत आहोत या भावनेमध्ये मग्न होऊन संपूर्ण दुपार काढूया असे कधी डोक्यात आले आहे का? असे नुसते विचारशून्य बसून अंतरंगातील भगवंताचे अस्तित्व पहाणे म्हणजेच मनाची उन्मनी अवस्था होय आणि हाच तो अनिकेतपणा! शरीराच्या अशा निष्क्रियतेला कमी मानू नका. भगवंताच्या आत्मरुपी अवताराचे दर्शन होण्याकरीता दोन विचारांच्या मधील जागेत सतत मनाला ठेवणे ही साधनेतील अत्यंत उच्चतम अवस्था आहे. वाचकाच्या रुपात, वा दर्शकाच्या रुपात वा आराम करणाऱ्याच्या रुपात न जाता नुसते जगणे कुणाला जमते? फक्‍त खऱ्या भक्‍ताला जमते. तो अनिकेत आहे. त्याला कुठल्याही घराची आवश्यकता नाही. मजेत स्वतःमध्ये स्थित असलेल्या परमेश्वराचा आस्वाद घेण्यात संपूर्ण जीवन व्यतीत करायची तयारी असणारा म्हणजे अनिकेत. हा अर्थ गीतेतील बाकी सर्व श्लोकांशी सुसंगत आहे. बाकी कुठेही अर्जुनाला तू घर सोड असे सांगितलेले दिसत नाही. तू कर्तृत्वाची भावना सोड असा उपदेश केला आहे. म्हणजे काय तर स्वतःच्या धनुर्धराच्या रुपाचा आश्रय घेऊ नकोस. मोड ते घर, हो अनिकेत!
तेव्हा फावल्या वेळात ही साधना करुन पहा. बसा नुसते मठ्ठपणे काहीही न करीता. स्वतःमध्ये देव आहे या कल्पनेत रमून बाह्यदृष्टीने ठोल्यासारखी संपूर्ण दुपार घालविण्यात छान साधना होत आहे असे मानण्यात काय हरकत आहे? आपल्याभोवती आपणच बांधलेली घरे मोडायची एकदा सवय लागली की आपोआप विवेक आणि वैराग्य प्रज्वलित होतात. मग तुम्हाला नको असली तरी आपली साधना सुरुच रहाते. सहजपणे घडणाऱ्या अशा साधनेचा आस्वाद चाखायला आपल्या घरांतून जरा बाहेर या!!

॥ हरि ॐ ॥

अध्याय बारावा 

(40-59): The same goal for all


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


आणि येर तेही पांडवा । जे आरुढोनि सोऽहंभावा ।

झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४०:१२ ॥


मनाची नखी न लगे । जेथ बुध्दीची दृष्टी न रिगे ।

इंद्रिया कीर जोगे । काई होईल? ॥ ४१:१२ ॥


आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठी ।

तेही मातेचि किरीटी । पावती गा ॥ ५८:१२ ॥


वांचूनि योगाचेनि बळे । अधिक काही मिळे ।

ऐसे नाही आगळे । कष्टचि तया ॥ ५९ :१२ ॥
           भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायात भगवंतांनी भक्‍तीयोगाचे वर्णन केले आहे. या अध्यायाची सुरुवात भक्‍तशिरोमणी अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अकराव्या अध्यायात भगवंताच्या विश्वरुपाचे दर्शन झाल्यावर त्याच्या मनात भय निर्माण झाले व त्यामुळे त्याने श्रीकृष्णांची विनवणी भगवंताचे सगुण रुप मागून घेतले होते. स्वतःच्या सगुण रुपाट परत जाण्याआधी भगवंतांनी त्याला उपदेश केला होता की हे विश्वरुपच माझे स्वरुप आहे, खरे रुप आहे. आणि त्यात विलिन होण्यातच खरा आनंद आहे, साधनेचे अंतिम ध्येय आहे हे तू विसरु नकोस. त्यांच्या वक्तव्यामुळे आता बाराव्या अध्यायात अर्जुन असे विचारतो की काही साधक (योगमार्गाने) तुझे अव्यक्‍त, निर्गुण निराकार रुप उपासत आहेत तर काही भक्‍त तुझ्या सगुण रुपावर निरंतर प्रेम करीत आहेत. या दोघांमध्ये कुणाला तुझी खरी प्राप्ती होईल? अर्जुनाचा हा मार्मिक प्रश्न ऐकून भगवंत प्रसन्न होतात आणि त्याला सांगतात की या दोघांना एकसारखीच प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यायाच्या चाळीसाव्या ओवीपासून सत्तावन्नाव्या ओवीपर्यंत निर्गुण रुप आपल्या मन-बुध्दी संकुलाच्या पलिकडे कसे आहे ते वर्णन केले आहे. अशा रुपाची प्राप्ती करण्यास केव्हढे कष्ट साधकाला करावे लागत असतील याची आपण कल्पना करु शकतो. परंतु शेवटी त्यांच्या मार्गाचा अंतसुध्दा भगवंतामध्ये विलीन होण्यातच होतो. भगवान म्हणत आहेत `अरे अर्जुना, जे `सोऽहं’ भावात दिवसरात्र गुंग राहून माझ्या अव्यय, निर्गुण रुपाच्या प्राप्तीची आस धरुन असतात. ज्या रुपाचे वर्णन करण्यास मनाला कुठे सुरुवात करावी हे कळत नाही, ज्या ठिकाणी आपली मति पोहोचू शकत नाही अशा रुपाचे ज्ञान इंद्रियांनी भोगता येईल हे शक्य आहे का? अगदी ध्यानातसुध्दा जे रुप गोचर होत नाही त्या शून्यरुपाला आपल्या शक्‍तीप्रमाणे कवटाळायचा प्रयत्‍न करणारेही साधकही शेवटी (भक्‍तांप्रमाणेच) माझ्यातच विलिन होतात. त्यांच्या योगशक्‍तीच्या बळाने त्यांना भक्‍तांपेक्षा अधिक काही मिळते असे नाही, याउलट त्यांच्या मार्गात अतोनात कष्टच (भक्‍तीमार्गापेक्षा) जास्त असतात.’
बघू नका फरक मार्गांत । भावना पहा साधकाच्या ह्रुदयात ।

मनातील भेद मग मावळतात । सुमती सहिष्णुतेची उद्भवेल जीवनात ॥
भक्‍तिमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग इत्यादी शब्द आपल्या कानावर पडतात तेव्हा कुठली भावना निर्माण होते? आपण कुठल्या मार्गावर आहोत याचे कुतुहल निर्माण होते की नाही? आणि एकदा आपण मनाशी ठरविले की माझा साधनेचा मार्ग अमुक-अमुक आहे की मग त्या जाणविलेल्या मार्गावर चालण्याचे बंधनच जणू आपल्याला होते. `अरे, मी नामस्मरण करणारा भक्‍त आहे. मग माझ्या मनात देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका यायला नको.’ असे वाटायला लागते की नाही? मग आपल्या जीवनात अचानक गोष्टी बिघडायला लागतात, जवळच्या नातेवाईकांचे आजार बघायला लागतात तेव्हा देव असे का करीत असेल असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा काय होते? स्वतःवर आलेल्या साधारण आपत्तिने माझा विश्वास कसा ढळला याची खंत मनात निर्माण होते. आधीच एकतर आयुष्यात समोर आलेल्या आपत्तीला तोंड देताना आपली फरफट होत असते त्यातच आपल्या साधकत्वाबद्दल शंका निर्माण झाली की व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोन्ही बाजूंनी आपली अवस्था भीषण वाटायला लागते. याउलट मी ज्ञानमार्गाने चालणारा साधक आहे अशी समजुत झाली असेल तर देवाच्या मूर्तीबद्दल अचानक प्रेम उफाळून येते तेव्हा ते नैसर्गिक प्रेम व्यक्‍त करावयास लाज वाटते. देवाच्या नावाचा मोठा गजर होत असतो तेव्हा आपले हात छातीवर ठेवून आपण जोडत नाही तर हळूच चोरुन पायावर त्यांना एकत्र आणतो व भजन तोंडाने न म्हणता कुणाचे उच्चार कसे आहेत याकडे लक्ष द्यायला लागतो! स्वतःच्या बौध्दीक वृत्तीला काळे लागणार नाही अशी खात्री करुनच आपण नमस्कार करतो. या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे आपण स्वतःला एका साच्यात घालून भगवंताकडे जायचा प्रयत्‍न करीत असतो. आपली मन आणि बुध्दी एवढी साफ नसते की एका भावनेमध्ये आपण निरंतर राहू शकू. परंतु एकाच मार्गावर चालण्याचे बंधन स्वतःवर लादून आपण मनाकडून एकाग्रतेची मागणी करीत असतो. हा विसंवाद आपल्या दुःखाचे मूळ आहे.
खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक साधकाला जीवनात सगळेच मार्ग चालावे लागतात. कधी तुम्ही एखाद्या भक्ताप्रमाणे व्यवहार कराल तर कधी तत्वज्ञानाच्या चर्चेत हिरीरीने भाग घेऊन देवाबद्दल चिंतन कराल. तर कधी त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका घेऊन जीवनात व्यावहारिक प्रगतीच खरी आहे असा स्वतःचा समज करुन घ्याल. ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. त्यातील कुठल्याही घटनेत तथ्य नाही हे जाणून जो स्वतः स्वस्थ असतो त्याला अध्यात्मिक प्रगती फार झटकन प्राप्त होते. असे बघा, केवलाद्वैताचे थोर प्रचारक जगद्गुरु आदी शंकराचार्यांनी सुध्दा देवीवर स्तोत्रे लिहिली आहेत मग आपल्यासारख्या जीवांची गोष्टच करायला नको. भगवान श्री रमण महर्षींकडे कुणी देवीचा प्रसाद घेऊन आला की ते अत्यंत आदराने त्याचे सेवन करुन बाकी भक्‍तांना वाटायचे. त्यात त्यांच्या अमूर्त साधनेला धोका आला असे ते कधीही मानायचे नाहीत. त्याचप्रमाणे नामस्मरणाचा उपदेश आयुष्यभर केलेल्या श्रीसंत श्री गोंदवलेकर महाराजांची `प्रवचने’ जे वाचतील त्यांना त्यातील अद्वैत तत्वज्ञान जरुर जाणवेल. स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे बघा हा सल्ला वारंवार ऐकायला मिळेल. अशी अनंत उदाहरणे आपणास सांगत आहेत की साधनेमध्ये स्वतःला एकाच मार्गावर चालत ठेवण्याचे बंधन घालणे साधकाला हितावह नाही.
असे मार्ग बदलण्यात काही धोका नाही असे कसे? व्यवहारात आपण पहातो की बंगलोरहून कोल्हापूरला जायला आपण एकच रस्ता घेतो. मध्येच सोलापूरचा फाटा आला तरी तो सोडून आपण एकाच मार्गावर रहातो. मग साधनेत का म्हणून मार्ग बदलायची तयारी ठेवावी? याचे कारण असे की व्यावहारिक मार्ग आपणास वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतात. परंतु अध्यात्मामध्ये कुठल्याही मार्गाने जरी तुम्ही चाललात तरी अंतिम स्थळ एकच आहे. त्यामुळे तुम्हाला जो मार्ग ज्याक्षणी आवडेल तो तुम्ही अवलंबू शकता. एकाच ठिकाणी तुम्ही पोहोचाल याची खात्री आहे. आज निरुपणाला घेतलेल्या वरील ओव्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज हेच सांगत आहेत. साधकाचे काम भोज्याला हात लावायचे आहे. त्याला अडवायला प्रकृती निरनिराळे मोह दाखवून फसवित आहे. त्या सर्व अडथळ्यांवर कुठल्याही मार्गाने, कुठल्याही उपायाने मात करुन अंगात विवेक आणि वैराग्य बाणवायचे आहे. बस इतकेच! मग यापुढे सर्व मार्ग एक होतात. मग तुम्ही त्याला भक्ती म्हणा वा ज्ञान म्हणा. एकदा अंगात प्रखर वैराग्य भिनले की साधक जे काही वर्तन करतो ते सर्व त्याची साधना म्हणून सिध्द होते. त्याच्या मूळ, नैसर्गिक स्वभावानुसार त्याचे वर्तन मुख्यत्वा भक्तीरुप असेल किंवा ज्ञानाच्या प्रखर तेजाने उजळून निघाले असेल. अशा साधकाच्या बाह्य वर्तनाला महत्व देण्यात आपण त्यामागील असलेल्या वैराग्यरुपी जिवंत धगीला दुर्लक्षित करीत आहोत हे लक्षात घ्या. आपल्यासमोर भाग्यवशाने आलेल्या खऱ्या साधकाच्या बाह्य वर्तनाची नक्कल करणे सोपे असते. परंतु त्या नकलेमध्ये आपण मूळ मुद्दा विसरत तर नाही ना याकडे ध्यान देणे जरुरी आहे. सर्व संतांच्या जीवनाकडे डोळे उघडे ठेवून बघितले तर काय दिसेल? संसाराबद्दलची असीम विरक्ती. मग त्याचे दृष्य रुप म्हणून कुणी देवाचे नाम घेत रस्त्यावर फिरत असेल तर कुणी बोधीवृक्षाखाली बसून ध्यान करीत असेल तर कुणी लग्नाच्या बोहल्यावरुन पळून जाऊन एका पायावर उभा राहून तपश्चर्या करीत असेल. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असतील परंतु त्या सर्व मार्गांवर पदयात्रा करण्यास प्रवृत्त करणारी शक्‍ती एकच आहे. ती म्हणजे व्यावहारिक जगाबद्दलचे वैराग्य. एकाच शक्तीची ही विभिन्न रुपे आहेत हे ध्यानात आले की मार्गांमधील भेदभाव नष्ट व्हायला लागतो. एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या स्वभावाची असतात परंतु आपण त्यांना भाऊ आहेत असे म्हणताना फारसा विचार करीत नाही. तशी ही गोष्ट आहे. सर्व मार्ग एकाच भगवंताच्या शक्‍तीची रुपे आहेत. भले एक काळे एक गोरे असेल पण त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम आहेच ना. मग त्यांच्या मागे मागे जाण्याऱ्या साधकांमध्ये का वैमनस्य असावे?!! श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एकदा श्रीराम आणि श्रीशंकर यांच्यात युध्द झाले. त्यांनंतर दोघेही ही गोष्ट विसरुन जवळ आले पण त्यांचे अनुयायी अजून एकमेकांविरुध्द आहेत! परम योगी श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) महाराजांच्या परिव्राजक भ्रमणात ते वैष्णवांच्या गावात गेले की भोजनसुध्दा मिळायचे नाही. कधी कधी एक महिनाभर भोजन न मिळालेले त्यांनी सहन केले होते! केवळ वैष्णव नाहीत म्हणून ही अवहेलना. साधनेच्या फक्त आपल्याच मार्गावर प्रेम करायची ही पराकोटी झाली. मान्य आहे की आपण इतके एकांगी नसू. पण जरा बघा की आपल्यात स्वतःच्या मार्गाचा अभिमान आहे कि नाही ते. माझे गुरु श्रेष्ठ कसे याचा उहापोह तुम्ही करता का? करीत असाल तर स्वतःच्या मार्गाचा गर्व तुम्हाला आहे. (अर्थात म्हणून आपल्या मार्गाची अवहेलना सहन करावी असे नाही हे ध्यानात घ्या.) कुठलाही अहंकार तुम्हाला भगवंतापासून दूर नेतो हे निर्विवाद सत्य आहे. अगदी स्वतःच्या साधनेचा अभिमानसुध्दा. प्रत्येक साधक एकाच वैराग्यशक्तीचा आधार घेऊन मार्गक्रमणा करीत आहे हे लक्षात आले की आपली दृष्टी बदलते. वरील ओवींतून हा एक अर्थ आज दृष्टोपत्त्यास पडत आहे. 
आता इथे साधना हा शब्द आपण वापरतो त्याचा खरा अर्थ काय आहे यावरसुध्दा विचार करावासा वाटतो. तुमच्यापैकी कुणी म्हणेल माझी साधना सकाळी ब्राह्ममुहुर्तावर उठून ध्यान करण्याची आहे तर कुणी म्हणेल मी दिवसात अमुक संख्या नामस्मरण करतो. अशा गोष्टींतून साधना प्रगट होते हे निश्चित आहे परंतु हे साधनेचे केवळ एक अंग आहे हे बहुतांशी लोकांना जाणवते असे दिसत नाही. साधना म्हणून जर ह्या क्रियाच असतील तर आयुष्यातल्या बाकीच्या समयाचे काय? सकाळी तास, दोन तास ध्यान करुन झाले की तुम्ही वाटेल तसे वागायला मोकळे होता का? तुमच्या दैनंदिन वागण्यात साधना नसते का? साधनेचे दोन प्रकार आहेत असे वाटते. एक म्हणजे ध्यान करणे, नामस्मरण करणे हा. तो बहुतांशी साधकांचा एक असतो. आणि दुसरा जो आहे तो प्रत्येक साधकाचा खास स्वतःचा असतो. एक उदाहरण द्यायचे झाले तर असे की आपण सगळेच पेट्रोल पंपावर जाऊन आपल्या वाहनात इंधन भरतो. ही क्रिया सर्वांना समान आहे. त्याचप्रमाणे सर्वजण देवाचे नाम घेतील वा ध्यान करतील. पण इंधन भरल्यावर वाहनाचा उपयोग कोण कशाकरीता करतो हे भिन्न असते. कुणी त्या वाहनाने अडलेल्या मदत करतील तर कुणी बँकेतून पैसे काढतील तर कुणी दुसऱ्यांना फसवायला उपयोग करतील. त्याचप्रमाणे नामस्मरण झाल्यानंतर वा ध्यान केल्यानंतर आपल्या जीवनात जी शक्ती येते तीचा वापर आपण कसा करतो हे प्रत्येक साधकाला स्वतःच ठरवायचे असते. साधनेतील भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग हे प्रकार म्हणजे आपण कुठल्या पेट्रोल पंपावर जाऊन आपण इंधन भरतो हे सांगण्यासारखे आहे. परंतु मूळ मुद्दा इंधन भरण्याचा नाही. आपण वाहन विकत घेतो ते कुठेतरी जाण्याकरीता, निव्वळ इंधन भरण्याकरीता नाही! त्याचप्रमाणे आपली `साधना’ आपणास कुठे घेऊन जात आहे याचे ध्यान जो ठेवतो तो खरा साधक. उदाहरणार्थ, श्रीगुरुंच्या जवळ जाणे, त्यांच्या मनात आपल्याबद्दलची आत्मियता निर्माण करणे हे चांगले खरे पण त्यानंतर स्वतःच्या उद्योगधंद्याबद्दल त्यांना प्रश्न विचारणार का अध्यात्मिक प्रगतीबद्दल सल्ला घेणार? तुम्हाला कुठे जायचे आहे हे तुम्हालाच ठरवायचे आहे. सगळी साधना करुन ऐहीक प्रगतीच हवी असेल तर कशाला हवा आपल्या मार्गाबद्दल अभिमान? आणि साधनेचे ध्येय भगवंताची प्राप्ती असेल तर जोपर्यंत त्याची पाप्ती होत नाही तोपर्यंत कशाला हवा आपल्या साधनेबद्दल अहंकार?
तुम्ही कुठल्याही नजरेने पहा. आपल्या मार्गाबद्दल अहंगंड ठेवणे सर्वस्वी चुकीचे दिसून येईल. दुसऱ्याचा मार्ग कुठला हे बघायचीसुध्दा आवश्यकता नाही, मग त्यावर मत दर्शविणे दूरच राहिले. खरा परमार्थ कुठल्याही मार्गाने साधता येतो कारण परमार्थाचे ध्येय स्वतःमध्येच दडलेले आहे. हा एकट्याने स्वतःशी खेळायचा डाव आहे. मग बाकीच्यांकडे लक्ष कशाला. एकलव्याने गुरुंची मूर्ती समोर ठेवून, ते आपल्याला शिकवित आहेत या केवळ विश्वासावर आपले ध्येय गाठले हे लक्षात घ्या. सहिष्णुता म्हणजे काय तर या जगातील यच्चयावत जीवांकडे सहनुभूतीने पहाणे. ही अंगात बाणवायला सर्वांचे अंतिम ध्येय एकच आहे हे सतत ध्यानात ठेवा. आपण सर्व एकाच शक्तीची मुले आहोत. आपल्या भाऊ-बहिणींबरोबर वाद घालण्यात कशाला वेळ वाया घालवायचा?
॥ हरि ॐ ॥

अध्याय बारावा 

(108): Our Wants are Our Bonds



॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

सुरुवातीचे नमन

नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.
ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥



जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥



किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

          आपल्या नमनातील जी तिसरी ओवी आहे त्याबद्दल थोडा विचार करु. ती म्हणत आहे की ज्यावेळी तुम्ही तिन्ही लोकांतील इच्छा पूर्ण झाल्यावर आदिपुरुषाचे भजन करा. प्रथमदर्शनी ही कल्पना विरोधाभासी वाटते. कारण असे की जर आपल्याला जे काही हवे आहे ते सर्व मिळाल्यावर त्यातच आपण सुखी राहू. परत एका नव्या गोष्टीची (म्हणजे आदिपुरुषाच्या भजनाची) सुरुवात आपण का करु असे वाटायची शक्यता आहे. सर्व इच्छा पुऱ्या झाल्यावर काय कमी राहील की त्यामुळे देवाचे भजन करायची इच्छा होईल असे वाटते. ह्या मुद्यावर आज थोडा विचार करु.

आपल्या नेहमीच्या आयुष्यात, व्यवहारात आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पुऱ्या होईपर्यंत आपण त्याबाबत खूप उत्साही असतो. त्या पुऱ्या करण्याकरीता आत्तापर्यंत आपण जे काही मिळविले आहे ते खर्च करायची अपली तयारी असते. असलेल्या गोष्टी खर्च करुन आपण आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन आणायचा प्रयत्‍न करीत असतो. त्या नवीन गोष्टीमुळे आपले आयुष्य अजून सुंदर, परिपूर्ण होईल असे आपल्याला वाटत असते. उदाहरणार्थ, विद्यार्थीदशेत आपण आपला वेळ व ध्यान खर्च करुन अभ्यास करतो; तो अभ्यास खर्च करुन परीक्षा देतो, व शेवटी उत्तमपैकी गुण मिळवितो. मोठेपणी नोकरी करुन पैसे मिळवितो आणि बँकेत जमविलेले पैसे खर्च करुन आवडती वस्तू विकत घेतो इत्यादी. आपला सतत असा प्रयत्‍न चालला आहे की आत्ता खर्च करता येईल असे आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व वापरुन जीवनात असे काहीतरी नवीन आणावे की ज्याने आपले जीवन अजून समृध्द होईल. ह्या प्रयत्‍नांना अंत नसतो, ते सतत चालू असतात कारण अशी कुठलीही गोष्ट अजून आपणांस आढळलेली नाही की जीच्या प्राप्तीमुळे जीवन एवढे समृध्द होईल की परत कधीही आपल्याला काही खर्च करायला नको, कुठलीही नवीन वस्तू नको. उदाहरणार्थ, आज जगातील सर्वांत उत्तम संगणक असेल तर काही महिन्यानी त्यापेक्षा अजून चांगला संगणक येतोच. आजच्या सर्वोत्तम गाडीपेक्षा उद्या अजून एक चांगली गाडी येणार आहेच. तेव्हा आपल्याला कधीही अशी खात्री नसते की आज जे काही आहे त्यापेक्षा अजून काहीही नको. कधी कधी असे वाटते की आहे तसेच जीवन राहीले तरी पुरे, नाही असे नाही. पण काही दिवसातच परत आपले जीवन अजून चांगले करायची इच्छा निर्माण होतेच. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या सध्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तरी त्याने आपण इच्छाविरहीत होऊ असे नाही.

ह्या पार्श्वभूमीवर आपण असे समजू शकू की पसायदानातील वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज असे सांगत आहेत की `निर्गुण परमेश्वराचे रुप मला संपूर्ण समजावे’ ही एकच इच्छा आपल्या जीवनातील शेवटची इच्छा होऊ शकते. एकदा ती पुरी झाली की आपले जीवन एवढे परीपूर्ण होईल की परत कुठलीही इच्छा निर्माण होणे शक्य नाही. परमेश्वराचे निर्गुण रुपच का? असे बघा, ज्या तीन लोकांत सुखी होण्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत त्यात स्वर्गलोक आहेच, आणि स्वर्गात सर्व देव असतातच. म्हणून सगुण रुपाशी जवळीक या तिन्ही लोकांतील सुखातच येते. म्हणजे सध्या तुम्हाला जरी असे वाटत असेल की देवाच्या एका अवताराच्या सान्निध्यात (देवाच्या अनेक अवतारांमध्ये आपले गुरुसुध्दा येतात!) तुम्हाला पराकोटीचे सुख लाभेल आणि त्यापुढे काही नको तरी ते वाटणे खरे नाही. अगदी ती इच्छासुध्दा पुरी झाली तरी तुम्हाला जीवनत कधीतरी काहीतरी कमी जाणवेलच अशी धोक्याची सूचना ते आपल्याला देत आहेत आणि म्हणत आहेत की आदिपुरुषाला सतत भजण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात `किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित.’ ह्या ओवीचा हा अर्थ अजून स्पष्ट व्हायला आपण श्रीसंत नामदेव महाराजांचे उदाहरण बघायला हरकत नाही.

एक दिवशी, श्री नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव आणि देवाने प्रसाद खाल्ल्याशिवाय तू खायचे नाही’. नामदेवांचा आपल्या वडिलांच्या बोलण्यावर एवढा विश्वास बसला की त्या दिवशी त्यांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल आणि मला जेवायला मिळेल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद भक्षण केला. त्यानंतरच नामदेवांनी स्वतः भोजन केले. झालेली गोष्ट त्यांना एवढी नैसर्गिक वाटली की आपल्या वडिलांना त्यांनी जे घडले ते सांगितलेसुध्दा नाही. ह्यानंतर दिवसेंदिवस त्यांचे श्रीविठ्ठलांशी नाते अजून दृढ होत गेले. शेवटी त्यांना असे वाटू लागले की आपले आणि देवाचे नाते अगदी जवळचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातीलच ही गोष्ट आहे. नामदेव महाराज वेगळ्या गावात रहात असल्यामुळे त्यांची व श्री ज्ञानेश्वरांची प्रत्यक्ष गाठभेट अजून झालेली नव्हती. पण एकदा विठ्ठलाच्या सांगण्यावरुन ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या झोपडीत बरीच संतमंडळी जमा झाली होती. नामदेवांना पाहील्यावर श्री मुक्‍ताबाईंनी गोरा कुंभारांना प्रत्येकाचे डोके तपासून `मडके नीट भाजलेले आहे की नाही’ (म्हणजे परमार्थात पूर्ण प्रगती झाली आहे की नाही) हे बघायला सांगितले. हातात एक लाकडी थापटणे घेऊन श्री गोरा कुंभाराने प्रत्येकाचे डोके तपासायला सुरुवात केली! सगळ्यात शेवटी एका कोपऱ्यात बसलेल्या नामदेवांच्या डोक्यावर ते थापटणे जोरात मारुन ते म्हणाले की केवळ हे एकच मडके थोडे कच्चे आहे! झालेल्या अपमानाने संतापून नामदेव परत आपल्या विठ्ठलाजवळ आले व झालेली सर्व गोष्ट सांगून तक्रार करु लागले की तू सांगितल्यामुळे मी तिथे गेलो पण त्यांनी माझा असा अपमानच केला. त्यांना तू खरे भक्‍त कसे म्हणतोस? तेव्हा विठ्ठलाने नामदेवांची बाजू न घेता गोरा कुंभाराचेच समर्थन केले व नामदेवांना सांगितले की त्यांच्यापाशी जो देव आहे तो अजून तुझ्याकडे नाही. तू गुरुकडून अनुग्रह घेऊन त्यांच्यासारखा हो. तू मला एका ठराविक रुपातच बघतोस पण मला विश्वरुपात बघण्यातच खरा परमार्थ आहे. खुद्द विठ्ठलानेसुध्दा त्याच्या आवडत्या भक्‍ताला `भजिजो आदिपुरुखी’ असाच उपदेश केला आहे हे यावरुन स्पष्ट होते.

पसायदानातील ह्या ओवीचे हेच सांगणे आहे असे वाटते. जरी तुमच्यासमोर ध्यानात देव (वा गुरु) प्रत्यक्ष समोर येऊन उपदेश करु लागले तरी साधनेत पराकोटीची स्थिती प्राप्त झाली नाही असे आपण समजायला हवे. जोपर्यंत दिवसाचे चोवीस तास आपल्याला भगवंताचे दर्शन होत नाही तोपर्यंत आपली साधना सतत सुरु ठेवली पाहीजे असे ह्या ओवीचे सांगणे आहे असे वाटते. आणि ही अवस्था सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यावर येणार असल्याने ह्यानंतर पुढे काहीही करायची जरुरी नाही असे आश्वासनही ह्या ओवीत आहे. साधनेचा अंत केव्हा होतो असे कुणाला पहायचा असेल तर ह्या ओवीचा जरुर अभ्यास करावा.






आजचे निरुपण




आज आपण बाराव्या अध्यायातील तीन ओव्यांवर विचार करायचा प्रयत्‍न करु. माझ्याकडे यायला जे अनेक मार्ग आहेत त्यातील अभ्यासाचा मार्ग कसा आहे याचे वर्णन करणाऱ्या ह्या ओव्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की




पुनवेहुनि जैसे । शशिबिंब दिसेंदिसे ।

हारपत अंवसे । नाहीचि होय ॥ १०८:१२ ॥




तैसे भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजी रिगतां ।

हळू हळू पंडुसुता । मीचि होईल ॥ १०९:१२ ॥




अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।

येणे कांही न निपजे । ऐसे नाही ॥ ११०:१२ ॥




म्हणोनि अभ्यासासि काही । सर्वथा दुष्कर नाही ।

यालागी माझिया ठायी । अभ्यासे मिळ ॥ ११३:१२ ॥




ह्या ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे: `ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून आपला आकार हळू हळू कमी करत चंद्र शेवटी अमावस्येला नाहीसाच होतो त्याचप्रमाणे तू आपले चित्त सध्याच्या भोगातून हळू हळू काढ व माझ्या रुपाचे ध्यान कर. असे जर केलेस तर शेवटी तुझे मन नाहीसे होऊन तू माझ्यात विलीन होशील. सतत असा प्रयत्‍न करण्यास अभ्यासयोग म्हणतात व त्या योगाने जे काही हवे ते सर्व प्राप्त करुन घेता येते. तेव्हा ह्या योगाद्वारे तू माझ्याकडे ये.’

आपल्या इंद्रियांद्वारे मिळणारे सुख म्हणजे भोग होय. व्यवहारात इंद्रियांमार्फत सुख कधी कधीच मिळते. उदाहरणार्थ, सकाळी उशीरा उठून आरामात पेपर वाचायला फक्‍त रविवारीच मिळतो. बायकांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर केस व्यवस्थित शांपू करुन आरामात बसायला आठवड्यातून एकदाच जमते! वरील अत्यंत क्षुल्लक भोगांच्या उदाहरणाने हे स्पष्ट होईल की भोग उपभोगायच्या वेळा आपल्या आयुष्यात मधून मधूनच येतात. नेहमीचे आयुष्य आपण अशा भोग उपभोगायच्या वेळा केव्हा येतील या उत्कंठेतच घालवितो. आपले कळत, नकळतचे सर्व प्रयत्‍न असेच असतात की भोग उपभोगायच्या वेळा आपल्या जीवनात लवकर लवकर याव्यात. म्हणून `भोगाआंतूनि निघता’ असे ऐकल्यावर आपल्या जीवनात फारसे भोग आहेत तरी कुठे की त्यापासून आपण निघू अशी पळवाट सापडण्याचा संभव आहे. ही पळवाट बंद करण्याकरीता भोगाची व्याख्या आपण थोडीशी बदलली पाहीजे. केवळ इंद्रियांमार्फत मिळणारे सुख अशी भोगाची व्याख्या न ठेवता, त्या सुखात अडकलेले आपले मन हेसुध्दा आपण भोगातच धरले पाहीजे. असे बघा, ठराविक भोग का आवडतात? तर त्याबद्दल आपण बराचवेळ आस्था धरुन बसलेलो असतो म्हणून. जर काहीच आस्था नसती तर तो भोग प्राप्त झाल्यावरसुध्दा फार सुख लाभले नसते. ज्याला वर्तमानपत्र वाचायला फारसे आवडत नाही त्याला रविवारच्या पुरवणीचे काय कौतुक? ज्याला वाचायचीच आवड नाही त्याला मासिकाच्या दिवाळी अंकाबद्दल काय आस्था वाटणार? याउलट ज्यांना साहित्याची आवड आहे ते चांगल्या दिवाळी अंकाची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात. तेव्हा भोग उपभोगताना जे सुख मिळत असते त्यात आधीच्या प्रतीक्षेचा फार मोठा भाग असतो. म्हणून भोगाच्या कल्पनेत इंद्रियांच्या सुखाबरोबर आपल्या मनाची उत्कंठा धरण्यात काहीच वावगे नाही असे वाटते.

असा विचार केला तर वरील ओव्यांचा अर्थ `सध्या तुझ्या जीवनात ज्या भोगाच्या कल्पना आहेत, त्यांच्या पूर्णतेकरीताच जो तू जगत आहेस, त्यामध्ये हळू हळू तू बदल केलास तर माझ्याकडेच येशील’ असा होतो. आपण असा विचार करुन स्वतःचे जीवन बघितले तर लक्षात येईल की आपले संपूर्ण जीवन आपण भोगातच घालवितो आहोत. कारण प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या भोगाबद्दलची आसक्‍ती आपल्यात असतेच आणि त्या आसक्‍तीनुसारच आपले वागणे ठरत असते. सतत आपला हाच उद्देश्य असतो की काहीतरी सुख लाभावे. या आसक्‍तीलासुध्दा भोगात सामील केल्याने `भोगाआंतून निघता’ करायचे असेल तर आपल्या सगळ्या जीवनात बदल करावा लागेल हे स्पष्ट होते.

म्हणजे, आपल्याला केवळ भोगाची गोष्ट प्राप्त झाल्यावर त्यातून मन काढून देवाकडे लावायचे नाही तर भोगाची इच्छेपासूनसुध्दा आपल्याला दूर जायचे आहे. व्यवहारातील काही ठराविक गोष्टी प्राप्त करण्याचे ध्येय ठेवून जे आपण जगत आहोत त्या ध्येयापासूनच आपल्याला दूर जायचे आहे. हळू हळू असे दूर होण्याच्या प्रक्रियेला अभ्यासयोग म्हणतात.

आता आपण असा विचार केला पाहीजे की असे करायची आपली तयारी आहे का. सध्याच्या जीवनात आपण एवढे सुखी आहोत की ह्यापेक्षा अधिक सुख मिळेल ही कल्पनासुध्दा आपल्याला फार आकर्षित करु शकत नाही. आपण असा प्रयत्‍न का करायला हवा याचे उत्तर नामदेवांच्या वरील गोष्टीतच आहे ते आपण बघूया. नामदेव महाराज त्यांच्या विठ्ठलाबरोबर पूर्ण सुखी होते (निदान असे त्यांना वाटत होते), केवळ देवाने सांगितले म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेले होते. त्या भेटीत त्यांचा जो अपमान झाला तो आधी कधीही झाला नव्हता. गोरा कुंभाराच्या आधी त्यांना कुणीही `कच्चे मडके’ असे संबोधिले नव्हते. तशी बिशादच कुणाची नव्हती. त्यामुळे नामदेवांना त्यांच्या अपमानाचा घाव जिव्हारी लागला. मग त्यांनी परत येऊन देवाला विचारले की बरोबर कोण तेव्हा देवाने त्यांना योग्य उत्तर देऊन श्रीसंत विसोबा खेचरांकडे पाठविले. यात एक अत्यंत सूक्ष्म गोष्ट अशी बघा की देवाला हे नाटक करायची काय जरुरी होती? ज्ञानेश्वर महाराजांकडे पाठविण्याआधीच त्यांनी नामदेवांना विसोबा खेचरांकडे का पाठविले नाही? विठ्ठलाने सांगितले असते तर त्यावर विश्वास ठेवून नामदेव तिकडे गेले असतेच की. मग हा लांबचा खेळ कशाला? इथे ही गोष्ट लक्षात घ्या की प्रत्यक्ष देवाला नामदेवांची मदत करुन त्यांची अध्यात्मिक प्रगती करुन घ्यायची होती तरीसुध्दा तो देव त्यांनी योग्य प्रश्न विचारेपर्यंत थांबला. ज्यावेळी खुद्द नामदेवांना आपल्या सध्याच्या उच्च स्थितीला फारसा मान न देणारे संत प्रत्यक्ष दिसले, त्यांनी तो अनुभव स्वतः अनुभवला तेव्हाच त्यांना योग्य मार्गाची जाणीव झाली. आता देवाने जरी सरळ विसोबा खेचरांकडे जा असे सांगितले नाही तरी देवाने नामदेवांना त्यांच्याच मार्गावर संपूर्ण सोडूनसुध्दा दिले नाही! देवाकडून मदत कशी येते हे बघायला ही गोष्ट एक उत्तम उदाहरण आहे. देव आपल्याला मदत करीत आहे यात प्रश्नच नाही पण तो संपूर्ण मदत करीत नाही. त्याच्या खेळात आपल्याला भाग घ्यावाच लागतो (जसे नामदेवांना स्वतःची मानहानी आधी सहन करावी लागली). देवाची मदत म्हणजे मोझेसला प्रचंड भूक लागल्यावर देवाने आकाशातून मन्ना खायला पाठविला तशी होत नसते. कधी कधी तशीसुध्दा होते (मोझेसच्या बाबतीत तसे झाले), पण दरवेळी तशी होत नाही. देवाला आपल्याकडून प्रयत्‍नांची अपेक्षा असते हे लक्षात घ्या.

म्हणून साधनेत प्रगती व्हायला आपण स्वतः आपल्या सध्याच्या जीवन जगण्याच्या शैलीत बदल करायचे प्रयत्‍न केलेच पाहीजेत. कधी कधी देवाची मदत आपल्याला थप्पड मारण्याच्या रुपातसुध्दा येते (जसे नामदेवांना आधी थापटण्याचा मार व नंतर सर्वांचे उपहासात्मक हसणे सहन करावे लागले). गुरु मदत करतात हे खरे असले तरी ती मदत आपल्या जीवनपध्दतीला अनुसरुन होईल असे काही नाही. अशा वागण्यात गुरुंचे निर्दयत्व अजिबात दिसत नाही. तुम्ही स्वतःच्या जीवनपध्दतीत गुंतला आहात, स्वतःच्या मानाची जाणीव ठेवून आहात पण म्हणून तुमच्या गुरुंनी तसेच गुंतावे ही अपेक्षा धरु नका. एखादा आठ वर्षांचा मुलगा मित्रांबरोबर खेळताना मोठ्या माणसाचे सोंग आणतो व त्याचे सर्व मित्र त्या सोंगाला अनुसरुन त्याच्याशी दबकून वागतात. पण म्हणून त्याच्या आईचे त्याचा वेळप्रसंगी कान पिरगाळायचे स्वातंत्र्य कमी होते का?! आपली अवस्था त्या छोट्या मुलासारखी आहे व आपले गुरु (वा देव) म्हणजे आपल्या आईसारखे आहेत. तेव्हा त्यांच्या कठोर वागण्यात निर्दयता नसून आपल्या खऱ्या सुखाची जाणीव असते हे ध्यानात ठेवा व मनापासून त्यांच्या निर्देशानुसार वागायचे ठरवा. मग तुमची विसोबा खेचरांशी भेट होईलच!

म्हणून आपल्याला स्वतः बदलायला हवेच, त्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या परीस्थितीत बदलला नाहीत तर हा बदल होण्याकरीता आपल्याला थोडीशी थप्पड खायला लागते. उदाहरणार्थ, जीवनात सर्व व्यवस्थित चालले असूनही मनाला अस्वस्थ वाटणे, मी कशाला जगतो आहे अशी बोचणी लागणे म्हणजे देवाने आपल्याला दिलेली एक थप्पड आहे असे समजायला हरकत नाही. या जाणीवेकडे दुर्लक्ष करु नका. तिकडे दुर्लक्ष केल्यास अजून मोठी थप्पड येईल हे ध्यानात ठेवा. तुम्ही शिकेपर्यंत गुरु तुम्हाला धडे देत राहणार आहेत, मग जेवढ्या लवकर शिकता येईल तेवढे बरे नाही का? जागे होणे म्हणजे काय तर उगाचच अस्वस्थ वाटते आहे हे आधी मान्य करा. मान्य करा की आत्तापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या आता आधीएवढ्या आवडत नाहीत. `भोगाआंतुनी निघता’च्या प्रक्रियेत असे मान्य करणे म्हणजे पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेचा चंद्र जसा थोडा लहान असतो तशी अवस्था होय. मग द्वितीया म्हणजे सध्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर काय होईल याचा विचार करणे होय. यानंतर मला या इच्छा का झाल्या याचा विचार करणे होय. विचार करा की कुठल्या कारणाने मी असे ठरविले की अमुक अमुक गोष्टी मला हव्याच आहेत. अशा विचार करण्यामध्ये तुम्ही त्या इच्छांच्या पलिकडे जात आहात हे लक्षात घ्या. मग तुमच्यापुढे दुसऱ्या इच्छा येतील परत त्यांच्यावर विचार करा. हाच अभ्यासयोग होय. संपूर्ण जीवन ह्या योगात घालवायची तयारी ठेवा. हळू हळू तुमच्या सर्व इच्छांचे तुमच्यावरचे प्रभुत्व कमी व्हायला लागेल. तुमचे जीवन इच्छाविरहीत व्हायला लागेल.

अशावेळी तुमची अवस्था कशी असेल? आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या इच्छेच्या पूर्तीकरीताच जीवन जगलो असण्याने तुम्हांला कदाचित इच्छेविरहीत जगण्यामध्ये शून्यत्वाचा भास होईल. पण तसे होत नाही. जरा बघा की जेव्हा तुमची एखादी इच्छा पूर्ण होते आणि दुसरी इच्छा निर्माण झालेली नसते तेव्हा तुम्ही नुसते स्वस्थ बसलेले असता. त्या मानसिक स्वस्थतेचीच ओढ खरे म्हणजे तुम्हाला इच्छा ठेवायला प्रवृत्त करीत असते. जर तुमच्या इच्छा निघुन गेल्या तर जीवनात तुम्ही सतत त्या शांत अवस्थेत रहाल हे लक्षात घ्या. ही अवस्था शून्यत्वाची नसून परीपूर्णतेची आहे हे जाणून घ्या. ही अवस्था म्हणजेच देवाशी आपले असलेले सान्निध्य होय. कुठल्याही कारणाशिवाय आपले मन आनंदी राहणे ही निर्गुण परमेश्वराच्या अस्तित्वाची खूण आहे. ह्या मानसिक शांतीत तुम्हाला जे काही समजेल ते तुमचे आणि परमेश्वराचे अत्यंत खाजगी असे संभाषण आहे. त्या शांतीत जे काही आपल्याला कळते ते म्हणजे `चित्त मजमाजी रिगता, हळू हळू मीचि होईल’ आहे.

हे सर्व व्हायला कृपाकरुन असे समजू नका की इच्छा ठेवणे हेच चुकीचे आहे. असलेल्या इच्छा का आल्या हे बघणे जरुरी आहे. कुठल्याही इच्छा चुकीच्या नाहीत तर त्या इच्छांमध्ये गुंतणे चुकीचे आहे. प्रामाणिकपणाने बघा की आलेली इच्छा मी का ठेवली. ते बघणे म्हणजे अभ्यास होय. जबरदस्तीने त्या इच्छा कढून टाकणे यात अध्यारुत नाही. चांगली-वाईट अशी वर्गवारी न करीता आपल्या इच्छांकडे बघणे हा प्रयत्‍न जरुरी आहे. ज्याप्रमाणे नामदेवांकडून ज्ञानेश्वरांच्या गावी जाण्याची अपेक्षा देवाने ठेवली तशी ही अपेक्षा आहे. तुम्ही बघा की लहान मुले प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात. का खाऊ, का अभ्यास करु, का आंघोळ करु इत्यादी. मोठे झाल्यावर आपण हे प्रश्न विचारणे सोडून दिले आहे. आपल्या इच्छांबाबत ते विचारायची सवय लावून घ्या. परत लहान बना! आपल्याकरीता अभ्यासयोग म्हणजे हेच आहे. प्रत्यक्ष भगवान म्हणत आहेत की असे वागल्यास तुला दुसरे काही करायची जरुरी नाही. तू आणि मी यात काही फरक राहणार नाही अशा अवस्थेत तू येशील. भगवंतांच्या या आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून प्रयत्‍न करा. यश तुमच्याकरीता राखून ठेवले आहे!




॥ हरि ॐ ॥








अध्याय बारावा

                     213: God’s Expectation


॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आपण नेहमीच्या तीन ओव्या म्हणून सुरुवात करु.

सुरुवातीचे नमन




ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥



जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥



किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

आपण का सर्वजण इथे एकत्र येतो याचा आपण सुरुवातीला विचार करु. आपल्याला दर शनिवारी ज्ञानेश्वरीवर प्रवचन ऐकावेसे का वाटते? दर बुधवारी किंवा दररोज साधना कराविशी का वाटते? कुठली शक्‍ती आपल्याला हे सर्व करायला भाग पाडत आहे? सर्वसाधारणपणे आपण असे बघतो की गोष्ट जरुरी आहे असे भासल्याशिवाय आपण करत नाही. जोपर्यंत आपण आपल्या सध्याच्या स्थितीत सुखात असतो तेव्हा दुसरे काही करावेसे आपल्याला वाटतच नाही. याचे एक उदाहरण म्हणून भरदुपारी चारा खाऊन चिखलात बसून शांतपणे रवंथ करणाऱ्या म्हशीकडे बघा. सर्व जग जरी तीला घाण समजत असले तरी ती आपल्या सुखात मग्न असते. तीचे पोट भरलेले असते व अंगावरचा चिखलाचा थर दुपारच्या कडकडीत उन्हाच्या धगीपासून तीला वाचवत असतो. यापुढे काही करण्याची आवश्यकता वाटत नसल्याने ती शांतपणे डबक्यात बसून असते. आपण आपले आयुष्य असेच जगत असतो. जेव्हा आपल्याला काही नवीन करायला कुणीतरी भाग पाडते, मग ती शक्‍ति आपल्या मनातील इच्छा असो, वा समाजाची आपल्याकडून अपेक्षा असो, तेव्हाच आपल्या सध्याच्या स्थितीत बदल करायचा विचार आपण करतो. जेव्हा आपल्या कुठल्यातरी अपेक्षा पुऱ्या होत नाहीत तेव्हा आपण सध्याच्या अस्तित्वाबद्दल नाखूश होऊन ते बदलायचा विचार करु लागतो. म्हणून खऱ्या अर्थाने साधना सुरु करण्यापूर्वी आपल्या सध्याच्या जीवनाबद्दल थोडेतरी अस्वस्थ असणे जरुरी आहे. परमेश्वराच्या जवळ जाण्याकरीता एक कुठलातरी हेतू आपल्या मनात असला पाहीजे. बाकीच्या लोकांना कितीही क्षुल्लक वाटणारा का असेना, पण कुठलातरी बोचणारा प्रश्न मनात ठेवून आपण परमेश्वराच्या जवळ जायचा प्रयत्‍न केला पाहीजे.
अर्जुनाला गीतेचा उपदेश केव्हा झाला? भगवान श्रीकृष्ण त्याचे मार्गदर्शक आयुष्यभर होते, पण त्यांनी गीता केव्हा सांगितली? तर जेव्हा अर्जुनाला स्वतःच्या सध्याच्या आयुष्याबद्दल संभ्रम उत्पन्न होऊन, जी गोष्ट तो आयुष्यभर विचार न करीता करत होता (म्हणजे युध्द लढणे) त्याबद्दलच निराशा उत्पन्न झाली तेव्हा. अगदी द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीसुध्दा त्याची एवढी निराशाजनक परीस्थिती नव्हती कारण त्या गोष्टीचे कर्तुत्व युधिष्ठिराच्या माथ्यावर त्याने ठेवले होते व स्वतःच्या जीवनाबद्दल त्याला संभ्रम उत्पन्न झाला नव्हता. परंतु जेव्हा हातात धनुष्य आहे आणि आत्ता आपल्या मित्रांना, नातेवाईकांना स्वतः मारायची जी वेळ आली आहे ती आपल्या स्वतःच्या निर्णयांनी आली आहे हे पूर्णपणे जाणविल्यावर त्याच्या मनात जी अस्वस्थता आली तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णांना योग्य प्रश्न विचारायला सुरुवात केली. योग्य प्रश्नांना योग्य उत्तर (म्हणजे गीता) मिळून तो ज्ञानी झाला. आपल्या गुरुंना योग्य प्रश्न विचारणे ही गोष्ट महत्वाची आहे कारण आपल्या गुरुंना कधीही कुठल्याही गोष्टीची घाई नसते. याचे कारण असे की आपली सध्याची अवस्था ते आपल्या अनेक जन्मांत आलेल्या अनंत अवस्थांपैकी एक मानत असल्याने त्यांना त्याबाबत फारशी आत्मीयता नसते. आपल्याला ह्या सत्यस्थितीची जाणीव नसते. पूर्वजन्मीचे कुणी बघितले आहे आणि उद्या काय होणार आहे हे कुणाला माहीती आहे असा आपला विचार असतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीबद्दल आपल्याला प्रचंड आत्मीयता असते. डोळ्यावर झापड बांधलेल्या घोड्याला फक्‍त समोरचे दिसत असते, आजूबाजूचे काही दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सध्याच्या परीस्थितीच्या मोहाने आधी घडलेल्या वा पुढे होणाऱ्या सर्व गोष्टींबद्दलचे अज्ञान होते व सद्य परीस्थितीत आपण पूर्णपणे गुंतुन जातो. परंतु गुरु स्वतःला अशा बंधनात घालत नाहीत आणि म्हणून ते शांत असतात. त्यांना आपल्यावर आलेली सध्याची आपत्ती आधी आलेल्या अनेक कठीण प्रसंगापेक्षा फार वेगळी वाटत नसते. त्यांना माहीती असते की अशाच अनेक मन चलबिचल करणाऱ्या घटना आधी घडल्या आहेत आणि पुढेही अनेकवेळा येणार आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावरील एका वाळूच्या कणाला आपण जेवढे महत्व देतो तेवढेच महत्व ते आपल्या सध्याच्या घटनेला देत असतात. त्यामुळे ते आपण जो प्रश्न विचारु त्याचेच उत्तर देऊन शांत राहतात. म्हणून आपण जेव्हा साधना करतो तेव्हा काहीतरी प्रश्न आपल्यासमोर असणे चांगले असते. जर तो प्रश्न बरोबर असला तर आपली प्रगती पटापट होते. जर चुकीचा असला तर हळू होते. म्हणून योग्य प्रश्न जवळ ठेवून त्याच्या उत्तराच्या उद्देशाने साधना केलेली खूप चांगली असते.
म्हणूनच आपण दरवेळी वरील तीन ओव्यांनी प्रवचनाला सुरुवात करतो. वरील तीन ओव्यांपैकी पहिली ओवी असे सांगत आहे की आपल्या साधनेचे ध्येय `भजिजो आदिपुरुखी’ असावे. परमेश्वराच्या ज्या रुपातून हे सर्व जग निर्माण झाले आहे त्याचे थोडेसे ज्ञान आपल्याला व्हायला हवे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून साधना करावी.
आता ज्ञानेश्वरीमध्ये असे लिहिले आहे की मनाची सतत शांत अवस्था असणे ही गोष्ट परमेश्वराचे खरे रुप जाणून घेण्याकरीता आवश्यक आहे. मनाची शांति हे साधनेचे अंतिम ध्येय नाही तर आपल्या प्रगतीचा एक टप्पा आहे. म्हणजे आदिपुरुषाला ओळखायचे असेल तर आधी मनाची अशी शांति मला मिळाली पाहिजे की जी जगातील कुठल्याही गोष्टीच्या अभावाने नाश पावणार नाही अशी अपेक्षा ठेवून साधना करावी. कठीण परीस्थितीतसुध्दा मानसिक शांतता प्राप्त करायची असेल तर आपण साधना करताना अनुकुल स्थितीच असावी अशी अपेक्षा ठेवणार नाही. आपली साधना नीट होण्याकरीता दुसऱ्यांना बंधनात ठेवणार नाही. उदाहरणार्थ, माझे ध्यान चालू आहे, मग टी.व्ही. बंद ठेवा असे सांगणार नाही किंवा घरातील छोट्या मुलाला आता गप्प बसायला हवे असा धाक देणार नाही. कारण बाहेरील परीस्थिती अनुकुल असताना जी शांतता मिळेल त्याच्या पलीकडे आपल्याला जायचे असल्याने आपली साधनासुध्दा प्रतिकूल परीस्थितीत करायला हवी हे आपल्याला कळते. अशा रीतीने साधनेचे ध्येय एकदा ठरविले की साधनासुध्दा बदलते. खरे म्हणजे मनाची सतत शांति हे आपली जन्मजात अवस्था आहे. लोकमान्य टिळकांनी `स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे’ अशी घोषणा केली व आपण सर्व त्या वाक्याचे कौतुक करतो. परंतु मानसिक शांति हे तर आपले स्वरुपच आहे, ते आपण कसे गमावले याचा विचार आपण कधी करीत नाही. तो आता केला पाहीजे. लक्षात घ्या की आपण स्वतःच असे ठरविले आहे की `चांगले घर असण्यात माझ्या मनाची शांतता आहे’ वा `चांगली नोकरी, भरपूर पैसे असण्यात मनाची शांतता आहे’ किंवा `घरातील सर्व मंडळींनी प्रेमाने राहण्यात माझे समाधान आहे’. मानसिक शांतीच्या आपण केलेल्या अशा कृत्रिम व्याख्येंमध्येच सहज असलेली शांति आपण गमावली आहे हे आपल्या लक्षात आले पाहीजे. याचा अर्थ असा नव्हे की वरीलपैकी एका गोष्टीच्या प्राप्तीमुळे आलेली मानसिक शांति खोटी आहे. व्यवहारात मनासारखे झाल्यावर जी शांतता मिळते आणि साधना चांगली झाल्यावर जी शांतता मिळते त्यांत काहीही फरक नाही. फरक एवढाच आहे की व्यवहारातल्या गोष्टींनी मिळणारी शांतता फार वेळ टिकू शकत नाही. ज्या मार्गानी ती आली आहे त्याबद्दलचे आपले ममत्व निघून गेले की शांतीसुध्दा निघून जाते. उदाहरणार्थ, आज घर छान आहे म्हणून समाधान असेल तर उद्या त्यापेक्षा अधिक चांगले घर असावे अशी इच्छा झाली तर ते आधीचे सुख निघून जाते. सध्याच्या नोकरीची सवय झाली की अजून चांगली नोकरी असावी असे वाटायला लागून परत मन अस्वस्थ होते इत्यादी. याउलट साधनेमुळे प्राप्त झालेली मनाची शांतता दृष्य कारणाशिवाय असल्याने सतत आपल्या जवळ राहू शकते. इथे काही साधक म्हणतील की नाही, साधनेची शांततासुध्दा निघून जाते हा आमचा अनुभव आहे. तसे सध्या जरी होत असले तरी उद्या साधना वाढल्यावर ती सतत राहू शकेल ही क्षमता त्या शांततेमध्ये असते. संसारातल्या सुखाने मिळणाऱ्या मानसिक शांतीत ही क्षमता नाही. म्हणून सतत शांतता हवी असेल तर पारमार्थिक प्रयत्‍न करणेच आवश्यक आहे. ही मूळ भूमिका मनात ठेवून जो साधक साधना करेल त्याची प्रगती फार लवकर होईल.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवाची आहे की आपल्या मनाची अवस्था शांत आहे हे फक्‍त आपल्यालाच कळते. ही शांति दुसऱ्यांना सांगायची आवश्यकता नसते, उलट तसे दुसऱ्यांना सांगण्याच्या आपल्या प्रयत्‍नामध्येच ती आपण गमावतो! फक्त आपली आपण उपभोगण्याची ही गोष्ट आहे. असे बघा, आपण अस्वस्थ आहे हे बाकीच्यांना कसे कळते? तर आपल्या उपस्थितीत ते स्वतः अस्वस्थ होतात तेव्हा. आपले काही शब्द म्हणा किंवा आपली शारीरीक चलबिचल म्हणा त्यांना अस्वस्थ करुन अशी जाणीव करुन देते की आपले मन शांत नाही. त्यांना आपल्या अशांततेची जाणीव करुन द्यायला हाच एक उपाय आहे. त्याचप्रमाणे आपली शांतता त्यांना सांगायची असेल तर आपल्याबरोबर असताना त्यांना स्वतःला शांत वाटले पाहीजे, आपली सोबत हवीहवीशी वाटली पाहीजे. या त्यांच्या वाटण्यातच आपली शांति त्यांनी ओळखली आहे असे आपण मानून शब्दांमध्ये ती सांगायला जाऊ नये.
आता शेवटची गोष्ट म्हणजे ही शांत अवस्था ओळखायची कशी? दोन गोष्टींनी आपण शांत अवस्था ओळखू शकतो. पहीली गोष्ट अंतर्गत आहे, आपली आपण शोधायची आहे. ती म्हणजे आपला तटस्थपणा. मन शांत होणे म्हणजे त्याचा नाश होणे नव्हे. मनातील विचार येतजात असतातच. परंतु आपण त्यामध्ये गुंतत नाही. आपल्याच मनातील सर्व विचार आपण तटस्थपणे जेव्हा पहायला लागतो तेव्हा आपले मन शांत व्हायला लागले आहे हे आपण ओळखावे. आपण सकाळी सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला ही जाणीव असते की आज अमुक अमुक गोष्टी करायला हव्यात तरी त्यांच्याकडे आपण तटस्थपणे पाहून अजून पाच मिनिटे झोपले तर चालेल का याचा विचारसुध्दा आपण करत असतो. ही जी तटस्थता असते ती आपल्या शांतीचेच लक्षण आहे. अशी आपल्या मनाची तटस्थता सतत आपल्याजवळ राहीली पाहीजे, सतत आपल्या मनाकडे आपण झोपेतून उठल्यावर कसे बघतो तसे बघू शकलो पाहीजे. किंवा जेव्हा आपले पोट भरलेले असते तेव्हा आवडती वस्तू समोर आली तरी आपण कधी खातो तर कधी खात नाही. त्याप्रमाणे आपले मन शांत असले की एवढी प्रसन्नता सतत जवळ असते की मनातल्या इच्छांकडे आपण असेच तटस्थतेने पाहू शकतो. दुसरि गोष्ट म्हणजे बाह्य आहे, समाजाकडे बघून जाणायची आहे. ती म्हणजे शांत मनाच्या माणसाच्या अस्तित्वाचे जगातील कुणाला ओझे वाटत नाही. तेव्हा आपली शांत अवस्था ओळखण्याकरीता किती लोकांना कारणाशिवाय आपण आवडतो ते बघावे. राजकीय नेते सभेला पैसे देऊन माणसे आणतात तसे सतत दुस्ऱ्यांकरीता चांगले वागायचे ओझे न घेता किती माणसे आपल्या जवळ आहेत ते बघावे. स्वतःचे आयुष्य नेहमीप्रमाणे जगताना जर जास्त माणसे जवळ यायला लागली तर आपले मन शांत होत आहे असे मानावे. जर तो नंबर कमी होत असला तर शांति गमावली हे ध्यानात ठेवावे.
तर, मनाची शांत अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी ह्या हेतूने आपण इथे नियमितपणे एकत्र जमतो हे सारखे लक्षात ठेवावे. सतत हे ध्येय समोर ठेवल्याने वायफळ गप्पा करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा आपण ह्या सत्संगाचा अधिक चांगला उपयोग करुन घेऊ.

निरुपणाच्या ओव्या




हे विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३:१२ ॥




मग याहीवरी पार्था । माझिया भजनीं आस्था ।

तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१४:१२ ॥


आज आपण बाराव्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आवडणाऱ्या भक्‍ताचे जे वर्णन केले आहे त्याबद्दल विचार करु. तो श्लोक असा आहे:

                 तुल्यनिंदास्तुतिमौंनी संतुष्टो येनकेनचित्‌ ।

                 अनिकेतः स्थिरमतिर्भक्‍तिमान्मे प्रियो नरः ॥ १९:१२ ॥

ह्या श्लोकाचे विवरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यामधील दोन ओव्या आज निरुपणाला घेतलेल्या आहेत. त्यांचा अर्थ असा आहे: `ज्या माणसाच्या मनात हे सर्व विश्व माझे घर आहे ही जाणीव पूर्णपणे झाली आहे, एवढेच नव्हे तर हे सर्व दृश्य जग म्हणजे माझेच रुप आहे हे त्याला माहीती आहे. यानंतर जेव्हा तो माझ्यावर भक्‍ति करतो तेव्हा मी त्याला माझ्या डोक्यावरील मुकुटातील मण्यासारखा मानतो.’ नेहमीप्रमाणे या शाब्दीक अर्थापलीकडे जायचा आपण प्रयत्‍न करु व बघू की आपल्या साधनेकरीता ह्या ओव्यांचा कसा उपयोग करुन घेता येईल.

परमेश्वराला आवडणारे भक्‍त

वरील ओव्यांतील पहिल्या ओवीमध्ये भक्‍ताची जी अवस्था वर्णन केली आहे ती कशी आहे? तर ह्या जगात जे जे काही घडत आहे ते माझेच रुप आहे हे त्याला पूर्णपणे माहीती आहे. म्हणजे नक्की काय? असे बघा, आपल्या स्वतःच्या शरीरातील किती गोष्टी आपल्याला आवडत असतात? खरे म्हणजे स्वतःच्या शरीरामुळे आपल्याला अनेक बंधने पडत असतात. समाज आपल्याला शरीरानेच ओळखत असल्याने सामाजिक स्थितीला अनुसरुन आपण रहायला पाहीजे याचे एक सतत दडपण आपल्यावर असते ते केवळ आपल्या शरीरामुळे आले आहे. मोठी नैतिक बंधने तर सोडाच, पण `मला व्यवस्थित कपडे घातले पाहीजेत’, `केस अस्ताव्यस्त न ठेवता राहीले पाहीजे’ इत्यादी अनेक क्षुद्र बंधनेसुध्दा आपण विनातक्रार पाळत असतो. आपल्या शरीराला नीट ठेवण्याकरीता इतके कष्ट घ्यावे लागतात तरी शरीराबद्दलचे आपले आकर्षण कायमच राहते. हाच नियम वरील साधक जगाला लावू लागतो. हे विश्वच जर माझे शरीर असेल तर त्यातील काही घटना आपल्या आवडीप्रमाणे झाल्या नसल्या तरी आपण आपल्या शरीराला कधी कधी दुखणे होते तसे स्वीकारले पाहीजे. म्हणजे, समजा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी `हे जग असे निष्ठुर कसे आहे’ असा विचार आपण केला नाही पाहीजे. आपली पाठ दुखायला लागते तेव्हा आपण पाठीच्या अस्तित्वाबद्दल तक्रार न करीता ते दुःख दूर करायला डॉक्टरकडे जातो त्याचप्रमाणे आवडती वस्तू वा व्यक्‍ती मिळाली नाही तरी त्याबद्दल हे असे का झाले याबद्दल विचार न करीता जो लगेच त्या वस्तूच्या, व्यक्तीच्या अनुपस्थितीत आता काय करु शकू असा विचार करायला लागतो त्याची मनःस्थिती `हे विश्वचि माझे घर’ व्हायला लागली आहे असे आपण समजले पाहीजे.
खरे म्हणजे घडलेल्या गोष्टीचे दुःख आपल्याला का होते? तर आपल्या मनात एक असते आणि घडते दुसरेच म्हणून. आपले त्या घटनेवर पूर्ण प्रभुत्व नाही याची पूर्ण जाणीव अशा वेळीच आपल्याला होते. आपल्या क्षमतेला हा एक धक्का बसलेला असतो. आपल्याला हे अजिबात आवडत नाही की आजूबाजूच्या घटनांवर आपले काहीच प्रभुत्व नाही. घटना त्यांना पाहीजे तशा घडत आहेत आणि आपण असहाय्यपणे फक्‍त बघत आहोत ही कल्पनासुध्दा आपल्याला सहन होत नाही, मग ती परीस्थिती सहन करणे दूरच राहीले. लहानपणापासून आपल्या कर्तुत्वाने सर्व मिळविले आहे हे आपण इतके मानलेले असते की आता आपल्या ताब्याबाहेर कुठली गोष्ट झाली की आपले मन अस्वस्थ होते. मग ती तशी का झाली, त्याचे कारण काय? याचा विचार आपण करायला लागतो. जर उत्तर सापडले तर आपले मन शांत होते कारण त्या उत्तरामध्ये आपण असे समजतो की परत आपला ताबा त्या घटनेवर आला. पण जर ही घटना अशी का घडली हे कळूच शकले नाही तर आपण फारच अस्वस्थ होतो. आपल्या बुध्दीला तो एक आघात असतो. तेव्हा आपण हे लक्षात घेतले पाहीजे की जरी प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असते हा कर्माचा नियम खरा असला तरी ते कारण अत्यंत सूक्ष्म असू शकते. गोष्ट मोठी असली तरी त्यामागचे कारण तेवढेच मोठे असले पाहीजे असा काही कर्माचा नियम नाही. लहानपणी कधी एक गोष्ट आपल्या शाळेतल्या बाईंनी सांगितलेली असते, आणि तीचा परीणाम आपल्या सबंध जीवनावर होऊ शकतो. बऱ्याच काळाने आपण एका परीस्थितीमध्ये असे का वागलो याचा विचार करायला लागलो तर लहानपणींचे हे सूक्ष्म कारण आपल्याला मिळेलच असे नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या असतात की ज्यांचा खरा परीणाम खूप काळानेच आपल्याला जाणवितो. त्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे. तेव्हा आधी संपूर्ण सारासार विचार करुन आपण हे जाणले पाहीजे की आपल्या बुध्दीच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीचे कारण शोधण्यात वेळ वाया घलविण्यापेक्षा गोष्ट आहे तशी स्वीकार करण्यातच खरा बुध्दीचा उपयोग आहे हे जेव्हा साधकाच्या लक्षात येते तेव्हा त्याचे मन जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार करायला तयार होते. असा विनातक्रार स्वीकार सतत करीत राहणे म्हणजेच `हे विश्वचि माझे घर’ अशी अवस्था होणे होय.
आता ही अवस्था होणे म्हणजे दगडाच्या मूर्तीसारखे जगाकडे बघणे नव्हे. तुमच्या मनाला सुख आणि दुःख हे जाणवित राहतेच. पण तुम्ही कधीच पराकोटीचे सुखी होत नाहीत वा पराकोटीचे दुःखी होत नाही. सध्याच्या आपल्या मनमानी जगण्यामध्येसुध्दा एक वेगळी गंमत आहे. जेव्हा तुम्ही संसारातील ठरावीक गोष्टींच्या उपस्थितीमध्ये सुख मानून त्या गोष्टींच्या प्राप्तीकरीता अथक प्रयत्‍न करता आणि त्या गोष्टी मिळतात तेव्हा तुम्हांला जे सुख लाभते ते सुख `मिळाली तर मिळाली, नाही तर नाही’ अशा प्रयत्‍नांतून प्राप्त झालेल्या गोष्टीमध्ये कधीच नसते. आत्यंतिक इच्छा ठेवून जगण्यामध्ये सुखाची अत्यंत परमावधी गाठता येते (व त्याप्रमाणेच दुःखाची सगळ्यांत कठोर जाणीव होऊ शकते). असे हे टोकाचे जीवन जगण्यामध्येसुध्दा एक गंमत आहेच, नाही असे नाही. परंतु ही गंमत आपण फार काळ उपभोगू शकत नाही. तरुणपणी असे जगणे ठीक आहे परंतु अगदी सर्वांत स्वच्छंदी जगणाऱ्या सिनेमा नटाच्या वा नटीच्या मनातसुध्दा लग्न करुन एकप्रकारचे संयमित जीवन जगावे ही भावना कधीतरी होतेच. ज्ञानेश्वर महाराजसुध्दा असे म्हणत नाहीत की तुमच्या मनाची अशी पराकोटीचे सुख भोगायची इच्छा असताना ती दाबून ठेवून साधना करा. आपल्या नेहमीच्या तीन ओव्यांपैकी `किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहीं लोकी’ या ओवीतून ते असेच सुचवित आहेत की तुमच्या आत्यंतिक इच्छा असल्या तर त्या आधी पूर्ण होऊ देत मग तुम्ही `भजिजो आदिपुरुखीं अखंडित’ असे रहा. याचा अर्थ असा की ज्या वेळी तुम्हाला असे वाटायला लागते की जीवनात एक संयम असलेला बरा त्या वेळी केवळ आधीच्या आठवणींत रमून न जाता सध्याच्या मनाच्या अवस्थेशी प्रामाणिक राहून संयमित जीवन जगण्याचा प्रयत्‍न सुरु करा. आणि ही अवस्था येईलच. आपल्या जीवनातील अत्यंत पराकोटीची अवस्थासुध्दा स्वरुपानंदाच्या मानाने खूप छोटी आहे. ही सत्य परीस्थिती आपल्याला स्वच्छंदी जगण्यापासून खेचून साधनेच्या, संयमित जीवन जगण्याच्या मार्गावर लावेलच यात अजिबात शंका नाही.
म्हणून आपण आधीच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींत रमून काही वेळ तसेच जगायचा जरी प्रयत्‍न केला, तरी शेवटी साधनेला लागूच यात शंका नाही. एखाद्याला प्रत्येक शुक्रवारी सिनेमाचा पहिला खेळ बघितलाच पाहीजे असा शौक असतो. काही काळाने त्याची ती प्रतिमा जपायची म्हणून तो दर शुक्रवारी जाऊ लागतो मग अजून काही काळाने त्याच्या जुन्या मित्राने विचारले की अजून `फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चालू आहे का? तर आता त्यात एवढी गंमत वाटत नाही अशी कबूली द्यायला तो लाजत नाही. आपण प्रामाणिक राहिलो तर आधी ज्या गोष्टींने आपल्याला सुख लाभत होते ते आता आपल्याला मिळत नाही हे आपण कबूल करतो. परमेश्वराचा हा एकच दोर आहे जो आपल्याला त्याच्याकडे खेचून नेत आहे. जर मिळणाऱ्या गोष्टींमधून सुख सतत तेवढेच असते तर आपण कधीच बदललो नसतो. भगवंताने हे जग असे निर्माण केले आहे की त्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये सुख द्यायची ताकद आहे पण कुठल्याही गोष्टीमध्ये सतत सुख द्यायची ताकद नाही. निरंतर सुख द्यायची शक्‍ति त्याने फक्‍त आपल्याकडे ठेवली आहे व त्या शक्‍तीची ओढ आपल्याला त्याच्याकडे खेचत आहे. ह्या शक्तीचे आपल्या जीवनातले अस्तित्व म्हणजे आपल्याला अचानक आपल्या जीवनातील आवडणाऱ्या गोष्टींबद्दलची आत्मीयता कमी होणे. काहीही कारण नसताना आपल्याला त्या गोष्टींमधला रस कमी झाल्यासारखा वाटतो. ह्यांच्याकरीता मी इतके जीवापाड प्रयत्‍न का करीत होतो असा प्रश्न भेडसावयाला लागतो. गंमत म्हणजे आपली ही स्थिती आपण कुणालाही समजावून देऊ शकत नाही. परंतु ही कारणविरहीत मानसिक बेचैनी म्हणजेच साधनेचे पहीले पाऊल असे आपण मानले पाहीजे. ह्या अवस्थेला यायला आधी आपण ज्या गोष्टींचा हव्यास आहे त्या पुऱ्या करायचा प्रामाणिक प्रयत्‍न केला पाहीजे. तुम्हाला `शॉपिंग’ची आवड असेल तर खिशातील सगळे पैसे संपेपर्यंत खरेदी करा आणि बघा काय वाटते ते? सतत बंधनात राहून माफक खरेदी करीत राहीलात तर तुमच्या जीवनातील खरेदीची आवड कधीच नष्ट होणार नाही. रामकृष्ण परमहंसांना अचानक अंगावर रेशमी भरजरी कुडता असावा अशी इच्छा झाली, त्यांनी लगेच त्यांच्या मथुर बाबूंना ते सांगून ती पुरी केली. सिल्कचा कुडता घालून ते म्हणाले `हे मना बघ हा रेशमी कुडता असा असतो, त्याच्यापासून हे असे सुख मिळते. साधनेच्या, कालीमातेच्या नावातल्या सुखापेक्षा हे मोठे आहे का?’ जेव्हा नाही असे उत्तर आले तेव्हा त्यांनी लगेच तो कुडता काढून फेकून दिला. मथुरबाबूंच्या सेवकाने ही वार्ता त्यांना जाऊन तक्रारपूर्वक सांगितली तेव्हा ते म्हणाले, `असू दे, `बाबा’ कसे वागतात हे आपल्या सारख्यांना कळणे शक्य नाही. तू त्यांना काही बोलू नकोस.’ अर्थात इच्छा संपूर्णपणे पूरी करण्यात सारासार विचार करणे जरुरी आहे. खुद्द रामकृष्ण परमहंस ही गोष्ट सांगून नंतर म्हणायचे की क्षुद्र इच्छांपासून मोकळे व्हायला हा मार्ग बरा आहे पण काही इच्छांवर नुसता विचार करुन त्या मनातून दूर करणेच बरे. परंतु आपले जीवन सर्वसामान्य असल्याने आपल्या इच्छासुध्दा साधारणच असतात. त्या शक्यतो पुऱ्या करायचा प्रयत्‍न करण्यातच आपल्याला त्यांच्यापासून मुक्तिचा मार्ग आहे.
आपण इच्छा करतोच तरी का? तर आपणच त्यांना महत्व दिलेले असते म्हणून. तुम्हांला कुणी येऊन सांगितलेले होते का की अमुक एक व्यक्‍ती तुमच्या जीवनात यायलाच हवी? तुमचे तुम्हीच ठरविले होते की ही व्यक्‍ति वा वस्तू माझ्या जीवनात असायलाच हवी. ही व्यक्‍ती वा वस्तू मिळाली तर जीवन सुखद होईल अशी त्यामागची आपली भावना त्या इच्छेचे कारण होती. स्वतःच एका गोष्टीला महत्व द्यायचे आणि मग आता ती नाही म्हणून आपणच शोक करायचा हे कितपत योग्य आहे? हे सर्व विश्वच जर आपले घर आहे, आपलेच एक रुप आहे, तर आवडणारी गोष्ट न मिळणे ही घटनासुध्दा माझेच रुप आहे असे आपण समजले पाहीजे. आता तुम्ही असे म्हणाल की काही ठराविक गोष्टी (पैसा, घर, कुटुंब वगैरे) जीवनात असाव्यात असे सर्वचजण मानतात. ते सर्व चुकीचे कसे असू शकतील? परंतु लोकांनी योग्य मानलेल्या सर्व गोष्टी तुम्ही योग्य मानल्या आहेत का? स्त्रियांच्या बाबतीत बहुतांशी लोकांची मते अजून जुन्या पठडीतील असतात, अशा लोकांचे प्रमाण सुधारक लोकांपेक्षा जास्तच आहे पण म्हणून किती बायका बहुमताप्रमाणे वागतील? याचा अर्थ असा की आपल्याला जे आवडेल तेच आपण लोकांकडून घेत असतो, लोकांना आवडते म्हणून आपण आपले आयुष्य कसे घालवायचे हे ठरवित नसतो. मग आवडत्या गोष्टींबाबत का ही सबब सांगायची? आवडणारी गोष्ट जरी बघितली तरी तीच्यामध्ये नावडणारे पैलू असतातच. परंतु त्यांचे प्रमाण आवडणाऱ्या पैलूंच्या मानाने कमी असते. खरोखर, या जगातील अशी कुठलीही गोष्ट नाही की संपूर्णपणे चांगली आहे, म्हणून या जगातील अशी कुठलीही व्यक्‍ति वा गोष्ट अशी नाही की संपूर्णपणे वाईट आहे (कारण जर ती पूर्ण वाईट असली तर तीचा नाश ही पूर्ण चांगली घटना झाली असती). कुठलीही कठीण आपत्ती संपूर्णपणे दुःखद नसते, त्या विपरीत परिस्थितीतच पुढच्या वाढीची बीजे असतात. म्हणून मैनेजमेंटच्या अभ्यासात नेहमी हे सांगतात की `कंपनीला जेव्हा कठीण काळ समोर येतो त्यामध्येच चांगल्या, नवीन धंद्याची सुरुवात असते हे लक्षात ठेवा.’ एका धंद्यात कठीण काळ आल्यामुळे तुम्ही दुसऱ्या धंद्याचा विचार करु लागतात. जर तुम्ही साबण बनवित असताना मंदी आली तर केवळ कंपनीचे अस्तित्व शाबूत ठेवण्याकरीता संगणकाचा धंदा चालू केलात आणि त्यातच तुम्हाला प्रचंड यश मिळाले तर साबणाच्या धंद्यातील मंदी तुम्हांला चांगली होती का वाईट?! श्री. अझिम प्रेमजी यांची अगदी हीच अवस्था झाली होती. आता विप्रो कंपनीचे नाव संगणकाकरीताच जास्त प्रसिध्द आहे, त्यांच्या आधीचा शिकेकाई साबणाचा धंदा अजून चालू आहे पण त्यामुळे श्री. प्रेमजी कधीच सर्वांत श्रीमंत माणसांपैकी एक गणले गेले नसते. त्यांच्या आधीच्या धंद्यावर जी बिकट परीस्थिती आली होती त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व आता अधिक चांगले आहे. `केस कापायला वेळ काढायला पाहीजे, काय कटकट आहे!’ ह्या बिकट परीस्थितीवर मात करुन आपण जेव्हा केस कापून येतो तेव्हा आपले व्यक्तिमत्व अजून चांगले झालेले असते नाही?!!
सांगायचा अर्थ असा की कुठलीही वाईट परीस्थिती ही आपल्या मनाच्या सध्या काय अपेक्षा आहेत यावर अवलंबून असते. काही काळ गेल्यावर आपण सध्याच्या परीस्थितीकडे मागे वळून बघितले तर असेसुध्दा वाटायची शक्याता आहे की आपल्या जीवनातली ती सर्वांत चांगली गोष्ट होती! जसे अझिम प्रेमजींना आत्ता वाटत असणार की शिकेकाई साबण न विकला जाणे ही बिकट परीस्थिती त्यांच्यावर आली हे सर्वांत चांगले झाले. जर असे होऊ शकेल तर आपल्या साधनेने असे वाटायचा वेळ आपण करु शकतो. वीस वर्षांनी आपल्या लहानपणाकडे बघताना नुसते सुखच दिसते परंतु लहानपणी सतत नुसती बंधनेच जाणवत होती. तसे आज आपल्याला जी परिस्थिती बिकट वाटत आहे ती वीस वर्षांनी चांगली वाटण्याऐवजी परवाच चांगली वाटावी, परवातरी कशाला आजच थोड्यावेळाने तीच्यातील चांगल्या बाजू जाणवाव्यात किंवा अत्यंत टोकाची तयारी म्हणजे थोड्या वेळाने कशाला, आत्ताच, ती परीस्थिती समोर असतानाच मन शांत रहावे हे आपण साधनेन प्राप्त करु शकतो.
खरी गोष्ट अशी आहे की देव आपल्याला सतत त्याच्याकडे खेचत आहे. त्याच्या खेचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जगातील गोष्टींचे आकर्षण आपल्या मनातून कमी होत जाणे. ते कमी होण्याकरीता तो कधी आपल्या इच्छा पूर्ण करतो तर कधी मुद्दाम अपूर्ण ठेवतो. याउलट आपल्या इच्छा आपल्याला जगातील गोष्टीकडे खेचत असतात. हा खेचाखेचीचा खेळ सतत चालू आहे. परंतु हे विश्वचि माझे घर अशी मती ज्याची स्थिर झाली आहे त्याला जगातील सर्व गोष्टींबद्दल आत्मीयता असते. म्हणजे त्याने आपल्या इच्छेचा दोर हातातून टाकून दिला आहे असे आपण समजू शकतो. मग आपोआपच तो भगवंताकडे जायला लागतो कारण भगवंताच्याविरुध्द दुसरी शक्तीच अशा साधकाच्या जीवनात नसते. मग जे काय त्याच्या जीवनात घडते ती त्याची साधनाच असते. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या गोष्टी त्याला परमेश्वराचे अस्तित्व जाणवून देत असतात व तो सतत अनुसंधानात असतो. ही अवस्था ह्या ओवीत वर्णन केली आहे. असा साधक सतत स्वतःच्या आनंदात मग्न राहून आपल्या स्वतःच्या मार्गाने देवाकडे जातच असतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक घटना म्हणजे त्याची साधना बनते. सहज स्थितीमध्ये सतत राहून तो प्रत्येक क्षणी परमेश्वराच्या जवळ जात असतो. निरुपणाच्या पहिल्या ओवीमध्ये साधकाची ही अवस्था वर्णन केली आहे.
मग पुढे काय होते?
जर ह्या मनुष्याला जगात काय चालले आहे याबद्दल फारशी पर्वा नसेल तर त्याचे समाजातील वागणे कसे राहील? ज्या वस्तूची आपल्याला पर्वा नसते तीच्याबद्दल आपण उदासीन असतो. त्याचप्रमाणे हा साधक आता समाजापासून अलिप्त राहून स्वतःच्या जगातच राहणार का? हा प्रश्न आपल्या मनात उद्‌भवतो. हो असे घडू शकते, परंतु भगवंताला काय आवडते ते जाणून घ्यायला दुसरी ओवी बघा.

`मग याहीवरी पार्था, माझिया भजनी आस्था, तरी तयाते मी माथा, मुकुट करी.

महाराष्ट्रात असे संत होऊन गेले आहेत की ते कचऱ्याच्या ढीगावर रहात होते. कुणी जवळ जाऊन साधनेबद्दल, परमेश्वराबद्दल प्रश्न विचारले तर शिव्यागाळ करुन त्यांना पळवून लावायचे. त्या कृतीने त्यांच्या ब्रह्मज्ञानामध्ये काही कमीपणा येत नाही हे आपण ध्यानात ठेवले पाहीजे. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात अशीच एक घटना घडली होती. ती अशी:
एक फकीर एके दिवशी अचानक दक्षिणेश्वर मंदीरात आला. काली मातेच्या मंदीरासमोर येऊन त्याने दोन श्लोक असे म्हटले की रामकृष्ण परमहंसांना सर्व मंदीर हादरले असा भास झाला. देवीला नमस्कार करुन नंतर तो साधु मंदीरासमोर कुणीतरी टाकून दिलेल्या प्रसाद खात असलेल्या कुत्र्याकडे गेला. गळ्यात हात घालून त्याने कुत्र्याला बाजूला केले व राहीलेला प्रसाद त्याने खाल्ला. रामकृष्ण परमहंस म्हणाले की त्या कुत्र्याने त्याला अजिबात विरोध केला नाही. तो ते अन्न खात असताना रामकृष्ण परमहंस आपल्या भाच्याला म्हणाले, `बघ, हा मनुष्य खरा ब्रह्मज्ञानी आहे!’ तेव्हा त्यांचा भाचा, ह्रुदयराम, त्या साधूच्या मागे मागे जायला लागला. मला काहीतरी उपदेश करा असे वारंवार विनवू लागला. साधूने ह्रुदयरामकडे अजिबात लक्ष दिले नाही. शेवटी त्याच्या मनधरणीचा त्रास येऊन तो शेजारच्या गटाराकडे गेला व त्यातील पाणी पिऊन म्हणाला की `हे पाणी आणि तुझ्या गंगामैयेचे पाणी यात काही फरक नाही हे जाणून घे!’ तरीसुध्दा ह्रुदयरामची भुणभुण बंद झाली नाही तेव्हा त्याने दगड उचलून मारायला सुरुवात केली आणि एका क्षणात तो तिथून नाहीसाच झाला. हे सर्व रामकृष्ण परमहंसांनी बघितले व ते धावत कालीजवळ जाऊन म्हणाले की `मला हे असे कोरडे ब्रह्मज्ञान नको!, मला तुझ्या भक्‍तांचा सहवास उपभोगायची इच्छा सतत असू दे.’ रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे की `मला साखर खायची आहे, साखर व्हायचे नाही!’
आपण हे लक्षात ठेवले पाहीजे की त्या साधूच्या तशा वागण्याने त्याचे ब्रह्मज्ञान कमी होत नाही व रामकृष्ण परमहंसांच्या साखर खायच्या इच्छेने त्यांचे ब्रह्मज्ञान कमी होत नाही. दोन्ही सारखेच आत्मज्ञानी आहेत. परंतु भगवंताला कोण आवडतो? तर रामकृष्ण परमहंसांसारखे भक्‍त. आत्मज्ञान जरी प्राप्त झाले तरी रस्त्यावरच्या दिव्यासारखे उभे राहून बाकी साधकांचा मार्ग जो उजळत राहतो त्याला भगवान श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर घेऊन नाचतात असे ही ओवी आपल्याला सांगत आहे.
बऱ्याचजणांना साधना सुरु करतानाच अशी शंका असते की साधनेमुळे मी स्वतःतच मग्न रहायला लागलो तर माझ्या ह्या जगात मी एक उपद्रवी जंतू होईन. मग माझ्यावर अवलंबून असलेल्यांचे काय होईल? असा विचार करुन ते साधनाच कमी करतात! ही नसती शंका जगाच्या ओढीमुळे आपल्या मनाने समोर केली आहे हे जाणून घेऊन आपण तिकडे दुर्लक्ष केले पाहीजे व आपली साधना सुरु ठेवली पाहीजे. आज सुरुवातीला आपण असे बघितले की स्वतःच्या मनाची सतत शांत अवस्था प्राप्त व्हावी हे उद्देश्य ठेवून आपण इकडे एकत्र आले पाहीजे. पण आता याहीपुढे जाऊन असे ध्येय ठेवले पाहीजे की माझ्या मनाची शांती मी मिळविनच पण त्याहीपुढे जाऊन जीवन असे जगीन की ज्यामुळे बाकी लोकांना माझा फायदा होईल. झाडावरच्या एखाद्या सुंदर फुललेल्या फुलासारखे मी आयुष्य जगायचा प्रयत्‍न करीन. हे कसे? बघा:
जरा विचार करा, की बागेतील एक फुल कधी लोकांना आपणहुन सांगते का की माझ्याकडे बघा? ते आपले आयुष्य शांतपणे जगत असते, त्याच्या असण्यातच लोकांना सुख द्यायची ताकद त्याच्यात असते. पण म्हणून ते लोकांवर जबरदस्ती करीत नाही की माझ्याकडे चांगले सौंदर्य आहे त्याचा उपभोग घ्या. समजा दहा हजार माणसे त्या फुलझाडासमोरुन गेली तरी त्यातील फक्‍त दहा जणांचे त्या फुलाकडे लक्ष जाईल व त्यामध्येसुध्दा एखादाच त्याच्या सौंदर्याने आपल्या जीवनात आनंद प्राप्त करुन घेईल. पण त्या फुलाला त्याचे काही दुःख नसते. ते त्या सर्व लोकांबाबत तेवढेच उदासीन असते व आपले जीवन जगत असते. आपण त्या फुलाप्रमाणे जगायचे ध्येय समोर ठेवून साधना केलेली सर्वांत चांगली आहे. आपल्या जीवनात इतकी माणसे आपल्यासमोर येतात त्यातील जास्त करुन माणसे तुम्हाला फार महत्व देणार नाहीत. जी थोडी माणसे तुम्ही कसे जीवन जगत आहात हे बघायचा प्रयत्‍न करतील त्यातीलसुध्दा बहुतेकजण तुमच्या साधनेचे, जीवनाच्या उदात्त ध्येयाचे, कौतुक करणार नाहीत. अगदी एखादाच असे म्हणेल की किती सुंदर ह्या माणसाने आपले आयुष्य घालविले आहे. त्या सर्वांबद्दल एकसारखी आपुलकी ठेवून आपले जीवन आपल्या पध्दतीने जगणे हे आपले ध्येय आपण ठेवले पाहीजे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपले आयुष्य शांतपणे जगत रहावे. फुल जसे दुसऱ्याच दिवशी सुकते, तसेच आपले आयुष्य तरी किती मोठे आहे? पण त्या क्षणभंगुरतेचा विषाद न ठेवता आहे तो क्षण जगा हे आपल्याला ह्या दोन ओवींवरुन शिकायचे आहे. असे एक मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आपण जगायला सुरुवात केली तर आयुष्य अत्यंत सुंदर होईल व जे काही घडेल त्याला शांतपणे सामोरे जायची शक्‍ति आपल्यात येईल. प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घ्यायला तयार होईल हे आपण जाणले पाहीजे.

॥ हरि ॐ ॥


अध्याय बारावा

                   

                     247:Where are saints?

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥




ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।

हे पढविलो जी आम्ही । श्रीनिवृत्तीदेवी ॥ २४७:१२ ॥

श्री ज्ञानदेवांनी वरील उद्‌गार १२व्या अध्यायाचा शेवट करताना काढले आहेत. ह्या ओवीने त्यांनी भक्तीयोगावर असलेल्या भावपूर्ण अशा या अध्यायाची सांगता केली आहे. ओवीचा शाब्दीक अर्थ असा आहे: `ज्ञानदेव असे म्हणत आहेत की तुम्हां संतांना शरण जाऊन आपुलकीने सेवा करावी हेच आम्हाला श्री निवृत्तीनाथांनी शिकविले आहे’. आपण आता नेहमीप्रमाणे या ओवीच्या खोलात शिरून श्री ज्ञानदेवांना कुठला अर्थ अभिप्रेत होता याचा अंदाज घ्यायचा प्रयत्‍न करुया.

संत कोणाला म्हणावे?

ज्याकुणी परमार्थाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्‍न केला आहे त्या सर्वांना सत्‌संगाच्या महत्वाबद्दल अधिक काही सांगायची जरूरी नाही. सर्व संतांनी या विषयाबद्दल इतके काही लिहीले आहे की आपणा सर्वांच्या मनात सत्‌संगाबद्दल अपार आदर आहेच. आपल्याला माहितीच आहे की ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला चांगला शिक्षक मिळाला की त्याच्यात असलेल्या उपजत बुध्दीचा योग्य उपयोग होऊन परीक्षेत यश लाभते त्याचप्रमाणे साधकाला सत्‌संग लाभला तर साधनेत येणाऱ्या अडचणींवर लवकर मात होऊन भरभर प्रगती होते. अशा परीस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांनी काढलेले हे उद्‌गार आपण फारसा विचार न करीताच स्वीकारु शकतो. परंतु परमार्थामध्ये दरवेळी अत्यंत सोप्या वाटणाऱ्या विचारातच अशी मेख असते की ती मेख जर आपण नीट ओळखू शकलो नाही तर हे विचार दररोजच्या जीवनात वापरणे आपल्याला कठीण होते. कधी कधी तर वापरायचा प्रयत्‍न केला असता आपल्या अर्धवट ज्ञानामुळे अशा वागण्याने आपल्याला अपाय व्हायची शक्यता असते. हा अपाय आपल्या अर्धवट ज्ञानामुळे झाला आहे हे न जाणल्यामुळे आपण त्या विचारांवरचाच विश्वास गमावून बसतो. श्री रामकृष्ण परमहंस या बाबतीत अतिशय सुंदर गोष्टी सांगत. यापैकी दोन गोष्टी अशा आहेत.
१). एका साधूने आपल्या सर्व शिष्यांना जगातील सर्व जीवांमध्ये परमेश्वर बघायला सांगितले. त्यानंतर बाजारात फिरताना शिष्यांना आरडा-ओरडा ऐकू आला की एक मत्त हत्ती त्यांच्याकडे येत आहे. बाकी सर्व शिष्य पळून गेले परंतु एका शिष्याला आपल्या गुरुंच्या सांगण्याची आठवण झाली व तो परमेश्वर आपल्याला कशी इजा करील ह्या भावनेने मुद्दामच मध्ये उभा राहीला. अर्थात, हत्तीने तिथे येऊन त्याला आपल्या सोंडेत घेऊन दूर भिरकावून दिले व तो बेशुध्द झाला. शुध्दीत आल्यावर गुरुंना बघून त्याने विचारले की तुम्हीं तर सांगितले की हत्तीतसुध्दा देव आहे मग मला इजा का झाली? यावर गुरु हसून म्हणाले की ज्याप्रमाणे हत्तीत देव आहे त्याचप्रमाणे बाकीच्या लोकांतसुध्दा देव आहेच की. त्या लोकरुपी देवांंच्या बोलण्याकडे तू लक्ष दिले नाहीस म्हणून तुला हत्तीरुपी देवानी शिक्षा केली!
२). एका गावाच्या माळरानात अत्यंत विषारी साप रहात होता. गायी चारणाऱ्या सर्व गुराखी पोरांकरीता तो एक मोठा धोकाच होता. एके दिवशी एक साधू त्या मार्गाने जात असताना गुराखी मुलांनी त्यांना त्या सापापासून जपायला सांगितले. साधूला अनेक मंत्र माहिती असल्याने तो त्याच मार्गाने मुद्दाम गेला. जेव्हा तो साप त्याला दंश करायला आला तेव्हा त्यांनी एक मंत्र म्हणून त्याला एखाद्या दोरीसारखा निष्प्रभ करून टाकला. नंतर त्याला जवळ घेऊन त्यांनी त्याला उपदेश केला की असा लोकांना त्रास देण्यामुळे काय मिळेल याचा तू विचार केला आहेस का? आता मी तुला एक मंत्र देतो तो तू सारखा जप व अहिंसेने रहा. तुझी खूप प्रगती होईल व मिळालेल्या जन्माचे सार्थक होईल. सापाने ती गोष्ट मान्य केली व त्याप्रमाणे वागायचा तो प्रयत्‍न करु लागला. असे काही दिवस गेल्यावर गुराखींना कळून चुकले की आता साप अगदी मवाळ झाला आहे. त्या सापाची भीति संपूर्णपणे त्यांच्या मनातून गेली व ते त्याच्याशी पाहिजे तसे खेळू लागले. एके दिवशी खेळताना त्यांनी त्याला गरगर फिरवून दूर भिरकावून दिले. साप अगदी मृतप्राय अवस्थेत पडलेला पाहून त्यांची अशी समजूत झाली की तो आता मेला. नंतर १२ वर्षांनी साधू परत येवून सापाची चौकशी करू लागले तेव्हा त्यांनी सांगितले की तो मेला. साधूंना हे माहित होते की त्यांची व सापाची भेट परत होणार होती म्हणून मुलांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता ते सापाला त्यांनी ठेवलेल्या नावाचा उच्चार करीत शोधू लागले. एका बिळात जीव मुठीत धरून राहणाऱ्या त्या सापाने आपल्या गुरुंचा आवाज ओळखला व बाहेर येऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्याची अशी अवस्था पाहून साधूने त्याचे कारण विचारले. नुसती फळे खाऊन राहण्याने अशी अवस्था होणार नाही हे त्यांना पूर्णपणे माहित होते. सापाची सात्विकबुध्दी वाढल्याने त्याला त्याच्या अश्या परीस्थितीच्या कारणाचा विसर पडला होता. नंतर थोड्यावेळाने त्याला गुराखी मुलांचे वागणे आठविले व त्याने सर्व गोष्ट सांगितली व म्हणाला की त्यांना माझ्यात पडलेला बदल माहित नसल्याने त्यांनी मला असा त्रास दिला असावा. ह्यावर गुरु त्याला म्हणाले `अरे मी तुला कोणाला इजा करु नकोस असे सांगितले होते. पण तू तर फूत्कार करायचेपण सोडलेस! ते कशाला? दुरुन जर तू फूत्कार करीत राहीला असतास तर ही अवस्था तुला भोगावी लागली नसती’.
म्हणून अत्यंत सोपी वाटणारी, संपूर्णपणे कळली आहे अशी वाटणारी गोष्टसुध्दा व्यवहारात वापरताना काळजी घ्यावी लागते. आपल्या जीवनातले अजून एक उदाहरण म्हणजे शेअर मार्केटचे. सर्वांना माहित असते की कमी भावात शेअर्स विकत घ्यायचे असतात व जास्त भावात विकायचे असतात. परंतु हे ज्ञान व्यवहारात वापरताना कुठला भाव कमी हे कळणे आवश्यक असते. ते न कळताच जर आपण पैसे गुंतवू लागलो तर फटका बसल्याशिवाय रहात नाही. आता वरच्या ओवीतली मेख म्हणजे संतसेवा करायला हवी हे आपल्याला कळले तरी संत कोण हे ओळखायचे कसे हे काही आपल्याला माहिती नसते. मग आपण हल्लीच्या काळात खरे संत आहेत तरी कुठे अशी तक्रार करून हा मार्ग आपल्याकरीता नाही अशी समजूत करून घेतो. आपले जीवन इतके चाकोरीबध्द आहे की अश्या जगण्यामध्ये कोणी संत आपल्याला भेटतील असे आपल्याला वाटत नाही. परंतु सत्‌संगतीबद्दल असलेल्या ओढीमुळे आपण संताच्या शोधात सतत असतोच. आपल्या ओढीचा परिणाम म्हणून मग आपण तीर्थक्षेत्री जातो, जिथे आपल्याला खरे संत भेटायची शक्यता वाटते. तिथेसुध्दा आपण कोणावरही विश्वास टाकत नाही. ज्यांचे अधिक शिष्य आहेत ते अधिक चांगले असणार असा विचार करून आपण प्रतिष्ठित माणसांकडेच जातो. म्हणजे आपण संत अशाच माणसांना मानायला तयार असतो की ज्यांनी अनेक शिष्य केले आहेत. अशावेळी आपली व त्यांची खाजगीत भेट होणेच शक्य नसते (कारण आधीच्या शिष्यांमध्येच ते गुंग असतात) मग आपुलकीने सेवा करायची गोष्ट तर दूरच राहीली! म्हणजे आपल्याकरीता ह्या ओवीचा मार्ग बंद आहे की काय?
असा अर्थ काढण्याआधी आपल्या सध्याच्या आयुष्याबद्दल विचार करुया. कधी आपण विचार केला आहे का की आपला जन्म कशाकरीता झाला आहे? सध्या संसारातील एखादी गोष्ट मिळविण्याकरीता जरी आपण जगत असलो तरी त्याच्याकरीताच आपला जन्म झाला आहे असे आपण म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ, आत्ताच्या ध्येयाची वस्तू मिळाली तरी त्या वेळी आपल्या आयुष्याचा अंत होणार नाही याची खात्री सर्वांना असतेच. आपल्याला पुढे जगायचे असतेच. म्हणजेच केवळ ती वस्तू मिळविण्याकरीताच आपला जन्म झालेला नाही ही गोष्ट स्पष्ट होते. `परमेश्वराकडे जायला जे अनंत मार्ग आहेत, त्या प्रत्येक मार्गावर चालण्याऱ्या व्यक्तीची वाटचाल प्रत्यक्ष बघण्याकरीताच भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे’ ह्या दृष्टीकोनातून बघितले तर असे म्हणता येईल की आपला जन्म हा साधनेतला एक ठराविक मार्ग चालण्याकरीताच झाला आहे. आयुष्याचे ध्येय म्हणजे हा आपला मार्ग चालून शेवटी परमेश्वराची भेट घेणे. जन्मवेळी आपल्याला परमेश्वराने ह्या मार्गावरील एका ठराविक स्थळी ठेवून आता तू तुझा खेळ सुरु कर असे सांगितले असावे. परमेश्वरानेच एक खास मार्ग आपल्याकरीता राखून ठेवला असल्याने जेव्हा तो मार्ग आपल्यासमोर येतो तेव्हा आपोआपच त्याच्याबद्दल एक प्रकारची आत्मियता वाटते. त्या मार्गाने जाण्याची ओढ आपल्यामध्ये अकारण येते. तशी ओढ, आत्मीयता इतर मार्गांबद्दल वाटत नाही. म्हणून आपल्या सर्वांचा असा अनुभव आहे की एकाला चांगली वाटणारी साधना दुसऱ्याला चांगली वाटेलच असे नाही. आपला स्वतःचा असा मार्ग सापडणे ही एक फार मोठी घटना आहे. तो सापडला की आपल्या साधनेत एक वेगळाच जोर येतो, साधना करायला आनंद वाटतो व प्रगती पटापट होते. म्हणूनच गुरु प्रत्येक शिष्याला एकच साधना सांगत नाहीत. ते त्याच्या मार्गाला पूर्ण जाणून असतात व त्यांचा सल्ला त्या ठराविक मार्गावर चालण्याकरीता उपयोगी असतो. खालील उदाहरणावरुन ही गोष्ट अगदी स्पष्ट होईल.
श्री रामकृष्ण परमहंसांच्या संन्यासी शिष्यांची साधना वेगवेगळी होती. एकदा स्वामी विवेकानंदांनी दुसऱ्या शिष्याला `गंमत बघ’ असे म्हणून स्वतःच्या ध्यानाच्या अवस्थेत मला स्पर्श कर असे सांगितले. त्या शिष्यालासुध्दा मजा वाटून तो विवेकानंदांच्या गुडघ्याला हात लावून बसला. एक छोटासा विजेचा झटका बसल्यासारखी संवेदना त्याला झाली व ती गंमत त्याने सर्वांना सांगितली. हे सर्व एका खोलीत पहाटे ३च्या सुमारास झाले. त्यावेळी रामकृष्ण परमहंस दुसऱ्या खोलीत झोपले होते. थोड्या वेळाने रामकृष्णांनी विवेकानंदांना आपल्या खोलीत बोलाविले व रागावून म्हणाले `बँकेत रक्कम जमा व्हायच्याआधीच उधळपट्टी सुरु केलीस? तुला माहिती आहे का की तुझ्या या कृतीमुळे या साधकाचे कीती नुकसान झाले ते? मी त्याला अत्यंत काळजीपूर्वक एका मार्गाने नेत होतो आणि आता त्या सर्वावर तुझ्या एका कृतीने पाणी पडले. तरी तो मुलगा नशिबवान आहे, नाहीतर त्याला जन्मभर नुकसान भोगावे लागले असते.’ नंतर खरोखरच रामकृष्णांनी त्या शिष्याला आधीचा मार्ग सोडून विवेकानंदांसारखी अद्वैत साधना शिकवायला सुरुवात केली.
साधनेत म्हणूनच कित्येक वेळा एकाच प्रश्नाची वेगवेगळ्या शिष्यांकरीता दिलेली उत्तरे वेगवेगळी असतात. आता हा विषय निघालाच आहे म्हणून दोन गोष्टी सांगाव्याश्या वाटतात: १). आपण असे बघतो की भीडेखातर बऱ्येच साधक आपल्या गुरुंना प्रश्न विचारायला कचरतात. तो प्रश्न ते आपल्या मित्रामार्फत किंवा जवळच्या व्यक्तीमार्फत विचारतात. आता ही दुसरी व्यक्ती व्यावहारीक दृष्टीने आपल्या कितीही जवळची असली (भाऊ, बहीण, आई, वडील इत्यादी) तरी साधनेमधील तीचा मार्ग आपल्या मार्गापासून पूर्णपणे भिन्न असू शकतो त्यामुळे आपल्या प्रश्नांची त्यांना मिळालेली उत्तरे आपल्याला पूर्ण लागू होतीलच असे नाही हे आपण जाणून घेतले पाहीजे. गुरुंबद्दल असलेली आपली भीड आपण मोडली पाहीजे. असे झाले नाही तर आपलेच नुकसान आपण करून घेत आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
२). प्रत्येक साधकाचा मार्ग भिन्न आहे ह्या वस्तुस्थितीचा दुसरा परिणाम म्हणजे नुसती पुस्तके वाचून आपली फार प्रगती न होणे हा होय. याचे कारण असे की पुस्तके, प्रवचने ही सगळी सर्वसाधारण माणसांना गृहीत धरून लिहीली असतात, सांगितली असतात. आपल्या स्वतःच्या मार्गामध्ये त्यांचा उपयोग होईलच अशी खात्री त्यामुळे देता येत नाही. त्यामुळे जरी वाचताना, ऐकताना मन प्रसन्न झाले, तरी साधनेत ह्या गोष्टींचा परिणाम गुरुंच्या आपल्याकरीता दिलेल्या सल्ल्याइतका कधीच प्रभावी होऊ शकत नाही हे आपण लक्षात ठेवून आपल्या गुरुंची सेवा मनोभावे करावी व साधनेत प्रगती करावी असे सांगावेसे वाटते.
आता मूळ मुद्याकडे परत येऊया. साधकाच्या स्वतःच्या जन्माबद्दलच्या अशा दृष्टीकोनामूळे हे दृष्य जग त्याला एखाद्या साप-शिडीच्या खेळासारखे त्याला दिसू लागेल. प्रत्येक क्षणी आपलाल्या कधी शिडी तर कधी सापाशी सामना करावा लागत आहे असे भासू लागते. याचा अर्थ असा की, प्रत्येक घटनेने एकतर आपण भगवंताच्या जवळ जातो वा जगात गुंतून त्याच्यापासून दूर जातो हे कळायला लागते. ह्या खेळामध्ये परमेश्वराचे स्थान अंतिम ठिकाणी आहे. परंतु देवाचा स्वभाव हा परम दयाळू असल्याने तो नुसताच स्थानापन्न राहून हा खेळ निर्विकारपणे बघू शकत नाही. आपल्याला मदत करायला तो उत्सुक असतो. म्हणूनच प्रत्येक आणिबाणीच्या क्षणी आपल्या मदतीला कोणीतरी येतेच. म्हणून असे सांगावेसे वाटते की:
साधनेत मदतीला येणारी प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती ही आपण संतांसमान मानली पाहीजे. संत कोणाला मानावे ह्या प्रश्नाचे अंतिम उत्तर हे आहे.
प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात परमेश्वराकडे जाण्याच्या साधनेत ज्यांची ज्यांची मदत झाली आहे अशा सर्वांना संत मानले पाहिजे. माझ्या जीवनातला संत तुमच्या जीवनात संतस्थानी असेलच असे नाही. एवढेच नव्हे तर काल माझ्या जीवनात संतस्थानावर असलेला गृहस्थ आज त्या पदावर असेलच असेसुध्दा मी निश्चितपणाने सांगु शकत नाही! आजचे त्याचे वागणे माझ्याकरीता मदतीचे असेलच असे आपण सांगू शकतो का? म्हणजे संतपणा आपण एखाद्या व्यक्तीला, घटनेला न देता, त्या घटनेमुळे आपल्यामध्ये झालेल्या बोधाला दिला पाहिजे व मग ज्या गोष्टीमुळे आपल्याला बोध झाला त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्या घटनेला व व्यक्तीला महत्व दिले पाहीजे. संतांची ही व्याख्या जरी पटायला कठीण वाटली तरी ह्या व्याख्येच्या सत्यतेबद्दलच्या पुष्टीकरीता अनेक संदर्भ देता येतील. खालील गोष्टच पहा:
अवधूत जेव्हा संन्यासी अवस्थेत फिरत होते तेव्हा एका घारीला तलावात सूर मारून एक मासा पकडताना त्यांनी बघितले. जशी ती घार मासा घेऊन वर निघाली तसे तिच्यामागे तीन-चार कावळे लागले. त्यांनी तिला कुठेही बसू दिले नाही. शेवटी कंटाळून तिने तो मासा आपल्या पंजातून टाकून दिला. असे झाल्याक्षणी ते सर्व कावळे घारीला सोडून त्या माश्यामागे गेले. हे बघून अवधूताने जमिनीवर त्या घारीला साष्टांग नमस्कार घातला. त्यांना ह्या घटनेने कळले होते की जीवनात जोपर्यंत आपण भौतिक सुखाचा मासा पकडून राहीलो आहोत तोपर्यंत आपल्यामागे चिंता, काळजी या रुपांचे कावळे लागणारच. परंतु ह्यांच्या तावडीतून सुटायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे पकडलेला हा मासा सोडणे. हा बोध त्यांना ह्या घटनेने झाला म्हणून त्यांनी त्या घारीला आपल्या २४ गुरुंपैकी एक गुरु मानले.
अवधूतांनी जर एका घारीला गुरुपदावर बसविले तर आपल्यासारख्या लोकांनी ज्या व्यक्तींमुळे आपल्या साधनेत मदत होत आहे अशांना संत मानायला काय हरकत आहे? संतांची अशी व्याख्याच ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत होती नाहीतर त्यांनी त्यांच्या सर्व श्रोत्यांना संत म्हटलेच नसते.

संत ओळखण्यामधील अडचणी

संतपणाची अशी व्याख्या करायला आपण घाबरतो याला अनेक कारणे आहेत…
१). आपल्या अपेक्षा. आपल्या मनात संत म्हणजे काय याच्याबद्दल ठराविक अपेक्षा असतात. उदाहरणार्थ, जो आपल्या नातेवाईकांबरोबर तावातावाने भांडतो त्याला संत म्हणण्यापूर्वी आपण दहादा विचार करतो. श्री गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या नातेवाईकांवर दावे लावून आपली जमीन परत मिळविली होती. परंतु त्यामुळे त्यांच्या संतपणावर काही बाधा आली नव्हती हे आपण विसरतो. खरं म्हणजे आपला व संतांचा सहवास कीती थोड्यावेळाकरीता असतो. सहवासाचे सर्व क्षण मिळवून जेमतेम काही महीने होत असतील. परंतु आपले त्यांच्या वागण्यावर घातलेले बंधन मात्र त्यांच्या अखंड जीवनाकरीता असते. कारण आपल्या मागेसुध्दा त्यांनी आपल्या संतांच्या व्याख्येप्रमाणे वागणूक केली नाही तरी आपण त्यांना संतस्थानावरुन काढायला मागेपुढे पहात नाही. आपल्या थोड्या सहवासाकरीता त्यांना असे आयुष्यभर बंधन घालणे कितपत संयुक्तिक आहे याचा आपण विचार करायला हवा व आपल्या त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा कमी करायला हव्यात.
२). आत्मविश्वासाची कमतरता. आता एखाद्या माणसाला आपण जरी संत मानले तरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्या माणसाचा आपल्यासारखाच अनुभव येईल अशी काही खात्री नसते. म्हणून ते त्या माणसाला संत मानतीलच असे नाही. एखाद्या टोकाच्या वेळीतर ते त्या व्यक्तीला अगदी सर्वसामान्य मानण्याचीही शक्यता असते. अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते. जर आपला आत्मविश्वास कमी असला तर हे अशक्यच होते. म्हणून संतांची ही व्याख्या आपण करत नाही.
३). आपली भावनिकता. सारासार विचारबुध्दी असणे व ती सतत वापरणे हे आपल्याला जमत नाही. याचा परिणाम असा होतो की दुःख झाले की आपण दुःख नक्की कुठल्या गोष्टीमुळे झाले याचा निर्णय लावू शकत नाही. मग दुधाने पोळले म्हणून ताकसुध्दा फुंकून प्यायला लागतो. त्यामुळे सुरुवातीला जरी आपण मदत करणाऱ्या लोकांना संत म्हणू शकलो तरी त्यांनी पुढच्यावेळी संतांप्रमाणे वर्तन केले नाही तर आपल्याला प्रचंड धक्का बसून आता परत मी कोणालाही संत म्हणण्याची चूक करणार नाही असे ठरवितो.
खरोखर संतांची अशी व्याख्या करून जीवनात वापरायला मनाची एक लवचिकता आवश्यक असते. कालची गोष्ट आज घडली तरी तीच्याकडे नवीन नजरेने कितीजण बघू शकतात? मनाला जुन्या गोष्टींच्या नजरेमधून आजच्या गोष्टींकडे बघायची जी सवय आहे ती आपल्याला बदलायला हवी.

संतांची सेवा कशी करावी?

आत्ताच आपण बघितले की संत ह्या शब्दाची व्याख्या आपण बदलली त्याचा परिणाम म्हणजे आज संत असलेली व्यक्ती किंवा घटना उद्या संत म्हणून आपल्याला वाटेलच असे नाही. आज जर एखाद्या लहान मुलाच्या बोलण्याने मला बोध झाला असेल तर उद्या त्याने होईलच असे नाही. याचा अर्थ असा की दररोज आपल्याला डोळे उघडे ठेऊन जगायला हवे. काल क्षुल्लक वाटणारी गोष्टसुध्दा आज आपल्याला धडा देऊ शकेल असा सतत विचार करून आपण जीवनातील प्रत्येक घटनांना सामोरे जायला हवे. आयुष्यभर असे सतर्क राहणे ही आपली संतांची पहिली सेवा आहे. ह्या सेवेवर खरेतर संतांचे अस्तित्वच अवलंबून आहे! एवढी दूरगामी, निरंतर व निरहंकारी सेवा जर आपण करु शकलो तर आपण जवळ-जवळ बाजी मारल्यासारखीच आहे. कारण परमेश्वर ही सेवा बघून अत्यंत प्रसन्न होतो व आपल्या जीवनांत अशाच घटना घडवायला लागतो की प्रत्येक गोष्टच आपल्याला संतासारखी दिसू लागते. या दृष्टीकोनातूनच असे म्हणतात की साधनेत एक वेळ अशी येते की सर्व जग आपल्याला मदत करीत आहे अशी जाणीव साधकाला होते.
संतांची दुसरी सेवा म्हणजे घडलेल्या गोष्टीरुपी संतामुळे जो काही बोध आपल्याला झाला आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करणे ही होय. मगाशी सांगितलेल्या दोन गोष्टींमधील शिष्याने व सापाने कळलेला बोध आचरणात आणण्याचा प्रयत्‍न केला होता. जरी तो त्यांच्या अंगावर आला व गुरुंनी त्यांना ताडन केले तरी गुरुंच्या मनात त्यांच्याबद्दल जास्त आपुलकीच निर्माण झाली असेल यात काही शंकाच नाही. गुरुंची अशी आपुलकी मिळविणे फार थोड्या भाग्यवंतांच्या नशिबात असते. म्हणून त्या दोघांच्या अतिउत्साही वागणुकीमुळे त्यांना जरी शारीरीक इजा झाली तरी साधनेत प्रगतीच झाली असे म्हणायला हवे. गुरुंच्या मनात आपुलकी उत्पन्न होणे याशिवाय अजून एक गोष्ट आपल्या अशा प्रयत्‍नाने होते. ती म्हणजे आपल्या बोधामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या जाणवितात. झालेला बोध आचरणात आणण्याचा प्रयत्‍न केला नाही तर नुसती `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशी आपली साधना व्हायला लागते. आचरणात आणण्याचा प्रयत्‍न न केल्यामुळे झालेल्या बोधाचा उपयोग नुसता आपला अहंकार वाढण्यामध्ये होतो. साधकाने या धोक्यापासून सावध रहावे.
संतांची सेवा करायला या दोन गोष्टी खूप आहेत. अशी सेवा करायला जे मानसिक धैर्य लागते, जो आत्मविश्वास लागतो तो गुरुंच्या पाठबळाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात `हे पढविलो जी स्वामी । श्री निवृत्तीदेवी’. खुद्द ज्ञानेश्वर महाराजांना ही सेवा करायला निवृत्तीनाथांची मदत घ्यावी लागली मग आपल्यासारख्यांचे काय?!! हे धैर्य प्राप्त होऊन संतांची सेवा आपल्या हातून व्यवस्थित घडू दे याकरिता आपण सर्वांनी आपल्या गुरुंची सेवा आधी करायला हवी. सध्या आपली हीच साधना आहे.

॥ हरि ॐ ॥

अध्याय बारावा

         

(120+121):The Complete Surrender



॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥




माळिये जेउते नेले । तेउते निवांतचि गेले ।

तया पाणिया ऐसे केले । होआवे गा ॥ १२०:१२ ॥




एऱ्हवी तरी सुभटा । उजू कां अव्हांटा ।

रथु काई खटपटा । करितु असे? ॥ १२१:१२ ॥

१२व्या अध्यायातील या दोन ओव्या आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जर अभ्यास करायला तुला कठीण वाटत असेल तर दुसरा मार्ग सांगतो. जे काही व्यवहार तू करशील, ते सर्व मी केले आहेत असे न म्हणता परमेश्वरानेच माझ्याकडून करवून घेतले आहेत असे समज. हा मार्गसुध्दा तुला माझ्याकडेच आणेल. ते म्हणतात: ज्याप्रमाणे माळी नेईल तिथे पाणी शांतपणे जाते, त्यासारखेच पुढे येईल ते कर्म तू कर. रथ कधीतरी चालकाला सांगतो का की मला फक्‍त चांगल्या रस्त्यावरच ने? (त्याचप्रमाणे तूसुध्दा देवाजवळ चांगलेच कर्म करण्याची मागणी करु नकोस.) बाराव्या अध्यायातील दहाव्या श्लोकावर आधारित असलेल्या या दोन ओव्यांवर आपण विचार करुया.

बागेतील पाण्याचे उदाहरण

शेतकरी ह्या शब्दातून ज्याप्रमाणे गावातील शेताचा संदर्भ ध्यानात येतो त्याचप्रमाणे माळी ह्या शब्दाने आपल्याला बागेची आठवण होते. तेव्हा या ओवीतील माळी हा बागेतच काम करणारा आहे असे आपण समजूया. आता, अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही पण बागेशिवाय आपण जगू शकतो. बाग ही काही आपल्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट नव्हे. म्हणून शेतकऱ्याचे आपल्या जीवनातले स्थान आणि माळ्याचे आपल्या जीवनातले स्थान ह्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला बागेतील पाण्यासारखे जगायला सांगितले आहे, शेतातील पाण्यासारखे नाही. शेतातील पाण्याला अहंकार असायचा जरातरी संभव असतो कारण त्याच्यामुळे अन्न निर्माण होत असते व त्यावर अवलंबून असणारे अनेक माणसे असतात. याउलट बागेत गुलाब कमी आले म्हणून माणसांना क्षणिक दुःख जरी झाले तरी कमी फुले आल्याने त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उत्पन्न होत नाही. तेव्हा सगळ्यांत पहिली गोष्ट ह्या उदाहरणावरुन आपण जाणून घ्यायला हवी की आपल्या जीवनावर कोणीही अत्यंतिकरितीने अवलंबून नाही. आपण फारफार तर दुसऱ्यांचे जीवन सुसह्य करु शकतो, त्यांना तात्पुरते सुख देऊ शकतो. पण आपल्याशिवाय या जगाचे कसे होईल ही भावना आधी आपण काढून टाकली पाहिजे. आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांचे दडपण ह्या जाणीवेने एकदम कमी होते. उदाहरणार्थ, माझ्या प्रवचनांमुळे तुमच्या साधनेत आमुलाग्र बदल पडेल असे मानणे चुकीचे आहे हे समजल्यावर माझ्यावरचे दडपण कमी होते. तुम्हाला सलत असलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर एखादवेळेस प्रवचनातून तुम्हांला मिळू शकेल, ह्यापेक्षा जास्त काही होणार नाही. तुमचे स्वतःचे प्रयत्‍नच तुम्हाला खरी प्रगती करुन देणार आहेत हे कळल्यावर माझी एका जबाबदारीतून मुक्‍ती होत असते. किंवा एखाद्या यशस्वी माणसाचे, घरातील सर्वांत मोठ्या माणसाचे असे वर्तन असते की मी नसलो तर या लोकांचे काय होईल हे सांगता येत नाही. सद्य परीस्थिती केवळ माझ्यामुळेच निर्माण झाली आहे. ह्या विचारांमुळे त्यांच्या वागण्यावर सतत एक बंधन असते. परंतु त्यांचे हे विचार बागेतील पाण्यासारखे नसून, शेतातील पाण्यासारखे आहेत. या ओवीत ज्ञानेश्वर महाराज `माळ्याने घातलेले पाणी’ या रुपकाद्वारे आपल्याला स्वतःच्या जीवनाचे बाह्य जगाच्या दृष्टीमध्ये असलेले खरे महत्व सांगत आहेत. त्यावर सर्वांनी मनन करुन ते सत्य आहे अशी स्वसंवेदनायुक्‍त जाणीव निर्माण करावी. अशा जाणीवेने आपल्यावर असलेले मिथ्या जबाबदारीचे बंध तुटुन पडतील. आपले जीवन आपल्याकरीता जगण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बागेत एक बादलीभरुन आपण पाणी घालतो, त्यातील एक लोटाभरच पाणी ज्या झाडाला पाणी घालायचे आहे त्याला मिळते. बाकीचे पाणी एकतर हवेत उडून जाते किंवा तणांना वाढविते. याचा अर्थ असा की बहुतांशी आपली कर्मे आपल्या ध्येयाकडे नेणारी नसतात. अधिककरुन आपल्या कर्मांमुळे जीवनातील तण वाढण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, यशस्वी माणसाला सर्वांनी त्याचे ऐकावे असा गंड असण्याची शक्यता असते. एखाद्याने गरीबीतुन वर येऊन यश मिळविले असेल तर जगातील सर्व गोष्टींवर त्याला अत्यंत ठाम मते उत्पन्न होतात व दुसऱ्यांनी सांगितलेले विचार ग्रहण करण्याची शक्‍ति तो गमावून बसतो. हे दुष्परीणाम म्हणजे तणच नव्हे काय? परंतु तण वाढतील म्हणून पाणी आपला स्वभाव बदलत नाही तसेच मानसिक दुर्गुण येतील म्हणून कर्मे थांबवायची नसतात. तर आपल्या प्रत्येक कर्मामुळे आपल्यामध्ये दुर्गुण येणारच आहेत अशा भावनेने जगात वावरायचे आहेत. अशा भावनेमुळे स्वतःचे दोष बघण्याची जागरुकता आपल्यात सतत राहते. मग वेळच्यावेळी तण काढल्यावर जसे फुलझाडांना फार नुकसान होत नाही तसेच अहंभाव जरा जाणविला की लगेच त्यावर नियंत्रण ठेवले तर साधकाच्या प्रगतीमध्ये बाधा येत नाही. साधना केल्यामुळे होणारी प्रगती जाणविली की स्वकष्टांनी प्राप्त अशा या स्थितीचा अभिमान यायचा संभव असतो. तो वेळच्यावेळी काढणे जरुरी असते. हा अभिमान का आला या विचाराने निराश न होता आपण तो सतत काढला पाहिजे, ज्याप्रमाणे माळी तण हे येणारच व ते काढायचेच असतात या विचाराने पाणी घालायचे थांबवित नाही, त्याप्रमाणे आपली साधना आपण अशा स्थितीतसुध्दा पूर्वीच्याच जोराने सुरु ठेवली पाहिजे.
पाणी घातल्यावर तण येणारच हे जसे आपण स्वीकार करतो, त्याचप्रमाणे आपल्याला हे स्वीकारले पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी दुर्गुण हे असणारच. ह्या स्वीकाराचा एक मोठा फायदा म्हणजे आपली एका साच्यात स्वतःला घालायच्या प्रवृत्तीपासून सुटका. लहानपणापासून आपण स्वतःला एका आदर्श व्यक्तिमत्वाची प्रतिमा बनविण्याचा प्रयत्‍न करीत असतो. आपल्याला असे वाटत असते की जर चांगले वागलो तर देवाच्या गुणवान मुलांपैकी आपण आहोत. त्यामुळे देव आपल्या अधिक जवळ येईल असे आपण समजत असतो. परंतु ज्याप्रमाणे आईचे प्रेम तिच्या अनेक मुलांमधल्या कमी प्रतिभावान मुलावर प्रकर्षाने दिसून येते त्याचप्रमाणे जेवढ्या स्वतःच्या चुका आपण बघायला लागू तेवढा देव आपली काळजी घ्यायला जवळ येईल. याउलट जेवढे स्वतःला पूर्ण समजू, आदर्श समजू तेवढा तो `या मुलाकडे सध्या लक्ष द्यायची गरज नाही’ असा विचार करेल. साच्यात बसवायच्या स्वभावामुळे अजून एक वाईट परीणाम होतो. आपल्या वागण्यात जर काही दोष आढळून आले तर लोकांची अवस्था केविलवाणी होते. जितकी सभ्यता माणसामध्ये मुरते तितके त्याचे वागण्यामधील स्वातंत्र्य कमी होत जाते. आत्तापर्यंतच्या बाळगलेल्या सभ्यतेचे एक ओझेच जणू त्याला सतत बाळगावे लागते. असे ओझे सांभाळायची सवय झाली की परीस्थितीला योग्य असे त्याला वागता येईलच याची खात्री नसते. उदाहरणार्थ, एखाद्या परीस्थितीत खास कोल्हापुरी शिव्या देणेच जरुरी असेल तर तो देऊ शकेल का? आपली सभ्यतेची जगात असलेली प्रतिमा डागाळेल असे वाटण्याची शक्यताच जास्ती असते. याचा अर्थ असा की साचेबध्द जीवन जगणारा मनुष्य परमेश्वराने समोर आणलेल्या झाडाला पाणी न घालता, झाडाच्या योग्यतेबद्दल विचार करु लागला आहे. माळ्याचे ते काम आहे, पाण्याचे नव्हे! म्हणून या उदाहरणावरुन हासुध्दा धडा शिकण्यासारखा आहे की आपल्या अगदी योग्य अशा वाटणाऱ्या प्रवृत्तीदेखील आपल्या संपूर्ण शरणागतीच्या आड येतात. हे समजून साच्यात स्वतःला घालायचा जो प्रयत्‍न करीत असतो तो थांबविला पाहिजे व परीस्थितीनुरुप वागण्याचे स्वातंत्र्य उपभोगायला सुरुवात केली पाहिजे.
शेवटची गोष्ट म्हणजे साधना कधीही न थांबविण्याची गरज. व्यवहारातील ज्ञानाबद्दल असे सांगता येईल की ते एकदा मिळाल्यावर सतत आपल्याजवळ असते. उदाहरणार्थ, दहावीची परीक्षा एकदा पास झालो की आयुष्यभर आपण दहावी पासच असतो. मग काही काळाने सध्याच्या दहावीच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकलो नाही तरी `दहावी पास’ ह्या आपल्या स्थितीत फरक पडत नाही. एकदा घर बांधले की परत परत ते बांधायची जरुरी नसते. अशा उदाहरणांमुळे बऱ्याच साधकांच्या मनात कळत-नकळत अशी अपेक्षा निर्माण होते की आपल्या प्रयत्‍नांमुळे म्हणा, किंवा गुरु-कृपेमुळे म्हणा, साधनेत अशी एक स्थिती प्राप्त होईल की ज्यापुढे करण्यासारखे काहीच उरणार नाही. ज्ञानप्राप्तीची आपली व्याख्याच एक गोष्ट की जी मिळाल्यावर पुढे काही न करायची गरज अशी होते. त्यामुळे साधनेत ते सतत अशा अनुभवाची वाट बघत राहतात की त्यामुळे साधना पूर्ण होईल. परंतु प्रत्यक्ष जीवनात सारखे सावध रहावे लागत असते, साधना कधीच पूर्ण होत नाही. मग त्यांना असे वाटते की त्यांना झालेले ज्ञान अपुरे आहे. एक प्रकारची निराशा त्यामुळे उत्पन्न होण्याची शक्यता असते. आता बागेतील पाण्यासारखे जर आपले जीवन आहे तर एकदाच कितीही पाणी घातले तरी आयुष्यभर काही ते झाडांना पुरत नाही. अगदी महापूर जरी आला तरी काही महिन्यांनी पाण्याचे दुर्भिक्ष व्हायची शक्यता असतेच. म्हणून साधनेत अगदी प्रचंड अनुभव आला तरी त्याचा परीणाम हा आयुष्यभर रहात नाही. परत आपले जीवन नेहमीप्रमाणेच सुरु होते. अगदी आधीच्या रस्त्यावर गाडी गेली नसली तरी परत त्याच मार्गावर जायला लागते. म्हणून परत पाणी घालणे जरुरी आहे, सतत साधना सुरु ठेवणे जरुरी आहे. आलेले अनुभव हे शाश्वत नसून नाशिवंत आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सहाव्या अध्यायात (ओवी १५३) म्हणतात की `जिये मार्गींचा कापडी, महेशू अजुनी’ म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर अजून साधना करीतच आहेत, मग आपली गोष्ट विचारायलाच नको! साधनेत आलेले अनुभव हे एखाद्या फुलाप्रमाणे आपण उपभोगूच, पण साधनेचा कधीतरी अंत होणार आहे असे न मानायलासुध्दा शिकू.

रथाचे उदाहरण

आता आपण दुसऱ्या ओवीकडे वळू. ज्या चालकाला कुठे जायचे आहे याची कल्पना असते तो त्या ध्येयाला पोहोचू शकेल असाच मार्ग निवडतो. बंगलोरहून कोल्हापुरला जाण्याकरीता आपल्याला मुंबईचाच मार्ग धरायला हवा, अशावेळी चेन्नईचा मार्ग चौपदरी केला आहे म्हणून त्या मार्गाने जाण्याची रथाची इच्छा चालक पुरवू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाचा मार्ग परमेश्वराकडे सोपविला की तो सध्या कठीण अशा मार्गावर जरी घेऊन गेला तरी आपली त्यावर चालण्याची तयारी हवी.
परमार्थातले खरे ज्ञान हे संकटप्रसंगीच्या आपल्या वागण्यावरुनच कळते. शाब्दीक ज्ञान हे सहज होत असते. म्हणून `परमेश्वरानेच हे जग निर्माण केले आहे, तोच सर्व गोष्टींचा कर्ता आहे’ असे शब्द उच्चारायला आपण कचरत नाही. थोड्या साधनेनंतर आपली खरोखर अशी खात्रीच होते की आपले आयुष्य ह्या श्रध्देवरच आपण जगत आहोत. परंतु ही जर वस्तुस्थिती असेल तर त्यामुळे आपोआप येणारी शांति आपल्या जीवनात का नाही याचा विचार आपण करीत नाही. थोड्या थोड्या गोष्टींनीसुध्दा जर आपले मानसिक संतुलन बिघडत असेल तर काहीतरी चुकत आहे अशी जाणीव का होत नाही? कदाचित्‌ अजून प्रयत्‍न करायलाच हवेत ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची आपली तयारी नसेल. परंतु आपण हे पूर्णपणे, स्वानुभवाने जाणून घ्यायला हवे की आपण `दादासाहेबच हे सर्व घडवून आणत आहेत’ असे जे शब्द उच्चारतो त्यामध्ये स्वतःचाच किती विश्वास आहे. हा विश्वास माहिती करुन घ्यायला जेव्हा आपल्या मनासारखी गोष्ट घडत नाही तेव्हा आपण किती अस्वस्थ होतो हे पहायला हवे. आपल्या आवडत्या व्यक्‍तीचा वियोग, त्या व्यक्तीवर आलेली संकटे ह्यामुळे आपण जर पराकोटीचे अस्वस्थ होऊन, ठराविक लोकांशी वागणे बदलायला लागलो, तर अजून परमेश्वरच सर्व करीत आहे या शब्दांवर पूर्ण विश्वास बसला नाही हे स्पष्ट होते. संकटकाळी आपण कसा विचार केला पाहिजे? तर ही परीस्थितीसुध्दा परमेश्वराने माझ्या साधनेतील प्रगतीसाठीच घडवून आणली आहे ह्या विचाराने तीच्याकडे बघितले पाहिजे. खालील गोष्टीमधील प्रधानासारखी आपली श्रध्दा हवी.
एका राजाच्या प्रधानाची परमेश्वरावर अत्यंतिक श्रध्दा होती. कुठलीही गोष्ट तो भगवंताच्या कृपेमुळेच झाली आहे असे मानत असे. एकदा राजाने त्याची परीक्षा घेण्याकरीता त्याच्या एका छोट्या चुकीला शंभर फटक्याची शिक्षा सुनाविली. प्रधानाच्या पाठीवर फटक्यांमुळे जखमा झाल्या तरी त्याचा परमेश्वराच्या दयाळूपणावरचा विश्वास उडाला नाही. नंतर राजाने शिकारीचा बेत काढला व प्रधानासहित सर्वांना घेऊन जंगलात गेला. तिथे वाट चुकल्याने प्रधान व राजा जंगलातील भिल्लांच्या हातात सापडले. त्यांच्या देवतेच्या यज्ञासाठी त्यांना नरबळीची आवश्यकता होती. भिल्लांनी त्यामूळे ह्या दोघांना पकडले. नरबळीसाठी माणसाचे शरीर व्रणविरहीत आवश्यक असते. प्रधानाच्या पाठीवरच्या जखमा पाहून त्यांनी त्याला सोडले व राजाला धरुन नेले. इकडे प्रधानाने परत जाऊन सैन्य जमविले व भिल्लांवर हल्ला करुन राजाला सोडविले. राजाला तो म्हणाला की परमेश्वरानेच तुम्हाला मला फटके द्यायची बुध्दी दिली होती कारण त्यामुळे नुसती माझी परीक्षाच झाली नाही तर तुमचा जीवसुध्दा त्याने वाचविला. त्याची अशी श्रध्दा पाहून राजाला प्रधानापुढे नतमस्तक होण्याखेरीज पर्यायच उरला नाही.
खरोखर, जीवनात पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची आपल्याला कल्पना नसते मग आयुष्याच्या शेवटी काय घडेल याची कशी कल्पना असू शकेल? त्यामूळे आत्ता आलेली ही आपत्ती पुढे मार्ग सोपा करु शकेल अशी कल्पना आपण का धरत नाही? पूर्वानुभवावर आधारित सध्या आपली सुखाची कल्पना आहे. त्या कल्पनेच्या अनुसरुन जीवन घडले नाही तर आपण कल्पना बदलायच्याऐवजी दुःखी का होतो? आपल्या जीवनाचे ध्येय हे परमेश्वराची प्राप्ती हे आहे, सध्या सुखात राहणे हे नाही हे आपल्या ध्यानातून सुटते. ज्याप्रमाणे दुर्योधनाने आपल्या सर्व सैन्याला आवाहन करून तुम्ही सर्वांनी भीष्माला रक्षावा असे गीतेच्या पहिल्या काही श्लोकांमध्ये सांगितले तशी आपली अवस्था आहे. काहीही करुन आपल्या मनाचे समाधान करायचा आपला सततचा प्रयत्‍न चालू असतो. पांडवांना हरवा असे दुर्योधन म्हणाला नाही त्याप्रमाणे देवाला हस्तगत करा असे न म्हणता आपल्या आयुष्याच्या सेनापतीला म्हणजे मनाला सांभाळायचा आपला प्रयत्‍न जीवनाच्या लढाईत दुर्योधनासारखेच अपयश देणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही!
मनाकडे लक्ष न देण्याकरीता जीवनाचा विचार आपण एखाद्या रस्त्याप्रमाणे केला तर त्याचा उपयोग होइल. ज्याप्रमाणे रस्त्यावर चालताना सुंदर दृष्य, अथवा विस्तीर्ण वृक्ष दिसला तर आपण थोडा वेळ थांबतो, त्या दृष्याचा वा वृक्षाचा आनंद उपभोगतो पण तिथेच अडकून रहात नाही. आपल्याला सतत ध्येयाची जाणीव असल्याने, थोड्यावेळाने परत पुढची वाट चालू लागतो, मग ती वाट कितीही कठीण का असेना. तसेच आपण आपल्या जीवनाकडे बघितले तर सध्याच्या अनुकूल परीस्थितीमध्ये अडकून न राहता, परत आपल्या परमेश्वरप्राप्तीच्या ध्येयाकडे चालतच राहू. साधना करतच राहू. रस्त्याकडेच्या झाडाखाली थांबण्यासारखेच सध्याच्या सुखद स्थितीकडे पाहू. अशा सर्व कारणांनी हे स्पष्ट होते की आपल्या जीवनात कुठल्या गोष्टी यायला हव्यात याचे जेवढे कमी भान आपल्याला असेल तेवढे चांगले. पराकोटीची अवस्था म्हणजे एखाद्या रथाप्रमाणे कुठलीही अपेक्षा न करीता जो मार्ग पुढे येईल त्यावर आपल्या क्षमतेप्रमाणे चालत राहणे ही होय. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला हाच उपदेश करीत आहेत.

ओवींचे सार

या दोन ओवींचे सार म्हणजे परमेश्वराला शरण जाण्यात मुक्ति आहे ही शिकवण. साधनेच्या अनंत मार्गांपैकी हा एक मार्ग आहे व ज्याकुणाला यामध्ये रस वाटतो त्याने खुशाल या मार्गावर जावे, माझी प्राप्ती होईलच असे परमेश्वराचे सांगणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्या आगगाडीत बसल्यावर जवळचे ओझे आपण खाली ठेवतो, डोक्यावरच घेऊन बसत नाही. त्याचप्रमाणे एकदा जन्माला आल्यावर सारासार विवेक करण्याचे ओझे आपण परमेश्वरावर टाकून निवांत चाललेल्या पाण्यासारखे जर जीवन जगलो तर मोक्षप्राप्ती ठरलेली आहे ही एकच गोष्ट जरी आपण शिकलो तरी पुरेशी आहे.
आता अगदी शेवटची बाब म्हणजे हे सार काढले कुणी? जेव्हा नामदेव महाराज म्हणतात `ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एकतरी ओवी अनुभवावी ॥’ तेव्हा त्यांना असे म्हणायचे नाही की प्रत्येक ओवीचा एक आदर्श अर्थ आहे व तो आपण नीट समजून घ्यावा. त्यांना असे म्हणायचे आहे की प्रत्येक ओवी म्हणजे एक सांकेतिक भाषेतील वाक्य आहे व आपण आपल्या जीवनात त्या वाक्याचा उलगडा केला पहिजे. दुसऱ्या कुणीही अत्यंत प्रामाणिकपणे ओवीचे सार आपल्याला सांगितले तरी त्यावर विचार करुन आपल्या आयुष्यात ते खरे आहे की नाही हे आपणच बघितले पाहिजे. सर्व प्रवचनांना हे बंधन लागू पडते. परमार्थ हा स्वतःचा स्वतःलाच करावा लागतो. एखाद्या नाटकाला गेल्यावर स्वतः अभिनय न करीता, नसते बसून, आपली करमणूक होऊ शकते पण दुसऱ्याचा अर्थ विचार न करीता स्वतःकरीता घेऊन परमार्थ साधत नाही. तेव्हा सांगितलेले हे सार बरोबर आहे की नाही याचा आपण सर्वांनी विचार करावा एवढे सांगून थांबतो.

॥ हरि ॐ ॥

अध्याय बारावा

 

12th Shloka: The Ultimate Sadhana



॥ ॐ श्री सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥


श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानद्‍ध्यानं विशिष्यते ।

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छांतिरनंतरम्‌ ॥ १२:१२ ॥
बाराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला भक्तियोग सांगितला. त्या अत्यंत रसाळ अध्यायातील हा बारावा श्लोक आहे. जरी प्रत्येक साधकाचा मार्ग भिन्न असला तरी सर्वसाधारणपणे साधक कुठल्या मार्गाने साधनेत प्रगती करतो याचे वर्णन करायला हा श्लोक त्यांनी वापरला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ह्यावरील भाष्य असे आहे:
अभ्यासाहुनि गहन । पार्था मग ज्ञान ।

ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१:१२ ॥

मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।

त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२:१२ ॥

ऐसिया या वाटा । इहीचि पेणा सुभटा ।

शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणे ॥ १४३:१२ ॥
या ओव्यांचा शाब्दीक अर्थ आहे `अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान व ध्यानापेक्षा कर्मफलत्याग हा श्रेष्ठ आहे. या सर्वांचा कळस म्हणजे निरंतर शांतीचा साधकाचा उपभोग हा आहे. सर्वजण याच वाटेने चालून शांतीच्या घरात विश्रांती घेतात’. आज आपण ह्या ओव्यांचा आपल्या जीवनात काय अर्थ होऊ शकेल हे पहायचा प्रयत्‍न करु.
ज्ञानाचे खरे महत्व
आपण लहानपणापासून जीवनात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. शाळेत असताना सर्व अभ्यास हा ज्ञान प्राप्त होण्याकरिताच असतो अशी आपली खात्री असते. ज्ञानप्राप्तीची एक खूण म्हणूनच आपण आपले परीक्षेतील गुण बघत असतो. माणसाला जितक्या जास्त गोष्टींबद्दलची माहिती असेल तितके आपण त्याला महत्व देतो, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्‍न करतो. अगदी आपल्या पारमार्थिक साधनेतसुद्धा आपण `ज्ञानी’ व्हायचाच प्रयत्‍न करीत असतो. अशा रीतीने आत्तापर्यंत ज्ञान मिळविणे हे आपण सर्वात महत्वाचे मानले आहे. परंतु वरील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण वेगळेच सांगत आहेत. ते म्हणतात की (जराशा) अभ्यासाने ज्ञान प्राप्त हो‍ऊ शकते. ध्यान, कर्मफलत्याग व अखेर शांति ह्या सर्व गोष्टी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेत! त्यांच्या या उद्‍गारांनी आपल्या मनात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आपण यावर विचार करायची आवश्यकता आहे.
सर्वसाधारणपणे साधकाच्या दररोजच्या जीवनामध्ये काही अडचणी आल्यानंतरच साधक परमार्थाच्या मार्गावर नेटाने चालायला लागतो. ज्याप्रमाणे तानाजीने पळून जायचे दोर कापल्यावरच त्याच्या सैनिकांनी प्राण पणाला लावून लढाई केली व विजय मिळविला, त्याचप्रमाणे आपल्या भौतिक जगामध्ये सुख मिळविण्याच्या आशा मावळल्यावरच परमार्थाच्या सूर्याचा उदय होतो. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनात त्यांना आलेला प्रचंड आजार, श्री रमणमहर्षींना अचानक झालेली मृत्यूप्राय अवस्था, अर्जुनाला आलेला विषाद, बुद्धाला प्रत्येक गोष्टींचा दिसलेला अशाश्‍वतपणा इत्यादी अनेक घटना उदाहरणार्थ देता येतील. अशा अत्यंत महत्वाच्या क्षणी आपल्या जीवनांत एक वादळ निर्माण होते. आत्तापर्यंत महत्वाच्या मानत असलेल्या गोष्टींबद्दल आपण शंका घेऊ लागतो. आपले आयुष्य वाया गेले आहे की काय? या विचाराने आपण अत्यंत अस्वस्थ होतो व आपल्या जगण्याच्या धेयाबद्दल विचार करू लागतो. साधकावस्था प्राप्त होण्याआधीची ही घटना आहे. परंतु अशा घटनेची तीव्रता ही काही आयुष्यभर टिकण्यासारखी नसते. खरं म्हणजे कुठल्याच घटनेबद्दलची तीव्रता आयुष्यभर रहात नाहीं. काळ सर्व गोष्टींचे महत्व हळूहळू कमी करतो. म्हणून अशा अस्वस्थ अवस्थेत आपण असतानाच आपण अंतर्मुख होऊन जीवनाबद्दल खोल विचार केला पाहिजे. परंतु मन अस्वस्थ असताना आपली सारासार करण्याची बुध्दी कमी होते. म्हणून अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक असते. या विचार करण्याला मदत म्हणून आपण अशा व्यक्तींचीच साहजिक मदत घेतो की ज्यांच्या मनांत आपल्याबद्दल सद्‍भावना आहे, सहानुभूती आहे. आधीच्या आपल्या इच्छांबद्दल साशंक होऊन ही आपली शाश्‍वत वस्तू मिळविण्याची धडपड म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला `अभ्यास’ होय. अशा अभ्यासामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन लाभते, जो उपदेश मिळतो व जो विचार आपण करतो त्याचे फळ म्हणजे `ज्ञान’ हे होय. जर नशिबाने आपल्या जवळ श्रीगुरु असले व त्यांच्या सल्ल्यानुसार वागायले हवे अशी बुद्धी झाली तर आपले हे `ज्ञान’ साधनेच्या मार्गावर आपल्याला घेऊन जाते. नाहीतर जीवन हे असेच असते, कधी कधी दुःख हे होणारच त्याची सवय करायला हवी अशा विचाराचा पगडा आपल्यावर बसायची शक्यता असते. असे जर झाले, तर संतांच्या `जीवन हे केवळ सुखमय होऊ शकते’ अशा सांगण्यावर विश्वास ठेवायची आपली शक्‍ति रहात नाही. परंतु जर नशिब जोरावर असेल, पूर्व-प्रारब्ध चांगले असेल तर अशा मोक्याच्या वेळी श्रीगुरुंचे दर्शन होते व `परमेश्वराचे चिंतन हेच ध्येय ठेवायला हवे’, `सर्व जग हे परमेश्वराचेच रूप आहे’ अशा तऱ्हेचे (शाब्दिक) ज्ञान मिळते. थोडक्यात म्हणजे असे ज्ञान मिळवायला फारसे प्रयत्‍न करावे लागत नाहीत तर ते आपल्या हातात सत्‌संगतीने आपोआपच येते. एवढेच नव्हे तर आपल्या अस्वस्थ मनःस्थितीमुळे अशा प्रत्येक वाक्याला ते पूर्णपणे सत्य आहे असे आपण स्वीकारूसुद्धा शकतो. ह्या संपूर्ण स्वीकाराने आपण ज्ञानी होतो. परंतु आपले हे स्वीकारणे अत्यंत भावुक असते. ज्याप्रमाणे स्मशानातील वैराग्य घरी येईपर्यंत नाहीसे होते त्याचप्रमाणे भावनेची तीव्रता कमी झाल्यावर ह्या ज्ञानावरची श्रद्धा कमी व्हायला लागोतो. केवळ भावनेच्या जोरावरच (किंवा श्रद्धेवरच) हे ज्ञान आपण सत्य मानले असल्याने भावनेची तीव्रता कमी झाली की आपले ज्ञान कमी होते. सायकल चालवायला एकदा शिकले की परत शिकायला लागत नाही तसे हे ज्ञान नसते तर एखादी भाषा शिकण्यासारखे असते. एकदा शिकलेली भाषा जर वापरली नाही तर हळूहळू ती आपण विसरतो तसेच जर झालेले ज्ञान वापरात आणले नाही तर हळू हळू नष्ट होते. शिवाय पारमार्थिक ज्ञान हे इंद्रियांमार्फत कवटाळण्यासारीखे नसल्याने आपली त्यावरची श्रद्धा कमी झाली तर दृश्य गोष्टींतून ती परत मिळवायची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच अशा तऱ्हेच्या ज्ञानाला साधनेमध्ये अंतिम घटना असे भगवान श्रीकृष्णांनी मानलेले नाही. `भौतिक जगापलिकडे काहीतरी आहे, व त्यामध्येच खरे सुख दडलेले आहे’ हे ज्ञान भावुक रीतीने सत्य मानणे ही साधनेमधील एक महत्वाची घटना आहे याबद्दल संशय नाही, पण ती अंतिम घटना नाही हे भगवान श्रीकृष्णांना वरील श्लोकात सांगत आहेत. एकदा प्राप्त झालेले हे ज्ञान आपल्या आयुष्य़ात स्थिर होण्याकरीता त्या ज्ञानाचा असलेला श्रद्धेचा पाया बदलून तो `प्रचितीचा’ करायला हवा. हा पाया बदलायला साधना करायला हवी. अनेक पुस्तकांमध्ये आपण वाचलेले आहे की आत्मरूपाचा शोध हेच आपले ध्येय व्हायला हवे. कित्येकवेळा लिहीणाऱ्याबद्दलच्या आदरामुळे ते आपण सत्य आहे हे स्वीकारले देखिल आहे. तरीसुध्दा आपले आयुष्य बदलत का नाही? याचे कारण असे की ज्ञान मिळविण्यामध्येच धन्यता मानून आपण पुढे काहीच करत नाही. ह्या ज्ञानामुळेच सर्व जीवन बदलेल, अत्यंत सुंदर, अधिक अर्थपूर्ण होईल अश्या अपेक्षेत आपण राहतो. खरोखर जर आपल्याला आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकायचे असेल तर अशा ज्ञानाचे, वरील श्लोकामधे सांगितलेले, साधनेतील असे खरे महत्व आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
ज्ञानानंतरची वाटचाल
जीवनातील आणिबाणीच्या क्षणी योग्य मार्गदर्शनामुळे अचानक प्राप्त झालेल्या ज्ञानानंतर साधकाने काय करावे? तर `ध्यान’ करावे असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. हे ध्यान म्हणजे `चिंतन व मनन’. ज्याप्रमाणे गायीचे गवत चरून झाल्यावर ती एका ठिकाणी शांत बसून रवंथ करते त्याचप्रमाणे मिळालेल्या ज्ञानावर आता शांतपणे विचार करायची आवश्यकता आहे. अशा विचाराने जे ज्ञान आपण सत्य आहे असे `मानले’ आहे ते मानणे-सवरणे बदलून ते ज्ञान सत्य आहे असे आपल्या जीवनात `सिद्ध’ होते. खरा परमार्थ `मानण्या-सवरण्यामध्ये’ कधीच नसतो. विचार करण्याने, आपण `परमेश्वराशिवाय या जगात काहीच सत्य नाही’ हे ज्ञान `सूर्य पूर्वेला उगवतो’ अशा ज्ञानाइतके सत्य मानायला हवे. कोणी जर कितीही वाद घालून हे सिध्द करायला लागला की सूर्य पूर्वेला उगवत नाही तर त्याच्या कुठल्याही कारणांवर आपण विश्वास ठेवत नाही. त्याचप्रमाणे, आपले हे ज्ञान खरे नाही असे कुणीही सांगितले तरी आपली त्यावरची श्रध्दा ढळली नाही पाहीजे. असे होण्याकरीता बाह्य, दृश्य जगातसुद्धा या ज्ञानाचा पडताळा आपल्याला दिसायला लागतो. कुठलीही गोष्ट दिसताक्षणीच ही आपल्या जीवनातून कधी नाहीशी होऊ शकते का? असा प्रश्न मनांत यायला सुरु होणे म्हणजे ध्यान. दरवेळी ऊत्तर `हो, नाहीशी होऊ शकते’ असे आल्याने अस्वस्थ होऊन आपले मन त्या गोष्टीमध्ये अडकत नाही. अशी अवस्था जीवनात सतत घडायला लागणे म्हणजे ध्यान. ही अवस्था म्हणजेच आपण मिळविलेल्या ज्ञानाबद्दल सतत विचार (चिंतन व मनन) करीत असणे.

 
आता आपण श्लोकात सांगितलेल्या साधकाच्या पुढच्या अवस्थेचा म्हणजे कर्मफळत्यागाचा विचार करू. सर्वसाधारणपणे कर्मफळ म्हणजे काय याबद्दलच आपल्या मनात चुकीची कल्पना असते. आपण परीक्षेतील मार्क हे कर्मफळ मानतो परंतु परीक्षेकरीता केलेला अभ्यास आपण कर्मफळ मानत नाही, तर कर्म मानतो ज्याचे फळ म्हणजे मार्कस्‌. मिळालेली नोकरी किंवा असलेल्या नोकरीतले प्रमोशन कर्मफळ आहे व नोकरीकरीता केलेले अर्ज, वगैरे कर्म आहे कर्मफळ नाही अशीच आपली समजूत असते. थोडक्यात म्हणजे जीवनात आपल्याला हवी अशी एखादी गोष्ट मिळणे किंवा न मिळणे या गोष्टीला आपण `कर्मफळ’ मानतो व ती गोष्ट मिळविण्याकरीता केलेल्या प्रयत्‍नांना आपण कर्मफळ मानत नाही तर कर्म मानतो. आपल्या मते अशा कर्मांचे जे फळ त्याला कर्मफळ म्हणतात. परंतु ही आपली कल्पना संपूर्णपणे चूकीची आहे! उदाहरणार्थ, परीक्षेत चांगले गुण मिळविणे ही गोष्ट चांगली आहे असे आपण आधी कधीतरी मानले होते म्हणूनच आपण खूप अभ्यास करु शकलो. म्हणजे आपले खूप अभ्यास करणे ही गोष्टसुद्धा `मार्कस्‌ मिळविणे चांगले आहे’ हे आपण मानण्याच्या कर्माचेच फळ आहे! म्हणजे ते कर्म नसून कर्मफळ आहे. तसेच नोकरी न करता नुसते घरात बसणे हे वाईट आहे ही गोष्ट आपण सत्य मानण्याच्या कर्माचा परिणाम म्हणजेच आपला नोकरी मिळवण्याकरीता प्रयत्‍न करणे हे होय. याचा अर्थ असा की नुसते नोकरी मिळणेच नव्हे तर नोकरीकरीता अर्ज टाकणे हे सुध्दा कर्मफळच आहे! अभ्यास करण्याआधीचे, अर्ज टाकण्याआधीचे आपले कर्म मनांत होत असल्याने ते आपल्याला दिसत नाही पण म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही. अशा रीतीने विचार केला तर जीवनातील आपण केलेली प्रत्येक कृती हे कर्मफळच आहे असे आपल्याला दिसायला लागेल! केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या आधी `ही गोष्ट करायला हवी’ असे आपण मानतो व ते मानणे हे एक कर्मच आहे!
अजुन खोल विचार केल्यावर `अमुक एक गोष्ट करायला हवी’ हे मानणेसुध्दा त्याच्या आधी कुठलातरी विचाराला मान्यता दिल्याचे फळ आहे हे दिसू लागते! म्हणजे आपल्या जीवनातील मानसिक व शारीरीक ह्या सर्व क्रिया `कर्मफळ’ आहे असे आपल्याला दिसू लागते. गीतेत तर अगदी आपला सध्याचा जन्मसुध्दा पूर्वजन्मींच्या राहीलेल्या इच्छांचेच फळ आहे असे सांगितले आहे. म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात प्रथम अशी घटना म्हणजे आपला जन्म हीसुध्दा कर्म नसून कर्मफळ आहे असे सिध्द होते! असा विचार केल्यावर मग `कर्मफळत्याग’ ह्या गोष्टीचा भव्यपणा, व्यापकपणा आपल्याला पटू लागतो. त्याचे महत्व जाणवायला लागते. म्हणुनच भगवान श्रीकृष्णांनी साधकाच्या कर्मफळत्यागाला त्याच्या ज्ञानापेक्षा व त्यावरील त्याच्या ध्यानापेक्षा महत्व दिलेले आहे.
आता साधनेची सर्वात शेवटची व अत्यंत सुरस अशी अवस्था म्हणजे साधकाचा निरंतर शांतीचा उपभोग. दररोजच्या जीवनामध्येसुध्दा आपण अनुभव घेतो की दुसरे काहीही कारण नसतांना दुसऱ्याकरीता केवळ प्रेमामुळे घेतलेले कष्ट, केलेला त्याग आपल्याला एक वेगळेच समाधान देतो. ज्या गृहीणींनी घरातील लोकांकरीता कष्ट सहन केले आहेत, ज्या सर्व मातांनी आपल्या मुलांच्या सुखाकरीता अनेक त्रास सहन केले आहेत त्यांना हे शब्द लगेच पटतील. खरं म्हणजे कर्माच्या सिध्दांतामध्ये असे सांगितले आहे की सेवेचे खरे फळ हे सेवा करून घेण्याऱ्याला मिळत नसून सेवा करणाऱ्याला मिळत असते. आता आपण कल्पना करा की केवळ परमेश्वराकडे जायचे आहे अशा प्रेमामुळे, अशा इच्छेने केलेला वरील सर्वव्यापक कर्मफळत्याग ही परमेश्वराची सेवा आपल्याला किती सुख, किती शांती, किती समाधान देईल! भगवान श्रीकृष्ण म्हणतात की `निरंतर शांति मिळते’! तेव्हा शांति हे कर्मफळत्यागाचे आपोआप आलेले फळ आहे!! आता ही शांतीसुध्दा फळ असल्याने त्याचापण आपण त्याग करायला हवा का? अशी कुशंका घेणाऱ्यांनी प्रथम ही अवस्था अनुभवावी व मगच हा प्रश्न विचारावा असे सांगावेसे वाटते.
साधनेचा अनंतपणा
अशा रीतीने सर्व साधक या मार्गाने चालून शांतीच्या घरात स्थानापन्न होतात असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्वात पहिल्यांदा अस्वस्थतेतून होणारा अभ्यास, नंतर योग्य मार्गदर्शनामुळे झालेले ज्ञान, यानंतर त्या ज्ञानाबद्दल केलेला खोल विचार व सर्वात शेवटी स्थिर झालेल्या ज्ञानाशी प्रामाणिक राहून जगण्यामुळे करावा लागलेला कर्मफळत्याग. खरोखर, जर आपले ज्ञान ध्यानामुळे जर स्थिर झले असेल तर आपण आपोआपच बाह्य जगात कमी गुंतु लागतो. हे कमी गुंतणे म्हणजेच सुरु झालेला त्याग. तेव्हा ध्यानाने एकदा ज्ञान पक्के झाले, की त्यागाशिवाय जगणे शक्य नसते. अशा रीतीने हा प्रचंड वाटणारा कर्मफळत्याग साधक आपोआपच करायला लागतो. सुरुवातीला तर साधकाला कल्पनासुध्दा नसते की आपण इथपर्यंत आलो आहोत. कर्मफळत्याग हा साधनेतील सर्वात लांबलचक, कधीही न संपणारा भाग आहे. जेवढे आपण ह्या मार्गावर चालू तेवढी खोल गंभीर अशी शांति आपल्याला प्राप्त होते. 
या बाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते.
बंगालमध्ये पूर्वी गिरीशचंद्र घोष नावाचे थोर नाटककार व कवि होऊन गेले. अजूनही कोलकतामध्ये त्यांच्या नावाचा एक मार्ग आहे. या गिरीशचंद्रांचा रामकृष्ण परमहंसांवर पूर्ण विश्वास होता. ते रामकृष्ण परमहंसांना परमेश्वराचा अवतारच मानायचे व जो कोणी त्यांना भेटेल त्यांना ते रामकृष्णांबद्दल सांगून भेटायला आणायचे. एकदा रामकृष्ण परमहंसांना त्यांनी विनंती करून स्वतःला योग्य अशी साधना सांगायला सांगीतली. स्वतःचे वागणे अत्यंत मुक्त, स्वच्छंद असल्याने (कलाकार लोकांना कशीही वागण्याची जणू मुभाच असते!) रामकृष्णांनी सांगितलेली कुठलीही साधना त्यांना आपण करु शकू अशी वाटली नाही. सर्वात शेवटी रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितले की तुमचे सर्व जीवन आहे तसेच जगा, काहीही बदल करू नका. फक्त प्रत्येक गोष्ट मी रामकृष्ण परमहंसांकरीता करीत आहे ही भावना ठेवा. आता कर्मफळत्याग यापेक्षा काय वेगळा आहे?! परंतु गिरीशचंद्रांना ही गोष्ट अगदी सोपी वाटली व ते या साधनेला लगेच कबुल झाले! नंतर काही दिवसांनी गिरीशचंद्र रामकृष्णांसमोर दुसऱ्या कोणाला सांगत होते की `पूजेला फूले मी आणीन’. त्यावेळी लगेच रामकृष्णांनी त्यांना सांगितले की हे तू चुकीचे बोललास. एकदा तू सर्व गोष्टी माझ्याकरीता करण्याचे कबूल केल्यावर तू `रामकृष्णांची इच्छा असेल तर फुले आणीन’ हे शब्द वापरायला हवेत! गिरीशचंद्र यावेळी एकदम अन्तर्मुख होऊन गप्प बसले. नंतर बऱ्याच वर्षानी रामकृष्णांचे एक संन्यासी शिष्य शारदानंद यांना गिरीशचंद्रांनी सांगितले की अजुनही त्यांना प्रत्येक गोष्ट रामकृष्ण परमहंसांकरीता करता येत नाहीं! म्हणजे ते `कर्मफळत्याग’ या शब्दाचा अर्थ अजूनही पूर्ण जाणून घेऊन शकले नाहीत!
खरोखर कर्मफळत्याग हा इतका कठीण, इतका सूक्ष्म आहे की साधकाला पदोपदी जाणविते की त्याचा कर्मफळत्याग हा किती अपूरा आहे. कधीही कोणत्याही क्षणी आपला `मी’पणा जागृत होतो व कर्मफळत्याग नाहीसा होतो. पण सर्वांना ही गोष्ट करायचीच आहे. व आपल्याहातून हे कसे होईल असा निराशावादी विचार न करता फक्त आलेल्या क्षणावर लक्ष केंद्रित करून चालायचे आहे.
हे एवढे धैर्य कसे येईल? हा स्थिरपणा कशामुळे येईल? आपण जर कर्मफळत्याग या अवस्थेपर्यंत आलो असू तर त्यामध्येच आपण स्वतःला अत्यंत भाग्यवान मानले पाहिजे. मनाच्या अस्वस्थतेचा वेळी योग्य मार्गदर्शन किती जणांना मिळते? जगातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आणिबाणीचा प्रसंग हा येतोच. इंग्रजीमध्येतर अशा क्षणांकरीता mid-life crisis असे नांवसुध्दा दिलेले आहे इतकी ही घटना सर्वसामान्य आहे. परंतु किती थोडेजण परमार्थाच्या मार्गावर येताना दिसतात. आपल्या नशिबानी योग्य गुरू भेटून आपण ज्ञानप्राप्ती करून घेतली आहे. गुरू-कृपेच्या बळावर चिंतन-मनन करून आता आपण दररोजच्या जीवनांत हे ज्ञान वापरण्याच्या स्थितीत आलो आहोत ही घटनाच किती लोकांचा वाट्याला येते? आपण असे अत्यंत नशिबवान असताना कर्मफळत्यागाच्या वाटेवर न चालणे हे अत्यंत करंटेपणाचे लक्षण आहे असे आपल्या लक्षात आले पाहिजे. एखाद्या लहान मुलाच्या हातातील भारी रकमेचा चेक्‌ आपण केवळ ५ रूपयाचा रंगीत फुगा देऊन घेऊ शकतो त्याप्रमाणे आपली अवस्था जगात गुंगून कर्मफळत्याग न करण्यामध्ये आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्यावर इतकी गुरू-कृपा आहे की आपण येथपर्यंत पोहोचलो आहोत. त्याची कृतज्ञता म्हणूनतरी आपण या मार्गावर चालले पाहिजे ही भावना आपल्याला धैर्य व स्थिरता देते, नम्रता देते. जी शक्ति आपल्याला येथपर्यंत घेऊन आलेली आहे तीच आपली पुढेसुद्धा काळजी घेईलच हा विश्वास या अनंत वाटेवर साधकाला सतत साथ देतो. याशिवाय कर्मफळत्याग केल्याने त्याच्या मनातील शांतिला उत्तरोत्तर उधाण येत राहते. त्याचासुध्दा साधकाला या मार्गावर चालायला उपयोग होतोच.
आता शेवटी कर्मफळत्यागात साधना कशी संपते? आपल्या परमेश्वराच्या सततच्या सान्निध्याच्या ध्येयाचे काय झाले? अशी ज्यांची शंका आहे त्यांच्या करीता असे सांगावेसे वाटते की सर्व कर्मांचा त्याग केल्यावर जी स्थिती उरते ती परमेश्वररूपीच असते. उदाहरणार्थ, मुंबईच्या मार्गावर कोल्हापूर शहर बंगलोरपासून ६५० कि.मि. आहे. हे कळल्यावर त्या मार्गावर ६५० कि.मि. गेल्यावर वेगळी कोल्हापूरला जायची धडपड करावी लागत नाहीं. त्या ठिकाणी कोल्हापूर शहर असतेच. त्याचप्रमाणे सर्वकर्मांपासून अलिप्त असा केवळ परमेश्वरच आहे. जेव्हां सर्वकर्मफळांपासून (म्हणजेच प्रत्येक कर्माच्या आपलेपणापासून) आपले मन दूर रहाते तेव्हां त्या मनाला जायला एकच ठिकाण असते व ते म्हणजे परमेश्वराचे घर! कर्मफळत्यागातून अमित शांतीची, अपार सुखाची प्राप्ती होते याचे खरे कारण हेच आहे. म्हणूनच कर्मफळत्याग पूर्ण झाल्यावर परमेश्वराची प्राप्ती होते व साधकाचे ध्येय त्याला मिळते.
॥ हरि ॐ ॥

*******************************************************************

अध्याय सोळावा

(1 to 6): Go near your innerself

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।
अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आता ॥ १:१६ ॥

जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां ।
जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ २:१६ ॥

जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।
सांडिती देहाहंतेची अविसाळे । जीवपक्षी ॥ ३: १६ ॥

लिंगदेह कमळाचा । पोटीं वेचतया चिद्‌भ्रमराचा ।
बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥ ४:१६ ॥

शब्दाचिया आसकडी । भेदनदीच्या दोहीं थडी ।
आरडाते विरहवेडी । बुध्दीबोधु ॥ ५:१६ ॥

तया चक्रवाकांचे मिथुन । सामरस्याचे समाधान ।
भोगवी जो चिद्गगन- । भवनदिवा ॥ ६:१६ ॥

आपल्या सद्‌गुरुंना सूर्याची उपमा देऊन ती किती सार्थक आहे याचे वर्णन करणाऱ्या ह्या सोळाव्या अध्यायातील सद्‌गुरुस्तवनाच्या ओव्या जितक्या गूढ अर्थाने परिपूर्ण आहेत तितक्याच साहित्यिक सौदर्याने नटलेल्या आहेत. तसे पहायला गेले तर सर्व संतांना निःशंक आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि त्यामुळे त्यांच्या साहित्यिक कृतींमध्ये बोध संपूर्णपणे ठासून भरलेला असतो यात शंका नाही. उदाहरणार्थ, तुम्ही गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचा वा एकनाथी भागवताचे पठण करा. तुकारामांच्या गाथेतील अभंग बघा वा श्रेष्ठ संत श्री रामदासांचा दासबोधाचे अध्ययन करा. या सर्वांमध्ये आपणाला आत्मज्ञान करुन घेता येईल असा बोध ठासून भरलेला आहे. परंतु श्री ज्ञानेश्वरीची गोष्ट काही वेगळीच आहे. निव्वळ बोध प्रदान करणाऱ्या ह्या ओव्या नसून यामध्ये साहित्याचे सर्व रंग दडलेले आहेत. ही प्रतिभा इतकी असामान्य आहे की या कृतीच्या जनकाला आपोआपच ज्ञानेश्वर ही पदवी प्राप्त होते. खरोखर, मराठी साहित्यामध्ये अशी दुसरी कृती दिसत नाही. आणि ज्ञानेश्वरीतही जेव्हा आपल्या सर्व प्रतिभेला पणाला लावून ज्ञानेश्वर महाराज सद्‌गुरुस्तवन करतात तेव्हा साहित्यिक सौंदर्य पराकोटीचे खुलून येते. मग ते चौदाव्या अध्यायात ‘कीं पुढिलांची दृष्टी चोरिजे । हा दृष्टीबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें। जे आपणपें चोरे॥’ असे उद्‌गारतात आणि ‘आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥, तयापरी श्रीगुरु । करिती जे अंगिकारु । तै होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा॥’ अशी ग्वाही देतात. आपल्या प्रतिभेला संपूर्णपणे मोकळिक देऊन त्यांनी केलेल्या सद्‌गुरुस्तवनांतील गूढार्थ जाणून घेणे अतिशय अवघड आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ‘अतिशयोक्ती’ या अलंकाराने पूरेपूर भरलेली ही स्तवने वस्तुस्थितीमध्ये सत्याच्या पायावर उभी आहेत. यातील एकही शब्द सत्याला सोडून नाही. परंतु आपली दृष्टीच एवढी भव्य नाही की या अलंकारीक भाषेमागील सत्य आपण बघू शकू. असे बघा, आपल्यासमोर कुणी हिरे-माणकांचा हिमालयाएवढा डोंगर जरी उभा केला तर त्याची संपूर्ण भव्यता पाहणे आपणास शक्य आहे का? मग तो घरी घेऊन जायची बातच सोडा. आपल्याला ओंजळीत उचलता येईल इतकीच रत्ने आपण घरी नेऊ शकतो. त्याचप्रमाणे, सद्‌गुरुस्तवनाद्वारे जी अप्रतिम कृती आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवली आहे तीचे संपूर्ण आकलन करणे कुणाला शक्य आहे? आपल्या संकुचित दृष्टीकोणामुळे संपूर्ण चित्र आपण बघूच शकत नाही. त्यामुळे एका मोठ्या कॅनव्हासवर रंगीबेरंगी चितारलेल्या चित्रातील कुठल्यातरी एका कोपऱ्यावरचा काळा रंग बघून काय घाण आहे असा निष्कर्ष आपण काढू लागतो. म्हणूनच जगामध्ये सर्वकाही योग्य घडत आहे या सत्य परिस्थितीची ग्वाही सर्व संतांनी दिलेली असली तरी आपल्या नजरेस फक्‍त आपलेच विश्व दिसत अस्ल्याने मनात ‘या जगात किती अन्याय होत असताना संत असे कसे म्हणू शकतात’ हीच भावना उद्भवते! असो.
सांगायची गोष्ट अशी की ज्ञानेश्वरीतील एकही ओवी वस्तुस्थिती सोडून नाही हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. वरील ओवींमागील सत्यता जाणून घ्यायचा एक प्रयत्‍न आज आपण करुया. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत “विश्वाचा आभास मावळवीत नवलपूर्ण सूर्य उगविला आहे, अद्वैत कमळाचा विकास करणाऱ्या ह्या अद्‌भुत सूर्याला (आपण) वंदन करुया. जो अविद्यारुपी रात्रीला नष्ट करुन (त्यातील चमचमणाऱ्या) ज्ञान आणि अज्ञान ह्या चांदण्या गिळून टाकतो आणि ज्ञानीजनांना आत्मबोधाचा प्रकाश दाखवून सुदिन उजाडवतो, ज्याच्या उदयाने झालेल्या पहाटेच्या प्रकाशामुळे जीवरुपी पक्षी ‘मी म्हणजे देह’ ह्या अहंकाराचे घरटे सोडतात (स्वतःच्या देह-मनाच्या संकुलाशी आत्मीयता नष्ट होते) आणि आपल्या ‘चित’रुपी अस्तित्वाचा भ्रमर ज्या मन आणि देहाच्या कमळामध्ये बंदिस्त झाला होता त्याची (सूर्य उगविल्यावर कमळे उमलतात म्हणून) त्या बंदिवासापासून सुटका होते. ‘शब्दांचा आधार घेऊन जग जाणणे’ ह्या भूमिकेत अडकल्याने निर्माण झालेल्या द्वैतरुपी अस्तित्वाच्या नदीच्या दोन तीरांवर ‘बुध्दी’ आणि ‘बोध’ ही चक्रवाक पक्षांची जोडी विरहाने आरडाओरड करीत होती त्यांचे ‘सर्वांभूती समभाव’ ह्या रुपाचे मिथुन आपल्या चिद्‌गगनामध्ये उदयलेल्या दिव्याने होते (बुध्दी जगात फरक दर्शविते आणि अंतर्स्फूर्ती परमेश्वराचे अस्तित्व जगात दाखविते या दोघांतील विसंगती नष्ट होऊन त्यांच्या ऐक्याचा ‘योग’ सद्‌गुरुंचे अस्तित्व जाणविण्याने होतो).’
जेव्हा जीव आणि शिव यांचे मिलन होते तेव्हा अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते असे म्हणतात. हे ऐक्य घडण्याचे ठिकाण म्हणजे आपल्या माथ्यावर असलेले सहस्त्ररा चक्र होय. या चक्राला योगशास्त्र सहस्त्र पाकळ्यांच्या कमळाच्या रुपात पाहते. म्हणून पहिल्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत ‘अद्वब्जिनिविकाशु’. एकदा या बोधाचा उदय झाला की अज्ञान तर मावळतेच परंतु अज्ञानरुपी नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ज्ञान हे ही लोप पावते. म्हणून एकदा अद्वयत्वाचा उदय झाला की ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नष्ट होतात.
चक्रवाक पक्षी अव्यभिचारी प्रेम करतात असे म्हणतात. जोडीमधील एका पक्ष्याचे निर्वाण झाले तर दुसरा पक्षी अन्नत्याग करून आपल्या जीवनाचा अंत करतो अशी दंतकथा आहे. विरहाचा दाह दाखविण्याकरीता त्यांच्या जबरदस्तीने (एका नदीच्या दोन तीरांवरील खड्यात अडकून पडले आहेत ही कल्पना केली आहे) झालेल्या वियोगापेक्षा सुंदर उपमा असू शकेल काय? आणि त्यांच्या शब्दांचा उपयोग बघा. सद्‌गुरुकृपेने त्यांचे नुसते ‘मीलन’ होत नाही तर ‘मिथुन’ होते! मीलन हा शब्द यमक जुळवायला योग्य असला तरी ‘एकमेकांमध्ये संपूर्ण मिसळून गेले आहेत’ या सत्य परिस्थितीचे वर्णन करण्यास अपुरा होता हे जाणून त्यांनी ‘मिथुन’ ह्या शब्दाचा प्रयोग केला आहे. इतकी सूक्ष्म दृष्टी, इतके चपखल शब्दप्रयोग श्रीज्ञानेश्वरीत पदोपदी आहेत. सर्व संत ज्ञानी आहेत पण ज्ञानेश्वरांना त्या सर्वांचे ईश्वर का म्हणतात हे ज्ञानेश्वरी बघितल्यावर स्पष्ट होते!

येता संसार-नदी तटी । सहज होई सद्‌गुरु भेटी ।
आतुरतेने मारीता मिठी । अंतरी भगवंत दिसे दृष्टी ॥
मावळवीत विश्वाभासू. हे सर्व जग केवळ आभास आहे हे वाक्य हजारवेळा आपण सर्वांनी ऐकलेले आहे. जेव्हा केव्हा आपले मन आसक्‍तीविरहित असते तेव्हा त्यांच्यावर आपला विश्वासही बसला आहे. परंतु पुढच्याच क्षणी कुठलीतरी आसक्‍ती मनात निर्माण होऊन आपण त्यात गुंगून जातो आणि आपल्या आकर्षणाचे कारण मायावी आहे हे विसरतो. अनेकवेळा सत्संग घडूनही आपल्या मनात वैराग्याची ज्वाळा धगधगत का नाही याचे कारण म्हणजे आपली संसारातून मन काढून घेण्याबद्दलची अनास्था होय. संसाराला जर नदीची उपमा दिली तर त्या नदीच्या तटावर आपले सद्‌गुरु उभे आहेत असे दिसेल. नव्हे, नव्हे. ते नुसते नदीच्या तटावर उभे आहेत असे नसून त्या नदीचे दोन्ही तट म्हणजेच आपले सद्‌गुरु होय! आपल्या जीवननदीला आकार देणारे, तीला मार्ग दर्शविणारे व ठराविक मर्यादेबाहेर वाहू न देणारे दुसरे कुणी नसून आपले सद्‌गुरुच आहेत. भावनांच्या महापूरात मर्यादेच्या तटाला विसरून आपण भलतीकडे वहात जातो तेव्हा आपल्या सद्‌गुरुंचे उल्लंघन आपण करीत असतो हे लक्षात घ्या! आपल्या नकळत ते आपणास भगवंताच्या विश्वरुपी सागराकडे नेत आहेत. म्हणूनच असे म्हणतात की आपल्या सर्वांना कधीनाकधी मोक्ष मिळणार आहे यात शंका नाही. सर्व नद्या जशा समुद्रातच विलीन होतात तशीच ही गोष्ट आहे. परंतु आपण स्वतःहून जर संसारनदीच्या प्रवाहातून बाहेर यायचा प्रयत्‍न केला तर या जन्मातच सागराशी मिलन होईल. नाहीतर विविध आकर्षणांचे बांध घालून आपण आपल्या नैसर्गिक प्रवाहाला थांबवितो आणि सागराचे मिलन दूर ढकलतो. अगदी मिलन नाही झाले तरी निदान त्या अथांग समुद्राचा घनगंभीर आवाज तर आपल्या कानात गुंजायला लागेल यात शंका नाही. सद्‌गुरु विश्वाभास मावळतील आणि आपले कल्याण होईल हे खरे असले तरी आपल्या मनात वैराग्य उत्पन्न केले तर सद्‌गुरुंची भेट लवकर होते. संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न करायला या जगातील एकही गोष्ट कष्ट केल्याशिवाय प्राप्त होत नाही आणि हातात आलेले कुठलेही फळ नासल्याशिवाय रहात नाही हे तुम्ही निःसंदेह पटवून घ्या. संसाराबद्दलची विरक्‍ती केव्हा तुमच्या मनात उत्पन्न होईल? जेव्हा आसक्‍तीचे तोटे जाणवायला लागतील तेव्हा. जोपर्यंत तुम्ही सध्याच्या जीवनातच रममाण होऊन ते अधिक चांगले करायच्या प्रयत्‍नात आहात तोपर्यंत विरक्‍ती अंगात कशी येईल? वैराग्य हवे असे न म्हणता जवळ असलेली आसक्‍ती नको असे आधी म्हणा. संसारातील प्रगतीलाच प्राधान्य देणे हळूहळू थांबवा.
सद्‌गुरुंची भेट व्हायला हवी असेल तर संसाराबद्दलची आसक्‍ती सोडायला हवे हे जरी कळले तरी हे संसाराचे बंधन तोडणे सोपे नाही. याचे कारण असे की एकाच प्रचंड मोठ्या दोराने आपण बांधलेलो नाही तर अनंत छोट्या छोट्या नात्यांमध्ये आपण गुंतलो गेलो आहोत. रेशमी किड्याचा कोश नाजूक धाग्यांनी विणलेला असतो हे जरी खरे असले तरी त्यामध्ये फसलेल्या किड्याचा अंतच त्यात गुंफलेला असतो तशी ही गोष्ट आहे. पैसा, मान-सन्मान, जमीन-जुमला, बायको-मुले इत्यादी पाश तोडायला अवघड असायचे कारण म्हणजे यातील एकही बंधन एकसंध नाही तर अनेक सूक्ष्म धाग्यांनी तयार केलेले आहे. आपल्या लहानपणापासून आपल्यावर आजूबाजूच्या लोकांमुळे जे संस्कार झालेले आहेत ते सर्व आपल्या सध्याच्या बंधनांना कारणीभूत आहेत. त्यावर आणि आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेतच. त्यामुळे संसारातून दूर जाऊनही आपली बंधने सुटतीलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. तेव्हा वैराग्य अंगी बाणवायला भौतिक त्याग फारसा उपयोगी नाही. आणि वैराग्य म्हणजे घृणा नव्हे. तिटकाराही नव्हे. वैराग्य अजिबात नकारात्मक भावना नाही. याउलट, सर्वांत सकारात्मक भावना आपल्या जीवनात कुठली असेल तर खरे वैराग्य. एखाद्या गोष्टीबद्दल असलेली नकारात्मक भावना त्या गोष्टीबद्दलचे वैराग्य दर्शवित नाही तर नावड दाखविते. तेव्हा आधी लक्षात घ्या की संसाराबद्दल वैराग्य हवे असेल तर त्याकरीता संसाराबद्दल राग मनात उत्पन्न करु नका. मग करायचे काय? तर संसारातील गोष्टी आहेत तशा बघायची प्रवृत्ती. एखादी गोष्ट अहे तशी बघायचे सामर्थ्य फार कमी जणांच्या भाग्यात लिहीलेले असते! आपण सर्व जण घडणाऱ्या गोष्टीकडे “यातून मला काय मिळणार आहे” या दृष्टीकोणातूनच पहात असतो. जगाकडे तटस्थपणे पहायची सवय आपण मनाला लावली पाहिजे. असे करायचा प्रामाणिक प्रयत्‍न तरी आपण केला पाहिजे. जे काही आपल्या अवतीभवती घडत आहे त्याकडे कुठलाही दृष्टीकोण ठेवून, पूर्वग्रह ठेवून, पहायची आपली जी सवय आहे तीला आपण सोडायची तयारी दर्शविली पाहिजे. ही तयारी ठेवणे म्हणजेच संसारनदीच्या तटावर जायची आपली धडपड होय.
ज्य बुध्दीचा उपयोग करुन आपण या जगात प्रगती केली आहे तीचा आता सदुपयोग करुन जगाबाहेर जायची धडपड आपण करायला हवी. आपल्या हातात नित्यनिरंतर सारासार विचार करणे आहे. आपल्या बाह्य कृतींमधून आपणास अंतर्गत झालेला बोध दिसत आहे का नाही याची पर्वा न करीता दररोज उत्साहाने आपण नित्यानित्यतेचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. या जगात कुठलीही गोष्ट नित्य नाही हे जेव्हा जाणवेल तेव्हा दुःख प्रदर्शित न करीता झालेल्या बोधाबद्दल आनंद मानायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्या दुःखाची नव्वद टक्के कारणे नाहीशी झाली आहेत हे तुम्हाला जाणवेल. दुःख निरसन व्हायला लागले की मनाला सारासार विचार करायची चटकच लागते मग प्रत्येक गोष्टीकडे ते निरपेक्ष नजरेने बघायला शिकते. व्यवहारात सतत जवळ असणारी तटस्थता म्हणजेच आपले सद्‌गुरुंशी झालेले एकत्व होय. ज्याठिकाणी उभे राहून तुम्ही जगाकडे तटस्थतेने बघता ती जागा म्हणजे सद्‌गुरु. तिथे आपण पोहोचलो म्हणजेच त्यांचा आपल्या जीवनात प्रवेश झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि एकदा सद्‌गुरुरुपी सूर्याचा उदय झाला की काय होते याचे वर्णन करणाऱ्या वरील ओव्यांची सत्यता तुम्हाला पटायला वेळ लागणार नाही.

॥ हरि ॐ ॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

अध्याय सोळावा


444: Set New Goals


॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करुनि ठाके उभा ।

तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ॥ ४४४: १६ ॥


सोळाव्या अध्यायातील या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी झालेले ज्ञान स्थिर होण्याकरीता साधकाच्या मनाची अवस्था कशी असावी याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात की: `जेव्हा आपल्या आयुष्यातून काम, क्रोध आणि लोभ संपूर्णपणे निघून जातील तेव्हाच आपण झलेले पारमार्थिक ज्ञान मनात स्थिर होऊन त्या ज्ञानाचा स्वामी होण्याची अपेक्षा करु शकतो.’ ज्याप्रमाणे एखादे उत्तम बी हातात आले तरी त्याची पेरणी चांगली मशागत केलेल्या शेतात केली तरच चांगले पीक हातात येते, त्याचप्रमाणे अध्यात्मिक ज्ञान कर्मधर्मसंयोगाने आपल्या हातात पडले तरी जीवनात ते नीट रुजायला, त्याची पूर्ण जोपासना होऊन फळ हातात यायला मनातील कामक्रोधलोभरुपी तण नसणे आवश्यक आहे.

चाकोरीबध्द जीवन जगण्याचा परीणाम


आपल्याला झालेले ज्ञान स्थिर का होत नाही? खरे म्हणजे आपण इतक्या वेळा ज्ञानेश्वरीचे पारायण केले आहे, संतसाहीत्य वाचले आहे, त्यावरील निरुपणांना आस्थेने गेलो आहोत की आत्तापर्यंत आपली अध्यात्मिक प्रगती व्हायला हवी होती. मग अजून आपल्या जीवनात मूलभूत फरक पडलेला का दिसत नाही? ज्या ज्या वेळी आपण मनापासून प्रवचन ऐकतो, वा एकाग्रतेने ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, त्या प्रत्येकवेळी आपल्याला शाश्वत सत्याची खात्री झालेली असते. खूपवेळा तर आपण त्या शब्दांनी भारावून जाऊन आपले यापुढील जीवन झालेल्या बोधाशी सुसंगत जगायचेच असे ठाम ठरवितो. परंतु आपल्या हा निश्चय फार काळ टिकत नाही. ज्याप्रमाणे कमळाच्या पानावरील एखादा पाण्याचा थेंब अगदी थोड्याशा धक्यानेसुध्दा अस्थिर होतो, त्याचप्रमाणे अगदी थोड्याशा विकल्पाने आपला अध्यात्मिक जीवन जगण्याचा निश्चय डळमळीत होतो. प्रामाणिक साधकाला केवळ एकदोनवेळा नव्हे तर आयुष्यभर असेच घडले आहे हे कळत असते. असे का होते याचे कारण जर नीट कळले नाही तर साधकाचा स्वतःवरील विश्वास ढळायचा संभव असतो व `अध्यात्मिक प्रगती’ आपल्या हातातील गोष्ट नाही अशी खात्री व्हायची शक्यता असते. हा निराशावादी दृष्टीकोन आपल्याला ज्ञानापासून अजूनच दूर खेचतो व त्यामुळे आपण अधिकच हताश व्हायला लागतो. ह्या दुष्टचक्रातून आपण बाहेर पडले पाहीजे. कारण जोपर्यंत आपल्या मनात आत्मविश्वास नाही तोपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून राहण्याशिवाय आपणांस पर्याय नाही आणि जोपर्यंत आपण आपल्या पायावर उभे रहात नाही तोपर्यंत अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. अध्यात्मिक ज्ञान हे स्वतःलाच प्राप्त करुन घ्यायचे असते. कुठलाही देव वा गुरु तुम्हाला तुमचे स्वरुप काय हे सांगू शकत नाही. ते फक्‍त तुमच्या साधनेत मदत करु शकतात. मार्ग तुम्हांलाच चालायचा आहे. तेव्हा मनात आत्मविश्वास असणे जरुरीचे आहे.
वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सतत विचलित होण्याचे कारण दिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जोपर्यंत आपल्याला एखाद्या वस्तूबद्दल आत्यंतिकरीत्या आत्मीयता आहे (काम) वा एखाद्या व्यक्‍तीबद्दल/घटनेबद्दल मनात राग आहे (क्रोध) वा आत्मीयता असलेली गोष्ट आपल्याजवळ असलीच पाहीजे असा हट्ट आहे (लोभ) तोपर्यंत आपली झालेली प्रगती टिकणे अशक्य आहे.
म्हणजे आपले क्षणिक वैराग्य अंगात बाणवायला आपण हे तीन दोष काढून टाकायचा प्रयत्‍न करणे आवश्यक आहे. पण हे दोष आपल्यात आले तरी कसे? जरा विचार केला तर असे आढळून येईल की लहानपणापासून आपल्यावर कळत नकळत असे संस्कार झाले आहेत की जीवन कसे जगायचे याबद्दल आपली मते अगदी ठाम झाली आहेत. आपल्या मनातील काम, क्रोध व लोभ हे अवगुण आपल्या ह्या ठाम मतांचाच परीणाम आहे. पहिले ठाम मत म्हणजे `काही झाले तरी आपल्या माणसांना आपण धरुन राहीले पाहीजे’. जन्माला आल्यावर लगेचच आपल्याला आई-वडील, भाऊ-बहीण इत्यादी नाती स्विकारावी लागतात. त्याशिवाय गत्यंतरच नसते. याशिवाय मित्रमंडळी, बायको-मुले इत्यादी नाती आपण वाढवतोच! जगात रहायचे म्हणजे हे सर्व करणे आलेच. परंतु ह्या सर्व नात्यांमध्ये आपण किती गुंतायचे हे आपल्या हातात असते. लहानपणापासून आपल्या मनात असे ठसविलेले असते की ही नाती आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे ही नाती व्यवस्थित सांभाळण्यातच आपण आपल्या जीवनाची यशस्वीता पहायला लागतो. खासकरुन भारतीय नारीच्या जीवनात ह्या नात्यांना अनन्यसाधारण महत्व दिले जाते. ही नाती नीट न सांभाळणाऱ्या नारीला सर्व समाज दोषी ठरवितो.
लहानपणापासून मनावर झालेला दुसरा संस्कार म्हणजे `मनुष्याच्या कर्तुत्वाची परीक्षा त्याच्या सामाजिक स्थानात पाहणे’. यशस्वी माणसाची व्याख्याच आपण समाजात उच्च स्थान असलेला वा अत्यंत श्रीमंत गृहस्थ अशी करतो. पुरुषार्थाचे लक्षण म्हणून आपण मानसिक शांतिकडे कधीतरी पाहीले आहे काय? किती माणसे मान देतात, किती गाड्या व बंगले आहेत यावरच आपण माणसाच्या कर्तुत्वाची मोजमाप करतो. मग तो गृहस्थ मानसिक शांतीकरीता तडफडत आहे हे कळले तरी त्याच्या जीवनातल्या यशाबद्दल आपण कधीच शंका घेत नाही.
ह्या दोन गोष्टींचा परीणाम म्हणजे स्वतःच्या जीवनात आपले सर्व लक्ष समाजात पुढे येण्याकरीता वा आपल्या जवळच्या माणसांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात गुंतले असते. आजूबाजूची सर्व माणसे अशीच वागत असल्याने आपल्या वागण्यात काही चुकते आहे ही कल्पनासुध्दा आपल्या मनाला शिवत नाही. आपले जीवन अशा चाकोरीत जगण्याचा परीणाम म्हणजे स्वतः यशस्वी आहोत की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्य आपण गमावतो व आपल्या नकळत दुसऱ्या एखाद्या माणसाच्या म्हणण्यावर किंवा एखाद्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये आपले यश बघायला लागतो. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्‍तीची ओढ किंवा त्या वस्तूच्या प्राप्तीबद्दल साहजिकच आत्यंतिक आसक्‍ती निर्माण होते. एकदा आसक्‍ती आली की लोभ आणि क्रोध फार दूर नाहीत! अशा रीतीने, आपल्या ह्या तीन अवगुणांचे मूळ पहायला गेलो तर ते अवगुण आपण जीवनात जे काही महत्वाचे मानले आहे त्याचाच परीणाम आहेत असे दिसून येते. म्हणून जर काम, क्रोध, लोभ जर मुळापासून उखडून काढायचे असतील (ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांत `झाडी करुनी ठाके उभा’ असे व्हायचे असेल) तर आपल्या जीवनाचे ध्येयच बदलायची आवश्यकता आहे. आपले बाकीचे जीवन आहे तसे ठेवून भगवंताच्या प्राप्तीची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे हे आपण जाणून घेतले पाहीजे. ज्या लोकांमध्ये चाकोरीबध्द जीवन झुगारुन देऊन नव्या व्यापक ध्येयाकरता आयुष्य वेचायची धमक आहे त्यांच्यातच पारमार्थिक ज्ञान पचवायची शक्‍ती आहे असे ज्ञानेश्वर महाराजांना ह्या ओवीत सांगायचे सांगायचे आहे असे वाटते.


आपले प्रेम सर्वव्यापक बनवा


आता असे एखादे ध्येय आपण बघू की ज्यामुळे आपले सध्याचे चाकोरीबध्द आयुष्य उध्वस्त होईल व नवीन जीवनाची पहाट उगवेल. खरे म्हणजे असे नवीन ध्येय शोधून त्याच्या प्राप्तीकरीता झटणे हीच खरी साधना होय. हे ध्येय प्रत्येकाला आपले आपण शोधून काढायचे असते. आपल्यापैकी बहुतांशी लोक प्रेमाखातर जगतात. मग ते प्रेम एखाद्या व्यक्‍तीवर असू दे, वा एखाद्या वस्तूवर असू दे, वा एखाद्या सिध्दांतावर असू दे. नेहमीचे जीवन जगताना आपल्या ह्या प्रेमाचा धागा आपण तुटून देत नाही. ज्याप्रमाणे कवडीचुंबकाचे लक्ष घरातील धनाच्या वृध्दीकडे सतत असते त्याचप्रमाणे आपण शक्य असेल तेव्हा आपल्या ह्या प्रेमाची पूर्तता करायची संधी नेहमी शोधत असतो. अशा लोकांचे ध्येय जीवनातल्या प्रेमाची पूर्णता करणे हे होते.
आता प्रेम हा गुण अत्यंत दिव्य आहे आणि अनेक उच्च प्रतीच्या गुणांमध्येही प्रेमाचे महत्व थोर आहे यात शंका नाही. परंतु असे जरी असले तरी त्या प्रेमाचा उपयोग व्यवहारातील गोष्टीवर केला वा जगातील एखाद्या व्यक्‍तीवर केला तर त्याचे उच्चत्व नाहीसे होते. गंगेचे पाणीसुध्दा मद्यपात्रात घातल्यावर अपवित्र होते तशी ही गोष्ट आहे. अशा अमंगळ प्रेमाचा परीणाम म्हणजे जेव्हा आपल्याला हवीहवी वाटणारी गोष्ट मिळत नाही तेव्हा क्रोध येणे, वा आपण प्रेमात पडलेल्या व्यक्‍तीचे दुसऱ्या लोकांशी खेळीमेळीने वागणे असह्य होणे असा व्हायला लागतो. म्हणजे केवळ आपल्या संकुचित वृत्तीमुळे `मनात प्रेम असणे’ ह्या अत्यंत ग्राह्य गोष्टीचासुध्दा आपल्या जीवनावर विपरीत परीणाम होऊ लागतो. जरा विचार केल्यावर हीच गोष्ट सर्व गुणांच्या बाबतीत लागू पडते हे आपल्या ध्यानात येईल. आपल्या जीवनात चांगल्या गुणांचा वापर करुनसुध्दा साधनेत प्रगती का होत नाही अशी शंका असणाऱ्यांनी जरा विचार करावा की आपण कुठल्या हेतूने हे चांगले गुण आपण अंगात बाणवायचा प्रयत्‍न करीत आहोत? जर त्या गुणांचा उपयोग जगातील गोष्टींकरीता होत असेल तर त्यांचा आपल्या साधनेत उपयोग होणार नाही हे ध्यानात ठेवा. हा विचार केल्यावर असे सिध्द होते की मनातील प्रेमाचा साधनेत फायदा होण्याकरीता आपण आपले प्रेम एका ठराविक गोष्टीच्या वा व्यक्‍तीच्या प्राप्तीकरीता न ठेवता सर्वव्यापक बनविले पाहीजे. `प्रेम’ ह्या गुणाला त्याचे खरे रुप दाखवायची संधी आपण दिली पाहीजे!
प्रेम सर्वव्यापक कसे बनवायचे? जेव्हा आपण म्हणतो की एका व्यक्‍तीवर माझे प्रेम आहे तेव्हा खरे म्हणजे त्या व्यक्‍तीच्या माध्यमातून तुमच्याच मनातील आत्तापर्यंत दडलेले प्रेम बाहेर यायचा प्रयत्‍न करीत असते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे व ती निःसंशय पटण्यातच आपले संकुचित प्रेम सर्वव्यापक बनण्याचा मार्ग आहे. असे बघा, जर तुमच्या मनात प्रेम नसते तर त्या व्यक्‍तीवर प्रेम कसे करायचे हे तुम्हाला कळले असते का? मनात प्रेम असल्याशिवाय ते दुसऱ्यावर कसे करता येईल? तेव्हा आपल्या मनात प्रेम असणे ही दुसऱ्यावर प्रेम करण्याकरीता आवश्यक गोष्ट आहे. म्हणून आपण प्रेमात पडलेल्या व्यक्‍तीमुळे आपल्याच मनातील प्रेम आपणांस दिसले असे म्हणण्यात काहीच गैर नाही.
एकदा का ही गोष्ट पटली की तुम्हाला असे वाटेल की आपण प्रेमात पडलेली व्यक्‍ती म्हणजे असा एक दिवा आहे की ज्याच्या उजेडामुळे माझ्या मनातील आत्तापर्यंत अंधारात असलेला प्रेम हा गुण स्पष्ट दिसायला लागला आहे. पण ही गोष्ट फक्‍त `प्रेम’ ह्या गुणाला लागू होत नाही तर सर्वच भावनांना लागू होते. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे मनात राग येतो तेव्हा आपण असा विचार केला पाहीजे की त्या गोष्टीने माझ्या मनातील राग हा गुण दाखविला आहे. थोडक्यात म्हणजे जगातील एखाद्या गोष्टीमुळे वा व्यक्‍तीमुळे आपल्या मनात ज्या काही भावना उठतात त्याचा दोष (वा त्याचे श्रेय) त्या गोष्टीला/व्यक्‍तीला न देता आपण माझ्यामध्ये ह्या भावना होत्याच, फक्‍त ह्या क्षणी मला कळल्या असे मानून स्वतःच्या शोधात मग्न राहू शकतो. असा विचार केल्यास आपल्या जीवनातील सर्वच घटना आपल्या स्वरुपाचे दर्शन आपल्याला देत आहेत ही भावना आपल्या मनात दृढ व्हायला लागेल. साधकाच्या साधनेचे ध्येय स्वरुप जाणून घ्यायचे आहे हे असल्याने जगातील सर्व घटनांबद्दल त्याला एकसारखी आत्मीयता वाटू लागेल, प्रेम वाटू लागेल. असे वाटणे म्हणजेच त्याचे प्रेम सर्वव्यापक होणे होय. एकदा सर्वच गोष्टी आवडू लागल्या की एका ठराविक गोष्टीबद्दल आकर्षण वा लोभ होणार नाही व क्रोध आपोआपच निघून जाईल. आपल्या मनात काम, क्रोध, लोभ निर्माण झाले नाहीत तर ग्रहण केलेल ज्ञान डळमळीत होण्याची शक्यताच उत्पन्न होणार नाही.


॥ हरि ॐ ॥

 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

पसायदान

 

आतां विश्वात्मकें देवें येणें वाग्यज्ञें तोषावें तोषोनि मज द्यावें पसायदान हें
जे खळांची व्यंकटी सांडो तयां सत्कर्मीं रती वाढो भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें
दुरिताचें तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यें पाहो जो जें वांच्छील तो तें लाहो प्राणिजात
वर्षत सकळमंगळीं ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळीं भेटतु या भूतां
चलां कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचें गांव बोलते जे अर्णव पीयूषाचे
चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु
किंबहुना सर्वसुखीं पूर्ण होऊनि तिहीं लोकीं भजिजो आदिपुरुखीं अखंडित
आणि ग्रंथोपजीविये विशेषीं लोकीं इयें दृष्टादृष्ट विजयें होआवें जी
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येणें वरें ज्ञानदेवो सुखिया झाला

 

संत ज्ञानेश्वर म्हणजेच 'माउली' यांनी "ज्ञानेश्वरी  " उर्फ " भावार्थ दीपिका "या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)-  अठराव्या अध्यायाच्या  शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे "पसायदान " मागितले .

श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वांग्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान  मागितले  . या पसायदानात ते मागतात कि जे  वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे .  वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो. सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी  यावे सर्व प्राणीमात्रांना भेटावे . त्या संतांचे  वर्णन ज्ञानेश्वर अस करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने , चेत्नारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न , आणि ज्यांचे  बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत . ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत , ताप नसलेले सुर्य आहेत  ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत . या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी . आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय मिळवून सुखी व्हावे . त्यावर विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वरांना दिला , ज्ञानेश्वर आनंदी झाले .

 

या प्रार्थनेचे वैशिष्ट्य हे की ती धर्म, पंथ, काल या सर्वांच्या पलीकडे आहे. सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे मागणे मागितले आहे. येथे कोणाही विशिष्ट देवतेचे नाव घेतलेले नाही. कोणत्या विशिष्ट पंथाचाही निर्देश केलेला नाही. हा ईश्वर "विश्वात्मक" आहे.ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधी कल्पना या प्रार्थनेत साररूपाने आलेली आहे. मानवजातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्टे ज्या प्रवृत्तीतून उत्पन्न होतात ते खलत्व. माणसांची ही खलवृत्ती व्यक्तिगत सांघिक स्वरूपात कार्य करीत असते. सर्वत्र मंगलाची स्थापना व्हायची असेल तर हे खलत्व नष्ट व्हायला हवे. ज्ञानेश्वर मानतात की ही खलवृत्ती निसर्गदत्त नसून परिस्थितजन्य आहे. माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे. तिला योग्य कार्य मिळायला हवे.त् यासाठी खलत्व नाहीसे व्हायला हवे. मैत्र म्हणजे नि:स्वार्थी, सर्वव्यापी प्रेम. हेच मानवी जीवनाचे, संस्कृतीचे आधारभूत सूत्र होईल. इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश जगाला दिला आहे, आणि प्रसंगी त्यासाठी प्राणार्पणासह सर्व प्रकारचे शासनही स्वीकारलेले आहे. दुष्कर्म नाहीसे होऊन सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या जाणिवेने कार्यरत असणे अपेक्षित आहे. इच्छा कोणतीही असो, ऐहिक वा आध्यात्मिक, व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात त्यामुळे संघर्ष होता कामा नयेत. असे सज्जन सर्वांचे आप्त होवोत आणि विश्वात्मकाची उपासना करोत असा आशय यामध्ये आहे.

 

ज्ञानेश्वरांचा भाव हृदय परिवर्तनावर दिसतो. मानवी मनाला आंतरिक आनंद लाभावा, सर्वांना अनन्य साधारण शांती मिळावी यासाठी ही प्रार्थना आहे. देवाला येथे "विश्वात्मक" असे विशेषण लावले आहे. जगाला परमवस्तूवाचून वेगळे अस्तित्व नाही असे दर्शन ज्ञानेश्वरीत अखंडपणे आलेले आहे. यामध्ये गुरू हाच परमेश्वर असाही एक विचार दिसून येतो. पापी, दुराचारी याऐवजी यामध्ये "खल" हा प्रवृत्तिवाचक शब्द वापरलेला दिसतो. ज्याला आत्मोन्नती साधायची आहे त्याने आपल्यातील वाईट वृत्तींचा बीमोड करायला हवा. सत्संगतीने स्वभावदोष दूर होऊ शकतात. व्यक्तीच्या विकृतींवरील सोपा आणि सहज उपचार सुसंस्कारांचा आहे. तयां सत्कर्मीं रती वाढो म्हणताना त्यात कर्माविषयीचा शास्त्र-चर्चित अर्थ सूचित करायचा आहे. वैयक्तिक स्तरावर सत्कर्माचे प्रेम आणि सामाजिक स्तरावर सर्वांबद्दल प्रीती वाटली पाहिजे. हे घडले तर व्यक्ती आणि समाज यांचे ऐक्य होण्यास उपयोगी ठरेल.


दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात पाहावे, मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.

पाप म्हणजे काय?
सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. `रज-तम'च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------